होळीचा फराळ

ही गीते मागल्या वर्षी हास्यगारवा या ई-(अ)नियतकालिकावर प्रकाशित झाली आहेत.
होळी खेळून झाल्यावर सडकून भूक लागणारच, त्यासाठी लावलेल्य़ा स्टॉल्सवर ऐकवण्यासाठी आजच्या तुफान लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर जाहिराती. यातली सगळी मूळ हिंदी गाणी आता जुनी झाली असली तरी अजूनसुध्दा ऐकू येतात. ती ओळखणे जड जाणार नाही.

१. चटकदार भडंग

भड भड भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग
लई चंवदार, लज्जतदार, याची नको तुलना
भड भड भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग
माझे सरकार, व्हा तय्यार, काढला ताजा घाणा
भड भड भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग

कुरकुरीत चुरमुरे रे
तळलेले दाणे खारे
मस्त मसाला त्यात घालुनी
केली भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग

एकदाच तू खाशील रे
चटक तुला बघ लागेल रे
पुन्हा पुन्हा मग येशील रे,
खाण्या भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग
————————————————————————————-

२. मिठ्ठास बुंदीचे लाडू

बुंदी फर्मास केली, तुझ्यासाठीच रे
बुंदीची चंव खास, ही झक्कास, फर्मास रे
मुद्दाम आज केली, तुझ्यासाठीच रे
बुंदी फर्मास केली, तुझ्यासाठीच रे

बुंदीचा दाणा मोत्यासारखा, मोत्यासारखा
चुरडून घातला मी मेवा सुका, रे मेवा सुका
तुपात तळूनिया, पाकात घोळली ही, तुझ्यासाठी रे
बुंदी फर्मास केली, तुझ्यासाठीच रे
———————————————————————————–

३. मजेदार भेळ

घेरे मस्त मस्त ही भेळ,  घेरे मस्त मस्त ही भेळ
अशी तुला कुठे ना मिळेल, घेरे मस्त मस्त ही भेळ

भेळ फॉर्म्यूला हा माझा, एकदम खासा
तिची चंव वर्णायाला, अपु-या भाषा
घेरे मस्त मस्त ही भेळ,  खा रे मस्त मस्त ही भेळ

बनवेन स्पेशल तुझ्या मनासारखी, मनासारखी
झणझणीत रस्सा घालू की ठेवू सुकी, रे ठेवू सुकी
घेरे मस्त मस्त ही भेळ,  खा रे मस्त मस्त ही भेळ
अशी तुला कुठे ना मिळेल, घेरे मस्त मस्त ही भेळ
——————————————————————————————-

४. गोड पेढे

पेढे घे ना, पेढे घे ना, पेढे घे ना रे

पेढ्यांचा गोडवा, वाटतो ना हवा,
चाखून तर पहा, एकदाच
कंदी पेढा हवा, केशरी की नवा,
सर्वांमध्ये खवा, ताजा ताजा
अप्रतीम आणून खास
त्याला भाजला खरपूस
वेलचीचा स्वादसुध्दा, आहे दिला रे
पेढे घे ना पेढे घे ना, पेढे घे ना रे
पेढे घे ना पेढे घे ना, पेढे घे ना रे
————————————————————————
 ५. पिझ्झा

I know you want me
And you’ll always get me
हॉटेलात वा घरी
फोनवरूनच, दिलीस ऑर्डर,
होईल होम डिलिव्हरी
आत्ता वाटतोय् ना हवा हा खायला ?
साइडडिश नाही लागत त्याला,
एक प्लेट पुरेल रे तुजला,
तुझी भूक पुरी भागवायला
असा मी कोण ?
What’s my name?
what’s my name?
My name is Pizza, पिझ्झा मेजवानी
I am very tasty, तोंडाला सुटले ना पाणी?

प्रेमदिन – व्हॅलेंटाईन डे

प्रेमदिन – व्हॅलेंटाईन डे

इतिहासकाळात होऊन गेलेल्या एका ख्रिश्चन संताच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस पाळण्याची प्रथा सुरू झाली. या दिवशी आपल्या सगळ्याच प्रियजनांची आवर्जून आठवण काढावी असा उद्देश आधी त्यामागे होता. आपल्याला त्यात फारसे कांही वाटणार नाही. ‘सातच्या आंत घरात’ या चित्रपटातील मकरंद अनासपुरे याच्या शब्दांत सांगायचे तर “तुम्ही हे फादर्स डे आणि मदर्स डे पाळून जीवंतपणीच त्यांचे दिवस कसले घालता? आपल्याकडे प्रत्येक दिवसच फादर्स डे आणि मदर्स डे असतो.” तसाच आपला प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे सुद्धा असतो. मात्र गेल्या कांही वर्षात, विशेषतः इंटरनेटचा प्रसार वाढल्यानंतर त्याला विमुक्त प्रणयाचे रूप आले आहे ते अजून तितकेसे सर्वमान्य झालेले नाही. पहायला गेलो तर राधा कृष्ण ते हीर रांझा, बाजीराव मस्तानी वगैरे सगळे आपलेच, पण वैयक्तिक आयुष्यात अशा जोड्या जोडणे म्हणजे लफडी, कुलंगडी व भानगडी. त्यामुळे कुठल्याशा सेंट व्हॅलेंटाईनच्या नांवाने हा दिवस साजरा करायचा!

प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन स्व.कवीवर्य कुसुमाग्रजांच्या शब्दात दिले आहे.


प्रेम या भावनेची व्याप्ती प्रणयभावनेपेक्षा खूप विस्तृत आहे. लहान मुलांना त्यांचे आजी, आजोबा आणि असले तर पणजी, पणजोबा  अत्यंत प्रिय असतात तर वृध्दांना त्यांची नातवंडे, पणतवंडे लाडकी असतात. यांच्यामधल्या सगळ्या पिढ्यांमधील आप्तांचे आपल्याशी मधुर संबंध असतात. शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी, सहकारी वगैरे अनेक लोकांशी आपला स्नेह जुळतो. अनेक नेते, अभिनेते, खेळाडू, गायक, गायिका आणि इतर कलाकार आपल्याला अगदी मनापासून आवडतात, झी टीव्हीवरले लिटल चँप्स आपल्या गळ्यातले ताईत बनले होते ते आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम वाटत होते म्हणूनच. इतकेच नव्हे तर ज्यांची नांवेसुध्दा आपल्याला ठाऊक नसतात आणि पुन्हा भेट होणे जवळ जवळ असंभव असते अशी कांही माणसे जीवनाच्या प्रवासात कुठल्याशा नाक्यावर भेटतात, त्यांच्याबद्दलसुध्दा मनात ओढ निर्माण होते. पशुपक्ष्यांचादेखील लळा लागतो. “भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे” असे पसायदान संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाकडे मागितले आहे. हे परस्परांचे मैत्र मनातल्या प्रेमभावनेमुळेच जडू शकते.

याचा अर्थ म्हणजे मांजराने उंदरावर प्रेम करावे काय असे यावर कांही लोक विचारतात. “घोडा जर गवतावर प्रेम करायला लागला तर त्याने खायचे काय” अशा अर्थाची म्हण हिंदीमध्ये आहे. विचारवंत लोकांना असा प्रश्न पडत नाही. वर दिलेल्या कवितेत कवीवर्य कुसुमाग्रज असे सांगतात, “ज्याला तारायचा आहे त्याच्यावर तर प्रेम करावेच, पण ज्याला मारायचे आहे त्याच्यावरसुध्दा करावे.” तारणे किंवा मारणे हे कर्तव्यानुसार ठरेल, पण शत्रूबद्दलसुध्दा मनात सूडबुध्दी, द्वेषबुध्दी बाळगायचे कारण नाही. महाभारतकालीन युध्दात कांही नीतीनियम असायचे. सूर्यास्त होताच युध्द थांबल्यावर शत्रूच्या गोटात जाऊन त्याची विचारपूस केली जात असे. युध्दात कामी आलेल्या शत्रूलासुध्दा आदराने वंदन केले जाई. कालमानानुसार आज असले नियम पाळता येण्यासारखे नाहीत, तरीही जिनिव्हा कन्व्हेन्शनप्रमाणे कांही संकेत घालून देण्यात आले आहेत. प्रेम ही दैवी भावनाच त्याच्या मुळाशी आहे.

माणसामाणसांनी परस्पर प्रेमबंधनात एकमेकांना गुंतवावे असा प्रचार इतिहासकाळातील ख्रिश्चन धर्मगुरू सेंट व्हॅलेंटाईन याने केला होता. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साजरा करणे सुरू झाले. पुढे त्याचे स्वरूप बदलत गेले. आजचे स्वरूप पाहता प्रेम या शब्दाचा अर्थच माणूस विसरत चालला आहे की काय अशी भीती संवेदनशील उदारमतवादी लोकांना वाटते आहे, तर हे सगळे भारतावर पाश्चिमात्य संस्कृती लादण्याचे कारस्थान आहे असा समज सनातनी विचाराच्या लोकांचा झाला आहे. यातून आपल्या मालाची विक्री वाढवून फायदा कमवायचा प्रयत्न व्यापारी करीत आहेत. एका बाजूच्या युवकांना धमाल मस्ती करायला एकादे निमित्य हवे असते, तर विरोधाचे निमित्य करून वेगळ्या प्रकारचा धिंगाणा घालायला दुसरे कांही लोक सदैव तयार असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणांनी दर वर्षी व्हॅलेंटाईन डे गाजतो. त्या सगळ्या कल्लोळात विसरली जात असेल तर ती आहे प्रेमभावना!

कुसुमाग्रजांच्या कवितेत वैश्विक प्रेमाचे गाणे असले तरी त्यात दिलेले एकूण एक दाखले श्रीकृष्णाच्या जीवनातल्या घटनांशी संबंधित आहेत. त्यामुळे कृष्णाचे नांवही न घेता त्याने सांगितलेल्या गीतेचा हा सारांश आहे असेसुध्दा म्हणता येईल. खाली दिलेल्या कवी मंगेश पाडगांवकरांच्या गाण्यात तुमच्या आमच्या ‘सेम’ असलेल्या प्रेमाचे मार्मिक दर्शन घडते.
प्रेम म्हणजे प्रेम असतं
 
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ? या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा,  तरीसुद्धा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लगतात !
आठवतं ना ? तुमची आमची सोळा जेव्हा, सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता  वाचलो होतो !
बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

सांचीचे स्तूप – भाग ३

 सांची येथील स्तूपांची प्रवेशद्वारे किंवा तोरणे हा सांचीदर्शनाचा सर्वात जास्त आकर्षक, सुंदर आणि महत्वपूर्ण भाग आहे. कल्पकता, कलादृष्टी, हस्तकौशल्य आणि चिकाटी या सर्व गुणांचा परमोच्च असा संगम या शिल्पकृतींमध्ये झालेला दिसतो. सांची येथील मुख्या स्तूपाच्या चार दिशांना चार भव्य अशी तोरणे आहेत, तर इतर स्तूपांसमोर एक किंवा दोन आहेत. मूळ स्तूपांचे बांधकाम होऊन गेल्यानंतर शेदोनशे वर्षांनंतर ही तोरणे बांधली गेली असे पुरातत्ववेत्ते सांगतात. तशी ती मुख्य स्तूपांपासून वेगळीच आहेत.

प्रत्येक तोरणासाठी जमीनीवर दोन उंच असे स्तंभ उभे केले आहेत. प्रामुख्याने हे चौकोनी आकाराचे आहेत, पण कांही ठिकाणी त्याच्या कडा घासून तिथे नक्षीकाम केले आहे तर कांही जागी त्यात सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. चार हत्ती, चार सिंह किंवा चार बटू वगैरे आकृती अशा खुबीने कोरल्या आहेत की वरील तोरणाचा भार ते उचलून धरत आहेत असेच वाटते. या दोन खांबाच्या माथ्यावर विशिष्ट अशा वक्र आकाराच्या तीन आडव्या शिळा ठेवल्या आहेत. त्यातील दर दोन शिळांमध्ये एक पोकळी ठेऊन त्या पोकळ्यांमध्ये तसेच सर्वात वरील शिळेच्या माथ्यावर सुंदर मूर्ती ठेवल्या आहेत. हे सारे शिल्प एकाच अखंड प्रस्तरातून कोरले आहे असे वाटत नाही, पण त्यामधले सांधे बेमालूम पध्दतीने जोडले आहेत, त्यामुळे ते सहजपणे दिसून येत नाहीत.

या कमानींचे उभे खांब व आडव्या पट्ट्या यांवर अगणित सुरेख शिल्पे कोरलेली आहेत. ती सारी पॅनेल्सच्या स्वरूपात आहेत. द्विमिती चित्रांनाच थोडा उठाव देऊन त्यातून त्रिमितीचा भास निर्माण केला आहे. अनेक प्रकारच्या आकृती या चित्रांमध्ये एकमेकीमध्ये गुंतवल्या असल्यामुळे सत्य आणि कल्पित यांचे अगम्य असे मिश्रण या कलाकृतींमध्ये दिसते. यातील चित्रांचे मुख्य विषय आहेत :
१. जातक कथांमधील दृष्ये
२. गौतम बुध्दाच्या आयुष्यातील प्रसंग
३. बौध्द धर्माशी निगडित बुध्दानंतरच्या काळातील प्रसंग
४. मानुषी बुध्दांशी निगडित दृष्ये
५. विविध प्राणिमात्र व वनराई वगैरेंची चित्रे आणि कलाकुसर

जातक कथांमध्ये गौतमबुध्दाच्या पूर्वायुष्याच्या गोष्टी आहेत. ती बौध्दधर्मीयांची पुराणे आहेत असे म्हणता येईल. या पूर्वजन्मांमध्ये गौतमाने मनुष्य रूपात तसेच विविध प्राणी व पक्षी यांच्या रूपात जन्म घेतले होते. त्यात छद्दंत नांवाचा सहा दांत असलेला गजराज, महाकपी नांवाचा वानर, एक शिंग असलेले हरिण वगैरेंच्या उद्बोधक कथा आहेत. समा नांवाच्या मातृपितृभक्त मुलाची गोष्ट श्रावणबाळाच्या गोष्टी सारखी आहे. या कथांमधील प्रसंग चित्रमय पध्दतीने दाखवले आहेत. प्रत्येक चित्रामधील अनेक पात्रांच्या मुद्रा व त्यांचे हांवभाव पाहण्यासारखे आहेत.

गौतमबुध्दाच्या जीवनातले प्रसंग त्याच्या जन्माच्या आधीपासून सुरू होतात. त्याची आई मायादेवी हिला एक दृष्टांत होऊन एक महात्मा तिच्या उदरी जन्माला येणार असल्याचे समजते. सिध्दार्थाच्या जन्मामुळे राजधानीत सर्वांना आनंदीआनंद होतो, त्यानंतर कुमार सिध्दार्थाचे बालपण, यशोधरेबरोबर विवाह, त्याने रथात बसून राज्याचे निरीक्षण करायला बाहेर पडणे, घरदार सोडून रानात जाणे, बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती होणे वगैरे सारा कथाभाग कांही प्रत्यक्ष रूपाने तर कांही अप्रत्यक्ष रूपाने दाखवला आहे.

एक सजवलेला घोडा त्यावर आरूढ झालेल्या राजकुमाराला घेऊन रानाच्या दिशेने जातो आणि उलट दिशेने एक रिकामा घोडा खाली मान घालून परत येतांना दिसतो एवढ्या दोन चित्रांतून गौतमाचे तपश्चर्या करण्यासाठी रानात जाणे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे बोधीवृक्षाखाली गौतमाची आकृती न दाखवताच त्याचे तिथे असणे सूचित केले आहे.

बौध्द धर्माच्या प्रसारार्थ गौतमबुध्दाने तसेच त्याच्या प्रमुख अनुयायांनी मोठमोठे दौरे काढून जागोजागी प्रवचने दिली, संघ स्थापन केले, त्यांना अनेकविध माणसे भेटली. त्यात कांही राजे होते तर कांही दीनवाणे पीडित लोक होते, कांही पंडित होते तशाच गणिकासुध्दा होत्या. या सर्वांचा कसा उध्दार झाला हे वेगवेगळ्या कथांमध्ये सांगितले आहे. महावीर हा अखेरचा तीर्थंकर होता तसेच गौतम हा शेवटचा बुध्द होता, त्याच्या आधीसुध्दा कांही बुध्द होऊन गेले अशी बौध्दधर्मीयांची मान्यता आहे. त्या सर्वांच्या जीवनाशी निगडित कथा आहेत. या सर्वच गोष्टी चमत्कारांनी भरल्या आहेत. त्यातल्या त्यात ज्या शक्यतेच्या कोटीतल्या वाटतात त्यांचा समावेश इतिहासात केला गेला असावा. सांची येथील तोरणांवरील चित्रांत शक्य व अशक्य या दोन्ही प्रकारच्या गोष्टी दाखवल्या असल्यामुळे त्या एकमेकीत मिसळून गेल्या आहेत. लक्षपूर्वक पाहून त्या चित्रांचा अर्थ लावावा लागतो.

याशिवाय अनेक प्रकारचे जलचर व थलचर पशु, पक्षी तसेच झाडे, पाने, फुले वगैरेंनी ही चित्रे सुशोभित केलेली आहेत. त्यातले अनेक पाकळ्यांचे कमळ, धम्मचक्र, स्तूपाचा बाह्य आकार, बोधीवृक्ष, त्याखाली जिच्यावर बसून गौतमबुध्दाने तप केले ती शिला, सम्राट अशोकाचे चार सिंह वगैरे कांही प्रतीके अनेक जागी कोरलेली दिसतात. हे चार सिंह आणि चक्र यांना भारताच्या नाण्यांवर व नोटांवर स्थान मिळाले आहे.

तोरणाचे स्तंभ आणि आडव्या शिला यांच्या माथ्यावरील मोकळ्या जागांवर पूर्णपणे त्रिमित अशा आकृती आहेत. यांत घोड्यावर किंवा हत्तींवर बसलेले स्वार, नृत्य करणा-या नर्तकी वगैरे आहेत. कांही मनुष्याकृतींना तर आतल्या बाजूला पहाणारे एक आणि बाहेरच्या बाजूने पहाणारे दुसरे अशी दोन दोन तोंडे आहेत. माणसाने बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावे तसेच अंतर्मुखसुध्दा व्हावे असे यातून सुचवले आहे.

अशा प्रकारच्या खूप मजा इथे आहेत. ही चित्रे पाहण्यासारखी आहेतच, पण त्याबरोबर विचार करायला लावणारी आहेत. मात्र त्यासाठी बौध्द धर्म, त्याचे तत्वज्ञान, त्यांच्या समजुती वगैरेंची माहिती असायला हवी.

. .  . . . . . . . . (समाप्त)

सांचीचे स्तूप – भाग २

बौध्द धर्माच्या पुरातनकालीन परंपरेत स्तूप म्हणजे एक समाधी किंवा स्मारक असते. महात्मा गौतम बुध्दाचे महानिर्वाण ख्रिस्तजन्माच्या पाचशे वर्षे आधी होऊन गेले. तत्कालिन भारतीय परंपरेनुसार त्यांचेवर दाहसंस्कार करून त्यावर एक समाधी बांधली गेली. ती कदाचित स्तूपाच्या आकाराची असावी. त्यानंतर सुमारे तीन शतकांनी सम्राट अशोक याने बौध्द धर्माचा स्वीकार केला आणि त्याच्या प्रसाराचे काम हिरीरीने पुढे नेले. त्याने त्यापूर्वी केलेल्या निरनिराळ्या लढायांत प्रचंड मानवसंहार झाला होता. त्या पापातून मुक्त होऊन चौर्‍याऐंशीच्या फेर्‍यांतून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने बोधिसत्वाचे चौर्‍याऐंशी हजार स्तूप बांधले होते अशी आख्यायिका आमच्या मार्गदर्शकाने सांगितली. एकाच पुण्यात्म्याच्या अनेक जागी समाध्या असणे मी तर कधी ऐकले नाही. त्यात तीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या मानवाच्या पार्थिवाचे चौर्‍याऐंशी हजार भागात विभाजन करणे शक्यतेच्या कोटीतले वाटत नाही. त्यामुळे यात अतीशयोक्ती वाटली. चक्रवर्ती सम्राट अशोकाकडे सत्ता आणि समृध्दी या दोन्ही गोष्टी मुबलक असल्यामुळे त्याने गांवोगांवी भिक्खूंसाठी मठ बांधून दिले असतील आणि ते दुरूनही चटकन ओळखू यावेत यासाठी टेकड्या टेकड्यांवर स्मारकाच्या रूपात स्तूप उभे केले असण्याचीही शक्यता आहे. त्या कालातले सारेच बांधकाम दगड, माती, विटा वगैरेंपासून केलेले असल्यामुळे ते दोन हजार वर्षांच्या दीर्घ कालौघात वाहून गेले असणार. त्यातल्या त्यात सांची येथील काम आज जास्तीत जास्त सुस्थितीत दिसते, पण त्यामागे वेगळीच कारणे आहेत.

महात्मा गौतम बुध्दाचा जन्म आजच्या नेपाळमधील लुंबिनी या जागी झाला. राजकुमार सिध्दार्थ या नांवाने तो कपिलवस्तू या नगरात वाढला. राजवाड्यातील सुखी जीवनाचा त्याग करून सत्याचा शोध घेण्यासाठी तो अरण्यात गेला आणि बिहारमधल्या गया शहराजवळ बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करतांना त्याला ज्ञानप्राप्ती झाली. आपल्या मतांचा प्रसार करण्यासाठी तो आजचा उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ या भागात पुढे आयुष्यभर भ्रमण करत राहिला. आजच्या मध्यप्रदेशातील सांची या गांवाला गौतमबुध्दाने कधीच भेट दिली नव्हती. मग त्याची समाधी किंवा एवढे मोठे स्मारक इथे कां बांधले गेले? या प्रश्नाचे एक कारण असे दिले जाते की सम्राट अशोकाच्या एका राणीचे माहेर नजीकच असलेल्या विदिशानगरीत होते. त्यामुळे त्याचा थोडा ओढा या बाजूला होता. हा भाग आर्थिक दृष्टीने समृध्द होता आणि विदिशा हे एक महत्वाचे शहर होते. मोठ्या शहराच्या जवळ पण उंच टेकडीवर असल्यामुळे त्यापासून थोडे अलिप्त अशी ही निसर्गरम्य जागा भिख्खूंना राहण्यासाठी आकर्षक होती. असा सर्व बाजूंनी विचार दूरदृष्टीने करून सम्राट अशोकांने या जागी फक्त एक स्तूपच बांधला नाही, तर बौध्द धर्माच्या अभ्यासाचे आणि प्रसाराचे एक प्रमुख केंद्र या जागी उभे केले.

देशभरातील शिकाऊ तसेच अनुभवी भिख्खू इथे येऊन रहात असत आणि प्रशिक्षण घेऊन तयारीनिशी धम्मप्रसारासाठी बाहेर पडत असत. यात हे केंद्र चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आणि पुढील तेरा शतके त्याचा विकास अधून मधून होत राहिला. वेगवेगळ्या काळातल्या तत्कालिन राजांनी त्याच्या सौंदर्यात आणि समृध्दीत वेळोवेळी भर घातली. सम्राट अशोकाने बांधलेला मुख्य स्तूप फक्त विटांनी बांधलेला होता. कांही काळाने तो मोडकळीला आला. तेंव्हा त्याची डागडुजी करून त्याच्या सर्व बाजूंनी दगडी बांधकाम केले गेले. नंतर कोणी त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरुषभर उंच असा चौथरा सर्व बाजूंनी बांधून त्यावर चढण्याउतरण्यासाठी दगडी पायर्‍या बांधल्या. भारताचे सुवर्णयुग मानले जाणार्‍या गुप्तवंशाच्या राजवटीत अनेक सुंदर मूर्ती या परिसरात बसवल्या गेल्या. बौध्द धर्म परमेश्वराची मूर्तीपूजा मानत नाही. त्यांच्या मताप्रमाणे तो निर्गुण निराकार आहे. त्यामुळे परमेश्वराची कोणत्याही सगुण रूपातली प्रतिमा इथे दिसत नाही किंवा तिची पूजाअर्चा होत नाही, पण बुध्दाच्या मात्र अगणित रूपामधील प्रतिमा पहायला मिळतात. मुख्य स्तूप बांधून कांही शतके लोटल्यानंतर इतर स्तूप त्या जागी बांधले गेले, तसेच त्यांना आकर्षक अशी प्रवेशद्वारे बांधली गेली. सांचीच्या स्तूपामधील सर्वात सुंदर, अगदी अप्रतिम म्हणता येईल असा भाग म्हणजे स्तूपांच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना उभ्या केलेल्या कमानी किंवा तोरणे आहेत. इतके सुंदर प्रवेशद्वार आणि आत गेल्यावर पाहण्यासारखे विशेष असे कांहीच नाही असा अनुभव आपल्याला फार क्वचित येतो. या कमानींबद्दल सांगण्यासारखे खूप असल्यामुळे ते पुढील भागात देईन.

सम्राट अशोकाचे एकछत्र साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा भाग कधी एकाद्या चक्रवर्ती सम्राटाच्या अधिपत्याखाली यायचा तर कधी स्थानिक राजेरजवाडे शिरजोर होत असत. त्यांच्या मर्जीनुसार कधी बौध्द धर्माला महत्व प्राप्त होत असे, तर कधी त्याचा राजाश्रय काढून घेतला जात असे. हा उतार चढाव तेरा शतके इतका प्रदीर्घ काळ चालल्यानंतर बहुधा बौध्द धर्मीयांनी या जागेला कायमचा रामराम ठोकला असावा. कारण अकराव्या शतकानंतरच्या काळातला एकही बौध्द धर्माशी संबंधित अवशेष येथील उत्खननात सापडला नाही. त्यानंतर इतर कोणीही या जागेचा सदुपयोग न केल्यामुळे ती पुढील सातआठ शतके पडून राहिली होती. मोठ्या स्तूपांची पडझड झाली होती, लहान लहान स्तूप दगडामातीच्या ढिगा-यांखाली गाडले गेले होते आणि सगळीकडे दाट झाडाझुडुपांची गर्दी झाली होती. भारतातील इतर कांही सौंदर्यस्थळांप्रमाणेच सांचीच्या प्राचीन स्तूपांचा नव्याने शोध एका इंग्रज अधिका-याने लावला.

अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी भारतात चांगलेच हातपाय पसरवले होते. मोगलाई आणि मराठेशाही लयाला चालली होती. त्यांच्या प्रमुख सरदारांना राजेपद आणि नबाबी देऊन इंग्रजांनी आपले मांडलिक बनवले होते. त्या राजांना संरक्षण, मदत, सल्ला वगैरे देण्याचे निमित्य करून जागोजागी इंग्रज अंमलदार पेरून ठेवले होते आणि त्यांच्या दिमतीला कवायती फौजा दिल्या होत्या. जे याला तयार झाले नाहीत त्यांची राज्ये खालसा करून इंग्रजांच्या अधिपत्याखाली आणण्याचा सपाटा चालवला होता. सन १८१८ मध्ये त्यांनी पुण्यातली पेशवाई कायमची बुडवली त्याच वर्षी भोपाळच्या नवाबाच्या पदरी असलेल्या जनरल टेलरला सांचीचा स्तूप अचानक सापडला. टेहेळणी करण्याकरता तो तिथल्या टेकडीवर चढून गेला असतांना झाडाझुडुपांच्या आत लपलेल्या स्तूपाचा भाग त्याला दिसला. झाडेझुडुपे तोडून आणि दगडमातीचा ढिगारा बाजूला केल्यावर त्याला स्तूपाचा आकार दिसला आणि त्याने त्या गोष्टीची नोंद केली.

त्या पुरातन वास्तूच्या आत एकादा खजिना गाडून ठेवला असल्याची भूमका उठली आणि त्याच्याबरोबरच त्या द्रव्याचे रक्षण करणारी एकादी दैवी किंवा पैशाचिक शक्ती त्या जागी वास करत असल्याच्या वावड्याही उठल्या. त्यांना न जुमानता कांही धीट भामट्यांनी स्तूपाच्या आतमध्ये आणि आजूबाजूला बरेच खोदून पाहिले आणि खजिन्यांऐवजी अस्थी किंवा राखेने भरलेले कलश मिळाल्यावर कपाळाला हात लावला आणि हाताला लागेल ते उचलून नेले. या सगळ्या गोंधळात येथील प्राचीन ठेव्याचा बराच विध्वंस झाला. अशोकाने स्तूप बांधतांना त्याच्या समोर दगडाचा एक सुरेख स्तंभ उभा केला होता. त्याचे तुकडे नंतर शेजारच्या गावातल्या जमीनदाराकडे मिळाले. तेलबियांमधून तेल गाळण्यासाठी किंवा उसाचा रस काढण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात होता म्हणे.

इंग्रजी राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर ब्रिटीशांच्या केंद्रीय सरकारमध्ये पुरातत्वशाखेची स्थापना करण्यात आली आणि त्या खात्यातर्फे या जागी योजनाबध्द रीतीने उत्खनन आणि साफसफाई करून जमीनीखाली दडलेली देवळे, स्तूप, कमानी, निवासस्थाने वगैरे काळजीपूर्वक रीतीने शोधून काढण्यात आली. पडझड जालेल्या सर्व स्तूपांची डागडुजी आणि आवश्यक तेवढी पुनर्बांधणी करून त्यांना पूर्वीची रूपे देण्यात आले. या कामाचे सर्वाधिक श्रेय सर जॉन मार्शल यांनी सन १९१२ ते १९१९ या काळात केलेल्या अभूतपूर्व अशा कामगिरीला जाते. त्यांनी पाया घालून दिल्यानंतर पुढे आलेल्या संशोधकांनी हे काम चालू ठेवलेच आणि आजही ते चाललेले आहे. जागतिक कीर्तीच्या पुराणकालीन अवशेषांमध्ये म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सांचीचा समावेश होतो आमि जगभरातले अभ्यासू या जागंला भेट देण्यासाठी इथे येतात.

इतस्ततः सापडलेले कमानींचे तुकडे गोळा करून आणि जोडून त्या उभ्या करण्यात आल्या. अशोकस्तंभ मात्र पुन्हा एकसंध करता येण्यासारखा नसल्यामुळे खंडितच राहिला. त्याचा जमीनीलगतचा खालचा भाग स्तूपाच्या जवळच जमीनीत गाडलेल्या स्थितीत आहे. मधला मोठा तुकडा आडवा करून एका शेडमध्ये ठेवला आहे आणि चार दिशांना चार सिंहाची तोंडे असलेला शीर्षभाग म्यूजियममध्ये ठेवला आहे. आतून भरीव असलेले स्तूपसुध्दा कालौघात अभंग राहिलेले नव्हते त्या ठिकाणी बांधकाम करून उभारलेली देवळे टिकणे शक्यच नव्हते. त्यामुळे ती सगळी भग्नावस्थेत सापडली आणि त्याच अवस्थेत राखून ठेवली आहेत. उभे असलेले सुंदर खांब, कांही तुळया, चौकटी, कोनाडे, शिखरांचे भाग वगैरेवरून तत्कालिन वास्तुशिल्पकलेचा पुरेसा अंदाज येतो. त्यातली कोणतीच वास्तु आकाराने भव्य नाही, पण ज्या आकाराच्या दगडांचा वापर त्यात केलेला दिसतो ते पाहता कोणत्याही यांत्रिक सहाय्याशिवाय या शिला खडकातून खोदून कशा काढल्या असतील, कशा तिथवर आणल्या असतील आणि कशा रीतीने खांबांवर चढवल्या असतील याचे कौतुक वाटते. एका जागी रांगेत ओळीने उभ्या असलेल्या सात आठ उंच खांबांवर सरळ रेषेत मोठमोठ्या फरशांच्या तुळया मांडून ठेवल्या आहेत. त्यांना पाहून अशा प्रकारच्या ग्रीक व रोमन अवशेषांची आठवण येते.

पूर्वीच्या काळातल्या मठांच्या अस्तित्वाच्या खुणा अनेक ठिकाणी दिसतात. त्यातील एका मुख्य जागी एक संपूर्ण मठच उत्खननातून बाहेर निघाला आहे. या आयताकृती जागेत सरळ रेषेत अत्यंत प्रमाणबध्द अशा अनेक लहान लहान चौकोनी खोल्या दगडांच्या भिंतीतून बांधल्या होत्या. देशविदेशातून आलेले बौध्द धर्माचे विद्वान, प्रसारक आणि विद्यार्थी तिथे राहून अध्ययन, अध्यापन, ध्यानधारणा वगैरे गोष्टी करत असतील. मठाच्या या इमारतींना लागूनच एक अवाढव्य आकाराचा दगडी कटोरा ठेवला आहे. सर्व भिख्खूंना मिळालेले अन्न त्यांनी त्यात टाकायचे आणि सर्वांनी मिळून ते भक्षण करायचे असा रिवाज त्या काळी असावा.

या जागी केलेल्या उत्खननात अगणित नाणी, मातीच्या भांड्यांचे तुकडे वगैरे मिळाले आहेत. अनेक लहान मोठ्या आकाराच्या दगडी प्रतिमा आहेत. त्यातील कांही बहुतांश शाबूत आहेत, कांहींचे थोडे तुकडे निघाले आहेत, तर कांही छिन्नविछ्छिन्न अवस्थेत आहेत. अनेक शिलालेख आहेतच, शिवाय खांब, तोरण वगैरेंवर लिहिलेला बराच मजकूर स्पष्टपणे दिसतो. पण तो बहुधा ब्राम्ही लिपीत असल्यामुळे आपल्याला वाचता येत नाही आणि पाली भाषेत असल्यामुळे कळणारही नाही. पुरातत्व खात्याच्या दृष्टीने सांची हे फार महत्वाचे ठिकाण आहे. त्यांचे तज्ज्ञ या सगळ्यांचा सुसंगत अर्थ लावून त्यातून निष्कर्ष काढत असतात.

…. . . . . . . (क्रमशः)

सांचीचे स्तूप – भाग १

शाळेत शिकतांना इतिहास आणि भूगोल या दोन्ही विषयात सांचीबद्दल थोडेफार वाचनात आले होते, त्या भागातून रेल्वेने जातांना मुद्दाम लक्ष ठेऊन सांची स्टेशनजवळच असलेल्या टेकडीवरील त्या वास्तूच्या घुमटांचे दर्शन घेतले होते, पण मुद्दाम मुंबईहून इतक्या दूर खास तेवढ्यासाठी जाण्याएवढी तीव्र इच्छा मात्र कधी झाली नव्हती. विदिशाला जाण्याचा योग आला तेंव्हा मात्र सांची पाहूनच परत यायचे ठरवले.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन वर येण्याच्या आधीच आम्ही घरातून निघालो आणि पंधरा वीस मिनिटात सांचीला पोचलो तोंवर ते अजून कोवळेच होते. विदिशाहून भोपाळकडे जाणार्‍या महामार्गावरून जातांना सांचीच्या स्तूपाकडे जाण्यासाठी एक फाटा फुटतो. त्या फाट्यावर वळताच लगेच पुरातत्वखात्याची चौकी लागली. तिथली तिकीटाची खिडकी उघडलेली होती. भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, बांगलादेश वगैरे भरतखंडातल्या पर्यटकांसाठी माणशी दहा रुपये तिकीट आहे तर इतर देशातील नागरिकांसाठी त्याचा दर थेट अडीचशे रुपये इतका आहे असे तिथल्या फलकावर लिहिलेले होते. अमेरिकेत जन्मलेल्या आपल्या लहानग्या नातवाला सोबत आणले तर इतके पैसे द्यावे लागतील असा शेरा कोणी मारला, पण जगातल्या सगळ्याच लहान मुलांना इथे विनामूल्य प्रवेश असल्यामुळे सध्या तरी तशी वेळ आलेली नाही अशी दुरुस्ती केली गेली. दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी वेगवेगळे दर दाखवणारा तक्ता दिला होता, पण त्याची वसूली करणारा नगरपालिकेच्या कंत्राटदाराचा कर्मचारी अजून आला नसावा. तो वाहनतळावर बसला असेल असे समजून आम्ही आपली गाडी पुढे दामटली.

स्तूप ज्या टेकडीवर आहेत तिथपर्यंत वर चढण्यासाठी चांगला रस्ता आहे. वर गेल्यावर एक लहानसा पार्किंग लॉट होता. वीस पंचवीस गाड्या तिथे उभ्या राहू शकल्या असत्या. तिथे जागा नसली तर तिथे पोचण्याच्या रस्त्याच्या कडेने आणखी चाळीस पन्नास गाड्या उभ्या करता येतील. एकाच वेळी याहून जास्त संख्येने तिथे येणार्‍या वाहनांची संख्या कधी होत नसणार. रमत गमत वेळ घालवण्यासारखे हे ठिकाण नसल्यामुळे कोणीही तिथे तासभरसुध्दा रहात नसेल.

त्या दिवशीच्या पर्यटनाची बोणगी आम्हीच केली होती. त्यामुळे रस्त्यावरही कोणी भेटले नाही आणि पार्किंग लॉटही अगदी रिकामा होता. वाहनतळाच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या सावलीला कार उभी करून आम्ही गेटपाशी गेलो. तिथली झाडलोट, राखणदारी वगैरे करणारे दोन तीन कर्मचारी गप्पा मारत बसले होते. आम्ही प्रवेश केल्यावर त्यातलाच एकजण माहिती द्यायला तयार झाला. त्याच्या बरोबर आम्ही समोरच असलेल्या मुख्य स्तूपाकडे वळलो.

यापूर्वी सारनाथला एकच भव्य आकाराचा स्तूप पाहिल्यासारखे मला आठवत होते आणि शाळेत असतांना पाहिलेल्या सांचीच्या चित्रांत एकच स्तूप असायचा. रेल्वेतून जातांनासुध्दा टेकडीच्या माथ्यावर असलेला एकच स्तूप पाहिला होता. प्रत्यक्षात ती टेकडी चढून वर गेल्यावर तिच्या शिखरस्तानी एक मोठा स्तूप आणि त्याच्या जवळच उतारावर दोन मध्यम आकाराचे स्तूप दिसले. लहान सहान अगणित स्तूपांचा तर सडा पडला होता. असे दृष्य पाहणे मला अगदी अनपेक्षित होते. एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असलेल्या इतक्या स्तूपांचे कांही प्रयोजन वरवर तरी दिसत नव्हते.

लहानपणी स्तूपाचे चित्र पाहून ती एक वर्तुळाकृती इमारत असावी आणि तिच्या माथ्यावर अर्धगोलाच्या आकाराचा घुमट बांधलेला असावा असाच माझा समज झाला होता. अशा प्रकारचे घुमट अडीच हजार वर्षांपूर्वी कोणत्या तंत्राने बांधले गेले असतील आणि त्यांचा भार कशाच्या आधारावर तोलला जात असेल असे तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न इंजिनियरिंग शिकल्यानंतर पडू लागले. शिवाय असे घुमट बांधण्याचे कौशल्य जर ख्रिस्तपूर्व युगात भारतीयांकडे होते तर ते मध्येच लुप्त होऊन पुन्हा इस्लामी राजवटीत कां प्रगट झाले असाही प्रश्न सतावू लागला. त्यांचे उत्तर सारनाथला मला मिळाले. तेथील स्तूपाला प्रदक्षिणा घालून पाहिली, पण कोठेच आत जाण्याचा दरवाजा दिसला नाही. आजूबाजूला कोणता भुयारी मार्गही सापडला नाही. अखेर चौकशी करता स्तूप ही इमारत नसून तो एक प्रकारचा बुरुज आहे असे समजले. आंतमध्ये दगडमातीचा ढिगारा रचून त्याला विवक्षित आकार देण्यासाटी बाहेरून भिंत बांधली होती. त्याला पोकळी नव्हतीच, त्यामुळे त्याच्या आंत प्रवेश करण्याचा प्रश्नच नव्हता. ही माहिती मला मिळालेली असल्यामुळे सांचीच्या स्तूपाकडे पाहतांना तिच्याकडे एक इमारत या नजरेने मी पाहिलेच नाही.

. . . . . . . . . . . (क्रमशः)

मकर संक्रांत

आज मकरसंक्रांत आहे. म्हणजे काय आहे हे सांगणारे लेख बहुतेक वर्तमानपत्रात आले आहेतच. माझ्या लहानपणी आमच्या घरात टिळक पंचांगाचा उपयोग केला जात असे. हे पंचांग वापरणारे फारच थोडे लोक गावात रहात असल्यामुळे ते मुद्दाम पुण्याहून मागवले जात असे. त्या काळात टिळकपंचांगातली संक्रांत दरवर्षी १० जानेवारीला येत असे. वर्षभरातले बाकीचे सारे सण तिथीनुसार येतात आणि दरवर्षी ते वेगळ्या तारखांना येतात, पण ही संक्रांत तेवढी इंग्रजी तारखेनुसार कशी येते याचे आश्चर्य वाटायचेच, शिवाय इतर पंचांगात ती १४ तारखेला येत असतांना टिळक पंचांगात चार दिवस आधी का येते याचे एक वेगळे गूढ वाटत असे. कदाचित देशभक्त टिळकांवर इंग्रजांचा राग असल्यामुळे ते लोक संक्रांतीला त्यांच्याकडे आधीच पाठवत असावेत.

संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून तिच्या फलाचे वाचन केले जात असे. घरातील सर्वांनी एकत्र बसून ते ऐकण्याची प्रथा होती. गणपतीचे वाहन उंदीर, शंकराचे नंदी याप्रमाणे सर्व देवदेवतांची वाहने ठरलेली आहेत, पण ही संक्रांत मात्र दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असे, शिवाय तिचे एक उपवाहन असे. ती कुठल्यातरी दिशेकडून येत असे आणि कुठल्यातरी दिशेला जात असे. शिवाय तिचे मुख तिसरीकडे असे आणि दृष्टी चौथ्या दिशेला. त्या सर्व दिशांना राहणा-या लोकांना त्यानुसार फळ मिळते अशी धारणा होती. या सर्व दिशा कोणत्या केंद्रबिंदूच्या सापेक्ष आहेत ते दिले नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावायला मोकळा होता. या सगळ्यातून काय अर्थ निघणे अपेक्षित आहे याचा मला आजपर्यंत पत्ता लागलेला नाही.

एकाद्यावर संक्रांत आली म्हणजे त्याचा आता विनाश किंवा निदान नुकसान तरी होणार असे समजले जाते. तिचा स्वभाव विध्वंसक आहे असे यात गृहीत धरले आहे. संक्रांतीची गणना दैत्य, राक्षस, असुर अशा वर्गात होत नाही तरीही असे का असावे कुणास ठाउक. तिला खूष करून आपला बचाव करून घेण्यासाठी तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो की स्वतः बलवान होऊन येऊ घातलेल्या संकटांना सामोरी होण्यासाठी तो खाल्ला जातो हे ही स्पष्ट होत नाही. तिळातली स्निग्धता आणि गुळातला गोडवा यांच्यामुळे तो चविष्ट असतोच, शिवाय त्यात अनेक प्रकारचे शक्तीवर्धक गुण असल्यामुळे तो खाणे हे माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितकारक आहे याचे वर्णन करणारे लेख आता नियतकालिकांमध्ये वाचायला मिळतील. पण असे असेल ते बाराही महिने खायला काय हरकत आहे? थंडीच्या दिवसात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते असे असले तरी निदान महिनाभर आधीपासून थंडी पडायला लागलेली असते तेंव्हापासून तरी खायला सुरू करावे. पुणे मुंबई दरम्यान प्रवास करणारे लोक मात्र वाटेत लोणावळ्याची चिक्की खाऊन वर्षभर संक्रांत साजरी करत असतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो. आभाळात सर्वांना दिसणारा सूर्य एकच असतो आणि स्पष्टपणे न दिसणा-या राशीसुध्दा समानच असाव्यात. असे असतांना टिळक पंचांगवाल्यांचा सूर्य चार दिवस आधीच मकरसंक्रमण कसे करत असेल असा प्रश्न मला लहानपणी पडत असे. धनू आणि मकर राशींमधल्या सीमारेषा काही आभाळात कोणी आंखून ठेवलेल्या नाहीत. सूर्य या राशीमधून त्या राशीत गेला ही गोष्ट प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही. काही निरीक्षणे आणि प्रचंड आकडेमोड करून गणिताच्या आधाराने ती ठरवली जाते. गणिताची पध्दत परंपरेनुसार ठरत गेली असल्यामुळे त्यात मतभेद असू शकतात. पूर्वीच्या काळात पंचांग तयार करणा-या ज्या विद्वानांबद्दल आदर वाटत असे किंवा त्यांच्या पध्दतीवर ज्यांचा विश्वास असे त्यानुसार लोक आपापली पंचांगे ठरवत असत. आजच्या राहणीमध्ये या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.

मकरसंक्रांतीच्या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते असे सांगितले जाते. हजार वर्षांपूर्वी कदाचित तसे होत असेल. मकरसंक्रांत माझ्या बालपणी इतर पंचांगांमध्ये १४ जानेवारीला येत असे, हल्ली १५ जानेवारीला येते. याचा अर्थ तिची तारीख हळू हळू पुढे जात आहे. मागे मागे गेल्यास कधी तरी ती २१ – २२ डिसेंबरला येत असावी. ग्रेगोरियन कँलेंडरमध्ये वेळोवेळी सुधारणा केली गेली असल्यामुळे वर्षातला सर्वात लहान दिवस (विंटर सोलस्टाइस) आजसुध्दा २१ किंवा २२ डिसेंबरलाच येतो. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो आणि सूर्योदय व सूर्यास्ताला ज्या ठिकाणी सूर्याचे बिंब क्षितिजाला टेकतांना दिसते तो बिंदू उत्तरेच्या दिशेने सरकू लागतो. याचा अर्थ सूर्याचे उत्तरायण आधीच सुरू होऊन गेलेले आहे.

पृथ्वीचा आंस वाटतो तेवढा स्थिर नाही. अत्यंत सूक्ष्म गतीने त्याचा तिरकसपणा बदलत असतो यामुळे शेकडो वर्षांच्या कालावधीत क्षितिजामध्येही किंचित बदल येत असतो आणि त्याच्या सापेक्ष दिसणारे राशीचक्र किंचित बदलत असते. यामुळे हा फरक येतो. आपले पंचांग पूर्णपणे राशीचक्रामध्ये होत रहाणा-या ग्रहांच्या भ्रमणावर आधारलेले असल्यामुळे विंटर सोलस्टाइस आणि मकरसंक्रांत आता वेगळ्या दिवशी येतात.

मकरसंक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देऊन आपले संबंध दृढ करायची प्रथा तर आहेच, शिवाय नवीन लग्न झालेली मुलगी, गरोदर स्त्री, नवजात बालक अशा संक्रमणाच्या स्थितीत असलेल्यांचा संक्रांतसण साजरा केला जातो. त्या दिवशी हलव्याचे दागिने तयार करून ते त्यांना चढवले जातात. लहान मुलांचे बोरन्हाण घातले जाते. मराठी माणसांनी या प्रथा आता साता समुद्रापार नेल्या आहेत. अमेरिकेत राहणारे मराठी लोकसुध्दा हे सण साजरे करतांना दिसतात. संक्रांतीचे हळदीकुंकू करून त्यात जमलेल्या सर्वजणींना एकादी क्षुल्लक अशी भेटवस्तू दिली जाते. पण याला लुटवणे असे म्हणायची पध्दत आहे.

ध्वज, झेंडे आणि त्यांचे बदलते स्वरूप

 गणेशाची किंवा श्रीकृष्णाची मूर्ती, शंकराची पिंडी, शाळिग्राम, साधुसंतांच्या तसबिरी वगैरेंची आपण पूजा करतो, त्यांना नमस्कार करतो आणि त्यांची आराधना करतो. निराकार परमेश्वरावर विश्वास ठेवणारे या गोष्टींना मान्यता देत नाहीत. निर्जीव दगड किंवा धातूच्या आकारात किंवा कागदाच्या चिटो-यामध्ये ते लोक परमेश्वराला पाहू शकत नाहीत. पण मूर्तिपूजक असो वा मूर्तिभंजक असो सगळेच लोक झेंडा हे देशाचे, धर्माचे किंवा माणसांच्या विशिष्ट गटाचे प्रतीक आहे असे मात्र मानतात. ‘प्रतीक’ या संकल्पनेचे ध्वज हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

राष्ट्रीय पशु, पक्षी, फूल वगैरे इतर अनेक प्रतीकांची नांवे सरकारी आदेशाने जाहीर केली जातात, शाळेतल्या मुलांना ती शिकवतात आणि त्यातली तल्लख बुद्धीची मुले ती लक्षात ठेऊन क्विझमध्ये मार्क मिळवतात. आम जनतेला मात्र त्यातल्या कोणत्याही प्रतीकावरून आपल्या देशाची आठवण येते असे दिसत नाही. नोटेवर आणि नाण्यावर छापलेली मुद्रा आणि सर्व महत्वाच्या प्रसंगी उभारलेला झेंडा ही प्रतीके तेवढी सर्वांना ठाऊक असतात. ध्वजाला मान दिला जातो, त्याच्या पुढे सारे नतमस्तक होतात, कोणी त्याची आरती करतात, कोणी त्याला राखी बांधतात, त्याचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा दिल्याचा इतिहास आहे. इथे झेंडा म्हणजे एक कापडाचा तुकडा उरलेला नसतो. तो संपूर्ण राष्ट्राचे किंवा निदान एका विशाल जनसमूहाचे प्रतीक बनलेला असतो. लोकांच्या मनात तो कर्तव्यबुद्धी, इमानदारी, राष्ट्रभक्ती, अस्मिता यासारख्या उच्च कोटीच्या भावना जागृत करतो.

पूर्वापारपासून ‘झेंडा’ या प्रतीकात्मक संकल्पनेचा उपयोग होत आलेला आहे. महाभारताच्या युध्दातसुध्दा अर्जुनाच्या रथावर ध्वज लावला असल्याचा उल्लेख आहे. एका राजाने किंवा माणसांच्या समूहाने दुस-याशी लढाई करून त्याला चारी मुंड्या चीत केले, पराजित लोक नष्ट झाले, पळून गेले किंवा शरण आले आणि विरोध शिल्लकच राहिला नाही असे झाल्यावर जेते लोक आपला झेंडा उंच फडकवून आनंद व्यक्त करीत असत. दुरूनही तो दिसत असल्यामुळे आणि ओळखता येत असल्यामुळे आसमंतातील सर्वांना ते दिसत असे. कोणताही किल्ला काबीज केला की त्यावर तो जिंकणा-याचे निशाण फडकवण्याची पद्धत होती. त्या जागी कोणाची सत्ता चालते हे त्यावरून कळत असे. राघोबादादांनी मराठेशाहीचा झेंडा अटकेपार फडकवला हे इतिहासात वाचतांना आपल्या अंगावर मूठभर मांस चढते. एखाद्या जागी दंगेधोपे चालले असतील तर तिथे सैन्य पाठवले जाते आणि तिथे गेल्यावर ते त्या भागाच्या हमरस्त्यावरून ध्वजसंचलन करते. “आता कोणाची हिंमत असेल तर पुढे या” असा इशारा त्यातून दिला जातो. या सगळ्या जागी झेंडा हे सत्तेचे प्रतीक आहे.

गिर्यारोहणासारखी आव्हानात्मक कामगिरी फत्ते झाल्यावर त्या जागी त्याची खूण झेंड्याच्या रूपाने ठेवतात. उत्तर व दक्षिण ध्रुवावर आणि एव्हरेस्ट शिखरावर जे साहसी वीर सर्वात आधी पोचले ते तेथे आपल्या देशाचा ध्वज रोवून परत आले. नील आर्मस्ट्रॉंगने तर चंद्रावर अमेरिकेचे निशाण फ़डकवले. ऑलिंपिक किंवा कोठल्याही आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये विजयी वीरांना पदके दिली जात असतांना त्यांच्या देशांचा ध्वज उंचावला जातो. तो पाहून त्यांच्या मनातला आनंद द्विगुणित होतो. ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचाच एक खास ध्वज आहे. स्पर्धा सुरू करतांना त्याचे समारंभपूर्वक आरोहण होते आणि कार्यक्रमाचे सूप वाजवतांना तो सन्मानाने खाली उतरवला जातो.

राष्ट्रध्वज ही आपल्या देशाची खूण असते व कधी कधी त्यावरून माणसाची ओळख करून दिली जाते. टेलीव्हिजनवर होत असलेल्या खेळांच्या प्रक्षेपणात त्यात खेळत असलेल्या खेळाडूच्या किंवा संघाच्या नांवासोबत अनेक वेळा त्याच्या देशाचा झेंडा दाखवतात. ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडूंचे सांघिक संचलन होते तेंव्हा प्रत्येक देशाच्या संघाचे नेतृत्व करणारा (किंवा करणारी) हातात त्या देशाचा झेंडा घेऊन चालत असतो. मागे एकदा मी जर्मनीतल्या एका कारखान्यात कांही कामासाठी गेलो होतो तेंव्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी असलेल्या दोन खांबांवर भारत आणि जर्मनी या देशांचे ध्वज लावलेले पाहून मला किती आनंद झाला की ते शब्दात सांगता येणार नाही. समुद्रातून जाणारी गलबते आपल्या देशाचा ध्वज अभिमानाने शिडावर लावीत असत. त्यामुळे ते जहाज कोणत्या देशातले आहे हे दुरून पाहतांना न सांगताच समजत असे. एवढेच नव्हे तर चांचेगिरी करणारे पायरेट्सदेखील दोन हाडे आणि कवटीचे चित्र असलेला झेंडा फडकावत होते हे आपण कॉमिक्समध्ये पाहतो.

सत्ता किंवा विजय यातील धुंदीपासून अगदी दूर अशा वेगळ्या भावनादेखील ध्वजारोहणाद्वारे व्यक्त करतात. “विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला । वाळवंटी चंद्रभागेच्या कांठी डाव मांडिला ।” असे म्हणत वारकरी हरिनामाच्या कल्लोळात डुंबतात. विठ्ठलाच्या भक्तीची प्रेरणा घेऊन सारे हरिभक्त एका झेंड्याखाली जमा होतात. त्याच प्रकारे समविचाराचे लोक एक संघटना निर्माण करतात तेंव्हा अनेक वेळा तिचा एक ध्वज बनवला जातो. हातोडा आणि कोयता यांचे चित्र असलेल्या लाल बावट्याखाली सा-या दुनियेतील कामगारांना एकत्र आणण्याचे स्वप्न एके काळी जगभरातील साम्यवादी पहात होते. इतर राजकीय पक्षांच्या कार्यातसुद्धा त्यांच्या ध्वजाला केवढे महत्व आहे हे आपण रोजच पहातो.

युद्धविराम करण्यासाठी रणभूमीवर पांढरा ध्वज दाखवतात. ऐन लढाईच्या हमरीतुमरीतदेखील रेडक्रॉसचा झेंडा दाखवत मानवी सेवाभावाचे कार्य चालले होते. रेल्वे असो वा रस्ता असो, त्यावरून पुढे जाणे धोक्याचे असल्यामुळे थांबायचे असेल तर लाल झेंडा दाखवतात आणि सर्व कांही ठीक आहे हे पाहून पुढे जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला जातो. हल्ली या कामासाठी दिव्यांचा उपयोग केला जात असला तरी लाल किंवा हिरवा झेंडा दाखवणे हा शब्दप्रयोग शिल्लक आहे.

ध्वजाचे महत्व सांगणा-या सगळ्याच गोष्टींचा उल्लेख एका लेखात करणे अशक्य आहे. त्याची महती अपरंपार आहे आणि त्याला अनेक पैलू आहेत. म्हणूनच “पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तीन्ही लोकी झेंडा । ” अशी मनोकामना सगळे करतात.

भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि त्यांचे बदलते स्वरूप

स्व.मादाम कामा यांनी शंभर वर्षांपूर्वी जर्मनीमधील स्टूटगार्ट येथे भरलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात भारतातर्फे भाग घेऊन भारताचा म्हणून एक झेंडा त्या संमेलनात फडकवला. सामान्यपणे हा भारताचा पहिला ध्वज मानला जातो. या घटनेला मागच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली याप्रीत्यर्थ भारतात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एका राष्ट्रभक्त संघटनेने त्या दिवशी भारतातील निरनिराळ्या किल्यांवर मादाम कामा यांचा ध्वज फडकावून त्याला वंदना दिली होती.

जुनी कागदपत्रे पाहता पाहता मला २००१ साली लिहिलेला एक लेख सापडला. ध्वज या विषयाचे अभ्यासक, तज्ञ आणि छंद म्हणून हा विषय जोपासणारे श्री.सदानंद बांदेकर यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे श्री.प्रमोद सावंत यांनी हा लेख लिहिला होता. लेखामध्ये दिलेल्या सविस्तर वर्णनावरून मला तो विश्वसनीय वाटतो. या लेखात छत्तीस ध्वजांची चित्रे दिली असून त्यातला प्रत्येक ध्वज कोणी ना कोणी कधी ना कधी वापरला असल्याची माहिती दिली आहे. याखेरीज भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा साडेपाचशेहून अधिक संस्थाने शिल्लक होती. त्या प्रत्येकाचा आपापला झेंडा होता. त्यापूर्वी किती तरी राज्ये ब्रिटीशांनी खालसा केली असतील. इतिहासकालात किती राज्ये स्थापन झाली आणि लयाला गेली याचा तर हिशेबच नाही. अगदी रामायण महाभारताच्या काळापासून ध्वजाची परंपरा चालत आलेली आहेच. यातील कोणत्याही ध्वजाचा या छत्तीसात समावेश नाही.

स्वातंत्र्यापूर्वीच्या त्या काळात ब्रिटीश राज्यकर्ते तर युनियन जॅकलाच सलाम ठोकत होते आणि सर्व भारतीयांनी तेच करावे अशी त्यांची अपेक्षा व आज्ञा होती. त्यामुळे भारताचा वेगळा अधिकृत राष्ट्रध्वज कोण ठरवणार? देशभक्तांच्या मनात राष्ट्रभावनेला सर्वाधिक महत्व होते. अमक्या वा तमक्या रंगाला किंवा चित्राला तेवढे महत्व देण्याची गरज नव्हती. आपला असा एक वेगळा ध्वज फडकावून त्याला वंदन करणे ही राष्ट्रभक्तीची खूण होती. लेखात दिलेल्या चित्रांमधील क्रमांक १३ पासून २३ पर्यंतच्या चित्रांमध्ये दाखवलेल्या ध्वजांबरोबर मादाम कामा यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आलेला होता असे या लेखावरून दिसते. यात दोन्ही प्रकारची रंगसंगती दिसते. तसेच कोठे कमळे तर कोठे सूर्य, चंद्र व तारे दिसतात. ही सगळीच राष्ट्रीय प्रतीके आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या राष्ट्रीय सरकारने तिरंगा झेंडा निश्चित केला आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनियव जॅक उतरवून तिरंगा झेंडा फडकवण्यात आला.

या लेखात दिलेल्या चित्रामधील ध्वज खालीलप्रमाणे आहेत.
१) आपला राष्ट्रध्वज
२) जम्मू काश्मीरचा ध्वज
३) क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज (१६००)
४) रॉयल बॅनर ऑफ इंग्लंड (१४०५-१६०६)
५) पहिला युनियन जॅक (१६०६-१६१२)
६) ब्रिटीश ईस्ट इंडियाचा झेंडा(१६१२-१८५८)
७) स्पेशल कॉमनवेल्थ फ्लॅग (१६४९-१६६०)
८) दुसरा युनियन जॅक (१६५८-१८०१)
९) तिसरा युनियन जॅक (१८०१-१९४७)
१०) बारीसालचा ध्वज (१९०६)
११) सिस्टर निवेदिता ध्वज (१९०६)
१२) सिस्टर निवेदिता व त्यांच्या विद्यार्थ्यांचा ध्वज
१३) स्वदेशी ध्वज
१४) कलकत्ता ध्वज (१९०६)
१५) हेमचंद्र दास कानुनगो नमूना ध्वज
१६) मॅडम कामा ध्वज (१८-८-१९०७)
१७) मॅडम कामा ध्वज (२१-८-१९०७)
१८) मॅडम कामा ध्वज (२३-८-१९०७)
१९) वीर सावरकर- मॅडम कामा ध्वज (१९०७)
२०) मॅडम कामा ध्वज (१९०८)
२१) गदर पार्टी ध्वज(१९०८)
२२) गुरू गोविंदसिंग जयंती मंडळ ध्वज
२३) मॅडम कामा ध्वज (१९०९)
२४) कोमागाता मारू ध्वज (१९१४)
२५) बर्लिन कमिटी (१९१५)
२६) होमरूल ध्वज (१९१६)
२७) होमरूल ध्वज-२ (१९१६)
२८) ध्वज चर्चा (१९१७)
२९) एस.एस.गलीया यांचा ध्वज (१९२०)
३०) पिंगळे केंकय्या यांचा ध्वज (१९२१)
३१) महात्मा गांधी यांचा ध्वज (१९२१)
३२) फ्लॅग कमीटीचा ध्वज (१९३१)
३३) टाइम्स वृत्तपत्रसमूहाचा ध्वज (१९३१)
३४) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा ध्वज (१९३१)
३५) इंडियन लिजन ध्वज (१९४१)
३६) ब्रिटिश इंडिया ध्वज (१९४५)

श्री.प्रमोद सावंत यांच्या लेखावरून.

मादाम कामा आणि त्यांचा राष्ट्रध्वज

हा लेख २००७ साली लिहिला होता.

मादाम कामा यांनी शंभर वर्षापूर्वी ‘स्वतंत्र’ भारताचा ध्वज एका आंतरराष्ट्रीय मेळाव्यात फडकवला. त्यामुळे त्या काळातील वृत्तपत्रातून ही खळबळजनक बातमी जगभर पसरली. या साहसी कामगिरीसाठी त्यांचे नांव भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासात ठळक अक्षरांनी लिहिले गेले आहेच. त्यांनी तर आपले पूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून घेतले होते. कदाचित या गोष्टीला योग्य तितकी प्रसिद्धी मिळाली नसेल. त्यांनी जी इतर कामे केली त्यातली बरीचशी त्या काळात लपून छपून गुप्तपणे केलेली होती. त्यातली कांही अखेरपर्यंत गुलदस्त्यातच राहिली असण्याचीही शक्यता आहे. अशी कोणकोणती कामे त्यांनी केली ते थोडक्यात पाहू.

त्यांचा जन्म मुंबईतल्या एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नांव भिकाजी सोराबजी पटेल असे होते. ‘भिकाजी’ हे मुलीचे नांव आपल्याला ऐकायला विचित्र वाटेल, पण त्या काळात म्हणजे १८६१ साली त्यांना ते नांव ठेवले गेले होते. त्यांच्या आयुष्यात कधीही भीक मागण्याचा प्रसंग त्यांच्यावर येण्याचा प्रश्नच नव्हता. गडगंज संपत्ती घरात असलेल्या इतर तत्कालीन मुलींप्रमाणे दागदागीने, पोषाख, बंगले, बगीचे, कुत्री, मांजरे वगैरे षौक करून ऐषोआरामात लोळत राहणे त्यांनाही शक्य होते. पण या अत्यंत बुद्धीमान व संवेदनाशील मुलीवर तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचा खोलवर प्रभाव पडत होता आणि तिला देशभक्तीची ओढ आकर्षित करीत होती. इंग्रजांच्या राज्यात त्यांची अवकृपा ओढवून घेण्याचा धोका पत्करणे तिच्या वडिलांना शक्य नव्हते. तो टाळण्याच्या दृष्टीने त्यांनी रुस्तम कामा या उमद्या, देखण्या आणि श्रीमंत वकीलाबरोबर आपल्या मुलीचे लग्न लावून दिले.

संसाराला लागल्यावर भिकाजीचे लक्ष घरात गुंतून जाईल आणि त्या देशसेवेच्या ‘धोकादायक’ कार्यापासून दूर राहतील अशी सर्वांची अपेक्षा असणार. पण तसे झाले नाही. त्यात रुस्तम हा इंग्रजांचा कट्टर भोक्ता असल्यामुळे त्या पतिपत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. त्यांचा चारचौघासारखा ‘सुखी संसार’ होऊ शकला नाही. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे” हे वाक्य लोकमान्य टिळकांनी अजून उच्चारलेले नव्हते. स्वातंत्र्याचा लढा असा सुरू व्हायचा होता. त्या काळात देशासाठी जी कांही सौम्य आंदोलने होत होती, भिकाजी यांनी त्या आंदोलनांमध्ये आणि समाजसेवेच्या कार्यात भाग घेणे त्यांच्या पतीच्या विरोधाला न जुमानता सुरूच ठेवले. त्यात प्लेगच्या साथीने मुंबईला पछाडले. तेंव्हा आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. रोग्यांची शुश्रुषा करणे, त्यांना धीर देणे वगैरे करतांनाच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. पण अखेर ज्याची भीती होती तेच झाले आणि भिकाजीलाच प्लेगचा संसर्ग झाला.

त्या आजारातून त्या जेमतेम बचावल्या ख-या, पण त्या रोगाने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. इथेच राहिल्या तर तब्येतीला न जुमानता त्या पुन्हा कामाला लागतील या भीतीने त्यांच्या परिवारातील लोकांनी त्यांना हवापालटासाठी युरोपमध्ये पाठवून दिले. तिथल्या हवेत त्यांची तब्येत सुधारली. त्या अवधीमध्ये त्यावेळी इंग्लंडमध्ये रहात असलेल्या दादाभाई नौरोजी यांच्या संपर्कात त्या आल्या. भारतीयांचे  पितामह (ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया) समजले जाणारे दादाभाई त्या काळात इंग्लंडमध्येच राहून भारतवासीयांच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा देत होते. भिकाजीं त्यांचे सचिव म्हणून काम करू लागल्या. चाळिशीला पोचलेल्या भिकाजी आता ‘मॅडम कामा’ झाल्या होत्या. त्या काळात उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा ते निमित्य सांगून भारतीय युवक इंग्लंडला जात असत. मॅडम कामा सतत त्यांच्या संपर्कात राहून त्यांना लागेल ती मदत करीत.

स्टुटगार्ट येथील संमेलनात भाग घेऊन भारताचा झेंडा फडकवल्यानंतर त्या अमेरिकेच्या दो-यावर गेल्या. एक उत्कृष्ट वक्त्या म्हणून त्यांची ख्याती झाली होती. अमेरिकेत ठिकठिकाणी भाषणे देऊन त्यांनी आपले स्वतंत्र विचार परखडपणे मांडले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या बाजूला तेथील जनमत वळवण्याचा प्रयत्न केला. तेथून त्या इंग्लंडला परत आल्या, पण आता ब्रिटिश सरकारची नजर त्यांच्याकडे वळलेली होती. इंग्लंडमध्ये राहून काम करणे दिवसेदिवस कठीण होत गेल्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये पॅरिसला स्थलांतर केले. तेथून त्या इतर क्रांतिकारकांच्याबरोबर संपर्कात राहिल्या. फक्त भारतीयच नव्हे तर आयर्लंडसारख्या इतर देशातील क्रांतिकारकांनासुद्धा त्या मदतीचा हात देत होत्या. रशीयात ज्यांनी राज्यक्रांती घडवून आणली ते लेनिन त्यांना भेटायला आले होते.

युरोपमधल्या वास्तव्यात त्यांनी ‘वंदे मातरम्’ नांवाचे देशभक्तीपर नियतकालिक काढायला सुरुवात केली आणि कांही काळ ते नेटाने चालवले. इंग्रजांनी त्याचेवर बंदी घातलीच होती. त्यामुळे पॅरिसमधूनसुद्धा ते उघडपणे प्रकाशित करता येत नव्हते. मादाम कामा यांनी कधी बर्लिन, कधी जिनीव्हा कधी हॉलंड अशा वेगवेगळ्या जागा बदलून ते गुप्तपणे छापून घेणे सुरू ठेवले. या छापलेल्या मॅगझिनच्या प्रती भारतात चोरट्या मार्गाने पाठवणे आणि तिथे पोचल्यावर त्यांचे देशभर वितरण करणे हे त्याहून जास्त कठीण होते. तरीही तत्कालीन क्रांतीकारक त्या दृष्टीने चिकाटीने प्रयत्न करीत राहिले. मादाम कामा त्यात आघाडीवर होत्या.

हे सगळेच काम छुप्या रीतीने होत असल्यामुळे प्रत्यक्षात किती प्रती योग्य जागी पोचल्या, किती मध्येच जप्त झाल्या, त्या वाचून किती युवकांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली, त्यातून किती जणांनी सशस्त्र लढ्यात उडी घेतली आणि कांही हिंसक कृती करून दाखवली वगैरेचे संख्यात्मक मूल्यमापन करणे आज शक्य नाही. पण त्यामुळे “ब्रिटीश सरकार डळमळीत झाले, थरथर कांपू लागले” वगैरे म्हणणे जरा अतीशयोक्त होईल. कारण हजारोंच्या संख्येने भारतीय लोकच त्यांची नोकरी करण्यासाठी स्वखुषीने पुढे येत होते आणि मूठभर गो-यांच्या सहाय्याने ते आपला इथला अंमल व्यवस्थितपणे हांकत होते. क्रांतिकारकांनी टाकलेल्या ठिणग्या पडून देशात जागोजागी असंतोषाचे विस्फोट होतील आणि स्थानिक लोक ब्रिटीशांना मारून टाकतील किंवा पळवून लावतील अशी आशा प्रत्यक्षात फलद्रुप झाली नाही. थोडक्यात म्हणजे लेनिनला ज्याप्रमाणे रशीयातली झारची सत्ता उलथून टाकता आली तसे भारतात घडले नाही.

मादाम कामा यांच्या कार्याला लगेच अपेक्षेइतके यश त्या काळात मिळाले नसले तरी त्यामुळे त्यांनी घेतलेल्या कष्टांचे मोल कमी होत नाही. शंभर वर्षापूर्वीच्या काळात एक भारतीय स्त्री आपले सुखवस्तु कुटुंब व आपला देश सोडून परदेशात, किंबहुना शत्रूपक्षाच्या देशात जाऊन राहते. अत्यंत प्रतिकूल वातावरणात निर्भयपणे आपण ठरवलेले जीवितकार्य अखेरपर्यंत करत राहते. हे सगळे कल्पनातीत आहे.

बरोबर शंभर वर्षांपूर्वी ऑगस्ट १९०७ मध्ये जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरात समाजवादी लोकांचे आंतरराष्ट्रीय संमेलन भरले होते. त्या काळात युरोपात रहात असलेल्या मादाम कामा या भारतीय विदुषीने त्या संमेलनात भाग घेतला व भर सभेत हिंदुस्थानचा झेंडा फडकवून सर्व उपस्थितांनी त्याच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली याचा उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने या महिन्यात महाराष्ट्रातील विविध गडांवर एकाच दिवशी हा ऐतिहासिक ध्वज फडकवून त्याला मानवंदना देण्याचा उपक्रम एका दु्र्गमित्र संस्थेतर्फे करण्यात आला. त्याचे वृत्त एका लोकप्रिय कार्यक्रमात ऐकायला मिळाले.

ते ऐकल्यावर मादाम कामा यांच्याविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने थोडे आंतर्जालावर उत्खनन केले. त्यात बरीच उद्बोधक माहिती मिळाली आणि त्या ऐतिहासिक ध्वजाची दोन वेगवेगळी चित्रे सापडली. दोन्ही चित्रे तिरंगी असून त्यात तीन आडवे पट्टे आहेत. एका चित्रात सर्वात वर भगव्या रंगाच्या पट्ट्यात पिवळसर छटेमध्ये आठ कमळांच्या आकृती आहेत. मधला पट्टा पिवळ्या रंगाचा असून त्यावर ‘बंदेमातरं’ असे लिहिलेले आहे. खालच्या हिरव्या रंगाच्या पट्ट्यावर पांढ-या रंगात सूर्य व चंद्रकोर रेखाटल्या आहेत. दुस-या चित्रात सर्वात वरच्या बाजूला हिरवा पट्टा आणि खालच्या बाजूला लालभडक पट्टा आहे. हिरव्या पट्ट्यावर कमळांची आणि लाल पट्ट्यावर चंद्रसूर्यांची चित्रे असली तरी त्यांचे आकार वेगवेगळे आहेत. मधल्या पिवळ्या रंगाच्या पट्ट्यावर छापील अक्षरांत ‘वंदे मातरम्’ असे लिहिले आहे. फक्त शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राष्ट्रीय महत्वाच्या आणि स्वातंत्र्यसंग्रामासारख्या विषयाशी जोडल्या गेलेल्या या घटनेच्या तपशीलात इतके अंतर असावे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. यातील कोठल्या चित्रावर विश्वास ठेवायचा? त्यातील किमान एक चित्र तरी चुकीचे असणार. मग त्याच्यासोबत दिलेल्या मजकुराच्या विश्वासार्हतेचे काय?

मादाम कामा यांनी हा ध्वज स्व.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मदतीने हा ध्वज बनवला असाही उल्लेख आहे. या दोन महान देशभक्तांनी जी रंगसंगती साधली असेल ती त्या काळातील परिस्थितीमध्ये उत्कृष्टच असणार यात मला शंका नाही. त्यात काय बरोबर आहे किंवा नाही हा मुद्दाच नाही. त्यांनी यापेक्षा वेगळे रंग वापरले असते तरीही तो झेंडा वंदनीयच ठरला असता. एका आंतरराष्ट्रीय मंचावर तो फडकवण्यात मादाम कामा यांनी औचित्य, चातुर्य आणि अतुलनीय धैर्य या सर्वांचा सुरेख संगम साधला होता. भारतात सुरू असलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाला त्यातून एकदम जगभर प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे त्या झेंड्यावर कोणत्या रंगात कोणती चित्रे काढलेली होती यापेक्षा असा झेंडा तयार करून तो फडकवला गेला हे महत्वाचे आहे. तरीही त्याचे स्मरण करतांना त्यात अचूकपणा असावा असे मला वाटते कारण माझ्या माहितीप्रमाणे ही दोन्ही चित्रे प्रसारमाध्यमांवर दाखवली गेली आहेत आणि लक्षावधी लोकांनी ती पाहिली असणार.

 

देवीची स्तोत्रे – देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्

देव्यपराधक्षमापनस्तोत्रम् ।।
 
न मंत्रं नो यंत्रं तदपि च न जानी स्तुतिमहो। न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा।।     
 न जाने मुद्रीस्ते तदपि च न जाने विलपनं। परं जाने मातस्तवदनुसरणं क्लेशहरणं।।१।।

हे माते, मी मंत्रही जाणत नाही आणि तंत्रही. मला स्तुती करणे येत नाही, आवाहन आणि ध्यान य़ांची माहिती नाही. स्तोत्र व कथा मला ठाऊक नाहीत, मला तुझ्या मुद्रा समजत नाहीत आणि व्याकुळ होऊन हंबरडाही फोडणे येत नाही. पण मला फक्त एक गोष्ट समजते ती म्हणजे तुझे अनुसरण करणे. तुला शरण येण्यामुळेच सर्व संकटांचा नाश होतो.

विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया।  विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्याच्युतिरभूत।।
तदेतत्क्षंतव्यं जननि सकलोध्दारिणिशिवे। कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती।।२।।

हे सर्वांचा उध्दार करणारे माते,  मला पूजाविधी माहीत नाही,  माझ्याकडे संपत्ती नाही, मी स्वभावानेच आळशी आहे आणि तुझी व्यवस्थित प्रकारे पूजा करणे मला शक्य नाही. या सगळ्या कारणांमुळे तुझ्या चरणी सेवा करण्यात ज्या तृटी येतील त्याबद्दल मला क्षमा कर, कारण वाईट मुलगा जन्माला येणे शक्य आहे पण आई कधीच वाईट होऊ शकत नाही.

पृथीव्यां पुत्रास्ते जननि वहवः सन्ति निरलाः। परं तेषांमध्ये विरलतरलोSहं तव सुतः।।
मदीयोSयं त्यागः सनुचितमिदं नो तव। कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।३।।

माते, या पृथ्वीवर तुझे पुष्कळ साधेसुधे पुत्र  आहेत पण मी त्या सर्वांमधील अत्यंत अवखळ बालक आहे. माझ्यासारखा चंचल मुलगा क्वचितच असेल. तरीही तू माझा त्याग करणे हे कधीही योग्य ठरणार नाही. कारण कुपुत्र होणे शक्य असले तरी कुमाता होणे शक्य नाही.

जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता। न वा दत्तं देवी द्रविणभपि भूयस्तव मया।।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे। कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती।।४।।

हे जगदंबे देवी माते, मी कधीही तुझ्या चरणांची सेवा केली नाही, तुला फारसे धन समर्पण केले नाही, तरीही तू माझ्यासारख्या अधम माणसावर अनुपम स्नेह करतेस कारण या जगात मुलगा वाईट होऊ शकतो पण आई कधीही वाईट बनू शकत नाही.

परित्यक्ता देवा विविधविधि सेवा कुलतया। भया पंचाशीते रधिकमपनीते तु वयसि।।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भवता। निरालंबोलंबोदरजननि कं यामि शरणं।।५।।

हे गणपतीला जन्म देणा-या पार्वतीमाते,  इतर अनेक देवतांची विविध प्रकाराने सेवा करण्यात मी व्यग्र होतो.  पंचाऐंशीचा झाल्यानंतर आता माझ्याच्याने ते होत नाही म्हणून मी त्या सर्व देवांना सोडून दिले आहे (कठीण पुजाविधिंना कंटाळुन मी सर्व देवांना सोडुन दिले आहे व त्यांच्या मदतीची आशा उरलेली नाही). या वेळी मला जर तुझी कृपा मिळाली नाही तर मी निराधार होऊन कुणाला शरण जाऊ?

श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा। निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकै।।
तवापर्णे कर्णे विशति मनवण्रे फलमिदं।  जनःको जानीते जननि जपनीयं जपविधौ।।६।।

हे अपर्णामाते, तुझ्या मंत्राचे एक अक्षर जरी कानावर पडले तरी मूर्ख माणूससुध्दा मधुपाकासारखे मधुर बोलणारा उत्तम वक्ता होतो, दरिद्री माणूस कोट्यावधी सुवर्णमुद्रा मिळून चिरकाल निर्भर होऊन विहार करतो. तुझ्या मंत्राचे एक अक्षर ऐकण्याचे एवढे मोठे फळ आहे  तर जे लोक विधीवत् तुझा जप करतात त्यांना काय मिळत असेल हे कोण जाणेल? 

चिताभस्मालेयो गरलमशनं दिक्पटधरो।  जटाधारीकण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।।
कपाली भूतेशो भजति जगदीशै क पदवीम्। भवानी त्वत्प्राणिग्रहण परिपाटी फलमिदम्।।७।।

जो आपल्या अंगाला चितेची राख फासतो, विष खातो, दिगंबर राहतो, डोक्यावर जटा वाढवतो, गळ्यात सांप धारण करतो, हातात (भिक्षेचे) कपालपात्र धरतो, अशा भुतांच्या व पशूंच्या नाथाला जगदीश ही पदवी कशामुळे दिली जाते?  हे भवानी, अर्थातच तुझे पाणिग्रहण (तुझ्याशी विवाह) केल्याचेच हे फळ त्याला मिळाले असणार.

न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभवाच्छापि च न मे। न विज्ञानापेक्षा शशिमुख सुखेच्छापि न पुनः।।
अतस्त्वां संचाये जननि यातु मम वै। मृडानी रुद्राणी शिवशिवभवानीति जपतः।।८।।

मला मोक्ष मिळवण्याची इच्छा नाही, जगातील वैभवाची अभिलाषा नाही, विज्ञानाची अपेक्षा नाही, सुखाची आकांक्षा नाही. हे चन्द्रमुखी माते,  तुझ्याकडे माझे एवढेच मागणे आहे की माझा जन्म मृडानी रुद्राणी शिवशिवभवानी या तुझ्या नामांचा जप करण्यात व्यतीत होवो.

नाराधितासि विधिना विविधोपचारैः। किं रुक्षचिन्तन परैर्न कृतं वचोमि।
श्यामे त्वमेव यदि किंचन मय्यनाये। धत्से कृपामुचितमम्ब परे तवैव।।९।।

नाना प्रकारच्या पूजा सामुग्रीद्वारे तुझी विधिवत् पूजा माझ्याकडून घडली नाही. नेहमी रूक्ष चिंतन करणा-या माझ्या वाचेने कोणकोणते अपराध केले नसतील?  हे श्यामा माते,  तरीही तू स्वतः प्रसन्न होऊन माझ्यासारख्या अनाथावर थोडीशी कृपा करतेस हे तुझ्या योग्यच आहे.

आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं  करोमि दुर्गे करुणार्णवेशि।।
नैतच्छठत्वं मम भावमेथाः क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।१०।।

करुणेचा सागर अशा माता दुर्गे, संकटात सापडल्यानंतर मी तुझे स्मरण करीत आहे. (आधी केले नाही) पण ही माझी शठता आहे असे मानू नकोस कारण तहान भूक लागल्यावरच मुलाला आईची आठवण येते.

जगदम्ब विचित्रमय किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी।
अपराध परंपरा परं न हि माता समुपेक्षते सुतम्।।११।।

हे जगदम्बे, माझ्यावर तुझी पूर्ण कृपा आहे हे आश्चर्य आहे मुलगा अपराधावर अपराध करीत गेला तरी माता कधीही त्याची उपेक्षा करीत नाही.

मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवम् ज्ञाता महादेवी यथा योग्यं तथा कुरु।।१२।।

हे महादेवी, माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि तुझ्यासारखी पापाचा नाश करणारी कोणी नाही हे जाणून तुला जे योग्य वाटेल ते कर.
————————————————————————————————————————
 जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलेले हे सुप्रसिद्ध स्तोत्र व मला त्याचा समजलेला अर्थ देत आहे. भक्ती, श्रद्धा वगैरे बाजूला ठेऊन एक काव्य म्हणून पाहिले तरी त्यातील अनुप्रास, यमक, रूपक वगैरे अलंकार, छंदबद्ध तशीच भावोत्कट शब्दरचना मंत्रमुग्ध करणारी आहे असे मला वाटते. त्यात  चुका झालेल्या असतील तर त्या सर्वस्वी माझ्या अज्ञानामुळे झाल्या आहेत.
———————————

Follow

Get every new post delivered to your Inbox.