मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया

गणेशोत्सवाशी या ब्लॉगचे जवळचे नाते आहे. पहिल्याच वर्षी आलेल्या गणेशोत्सवात मी गणपतीची कोटी कोटी रूपे पाहून त्यांच्यावर एक लेखमाला लिहिली होती. त्यानंतर बहुतेक दरवर्षी मी या उत्सवाच्या काळात गणपतीसंबंधी चार शब्द लिहीत होतो. या ब्लॉगवरील लेखांची संख्या मला हजाराच्या आंतच ठेवायची आहे म्हणून या वर्षी मी एकाच लेखात रोज थोडी भर घालून तो पूर्ण करणार आहे.

सूर निरागस हो

गणपती या देवाचे सर्वांनाच इतके आकर्षण आहे की कट्यार काळजात घुसली या नाटकाचे चित्रपटात रूपांतर करतांना त्यात नव्याने भर घातली ती सूर निरागस हो, गणपती या गाण्याची. या गाण्यामध्ये मधून मधून मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया. या नावांचा गजर केला आहे. हे पूर्ण गाणे खाली दिले आहे.

सूर निरागस हो. गणपती,
सूर निरागस हो.
शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.

ॐकार गणपती.
अधिपती. सुखपती. छंदपती गंधपती
लीन निरंतर हो.
सूर निरागस हो.
सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो.

मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु:खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु:खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो.

सूरसुमनानी भरली ओंजळ
नित्य रिती व्हावी चरणावर.
तान्हे बालक सुमधुर हासे
भाव तसे वाहो सूरातुन.
ॐकार गणपती. अधिपती. सुखपती छंदपती. गंधपती.
अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती.

गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
सूर निरागस हो. सूर निरागस हो.

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मोरेश्वर किंवा मोरोपंत ही नांवे पूर्वीच्या काळात प्रचलित होती. मोरोपंत या अठराव्या शतकांतल्या पंतकवींनी आर्या या वृत्तामध्ये अनेक इतक्या सुंदर काव्यरचना केल्या होत्या की महान संतकवि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउली आणि पंतकवि वामन पंडित यांच्याबरोबर त्यांची गणना केली जाते. “सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंताची।” असे समजले जाते. छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रधानमंडळात मोरोपंत पिंगळे मुख्य प्रधान होते. मोरोबा विजयकर या लेखकाने घाशीराम कोतवाल ही मूळ कादंबरी लिहिली होती.

मोरेश्वर, मोरोपंत, मोरोबा किंवा मोरू, मोऱ्या वगैरे नावे असलेली पात्रे साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या कथाकादंबऱ्या, सिनेमे नाटके यांचेमध्ये सर्रास आढळत असत. त्यातला मोरेश्वर शास्त्री म्हणजे एक वेदशास्त्रसंपन्न विद्वान, पण परंपरावादी, हटवादी आणि उग्र तिरसिंगराव असावा, मोरोपंत हा हुषार, धूर्त पण सहृदय असा सद्गृहस्थ असावा, मोरोबा म्हणजे साधासुधा, परोपकारी, लोकांना सढळ हाताने मदत करणारा भलामाणूस असावा आणि मोरू म्हणजे जरा जास्तच सरळमार्गी, भोळसट आणि बावळट असावा, त्याला कुणीही आणि केंव्हाही मोरू करावे असा संकेत होता. त्या अर्थाचे बुद्दू बनवणे, पोपट करणे किंवा वडा होणे वगैरे वाक्प्रचार नंतर आले. आचार्य प्र.के.अत्रे यांनी लिहिलेले मोरूची मावशी हे नाटक त्या काळात गाजले होतेच, पण त्यांच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी ते पुन्हा रंगमंचावर आले आणि विजय चव्हाणांनी टांग टिंग टिंगा कि टांग टिंग टिंगा म्हणत त्या नाटकाला आणि स्वतःच्या कारकीर्दीला यशाच्या शिखरावर नेले. ज्या कोण्या महाभागाने बुद्धी आणि विद्येचे दैवत असलेल्या गणेशाच्या नावाचा असा मोरू केला होता त्याची शिक्षा म्हणून पुढील अनेक जन्म त्याचा पोपट किंवा वडा होत राहील यात शंका नाही.

आपले गणपतीबाप्पा उत्तर भारतात गणेशजी आणि दक्षिणेकडे विनायक या नांवांनी जास्त ओळखले जातात. तशी त्याची शेकडो नांवे आहेत. गणपती, तुझी नांवे किती? या नांवाने मी लिहिलेल्या ब्लॉगची सर्वाधिक वाचने झाली आहेत आणि अजूनही होत आहेत. नारदमुनींनी लिहिलेल्या संकटनाशन गणेशस्त्रोत्रातील आणि गणेशद्वादशनामस्तोत्रातील प्रत्येकी बारा नांवांमध्ये मोरेश्वराचा समावेश मात्र होत नाही आणि मला आंतर्जालावर मिळालेल्या ११० नांवांमध्येसुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांमध्ये मात्र मोरगांवच्या मोरेश्वराचा पहिला नंबर लागतो. मोरेश्वर हा शब्द जरी संस्कृत असला तरी संस्कृत किंवा हिंदी भाषांमध्ये लिहिलेल्या कुठल्याही स्तोत्रांमध्ये हा शब्द आल्याचे मला वाचल्याचे स्मरत नाही.

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मोरगांवचा मयूरेश्वर
ज्यांना धड बोलताही येत नाही अशी लहान बालकेसुद्धा “गम्पतीबप्पा” म्हंटले की “मोय्या” असे किंचाळतात इतकी या शब्दांची जोडी आपल्या मनात घट्ट बसली आहे. कुठेही गणपतीबाप्पा ऐकले की मोरया हा शब्द आपोआप ओठावर येतो, इतकेच नव्हे तर तो कुणीही जोरात उच्चारला नाही तरी आपल्या कानावर आल्याचा भास होतो. ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यानकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी।।’ हा श्लोक लहान मुलांना शिकवतात. मोरया म्हणजे गणपती हे सगळ्यांना माहीत असले तरी ते कशासाठी? हे बहुतेक लोकांना माहीत नसते, मलासुद्धा नव्हते.
यावर थोडा शोध घेतल्यानंतर असे समजले की पुणे जिल्ह्यात मोरगांव नावाचे एक गांव आहे. पूर्वीच्या काळी तिथे खूप मोरांची वस्ती असायची म्हणून ते नांव पडले होते. पुराणकाळात सिंधुरासुर नांवाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी घेतलेला गणपतीचा एक अवतार तिथे झाला होता अशी कथा आहे. त्या अवतारात ते मोर या वाहनावर स्वार होऊन आले होते म्हणून त्याला मयूरेश्वर असे म्हणतात. पुढे मयूरश्वरचे मोरेश्वर झाले. मोरगांव येथे गणपतीचे मोठे देऊळ आहे. अष्टविनायकांमध्ये त्याची गणना होते.

चौदाव्या शतकात चिंचवड येथे मोरया गोसावी नावाचे एक साधू रहात असत. ते गणपतीचे भक्त होते आणि नेहमी चिंचवडहून मोरगांवला चालत जाऊन गणेशाचे दर्शन घेत असत. एकदा त्यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ते शक्य झाले नाही. पण त्यांच्या असीम भक्तीभावावर गणपती प्रसन्न झाले आणि स्वतःच चिंचवडला येऊन त्यांना दर्शन दिले, तसेच “माझ्या नावापुढे मोरया हे तुझे नांव घेतले जाईल” असा आशीर्वाद त्यांना दिला अशी आख्यायिका आहे. तेंव्हापासून “गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” असे म्हणण्याची रूढी महाराष्ट्रात पडली.

छायाचित्र विकीपीडियावरून मूळ छायाचित्रकाराच्या सौजन्याने
Redtigerxyz – स्वतःचे काम,CC BY-SA 3.0,https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=8913180 द्वारे.

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मोरया रे बाप्पा मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया रे या श्री.प्रल्हाद शिंदे यांनी गायिलेल्या धडाकेबाज चालीवरील गाण्याने एका काळात खूप धमाल उडवली होती. गणेशोत्सवांमध्ये या गाण्याची ध्वनिफीत जिकडे तिकडे ध्वनिवर्धकावरून (लाउडस्पीकर) वाजवली जात असे. कित्येकांना हे गाणे ऐकून ऐकून तोंडपाठ झाले होते.
https://www.youtube.com/watch?v=shw04gHOUl0

हलाखीच्या परिस्थितीमधल्या कुटुंबात गणेशोत्सव साजरा करतांनासुद्धा किती कष्ट पडतात, पण ते समजून घेऊन बाप्पाने त्यांच्यावर कृपा करून जरा बरे दिवस आणावेत अशी विनवणी या हृदयद्रावक गाण्यामध्ये केली आहे. या गाण्याचे शब्द असे आहेत.

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया

तूच सुखकर्ता तूच दुखहरता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा || ध्रु ||

पहा झाले पुरे एक वर्ष
होतो वर्षान एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श
घ्यावा संसाराचा परामर्ष
पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची
वाचावी कशी मी गाथा || १ ||

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

नाव काढू नको तान्दुळाचे
केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे
दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी
द्यावा आशिर्वाद आता || २ ||

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

आली कशी पहा आज वेळ
कसा बसावा खर्चाचा मेळ
प्रसादाला दूध आणी केळ
साऱ्या प्रसादाची केली भेळ
गुण गाईन आणि राहीन
द्यावा आशिर्वाद बाप्पा || ३ ||

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

गायक : प्रल्हाद शिंदे
संगीत : मधुकर पाठक, हरेन्द्र जाधव
अल्बम : गणपती आरती

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

अष्टविनायक या गाजलेल्या मराठी चित्रपटात आठही विनायकांच्या देवळांची सुरेख वर्णन करणारे अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणे स्व.जगदीश खेबूडकरांनी लिहिले होते. त्या गाण्याच्या अखेरीलासुद्धा मोरया मोरयाचा गजर आहे.

मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया।
मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ।।
मोरया मोरया चिंतामणी मोरया ।
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ।।
मोरया मोरया महागणपती मोरया ।
मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ।।
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया ।
मोरया मोरया वरदविनायक मोरया ।।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया।
मोरया मोरया अष्टविनायक मोरया ।।

सातआठ वर्षांपूर्वी आलेल्या उलाढाल या चित्रपटातल्या ढोलताशांच्या आवाजाबरोबर होणाऱ्या मोरया मोरयाच्या गजराने त्या काळातल्या सगळ्या गणेशोत्सवाचे मांडव दणाणून गेले होते. अजय अतुल या संगीतकार जोडगोळीने गाजवलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहेच. या क्षणी टीव्हीवर चालू असलेल्या सूर नवा ध्यास नवा या मालिकेत मी हे दणकेदार गाणे ऐकत आहे. याचे शब्द असे आहेत.

हे देवा तुझ्या दारी आलो गुनगान गाया
तुझ्याइना मानसाचा जन्म जायी वाया
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया

मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

ॐकाराचं रुप तुझं चराचरामंदी
झाड, येली, पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा गरीबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरुप झाली
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

आदि अंत तूच खरा, तूच बुध्दीदाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मोरया या नांवाचा एक चित्रपट सात वर्षांपूर्वी येऊन गेला. संगीतकार गायक आणि गीतकार श्री अवधूत गुप्ते यांनी लिहिलेले त्यातले शीर्षक गीत अर्थातच बाप्पा मोरयावर आहे. गणपती बाप्पा मोरयाने पुन्हा अवतार घेऊन चुकलेल्या लोकांना योग्य वाट दाखवावी अशी विनंती या गाण्यात केली आहे.
मोरया सिनेमा टायटल साँग
https://www.youtube.com/watch?reload=9&v=aZwIwU_k6SM
तूच माझी आई देवा, तूच माझा बाप ।
तूच माझी आई देवा, तूच माझा बाप ।
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप।
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप।
चुकलेल्या कोकराया, वाट दाखवाया
घ्यावा पुन्हा अवतार, बाप्पा मोरया ।

गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।

काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय,
माझा श्वास हि तुझिच माया तुझे हात पाय,
काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय,
माझा श्वास हि तुझिच माया तुझे हात पाय।
कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य,
का खेळीसी खेळ असा हा सारे अगम्य
तारू माझे पैलतीरी ताल कराया।

गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।

ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच,
कधी होशी सखा कधी वैरी होशी तूच।
ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच,
कधी होशी सखा कधी वैरी होशी तूच।
देवा तुला देवपण देती भक्तगण,
दानवांना पाप कर्म शिकवितो कोण
निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया।

गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

पं.हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या भावाबहिणीच्या जोडीने अवीट गोडी असलेल्या अनेक गीतांची भर मराठी सुगम संगीतामध्ये घालून त्याला अत्यंत समृद्ध केले आहे. सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांनी त्यांच्यासाठी लिहून दिलेले गजानना, श्री गणराया हे मोरयाला वंदन करणारे भक्तीगीत अजरामर झाले आहेच.
https://www.youtube.com/watch?v=fV8WIzEHD-E

गजानना, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया

सिंदुरचर्चित धवळे अंग
चंदन उटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया

गौरीतनया भालचंद्रा
देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा
अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मागच्या वर्षी आलेल्या व्हेंटिलेटर या एका वेगळ्याच विषयावरल्या चित्रपटामध्येसुद्धा गणेशोत्सवावर एक गाणे आहे. गीतकार मनोज यादव व शांताराम मापुसकर या जोडीने लिहिलेले या रे या सारे या हे गीत रोहन रोहन या संगीत दिग्दर्शकांनी बांधलेल्या चालीवर गायक रोहन प्रधान यांनी गायिले आहे. त्यातले समूहगान म्हणजे कोरस तर खूपच बहारदार आहे.
https://youtu.be/HzGE_WaSqE4

या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया
या रे या सारे या ….

उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया
या रे या सारे या ……

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

आपल्या समाजामध्येच कुठल्याही निमित्याने मोठमोठ्याने कर्ण्यावर (लाऊडस्पीकरवर) गाणी वाजवत राहणे आणि कार्यक्रमांमध्ये त्याचप्रमाणे मिरवणुकींमध्ये डी जे वर गाणी लावून त्यावर नाच करणे यालाच आता खूप जोर आल्यामुळे त्यासाठी कर्कश आवाज आणि उडत्या चालींच्या गाण्यांनाही उधाण आले आहे. यात सिनेमातली गाणी, आल्बम्स, लोकगीते वगैरे सर्वांचाच समावेश होतो. गणेशोत्सवांमध्येसुद्धा ते लोण आल्याशिवाय कसे राहील? तिथे देवाशी कसलाही संबंध नसलेली पॉप्युलर गाणी तर वाजवली जातातच, मुद्दाम गणपती बाप्पाचा उल्लेख असलेली अनेक गाणीसुद्धा गणेशोत्सवाच्या सुमाराला बाजारात यायला लागली. गेल्या तीन वर्षांमधल्या अशा गाण्यांचे दुवे खाली दिले आहेत.

२०१६ मोरया गाणी
https://www.youtube.com/watch?v=z7W9gEtIXbU

२०१७ मोरया गाणी
https://www.youtube.com/watch?v=OHUy2KJlINk

२०१८ ढोल ढोल ढोल घुमू लागला
https://www.youtube.com/watch?v=esBHy_ky-PQ

आता मोरयासंबंधीचे थोडेसे अवांतर
मोरया हा शब्द शार्दूलविक्रीडित या वृत्तातल्या ओळींच्या शेवटी चपखल बसत असल्यामुळे बहुतेक मंगलाष्टकांमध्ये तो येतोच. उदाहरणार्थ
प्रारंभी नमुया महेशतनया, विघ्नांतका मोरया ।
ब्रह्मा विष्णु शिवा, उमा, कमलजा, त्रैमूर्ति दत्तात्रया ।।

मोरया मधील मोर च्या ऐवजी More हा शब्द घालून Moreया, Moreघ्या. Moreन्या, Moreद्या असे शब्दप्रयोग केलेल्या जाहिराती या दिवसात पहायला मिळतात.

आपला गणपती बाप्पा आपल्या भक्तांना तुम्ही मागे राहू नका म्होरं या, म्हणजे पुढे या असा आदेश देत असतो म्हणून त्याला मोरया म्हणतात असा अजब शोधसुद्धा कोणा डोकेबाज माणसाने लावला आहे.

अनंतचतुर्दशीला सर्व ठिकाणचे उत्सव संपून विसर्जनाच्या जंगी मिरवणुकी निघतील आणि गणपतीबाप्पा मोरयाला पुढच्या वर्षी लवकर या असे सांगून रात्री उशीरापर्यंत किंवा कदाचित दुसरे दिवशी सकाळपर्यंत त्या चालत राहतील. मी या वर्षीच्या गणेशोत्सवात लिहिलेला मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया हा लेख रोज थोडी भर घालून पुढे नेला होता. त्या बाप्पाला मनोमन वंदन करून आज तो पूर्ण करीत आहे.

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

गणपतीच्या आरत्या आणि स्तोत्रे


सध्या गणेशोत्सव सुरू आहे. या प्रसंगी श्रीगणरायाला साष्टांग प्रणिपात.
हा उत्सव सर्वांना फलदायक ठरो अशा शुभेच्छा. या दिवसानिमित्य गणेशाची दोन स्तोत्रे आणि आरत्या खाली देत आहे.

१ गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता

माझ्या लहानपणी आमच्या गावातले सगळे रस्ते मातीचे होते, रस्त्यांच्या दोन्ही कडांना उघडी गटारे असायची, त्यांच्या बाजूला इतरही घाण केलेली किंवा टाकलेली असायची आणि काही गलिच्छ प्राणी त्यातून स्वैर हिंडत असायचे. रस्त्यातल्या विजेच्या खांबांवरचे दिवे कधी पेटलेच तरी अगदी मिणमिणता उजेड देत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्या तसल्या रस्त्यांवरून फिरायला नकोसे वाटत असे. दिवेलागणी होईपर्यंत आम्ही सगळेजण आपण होऊनच घरी परतत होतो. त्यावेळी घरातला महिला वर्ग रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाकात गुंतलेला असायचा आणि आम्ही मुले घरी आल्यानंतर शुभंकरोती आणि परवचा म्हणून झाल्यावर श्लोक, गाणी वगैरे म्हणत बोलावण्याची वाट पहात असू.

स्वैपाक पुरा होत आला की “दुपार्तीला या रे” अशी हाक यायची आणि घरातले सगळे जण देवासमोर येऊन उपस्थित होत असत. “या वेळच्या आरतीला ‘दुपारती’ असे का म्हणतात?” असे मी एकदा मोठ्या भावाला विचारले, तेंव्हा त्याने उत्तर दिले “अरे आपण दुपारी शाळेत असतो ना? म्हणून ती संध्याकाळी करतात.” त्याचे खरे नाव ‘धूप आरती’ असे असते हे ज्ञान खूप उशीराने झाले. पण त्याने काही फरक पडला नाही, कारण आमच्या घरातल्या ‘दुपारती’मध्ये सहसा धूप नसायचाच, ती निरांजन ओवाळूनच केली जात असे. दररोज करण्याच्या या आरतीत फक्त दोनच आरत्या म्हंटल्या जात. दररोज आधी गणपतीची आरती म्हणायची आणि सोमवारी शंकराची, मंगळवार व शुक्रवारी देवीची, बुधवारी विठोबाची, गुरुवारी दत्ताची व शनिवारी मारुतीची आरती म्हणायची हा कार्यक्रम खंड न पाडता कित्येक वर्षे चालत आला होता.

संध्याकाळच्या वेळेला भुते, पिशाच्चे, दुष्टआत्मे वगैरे मोकळे हिंडत असतात आणि आरत्यांचे आवाज ऐकून ते घाबरून दूर पळून जातात असे त्या काळात सांगितले जात असे. त्यांना जास्तच घाबरवण्यासाठी आम्ही जोरजोरात झांजा वाजवून आणि तारस्वरात आरत्या म्हणत असू. आजकाल नावापुरते सायन्स शिकलेले काही लोक निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, निगेटिव्ह एनर्जी वगैरे शब्द वापरतात, त्यांनाही कसली तरी अनामिक भीती वाटत असते. आरत्यांचा ध्वनीच प्रभावी समजला जात असल्यामुळे त्यातल्या शब्दांकडे कोणी लक्ष देत नसत. योग्य तो ध्वनि उत्पन्न करण्यासाठी फक्त त्यांचा उच्चार बरोबर यायला हवा, अर्थ समजून घेण्याचे काही कारण नसायचे. पण माझा स्वभाव थोडा चिकित्सक असल्यामुळे मला तो समजून घ्यावा असे वाटत असे. त्यातल्या कुठल्या शब्दांमुळे किंवा वाक्यांमुळे भुतांना घाबरायला होते याचे कुतूहलही वाटत होते. गणपतीची आरती रोजच कानावर पडत असल्यामुळे मला बोलायला लागण्याबरोबर ती आरती आपोआप पाठ झाली होती. या आरतीतले सगळे शब्द अगदी सोपे आहेत. तरीही आज गणेशचतुर्थीच्या दिवशी त्याचा अर्थ समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करू.

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
या पहिल्या ओळीतल्या पहिल्या दोन शब्दांचे अर्थ सुख करणारा (देणारा) आणि दुःखाचा नाश करणारा असे होतात, पण पुढे विघ्नाची वार्ता कशाला? त्याचे उत्तर पुढील ओळीत आहे.
नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी, तिला शिल्लक ठेवत नाही, शिवाय प्रेमाचा पुरवठा करते अशी ज्याची कृपा आहे. अशा त्या गणपतीचे वर्णन पुढील ओळींमध्ये आहे.
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।।
कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।

त्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि चमकदार मोत्याची माळ गळ्यात परिधान केली आहे. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार ध्रुवपदात केला आहे.
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।

त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले आहे. ‘दर्शनमात्रे’च्या जोडीला काही भक्त तर ‘स्मरणमात्रे’च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही जरा अतीशयोक्ती झाली, कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच ‘ये दिल माँगे मोअर’ म्हणत राहतो. शिवाय दोन शत्रूपक्षातल्या किंवा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार ?

या आरतीच्या दुसऱ्या कडव्यात राजसी थाटाच्या गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्रसंगीत वर्णन केले आहे. गणपतीचे पिताश्री शंकर महादेव अंगाला भस्म लावून अगदी साधेपणे रहात असतांना दाखवले जातात, तसेच त्याची आई पार्वतीसुध्दा माहेरच्या ऐश्वर्याचा त्याग करून कसलेही अलंकार न घालता वावरतांना पुराणात दिसते, पण त्यांचा पुत्र गणेश मात्र नेहमी राजसी थाटात असतो.
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।।

पार्वतीच्या या पुत्राने रत्नखचित अलंकार परिधान केला आहे, त्याने सर्वांगाला लावलेल्या शेंदुराच्या उटीचा उल्लेख पहिल्या चरणात आलेला आहे, आता त्याच्या जोडीला सुगंधी चंदन, केशर आणि लालचुटुक कुंकुमाची भर पडली आहे. त्याच्या पायात रुणुझुणू वाजणाऱ्या नूपुरांच्या (पैंजणांच्या) छोट्या छोट्या घागऱ्यांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या हिरेजडित मुकुटापर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे.

लंबोदर पितांबर फणिवर बंधना ।।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।

तिसऱ्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये गणपतीचे वर्णन असे केले आहे, त्याचे उदर (पोट) मोठे आहे, त्यावर नागाला (पट्ट्यासारखे) बांधले आहे, पिवळ्या रंगाचे धोतर तो नेसला आहे, त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे, त्याला तीन डोळे आहेत असे वर्णन या आरतीमध्ये केले आहे, पण गणपतीच्या कुठल्याच चित्रात मी त्याच्या कपाळावर तिसरा डोळा काढलेला पाहिला नाही.
दास रामाचा वाट पाहे सदना ।।
संकटी पावावे सुरवर वंदना ।।

अशा वर दिलेल्या स्वरूपाच्या गजाननाची वाट रामाचा दास (रामदास) घरी बसून पहात आहे, या देवांनाही वंदनीय अशा देवाने संकटकाळात प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना संत रामदासांनी केली आहे. (आणि निर्वाणी रक्षावे, या निर्वाणीच्या क्षणी आपले रक्षण करावे, अशी पुस्ती भक्तांनी त्याला जोडून ही विनंती अधित स्पष्ट केली आहे). काही लोक शेवटची ओळ ”संकष्टी पावावे” असे म्हणून सगळा अर्थच बदलून टाकतात. कदाचित संकष्टी या शब्दाचा अर्थ चतुर्थी असा न घेता खूप कष्टाची वेळ असा घेता येईल.

सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची शब्दरचना अशी अगदी सोपी आहे, त्यात खूप गहन अर्थ भरला असेल असे मला तरी कधी जाणवले नाही. सर्वसाधारण जनतेला ती कळावी, पटावी म्हणजे ते या आरतीचा स्वीकार करतील असाच विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणात साध्य झाला आहे. तीनशेहे वर्षांनंतरही आज अक्षरशः कोट्यावधी लोक गणपतीची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हंटली जात आहे. या आरतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती, गणेश, गजानन, विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिध्द नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडव्यात नाही, तरीसुध्दा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणाला शंका येत नाही.


गणपतीची आरती – २ – शेंदुर लाल चढायो

‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही गणपतीची आरती आमच्या घरी रोज म्हंटली जात होतीच, गणेशोत्सवामध्ये त्याच्या जोडीला एक हिंदी आरती म्हंटली जात असे. राष्ट्रभाषेचा परिचय होत असतांना सुरुवातीच्या काळात त्या भाषेतल्या ज्या थोड्या रचना मी म्हंटल्या असतील त्यातली ही एक होती. या आरतीची सुरुवात अशी होती,
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥

श्रीगणेशाला अंगभर लाल रंगाचा शेंदूर लावलेला आहे, शंकरपार्वतीच्या या मुलाचे लंबोदर (विशाल पोट) त्यामुळे छान लालचुटुक दिसते आहे, त्याच्या हातात गुळाचा लाडू आहे, अशा या गजाननाचा महिमा साधुसंतांना आणि देवाधिकांनाही सांगता येणार नाही इतका महान आहे, मी त्याच्या पायावर लोटांगण घालतो आहे.

त्यानंतर ध्रुवपदात त्याचा जयजयकार केला आहे.
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥

विद्या आणि सुख दोन्ही देणाऱ्या गणगायाचा जयजयकार असो, तुमचे दर्शन घेऊन मी धन्य झालो, माझे मन त्यात रमून जाते.

दुसऱ्या कडव्यात गणपतीचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी ॥जय० ॥२॥

आठही सिध्दी याच्या दासी आहेत, त्याच्या आज्ञेनुसार त्या वागतात, हा संकटांचा वैरी आहे, विघ्नांचा नाश करतो, हा मांगल्याची मूर्ती आणि अधिकारी आहे, याची छवि कोटी सूर्यांइतकी तेजस्वी आहे, मदमस्त हत्त्तीच्या (त्याच्या) मस्तकावर चंद्रकोर झुलत आहे. अशा श्रीगणरायाचा जयजयकार.

या गजाननाची भक्ती करणाऱ्याला कोणते लाभ मिळतात हे या आरतीच्या तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे.
भावभगतसे कोई शरणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥

जो कोणी भक्तीभावाने त्याला शरण जातो त्याला भरपूर संतती आणि संपत्ती मिळते, आजच्या जमान्यात खूप मुले होणे हे वरदान कोणाला परवडणारे नाही, पण तीनचारशे वर्षांपूर्वी जितकी जास्त वंशवृध्दी होईल तितके ते चांगले मानले जात असे. असे हे महाराज मला अत्यंत प्रिय आहेत म्हणून हा गोसाव्याचा मुलगा दिवसरात्र त्यांचे गुणगान करत असतो. श्रीगणरायाचा जयजयकार असो.

ही आरती हिंदी भाषेत असली तरी त्याची चाल आणि त्यातला भाव मराठी भाषेतल्या आरत्यांसारखाच वाटतो. माझ्या ओळखीतले सगळे हिंदी भाषिक जय जगदीश हरे या चालीवरच्या आरत्याच नेहमी गातात. ‘शेंदूर लाल चढायो’ ही आरती मी कधीच त्यांच्या तोंडी ऐकली नाही. ‘गोसावीनंदन’ या नावाविषयी मी थोडी माहिती गुगलून काढली. ती खाली दिली आहे, पण तो गाणपत्य होता एवढाच संदर्भ जुळतो. बाकीच्या माहितीचा या हिंदी आरतीशी कसलाच धागा जुळत नाही. त्यामुळे ही आरती लिहिणारा गोसावीनंदन कदाचित वेगळा असेल. त्याने ती कोणासाठी लिहिली याचा बोध होत नाही.

गोसावीनंदन : केतकरांच्या ज्ञानकोशात दिलेली माहिती :- याचें नांव वासुदेव असून बापाचें नांव गोस्वामी (गोसावी) होतें. हा तंजावरकडील राहणारा असून याचे गुरु गोपाळश्रमगजानन नांवाचे होते. अर्वाचीनकोशकार याच्या गुरूंचें नांव निरंजनस्वामी असें देतात. याचा काल इ. स. १६५०-१७०० चा होय. याचा मुख्य ग्रंथ ज्ञानमोदक नावाचा असून शिवाय सीतास्वयंवर व अभंग, पदें वगैरे स्फुटकाव्य बरेंच आहे. यांचीं स्तोत्रें व अष्टकें लहान मुलांनां शिकतां येतील अशीं सोपीं व साधीं आहेत; हा गाणपत्य होता’

गणपतीच्या आरत्यांसंबंधी अधिक माहिती माझ्या या ब्लॉगवर दिली आहे.
https://anandghare.wordpress.com/2018/09/16/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/


३. संकट नाशन गणेश स्तोत्र

(नारद पुराण, नारद विरचित)

नारद उवाच

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं
भक्तावासं स्मरेत् नित्यं आयु: कामार्थ सिद्धये ।।१।।

प्रथमं वक्रतुण्डं च एकदंतं द्वितीयकं
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं ।।२।।

लंबोदरं पञ्चमं च षष्ठमं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णम् तथाष्टकं ।।३।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं
एकादशं गणपतिम् द्वादशं तु गजाननं ।।४।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेत् नर:
न च विघ्नभयं तस्य सर्व सिद्धिकरं भवेत् ।।५।।

विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६।।

जपेत् गणपति स्तोत्रं षड्भि: मासै: फ़लं लभेत्
संवत्सरेण सिद्धिम् च लभते नात्र संशय: ।।७।।

अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्र्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८।।

इति श्री नारद पुराणे नारद विरचितं
“संकटनाशनं” नाम श्रीगणेश स्तोत्रं संपूर्णम्

शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु

ॐ श्री गजानन प्रसन्न

ॐ गं गणपतये नम:

———————

४. श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र (मुद्गल पुराण )

ॐ श्री गणेशाय नम:

शुक्लाम्बर धरं देवं शशिवर्णम् चतुर्भुजं
प्रसन्न वदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशांतये ।।१।।

अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम् पूजितो य: सुरासुरै:
सर्व विघ्नहर: तस्मै गणाधिपतये नम: ।।२।।

गणानां अधिप: चण्डो गजवक्त्र: त्रिलोचन:
प्रसन्नो भव मे नित्यं वरदात: विनायक: ।।३।।

सुमुख: एकदंतश्च कपिलो गजकर्णक:
लंबोदरश्च विकट: विघ्ननाशो विनायक: ।।४।।

धूम्रकेतु: गणाध्यक्ष: भालचन्द्र: गजानन:
द्वादश एतानि नामानि गणाध्यक्षश्च य: पठेत् ।।५।।

विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं
इष्टकामं तु कामार्थी धर्मार्थी मोक्षं अक्षयं ।।६।।

विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा
संग्रामे संकटे चैव विघ्न: तस्य न जायते ।।७।।

इति श्री मुद्गल पुराणोक्तं श्रीगणेश द्वादश नाम स्तोत्रं संपूर्णम्

शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

५. वक्रतुंड महाकाय

मी शाळेत असतांना वर्गातल्या बाकीच्या सगळ्या मुलांपेक्षा वयाने आणि चणीनेही लहान असल्यामुळे त्या सर्वांना थोडा घाबरून रहात असे. त्यातल्या कोणाला “अरे वाकड्या तोंडाच्या” अशी हाक मी मारली असती तर त्याने माझा एक गाल सुजवून माझेच थोबाड वाकडे करून टाकले असते आणि कोणाला जर मी “ढबाल्या” म्हंटले असते तर त्याच्या गुबगुबीत हाताचा ठोसा मला खावा लागला असता. त्यामुळे असले काही धाडस करायची माझी हिंमत झाली नसती, पण आपले गणपतीबाप्पा कधी असे रागावत नाहीत. मला कळायलाही लागायच्या आधीपासून “वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।” हा त्यांचा श्लोक कानावर पडून मला तोंडपाठ झाला होता आणि मीसुध्दा इतर बडबडगीतांबरोबरच “वक्कतुंड म्हाकाय सुल्यकोटी समप्पब” असे काही तरी बडबडू लागलो होतो. त्या शब्दांच्या उच्चारणात हळूहळू सुधारणा होत गेली आणि मी ते व्यवस्थित म्हणायला लागलो. तेंव्हापासून ते आजतागायत जगातल्या कुठल्याही ठिकाणच्या, अगदी इंग्लंड अमेरिकेतल्यासुध्दा, एकाद्या देवळात गणेशाची मूर्ती दिसली की त्याला हात जोडून नमस्कार करताच हाच श्लोक माझ्या ओठावर येतो. मुंबईतल्या कुठल्याही रस्त्याने जात असतांना वाटेत गणेशोत्सवाचे मंडप लागतात आणि आत जाऊन मंगलमूर्तीचे दर्शन घेतांना हा श्लोकही म्हंटला जातो. असे गेल्या आठवड्यात रोज घडत आले आहे.

कोणत्या ऋषीमुनीने हा श्लोक लिहिला आहे हे काही मला ठाऊक नाही, पण गणपतीच्या सहस्रनामांमधले ‘वक्रतुंड’ हेच नाव त्यांना या श्लोकात घ्यावेसे का वाटले कोण जाणे, ‘महाकाय’ याचा अर्थ ‘आडव्या अंगाचा’ असा न घेता शक्तीशाली, सामर्थ्यवान असाही घेता येईल. या देवाचा मुखडा आणि शरीरयष्टी कशीही (कदाचित भयभीत करणारी) असली तरी त्याचे तेज कोटी सूर्यांइतके दिपवून टाकणारे आहे असे या श्लोकाच्या पहिल्या चरणात लिहिले आहे. पण त्या महाशक्तीला वंदन, नमन वगैरेसुध्दा न करता “निर्विघ्नम् कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा” म्हणजे “माझ्या सगळ्या कार्यांमध्ये येणारी विघ्ने सर्व वेळी दूर कर” अशी प्रार्थना किंवा मागणे या श्लोकाच्या पुढल्या ओळीत मांडले आहे. पहिल्या शब्दात त्याला नावे ठेवायची आणि पुढे लाडीगोडी लावून त्यालाच नेहमी आपली मदत करायला सांगायचे असे या श्लोकाचे स्वरूप दिसते. चांगली बुध्दी, स्वर्ग, मोक्ष, संपत्ती, शांती यातले काही न मागता आपल्या कामातले अडथळे तेवढे दूर करण्याची ही विनंती या श्लोकात आहे. देवाच्या कृपेने आपला मार्ग निर्विघ्न झाला की आपले काम आपल्या प्रयत्नानेच तडीला न्यायचे, आपले यश आपण मिळवायचे, ते आयते हातात पडायला नको असा एक चांगला विचार त्यात दिसतो.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।

या श्लोकाच्या पाठोपाठ म्हंटला जाणारा श्लोक आहे,
गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती । पंचैतानि स्मरेन्नित्यम् वेदवाणी प्रवर्तते।।

(आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेले सगळे काही साध्य करून घेण्यासाठी) गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती या पाचजणांचे रोज स्मरण करावे असे वेदांमध्ये सांगितले आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे. यातला गणनाथ म्हणजेच गणपती हा सर्व गणांचा म्हणजे देवांच्या सर्व सेवकांचा प्रमुख आहे. सगळे काही करणे वा न करणे, करू देणे वा न देणे हे त्याच्या हातात आहे. सरस्वती ही विद्या, कला वगैरेंची देवता आहे. रवी, शुक्र आणि बृहस्पती हे नवग्रहांमधले प्रमुख ग्रह आहेत, त्यातला सूर्य अत्यंत तेजस्वी, प्रखर , ऊर्जा देणारा आणि जीवनाधार आहे. शुक्र आणि गुरू हे पुराणामधल्या कथांनुसार अनुक्रमे दैत्य आणि देवांचे गुरू होते. त्यांच्या सैन्यांना युध्दामधले सारे कौशल्य आणि डावपेच ते शिकवत असत. बृहस्पती हे अत्यंत बुध्दीमान आणि विद्वान तर शुक्राचार्य हे अत्यंत धोरणी समजले जात असत. पुराणातल्या बहुतेक सगळ्या लढायांमध्ये शेवटी देवांचाच विजय होत असला तरी पराभवाने निष्प्रभ झालेल्या असुरांना शुक्राचार्य संजीवन देऊन पुन्हा बलिष्ट बनवण्याचे काम करत असत. सामर्थ्य, कलाकौशल्य, तेज, बुध्दीमत्ता, विद्वत्ता, चतुराई हे सगळे गुण अंगात बाणवले तर माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी होणारच. शुक्र आणि बृहस्पती यांना विकार आणि विवेक यांची प्रतीके असेही बहुधा मानता येईल. ‘सगळे काही’ मिळवायचे असल्यास या दोघांचीही मदत लागेलच, शिवाय शक्ती, युक्ती, कौशल्य वगैरेही पाहिजेत.


या ब्लॉगवरील गणेशोत्सव

आनंदघन या नावाचा माझा ब्लॉग मी १ जानेवारी २००६ ला सुरू केला आणि अजूनही चालवत आहे. त्यात पहिल्या वर्षापासून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मी काही ना काही लिहीत आलो आहे. त्यातले गणपतीविषयक २९ निवडक लेख मी क्रमाक्रमाने या ब्लॉगवरदेखील सादर केले आहेत. उरलेले लेख एकत्र करून या वर्षी या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे सादर करीत आहे.

2009 : यंदाचा आमचा गणेशोत्सव

फार पूर्वीपासून म्हणजे माझ्या जन्मापूर्वीपासून आमच्या घरी पांच दिवसाचा गणेशोत्सव होत आला आहे. आमचे घर बांधतांनाच त्यातल्या सोप्याच्या मधोमध एक खास ‘गणपतीचा कोनाडा’ ठेवण्यात आला होता. एकादा लहान मुलगा त्यात चढून बसू शकेल इतका तो रुंद, उंच आणि खोल होता. त्याच्या आजूबाजूच्या भिंतीसुध्दा थोड्या सजवलेला होत्या. एरवी त्या कोनाड्यात इतर शोभेच्या किंवा अत्यावश्यक वस्तू ठेवल्या जात. गणेशचतुर्थीच्या आधी तो रिकामा करून रंगरंगोटी करून तयार ठेवला जाई. घरातली मुले आपले कलाकौशल्य पणाला लावून दरवर्षी नवे मखर आणि इतर सजावट करीत असत. कॉलेजला गेल्यानंतर दरवर्षी दिवाळीला घरी जायचे असायचेच. त्यापूर्वी गणपतीसाठी एक वेगळी ट्रिप करणे शक्य नसल्यामुळे स्थानिक नातेवाईकांना भेट देणे आणि सार्वजनिक गणेशोत्सवांची आरास पहात तिथले थोडे गाण्याबिण्याचे कार्यक्रम पाहणे एवढाच माझा गणेशोत्सवात सहभाग होत असे. लग्न करून घर थाटल्यानंतर दोन खोल्यांच्या इवल्याशा घरात गणपतीची पिटुकली मूर्ती आणून आमचा वेगळा घरचा गणेशोत्सव सुरू केला. बदलत्या परिस्थितीनुसार दरवर्षी कांहीतरी नवे आणि चांगले करण्याच्या प्रयत्नामधून त्यात सुधारणा होत गेली.

सेवानिवृत्तीनंतर प्रशस्त सरकारी निवास सोडून लहानशा सदनिकेत रहायला गेलो. त्यानंतर कांही महिन्यांनी एक मोठे दुखणे येऊन गेले. २००६ च्या गणेशोत्सवापर्यंत मी त्यातून हळूहळू मार्गावर येत होतो, पण अजून हिंडू फिरू लागलो नव्हतो आणि काही काम करायला अंगात फारसे त्राण नव्हते. त्यामुळे नव्या घरात पुन्हा एकदा अगदी लहान प्रमाणात गणेशोत्सव सुरू केला. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २००७ साली पुण्याला मुलाकडे गणपती ठेवायचे ठरवले. सर्वांनी खूप उत्साहात हा सण साजरा केला. मागल्या वर्षी घरात आम्ही दोघेच राहिलो होतो, त्यामुळे जुन्या आठवणी काढत आणि शेजारपाजारच्या लोकांना बोलवत गणेशोत्सव साजरा केला.

यंदा मात्र मुले सहकुटुंब घरी येऊन पुन्हा एकदा गणेशचतुर्थीला घराचे गोकुळ झाले होते. त्यामुळे सर्वांच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले होते. पण आता दिवस बदलले आहेत. पूर्वीप्रमाणे आपल्या कलाकौशल्याला वाव देऊन कांही नवी निर्मिती करण्याला तितकेसे महत्व राहिलेले नाही. उगाच आपल्या डोक्याला ताप देण्यापेक्षा बाजारातून रेडीमेड वस्तू आणणे सोईचे वाटते. नाना प्रकारची मखरे आणि सजावट करण्यासाठी असंख्य प्रकारच्या सुबक आणि झगमगीत गोष्टी बाजारात खचाखच भरलेल्या असतात. उपलब्ध जागा आणि खिशाचा विचार करून त्यातल्या कांही आणल्या आणि फटाफट जोडून टाकल्या. गणपतीच्या नैवेद्यापुरते एक दिवस तळलेले आणि एकदा उकडीचे मोदक घरी केले होते. त्याशिवाय पुण्याहून चितळे बंधूंची आंबाबर्फी आणि बाकरवडी आणली होती, हल्दीरामची सोनपापडी, बिकानेरची दाळमोठ आणि गुलाबजाम, शिवकृपाचे फरसाण आणि काजू कटली, गोडबोल्यांचे लाडू आणि शंकरपाळी, आणखी कोठले कांही, कोठले कांही अशा नाना तऱ्हेच्या मिठाया आणि नमकीन खाद्यवस्तूंची लयलूट होती. या निमित्याने अनेक आप्तेष्ट येऊन भेटून गेले. त्या गडबडीत पाच दिवसाचा उत्सव कसा संपला ते कळलेच नाही.

ब्लॉगगिरी सुरू केल्यापासून दरवर्षी गणेशोत्सवात कांही तरी प्रासंगिक लिहायचे असे ठरवले होते. पहिल्या वर्षी म्हणजे २००६ साली घरबसल्याच वृत्तपत्रे आणि टीव्हीवर जेवढे गणेशोत्सव पाहिले त्यावरून गणेशाच्या ‘कोटी कोटी रूपां’वर एक लेखमालिका लिहिली. सलग अकरा दिवस मी स्वतः, माझा संगणक आणि आंतर्जाल सक्षम राहिलो आणि रोज एक लेख लिहून तो ब्लॉगवर टाकू शकलो ही त्या श्रीगणेशाची कृपाच. पुढील वर्षी मी मुंबईत नव्हतोच, पण आधीपासून थोडी तयारी केली आणि आंतर्जालावर भ्रमण करून थोडी शोधाशोध केली आणि पुण्याला राहूनच रोज एक गजाननाचे गीत ब्लॉगवर टाकत राहिलो. मागल्या वर्षी ‘गणेशोत्सव आणि पर्यावरण’ या विषयावर एक लेखमाला लिहिली होती. या वर्षी काय करायचे किंवा काय करता येईल हे ठरत नव्हते. योगायोगाने काही विचार सुचले, कांही जुने कागद हाताशी लागले आणि त्यातून ‘आधी वंदू तुज मोरया’, ‘मूषक आणि माउस’, ‘लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव’ हे लेख लिहिले गेले. आणि आजचे हे पुनरावलोकन.

2009 : पुढच्या वर्षी लवकर या … की एकदा येऊच नका?

‘पुढच्या वर्षी एकदा येऊच नका’ य मथळ्याखाली श्री.संजय पेठे यांनी लोकसत्तामधल्या आपल्या ‘थर्ड आय’ या सदरात एक लेख लिहिला आहे. गणेशोत्सव आणि विसर्जनाची मिरवणूक याला आज जे स्वरूप आले आहे त्याबद्दल खेद आणि सात्विक संताप व्यक्त करून गणरायांनासुध्दा कदाचित पुढच्या वर्षी येऊ नये असे वाटत असेल असे मत त्यांनी या लेखात व्यक्त केले आहे. “या उत्सवात धार्मिकपणा नाही”, “या निमित्याने कांही लोक मिरवण्याची हौस भागवून घेतात”, “बहुतेक लोक मनाची करमणूक करून घेतात”, “यातले कार्यक्रम दर्जेदार नव्हते”, “यात पैशाचा अपहार व अपव्यय होतो”, “लोकांचा वेळ वाया दवडला जातो” आणि “परदेशी लोक यातून आपल्या देशाची बदनामी करतात” हे मुख्य मुद्दे त्यांनी आपल्या लेखात मांडले आहेत. मागील आठवड्यात मी या ब्लॉगवर लिहिलेल्या दोन लेखात लोकमान्य टिळकांनी सन १८९४ आणि १८९५ मध्ये केसरीत लिहिलेल्या दोन अग्रलेखांबद्दल लिहिले होते. एकशे पंधरा वर्षांपूर्वीसुध्दा नेमके हेच मुद्दे टिळकांच्या विरोधकांनी मांडले होते असे त्यातून दिसते. आज गणेशोत्सवाचे संयोजन करणाऱ्या लोकांना लोकमान्य टिळकांच्या पायाच्या नखाचीसुध्दा सर येणार नाही हे ते स्वतः देखील मान्य करतील. असे असले तरी विरोधकांचे मुद्दे जसेच्या तसेच राहिले असल्याचे पाहून गंमत वाटली. आज या उत्सवाचे दृष्य स्वरूप बदलले आहे, त्याचा आवाका शतपटीने वाढला आहे आणि त्यातल्या वाईट प्रकारांचे समर्थन करता येणे शक्यच नाही. गणेशोत्सवावर होत असलेल्या टीकेचा जसा खरपूस समाचार लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात घेतला होता तसा आता कोणालाच घेता येणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या उत्सवाच्या निमित्याने लोकसंग्रह करून त्यांना देशभक्तीच्या मार्गाला लावण्याचे लोकमान्यांच्या डोळ्यासमोर असलेले उदात्त उद्दिष्ट आज आपल्यापुढे राहिलेले नाही. तरीसुध्दा लोकमान्यांपासून प्रेरणा घेऊन कांही चांगले उपक्रम कांही ठिकाणी होत आहेत हे संजयनेसुध्दा मान्य केले आहे.

शंभर वर्षातल्या परिस्थितीत एक महत्वाचा फरक दिसतो. “एरवी मद्यपान करून लोळत पडणारे बरेच लोक गणेशोत्सवाचे दहा दिवस व्यसनापासून दूर राहतात” असा एक मोठा फायदा लोकमान्यांनी नमूद केला होता. आज याच्या नेमकी उलट परिस्थिती दिसते. अनेक प्रकारच्या धुंदीत उत्सव साजरा करणारेच कांही लोक ‘वहावत’ जातांना पहायला मिळतात. पण सारेच त्या अवस्थेत नसतात. माझ्या आजूबाजूच्या कित्येक गणेशोत्सवांच्या मंडपांत डोकावून पाहिल्यावर, आतापर्यंत झालेले कांही विसर्जन सोहळे प्रत्यक्ष पाहून झाल्यावर आणि आज या क्षणाला गांवोगांवी होत असलेल्या अनंतचतुर्दशीच्या भव्य मिरवणुकांचे थेट प्रक्षेपण पाहतांना ज्या समाजात आज आपण राहतो त्याचेच प्रतिबिंब मला त्या गर्दीत दिसत आले आहे. “त्या समूहात फक्त आपल्यासारखे निवडक लोक तेवढे धुतल्या तांदळाचे दाणे आहोत आणि बाकीचे सरसकट सारे लोक टाकाऊ खडे आहेत” असा आव आणणे मला योग्य वाटत नाही. आपल्या भोंवताली असलेला समाज जसा आहे तसा असल्याच्या सत्याचा स्वीकार करून आपल्या परीने आपल्या कार्यक्षेत्रात जेवढे बदल करता येणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न अगदी आपल्या घरापासून करणे हेच माझ्या मते महत्वाचे आहे. सर्व समाजाला नाक मुरडून नाकारण्याने कांही साध्य होणार नाही किंवा कांही गोष्टी व्यक्तीशः आपल्याला आवडल्या नसतील तर सरसकट त्या सगळ्या चुकीच्याच किंवा हिणकसच असतात असे समजण्याचेही कारण नाही.

संजयने मांडलेले एकूण एक चांगले विचार आणि त्याने केलेल्या सर्व सूचना यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. हा कदाचित योगायोग असेल किंवा आम्हाला मिळालेल्या समान प्रकारच्या संस्कारांचा भाग असेल. त्या सूचना अंमलात आणल्यास त्यातून समाजाचे भलेच होईल यात व्यक्तीशः मला कांही शंका नाही. फक्त इतक्या बलिष्ठ मांजरांच्या गळ्यात कोण कोण, कशा आणि कधी घंटा बांधणार हाच एक प्रश्न आहे. पण संजय माझ्यापेक्षा वयाने तरुण असला तरी मी मात्र त्याच्या एवढा निराश झालेलो नाही आणि गणपतीबाप्पाला पुढच्या वर्षी येऊच नका असे म्हणणार नाही.

या निमित्याने लोक एकमेकांना भेटतात हीच माझ्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट आहे. वर्षभरातून थोडे दिवस तरी ते एकत्र उभे राहून देवाच्या पारंपरिक आरत्या म्हणतात, त्यातले कांही शब्द तरी त्यांच्या मनाच्या आंतपर्यंत जाऊन पोचत असतील. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय असतो आणि कांही ना कांही निमित्य काढून मनातल्या उत्साहाला उधाण आणत असतो आणि ते तो करत राहणारच. त्यात एकमेकांचे अनुकरण होत असते तसेच प्रसारमाध्यमांमधून जे दाखवले जाते त्याचा परिणाम होत असतो. हे लक्षात घेता त्यामुळे इतर अप्रिय गोष्टी होतात म्हणून उत्सवच बंद करावा असे मी म्हणणार नाही आणि लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखांचा मतितार्थ जर मला समजला असेल तर त्यांनीसुध्दा असे सांगितले नसते असे मला वाटते. या निमित्याने लोक एका प्रकारे एकत्र वेळ घालवतात हीसुद्धा साधी सुधी गोष्ट नाही. एकदाचे ते एकत्र जमले म्हणजे त्यांना आपल्याला हवे तसे वळण लावणे हे आपले काम आहे असे त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखात स्पष्ट केले होते.


2010
यंदाच्या गणेशोत्सवातील आगळेपण

“नेमेचि येतो बघ पावसाळा । हे पृथ्वीचे कौतुक जाण बाळा ।।” या उक्तीमुळे तो दरवर्षी येतो आणि त्यातच गणेशोत्सवसुध्दा आपली हजेरी लावतो. हे सगळे ठरल्याप्रमाणे घडत असते आणि ते का घडते हे सुध्दा आता बहुतेक लोकांना माहीत झाले असल्यामुळे यात कौतुक करण्यासारखे कोणालाच फारसे काही दिसत नाही. त्या उत्सवातल्या मूर्ती, सजावट, गर्दी, उत्साह, भक्तीभाव, गजर, गोंगाट, रस्त्यातले अडथळे, वाहतूकीचे नियमन, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन, स्पर्धा, बक्षिससमारंभ, पुढारी आणि नटनट्यांचे गणपतीसोबत काढलेले फोटो, लोकमान्य टिळक आणि त्यांची उद्दिष्टे, पर्यावरण, त्याचा ऱ्हास आणि त्याचे दुष्परिणाम, विसर्जनातली सुसूत्रता तसेच त्यातले अपघात वगैरे वगैरे वगैरे सगळेच विषय आता इतके नेहमीचे झाले आहेत आणि त्यावर इतके चर्वितचर्वण होऊन गेले आहे की त्यासंबंधीच्या बातम्या आणि लेख पाहून त्या न वाचताच वर्तमानपत्राचे पान उलटले जाते. या विषयांवर मीसुध्दा पूर्वी बरेच वेळा लिहिले आहे. त्यात आणखी भर टाकली तर हे पानसुध्दा वाचले न जाण्याची शक्यता वाटते. यामुळे या वर्षी थोडा वेगळा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या तयारीवरील एक मजेदार अल्पकथा मागच्या भागात दिली होती. या वेळी एक वेगळा विषय हातात घेतला आहे.

आजकाल सगळ्याच क्षेत्रात नेहमी चढाओढ चाललेली असते आणि रोजच कोणी ना कोणी कसला ना कसला विक्रम मोडून नवा उच्चांक प्रस्थापित करत असतो. तसेच चाकोरीबाहेरचे काहीतरी वेगळे करून दाखवत असतो. गणेशोत्सव वर्षाकाठी एकदा येत असल्यामुळे त्यातसुध्दा दरवर्षी कोणी ना कोणी काही तरी वेगळे करत असतो. यंदाचे नाविन्यवीर कोण आहेत ते थोडक्यात पाहू.

लालबागचा राजा दरवर्षीच अतिशय प्रखर अशा प्रकाशझोतात असतो. तिथल्या उत्सवाच्या पूर्वतयारीपासून त्याच्या खोल सागरात केल्या जाणाऱ्या विसर्जनापर्यंत खडान् खडा बातमी रोजच्या रोज वाचायला आणि ऐकायला मिळत असते. त्याचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या आणि त्यांनी उदारपणे केलेले दान याची मोजदाद होत असते आणि तो आकडा वाढत असतो. तरीसुध्दा यंदा त्यात नाविन्याचा भागही दिसला. दर्शनोत्सुक भक्तांचे कष्ट कमी करण्याच्या दृष्टीने या वर्षी त्यांच्यासाठी वातानुकूलित मंडप उभारला होता. तसेच त्यांना खाद्यपेयेसुध्दा पुरवली जात होती. देवदर्शनासाठी केलेल्या कष्टाच्या प्रमाणात पुण्यप्राप्ती होते असा काही लोकांचा समज आहे. घरात गाडी असतांनासुध्दा अन्नपाणी वर्ज्य करून उपाशीपोटी दहा दहा किलोमीटर पायपीट करून देवदर्शनाला जाणारे महानुभाव मी पाहिले आहेत. त्यांना कदाचित अशा सोयी करणे आवडले नसेल, तसेच या सगळ्या खर्चातून समाजाचा किंवा देशाचा काय फायदा झाला? असा मूलगामी प्रश्न विचारून हा सगळा आटापिटा अनाठायी आहे असा सूर अश्रध्द लोकांनी लावला असेल. तसेच एवढ्या पैशात किती लोकांना पोटभर अन्न, अंगभर कपडे मिळाले असते, किती मुले शाळेला जाऊ शकली असती वगैरेंचे आकडेदेखील देतील.

गौडसारस्वतब्राह्मण म्हणजेच जीएसबी समाजाचा गणपती अत्यंत श्रीमंत समजला जातो. त्याचे सिंहासन, अंगावर चढवलेले दागदागीने आणि मुकुट वगैरे सगळ्याच गोष्टी सोन्याने बनवलेल्या आणि रत्नजडित असतात. हे ऐश्वर्य पहाण्यासाठी भाविक तसेच उत्सुक लोक दूरदूरहून येतात. कोट्यवधी रुपये किंमतीच्या या दौलतीचा कायमचाच विमा उतरवलेला असतोच. या वर्षी तिथे येणाऱ्या प्रेक्षकांचासुध्दा विमा उतरवला होता म्हणे. विघ्नहर्ता गणपती सर्वांचे रक्षण करेलच. तरीही जर काही अनुचित घटना घडली तर त्यात हताहत होणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या नुकसानीची भरपाई करून मिळणार होती. सुदैवाने प्रत्यक्षात तशी वेळ आली नाही.

परंपरेनुसार गणेशाची मूर्ती शाडू मातीची असायची. यांत्रिकीकरण झाल्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रामुख्याने वापर होऊ लागला. पर्यावरणवाद्यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा शाडूमातीकडे ओघ वळू लागला आहे. आजकाल काही लोक कसलीच मूर्ती ठेवत नाहीत, चित्राची पूजा करतात, तर काही लोक कायम स्वरूपाची मूर्ती ठेवतात, तिचे विसर्जन करत नाहीत. काही कल्पक लोक वेगळ्याच पदार्थांपासून गणेशाची मूर्ती तयार करतात. नारळांच्या ढिगातून गजाननाचा आकार तयार केलेला मी पूर्वी पाहिला आहे. यंदा काही निराळे प्रकार केले गेले. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” असे लहान मुलांचे स्वप्न असते. ६०० चॉकलेटे आणि २०००० बिस्किटे यांचा वापर करून एक गणपतीची मूर्ती या वर्षी तयार केली गेली होती, तर दुसऱ्या एका जागी गणपतीच्या सर्वांगावर टूटीफ्रूटीचे तुकडे चिकटवले होते. अर्थातच यातला एकादा तुकडा जरी कोणी तोंडात टाकला तो गणपतीभक्षक ठरेल. यामुळे कोणीही असे करणार नाही. या मूर्तींचे विसर्जन कुठे केले आणि त्या जलाशयातील जलचर प्राण्यांना मेजवानी मिळाली की प्रदूषणाने जिवाला मुकावे लागले ते कांही समजले नाही.

ओरिसाच्या समुद्रकिना-यावर वाळूची शिल्पे बांधणाऱ्या कलाकरांना जगभर प्रसिध्दी मिळाली आहे. एका जागी असा वालुकामय गणपती तयार केला गेला. एका कलाकाराने १२ लक्ष साबूदाणे घेतले, त्यांना वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवून त्यांचा उपयोग केला आणि त्यातून अप्रतिम सुंदर रांगोळी सजवली. गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या प्रयत्नाची नोंद झाली आहे.


2010
यंदाच्या गणेशोत्सवातील आणखी काही आगळ्या गोष्टी

लालबागच्या राजाच्या उत्सवासाठी या वर्षी दक्षिण भारतातल्या प्राचीन मंदिराची सजावट केली होती, पण यात फारसे नाविन्य वाटणार नाही कारण दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रसिध्द देवालयाच्या प्रतिकृती केलेल्या पहायला मिळतात. या वर्षीचे खास वैशिष्ट्य म्हणायचे झाले तर या गणपतीमंडळाचा गेल्या ७५ वर्षांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रसिध्द केला गेला. गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या अनेक लोकांनी भक्तीभावाने हे पुस्तक विकत घेतले असणारच. गेली काही वर्षे वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर या राजाचे जे दर्शन घडते त्यातल्या मूर्तीचा आकार सारखाच वाटतो. लालबागचा राजा फोटोवरून ओळखता यावा इतका ओळखीचा झाला आहे. पुण्यातला दगडूशेट हलवाई गणपतीसुध्दा जेंव्हापासून प्रसारमाध्यमात प्रामुख्याने दिसायला लागला आहे, त्याच्या रूपात काही फरक पडलेला नाही. पण लालबागचा राजा मात्र पहिल्यापासून असा एकाच रूपात येत नव्हता. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार तो वेगवेगळी रूपे घेऊन साकारला आहे. १९४६ सालच्या उत्सवात सिंहाच्या पाठीवर पाय ठेऊन उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्रांच्या रूपात तो दिसतो, तर १९४८ साली महात्मा गांधीजींच्या रूपात. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात तो दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर पंडितजींच्या रूपात बैलगाडी चालवत होता.

गणेशोत्सवाच्या निमित्याने येणाऱ्या दर्शकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या जाहिराती लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक मेंदूतून निघाली कोण जाणे, पण सिनेमाची पोस्टर्स लावण्याची सुरुवात लालबागच्या राजापासूनच झाली. त्याचसोबत सिनेकलावंतांनी प्रत्यक्ष लालबागला येऊन या राजाचे दर्शन घेण्याला सुरू केल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली. तो गणपती नवसाला पावतो अशी श्रध्दा उत्पन्न झाली आणि मग दर्शनोत्सुकांची गर्दी वाढता वाढता वाढत उच्चांक करू लागली, तसे तिचे नियोजन करण्याचे कामही वाढत गेले. लालबागला सुरू झालेले जाहिरातबाजीचे लोण पुढे कानाकोपऱ्यापर्यंत पोचले आणि त्यात कशाची जाहिरात करावी याचा नेम राहिला नाही. एक दोन वर्षांखाली जिकडे तिकडे माणिकचंद दिसत असे. या वर्षी मात्र तंबाखू, मद्य आदि व्यसनांना उत्तेजन देणाऱ्या द्रव्यांची जाहिरात करायची नाही असा निर्बंध पाळला गेला असे दिसले.

आंतर्जालावर नवे आभासी (व्हर्च्युअल) जग निर्माण झाले आहेच, त्याची वाढही पटीने होत चालली आहे. गणरायाचा यात प्रवेश होऊन त्याने आपले स्थान निर्माण करणे ओघाने आले. अनेक उत्सव मंडळांनी या वर्षी आपापल्या वेबसाइट्स उघडल्या आणि वर्गणी गोळा करण्यापासून बाप्पांचे दर्शन, पूजा आरती वगैरे दाखवण्यापर्यंत सेवा प्रदान केली. या वर्षीचा उत्सव आता संपून गेला आहे, पण पुढच्या वर्षी आधीपासून तयारी केलीत तर संगणकीय मूषकाच्या पाठीवर दोन बोटांनी टिचक्या मारत जगभरातल्या गणेशाच्या उत्सवांची चित्रे पहात विहरण करता येईल तसेच गांवोगांवच्या किंबहुना देशोदेशींच्या गणपतींची विविध रूपे पहाता येतील. ज्यांना संगणकाची एवढी आवड नाही अशा लोकांनासुध्दा लालबागचा राजा आणि प्रभादेवीचा सिध्दीविनायक यांच्या आरत्या घरबसल्या पाहण्याची सोय वाहिन्यांनी केली होती आणि काही भक्तगण या वेळी घरात बसूनच टाळ्या वाजवत त्या आरत्यांमध्ये सहभागी होत होते.

लोकसत्ता या दैनिकाने गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये एक लेखमालिका सादर केली होती. जपान, चीन, श्रीलंका, जावा, बाली, कंपूचिया, व्हिएटनाम आदि परदेशांमध्ये निरनिराळ्या नावाने आणि रूपांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गजाननाची माहिती दिली होती. सुप्रसिध्द अष्टविनायकांची माहिती देणाऱ्या लेखमालिका दरवर्षीच येतात. या वर्षी एका जाहिरातीमध्ये ती दिली होती, तर दुसऱ्या एका जाहिरातदाराने आरत्या आणि मंत्रपुष्प यांच छापील पुस्तिका वर्तमानपत्रांसोबत दिली होती. या निमित्याने महाराष्ट्रातल्या खेडोपाडी असलेल्या अप्रसिध्द पण जागृत समजल्या जाणाऱ्या काही अनोळखी देवस्थानांची माहिती या काळात प्रसिध्द झाल्यामुळे वाचायला मिळाली.

हिंदुस्थान टाइम्स हे दिल्लीचे वर्तमानपत्र मुंबईमध्ये जम बसवू पहात आहे. त्याने या वर्षी एक आगळा प्रयत्न केला. मोबाइल फोनवर एसएमएस देणाऱ्या वाचकांमधून लकी डॉ काढून भाग्यवान विजेत्यांना हॅलिकॉप्टरमधून गणपती विसर्जनाची दृष्ये दाखवण्यात येतील अशा अर्थाच्या मोठमोठ्या जाहिराती रोज छापून येत होत्या. ही संधी फक्त ७ ते १२ वर्षे वयोगटामधील मुलामुलींना उपलब्ध होती. प्रत्यक्षात असे दर्शन घडवण्यात आल्याची बातमीही आली.


2011 / 2012
या ब्लॉगवरील गणेशोत्सव

मी शाळेत असतांनासुध्दा गणेशोत्सवात घरी, शाळेत आणि गावात त्याची धामधूम चालत असे. ते दिवस अगदी वेगळे वाटायचे. पुण्यामुंबईकडे आल्यानंतर इकडल्या उत्सवाबद्दल तर विचारायलाच नको. त्याचे स्वरूप बदलत चालले असले तरी त्यामागे दिसणारा उत्साह तसाच आहे किंबहुना तो वाढतो आहे. गणेशोत्सवातले दिवस त्यामुळे काहीसे वेगळे आणि संस्मरणीय असेच असतात.

आनंदघन या ब्लॉगचा श्रीगणेशा २००६ सालाच्या सुरुवातीला केला. त्याचे नांव ‘श्रीगणेशा’ असे दिले असले तरी त्यात गणेश या देवाचा उल्लेखही केला नव्हता. तेंव्हाच्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये असतांना आलेल्या एका वेगळ्या अनुभवाची हकीकत त्यात दिली होती. पुढे त्या वर्षी मी एका मोठ्या आजारामुळे अंथरुणाला खिळलो होतो आणि इतर कामे तर करू शकत नव्हतोच, हा ब्लॉगही कदाचित बंदच पडेल असे वाटत होते. त्या निराशाग्रस्त मनस्थितीत असतांना त्या वर्षीचा गणेशोत्सव आला. त्या वर्षी गणेशोत्सवाच्या सुमारास मी त्या मोठ्या आजारातून देवाच्या कृपेने बरा होण्याच्या मार्गावर होतो. अजून हिंडायफिरायला लागलो नव्हतो त्यामुळे घराच्या बाहेरील उत्साहाच्या वातावरणात सामील होणे मला शक्य नव्हते. घरात बसल्याबसल्याच किंवा अंथरुणावर पडल्या पडल्या गणरायाची विविध रूपे मनात आठवून आणि टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरेवर पाहून त्यावर ‘कोटी कोटी रूपे तुझी’ ही लेखमालिका लिहून आपल्या परीने ती विविध रूपे वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. गणपतीच्या कृपेनेच मी त्याच्या कोटी कोटी रूपांपैकी काही निवडक रूपे सचित्र लेखांमध्ये दाखवू शकलो. अशा प्रकारे ‘कोटी कोटी रूपे तुझी’ ही मालिका मी ओळीने ११ दिवस ११ भागात लिहू शकलो. त्या काळात माझ्या अंगात काही काम करायचे फारसे त्राण नव्हते आणि मनोबलसुध्दा बरेच ढासळलेले होते. पण तरीही नेटाने अकरा दिवस रोज काही लिहू शकलो आणि त्या काळात माझ्या काँप्यूटर आणि इंटरनेटनेही साथ दिली, घरातली वीज गेली नाही की बाहेरची इंटरनेटची केबल तुटली नाही. ही विघ्नहर्त्याची कृपा असावी असे वाटायला लागले. त्यानंतर माझ्या शारीरिक परिस्थितीतही सुधारणा होत गेली आणि मनातला आत्मविश्वास पूर्ववत होत गेला. या ब्लॉगवरील लेखनात इतके सातत्य त्यापूर्वी कधी आले नव्हते आणि नंतरही ते क्वचितच घडले असेल.

२००७ मध्ये गणपतीचा सण साजरा करण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. त्या वर्षी हा ब्लॉग कोमात गेला होता, पण याहू ३६० वर आनंदघन याच नावाचा दुसरा ब्लॉग चालत होता. (पुढे तो बंद पडला) माझा मराठीभाषी संगणकसखा त्या वेळेस पुण्याला माझ्यासोबत नव्हता. मुलाक़चा एक इंग्रजीभाषी लॅपटॉप माझ्या हाताशी आला, पण त्याला मराठी भाषा कशी शिकवायची याचे ज्ञान माझ्याकडे नव्हते. मला या घोळाची पूर्वकल्पना असल्यामुळे मी थोडी पूर्वतयारी करून पुण्याला गेलो होतो. त्या वेळेस गजाननाची कांही विशेष रूपे आणि त्याची कांही लोकप्रिय गाणी चित्ररूपाने दाखवण्याचा प्रयत्न मी याहूवर केला. तीच गाणी मी नंतर २००८ साली ‘गणपतीबाप्पा मोरया’ या मथळ्याखाली या ब्लॉगवर दिली. शिवाय ‘उंदीरमामाकी जय’ हा नवा लेख लिहिला.

त्यानंतरच्या काळातसुध्दा या ब्लॉगवर मी गणेशोत्सव साजरा करत राहिलो. ‘गणेशोत्सव आणि पर्यावरण’ या विषयावर लेखमाला लिहून त्यात दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले. गणेशोत्सवात होणारी सजावट आणि गणेशमूर्तींचे विसर्जन यांचा पर्यावरणावर किती परिणाम होतो, तो कसा आणि किती कमी करता येईल याबरोबरच यात किती सत्य आणि तथ्य आहे, किती विपर्यास किंवा अतीशयोक्ती आहे, हे परिणाम टाळण्यासाठी जे पर्यायी मार्ग सुचवले जातात त्यांचे कोणते चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात, ज्या वस्तूंच्या गणेशोत्सवामध्ये होत असलेल्या वापरावर आक्षेप घेतले जातात त्याच वस्तूंचा इतर कोणत्या प्रकारे किती प्रमाणात वापर होत असतो, मुळात समाजाला उत्सवांचीच किती गरज असते किंवा उपयोग होतो वगैरे सर्व बाजूने विचार करणारे लेख या मालिकेत दिले होते.

गणेशोत्सवाचे ऐतिहासिक महत्व सांगून झाल्यावर त्याच्याशी तुलना करून आज त्याला आलेले रूप हा एक टीका करणाऱ्यांचा आवडता विषय आहे. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवाची आठवणही या वेळी केली जाते. मलाही याबद्दल लिहिण्याचा मोह झाला. इतका जुना भूतकाळ मी काही प्रत्यक्ष पाहिलेला नाही. त्याबद्दल फक्त वाचले आहे. गेल्या दोन तीन दशकात म्हणजे तुलनेने आजच्या काळात होत असलेल्या उत्सवाबद्दल लिहितांना त्यातल्या काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधण्याचा आणि नकारात्मक किंवा वादग्रस्त गोष्टींच्या मागची कारणपरंपरा शोधण्याचा अल्पसा प्रयत्नही केला. गणेशोत्सवातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या खटकल्या आणि कोणत्या गोष्टींची उणीव भासली याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

२०११ साली गणेशोत्सवाला चारच दिवस राहिले असतांना मला पुन्हा एकदा हॉस्पिटलाची वारी करावी लागली होती. गणेशचतुर्थीच्या आदले दिवसापर्यंत तबेत थोडी नरम गरमच होती. गणेशाची स्थापना झाली, अनेक आप्तस्वकीयांच्या भेटी झाल्या, घरातले वातावरण चैतन्याने भारले गेले आणि त्यातून मलाही ऊर्जा मिळाली असावी. पुन्हा एकदा या दिवसात फक्त गणेशाबद्दल लिहायचे ठरवले. अगदी रोजच्या रोज लिहायले जमले नाही पण आठ लेख लिहिले गेले. त्यांना यथायोग्य अशी नवी चित्रे मात्र देता आली नाहीत. त्यात मी गणपतीची स्तोत्रे, कहाण्या, गाणी वगैरेंकडे लक्ष पुरवले. या निमित्याने काही जुनी, काही नवी गीते, काही स्तोत्रे, काही स्तोत्रांचे अर्थ वगैरे देण्याचा प्रयत्न केला होता. गणपती आणि चंद्रदेव, स्यमंतकमणी यांच्या कहाण्या सांगितल्या .

२०१२ साली आलेल्या गणेशोत्सवात मी ‘गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला’ हा विषय घेऊन त्यात गणित आणि लेखनकलांचा गणपतीशी असलेला संबंध दाखवला तसेच लोकमान्य टिळकांच्या काळापासून आजकालच्या परिस्थितीपर्यंत या उत्सवात कसा बदल होत गेला याचाही वर्तमानपत्रांमधून आलेल्या लेखांच्या आधारे आढावा घेतला.

******************

2014

गणेशोत्सवानिमित्य

तुझ्या कांतिसम रक्‍तपताका पूर्वदिशी फडकती।
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती ।।

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा ।
शुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा ।
छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ।।

आवडती तुज म्हणुनि आणिली रक्‍तवर्ण कमळे ।
पांचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे ।
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती ।।

शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा ।
तिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा ।
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्हा, श्रीपती ।।

                स्व. ग. दि. माडगूळकर

दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.

दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.

मी शाळेत शिकत असतांना दरवर्षी गणेशचतुर्थी हा एकमेव सण आमच्या हायस्कूलमध्ये धूमधडाक्यात साजरा होत असे. इतर सणवारांसाठी फक्त सुटी असे. त्या दिवशी ते सण घरीच साजरे केले जात असत. गणेशचतुर्थीच्या दिवशी मात्र आपापल्या घरातले गणपती बसवून झाले की सगळी मुले शाळेकडे धाव ठोकत असत. घरून निघायला उशीर झाला तर गावात जिथे कुठे आमच्या शाळेची मिरवणूक चालत असेल तिथे येऊन त्यात सामील होत असत. ढोल ताशा, झांजा वगैरेंच्या आवाजावर “गणपती बाप्पा मोरया”चा घोष करत आमची वानरसेना गणपतीच्या मूर्तीसह गावात फिरून शाळेत येत असे. तिथल्या सेंट्रल असेंब्ली हॉलमध्ये त्या मूर्तीची स्थापना केली जात असे. त्या काळात ज्या वस्तू आजूबाजूच्या निसर्गात किंवा स्थानिक बाजारात उपलब्ध असायच्या त्यामधून सजावट केलेली असायची. शाळेचा हॉल तर मुलांनी गच्च भरलेला असायचा त्याच्या पुढच्या बाजूचा कॉरीडॉर मुलांनी आणि मागच्या बाजूचा मुलींनी भरलेला असायचा. पूजा, आरती वगैरे करून चिमूटभर प्रसाद खाऊन घरी गेल्यावर संध्याकाळी पुन्हा सगळे शाळेत येत. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा वाजत गाजत आणि फटाके उडवत गणपतीची मिरवणूक निघे पण ती फक्त शाळेच्या आवारातच असलेल्या विहिरीपर्यंतच जात असे. तिथे पोचल्यावर पट्टीचे पोहणारी चार पाच मुले गणपतीच्या मूर्तीला हातात धरून पाय-यांवरून खाली उतरत आणि पाण्यात बुडी घेऊन विहिरीच्या पार तळापर्यंत पोचत आणि तिला अलगदपणे तळाशी ठेऊन वर येत असत. बाकीची काही मुले पाय-यावर तर काही काठावर उभी राहून ते दृष्य पहात असत. शिक्षकवर्ग फक्त मार्गदर्शन करण्यापुरते काम करत असत, मुख्य हौस मुलांचीच असे. शाळेतल्या गणपतीचे विसर्जन करून झाल्यावर सगळेजण आपापल्या घरातल्या गणपतीच्या संध्याकाळच्या आरतीच्या तयारीला लागत.

असा अर्ध्याच दिवसाचा गणपती मी फक्त आमच्या शाळेतच पाहिला. आमच्या गावात काही लोकांकडे दीड दिवसांचा, कुणाकडे तीन, पाच किंवा सात दिवसांचा असायचा. काही लोकांकडे बाप्पाचा मुक्काम अनंतचतुर्दशीपर्यंत असायचा तर काही लोकांचे गणपती गौरीसोबत जायचे. ते सहा किंवा सात दिवस रहात असत. गणेशोत्सवाच्या बाबतीतले हे वैविध्य मुंबईतसुद्धा दिसते. दीड दिवसांचा गणपती उत्सव साजरा करणा-या एकाला त्याच्या मित्राने विचारले, “तुम्ही लोक इतके कसे रे चिक्कू? गणपती आला ना आला तेवढ्यात त्याला निरोप देऊन मोकळे होता. आम्ही बघा कसे बाप्पाला चांगले दहा दिवस आमच्याकडे ठेवून घेतो.”
त्यावर पहिला मित्र म्हणाला, “बरं तू साग, गणपती हा काय देणारा देव आहे?”
“बुद्धी देणारा.”
“मग त्यासाठी आम्हाला दीड दिवस पुरेसे आहेत, तुम्हाला लागत असतील बाबा दहा बारा दिवस.”

ज्या गणपतींचे विसर्जन दुस-या दिवशी केले जाते त्यांना दीड दिवसाचा असे कदाचित खिजवण्यासाठी म्हणत असतील, पण तिस-या दिवशी विसर्जन होत असलेल्या गणपतींना मात्र अडीच दिवसाचे न म्हणता तीन दिवसाचे असे का म्हणायचे हे गणित मला कधी समजले नाही. दीड, अडीच असे करत हाच क्रम पुढे वाढवत नेला तर मग साडे चार, साडेसहा, साडे नऊ असे आडमोडी आकडे येतील म्हणून कदाचित अडीच दिवसांना राउंड ऑफ करून तीन दिवस म्हंटले जात असेल. आमच्या घरातला गणपती मात्र मोजून पाच दिवसांचाच असायचा. ही प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केली की आजोबांनी की पणजोबांनी ते माहीत नाही. आमच्या लहानपणी असले प्रश्न मनात उठले तरी ते विचारायची कोणाची प्राज्ञा नसायची. मी मात्र माझ्या मुलांना सांगण्यासाठी एक एक्स्प्लेनेशन तयार केले.

गणपतीची आरास आणि इतर तयारी करण्यात बराच वेळ खर्च केला जातो, सजावट करण्यात हौसेने कलाकुसरत केली जाते, नवनवीन कल्पनांना आकार दिला जातो. आपले कलाकौशल्याचे काम चार लोकांनी येऊन पहावे असे वाटते. गावातली मित्र मंडळी, नातेवाईक वगैरे लोक या निमित्याने भेटायला येतात. त्यांना सवडीने येऊन जायला थोडी फुरसत द्यायला पाहिजे. घरातल्या सर्वांनी मिळून एकत्र जमून गजाननाची पूजा, आरती वगैरे करण्यात थोडी मजा येऊ लागलेली असते. ती गोडी दीड दोन दिवसात संपवून टाकावी असे वाटत नाही. असे असले तरी या उत्सवाच्या दिवसात रोजच्या भरगच्च कामांमध्ये या कार्यक्रमांची भर पडलेली असते. शाळा, ऑफीस वगैरेंची व्यवधाने सांभाळून ते सगळे कार्यक्रम अगदी साग्रसंगीत रीतीने रोज नियमितपणे करणे जास्त दिवस अशक्य नसले तरी कठीण असते. शिवाय घरात गणपती बसलेला असतांना शक्य तोवर कोणी ना कोणी नेहमी घरात हजर राहण्याची गरज असते. त्या काळात मला अनेक वेळा फिरतीवर परगावी जावे लागत असे, ते जास्त दिवस पुढे ढकलता येत नसे. या सगळ्याचा विचार करता घरातल्या गणेशोत्सवासाठी पाच दिवस हा चांगला आणि ऑप्टिमम पीरियड वाटतो. बाप्पासाठी काही करत असल्याचे समाधानही मिळते आणि त्याचा ताणही पडत नाही. हे लॉजिक मुलांना बहुधा पटले असावे.

ःःःःःःःःःःःःःःःःः

२०१५ साली आम्ही दोघेही एका अपघातात जबर जखमी झालो होतो. परमेश्वराच्या कृपेने त्यातून वाचलो, पण दीर्घकाळ आजारी होतो आणि हॉस्पिटलच्या वाऱ्या करत होतो. त्यामुळे त्या वर्षीचा गणेशोत्सव मनासारखा साजरा करणे शक्य झाले नाही. याची खंतच मी दोन लेखांमधून व्यक्त केली होती. मी त्यातून हळूहळू सावरलो, पण अलकाचे दुसरे गंभीर दुखणे बळावले आणि तिची तब्येत खालावत जाऊन २०१६ च्या श्रावणमहिन्याच्या अखेरीस ती देवाघरी गेली. त्यामुळे त्या वर्षी आम्ही घरी गणेशोत्सव साजरा केरू शकलो नाहीच, ब्लॉगवरही काही लिहिण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो. २०१७, २०१८ आणि २०१९ साली लिहिलेले लेख या ब्लॉगवर वेगळे चढवणार आहे.

************

गेल्या दहा वर्षातील लेखांची यादी खाली दिली आहे.

२००६ : कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प १ ते ११

२००७ साली हा ब्लॉग बंद होता.

२००८ : गणपतिबाप्पा मोरया भाग १ ते ३
उंदीरमामाकी जय
गणेशोत्सव आणि पर्यावरण १ ते ५

२००९ : आधी वंदू तुज मोरया
मूषक आणि माउस
लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव -१, २
यंदाचा आमचा गणेशोत्सव
पुढच्या वर्षी लवकर या … की एकदा येऊच नका?

२०१० : गणेशोत्सवातली उणीव
यंदाच्या गणेशोत्सवातील आगळेपण
यंदाच्या गणेशोत्सवातील आणखी काही आगळ्या गोष्टी

२०११ : गणपती, तुझी नावे किती ?
ॐकार गणेश
अथर्वशीर्षामधील गणपतीचे वर्णन
पुराणातला गणपती
पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी -१ ते ४

२०१२ : गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला – भाग १ – गणपती आणि गणित
भाग २ – गणेश आणि लेखनकला
भाग ३ – सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात
भाग ४ – सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार
भाग ५ – टिळकांच्या काळातली आणि आताची परिस्थिती
भाग ६ – टिळकांच्या काळातली आणि आताची परिस्थिती (उत्तरार्ध)

२०१३ : गणेशोत्सवातली उणीव
अनंतचतुर्दशी
वक्रतुंड महाकाय
गणपतीची आरती – २ – शेंदुर लाल चढायो
गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता

२०१४ : गणेशोत्सवानिमित्य

२०१५ : गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपतीबाप्पांची इच्छा

हे सर्व लेख खालील दुव्यावर एकत्र उपलब्ध आहेत.
https://anandghare2.wordpress.com/category/%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80/

गणेशोत्सवात होत गेलेले बदल

WhatsApp Image 2018-09-16 at 23.39.05

रोजच्या रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र होते, वर्षभरात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येऊन जातात, त्यानुसार वातावरणात बदल होतात, झाडांना नवी पालवी फुटते, जुनी पाने गळून पडतात, फुले उमलतात आणि कोमेजतात, प्राणीमात्रांच्या जीवनात बालपण, युवा आणि वार्धक्य या अवस्था येतात. अशा प्रकारे सतत बदलत राहणे हाच सृष्टीचा स्थायी भाव आहे असे म्हंटले जाते. समाजाची राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीसुध्दा हळूहळू बदलत असते आणि त्याचा परिणाम समाजातल्या चालीरीती, घडामोडी वगैरेंवर होत असतो.

१८९३ साल आणि आजच्या सामाजिक परिस्थितीत जमीन अस्मानाइतका फरक पडला आहे. त्या काळातल्या समाजात धर्म, जात, वंश, भाषा वगैरेनुसार असंख्य गट पडलेले होते. प्रत्येक गटातले लोक निरनिराळी आळी, गल्ली, वाडी, मोहल्ला वगैरेंमध्ये गटागटाने आपापल्या संकुचित विश्वात रहात असत. त्यांच्यामध्ये आपापसात विशेष सामंजस्य नव्हते. एकमेकांविषयीचे अज्ञान, गैरसमज, दुरावा यापासून ते वैर आणि तिरस्कारापर्यंत नकारार्थी भावना मनात दडलेल्या असायच्या. साक्षरतेचे प्रमाण फारच कमी होते. त्यातलेही बहुतेक साक्षर लोक आपल्या अक्षरओळखीचा उपयोग पोथ्या, पुराणे, गाथा वगैरेसारख्या धार्मिक वाङ्मयाच्या वाचनासाठीच करत असत. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षणपध्दतीत ज्यांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले होते अशा मूठभर लोकांनाच भारताचा (त्या काळामधील हिंदुस्थानचा) विशाल भौगोलिक विस्तार व उज्ज्वल इतिहास याबद्दल काहीशी माहिती असायची. इतर सर्वसामान्य लोकांचे सामान्यज्ञान त्यांच्या पंचक्रोशीपुरतेच मर्यादित असायचे. त्यापलीकडे पसरलेल्या आपल्याच देशातल्या भूभागाबद्दल किंवा तिथे रहात असलेल्या लोकांबद्दल त्यांनी कधी फारसे ऐकलेलेही नसायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना आत्मीयता कशी वाटणार? आपण एका मोठ्या देशाचे रहिवासी आहोत याचीच ज्यांना नीटशी कल्पना नव्हती त्यांना त्या देशाबद्दल प्रेम आणि अभिमान तरी कसा आणि किती असणार? भारतातल्या राजेरजवाड्यांच्यात चालत असलेल्या लढायांचा फायदा घेऊन इंग्रजांनी हा देश काबीज केला होता आणि भारतामधील जनतेमध्ये एकजूट न होणेच त्यांच्या हिताचे होते. त्यामुळे येथील जनतेतल्या आपापसातील तेढीला ते खतपाणी घालत राहिले होते.

इंग्रजी शाळांमधून शिक्षण घेतलेले जे सुशिक्षित लोक होते, त्यामधील बरेच लोक सरकारी नोकरी करीत होते आणि इंग्रज सरकारशी इमानदार होते. इतर अनेक विद्वानांना मात्र त्या काळातली सामाजिक परिस्थिती सहन होत नव्हती. त्यांच्यापैकी महात्मा ज्योतीबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या थोर लोकांनी समाजसुधारणेचा खडतर मार्ग स्वीकारला. समाजाच्या स्त्रीशूद्रादि मोठ्या भागाला त्या काळात शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, त्यांना शिक्षण मिळवून देण्याचे त्या काळातले अत्यंत कठीण काम त्यांनी हाती घेतले. त्यांना पहिली अनेक वर्षे समाजाचा नुसता विरोधच झाला नाही तर त्यांचा छळ करण्यात आला. अशा काळात इंग्रज सरकारचाही रोष ओढवून घेणे त्यांच्या कार्याला हानीकारक होते. टिळकांचे परममित्र असलेले आगरकर यांच्यासारखे काही देशभक्त लोक सभांमधील भाषणे, वृत्तपत्रांमधील लेखन वगैरे मार्गाने समाजाचे प्रबोधन करत होते तसेच सरकारकडे अर्जविनंत्या करून कायदेशीर मार्गाने समाजाचे जास्तीत जास्त हित करून घेण्याचा प्रयत्न करत होते.

लोकमान्य टिळकांचे विचार या सर्वांहून वेगळे होते. त्यांना इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्त करायचे होते. पण तीन चार दशकांपूर्वी १८५७चे स्वातंत्र्ययुध्द होऊन गेले होते. त्यावेळी उत्तर भारतामधील काही भागातील सैनिकांनी एकत्र येऊन त्यात उडी घेतली, पण बाकीच्या फार मोठ्या प्रदेशातील जनता त्यापासून अलिप्त राहिली होती. त्यामुळे इतर प्रदेशातील भारतीय सैनिकांच्याच सहाय्याने इंग्रजांनी ते युध्द जिंकले होते. त्यानंतर इंग्रज सरकार सावध झाले असल्यामुळे त्यांच्या विरोधात सशस्त्र लढा देणे अशक्य झाले होते. हा इतिहास ताजा होता. एकट्यादुकट्याच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य मिळू शकणार नाही याची जाणीव लोकमान्य टिळकांना होती आणि सर्व समाजाला एकत्र आणून त्यांच्या संघटनेच्या बळावर इंग्रज सरकारला आव्हान दिले पाहिजे हे त्यांनी जाणले होते. सन १८९३ पर्यंत त्यांनी आपली सुप्रसिध्द स्वराज्याची मागणी उघडपणे केलेली नव्हती आणि आधी सर्व भारतीयांना संगठित करायचे, त्यांच्या मनात देशभक्तीची आंच निर्माण करायची आणि त्यांच्या बळावर स्वातंत्र्याची चळवळ पुढे न्यायची अशी टप्प्याटप्प्यांची योजना आखून त्यानुसार ते एक एक पाऊल यशस्वीपणे टाकत होते. त्यांनी १८९३ साली सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हे त्यातलेच एक महत्वाचे पाऊल होते.

WhatsApp Image 2018-09-16 at 23.38.52

तत्कालीन परिस्थितीत निरनिराळ्या प्रांतांमधील आणि जातीतील लोकांना एका व्यासपीठावर आणणे आवश्यक होते. धार्मिक स्वरूपाचा समारंभ हा त्यांना एकत्र आणण्याचा एकमात्र नामी उपाय होता. एतद्देशीयांच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही अशा सूचना सरकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या असल्यामुळे त्याला सरकारकडून मनाई होण्याचा धोका नव्हता. एका ठिकाणी जमलेल्या लोकांना मनोरंजनामधून आपला देश, धर्म, संस्कृती वगैरेंची माहिती मिळावी, त्याबद्दल त्यांना अभिमान वाटावा, प्रेम वाटावे अशा दृष्टीने मेळ्यांचे कार्यक्रम ठेवले. त्यांना आकर्षक वाटावेत तसेच उत्साही लोकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सुरेख आरास आणि सजावटी केल्या, गणपतीच्या मूर्तीचे आगमन आणि विसर्जन यांसाठी वाजत गाजत मिरवणूक काढल्यामुळे या उत्सवाची माहिती गावातल्या सर्वांना कळावी आणि कुतूहलाने त्यांनी त्यात हजेरी लावावी. अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून घेता यावे आणि आपला संदेश खुबीने त्यांच्यापर्यंत पोचवता यावा असा सर्व दृष्टीने विचार करून टिळकांनी या स्वरूपातला उत्सव सुरू केला होता. सिनेमा, रेडिओ, टेलीव्हिजन अशा प्रकारची कोणतीच प्रसारमाध्यमे त्या काळात उपलब्ध नव्हती आणि वर्तमानपत्रे वाचणारा सुशिक्षित वर्ग अत्यल्प होता. अशा त्या काळातील परिस्थितीत मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणून काही सांगण्याची गरज होती, त्यांच्या संघटित प्रयत्नातूनच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला चालना देता येणार होती. पुण्यापासून सुरुवात करून हा उत्सव देशभर गावोगावी पोचवता येईल अशा दृष्टीने त्याची रचना केली होती आणि तसे झालेही.

त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लढे झाले आणि १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. आता पारतंत्र्याचा मुद्दा राहिला नाही. जातीभेद पूर्णपणे नाहीसा झाला नसला तरी त्याचे स्वरूप बदलले आहे. रोजच्या सामान्य जीवनातील इतर अनेक प्रसंगी सुध्दा जातपात विसरून अनेक लोक घडोघडी एकत्र येतच असतात. त्यासाठी गणेशोत्सवासारख्या वेगळ्या निमित्याची गरज नाही. टीव्ही आणि सिनेमासारखी दृकश्राव्य प्रसारमाध्यमे उदंड झाली असल्यामुळे मनोरंजनाची तसेच प्रचाराची भरपूर सोय, किंबहुना त्यांचा अतिरेक झाला आहे, संगणक आणि आंतर्जाल क्रांतीनंतर माहितीचा महापूर आला आहे आणि मोबाईल फोनमुळे संपर्क अत्यंत सुलभ झाला आहे. त्यामुळे जनसंपर्क, ज्ञान आणि मनोरंजन यासाठी गणेशोत्सवामधील मेळ्यांची गरज नाही. तरीसुध्दा गणेशोत्सव साजरे होतच आहेत, शिवाय त्याच्या आकारात अनंतपटीने वाढच होत चालली आहे. याचे कारण म्हणजे हा उत्सव ही या काळातली गरज राहिलेली नसली तरी त्यातून अनेक प्रकारचे लाभ मिळतात. हे लाभ कशा प्रकारचे आणि कोणाला मिळतात या प्रश्नाला एकच उत्तर नाही. आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकांमागे निरनिराळे उद्देश असतात, त्यानुसार त्यांचे फायदे संयोजकांना मिळतात.

WhatsApp Image 2018-09-17 at 07.16.03

लोकमान्य टिळकांच्या काळापासून चालत असलेली आणि त्यावरून प्रेरणा घेऊन सुरू झालेली काही गणेशोत्सव मंडळे अद्याप कार्यरत आहेत. समाजसेवेच्या उद्देशाने काम करणाऱ्या सेवाभावी संस्था आहेत. टिळकांच्या काळातली बहुतेक उद्दिष्टे आज शिल्लक राहिलेली नसली तरी वेळोवेळी समाजापुढे असलेल्या मुद्द्यांवर आणि समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम ही मंडळी करीत आली आहेत. चित्ताकर्षक देखावे, पोस्टर्स, पॅम्फ्लेटे, व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, चर्चासत्रे अशा निरनिराळ्या मार्गाने ही मंडळी गणेशोत्सवात समाजाचे प्रबोधन करतात. महात्मा गांधींच्या काळात दारूबंदी, अस्पृश्यतानिर्मूलन, खादी व ग्रामोद्योग यासारखे विषय होते, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंचवार्षिक योजना, औद्योगिक क्रांती, समाजवादी विचारसरणी, शिक्षणाचा प्रसार यासारखे विषय आले तर चीन आणि पाकिस्तानबरोबर होऊन गेलेल्या युध्दांच्या काळात देशाचे संरक्षण हा ज्वलंत मुद्दा होता. गेल्या दोन तीन दशकांच्या काळात अवकाशात भरारी, संगणकक्रांती, माहितीतंत्रज्ञान, धूम्रपानबंदी, पोलिओचे निर्मूलन, एड्स, स्वाईन फ्ल्यू, अपहरण, दहशतवाद आदि अनेक विषयांकडे लक्ष वेधले गेले होते. पर्यावरणाचे संरक्षण हा तर हल्लीच्या काळातील गणेशोत्सवांमध्ये कळीचा मुद्दा बनून गेला आहे. पॅकिंगसाठी थर्मोकोल आणि बांधकामासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे जेवढे उत्पादन वर्षभर सतत होत असते त्याच्या तुलनेत पाहता या पदार्थांचा गणेशोत्सवामध्ये होणारा उपयोग अगदी नगण्य असतो अशी वस्तुस्थिती असली तरी जणू काही गणेशोत्सवामुळेच पर्यावरणाचा सत्यानाश होणार आहे अशा थाटाचा प्रचार होत असतो. पण या निमित्याने का होईना, पर्यावरणाच्या जपणुकीकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. मी हा लेख सहा वर्षांपूर्वी लिहिला होता त्या वर्षीपासून आम्ही सुध्दा शंभर टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करीत आलो आहोत. आवर्जून शाडू मातीच्याच मूर्ती आणल्या, कागद, कापूस आणि कापड यांच्यातून देखावा निर्माण करून आरासी केल्या. उत्सव संपल्यानंतर ते पदार्थसुध्दा शक्यतो व्यवस्थित गुंडाळून ठेवले आणि त्या वर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन तात्पुरत्या उभारलेल्या पाण्याच्या कृत्रिम टाकीत केले. अशा प्रकारे त्या वर्षी आम्ही मुळामुठा नद्यांच्या पात्रात एक कणसुध्दा टाकला नाही. ज्या गणेशोत्सवांमध्ये सामाजिक विषय किंवा तत्कालीन समस्यांकडे लक्ष वेधले जाते त्याचा समाजावर चांगला परिणाम होण्याची शक्यता असते याचे हे एक उदाहरण आहे.

मुंबईमधील लालबागचा राजा आणि पुण्यातला दगडूशेठहलवाई गणेशोत्सव यासारख्या अनेक उत्सवांमधील मूर्ती आता असंख्य भाविकांची श्रध्दास्थाने बनल्या आहेत. हे देव नवसाला पावतात या विश्वासाने त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे काही मागण्यासाठी किंवा त्याच्या प्राप्तीनंतर नवस फेडण्यासाठी लक्षावधी लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी तास न् तास रांगा लावतात आणि पैसे, सोने, चांदी, दागदागीने वगैरे भरपूर मौल्यवान वस्तू स्वेच्छेने अर्पण करतात. अर्थातच त्या भक्तांच्या गर्दीची सोयीस्कर व्यवस्था करणे आवश्यक ठरते. अशा ठिकाणचे गणेशोत्सव जास्तच धूमधडाक्यात साजरे होतात. त्या ठिकाणी अत्यंत लक्ष्यवेधी सजावट असते, त्या वर्षी दगडूशेठहलवाईच्या गणेशमंदिराला जयपूरच्या हवामहलाचे रूप दिलेले होते. या वर्षी दक्षिण भारतातल्या तंजावूर इथल्या मंदिराचा देखावा होता. हजारो भक्तांनी एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे पठण करण्याचा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो. लालबागच्या राजाचा राजवाडासुध्दा नेहमीच प्रेक्षणीय असतो. या उत्सवांनिमित्य होणाऱ्या उलाढाली आता कोट्यवधी रुपयांच्या घरात गेल्या आहेत. त्यांचे आयोजन करणाऱ्या धर्मादाय संस्थांची संस्थाने झाली आहेत असे म्हणता येईल. उत्सवाच्या दहा दिवसांव्यतिरिक्त इतर काळातसुध्दा त्यांच्यातर्फे अनेक समाजोपयोगी कामे केली जात असतात. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना किंवा गरीब रुग्णांना त्यांच्याकडून मदत केली जाते. काही संस्था आपला वार्षिक ताळेबंद जाहीर रीत्या प्रकाशित करतात. नवस सायास वगैरेंवर व्यक्तीशः माझा विश्वास असो किंवा नसो, पण त्यामधून अनेक लोकांना मानसिक समाधान मिळत असेल, तर ते हिरावून घेण्याचा मला अधिकारही नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गणेशोत्सवसुध्दा त्या दृष्टीने पाहता समाजाच्या दृष्टीने हिताचेच म्हणता येतील.

WhatsApp Image 2018-09-16 at 23.39.06

शाळा, कॉलेजे, ऑफीसे, कारखाने, सहकारी गृहनिर्माणसंस्थांच्या किंवा सरकारी नोकरांच्या वसाहती अशा अनेक जागी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. तिथे या काळात एकाद्या स्नेहसंमेलनाचे वातावरण असते. या निमित्याने अनेक लोक सहकुटुंब एकत्र येतात, त्यात काही लोकांच्या भेटी होतात, नव्या ओळखी होतात आणि जुन्या ओळखींना तजेला मिळतो. या निमित्य ठेवल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये चित्रकला, शिल्पकला, विणकाम, भरतकाम, पुष्परचना, संगीत, नृत्य, वक्तृत्व इत्यादि क्षेत्रांमधील आपापले कला गुण दाखवण्याची संधी अनेक लोकांना, विशेषतः मुलांना मिळते. सजावट, आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रम, विसर्जन वगैरे गोष्टी सामूहिक रीतीने करतांना लोकांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आणि अनुभव मिळतो. यातून आनंद मिळतो आणि काही नवे अनुभव, नवी माहितीही मिळते.

बदललेल्या परिस्थितीतील गणेशोत्सवात जर असे सगळे चांगलेच घडत असेल त्याच्या विरोधात इतकी ओरड का केली जाते असा प्रश्न पडेल. ती ओरडही अनाठायी वाटत नाही, कारण काही गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त गोंधळ आणि गोंगाट सुध्दा होत असतो. हे उत्सवाच्या नावाने होत असलेले उरूस अनेक प्रकाराने समाजाला त्रासदायक ठरतात. याची सुरुवात दोन तीन महिन्याआधी वर्गणी गोळा करण्यापासून होते. ती करतांना स्वेच्छेपेक्षा दबावावर जास्त भर दिला जातो. मांडव घालण्यासाठी भर रस्त्यांमध्ये खड्डे खणले जातात आणि ते कधीच बुजवले जात नाहीत. अर्धा रस्ता मांडवात गेल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी संकुचित होतो आणि एरवीसुध्दा जिथे वाहनांची गर्दी असते तिथली वाहतूक जवळजवळ बंदच पडते. कर्णकर्कश भोंग्यामधून वेळी अवेळी अभिरुचीहीन गाणी मोठमोठ्याने ऐकवली जातात आणि कधीकधी त्यांच्या तालावर बीभत्स असे नाच केले जातात. या सगळ्या धांगडधिंग्यात मांगल्याचा मागमूसही दिसत नाही आणि याला धार्मिक का म्हणायचे हेच समजत नाही. अशा हिडीस स्वरूपाच्या उत्सवातून समाजाला काही तरी चांगले मिळण्याची फारशी शक्यता नसते. त्याचे आयोजन करणाऱ्यांना त्यातून वैयक्तिक फायदे होतात. त्यांच्या टोळक्यांना दहा बारा दिवस फुकटात मनसोक्त मजा करता येते आणि त्यांच्या म्होरक्यांना मिरवायला मिळते. त्यांचा धाक आणि भाव थोडा वधारतो. सर्वसामान्य माणूस थोडी कुरकुर करण्यापलीकडे काही हालचाल करायला धजत नाही.

गेल्या १-२ वर्षांपासून सरकार आणि न्यायालये यांनी त्यावर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत आणि त्यांना कांही ठिकाणी कांही प्रमाणात यश मिळत आहे. यात आणखी पुष्कळ सुधारणा होण्याची गरज आहे. आता वाटल्यास गणपतीबाप्पानेच या लोकांना चांगली बुध्दी द्यावी अशी प्रार्थना त्याला हात जोडून करतो. एकादा वैतागलेला लेखक आता पुढल्या वर्षी येऊच नका अशी प्रार्थना गणपतीबाप्पाला करतो. पण अशा स्वरूपाचे उत्सव साजरे करणे हा ज्यांचा धंदा बनला असेल आणि त्यात बरकत असेल तर तो आपला धंदा वाढवतच जाणार. जेंव्हा ते सुध्दा अती होईल आणि सहनशक्तीच्या पलीकडे जाईल तेंव्हा समाजच त्याला आळा घालेल. त्या दृष्टीने प्रबोधन करणेही सुरूच आहे.

WhatsApp Image 2018-09-17 at 20.21.02

आमच्या पांच दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता विसर्जनाने झाली.  त्यासोबत ही लहानशी लेखमालिका संपवत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार

 

माणसांच्या मनात विचार येतात, त्यांना कल्पना सुचतात, अनुभव आणि ज्ञान यांच्या कसोट्यांवर त्यांची पारख होते, विवेक व संयम यांच्या गाळणीतून गाळून घेतल्यानंतर त्यातले इतरांना सांगण्याजोगे असे विचार व्यक्त केले जातात, त्या कल्पना मांडल्या जातात. मनातले हे व्यवहार आपल्या नकळत चालले असतात. भाषेवर चांगले प्रभुत्व, आपले विचार सुसंगतपणे मांडण्याचे कौशल्य, छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि वाक्चातुर्य हे गुण अंगी असले तर मनातल्या कल्पना शब्दातून स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी त्या गुणांचा चांगला उपयोग होतो, मनात आलेले नवे विचार, नव्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात. समाजामधील रूढ समजुतींना त्यातून धक्का बसण्याची शक्यता असली तर ते वेगळे विचार व्यक्त करण्याचे धैर्य लागते. लोकमान्य टिळकांसारख्या अलौकिक व्यक्तींमध्ये हे सगळे गुण एकवटले होते, तसेच त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट स्पष्ट होते आणि ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची त्यांची तयारी होती, टीका किंवा विरोधाने विचलित न होता आपल्या भूमिकेवर ठामपणे उभे राहण्यासाठी लागणारे मनोधैर्य ही त्यांच्या अंगी होते. यामुळे ते असे नवे विचार समाजापुढे मांडून सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकले.

कोणत्याही नव्या कल्पनेवर त्या ऐकणाऱ्या लोकांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. पहिली म्हणजे खूप लोकांकडून तिचे उत्साहाने स्वागत होते. त्यांच्यातल्या ज्यांना ती कल्पना पटलेली आणि आवडलेली असते, ते लोक तिचा पुढे पाठपुरावा करतात, तिला वास्तवात आणण्याच्या कामात सहभागी होतात, त्यात जमेल तेवढी आपली भर टाकतात. अशा लोकांचा नव्या कार्यात हातभार लागतो. पण त्यातल्या इतर अनेक जणांना नव्याची नवलाईच तेवढी प्रिय असते. ती संपली किंवा आणखी एकादी वेगळी कल्पना पुढे आली की त्यांचा उत्साह ओसरतो, मग ते लोक दुसऱ्या नव्या कल्पनेच्या मागे धावतात. अशा लोकांचा पाठिंबा फसवा आणि तात्पुरता असतो. त्यामुळे अवसानघात होतो. त्यांच्यावर विसंबून राहिल्यास ते काम बिघडते किंवा खोळंबून राहते.

काही लोकांना टिंगल, टवाळी, चेष्टा, मस्करी यात खूप गोडी असते. प्रस्थापित गोष्टींच्या तुलनेने नव्या विचारांची टर उडवणे सोपे आणि सुरक्षित असते. असे लोक त्यातील कमकुवत दुवे, त्याबद्दलचे गैरसमज वगैरेंना यथेच्छ झोडून घेतात. त्यात त्यांना गंमत वाटतेच, इतरांनाही ते ऐकतांना मजा वाटते. त्यामुळे कार्यकर्ता नाउमेद झाला तर तो आपले काम सोडून देतो आणि त्याला प्रत्युत्तर देत बसला तर त्यातच त्याचा वेळ आणि श्रम खर्च होतात. त्यामुळेही कार्यातली प्रगती मंद होते.

काही लोकांना विरोध करण्याचीच आवड असते. विशेषतः रूढी प्रिय असणाऱ्या लोकांना कोणताही बदल नको असतो. त्यांना बदलामधील अनिश्चिततेचे भय वाटते. ज्या लोकांचे हितसंबंध आधीच्या व्यवस्थेत गुंतलेले असतात त्यांचे त्यातील बदलामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. असे लोक सरळ सरळ विरोधात उभे राहतात किंवा प्रच्छन्नपणे अडथळे आणतात. ते बलिष्ठ असल्यास नव्या विचारानुसार काम होऊ देत नाहीत किंवा चालू झालेले काम बंद पाडू शकतात. अशा वेळी शक्ती किंवा युक्तीचा वापर करून त्यांच्यावर मात करावी लागते.

अशा प्रकारे बहुतेक सगळ्या नव्या कल्पनांना उत्साह, उपहास, विरोध आणि त्यानंतर स्वीकृती या अवस्थांमधून जावे लागते. त्यात काही दिवस, महिने किंवा कदाचित काही वर्षे जातात. पण ती कल्पना मुळात चांगली आणि उपयुक्त असेल तर ती पहिल्या तीन अवस्थांमध्ये तग धरून राहते आणि अखेर स्वीकारली जाते. त्यानंतर ती खूप फैलावते आणि दीर्घ काळ टिकून राहते. नवी वैद्यकीय उपचारपध्दती, शिक्षणाची नवी पध्दत, विज्ञानातले नवे सिध्दांत किंवा नवे तंत्रज्ञान अशा निरनिराळ्या प्रयोगांमध्ये असेच अनुभव येतात, पंचवीस तीस वर्षांपूर्वी संगणकाचे आगमन झाले तेंव्हाचा इतिहास आपण पाहिला आहेच. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातसुध्दा असे अनुभव येतात. एवढेच काय, घरात आणलेल्या एकाद्या नव्या वस्तूचेसुध्दा कोणाकडून उत्साहाने स्वागत होते, तर कोणी त्याला नावे ठेवतात, कोणी त्यातल्या उणीवा शोधतात, तर कोणाला त्यात धोके दिसतात. पण ते उपकरण खरोखर चांगले असले तर अखेर सगळे त्याचा उपयोग करू लागतात आणि तसे नसले तर ते अडगळीच्या खोलीत जाऊन धूळ खात पडते.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो उपक्रम श्री. भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी १८९२-९३ साली सुरू केला त्याच्या संदर्भातसुध्दा आपल्याला या चार प्रतिक्रिया दिसतात. त्या वेळी बाळ गंगाधर टिळक अजून ‘लोकमान्य’ झाले नव्हते. झुंजार वृत्तपत्रकार अशी त्यांची ख्याती झालेली होती आणि पुण्यामधील शिक्षणसंस्था, सभा, संमेलने वगैरेंशी त्यांचा निकटचा संबंध असल्यामुळे त्यांची खास प्रतिमा तयार झाली होती. त्यांचा चाहता वर्ग तयार झाला होता. त्या लोकांनी गणेशोत्सवाचा उत्साहाने पुरस्कार केला. पण अनेकांनी त्याचा उपहास आणि विरोधही केला. कर्मठ धर्मनिष्ठांनी त्याला ‘धर्मबुडवा’ म्हंटले तर कुचाळकी करणाऱ्यांनी त्याला जातीयतेचा रंग दिला, कोणी त्याला परधर्मीयांचे अनुकरण ठरवले तर कोणी परकीय लोकांचे. कोणाला मेळ्यामधील कार्यक्रमात बरेच काही आक्षेपार्ह वाटले तर कोणाला सजावट आणि आणखी कोणाला विसर्जनाची मिरवणूक पसंत पडली नाही. त्यांनी या सर्वांची टिंगल केली किंवा त्यांचा निषेध केला. पण त्यांनी केलेल्या निंदेमुळे टिळक विचलित झाले नाहीत की त्यांनी निंदकांना अवास्तव महत्व दिले नाही. ते आपल्या ध्येयाच्या दिशेने शांतपणे आणि खंबीरपणे मार्गक्रमण करत राहिले आणि गणेशोत्सवामुळे समाजाला होणारे फायदे दाखवत राहिले. टिळकांच्या आवाजाचा एक नमूना शतकानंतर अलीकडे आपल्याला ऐकायला मिळाला. त्यावरून असे दिसते की गणेशोत्सवात आलेल्या श्रोत्यांना शास्त्रीय संगीत ऐकायची संधी मिळावी अशी योजना टिळकांनी केली तसेच हे दिव्य संगीत त्यांनी गोंधळ गडबड न करता शांतपणे ऐकून घ्यावे अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.

टिळकांचे कळकळीने केलेले सांगणे लोकांनाही पटत गेले आणि अल्पावधीतच गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत गेली. टिळकांनी दाखवलेल्या उदाहरणाचे असंख्य लोकांनी अनुकरण केले. वर्षभरानंतर पुण्यातच शेकडो ठिकाणी हा उत्सव साजरा केला गेला आणि त्याच्या पुढल्या वर्षी तो गावोगावी साजरा होऊ लागला. पंढरपूरसारखी यात्रा आणि सार्वजनिक गणेशोत्सव यातला हाच मोठा फरक होता आणि टिळकांनी तो नेमका हेरला होता असे त्यांच्या लिखाणावरून दिसते. देवस्थानांमध्ये जमणारी यात्रा ही फक्त त्या एकाच ठिकाणी भरते पण टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव गावोगावीच नव्हे तर प्रांताप्रांतांमध्ये पसरवायला कसलीच मर्यादा नव्हती. त्या निमित्याने ठिकठिकाणी तिथले अनेक लोक एकत्र येतील आणि त्यांना देशाभिमान व देशप्रेमाची प्रेरणा मिळू शकेल अशी दूरदर्शी व्यवस्था त्यात होती. टिळकांचा हा होरा अचूक ठरला आणि पाहता पाहता गणेशोत्सवाचा प्रसार सर्व दिशांना झाला. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा फक्त एकच विशाल वृक्ष झाला नाही, त्यातून असंख्य वृक्ष निर्माण झाले.

. . . . . . . . . .

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात

पुढील लेख : सार्वजनिक  गणेशोत्सवाचा प्रसार इथे पहा
https://anandghare2.wordpress.com/2018/09/19/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa/

कुंभमेळा, पंढरपूरची यात्रा, इतर अनेक ठिकाणच्या जत्रा, उरूस वगैरे धार्मिक स्वरूपाचे मेळावे भारतामध्ये कित्येक शतकांपासून चालत आले आहेत. विशिष्ट तिथीला विशिष्ट दैवतांचे दर्शन घेण्याने महान पुण्य मिळते, पापाचा क्षय होतो, या जन्मात सुखाची प्राप्ती आणि दुःखाचा अंत होतो, तसेच मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळते, मनुष्य योनीमध्ये पुनर्जन्म मिळतो किंवा जन्म मरणाच्या चक्रामधून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते वगैरे आमिषे काही भाविकांना त्यात दाखवली जातात. पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरा त्यात खंड न पाडता चालवत राहून पुढील पिढीकडे सोपवणे हे आपले परमकर्तव्य आहे आणि काहीही करून ते पार पाडणे अत्यावश्यक आहे अशा निष्ठेने काही लोक या यात्रांना जातात. त्याशिवाय एक वेगळा अनुभव, गंमत, हौस म्हणून जाणाऱ्यांची संख्या सुध्दा मोठी असते. या निमित्याने इतकी माणसे एकत्र येतात, त्यांची सेवा करण्याची संधी, किंवा त्यांच्याकडून काही ना काही अर्थप्राप्ती करून घेण्याचा मोह, अशा विविध कारणांमुळे अनेक लोक या यात्रांमध्ये सामील होतात. हे सगळे कित्येक शतकांपासून आजतागायत चालत आले आहे आणि जसजशा वाहतुकीच्या सोयी वाढत गेल्या तशी त्या यात्रेकरूंची संख्या कैकपटीने वाढत चालली आहे.

हे बहुतेक उत्सव एकाद्या पुरातन आणि जागृत समजल्या जाणाऱ्या देवस्थानाच्या ठिकाणी साजरे होत असतात. त्या यात्रांमध्ये काळ आणि स्थानमहात्म्याला फार मोठे महत्व असते. एकाद्या परमभक्ताला यात्रेच्या काळात त्या ठिकाणी जाऊन पोहोचणे काही कारणामुळे शक्य झाले नव्हते, तेंव्हा देवाने प्रत्यक्ष किंवा त्याच्या स्वप्नात येऊन त्याला दर्शन दिले अशी हकीकत अनेक देवस्थानांच्या बाबतीत सांगितली जाते. त्यातून नव्या श्रध्दास्थानांचा उगम होतो, नवी सुरस कथा बनते आणि नव्या यात्रेकरूंची नवी परंपरा सुरू होते. अशा प्रकारे त्यात भर पडत जाते.

अठराव्या शतकातल्या पेशवाईच्या काळातच गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात झालेली होती. त्यानिमित्य शनिवारवाड्याची सजावट आणि दिव्यांची रोषणाई केली जात असे तसेच भजन कीर्तन, गायन, नृत्य आदि कार्यक्रम होत असत. पेशव्यांचे इतर सरदार हा उत्सव आपापल्या संस्थानांच्या ठिकाणी करू लागले. पुण्यामध्येच कसबा पेठेतील सरदार मुजुमदार यांच्या वाड्यात सन १७६५ साली हा उत्सव सुरू झाला आणि गेली २४८ वर्षे तो चालत आला आहे. लोकमान्य टिळकांच्या काळाच्या आधीपासूनच अशा प्रकारे कांही ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत होता. पण तो मुख्यतः धार्मिक स्वरूपाचा होता किंवा तो साजरा करणाऱ्या श्रीमंत मंडळींच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन त्यात केले जात असे. लोकमान्यांनी त्याला लोकाभिमुख आणि मनोरंजक तसेच उद्बोधक असे वेगळे रूप दिले, त्याला देशभक्तीची जोड दिली आणि तो इतका लोकप्रिय केला की सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनकत्व त्यांनाच दिले जात होते. पण पुण्यातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये सुरू केला असल्यामुळे लो.टिळकांचा उत्सव पहिला ठरत नाही असा आक्षेप अलीकडे घेतला गेला होता. त्या वेळी जेवढे माझ्या वाचनात आले त्यावरून पाहता ते स्वतः लोकमान्य टिळकांचे चाहते किंवा सहकारी असावेत, प्रतिस्पर्धी किंवा विरोधक नसावेत असाच माझा ग्रह झाला. हे दोन्हीही उत्सव सव्वाशे वर्षांपासून अव्याहत चाललेले आहेत.

लोकमान्य टिळकांच्या मनात देवभक्तीपेक्षा देशभक्तीची भावना जास्त प्रखर होती. जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांच्या मनात देशप्रेम आणि देशाभिमान रुजवावे, त्यांना देशकार्यासाठी उद्युक्त करावे हा लोकमान्य टिळकांचा अंतस्थ हेतू होता, पण देशभक्तीवर केलेली भाषणे लोकांना रुक्ष वाटली असती आणि मुळात ती ऐकण्यासाठी फारसे लोक जमलेच नसते. शिवाय तत्कालीन इंग्रज सरकारने त्यावर लगेच अंकुश लावला असता. त्यामुळे लोकांना एकत्र आणण्यासाठी वेगळी युक्ती योजणे आवश्यक होते. धार्मिक स्वरूपाच्या उत्सवांच्या निमित्याने खूप माणसे एकत्र जमतात हे लोकमान्य टिळकांनी पाहिले आणि त्यातून आपल्याला हवी असलेली जनजागृती करता येईल हे त्यांनी ओळखले, पण त्यांचे अनुयायी बनण्यासाठी लोकांनी त्यांना महंत, स्वामी, बाबा अशा प्रकारचा धर्मगुरू म्हणून मखरात बसवावे हा त्यांचा उद्देश नव्हता. स्वतः एकाद्या देवाचे लाडके परमभक्त असल्याचे न भासवता पण ईशभक्तीचे निमित्य पुढे करून लोकांना कसे आकर्षित करावे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. सार्वजनिक गणेशोत्सव हा त्यावर एक नामी उपाय त्यांनी शोधून काढला आणि अंमलात आणला.

हे काम वाटते तेवढे सोपे नव्हतेच. ते यशस्वी करण्यासाठी लोकमान्यांना भरपूर परिश्रम करावे लागले, अनेकांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. एरवी साधा वाडा असलेल्या वास्तूमध्ये काही दिवसांसाठी गणपतीची तात्पुरती प्रतिष्ठापना करणे आणि उत्सव संपल्यानंतर त्याची बोळवण करून त्या जागेत पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण करणे हे भाविक लोकांना पटणे कठीण होते. गणपती या देवाची पूजा अर्चा ही व्यक्तीगत बाब आहे, ती विधीवत (सोवळे वगैरे नेसून) प्रकारे करायला हवी, त्यातले विशिष्ट पूजाविधी, मंत्रोच्चार वगैरेमध्ये कसलीही उणीव येता कामा नये असे समजणारे आणि सांगणारे लोक शंभरावर वर्षे उलटून गेली तरी आजही आपल्याला भेटतात. लोकमान्य टिळकांच्या काळामधल्या कर्मठ लोकांनी तर यात कसलीही हयगय होणे मान्य केलेच नसते. देवघरातल्या देवाला सार्वजनिक जागी आणून ठेवले आणि कोणीही उठून त्याची पूजा करू लागला. यामुळे पावित्र्याचा भंग झाल्याने गणपतीमहाराज रुष्ट झाले आणि त्या पातकाचे शासन म्हणून त्यांनी प्लेगाच्या साथीला पाठवून दिले असे अकलेचे तारेसुध्दा काही मंडळींनी त्या काळात तोडले होते.

हा विरोध इतर काही वेगळ्या मुद्द्यांवर आणि वेगवेगळ्या स्तरांवर झाला होता. यात पूजेच्या पावित्र्याचा भंग होतो अशी ओरड कर्मठ धर्ममार्तंड करत होते,तर दुसऱ्या बाजूला हा ब्राह्मणांना पुढे पुढे करून समाजावर वर्चस्व गाजवण्याचा टिळकांचा एक कुटील डाव आहे असा दुष्ट आरोप कांही लोक करत होते. ही मुसलमानांच्या मोहरमच्या ताबूतांची नक्कल आहे असे सांगून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना भडकवण्याचा उद्योग इतर कोणी करत होते. अशा तात्विक मुद्द्यांशिवाय सजावट आणि मेळ्यांचे कार्यक्रम यांचा दर्जा, त्यावर होणारा खर्च आणि त्यात वाया जाणारा वेळ याबद्दल नाक मुरडणारे बरेच लोक होते. या सर्वांनी उडवलेल्या राळीमुळे विचलित न होता त्यांचे मुद्देसूद खंडन करून समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचा विश्वास संपादन करणे आणि आपल्या या नव्या उपक्रमाला त्यांची मान्यता मिळवून त्यांना मोठ्या संख्येने त्यात सहभागी करून घेणे हे अत्यंत कठीण काम लोकमान्यांनी त्या काळात करून दाखवले. लोकमान्यांनी या गोष्टी कशा प्रकारे लोकांच्या गळी उतरवल्या, त्यासाठी कोणकोणते युक्तीवाद केले हे त्या काळामधील लोकच जाणोत.

भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये आणि लोकमान्य टिळकांनी सन १८९३ मध्ये पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि वर्षभरानंतर सन १८९४ साली शेकडो ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले गेले. त्यानंतर ते लोण झपाट्याने पसरत गेले. आज जगभरातल्या सर्व खंडांमध्ये (अंटार्क्टिक सोडून) जिथे जिथे भारतीय लोक गेले आहेत तिथे तिथे ते लोक मोठ्या उत्साहाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात.

गणेश आणि लेखनकला

Ganapati vedavyasa

आजच्या काळात निरनिराळ्या प्रकारची लेखनसामुग्री मुबलक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध असते आणि ज्याला कोणाला काही लिहायची इच्छा असेल तो ते लिहू शकतो. जगातील प्रत्येक माणसाने साक्षर व्हावे या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत. माझ्या लहानपणी म्हणजे साठ वर्षांपूर्वीसुद्धा कागद आणि शाई सहजपणे मिळत होती तरी ग्रामीण भागातली साक्षरता वीस टक्क्याहून कमी होती. ज्या काळात कागदच अस्तित्वात आला नव्हता तेंव्हा ती अगदीच नगण्य प्रमाणात असणार. काही महान सम्राट आणि बादशहासुध्दा निरक्षर होते असे म्हणतात. असे असले तरी अगदी प्राचीन काळापासून लेखन व वाचन चालत आले आहे. भाषांच्या विकासाबरोबरच किंवा पाठोपाठ त्या लिपीबध्द केल्या गेल्या. काही विद्वान मंडळी निरनिराळ्या भाषांमध्ये आणि निरनिराळ्या लिपींमध्ये लेखनाचे कार्य करीत असत. ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे वगैरे साधनांवरून अशा लेखनांचे पुरावे मिळतात. अशा लेखनामधून प्राचीन काळातले काही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे.

आजच्या काळातले बहुतेच लोक व्यक्तीगत स्वरूपाचे लेखन स्वतःच करतात, पण पत्रव्यवहार, रिपोर्ट्स किंवा रेकॉर्ड्स यासारख्या व्यावसायिक लेखनासाठी अनेक ठिकाणी खास प्रशिक्षण घेतलेले लिपिक (स्टेनोटायपिस्ट) नेमलेले असतात. इतिहासकाळातसुध्दा मुनीम, चिटणिस वगैरेंकडून लेखनाचे काम करून घेतले जात असे. लिहिलेला मजकूर वाचणाऱ्याला नीट समजावा या दृष्टीने तो सुवाच्य अक्षरात लिहिलेला असणे आणि व्याकरणदृष्ट्या निर्दोष असणे आवश्यक असते. तशा पध्दतीने तो लिहिण्यासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवावे लागते तसेच सुलेखनकला अवगत असावी लागते. विद्या आणि कला या दोन्हीमध्ये प्राविण्य मिळवावे लागते.

बरेचसे वैदिक वाङ्मय अपौरुषेय आहे, ते कोणा माणसाने लिहिले नसून साक्षात ब्रह्मदेवापासून ते ज्ञान काही निवडक ऋषींना मिळाले आणि पुढे त्याचा प्रसार गुरूशिष्यपरंपरेनुसार मौखिक रीतीने होत गेला अशी काही लोकांची श्रध्दा असते. गुरूने सांगायचे आणि शिष्याने त्याचा वारंवार उच्चार करून ते तोंडपाठ करायचे अशी ज्ञानदानाची पध्दत प्राचीन काळात होती. अनेक सूक्ते, श्लोक, स्तोत्रे वगैरे अमक्या तमक्या ऋषीने विरचित केली असा उल्लेख त्यात केला जातो. सर्वाधिक प्रसिध्द आणि प्रचंड आकाराचे असे महाभारत हे महाकाव्य व्यासमहर्षींनी रचले आणि प्रत्यक्ष गणेशाने ते लिहिले असे समजले जाते. त्याचा विस्तार पाहता हे काव्य तोंडपाठ करणे जवळ जवळ अशक्यप्रायच वाटते. ते चिरकाळ टिकून रहावे यासाठी ग्रंथरूपाने लिहून ठेवणे आवश्यक होते. ते लिहून काढणे हे सुध्दा सोपे काम नव्हते. ते कोण करू शकेल याचा विचार करता केवळ श्रीगणेशच हे करू शकेल असे दिसले.

त्यासाठी व्यासमहर्षींनी गणेशाची आराधना केली. त्याने प्रसन्न होऊन वरदान मागितले तेंव्हा महाभारताचे लेखनकार्य त्याने करावे असा वर व्यासांनी मागितला. हे काम करण्यासाठी गणेशाने एक अट घातली. ती म्हणजे व्यासांच्या सांगण्यात खंड पडला तर लगेच हे काम तिथेच थांबवून गणेशजी अंतर्धान होतील आणि पुन्हा परत येणार नाहीत. व्यासांनी ती अट मान्य केली आणि एका बैठकीत हजारो श्लोक रचून सांगितले आणि गणेशाने ते तत्परतेने लिहून हा ग्रंथ पूर्ण केला. अशी कथा मी ऐकली होती. माझ्या वाचनात आलेल्या एका लेखात असे लिहिले होते की गणेशाने अशी अट घातली की व्यासांच्या सांगण्यात खंड पडला तर गणपती आपल्या मनाने काही तरी लिहीत जाईल. अशा प्रकारे त्याने लिहिलेला मजकूर इतका गूढ आहे की त्याचा अर्थ कोणालाच कधी नीटपणे समजला नाही.

सर्वात पहिला कुशल लेखनपटु गणेशच होता याबद्दल एकमत दिसते. कोणत्याही लेखनाच्या सुरुवातीला गणेशाला वंदन, त्याची स्तुती करून ग्रंथनिर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे संपूर्ण होऊ द्यावे असा आशिर्वाद गणपतीकडे मागण्याचा प्रथा पडली आणि शतकानुशतके चालत राहिली. आधुनिक काळातील काही इतिहासकारांना असे वाटते की महाभारत हा ग्रंथ शतकानुशतके लिहिला जात होता. तसे असल्यास ते रचणारे सगळे विद्वान व्यास म्हणवले जात असतील आणि लिहिणारे विद्वान गणेशाचे अंश.

गणश

संस्कृत या देववाणीची देवनागरी ही लिपी गणेशानेच तयार केली असेही त्या लेखात लिहिले होते. या लिपीची रचना करतांना त्यात अशी खुबी केली आहे की ग, ण आणि श ही तीन अक्षरे इतर व्यंजनाहून वेगळी आहेत. फक्त या तीन व्यंजनांनाच एक स्वतंत्र अशी उभी रेघ आहे. ही तीन अक्षरेसुध्दा गणेश या नावात ज्या क्रमाने येतात त्याच क्रमाने देवनागरी लिपीच्या मुळाक्षरांमध्ये येतात. आहे की नाही गंमत ?

अनंतचतुर्दशी

मी हा लेख अनेक वर्षांपूर्वी एका अनंतचतुर्दशीच्या दिवशी लिहिला होता. कोरोनाच्या दहशतीमुळे मधली दोन वर्षे या दिवशी मोठ्या प्रमाणात गणपतींचे विसर्जन होत नव्हते. या वर्षी मात्र सगळे निर्बंध उठवले असल्यामुळे धूमधडाक्यात  विसर्जनाच्या मिरवणुकी निघाल्या आहेत. सगळीकडे ढोलाचे आवाज दुमदुमत आहेत.

‘अनंत’ या शब्दाने माझा लहानपणापासून पिच्छा पुरवला आहे. साठसत्तर वर्षांपूर्वी हे नाव खूपच प्रचलित असायचे. अनंतराव, अंतूशेठ, अनंता, अंत्या वगैरे नावांनी ओळखली जाणारी निदान शंभर तरी लहानमोठी मुलेमाणसे आमच्या गावात होती आणि त्यातली चारपाच तरी आमच्या अगदी जवळची आणि नेहमी आमच्या घरी येणारी होती. माझ्या आधीच्या पिढीतली ‘आनंद’ हे नाव धारण करणारी मोठी माणसे नव्हतीच आणि तेंव्हा या नावाची मुलेसुध्दा अनंतांच्या मानाने अगदी कमी होती. त्यामुळे कुठेही माझे नाव मी ‘आनंद’ असे सांगितले तरी ऐकणारा माणूस ते ‘अनंत’ असेच लिहून घेत असे आणि हे आजतागायत होत आले असल्याने मी केलेल्या खर्चासाठी मिळालेल्या शेकडो पावत्या ‘अनंत’ या नावाने फाडल्या गेल्या आहेत, या नावाने मला प्रवास करावा लागला आहे आणि या नावाने माझ्यासाठी उद्घोषणा (अनाउन्समेंट्स) झालेल्या ऐकून मी त्यांना प्रतिसाद दिला आहे. हळूहळू मलाही त्याचे काही वाटेनासे झाले.

सरकारदरबारी महत्व असलेल्या कागदपत्रांमध्ये मात्र माझे नाव चुकीचे लिहिले जाऊ नये यासाठी मला थोडी धडपड करावी लागली आणि ते तसे झाल्यानंतर त्या चुका दुरुस्त करून घेण्यासाठी अनेक हेलपाटे घालावे लागले आहेत.  मुंबईला स्थाइक झाल्यानंतरच्या काळात मात्र ‘अनंत’ नावाची माणसे भेटणे कमी कमी होत गेले आणि मला भेटणाऱ्या ‘आनंदां’ची संख्या वाढत गेली, काही चिदानंद, परमानंद, नित्यानंद आणि सदानंदही भेटले. नंतर त्यांची संख्याही कमी होत गेली आणि स्वानंद, आमोद वगैरे त्या नावाचे नवे अवतार येत गेले. सध्याच्या नव्या पिढीतले कोणतेच जोडपे त्यांच्या मुलाला ‘अनंत’ हे नाव आता ठेवत नसेल.

‘अनंत’ या नावाचा अर्थ खरे तर खूप मोठा आहे. ‘ज्याला अंत नाही’ असा तो होतो. अमित, अगणित, असंख्य, इन्फिनिटी यासारखी ही एक अचाट कल्पना आहे किंवा कल्पनातीत अशी संख्या आहे, त्याचा कालावधी कधीही न संपणारा इतका आहे. असे स्वरूप फक्त परमेश्वराचेच असू शकते. भगवान विष्णूच्या सहस्रनामांमधले हे एक प्रमुख नाव आहेच, पण नवनागस्तोत्राची सुरुवात अनंतं वासुकी शेषं अशी होते. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम् (त्रिवेन्द्रम्) येथील पद्मनाभस्वामीचे मंदिर खूप मोठे आणि प्रसिध्द आहे. त्याला अनन्तपद्मनाभदॆवालय असेही म्हणतात. त्यामधले अनंत हे नाव शेषाचे आहे की विष्णूचे आहे की त्या दोघांचे आहे असा संभ्रम पडतो. शेषशायी विष्णूची भव्य अशी आडवी मूर्ती या देवळात आहे.

अनंतचतुर्दशी हा वर्षातला एक दिवस अनंताच्या नावाने ओळखला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुध्द चतुर्दशीला हे नाव दिलेले आहे. या दिवशी अनंतचतुर्दशीचे एक व्रत केले जात असे. त्या दिवशी शेषशायी विष्णूच्या प्रतिमेची आणि एका विशिष्ट दोऱ्याची पूजा करून तो मंतरलेला दोरा मनगटावर गुंडाळायचा आणि पुढल्या वर्षी अनंतचतुर्दशीला पूजा करून तो बदलायचा असे चौदा वर्षे करायचे असे नियम होते. हे फार कडक व्रत आहे आणि ते पाळले गेले नाही तर फार मोठे दुष्परिणाम होतात वगैरे भीतीपोटी सहसा कोणी ते व्रत करत नसत. असे मी लहानपणी ऐकले होते. आता तर या व्रताचा मागमूसही कुठे दिसत नाही.

पण दरवर्षी अनंतचतुर्दशी प्रचंड प्रमाणात गाजते ती मात्र गणपतीविसर्जनासाठी. त्याचा गाजावाजा, गोंगाट आणि धामधूम वाढतच आहे. गणेशचतुर्थीला प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीच्या मूर्तीची दहा अकरा दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचे समारंभपूर्वक पाण्यात विसर्जन केले जाते. घरांमध्ये बसवलेल्या गणपतींच्या उत्सवांचे दीड, तीन, पाच, सात वगैरे दिवस कालावधी असतात. वंशपरंपरेमधून ते चालत आलेले असतात. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यापासून त्यांचा कालावधी अनंतचतुर्दशीपर्यंत ठरवला गेला आणि त्याचे पालन होत राहिले आहे. ज्या मंडळांना इतके दिवस उत्सव करणे शक्य नसते ते आपल्या गणपतींचे विसर्जन आधी करून घेतात, पण बहुतेक सगळे प्रमुख गट मात्र त्यांच्या उत्सवमूर्तीचे अनंतचतुर्दशीच्या दिवशीच विसर्जन करतात. हा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यात सामील होणाऱ्यांची संख्याही अगणित असते.

नोकरीसाठी मी मुंबईला आल्यानंतर पहिली अनेक वर्षे माझे ऑफिस दक्षिण मुंबईत होते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी बाहेर कुठेही मीटिंग किंवा व्हिजिटला जाण्याचा प्रश्नच नसायचा, आमच्या ऑफिसातली उपस्थितीही रोडावत असल्यामुळे त्या दिवशी महत्वाच्या बैठका ठेवल्या जात नसत. रस्त्यावरील तुडुंब वाहणारी गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी वगैरेंचा विचार करून दोन तीन तास आधीच घरी जाण्याची परवानगी मिळत असे. त्यानंतर आम्ही तीनचार मित्र मिळून ठिकठिकाणच्या मिरवणुका पहात हिंडत असू आणि आमच्या ग्रुपमधल्या शेवटच्या मित्राला कंटाळा येईपर्यंत फिरून झाल्यानंतर आपापल्या निवासस्थानी परतत असू.  लहानमोठे असंख्य गणपती, त्यांचे देखावे वगैरेंमधून त्याची कोटीकोटी रूपे त्या काळात मला पहायला मिळाली. लग्न झाल्यानंतर  मात्र या तोबा गर्दीत सहकुटुंब जाणे आणि परतणे शक्य नसल्यामुळे आम्ही थोडा लहानसा फेरफटका मारून सुखरूप परतत होतो.

योजना प्रतिष्ठानशी आमचा संबंध आल्यानंतर दर वर्षी अनंतचतुर्दशीला एक वेगळा कार्यक्रम निश्चित झाला. परळच्या ऑव्हरब्रिजला लागूनच असलेल्या एका चाळीतल्या खोलीत या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या दिवशी संगीत भजनाचा लहानसा घरगुती पण चांगल्या दर्जाचा कार्यक्रम केला जात असे आणि त्यात स्व.शिवानंद पाटील, योजनाताई आणि त्यांचे निवडक शिष्यगण भक्तीपूर्ण गायनसेवा सादर करीत असत. बाहेरील रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकांमध्ये चाललेला ढोलताशांचा गजर आणि त्याच्यावर आवाज काढून बंदिस्त खोलीत केलेले ते गायन यात एक वेगळा रंग येत असे. संध्याकाळच्या सुमारास घरी परत येतांना आमची बस मुंगीच्या पावलाने चालत असे आणि उलट दिशेने समुद्राकडे जाणारे खूप गणपती पहायला मिळत असत.

आज अनंतचतुर्दशी आहे. मुंबई, पुणे, नागपूर, इन्दौर वगैरे सर्वच प्रमुख शहरांमध्ये या विसर्जनांच्या भव्य मिरवणुकी निघायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक मंडळामधील गणपतीसोबत त्या भागातले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले सगळे लोक त्या मिरवणुकींमध्ये सामील होतातच, शिवाय या मिरवणुकी पहायला ज्याला ज्याला शक्य असेल तो त्या पहायला जातो. मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे गिरगाव, दादर, जुहू वगैरे अनेक ठिकाणी हे विसर्जन होते, पण त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. लालबागपासून दादर जवळ असले तरी लालबागचा राजा आणि त्या भागातले मोठे गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरच वाजत गाजत नेले जातात. टेलिव्हिजनवर या मिरवणुकींचे वृत्तांत दाखवले जात असल्याने घरात राहिलेले सगळेजण आता टीव्हीसमोर बसलेले आहेत. तेंव्हा मीसुध्दा हा लेख इथे आटोपता घेऊन आता तिकडे चाललो आहे.
गणपतीबाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या।।

हा लेख पूर्वी लिहिलेला आहे आणि यात वर्णन केलेली मिरवणुकींची धमाल दर वर्षी होत असे. या वर्षी (२०२० साली) कोरोनोच्या दहशतीमुळे सगळीकडे सामसूमच आहे.
—————————————–

आधी वंदू तुज मोरया

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया असे एक लोकप्रिय गीत आहे. आपण प्रत्येक महत्वाच्या कामाचा शुभारंभ गणपतीच्या स्तवनाने करतो. पूर्वीच्या काळात ‘श्रीगणेशायनमः’ लिहून मुलांची अक्षर ओळख होत असे. बालमानसशास्त्र वगैरेचा विचार करून आता ‘गमभन’ ने सुरुवात केली तरी त्यात सुध्दा सर्वात पहिल्यांदा ‘ग गणेशाचा’च येतो. सर्व मंत्रांची सुरुवात ओंकाराने होते. इतर देवतांच्या पूजेच्य़ा आधी गणपतीची पूजा केली जाते. कुठल्याही पोथीचे वाचन श्रीगणेशायनमः ने सुरू होते. अशा प्रकारे सर्व धार्मिक कृत्यात तसेच इतर महत्वाच्या प्रसंगी श्रीगजाननाला अग्रपूजेचा मान मिळतो. ही प्रथा पूर्वीपासून चालत असावी. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात ॐ नमोजी आद्या या गणेसस्तवनाने सुरू केली होती. विठ्टलभक्त संत तुकाराम, आणि श्रीरामाचे परमभक्त समर्थ रामदास यांनी सुध्दा गणपतीची स्तुती करण्यासाठी सुंदर रचना केल्या आहेत.

असे असले तरी जसे एकादे यंत्र सुरू होऊन व्यवस्थितपणे चालायला लागले की त्याचे स्टार्ट बटन किंवा सर्किट बाजूला राहते, त्याप्रमाणे एकादी मोठी पूजा करतांना सुरुवातीला गणेशपूजा झाल्यानंतर शेवटी आरतीच्या वेळेपर्यंत गणेशाची आठवण रहात नाही. उत्तर आणि दक्षिण भारतात बहुतेक सर्व देवतांच्या मंदिरात प्रवेशद्वारावरती किंवा एकाद्या कोनाड्यात गणपतीची प्रतिमा असते. अशा प्रकारे तो सगळीकडे उपस्थित असतो, पण खास गणपतीची प्रसिध्द मंदिरे मुख्यतः महाराष्ट्रात दिसतात. पुण्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात प्रसिध्द अष्टविनायक आहेत. त्याखेरीज पुळ्याचा गणपती, दिवेआगरचा सोन्याचा गणपती, पुण्यातला कसबा गणपती, मुंबईचा सिध्दीविनायक वगैरे देवस्थानांच्या ठिकाणीही भक्तांची गर्दी असते.

कोकणातून बाळाजी विश्वनाथ भट पुण्याला आले आणि त्यांना पेशवेपद मिळाले. पुढील सुमारे शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांच्या साम्राज्याची धुरा पेशव्यांकडे होती. गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत होते आणि त्याच्या कृपाप्रसादानेच त्यांची भरभराट झाली अशी त्यांची श्रध्दा असल्यामुळे पुणे शहरात आणि त्याच्या परिसरात गणेशाच्या उपासनेला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. पेशव्यांनी त्यांच्या शनिवारवाडा या निवासस्थानात गणेशोत्सव सुरू केला आणि तो धामधुमीत चालवला. पटवर्धन, रास्ते, मेहेंदळे आदि कोकणातली काही कुटुंबे पेशव्यांबरोबर पुण्यात आली आणि सरदारपदापर्यंत त्यांची प्रगती झाली. त्यांनीसुध्दा आपापल्या वाड्यात आणि संस्थानात गणपतीची सुरेख मंदिरे बांधली आणि त्याची भक्तीभावाने उपासना केली. पण हे सगळे मुख्यतः व्यक्तीगत पातळीवर चालायचे आणि त्यांच्या खास मर्जीतले लोकच त्यात सहभागी होत असत.

पुण्यातच राहणा-या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचे महत्व ओळखून त्याला सार्वजनिक रूप दिले आणि त्या निमित्याने लोकसंग्रह सुरू केला. भारतीय लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही असे इंग्रजांचे धोरण असल्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि पौराणिक गोष्टींच्या आधाराने भारतीयत्वाचा विचार पसरवणे लोकमान्यांना शक्य झाले. त्यांनी सुरू केलेला उत्सव लोकप्रिय होत गेला आणि आता तर गणेशोत्सव ही महाराष्ट्राची एक ओळख झाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात आणि परदेशातसुध्दा अनेक ठिकाणी तो उत्साहाने साजरा होत आहे.
या गणेशोत्सवाच्या दिवसात श्रीगजाननाला शतशः सादर प्रणाम.

मूषक आणि माउस

मूषक माउस

घोडा, बैल, रेडे, उंट यासारख्या प्राण्यांना पाळीव बनवून माणसाने त्यांचा उपयोग आपली ओझी वाहण्यासाठी प्राचीन काळातच सुरू केला. राजा महाराजांकडे पाळलेले हत्तीसुध्दा असत. जगाच्या कांही भागात गाढवे आणि खेचरे यांचा उपयोग वहनासाठी केला जाऊ लागला. ध्रुवप्रदेशात स्लेज ओढण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग होतो. आकाराने त्याहून लहान असलेल्या मांजरीचे पालन मात्र बहुतेक करून फक्त जवळ घेऊन कुरवाळण्यासाठी आणि घरात शिरू पाहणा-या उंदरांवर अंकुष ठेवण्यासाठी होते. उंदीर हा मात्र कधीच घरातला पाळीव प्राणी बनला नाही. प्रयोगशाळांमध्ये उंदीर पाळून त्यांच्यावर प्रयोग करण्यात येतात, तेवढाच याला अपवाद म्हणायचा.

त्यामुळे उंदीर हा प्राणी एक वाहन म्हणून कधीच आपल्या डोळ्यासमोर येत नाही, पण गणपतीचे वाहन मात्र उंदीर मानले जाते. मोर हा मोठ्या आकाराचा पक्षी सुध्दा गणपतीचे वाहन म्हणून ओळखला जातो. त्यावरून मयूरेश, मोरेश्वर आदि नांवे गजाननाला दिली आहेत. याचा उलगडा करण्यासाठी गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारात त्याची वेगवेगळी वाहने होती असा खुलासा केला जातो. उंदीर हे गणपतीचे वाहन कसे बनले यासंबंधी एक पौराणिक कथा प्रसिध्द आहे. मूषकराज नांवाच्या दैत्याला गजाननाने पराभूत केल्यानंतर तो शरण आला आणि त्याने गयावया करून गणपतीचे वाहन होण्याचे कबूल केले असे सांगतात.

या गोष्टीचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न कांही विद्वानांनी केला. प्राचीन काळात मूषक या नांवाने ओळखली जाणारी एक जमात होती. ते लोक चांचेगिरी करत असत. सर्व गणांचा प्रमुख असलेल्या गणाधिपाच्या नेतृत्वाखाली त्यांचा पाडाव केल्यानंतर त्यांनी शरणागती पत्करून गणपतीचे दास्यत्व स्वीकारले असा निष्कर्ष कोणा विद्वानाने काढला आहे. उंदीर हा प्राणी देखील एक उपद्रव देणारा प्राणीच समजला जातो. बिळातल्या चोरवाटेने घरात शिरून तो अन्नधान्य, कागदपत्रे, कपडेलत्ते वगैरे सगळ्यांची नासधूस करत असतो. त्यावरून तसे करणा-या मूषक जमातीचे नांव पडले असेल आणि त्यांना आटोक्यात आणणा-या गणपतीला त्याच्यावर स्वार झालेले दाखवले गेले असेल.

उंदीर हा उपद्रवी असला तरी अत्यंत चपळ आणि तल्लख प्राणी आहे. त्याला मारण्यासाठी मांजर पाळले तरी अनेक वेळी तो त्याला मुळीच दाद देत नाही. टॉम अँड जेरीच्या कारटून्समध्ये तर जेरीच्या उपद्व्यापामुळे नेहमी टॉम अगदी जेरीला आलेला दिसतो. टॉम अँड जेरी, मिकी माऊस यासारख्या कारटून्समधून उंदीरमामा लहान मुलांचा लाडका तर झाला आहेच, केसरी टूरबरोबर फिरत असतांना मोठी माणसे सुध्दा प्रत्येक प्रवासाच्या सुरुवातीला गणपतीबाप्पा मोरया च्या बरोबर उंदीरमामाकी जय चा गजर करत असत.

संगणकक्रांती आल्यापासून माऊस नांवाच्या आधुनिक उंदीरमामाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या माऊसला हाताशी धरून आपण काँप्यूटरकडून विविध प्रकारची कामे करून घेतोच, आंतर्जालावर भ्रमण करून विश्वरूपदर्शन करून घेऊ शकतो. हे काम कधी इतके सोपे होऊ शकेल असे पूर्वीच्या काळात स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते. गणपती या बुध्दीच्या देवतेच्या उपासकांना गणपतीचे हे वाहन मनाने क्षणार्धात कुठल्या कुठे घेऊन जाते. एकाद्या शब्दावरून त्याबद्दल असलेली प्रचंड माहिती शोधयंत्रावरून आपल्याला चुटकीसरशी मिळू शकते. अशा प्रकारे या माऊसने आपल्याला ज्ञानमार्गातील नवनव्या गोष्टींच्या अगदी जवळ आणले आहे.