जिवतीचा पट आणि कहाण्या

jivatiPatSmall

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत श्रावण महिन्याला एक खास स्थान आहे. जिवतीचा पट आणि कहाण्या या दोन गोष्टींना हा महिनाभर विशेष महत्व प्राप्त होते. शहरातल्या वातावरणात आता पंचांगातल्या महिन्यांना महत्व राहिले नाही आणि जीवनातले सर्व व्यवहार कॅलेंडरबरहुकूम होत असल्यामुळे ते महिनेच बाजूला पडले आहेत असे चित्र दिसत असले तरी निदान ग्रामीण भागात आणि शहरातल्या कांही घरात अजून श्रावण महिना पाळला जातो. पूर्वी तो सरसकट सगळ्यांच्या घरी पाळला जात असे, आता एका बाजूने त्याचे प्रमाण कमी कमी होत आहे असे असले तरी परदेशात गेलेले मराठी लोकसुध्दा त्यातला कांही भाग पाळतात असेही मी पाहिले आहे.

श्रावण महिना लागताच देव्हा-याच्या बाजूला जिवतीच्या पटाची स्थापना होते. पूर्वी तो साध्या कागदावर काळ्या शाईने छापला जात असे. आता तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे गुळगुळीत कागदावर सुबक आणि रंगीत चित्रे असलेले पट मिळतात. हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असलेले श्रीनरसिंह, त्यांच्या समोर हात जोडून उभा असलेला बालक प्रह्लाद, कालियामर्दनाचा प्रसंग, अनेक बालगोपालांसह दोन जिवत्या, हत्तीवर आरूढ झालेले बुध आणि वाघावर स्वार झालेले बृहस्पती यांची चित्रे या पटावर काढलेली असतात. त्यासाठी याच देवतांची निवड कोणी आणि कां केली वगैरे प्रश्नांची उत्तरे मला कधी मिळाली नाहीत. परंपरांच्या मुळाशी जाऊन पोचणे कठीण असते. तिथी आणि वार पाहून यातल्या एकेका देवतेची पूजा करावी असा विचार कदाचित असेल, पण बहुतेक सगळे लोक रोजच या सर्व चित्रांना गंध, फूल, हळद, कुंकू वाहतात. पूर्वीच्या काळी वापरलेल्या साध्या कागदावरचे चित्र महिनाभरानंतर ओळखू येत नसे आणि त्याचे विसर्जन केले जात असे. आजकाल कांही लोक हा पट लॅमिनेट करून घेतात आणि श्रावण महिना संपल्यानंतर स्वच्छ पुसून तो उचलून ठेवतात. पुढच्या वर्षी श्रावण आल्यानंतर (त्या वेळी तो सापडला तर) पुन्हा त्याची पूजा करावी अशी योजना असते, ती किती यशस्वी होते ते माहीत नाही.

श्रावण महिन्यात संध्याकाळी कहाण्या वाचण्याचा प्रघात मात्र आता मागे पडत चालला आहे. माझ्या लहानपणी संध्याकाळी दिवेलागणी झाल्यानंतर घरातली सगळी मुले एकत्र बसून शुभंकरोती आणि परवचा म्हणत असत. श्रावण महिन्यात त्यानंतर कहाणीवाचनाचा कार्यक्रम ठरलेला असे. त्या वेळी घरातली कांही मोठी माणसे सुध्दा येऊन बसत आणि श्रवण करत असत. पहिली कहाणी नेहमी गणेशाची असे. “निर्मळ मळं, उदकाचं तळं, तेथे गणेशाची देवळंरावळं” अशी त्याची सुरुवात केल्यानंतर “संपूर्णाला काय करावे, पसापायलीचे पीठ कांडावे, त्याचे अठरा लाडू करावेत, सहा देवाला द्यावेत, सहा ब्राम्हणाला द्यावेत, सहाचे सहकुटुंब भोजन करावे.” वगैरे सूचना असत. पण रोज वाचूनसुध्दा त्यावर कोणी अंमलबजावणी केलेली मात्र कधी माझ्या पाहण्यात आली नाही.

त्यानंकर रोज त्या दिवसानुसार वेगळी कहाणी वाचायची. रविवारी आदित्यराणूबाईची, सोमवारी शंकराची, मंगळवारी मंगळागौरीची, नागपंचमीला नागोबाची वगैरे. या सर्व कहाण्या “आटपाट नगर होते.” पासून सुरू होत आणि “ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण ” या वाक्याने संपत. त्यात बहुतेक करून तीन चार शब्दांची लहान लहान वाक्ये असत. आटपाट नगर होते झाल्यानंतर “तिथे एक राजा होता. तो खूप शूर होता. त्याला दोन राण्या होत्या.” किंवा “तिथे एक ब्राम्हण रहायचा, तो खूप गरीब होता.” वगैरे सोप्या वाक्यांमधून ती गोष्ट पुढे सरकत असे. त्याचे वाचन करतांना सुध्दा ते एका विशिष्ट लयीत केले जात असे.

कांही कहाण्यांमधून खूप चांगला आशय मनावर बिंबवला जात असे. उदाहरणार्थ शुक्रवारची कहाणी घेता येईल. एका श्रीमंत भावाची दुर्दैवी बहीण अत्यंत गरीब होती. एकदा त्या भावाने रोज सहस्रभोजन घालायला सुरुवात केली, पण आपल्या बहिणीला जेवणाचे आमंत्रण दिले नाही, तिची दैन्यावस्था पाहून लोक आपल्याला नांवे ठेवतील याची भीती त्याला वाटली. आपल्या मुलांच्या पोटात चार चांगले घास जावेत या उद्देशाने अन्नाला मोताद झालेल्या बहिणीने तिथे जायचे ठरवले. पण निमुटपणे रांगेत जाऊन बसलेल्या आपल्या बहिणीच्या आणि तिच्या मुलांच्या अंगावरले कपडे पाहून त्या निष्ठुर भावाला लाज वाटली आणि तिचा राग आला. तिने तिला पुन्हा न यायला सांगितले, पण मुलांनी मामाकडे जायचा हट्ट धरल्यामुळे झालेला अपमान विसरून ती बहीण दुसरे दिवशी पुन्हा सहस्रभोजनाच्या पंक्तीत जाऊन बसली. भाऊ या वेळी जास्तच डाफरला. तिसरे दिवशी तर त्याने तिला हाताला धरून बाहेर काढले.

पुढे तिच्या कुटुंबाला ऊर्जितावस्था आली. आता मात्र भावाने तिला आग्रहाने आपल्याकडे जेवायला बोलावले. तिच्यासाठी पंचपक्वांनांचा बेत केला. ती जेवायला आल्यावर तिला सन्मानाने पाटावर बसवले. त्या बहिणीने आपला भरजरी शेला, गळ्यातला चंद्रहार, हातातल्या गोठ पाटल्या वगैरे एकेक अलंकार काढून त्या पाटावर ठेवले. मग त्यातल्या एकाला जिलबीचा घास दिला, दुस-याला पुरणाच्या पोळीचा, तिस-याला लाडूचा वगैरे. ती हे काय करते आहे असे भावाने विचारताच त्या मानिनीने उत्तर दिले, “आज तू ज्यांना जेवायला बोलावले आहेस त्यांनाच मी हे जेवण भरवते आहे. माझे जेवण मला सहस्रभोजनाच्या दिवशी मिळाले आहे.” त्या बोलण्याने भावाचे डोळे खाडकन उघडले, त्याने बहिणीची क्षमा मागितली आणि आपल्या वागणुकीत सुधारणा केली.

अशा अनेक बोधप्रद गोष्टी या कहाण्यांमध्ये आहेत. पण आजच्या जीवनात घरातली सारी मंडळी तीन्हीसांजेला घरी परतच नाहीत आणि आल्यानंतर टीव्हीसमोर बसलेली असतात. ते मनोरंजन सोडून त्यांनी जुन्या पुराण्या कहाण्या ऐकाव्यात अशी अपेक्षा धरता येणार नाही.

स्व.मोगूबाई आणि श्रीमती किशोरीताई

स्व.मोगूबाई आणि श्रीमती किशोरीताई

मी हा लेख २००८ मधये लिहिला होता. आज श्रीमती किशोरीताईंच्या निधनाचे दुःखदायक वृत्त आले. त्यांच्या स्मृतीला आदरांजली. ………… ४ एप्रिल २०१७.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या विश्वात गुरुशिष्यपरंपरेला अपरंपार महत्व आहे. शिष्याने किंवा चेल्याने अत्यंत लीनवृत्तीने गुरूकडून कणाकणाने विद्या संपादन करायची आणि गुरूजी किंवा उस्तादजी यांनी अगदी श्वासोच्छ्वास आणि शब्दोच्चारापासून संगीताचा संपूर्ण अभ्यास त्याच्याकडून चांगला घोटून घ्यायचा अशा पद्धतीने या दिव्य शास्त्राचा प्रसार पिढ्यानपिढ्या होत आला आहे. संगीतज्ञांच्या घरी जन्माला आलेल्या मुलांना तर त्याचे बाळकडू अगदी जन्मल्यापासूनच मिळायला सुरुवात होते. श्रेष्ठ अशा पितापुत्रांच्या अनेक जोड्या या क्षेत्रात होऊन गेल्या आहेत, पण स्व.मोगूबाई कुर्डीकर आणि श्रीमती किशोरीताई आमोणकर यांची अत्युच्चपदापर्यंत पोचलेली आई व मुलगी यांची अद्वितीय जोडी आहे.

 

स्व.मोगूबाई कुर्डीकर यांचा जन्म गोव्यातील कुर्डी या गांवी १५ जुलै १९०४ रोजी झाला. गोड आवाजाची देणगी मिळालेल्या आपल्या मुलीने संगीताच्या क्षेत्रात चांगले नांव मिळवावे असे त्यांच्या आईला वाटत होते. त्यामुळे त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या गायनाच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आधी स्थानिक देवालयात होणारी भजने वगैरे शिकल्यानंतर तिला एका संगीत नाटक कंपनीत पाठवण्यात आले. नाटकांत कामे करण्यासाठी त्या सांगलीला आल्या. तेथे त्यांची संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांच्याबरोबर भेट झाली. पुढे अल्लादियाखाँसाहेब मुंबईला आल्यावर त्यांच्याबरोबर त्याही मुंबईला आल्या. त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायनाचे शिक्षण घेऊन त्यात प्राविण्य प्राप्त केले. आवाजाची दैवी देणगी, खाँसाहेबांची तालीम आणि कठोर परिश्रम यांच्या योगावर त्या स्वतः उच्च कोटीच्या गायिका झाल्या. देशभरातील अनेक मंचावर त्यांनी आपल्या गायनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. संगीत नाटक अकादमी आणि संगीत रिसर्च अकादमीचे पुरस्कार त्यांना मिळाले भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण ही पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान केला. त्या जशा स्वतः उत्कृष्ट गायिका होत्या तशाच फारच चांगल्या शिक्षिका ठरल्या. पद्मा तळवलकर, कमल तांबे, सुहासिनी मुळगांवकर, बबनराव हळदणकर, अरुण द्रविड यासारख्या त्यांच्या शिष्यगणानेही दिगंत कीर्ती मिळवली आणि जयपूर घराण्याचे नांव पसरवले.
या सर्व शिष्यवर्गात मेरूमणी शोभेल असे सर्वात ठळक नांव त्यांच्या सुकन्या किशोरी आमोणकर यांचे आहे. किशोरीताईंचा जन्म मुंबईत १० एप्रिल १९३१ रोजी झाला. कळायला लागल्यापासूनच त्यांनी आपल्या आईकडून शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली आणि लवकरच जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीत नैपुण्य मिळवले. जयपूर घराण्याचा मूळ बाज कायम ठेऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि गायन कौशल्याच्या जोरावर त्यांनी स्वतःची अशी अद्भुत शैली निर्माण केली आहे. आजच्या जमान्यातल्या त्या सर्वोत्कृष्ट शास्त्रीय गायिका मानच्या जातात. त्या श्रेष्ठ गायिका तर आहेतच, पण बुद्धीमत्ता, विद्वत्ता, व्यासंग आदि अनेक गुण त्यांच्या अंगात आहेत. संगीतशास्त्राचा तसेच संगीतविषयक साहित्याचा त्यांनी खूप अभ्यास केला आहे. त्यावर सखोल विचार केलेला आहे. या सा-या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या गायनात दिसून येतो.

 

शास्त्रीय संगीतातील ख्यालगायन तर त्या करतातच, पण ठुमरीसारखे उपशास्त्रीय संगीत, भावपूर्ण भावगीते
आणि भक्तीरसाने ओथंबलेली भजने त्यांनी गायिलेली आहेत. त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका, कॅसेट्स आणि सीडी निघालेल्या आहेत आणि अफाट लोकप्रिय झाल्या आहेत. त्याद्वारे त्यांचे गायन आता जगभर घरोघरी पोचले आहे. त्यांचा कोठलाही सार्वजनिक कार्यक्रम ऐकायला दुरून येऊन श्रोते गर्दी करतात आणि तो हाउसफुल झाल्याशिवाय रहात नाही.

 

किशोरीताई कांहीशा शीघ्रकोपी आहेत अशी एक समजूत पसरवली गेलेली आहे. त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाच्या वेळी रंगमंचावरील वादक साथीदार, मंचामागील संयोजक आणि समोरील श्रोतृवृंद हे सगळेच त्यांच्या धाकात असल्यासारखे वाटते. त्यांचे गाणे सुरू असतांना कोणाचा मोबाईल वाजता कामा नये, कोणीही त्याचे रेकॉर्डिंग करू नये वगैरे सूचना कडक शब्दात दिल्या जातात आणि त्यांचे कसोशीने पालनही होते. पण एकदा त्यांचे गाणे रंगात आले की सारेजण आपोआपच ब्रम्हानंदात विलीन होऊन जातात. कांहीतरी अद्भुत आनंद घेऊनच प्रत्येक श्रोता सभागृहाच्या बाहेर पडतो.

किशोरीताईंनासुद्धा पद्मविभूषण या पदवीने सन्मानित केले आहे. हा खिताब मिळालेली आई व मुलगी यांची ही एकमेव जोडी असावी. त्याशिवाय त्यांना राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. इतर सन्मानांची तर गणनाच करता येणार नाही. अशी आहे ही माता व कन्या यांची अद्वितीय जोडी.

तेथे कर माझे जुळती – १५ – डॉ.जयंत नारळीकर

 

४९७ जयंत नारळीकर

मी हा लेख २०१३ साली लिहिला होता. त्यानंतर मला डॉ.जयंत नारळीकरांना घेटण्याची संधीच मिळाली नाही.

माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या काही व्यक्तीबद्दल आधीच ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. अशा महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. “मी सुध्दा या थोर लोकांना भेटलो आहे.” अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही, पण त्यांना भेटल्याचा मला निश्चितच आनंद आणि अभिमान वाटतो. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द मी या निमित्याने मांडणार आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. या लेख मालिकेतले हे पंधरावे पुष्प प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्य समर्पित करीत आहे.

मी कॉलेजात शिकत असतांना त्या काळातल्या वर्तमानपत्रांमध्ये एक सनसनाटी बातमी आली होती. ती अशी होती, “एका तरुण भारतीय, त्यातही महाराष्ट्रीय शास्त्रज्ञाने आइन्स्टाईनला खोटे ठरवले.” त्या काळात आल्बर्ट आईन्स्टाईन हा जगातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ गणला गेला होता, कदाचित आजसुध्दा असेल. त्याच्या आधी सर आयझॅक न्यूटनला सर्वात मोठा मानले जात होते, पण आईन्स्टाईनने न्यूटनला खोटे पाडल्यामुळे तो सर्वात मोठा शास्त्रज्ञ झाला. या न्यायाने पाहता हा तरुण महाराष्ट्रीय शास्त्रज्ञ आईन्स्टाईनपेक्षाही मोठा म्हणजे जगातला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ ठरायला पाहिजे असा तर्क काही लोक लावत होते. या शास्त्रज्ञाचे नाव होते डॉ.जयंत नारळीकर. त्यानंतर वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरेंमध्ये जयंतराव नारळीकरांचा परिचय छापून येत राहिला. त्यांचा जन्म कुठे आणि कधी झाला, शिक्षण कुठे झाले, त्यांचे थोर आईवडील कोण आहेत, त्यांनी केलेले विक्रम आणि त्यांचे कार्य वगैरेंचा भरणा त्या वृत्तांतांमध्ये असायचा. डॉ.जयंत नारळीकरांनी लावलेला शोध त्यांचा एकट्यांचा नव्हता, सुप्रसिध्द खगोलशास्त्री आणि जयंतरावांचे गुरू डॉ.फ्रेड हॉइल यांच्या जोडीने दोघांनी मिळून एक नवा सिध्दांत मांडला होता आणि तो त्या जोडीच्या नावाने प्रसिध्द झाला होता. ही माहिती पुढे छापून आली. त्या काळातल्या वार्ताहरांनासुध्दा विज्ञान या विषयाचे वावडे असायचे. यामुळे हॉइल आणि नारळीकरांनी नेमका कसला शोध लावला होता हे काही मला त्या काळातही समजले नाही. पहायला गेल्यास आईन्स्टाईनने तरी काय सांगितले होते आणि त्याने न्यूटनची कोणती चूक दाखवून दिली होती याचाही मला पत्ता नव्हताच, त्यामुळे त्यातले काय खरे आणि काय अतिरंजित हे समजून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

डॉ.जयंत नारळीकर हे पुण्याला येणार आहेत, त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे आणि त्यात ते भाषण करणार आहेत असे समजल्यावर आमचा आनंद गगनात मावला नाही. त्या दिवशी आम्ही काही मित्र त्या जागी जाऊन पोचलो. तरुण, तेजस्वी, हंसतमुख आणि अत्यंत सालस असे जयंतराव मंचावर आले आणि एका जादूई स्मितहास्यानेच त्यांनी सर्व प्रेक्षकांची मने काबीज केली. त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल शक्य तितक्या सोप्या भाषेत ते बराच वेळ बोलले. पण त्यात आईन्स्टाईनला खोटे ठरवण्याचा उल्लेख कुठे आला नाही. अंतराळाविषयीचे माझे त्या वेळचे ज्ञान फारच तोटके होते. आपल्या पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, मंगळ, गुरू, शनी, नेपच्यून वगैरे इतर ग्रहांसमवेत पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तसेच ती स्वतःभोवती फिरते. त्यामुळे आकाशात रात्री दिसणारे अगणित तारे आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतांना दिसतात. पण खरे तर ते जागच्या जागीच असतात. एवढेच शाळेत शिकलेले खगोलशास्त्र मला तेंव्हा ठाऊक होते. या असंख्य ता-यांचेसुध्दा अनेक प्रकार असतात, त्यांनाही आयुष्य़ असते, त्यात बालपण, यौवन आणि वार्धक्य अशा अवस्था असतात अशा प्रकारच्या शक्यतासुध्दा कधी मनात आल्या नव्हता. त्यामुळे डॉ.जयंत नारळीकर यांनी त्यांच्या व्याख्यानात त्याविषयी काय काय सांगितले त्याचा अर्थ काही मला नीटसा समजला नाही. फक्त त्यांची बोलण्याची शैली, शब्दोच्चार, वाक्यांची फेक, एकादा मुद्दा मांडण्यातले कौशल्य असे गुण जाणवले आणि त्यावर सर्वांसोबत मीसुध्दा टाळ्या दिल्या. इतर श्रोत्यांच्याही बाबतीत कदाचित असेच घडले असल्याची शक्यता आहे. मंदपणे लुकलुकणा-या ता-यांच्या बाबतीत जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये खूप संशोधन केले जात आहे, तेसुध्दा एका जागी स्थिर नसून सतत एकमेकांपासून दूर दूर जात असतात असे कोणी म्हणतात, पण नारळीकरांचे मत यावर वेगळे आहे. इतपत त्यांच्या सांगण्याचा उलगडा झाला.

त्यानंतरच्या काळात डॉ.जयंत नारळीकर हे नाव वर्तमानपत्रांमध्ये येत राहिले ते आजतागायत येतेच आहे. त्यांचे शोधनिबंध कुठे प्रसिध्द झाले, त्यांना कोणती पदवी मिळाली, कुठला सन्मान मिळाला वगैरेची माहिती त्यात येत असे. तरुण वयातच ते आंतरराष्ट्रीय पातळीवरले तज्ज्ञ गणले जात आहेत हे त्यावरून दिसून येत होते. ते भारतात परत येणार आहेत असे वाचण्यात आले. ते आमच्या अणुशक्ती खात्यातल्या टीआयएफआरमध्ये संशोधन करायला आले आहेत असे एक दिवस समजले तेंव्हा आता लवकरच आपल्याला त्यांना प्रत्यक्ष भेटता येईल असे वाटून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांची संस्था मुंबईतच असल्यामुळे एकाद्या कार्यक्रमात त्यांना भेटण्याची संधी मिळेल असे वाटले होते, पण अशी संधी अगदी अनपेक्षितपणे आणि अनपेक्षित जागी समोर चालून आली.

मी नोकरीला लागल्यापासूनच ऑफिसच्या कामासाठी नेहमी रेल्वेच्या पहिल्या वर्गात प्रवास करत होतो आणि पदोन्नती झाल्यानंतर विमानाने जाऊ लागलो होतो, पण त्या काळातला पगार बेताचाच असल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात रेल्वेचा दुसरा वर्गच परवडण्यासारखा होता. त्यामुळे आम्ही सगळे मिळून कुठेही जातांना साध्या स्लीपरकोचनेच जात होतो. पत्नी आणि मुले याबद्दल किंचित असूया दाखवत असत. त्यांनाही एकदा वरच्या दर्जाचा प्रवास घडवून आणायचा असे मी ठरवले आणि त्याकाळी नव्यानेच सुरू झालेल्या वातानुकूलित स्लीपर क्लासची तिकीटे काढली. आम्ही सर्वजण महालक्ष्मी एक्सप्रेसच्या थंडगार डब्यातल्या आमच्या खणात जाऊन बसलो. गाडी सुरू व्हायला वेळ असल्यामुळे पडदा लावून घेतला नव्हता. त्यामुळे आमच्या समोरूनच एक ओळखीचा चेहेरा पुढे जातांना दिसला आणि आमच्या बाजूच्याच केबिनमध्ये त्यांनी प्रवेश केला. मी पॅसेजमध्ये जाऊन हळूच बाजूला पाहिले तर तिथे साक्षात डॉ.जयंत नारळीकर त्यांच्या पत्नीसह बसले होते. आमचे आयडॉल असे इतक्या जवळ आले होते आणि आम्हाला डिस्टर्ब करायला किंवा अडवायला तिथे इतर कोणीही नव्हते हे पाहिल्यावर आम्हाला राहवले जाणे शक्यच नव्हते. त्यांना जागेवर बसून स्थिरस्थावर होण्यासाठी दोन तीन मिनिटे दिली आणि त्यांनी पडदा लावून घ्यायच्या आधीच आम्ही दोघे त्यांच्या केबिनमध्ये जाऊन दाखल झालो.

आम्ही तर त्यांना कित्येक वर्षे आधीपासून ओळखत होतो, फक्त आमची ओळख त्यांना करून दिली. अशा वेळी काय बोलावे हे त्या क्षणी सुचतच नाही. मग मुंबईतले हवामान आणि भारतातले व अणुशक्तीखात्यातले वातावरण वगैरेंवर जुजबी चर्चा केली, त्यांनीही आमची थोडी औपचारिक विचारपूस केली, हस्तांदोलन केले, प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि निरोप घेतला. आपल्या केबिनमध्ये येऊन आम्ही झोपून गेलो. ते दोघे कोल्हापूरपर्यंत जाणार होते, पण आम्हाला मिरजेलाच उतरायचे होते. आम्ही त्यावेळी त्यांना डिस्टर्ब करणे योग्य नव्हते.

डॉ.जयंत नारळीकर आणि मी एकाच सरकारी खात्यात काम करत असल्यामुळे एकादी कमिटी किंवा सबकमिटी, वर्किंग ग्रुप, टास्क फोर्स वगैरेंमध्ये किंवा सेमिनार, कॉन्फरन्स, वर्कशॉप, ट्रेनिंग प्रोग्रॅम वगैरेंमध्ये भेटण्याची शक्यता होती, निदान कशाचे तरी उद्घाटन, कोणाचा निरोप समारंभ, एकाद्या सहका-याच्या घरातल्या लग्नाचे रिसेप्शन अशा जागी तरी आमची गाठ पडेलच असे वाटले होते. आमच्या खात्यातल्या ज्या लोकांशी माझे प्रत्यक्ष काम पडले नव्हते अशा अनेक उच्चपदस्थांबरोबर या निमित्याने माझा परिचय झाला होता. पण नारळीकरांच्या बाबतीत मला अशी संधी मिळालीच नाही. भारतात परतण्याच्या आधीच ते इतक्या वरच्या पातळीवर जाऊन पोचलेले होते की इथे आल्यानंतर ते या बाबतीत कदाचित थोडेसे उदासीन राहिले असावेत. डिपार्टमेंटमध्ये त्यांनी कधीच हाय प्रोफाईल प्रेझेन्स ठेवली नसावी. त्यांच्यासाठी पुण्याला आयुका ही वेगळी संस्था स्थापन केली गेली आणि तिथल्या संचालकपदावर ते गेले आहेत असे एक दिवस समजले.

मी पुन्हा कधी नारळीकरांना प्रत्यक्ष भेटू शकलो नसलो तरी निरनिराळ्या प्रसारमाध्यमांमध्ये मी त्यांना नेहमी पहात आलो आहे. अॅस्ट्रॉनॉमी या अत्यंत स्पेशलाइज्ड विषयामधील उच्च दर्जाच्या संशोधनाखेरीज विज्ञान विषयाचे शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार यावर ते खूप काम करत आले आहेत. सर्वसामान्य वाचकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक मनोरंजक पुस्तके लिहिली. लोकप्रिय विज्ञान (पॉप्युलर सायन्स) तसेच विज्ञानकथा (सायन्स फिक्शन) या दोन्हींमध्ये त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी लिहिलेली पुस्तके लोकांना खूप आवडली. त्यांनाही पुस्कार मिळाले. त्यांनी लिहिलेले अनेक लेख वर्तमानपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये छापून आले. टेलिव्हिजनवर त्यांचे नेहमी दर्शन घडत आले, विविध प्रसंगी त्यांच्या मुलाखती घेऊन त्या टीव्हीवर दाखवण्यात आल्या. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण यासारखे सर्वोच्च सन्मान त्यांना दिले गेले, याशिवाय इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. ज्योतिष म्हणून भविष्य वर्तवण्याचे शास्त्र (अॅस्ट्रॉलॉजी) या विषयाला सायन्स या सदराखाली आणण्याचे आटोकाट प्रयत्न एका मोठ्या राजकीय पुढा-याने केले. त्यांची सत्ता जिथे चालत होती त्या भागात ते अंमलातही आणले असेल. डॉ.जयंत नारळीकर यांनी याबाबतचे वैज्ञानिक विचार परखडपणे सांगितले आणि चर्चांमधून ते प्रभावीपणे मांडले. त्यावर उलटसुलट चर्चा होत राहिली. अशा प्रकारे ते सतत प्रकाशझोतात राहिले.

डॉ.जयंत नारळीकर यांनी दिलेल्या अनेक मुलाखतींपैकी काही गोष्टी माझ्या लक्षात राहिल्या आहेत. ज्या काळात भारताला महासंगणक मिळू नये असे प्रयत्न प्रगत राष्ट्रांमध्ये चालले होते त्या काळात घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला गेला “आता तुम्ही काय करणार? काँप्यूटरशिवाय आपला विषय विद्यार्थ्यांना कसा शिकवणार?”
त्यावर ते गंमतीने म्हणाले, “मला फक्त एक फळा आणि खडू मिळाला तरी माझा विषय शिकवायला तेवढे पुरेसे आहे.”
त्यांना एकदा विचारले गेले, “तुमच्या या संशोधनाचा आम जनतेला काय फायदा मिळणार आहे?”
त्यावर त्यांनी हसत हसत सांगितले, “खरं सांगायचं तर मुळीसुध्दा नाही. मी आकाशातल्या अतीदूरस्थ ता-यांचे निरीक्षण करत असतो. माझ्या या कामामुळे कोणालाही लगेच अन्न, वस्त्र, निवारा मिळण्याची काही शक्यता नाही. पण मूलभूत विज्ञानामधील प्रगतीमुळेच माणसाला अनेक उपयुक्त असे शोध लागतात आणि त्यांच्या उपयोगाने त्याचे जीवन सुसह्य किंवा समृध्द बनते. नासासाठी विकसित केल्या गेलेल्या अनेक टेक्नॉलॉजीज आता रोजच्या जीवनावश्यक वस्तू बनवण्यासाठी कामाला येत आहेत.”

नारळीकरांचा सहभाग असलेल्या एका चर्चासत्रामध्ये विश्वाची उत्पत्ती आणि पसारा यावर चर्चा झाली होती. एका हिंदुत्ववादी विदुषीनेही त्यात भाग घेतला होता. शास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग, निरीक्षणे आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष याबद्दल नारळीकर शास्त्रीय माहिती देत होते, तर ती महिला कुठकुठल्या पोथ्यांचे संदर्भ देऊन भृगु, भारद्वाज वगैरे ऋषींनी काय काय सांगून ठेवले आहे हे सांगत होती. “पुराणकाळातले नारद मुनींसह आणखीही काही महापुरुष मंत्रशक्तीने विश्वभर संचार करत होते आणि हे सायंटिस्ट लोक आता कुठे चंद्रापर्यंत जाऊन पोचले आहेत.” अशा प्रकारचे तारे तिने तोडल्यावर “यावर आपले काय म्हणणे आहे?” असे मुलाखत घेणारीने नारळीकरांना विचारले. त्यांनी जरासुध्दा विचलित न होता म्हंटले, “इट ईज नॉट फेअर टु कम्पेअर दीस फिंग्ज. माझे सांगणे आणि यांचे म्हणणे याची सांगड घालता येणार नाही. प्रत्यक्ष केलेल्या आणि जगमान्य झालेल्या संशोधनावरून मी बोलतो आहे. त्यातले प्रत्येक विधान कशाच्या आधारावर केले आहे हे मी सांगू शकतो. या विद्वान बाई फक्त पोथीतल्या गोष्टी (पुराणातली वांगी) सांगत आहेत. (त्याच्या मागे कसलेच स्पष्टीकरण नाही.)”

आज डॉ.जयंत नारळीकर यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचे वाचले. त्यांना वाढदिवसानिमित्य आणि शतक पूर्ण करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

Saturday, July 20, 2013
———————————————————————–

तेथे कर माझे जुळती – १४ – शंतनुराव किर्लोस्कर

तेथे कर माझे जुळती – १४ – शंतनुराव किर्लोस्कर (पूर्वार्ध)

%e0%a5%aa%e0%a5%af%e0%a5%a6-slk-blog1

हा लेख मी तीन वर्षांपूर्वी  (२०१३ मध्ये)  लिहिला होता. 

माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या एकेका व्यक्तीबद्दल ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. “या थोर लोकांबरोबर माझी ओळख होती.” अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्यावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द मी या निमित्याने मांडणार आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. या लेख मालिकेतले हे चौदावे पुष्प प्रख्यात उद्योगपती स्व.शंतनुराव किर्लोस्कर यांना समर्पित करीत आहे.

पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातल्या दर्जेदार आणि लोकप्रिय मराठी मासिकांमध्ये किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर या मासिकांना मानाचे स्थान होते. या तीन्ही मासिकांचे प्रकाशन किर्लोस्कर कुटुंबीयांकडून होत असे. किर्लोस्करांच्या कारखान्यांसंबधी काही महत्वाचे व़ृत्तांतसुध्दा या मासिकांमध्ये संक्षिप्तपणे दिले जात असत. एकाद्या नव्या कारखान्याचे किंवा त्यातल्या नव्या भागाचे उद्घाटन, एकादा बक्षिस समारंभ, स्नेह संमेलन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, माननीय स्थानिक किंवा परदेशी पाहुण्यांची भेट अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये उद्घाटक, वक्ते, प्रमुख पाहुणे, यजमान अशा निरनिराळ्या भूमिकांमध्ये श्री.शंतनुराव किंवा एस.एल. किर्लोस्कर यांचे दर्शन या पानांमधून नेहमी होत असे, त्या प्रसंगी त्यांनी दिलेल्या संदेशाचा गोषवारा दिलेला असे. त्या काळात मी वयाने लहान असलो तरी मासिकांची पाने सहज चाळता चाळता अशा बातम्यांकडेही माझी नजर वळत असे. त्यायोगे एक अद्वितीय आणि महान व्यक्ती अशी श्री. शंतनुराव किर्लोस्कर यांची प्रतिमा या वाचनामधून मनात तयार होत गेली.

मी शाळेत असतांनाच स्व.जमशेदजी टाटा यांचे अल्पचरित्र माझ्या वाचण्यात आले होते. त्यांनी लोखंड आणि पोलाद तयार कऱण्यासाठी भारतातला पहिला मोठा कारखाना उभारला होता. जमशेदपूर आणि टाटानगर अशी दोन शहरे त्यांच्या नावाने वसवली गेली होती. टाटांच्या कारखान्यात रेल्वे इंजिनासारखी अजस्त्र यंत्रे तयार केली जात होती, मुंबई महानगराला होणारा विजेचा पुरवठा टाटा कंपनीकडून केला जात होता, त्यासाठी बांधलेली धरणे त्यांच्या मालकीची होती, शिवाय तेल, साबण आणि मीठ यासारख्या रोजच्या उपयोगाच्या वस्तूही टाटा या नावाने बाजारात विकल्या जात होत्या. त्यामुळे त्या काळात टाटा कंपनी भारतातली सर्वात मोठी कंपनी होती यात काही शंका नव्हती. बिर्लांचे नाव मी ऐकले होते, पण त्या नावाने कोणतीही वस्तू स्थानिक बाजारात दिसत नव्हती. सेठ घनश्यामदास बिर्ला हे महात्मा गांधींचे निकटवर्ती होते असेही ऐकले असल्यामुळे ते बहुतेक चरखा, पंचा, धोतर वगैरेंचे उत्पादन करत असावेत असा एक तर्क मनात येत होता. त्या काळच्या बिर्ला यांच्या विशाल साम्राज्याची मला सुतराम कल्पना नव्हती. वालचंदनगर नावाचेही एक गाव ठाऊक होते, पण वालचंद ग्रुपबद्दल काही माहिती नव्हती. सिंघानिया, वाडिया, महिन्द्र वगैरेंची नावेदेखील ऐकली नव्हती, अंबानी, मित्तल, नारायणमूर्ती, प्रेमजी वगैरेंचा अद्याप उदय झाला नव्हता. यामुळे शालेय जीवनात असतांना माझ्या लेखी तरी टाटांच्या खालोखाल किर्लोस्करांचेच स्थान होते. शंतनुराव त्यांचे मुख्य असल्यामुळे तेही खूप ग्रेटच असणार यात शंका नव्हती.

पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजवर त्या काळी किर्लोस्कर या नावाची एक प्रकारची छाया पसरलेली असायची. पुण्यातच ख़डकी, हडपसर आणि कोथरूड या भागात त्यांचे तीन कारखाने होते आणि टिळक रोडवर मोठे ऑफिस होते. आम्हाला एक दोन वर्षांनी सीनीयर असलेली अनेक मुले किर्लोस्करांच्या यातल्या एकाद्या कंपनीमध्ये नोकरीला लागली होती. आपल्या मित्रांना भेटायला ती हॉस्टेलवर आली तर त्यांच्या बोलण्यात आपल्या कंपनीचे खूप गुणगान येत असे. आमच्या कॉलेजातले बरेचसे ज्यूनियर लेक्चरर्स, डेमॉन्स्ट्रेटर्स वगैरे लोक किर्लोस्करांकडे नोकरीची संधी शोधत असत आणि ती मिळाली की लगेच कॉलेज सोडून तिकडे जात असत, असे वारंवार घडत असे. आमच्या काही वर्गबंधूंचे काका, मामा किंवा मावस, आते वगैरे भावंडे किर्लोस्कर कंपनीत नोकरीला असत आणि त्यांच्याकडूनसुध्दा फक्त चांगलेच रिपोर्ट येत असत. किर्लोस्कर समूहाच्या अनेक कंपन्या आहेत आणि प्रत्येकीचे व्यवस्थापन निरनिराळी मंडळी करतात एवढे सामान्यज्ञान वाढलेले असले तरी या सर्वांवर शंतनुरावांचा वचक आहे आणि सगळ्या कंपन्यांचे तेच प्रमुख कर्ताधर्ता होते याबद्दल कोणालाही शंका नव्हती. त्या सर्वच कंपन्या आपापल्या क्षेत्रात करत असलेल्या घोडदौडीचे श्रेय शंतनुरावांना मिळत असे. त्याचप्रमाणे तिथे काम करत असणा-या कर्मचारी वर्गामधले शिस्त आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यालाही तेच मुख्यतः कारणीभूत असल्याचे बोलले जात होते.

इंजिनियरिंग शिकत असतांना केलेल्या शैक्षणिक सहलीमध्ये दक्षिण भारतातले मोठमोठे कारखाने आणि पॉवर स्टेशन्स पाहण्याची संधी मिळाली. उत्तर भारताची सहल पाकिस्तानबरोबरच्या लढाईमुळे रद्द झाली, पण त्या निमित्याने त्या कारखान्यांची माहिती मिळाली होती. यावरून एवढे लक्षात आले की किर्लोस्कर उद्योगसमूह मोठा असला तरी त्यांच्याहूनही मोठे अनेक कारखाने भारतात आहेत. सर्व प्रकारची कारखानदारी पाहता त्यातले किर्लोस्करांचे स्थान मला आधी वाटत होते तसे शिखराजवळ नव्हते. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात मात्र त्यांचेही नाव आघाडीवर होते.

पदवी मिळाल्यानंतर कसेही करून परदेशी म्हणजे अमेरिकेला जायचे हे माझ्या बॅचमधल्या बहुतेक पुणेकर विद्यार्थ्यांचे पहिले स्वप्न असायचे आणि श्रीमंत बापांची पोरे व्यवस्थित प्लॅनिंग करून ते साकार करून घेत असत. पण मध्यम वर्गीयांच्या मुलांच्या बाबतीत ते खूपच कठीण असल्यामुळे किर्लोस्करांच्या कंपनीत नोकरी धरणे हे त्यानंतर दुस-या क्रमांकावर असलेले स्वप्न ते पहात आणि त्याची पूर्तता होतही असे. मला स्वतःला सुध्दा किर्लोस्करांच्या एका कंपनीकडून इंटरव्ह्यूचा कॉल आला तेंव्हा खूप आनंद झाला होता, पण त्याच दिवशी माझ्या काही पुण्यातल्या मित्रांनाही इंटरव्ह्यूसाठी बोलावले होते. इंटरव्ह्यूमध्ये सगळेच पास झाले असते तर त्यातून निवड करतांना त्या स्थानिक कँडिडेट्सनाच अधिक पसंती मिळाली असती. पुण्यात रहाण्यासाठी माझे घर नसल्यामुळे माझ्या निवडीची शक्यता त्या मानाने कमी झाली असती. योगायोगाने त्याच दिवशी इंटरव्ह्यूसाठी मला अणुशक्तीखात्याच्या प्रशालेकडूनही बोलावणे आले. त्या नोकरीत हॉस्टेलमध्ये राहण्याचीही सोय असल्यामुळे घराचा प्रश्न सुद्धा सुटणार होता. या दोन आमंत्रणांचा विचार करता मला दुसरा पर्याय बरा वाटला आणि मी तिकडे जायचा निर्णय घेतला. पण किर्लोस्कर उद्योगाबद्दल मनात जी एक अनुकूल जागा तयार झालेली होती ती तशीच राहिली. मला मिळालेली संधी गमावल्याबद्दल कधी कधी हुरहूरही वाटायची. पुढे अणुशक्तीखात्यात मन रमल्यानंतर ती मावळली.
—————————————————————

तेथे कर माझे जुळती – १४ – शंतनुराव किर्लोस्कर (उत्तरार्ध)

%e0%a5%aa%e0%a5%af%e0%a5%ab-slk-blog2

शंतनुराव किर्लोस्कर यांचे नाव आणि फोटो मला वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्हीवर वरचेवर दिसत असत आणि त्याबरोबर येणारा मजकूर वाचून मनामधली त्यांची प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल होत गेली. अत्यंत हुषार, धोरणी, कार्यक्षम, कर्तबगार, तत्वनिष्ठ असूनही प्रॅक्टिकल, सज्जन, विचारवंत, कल्पक, दूरदर्शी, मनमिळाऊ, लोकप्रिय, प्रामाणिक, निर्भिड, निर्भय वगैरे अनेक विशेषणे त्यातल्या एकेका बातमीतून किंवा लेखामधून माझ्या मनातल्या त्यांच्या व्यक्तीरेखेशी जोडली जात होती. त्यांची पर्सनॅलिटी, बोलणे, चालणे, वागणे वगैरे सगळे रुबाबदार होते, माझ्या मनावर आपोआपच त्यांची छाप पडत होती. त्यांनी वार्ताहरांना दिलेल्या मुलाखतींमधले काही मुद्दे दीर्घकाळ लक्षात राहण्यासारखे होते.

एकदा एका मुलाखतकाराने त्यांना विचारले की पुण्याला त्यांचे तीन चार कारखाने असतांना त्यातल्या कामगारांसाठी वसाहत बांधायचा विचार त्यांनी का केला नाही? त्याला अत्यंत समर्पक उत्तर देतांना त्यांनी सांगितले, “आम्हाला इंजिनियरिंगमधले जास्त समजते म्हणून आम्ही या क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. इमारतींचे बांधकाम, त्याचा मेंटेनन्स, इस्टेट मॅनेजमेंट वगैरेतले आम्ही तितकेसे जाणत नाही आणि ते शिकून घेण्याची आम्हाला इच्छा नाही, आमचा अमूल्य वेळ आम्हाला त्यात घालवायचा नाही. या कारणासाठीच आम्ही कारखान्यांसाठी जागांची निवड करतांना पुणे आणि बंगलोरसारखी मोठी शहरे निवडली. या ठिकाणी घरे बांधून देण्याचे काम जाणणारे अनेक व्यावसायिक आहेत. त्यांचे काम त्यांनाच करू देत. आमच्या कामगारांना ती घरे विकत किंवा भाड्याने घेण्यासाठी आम्ही अर्थसहाय्य करू शकतो, पण आम्हाला स्वतःला त्या उद्योगात पडायचे नाही.”

“मग किर्लोस्करवाडी तरी कशाला वसवली?” या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते, “तो काळ वेगळा होता. जे कामगार त्या कारखान्यात काम करण्यासाठी येतील त्यांच्या निवासाची चांगली सोय करणे तेंव्हा आवश्यकच होते. त्या काळात नवा कारखाना उभा करण्यासाठी मिळालेल्या ओसाड जमीनीवर शून्यामधून नवे विश्व उभे करायचे होते. या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी जे जे काही आवश्यक होते ते सगळे माझ्या वडिलांना करावे लागले आणि त्यांनी ते आनंदाने केले. पण आजही आम्ही त्याच ठिकाणी उभे रहायला हवे का? आज उपलब्ध असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि आमच्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग कशात होणार आहे हे पाहून आम्हाला त्या दिशेने पुढे जायला पाहिजे ना?”

किर्लोस्करांचे उद्योगविश्व सांभाळत असतांनाच ते पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याची विचारपूर्वक तयारी शंतनुरावांनी केली. त्या व्यापातली दैनंदिन व्यवहार पहाण्याची आणि जबाबदारी संभाळण्याची एकेक कामे त्यांनी पुढच्या पिढीकडे सोपवली आणि धोरण ठरवणे, मार्गदर्शन करणे वगैरेसारख्या मूलभूत मुद्यांवर ते अधिक लक्ष देऊ लागले होते. त्या काळातल्या एका वार्ताहरपरिषदेत एका रिपोर्टरने त्यांना खवचटपणे विचारले, “तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी तुम्ही प्रोफेशनल मॅनेजर्स का ठेवत नाही?”

शंतनुरावांनी त्यालाच उलट विचारले, “असे तुम्हाला कुणी सांगितले?” ते पुढे म्हणाले, “आमच्या कंपन्यांच्या टॉप मॅनेजमेंटमधले सारेजण उच्चशिक्षित आहेत. इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, फायनॅन्स वगैरेंमध्ये त्यांनी जगप्रसिध्द संस्थांमधून शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतले आहे. आधुनिक काळातली सगळी मॅनेजमेंट टूल्स वापरण्यात ते निष्णात आहेत. प्रोफेशनल मॅनेजर होण्यासाठी आणखी काय असायला पाहिजे?”

यावर काही उत्तर येण्याआधीच शंतनुरावांनी हल्ला चढवला, “एकादी आगबोट बुडण्याची भीती वाटली तर सगळ्यात आधी त्या बोटीवरचे उंदीर पळ काढतात, तशा पळपुट्या किंवा कुणीतरी मोठे गाजर दाखवले की तिकडे धाव घेणा-या आधाशी लोकांनाच तुम्ही प्रोफेशनल मॅनेजर म्हणणार का? बिकट परिस्थिती आली तरी आमचे लोक तसे घाबरून पळून जाणार नाहीत, तिला खंबीरपणे तोंड देतील. शिवाय आणखी कुठे आणखी काय जास्तीचे मिळते का हे शोधत ते फिरत नाहीत म्हणून त्यांचे प्रोफेशनल स्किल कमी ठरते का?”

या उत्तराने गांगरून जाऊन तो पत्रकार गारेगार पडला. “हे सगळे गुण किर्लोस्कर आडनावाच्या लोकांमध्येच असतात का?” असा दुसरा कुजकट प्रश्न त्याने विचारलाही असता तरी त्यालाही शंतनुरावांनी समर्पक उत्तर दिलेच असते. आपण जे काही करतो ते बरोबरच आहे याची खात्री आणि आत्मविश्वास त्यांच्या रोखठोक बोलण्यात व्यक्त होत असे. गुळमुळीत उत्तर देणे किंवा प्रश्नाला बगल देणे असे ते सहसा करत नसावेत.

शंतनुराव किर्लोस्करांना प्रत्यक्ष पाहण्याची पहिली संधी मला गुणवत्ता या विषयावरील एका कॉन्फरन्स किंवा सेमिनारमध्ये मिळाली. अर्थातच त्या वेळी मी प्रेक्षकांमध्ये बसलो होतो आणि ते प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर विराजमान झाले होते. संस्थेचे पदाधिकारी आणि उद्योगपती, सनदी अधिकारी, राजकीय नेते वगैरे इतर काही मान्यवर त्यांच्यासोबत बसले होते. सूत्रसंचालक, स्वागताध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी आपापल्या भाषणात गुणवत्तेचे अमाप कौतुक करून “आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट टॉप क्वालिटी असली पाहिजे”, “आमच्या कारखान्यात तयार होणारी प्रत्येक वस्तू बेस्ट क्वालिटीचीच असते.” वगैरे वारेमाप विधाने केली. शंतनुरावांनी मात्र त्यांच्या ‘की नोट अॅड्रेस’ची सुरुवात अशी केली. “क्वालिटी या शब्दाचा अर्थ फक्त बेस्ट क्वालिटी असा होत नाही.” एवढे बोलून त्यांनी एक छोटासा पॉज घेतला आणि व्यासपीठावरील इतर मंडळींवर नजर टाकली. “आतापर्यंत जे काही बोलले गेले ते कसे निरर्थक होते.” असा त्या नजरेचा अर्थ सुजाण श्रोत्यांना त्या नजरेमधून समजला. कुठल्याही कारखान्यात जी वस्तू किंवा जे यंत्र तयार होते ते कशासाठी वापरायचे असते हा त्याचा उद्देश ठरलेला असतो आणि त्या कारणासाठी ते विकत घेणा-या ग्राहकांच्या तशा अपेक्षा असतात. त्या पूर्ण होतील अशी खात्री देणे म्हणजे ‘गुणवत्ता’. प्रत्येक बाबतीत ‘बेस्ट क्वालिटी’चा हट्ट धरण्यापेक्षा खात्रीलायक ‘अॅप्रोप्रिएट क्वालिटी’ आणणे हा त्याच्या इंजियरिंगचा गाभा असला पाहिजे. या दृष्टीने स्टँडर्डायझेशन करून प्रत्येक उत्पादनाचे वर्गीकरण करून त्यातल्या प्रत्येक ग्रेडचे गुणधर्म ठरवले जातात आणि ते जाणून घेण्यासाठी कोणकोणत्या तपासण्या करायच्या हे ठरवले जाते. आपले उत्पादन त्या तपासण्यामधून शंभर टक्के पास होत असले तर त्याचा अर्थ त्याची गुणवत्ता समाधानकारक आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये साध्या पोलादापेक्षा अनेक बाबतीत चांगले गुण असतात, पण गरज नसतांनासुध्दा ‘बेटर क्वालिटी’ म्हणून साध्या पोलादाऐवजी सरसकट सगळीकडे स्टेनलेस स्टील वापरले तर त्यामुळे त्या वस्तूंची किंमत जेवढी वाढते त्या प्रमाणात त्यांची गुणवत्ता वाढत नाही आणि त्याची गरजही नसते किंवा त्यात तोटे असतात. सोने हा काही दृष्टीने सर्वोत्कृष्ट म्हणजे ‘बेस्ट क्वालिटी’चा धातू असला तरी यंत्रांचे भाग सोन्याचे करून काहीच फायदा नाही, उलट ते यंत्र चालणारसुध्दा नाही. शंतनुरावांनी अशा प्रकारची अनेक उदाहरणे देऊन ‘क्वालिटी’ किंवा ‘गुणवत्ता’ या संकल्पनेचा अर्थ इतक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगितला की सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन त्यांचे व्याख्यान ऐकत राहिले.

आमच्या एका प्रकल्पासाठी काही अतिविशिष्ट यंत्रसामुग्री तयार करण्याचे कठीण काम किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीला दिले होते. श्री.संजय किर्लोस्कर त्या आव्हानात्मक कामगिरीकडे जातीने लक्ष ठेवत असल्यामुळे त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर आमची अधूनमधून त्यांच्याशी चर्चा होत असे. या निमित्याने आमच्या भेटी होत असतांना शंतनुरावांशी एकदा प्रत्यक्ष भेटण्याची मनापासूनची इच्छा आम्ही व्यक्त केली. संजय यांनीही विचार विनिमय करून त्या भेटीची तारीख आणि वेळ ठरवली. त्यानुसार माझे वरिष्ठ अधिकारी आणि मी पुण्याला जाऊन पोचलो. आम्हाला मॉडेल कॉलनीतल्या त्यांच्या ‘लकाकि’ बंगल्यात नेण्यात आले. शंतनुरावांचे वडील आणि किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आद्य संस्थापक कै.लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या नावाची आद्याक्षरे घेऊन त्या बंगल्याचे नामकरण केले असणार. तो टुमदार बंगला सुंदर आणि नीटनेटका दिसत होता. त्या परिसरातल्या आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये कोण रहात होते आणि ते किती मोठे होते याची मला काही कल्पना नाही, पण जगप्रसिध्द उद्योगपती शंतनुराव या बंगल्यात रहातात असे त्याचे वेगळेपण दाखवणारी कोणतीही भपकेबाज ठळक खूण मात्र मला तरी तिथे दिसली नाही.

लहानपणापासून मला शंतनुराव हिमालयासारखे उत्तुंग वाटत होते आणि मी त्यांच्या पायथ्याशी तरी कधी पोचेन असे वाटले नव्हते. इतक्या वर्षांपासून मला स्वप्नवत वाटणारी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली होती, पण त्यासाठी मी काहीच तयारी केली नव्हती. वयाने मी त्यांच्या वयाच्या अर्ध्याहूनही लहान होतोच, ज्ञान, अनुभव, यश, समृध्दी, सामर्थ्य अशा कुठल्याही बाबतीत त्यांच्या पायाच्या बोटाच्या नखाचीसुध्दा मला सर आली नसती. त्यामुळे त्यांच्यासमोर गेल्यावर काय बोलावे हेच मला समजत नव्हते, चुकून एकादा वावगा शब्द तोंडातून बाहेर पडला तर जन्मभर पस्तावा करावा लागणार अशी धाकधूक मनात वाटत होती. अनुभवी लोकांना विचारून घेऊन बोलण्यासारखी दोन चार वाक्ये तयार करावी एवढेही मला आधी सुचले नव्हते. ‘लकाकि’ बंगल्यात प्रवेश करतांना माझ्या मनात असे विचार येत होते. बंगल्याच्या दिवाणखान्यात जाताच आम्हाला शंतनुरावांचे दर्शन झाले. ऐंशीच्या घरात पोचल्यानंतरसुध्दा त्यांचा चेहेरा तितकाच तेजःपुंज होता. आम्ही शक्य तेवढे वाकून त्यांना अभिवादन केले. त्यांनी आम्हाला समोर बसवून घेतले. संजयने आमची औपचारिक ओळख करून दिली.

चेर्नोबिलच्या आधीच्या त्या काळात अणुशक्तीविरोधाचे नकारात्मक वातावरण तयार झालेले नव्हते, पण पोखरण होऊन गेल्यानंतर भारतावर अनेक प्रतिबंध लादण्यात आलेले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही संपूर्ण स्वावलंबी होण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. देशाच्या स्वावलंबनाबाबत शंतनुराव अनुकूल होते, पण सार्वजनिक क्षेत्राबद्दल मात्र त्यांची मते फारशी अनुकूल नसावीत. असा आमचा अंदाज होता. अशा उलटसुलट परिस्थितीत ते कितपत आमच्या पाठीशी आहेत याबद्दल आमच्या मनात संभ्रम होता. तरीही त्यांनी आम्हाला भेटण्याची संधी दिली ही आशेची बाजू होती. माझ्या बॉसने आमचा प्रॉजेक्ट आणि त्यात किर्लोस्करांचा सहभाग यावर थोडक्यात माहिती दिली. त्यांच्याकडे आधीपासूनच तेवढी माहिती नक्कीच होती, पण संभाषणाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने ते सुसंगत होते. आमच्या क्षमतेवर त्यांचा किती विश्वास होता हे कळायला मार्ग नव्हता, त्यामुळे आम्ही हातात घेतलेले काम आमच्या आवाक्यात आहे की नाही याबद्दल ते कदाचित साशंक असण्याची शक्यता होती. आमच्या प्रकल्पाच्या आर्थिक बाजूवर त्यांनी विचारलेल्या खोचक प्रश्नांना आमच्याकडे समाधानकारक उत्तरे नव्हती. त्यामुळे देशाची आन, बान, शान, इभ्रत आणि नवे तंत्रज्ञान विकसित करणे वगैरे तात्विक मुद्यांवर आम्ही जास्त भर दिला. या प्रयत्नात किर्लोस्कर उद्योगाच्या महत्वपूर्ण सहभागाची प्रशंसा केली. पण यामधून त्या उद्योगाला तात्कालिक किंवा भविष्यकाळात नेमका कोणता लाभ होणार आहे याबद्दल ते विचारणा करत राहिले. या प्रयत्नामुळे भारताची इभ्रत वाढली आणि किर्लोस्कर उद्योगसमूहाचा लौकिक वाढला तरी त्यामधून त्यांची यंत्रे निर्यात करण्याच्या संधी वाढण्याची शक्यता ते आजमावून पहात असावेत. तोपर्यंत ते आमचे लहानसे काम सोडून वैश्विक पातळीवर विचार करू लागलेले होते. अशा प्रकारचा पंधरा वीस मिनिटे वार्तालाप आणि चहापान करून झाल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. त्यांच्याकडून पाठीवर शाबासकीची थाप किंवा डोक्यावर हात ठेवणारे वरदान आमच्या पदरात पडले नसले तरी त्यांचे जवळून दर्शन घडले होते, त्यांच्याशी थोडासा वार्तालाप झाला होता, त्यांच्यासमोर आमची बाजू मांडायची संधी मिळाली होती. माझ्या व्यक्तीगत दृष्टीने पाहता हेच खूप महत्वाचे होते आणि जन्मभर लक्षात ठेवण्यासारखे होते.

कॅक्टस अँड रोजेस या नावाने शंतनुरावांनी लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये त्यांना आलेले कटु व चांगले अनुभव त्यांनी लिहिले आहेत. त्यातले एक वाक्य एपीजे अब्दुल कलाम यांनी शंतनुरावांच्या शतसांवत्सरिक समारंभात भाषण करतांना उद्धृत केले होते. ते असे आहे. ‘when productively used capital and materials, men and machines, yield results in proportions to the skill and brains of the user’. साधनसामुग्री, मनुष्यबळ आणि यंत्रे या सर्वांचा कौशल्य आणि बुध्दीमत्ता यांच्या सहाय्याने उपयोग करून घेतला तर त्यामधून चांगला विकास होतो, प्रगती होते. यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि ते साधण्याचा प्रयत्न ते सदोदित करत राहिले होते. त्यांच्या शतसांवत्सरिक समारंभाचे जे आमंत्रण मला आले होते, त्यात त्यांच्या यापूर्वी मला माहीत नसलेल्या एका अद्भुत पैलूचे दर्शन झाले. ते म्हणजे शंतनुराव एक उत्कृष्ट चित्रकारसुध्दा होते. त्यांनी काढलेल्या रंगीत चित्रांचा संच मला या निमंत्रणासोबत मिळाला होता. त्यातल्या काही चित्रांचे अंश या लेखाच्या वर दिले आहेत. त्यांच्या आठवणीने फक्त हातच जोडले जात नाहीत तर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावे असे वाटते.

पितृपक्ष आणि बेचाळीस पिढ्या

सध्या पितृपक्ष चालू आहे. भाद्रपद महिन्याच्या दुस-या पंधरवड्याला हे नाव दिले गेले आहे. आई आणि वडील यांचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्या तिथीला दरवर्षी त्यांचे ‘श्राध्द’ करायचे आणि पूर्वीच्या पिढ्यांमधील पितरांसाठी पितृपक्षातल्या एकाद्या दिवशी ‘पक्ष’ घालायचे अशी पध्दत पूर्वीच्या काळी होती. त्या दिवशी विशिष्ट मंत्रोच्चाराने करायचा एक खास विधी असे आणि पिंडदान केल्यानंतर ते भाताचे गोळे कावळ्यांना खायला दिले जात असत किंवा नदीत सोडून दिले जात असत. श्राध्दपक्षाला जेवलेल्या भटांच्या, कावळ्यांच्या, नदीतल्या जलचरांच्या पोटात गेलेले अन्न आपल्या स्वर्गवासी पितरांना मिळते आणि त्यावर त्यांचा वर्षभर निभाव लागतो अशी त्यामागील श्रध्दा होती.

आमच्या घरी परंपरेने तशी पध्दत चालत आली होती आणि मी लहान असतांना दरवर्षी माझे वडील नेमाने श्राध्द पक्ष करत असत. हा विधी प्रत्यक्ष पहायला मात्र घरातल्या मुलांना बंदी असे. त्यामुळे तो विधी सांगणारे स्पेशॅलिस्ट पुरोहित घरात आले की आम्हा मुलांना घराच्या माडीवर पिटाळले जाई आणि हाक मारून खाली बोलावीपर्यंत कोणीही जिना उतरायचा नाही अशी तंबी दिली जात असे. तसेच दंगा करायचा नाही, आमच्या आरडाओरडीचा आवाज खाली येता कामा नये वगैरे कडक नियम असत. माडीवर बसून शक्य तितक्या शांतपणे पत्ते, सोंगट्या वगैरे खेळण्यात किंवा पुस्तके वाचण्यात आम्ही वेळ घालवत रहायचे. श्राध्दपक्षाचे विधी एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर मुलांना हाक मारली जाई. तेंव्हा आम्ही सगळे धडाधडा जिन्यातून खाली उतरून तिथे एका पाटावर मांडून ठेवलेल्या गोष्टींना वाकून नमस्कार करत असू आणि पुन्हा माडीवर जाऊन आपला खेळ पुढे चालवत असू. जेवणखाण करून ब्राह्मण निघून गेल्यानंतर विधी केलेल्या जागेची पूर्ण सारव सारव करून झाल्यानंतर आमची पंगत मांडली जात असे. वर्षभरात एरवी कधीही खाण्यात न येणारे कांही विशिष्ट पदार्थ त्या दिवसाच्या जेवणात असत. ते चविष्ट असले तरी कुठल्याही मंगल प्रसंगी करणे निषिध्द होते.

मी लहान असतांना मला या सगळ्या गोष्टींबद्दल थोडे कुतूहल वाटत असे, पण कोणीच त्याच्याबद्दल काही सांगत नसे. मोठा झाल्यावर माझा त्यावर  विश्वास राहिलेला नसल्यामुळे मी त्याबद्दल कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही. आमच्या भावंडात मी सर्वात लहान असल्यामुळे परंपरेने सुध्दा माझ्यावर ही जबाबदारी आली नव्हती आणि त्याची चौकशी करावी असेही मला कधी वाटले नाही. माझ्यासाठी हा विषय कायमचा बंद झाला होता. पण या वर्षी पितृपक्षामध्ये आपण आपल्या दिवंगत नातेवाइकांच्या आठवणी एकमेकांना सांगाव्यात आणि एक नव्या प्रकारची श्रध्दांजली त्यांना समर्पण करावी अशी सूचना मला सहा वर्षांपूर्वी आलेल्या एका पत्रात होती. त्या वेळी मी ही कल्पना उचलून धरली आणि काही जवळच्या व्यक्तींची शब्दचित्रे रंगवायला सुरुवात केली. त्यातली काही निवडक शब्दचित्रे या पंधरवड्यात देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. एक वय होऊन गेल्यानंतर भूतकाळात जाऊन मन रमवणे बरे वाटते. घडून गेलेल्या घटनांपासून आपण फारसा बोध घेतला नसला, आपल्याला भेटलेल्या थोर व्यक्तींचे आपण फारसे अनुकरण केले नसले तरी इतरांनी (त्यांना वाटले तर) ते करावे, त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी वगैरे उद्देशसुध्दा त्याला जोडले जातात. यामुळेच त्यांची भाराभर चरित्रे लिहिली जात असावीत.

मला या ठिकाणी त्याबद्दल लिहायचे नाही. इथे एक वेगळाच मुद्दा मांडावयाचा आहे. पितरांचे पक्ष घालतांना माता आणि पिता या दोन्ही बाजूच्या बेचाळीस पिढ्यांमधील लोकांना त्यांच्या नावाने आवाहन केले जाते असे मला आलेल्या त्या पत्रामध्ये लिहिले होते. ‘बेचाळीस पिढ्यांचा उध्दार’ हा वाक्प्रचार जरा वेगळ्या अर्थाने रूढ असला तरी त्यातही बेचाळीस पिढ्यांचा उल्लेख आहे. मी सहज विचार केला. माझ्या आई आणि वडिलांची पूर्ण माहिती मला आहे. पण त्यांच्या आईवडिलांना मी पाहिलेच नाही, फक्त त्यांच्याबद्दल ऐकले आहे. स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या क्रमाने नाव लिहिण्याची पध्दत असल्यामुळे वडिलांच्या वडिलांचे नाव ठाऊक आहे. पण आईच्या माहेराचा उल्लेख कागदोपत्री कुठेच होत नसल्यामुळे तिच्या आई वडिलांची नावे सांगायला आज कोणीच उपलब्ध नाही. लाइफ एक्स्पेक्टन्सी वाढली असल्यामुळे आणि मुलांची संख्या एक दोनवर मर्यादित ठेवली जात असल्यामुळे आजकालच्या बहुतेक मुलांना त्यांचे आजी आजोबा भेटतात. काही सुदैवी मुलांची त्यांच्या पणजोबा आणि पणजीशी सुध्दा भेट होते. पण त्यापलीकडे काय? किती लोकांना त्यांच्या आठ आठ खापरपणजोबांची माहिती असते?

भारतात तरी (निदान अजूनपर्यंत) प्रत्येकाला फक्त एक आई वडील असतात. त्या दोघांचे आई व वडील म्हणजे दोन आजोबा आणि दोन आज्या असतात. या चौघांचे आई व वडील धरून चार पणज्या आणि चार पणजोबा होतात, म्हणजेच आठ खापरपणजोबा आणि आठ खापरपणज्या होतील. चार पाच नातवंडे असलेले अनेक आजोबा माझ्या पाहण्यात आहेत. त्यातल्या काही जणांना एकाद दुसरे पणतवंडही झाले आहे. पण चार पणजोबा आणि चार पणज्या असलेले कोणतेही मूल मी अजून पाहिलेले नाही. त्यामुळे आपल्या आधीच्या तिस-या पिढीमधली एकाददुसरी व्यक्तीच असली तर कुणाच्या माहितीची असते. त्याच्या पलीकडे सगळा अंधार असतो.

बेचाळीस पिढ्या म्हणजे त्यात किती माणसे येतील? लहानपणी एक बोधकथा ऐकली होती. त्यात एक राजा खूष होऊन आपल्या भाटाला काय हवे ते मागायला सांगतो. तो हुषार भाट म्हणतो, “माझे लई मागणे नाही. आज मला फक्त तांदळाचा एक दाणा दे. उद्या दोन, परवा चार असे ते रोज दुपटीने वाढवत जा. असे फक्त एक महिना कर.” राजाला वाटले की हा भाट मूर्ख आहे. त्याने भरसभेत त्याची मागणी मान्य केली. पण दोन, चार, आठ, सोळा, बत्तीस, चौसष्ठ असे करत हा आकडा इतका वाढला की महिनाअखेर राजाचे कोठार रिकामे करूनसुध्दा तेवढे तांदळाचे दाणे पुरवणे शक्य झाले नाही. त्याचप्रमाणे दोन गुणिले दोन असे बेचाळीस वेळा केले तर जेवढी मोठी संख्या येईल तेवढी अख्ख्या जगाची लोकसंख्यासुध्दा कधीच अस्तित्वात नव्हती. अर्थातच हे सगळे पितर वेगवेगळे होते ही कल्पनाही चुकीची आहे. तीन चार पिढ्यांनंतर संपर्क रहात नाहीत आणि एकाच व्यक्तीचे वंशज एकमेकांशी विवाहबध्द होतात. काही जातीजमातींमध्ये आतेमामेभावंडे किंवा मामाभाची यांची लग्ने ठरवतात. त्यामुळे त्यांचे पितर वेगवेगळे असायचा प्रश्नच नसतो.

थोडक्यात सांगायचे तर बेचाळीस पिढ्या वगैरे समजुतींना काही अर्थ नाही. आपण फार फार तर मागच्या आणि पुढच्या दोन तीन पिढ्या पाहू शकतो. वैयक्तिक बाबतीत आपली माहिती तेवढीच असते. देशाचे राजघराणे वगैरेंचा इतिहास अनेक पिढ्यांपर्यंत पोचतो, पण तो सुध्दा फार फार तर दहा बारापर्यंत असेल. तेवढ्यात एकादी क्रांती होते आणि राजघराणेच बदलते. पुराणकाळातल्या रघु किंवा यदु यासारख्या वंशांची लांबच लांब वंशावळ सांगितली जाते, पण ते शेवटी पुराणच असते नाही कां?

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी – ४

काशी आणि रामेश्वर ही सर्वात मोठी पवित्र देवस्थाने आहेत असे मी लहानपणी ऐकले होते. त्यांच्या खालोखाल पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरची अंबाबाई, गाणगापूरचा दत्त वगैरे देवस्थानांमध्ये पुळ्याच्या गणपतीचे स्थानही होते. मी पुण्याला असतांना कसबा पेठेतील गणपती आणि मुंबईला आल्यानंतर टिटवाळ्याच्या गणपतीचे महात्म्य ऐकले. प्रभादेवीचा सिध्दीविनायक हा तर आमचा नेहमीचा सुखकर्ता दुखहर्ता झाला. अडचणींच्या किंवा आनंदाच्या बहुतेक प्रसंगी आम्ही त्याचे दर्शन घ्यायला जात असू. या स्थानांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात गणपतीची आठ प्रमुख देवस्थाने आहेत आणि त्यांना अष्टविनायक म्हणतात हे मात्र लहानपणी कधीच माझ्या कानावर आले नव्हते. यातील बहुतेक स्थाने खेडोपाड्यात आहेत. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागातील रस्त्यांची परिस्थिती दारुण होती आणि वाहतुकीच्या साधनांचा अभाव होता. त्यामुळे माझ्या माहितीत तरी कोणीही या अष्टविनायकांची यात्रा केल्याचे मी ऐकले नव्हते. पण १९७९ साली अष्टविनायक नावाचा एक चित्रपट आला आणि त्याने अमाप लोकप्रियता मिळवली. त्या चित्रपटाच्या द्वारे अष्टविनायकांना भरपूर प्रसिध्दी मिळाली. त्यातील कथानायकाला जसा गणेशकृपेचा लाभ मिळाला तसा आपल्याला व्हावा या इच्छेने असंख्य भाविकांना अष्टविनायकाची यात्रा करण्याची प्रेरणा मिळाली. सर्व यात्रा कंपन्यांनी त्यासाठी खास पॅकेज टूर्स बनवल्याच, इतर अनेक लोकसुद्धा अशा यात्रांचे आयोजन करायला लागले. माझे एक जवळचे आप्त त्यांची नोकरी सांभाळून सप्ताहांतात (वीक एंड्सना) भाविक यात्रेकरूंना अष्टविनायकांचे दर्शन घडवून आणत होते.

या चित्रपटाला जे प्रचंड यश मिळाले त्यात त्यातील गाण्यांचा फार मोठा वाटा आहे. यातील तीन अजरामर गाणी आजदेखील गणेशोत्सवात जागोजागी ऐकायला मिळतात.

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता,
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

ओंकारा तू, तू अधिनायक , चिंतामणी तू, सिद्धिविनायक,
मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक,
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता ।।
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन ।
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण ।
सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा ।।
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

पं. वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायिलेले हे गोड गाणे भक्तीगीतांच्या पठडीतले आहे. त्यात थोडी गणेशाची स्तुती करून त्याची कृपादृष्टी आपल्याकडे वळावी, आपले जीवन उजळून निघावे अशी प्रार्थना केली आहे. अशा प्रकारची कांही गाणी मी आधी लिहिलेल्या गणेशोत्सवावरील लेखात चित्ररूपामध्ये दिली होती. पं.वसंतराव देशपांडे यांनीच गायिलेल्या पुढील गाण्यात शास्त्रीय संगीतातील यमन रागाचे विलोभनीय दर्शन घडवले आहे. हे गाणे एकादे नाट्यगीत वाटावे इतके क्लासिकल ढंगाचे आहे. यात गणपतीच्या अनेक रूपांचे वर्णन आणि स्तुती यांना प्राधान्य आहे आणि मागणे जरा कमी आहे.

प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया ।।

विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरीत तिमीरहारका ।
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा ।
वक्रतुंड ब्रम्हांड नायका, विनायका प्रभूराया ।।

सिद्धी विनायक, तूच अनंता, शिवात्मजा मंगला ।
सिंदूर वदना, विश्वाधीशा, गणाधिपा वत्सला ।
तूच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधू तराया ।।

गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसूता ।
चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता ।
रिद्धी सिद्धिच्या वरा, दयाळा, देई कृपेची छाया ।।

अष्टविनायक या सिनेमाच्या शीर्षकगीताने अनेक उच्चांक मोडले असावेत. जवळ जवळ वीस मिनिटे चालणारे (तरीही कंटाळा न आणणारे) इतके मोठे दुसरे एकही गाणे मला तरी माहीत नाही. हे गाणे अनेक गायक गायिकांनी मिळून गायिले आहे. त्यातील कडव्यांमध्ये लोकगीतांचे अनेक रंग पहायला मिळतात. सुरुवातीला अष्टविनायकांची नावे एका शार्दूलविक्रीडित वृत्तामधील श्लोकात दिली आहेत. हा श्लोक अनेक वेळा लग्नामधील मंगलाष्टकातसुध्दा म्हंटला जातो. किंबहुना कुर्यात सदा मंगलम् या अखेरच्या चरणावरून तो मंगलाष्टकांसाठीच लिहिला असावा असे वाटते. त्यानंतर एका कडव्यात गणपती या देवतेचे गुणगान केल्यानंतर प्रत्येक स्थानी असलेल्या मंदिराचे सुरेख वर्णन तसेच त्या विशिष्ट स्थानासंबंधीच्या आख्यायिका, तिथली वैशिष्ट्ये वगैरे एकेका कडव्यात दिली आहेत. ग्रामीण भाषेत सुलभ अशा वाक्यरचनेत केलेले हे वर्णन अप्रतिम आहे. नानांनी म्हणजे स्व.जगदीश खेबूडकरांनी हे इतके मोठे आणि सुरेख गीत एका रात्रभरात लिहून दिले असे सचिन याने अलीकडेच टीव्हीवरील एका कार्यक्रमात सांगितले. ते ऐकून आश्चर्याला पारावार उरला नाही. ठराविक वृत्त किंवा छंदामध्ये बध्द नसलेल्या या गाण्यातील कडव्यांना अनिल अरुण यांनी लोकगीतामधील निरनिराळ्या चाली लावल्या आहेत. यातले त्यांचे कौशल्य आणि त्याला दिलेली विविध वाद्यसंगीताची जोड सगळे काही लाजवाब आहे. अशा प्रकारचे गाणे क्वचितच जन्माला येत असते.

संस्कृत श्लोक

स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरसिद्धिदम्‌ ।
बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिंतामणीं थेवरम्‌।
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरम्‌ ।
ग्रामोरांजणस्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌ ।।

अष्टविनायकांचे वर्णन 

जय गणपती गुणपती गजवदना ।
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना ।
कुडी झाली देऊळ छान, काळजात सिंहासन ।
काळजात सिंहासन, मधोमधी गजानन ।
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना ।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा ।।१।।

गणपती, पहिला गणपती, मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर ।
अकरा पायरी हो अकरा पायरी हो, नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर ।
शोभा साजरी हो शोभा साजरी हो. मोरया गोसाव्यानं घेतला वसा ।।२।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, दुसरा गणपती, थेऊर गावचा चिंतामणी ।
कहाणी त्याची लई लई जुनी ।
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं सा-यांनी ।
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यानी ।
रमा बाईला अमर केलं वृंदावनी ।
जो चिंता हरतो मनातली चिंतामणी ।
भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा ।।३।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, तिसरा गणपती, सिद्धिविनायका तुझं सिद्धटेक गाव रं ।
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं ।
दैत्यामारु कैकवार गांजलं हे नगर।
विष्णुनारायण गाई गणपतीचा मंतर ।
टापूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं ।
लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर ।
चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर ।
मंडपात आरतीला खुशाल बसा ।।४।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, चौथा गणपती, पायी रांजणगावचा देव महागणपती ।
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती ।
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन ।
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण ।
किती गुणगान गावं किती करावी गणती ।
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा ।।५।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, पाचवा गणपती, ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई मूर्ती ।
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती ।
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा ।
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा ।
चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर ।
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा ।।६।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, सहावा गणपती, लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी ।
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव ।
दगडामंदी कोरलाय्‌ भक्तिभाव ।
रमती इथे रंका संगती राव ।
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो ।
लेण्याद्री गणानी पाठी आशिर्वाद केला हो ।
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो ।
किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो ।
खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब ।
वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट ।
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा ।
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा ।
दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा ।।७।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

सातवा गणपती राया, महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर ।
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर ।
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर ।
सपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं ।
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ ।
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो ।
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो ।
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा ।।८।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

आठवा आठवा गणपती आठवा,
पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा ।
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक ।
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे ।
चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती ।
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा ।।९।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

अखेर गणपतीच्या आठ नावांचा गजर
मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ।
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ।
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ।
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया ।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया ।।
. . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी – ३

कोळीगीते हा एक अत्यंत आकर्षक असा लोकगीतांचा प्रकार आहे. त्यातल्या ठेक्यावर आपोआप पावले थिरकायला लागतात. मल्हारी, एकवीरा आई वगैरे कोळी मंडळींची दैवते आहेत आणि असली तर बहुधा त्यांचीच स्तुती कोळीगीतांमध्ये असते. पण कोळीगीतांसारख्या ठेक्यावर आणि ठसक्यात गायिलेले गणपतीचे हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते आणि अजूनही आहे.

तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा ।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष ।
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणुनी हा परामर्श ।
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दु:खाची, वाचावी कशी मी गाथा ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ ।
गुळ-फुटाणे-खोबरं नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ ।
कर भक्षण आणि रक्षण तूच पिता अन्‌ तूच माता ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे ।
हाल ओळख साऱ्या घरांचे, कधी येतील दिवस सुखाचे ?
सेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आशीर्वाद आता ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

या गाण्यातील कारुण्याचा भाव हृदयद्रावक आहे. वर्षभरातून एकदा गोड अन्नाचा स्पर्श होतो आहे आणि को सुध्दा गुळ-फुटाणे-खोबरं नि केळं यांचा. केवढी दैन्यावस्था ? पण अशा परिस्थितीतसुध्दा मायबाप गजाननावर अमाप श्रध्दा आहे, यातून तोच बाहेर काढेल, दुःखांचा नायनाट करेल आणि सुखाचे दिवस आणेल असा विश्वास आहे.
——

मराठी कोळीगीते आणि गुजराथी गरबा या दोघांचीही आठवण करून देणा-या ठेक्यावरले एक गाणे एका काळी लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचले होते आणि अजूनही गणेशोत्सवात ऐकायला हमखास मिळते. ते आहे.

अशी चिक्क मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्यांची ग ।
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा हो ।।

या चिक्कमाळेला रेशमी मऊ दोरा ग ।
मऊ रेशमाच्या दौऱ्यात नवरंगी माळ ओविली ग ।। १।।

अशा चिक्कमाळेला हिऱ्याचे आठआठ पदर गं ।
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली गं ।। २।।

मोरया गणपतीला खुलुन माळ शोभली ग ।
अशी चिक्क माळ पाहून गणपती किती हसला गं ।। ३।।

त्यानं गोड हासूनी गोड आशीर्वाद दिला गं ।
चला करू या नमन गणरायाला गं ।। ४।।

या गाण्याचा आशय अगदी साधा आहे. एक अनमोल अशी हि-यामोत्यांची माळ करून गणपतीला घातली, ती त्याला शोभून दिसली आणि त्याने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला वगैरे गोष्टी इतक्या सहजपणे सांगितल्या आहेत की ते गाणे ऐकायला मजा वाटते आणि ठसकेदार उडत्या चालीमुळे गुणगुणावेसे वाटते.
—-

सगळ्या कामांची सुरुवात गणेशाचे स्मरण करून करायची पध्दत असली तरी मराठी नाटकांच्या सुरुवातीला नटवराला नमन करण्याचा पायंडा आपल्या आद्य नाट्याचार्यांनी पाडला आहे. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या संगीत शाकुंतल या नाटकातली नांदी आजही ऐकायला मिळते.

पंचतुंड नररुंडमाळधर पार्वतीश आधीं नमितो ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥

यात नटेश्वर शंकराला आधी वंदन केल्यानंतर लगेच विघ्नविनाशक गणपतीचे आवाहन करून आपले नाटक निर्विघ्नपणे पार पडावे अशी त्याला विनंती केली आहे. ‘सबकुछ बाळ कोल्हटकर’ या पध्दतीने त्यांनी सादर केलेल्या नाटकांमध्ये ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. गणेशावर श्रध्दा हा या नाटकाचा विषयच असल्यामुळे त्याच्या शीर्षकगीतात गणपतीची भक्ती येणारच. हे गीत आहे.

गजाननाला वंदन करूनी, सरस्वतीचे स्तवन करोनी,
मंगल शिवपद मनी स्मरोनी. सद्भावाने मुदित मनाने,
अष्टांगांची करूनि ओंजळ, वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

अभिमानाला नकोच जपणे, स्वार्थासाठी नकोच जगणे,
विनम्र होऊन घालव मनुजा, जीवन हे हर घडी ।।
वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

विघ्न विनाशक गणेश देवा, भावभक्तीचा हृदयी ठेवा,
आशिर्वाद हा द्यावा मजला, धन्य होऊ दे कुडी ।।
वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

पार्वती नंदन सगुण सागरा, शंकर नंदन तो दुःख हरा,
भजनी पुजनी रमलो देवा, प्रतिमा नयनी खडी ।।
वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

या गीतात गणपतीविषयी भक्तीभाव आहेच, शिवाय निस्वार्थ, निरभिमान आणि विनम्र वागणूक ठेवावी असा हितोपदेशसुध्दा आहे.

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)