आजीचे घड्याळ (कालगणना) – पूर्वार्ध – भाग १ ते ६

संपादन दि. २२-०९-२०२० : या लेखमालेचे पहिले सहा भाग एकत्र केले.

——————————–

आजीचे घड्याळ (कालगणना) – १

aajeecheghadyal_01
भाग १ – नकाशा

दहा बारा वर्षापूर्वीच्या काळातली ही गोष्ट आहे. एका जवळच्या परिचिताला भेटायला मी त्याच्या घरी गेलो होतो, त्या वेळेस तो घरी नव्हता. त्याच्या शाळकरी मुलाने म्हणजे अमोलने दरवाजा उघडला. “आई व बाबा थोड्याच वेळात येणार आहेत. तोंवर थोडा वेळ बसा.” असे मला सांगितले, प्यायला पाणी दिले आणि तो पुन्हा आपल्या अभ्यासाला लागला. मी पाहिले की त्या वेळी तो भूगोलाचा गृहपाठ करीत होता. भारताच्या एका कोऱ्या नकाशावर कोळशाच्या खाणी, लोखंडाचे कारखाने, कुठलीशी नदी आणि तिच्यावर बांधलेल्या धरणाची जागा वगैरे खुणा करून दाखवत होता. तो गृहपाठ संपल्यावर त्याने वह्यापुस्तके नीट जागेवर ठेवली आणि तो माझ्यासमोर येऊन बसला.

मी त्याला विचारले,”तुला भूगोल विषय आवडतो का रे?”
तो म्हणाला, ”हो. कुठल्या जागी काय आहे याची खूप माहिती त्यातून आपल्याला मिळते.”
“तुझ्याकडे अजून एखादा कोरा नकाशा आहे कां?”
“आहेत ना. नेहमीच ते लागतात ना? म्हणून मी भरपूर नकाशे आणून ठेवले आहेत.”
“एक घेऊन येशील? आईबाबा येईपर्यंत आपण एक खेळ खेळू.”
तो एक नकाशा घेऊन आला. मी त्याला एका गांवाचे नांव सांगायचे, त्याने ते गांव नकाशात दाखवायचे. मग त्याने एक जागा विचारायची ती मी त्याला दाखवायची असे थोडा वेळ खेळून झाले.
त्यानंतर मी त्याला विचारले, ”तू नुकताच कोठल्या गांवाला जाऊन आलास?”
तो म्हणाला, ”मागल्या महिन्यात आम्ही सगळे डेक्कन क्वीनने पुण्याला गेलो होतो. इतकी मजा आली!”
मी म्हंटले, ”अरे वा! मग आता आज पुण्याला जायला निघालेली दख्खनची राणी या वेळी कुठपर्यंत गेली असेल ते दाखव.”
त्याने मनाशी थोडा विचार केला आणि खंडाळ्याच्या घाटाची जागा नकाशात दाखवली आणि मला म्हणाला, ”आता तुम्ही लेटेस्ट कुठे गेला होता ते दाखवा.”
“मी परवाच संध्याकाळच्या विमानाने कलकत्याहून परत आलो. या वेळेपर्यंत ते विमान नागपूरच्या आसपास इथे कुठे तरी उडत असणार.” असे सांगत मी नकाशावर खूण केली.
एवढ्यात त्याचे आईबाबा परत आले. आल्या आल्या वडिलांनी सांगितले, “आम्ही आमच्या गुरूंकडे गेलो होतो. एका मुलाबद्दल त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन घ्यायचं होतं. तुम्हाला फार वेळ थांबावं लागलं कां? कंटाळा आला नाही ना?”
मी म्हंटलं, “नाही हो. मी अमोलबरोबर मजेत खेळत बसलो होतो. त्या निमित्ताने माझ्या भूगोलाची उजळणी झाली.”
तेवढ्यात आई उद्गारली, “आमचे गुरूमहाराज मोठे सिद्धपुरुष आहेत हो! कुंडली पाहून माणसाच्या भूत, भविष्य, वर्तमानाचं त्रिकाल ज्ञान त्यांना समजतं.”
मी सहजपणाने म्हंटले, “खरंच? त्या कुंडलीत कुठकुठली भुतं दिसताहेत ते मी जरा पाहू कां ?”
यावर ते गृहस्थ जाम भडकले. “अहो, हे कुठल्याही सोम्यागोम्याचं काम नाही बरं कां! त्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागते तेंव्हा कुठं सिद्धी प्राप्त होते.”
“आमचे गुरू महाराज त्यासाठी हिमालयात जाऊन एकवीस वर्षे फक्त दुर्वा खाऊन आणि गोमूत्र पिऊन राहिले होते. माहीत आहे?” त्यांच्या सौ.ने दुजोरा दिला. हिमालयाच्या बर्फात त्यांना या गोष्टी तरी कोठून मिळणार होत्या म्हणा! तेवढ्यावर न थांबता त्यांनी मला गंभीर परिणामांचा इशारासुद्धा दिला, “तुम्ही इथं जी कांही मुक्ताफळं उधळलीत ती त्यांना अंतर्ज्ञानाने कळल्याशिवाय राहणार नाहीत. अहो, आकाशातले सगळे ग्रह त्यांना आधीन आहेत बरं! त्यातला एकादा जरी त्यांनी तुमच्या राशीला लावून दिला तर तुमची धडगत नाही हो.”
आता मलासुद्धा हे सगळे निमूटपणे ऐकून घेणे शक्य नव्हते. या लोकांच्या डोक्यात थोडा तरी उजेड पाडणे अत्यंत आवश्यक होते. मी म्हंटले, “अहो मी तुमच्या आदरणीय गुरूमहाराजांच्याबद्दल अवाक्षरसुद्धा बोललेलो नाही. फक्त भूतकाळात होऊन गेलेल्या घटना या कुंडलीमध्ये दिसतात कां? तेवढे मला पहायचे आहे. तुम्हाला तर त्या माहीत आहेतच. त्यामुळे मला कांही दिसलंच तर ते बरोबर की चूक ते तुम्हालाही लगेच समजेल. मी त्यावर वाद घालणार नाही. मी कांही भविष्य सांगणार नाही आहे. त्यामुळे त्यातल्या खऱ्याखोट्याचा प्रश्नच येत नाही. मग हा प्रयोग करून पहायला काय हरकत आहे?”

मी जास्तच आग्रह धरल्यावर त्या व्यक्तीच्या कुंडलीमधील त्याचे नांव, गांव, जन्मतारीख इत्यादी सर्व तपशील व्यवस्थितपणे झांकून फक्त कुंडलीची चौकट त्यांनी माझ्यासमोर धरली. त्यातले त्रिकोन चौकोनात मांडलेले १ ते १२ आंकडे आणि कुठेकुठे लिहिलेली र चं मं असली अक्षरे यातून मला काडीचाही बोध होणे शक्यच नाही याची त्यांना दोनशे टक्के खात्री होती.

. . . . . . . . . (क्रमशः)

आजीचे घड्याळ (कालगणना) – २

भूतकालनिवेदन

त्या गृहस्थाने माझ्यासमोर धरलेली कुंडली थोडी पाहून होताच मी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि खर्जाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. “रात्रीचा पहिला प्रहर आहे. सगळीकडे अंधार पसरला आहे.”
“अहो काका, तो बघा बाहेर अजून उजेड दिसतो आहे.” अमोल उद्गारला.
“मी या जन्मकुंडलीमध्ये पाहून त्या मुलाच्या जन्मकाळातली स्थिती सांगतो आहे. मध्ये बोलून माझी एकाग्रता भंग करू नकोस. चंद्र अजून मावळायचा आहे. पण आकाशात ढगांची गर्दी असल्यामुळे फारसे चांदणे दिसत नाही. अधून मधून विजा चमकून एकादी पावसाची सर येते आहे. ढगांच्या गडगडाटाशिवाय दुसरेही कांही आवाज ऐकू येत आहेत. झांजा आणि टाळ्या वाजवून बरेच लोक आरत्या करताहेत. त्यात मोठ्या घंटांचा आवाज नाही. याअर्थी त्या आरत्या देवळात नसून घरोघरी चालल्या आहेत. सगळीकडे आरास केलेली दिसते आहे. हो, हा गणेशोत्सवच साजरा होत आहे. कांही जागी गौरींचे मुखवटेसुद्धा दिसत आहेत. इथपर्यंत बरोबर आहे ना?”

दोघांनीही थोड्या आश्चर्यानेच होकारार्थी माना डोलावल्या. मी पुढे सांगायला लागलो, “उत्सव सुरू आहे, पण त्यात नेहमीचा उत्साह दिसत नाही. सगळे लोक कसल्या तरी भीतीच्या दाट छायेत वावरत आहेत. या मुलाच्या घरातील वातावरण तंग आहे. जवळची कोणी व्यक्ती भूमीगत झालेली आहे किंवा बंधनात अडकली आहे. त्यामुळे इतर लोकांची अवस्था ‘तोंड बांधून बुक्याचा मार’ अशागत झाली आहे. मुलाच्या जन्माचा आनंद गाजावाजाने साजरा करायच्या मनस्थितीत यावेळी कोणीही नाही.”

जसजसे मी एक एक वाक्य हळू हळू बोलत होतो आणि त्या दोघांचे चेहेरे पहात होतो, ते पांढरे पडत चाललेले दिसत होते. त्यांना पाहून अमोलही कावराबावरा होत होता. भूतकाळातून हलकेच मी वर्तमानकाळात येऊन सांगितले, “हा मुलगा आता पंचविशीला आला असला तरी अजून मार्गी लागलेला दिसत नाही. नेहमी धरसोड करण्याची त्याची वृत्ती आहे. कुठल्याही गोष्टीत तो उत्साहाने भाग घेत नाही. त्याच्या मनात कसली हौस, ऊर्मी, महत्वाकांक्षा नाही. कोणतेही काम करतांना त्याला आत्मविश्वास वाटत नाही. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या भविष्याची काळजी वाटते.”

आता त्यांच्या डोळ्याची बुबुळे बाहेर येतील का काय असे मला वाटायला लागले. बाईंनी तोंडाने “राम राम राम राम” असे पुटपुटत दोन्ही हांतांनी कान पकडायला आणि दोन्ही गालांवर हलक्याशा थपडा मारून घ्यायला सुरुवात केली. नवससायास किंवा उपासतापास न करणाऱ्या, सोवळेओवळे न पाळणाऱ्या आणि कसलेही खाणे किंवा पिणे वर्ज्य न मानणाऱ्या माझ्यासारख्या सोम्यागोम्याला दैवी शक्ती प्राप्त होणे तर निव्वळ अशक्य! “कुठल्याशा भूतपिशाच्चाने माझ्यात संचार केला की काय!” अशी शंका त्यांना येऊ लागली असणार.

मी पुन्हा डोळे मिटले. एक दीर्घ श्वास घेऊन जागेवरून उठलो. त्या सद्गृहस्थाच्या खांद्यावर थोपटून त्याला म्हंटले, “रिलॅक्स. माझ्यात कसला संचार वगैरे झालेला नाही. मी फक्त थोडासा अभिनय करीत होतो.”
“पण तुम्हाला इतकी तंतोतंत बरोबर माहिती कुठून मिळाली?” त्यांनी मला आश्चर्याने विचारले.
“अहो या कुंडलीमधून!”
“म्हणजे तुम्ही विज्ञानवादी लोकसुद्धा कुंडलीत सगळं असतं हे मानताच ना! गुरूमहाराजांनीसुद्धा कुंडली पाहून त्यावेळी असं असं झालं असणार म्हणून बरोबर सांगितलं होतं. तुम्ही ते ऐकलत की काय?”
“मी तर केंव्हापासून तुमची वाट पहात इथे बसलो आहे. तुम्ही कुणाकडे गेला होता हेसुध्दा मला ठाऊक नाही. तुमच्या गुरूजींनी माहिती सांगतांना त्यावेळी अमक्या स्थानी राहू होता आणि तमक्या ग्रहाची महादशा चालू होती म्हणून तसं घडलं हेसुद्धा सांगितले असणार.”
“म्हणजे काय, ते एक शास्त्रच आहे ना? तसं होणारच!”
“अहो, पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांनी केलेल्या कृत्यांमुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल आपण आकाशातल्या ग्रहांना उगाच कशाला दोष द्यायचा?”
“त्यांनी हे सगळं घडवून आणलं नाही केलं तर मग ते आणखी कशामुळे होणार?”
“जगांत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एकच कारण नसतं, तर कारणपरंपरा असते. त्यातली कांही कारणे आपल्याला समजतात, कांही कधीच समजत नाहीत. आपण आपला त्यांचा शोध घेत रहायचं.”
“ते जाऊ दे. पण तुम्हाला सुद्धा कुंडलीमधले ग्रह पाहूनच ही माहिती मिळाली ना? मग त्यांचा तिच्याशी काय संबंध आहे ते आता तुम्हीच आम्हाला सांगा.”
“कांहीसुद्धा संबंध नाही. तुम्ही जरी माझ्यापासून लपवून ठेवली असली तरी त्या मुलाच्या जन्माची वेळ, महिना आणि वर्ष वगैरे माहिती मला या कुंडलीतल्या ग्रहांच्या जागांवरून मिळाली. त्या वेळी वर्षा ऋतु होता, गौरीगणपतीचा उत्सव सुरू होता, देशात आणीबाणीची परिस्थिती होती आणि त्याचा तुमच्या परिवारावर जबर आघात झाला होता हे सगळं माझ्या सामान्यज्ञानावरून ओघानं आलं. अशा परिस्थितीत आणि वातावरणात वाढलेल्या मुलावर त्याचा काय परिणाम झाला असेल यावर मी मानसशास्त्राच्या आधाराने अंदाजाने खडे मारत राहिलो आणि ते नेमके लागत गेले एवढेच!”
“पण तुम्हाला त्या मुलाच्या जन्माची वेळ तरी कुंडलीवरून कशी समजली?”
“ते मात्र सरळ सरळ विज्ञान आहे. ही जन्मकुंडली म्हणजे आभाळाचा एक नकाशा आहे आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळी कोणते ग्रह आकाशाच्या कोणत्या भागात होते ते त्यात दाखवलेले आहे. आता मी अमोलबरोबर खेळत होतो तेंव्हा भारताच्या नकाशावर या खुणा केल्या आहेत. मुंबईहून पुण्याला जाणारी दख्खनची राणी त्या वेळी कोठे धावत असेल आणि कोलकात्याहून मुंबईकडे येणारे विमान कोठे उडत असेल ते खुणा करून या नकाशात दाखवले आहे. या कुंडलीचे स्वरूप अगदी तसेच आहे. आणखी तासाभरात डेक्कन क्वीन पुण्याला पोचेल आणि विमान मुंबईला. म्हणजे त्यांच्या जागा बदलतील. त्याचप्रमाणे हे ग्रह आपल्या कक्षेत फिरत असतांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात. आपल्याला त्यांच्या गती माहीत असतील तर त्यांच्या स्थानावरून वेळेचा हिशोब करता येतो.”
“तो कसा?” अजून त्यांना माझे सांगणे समजले नव्हते.
मी म्हंटले, “मी दुसरे एक उदाहरण देतो. समजा मी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ई टीव्हीवर ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका पहात पहात जेवण केलं असं सांगितलं तर त्याचाच अर्थ मी पंधरा ऑगस्टला रात्री आठनंतर जेवायला बसलो असा होतो ना? कारण पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन असतो आणि रात्री आठ वाजता ई टीव्हीवर ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका सुरू होते. त्याचप्रमाणे कोणता ग्रह कोणत्या वेळी कोणत्या राशीमध्ये असायला हवा हे त्यांचा अभ्यास करणाऱ्यांना ठाऊक असते. ते कुठे आहेत हे पाहून त्यांना ती वेळ गणिताने काढता येते.”

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

आजीचे घड्याळ (कालगणना) – ३

कुंडलीचा अर्थ

aajeecheghadyal_03

मी दिलेल्या या उदाहरणाने त्या सद्गृहस्थांचे समाधान झाले नाही. त्यावर ते म्हणाले, “असली सोपी उदाहरणे राहू देत. तुम्ही या कुंडलीवरून पंचवीस वर्षापूर्वीची जन्मवेळ इतक्या पटकन कशी काढली तेच आम्हाला सांगा.”
मी सांगू लागलो, “ठीक आहे. तेही सांगणे फारसे अवघड नाही. पण त्यासाठी आधी तुम्हाला या कुंडलीचा ढोबळ अर्थ समजून घ्यावा सागेल. मघाशी मी सांगितलंच की कुंडली हा एका विशिष्ट वेळी आभाळातील ग्रहांची स्थिती दाखवणारा साधा नकाशा आहे. म्हणजे या मुलाचा जन्म ज्या वेळी झाला त्या वेळी कोणता ग्रह कुठल्या राशीमध्ये होता ते यांत दाखवले आहे. भूगोलातील नकाशा कसा काढायचा याचे कांही प्रमाणित नियम आहेत. कोणताही नकाशा आपल्यासमोर उभा धरला तर उत्तर दिशा नेहमी वरच्या बाजूला, दक्षिण दिशा खालच्या बाजूला, पूर्व आपल्या उजवीकडे आणि पश्चिम डावीकडे दिसते. मुंबई, दिल्ली, कोलकाता वगैरे गांवे त्यात वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली दिसतात. कुंडली बनवण्यासाठी वेगळे नियम आहेत. यात आकाशगोलाचे बारा समान भाग करून त्या भागांना बारा राशी अशी नांवे दिली आहेत आणि त्या बारा भागांची एक सलग साखळी बनवलेली असते, कारण बाराव्या मीन राशीला लागून पुन्हा तिच्यापुढे पहिली मेष रास येते. हेच भाग एका आयताकृती आकृतीमध्ये विशिष्ट तऱ्हेने बसवतात. त्यातील प्रत्येक जागी कोणती रास आहे ती इथे अंकाद्वारे दाखवतात. उदाहरणार्थ मेष, वृषभ, मिथुन या राशी १, २, ३ अशा रीतीने दाखवतात. आकाशात या राशी ज्या क्रमाने दिसतात त्याच क्रमाने त्या कुंडलीत देतात. त्याच क्रमाने ग्रहांचे या राशीमधून भ्रमण सुरू असते. त्याशिवाय पूर्ण राशीचक्र आकाशात सतत फिरत असते. एक एक रास क्रमाने पूर्वेला उगवते आणि पश्चिमेकडे सरकत जाऊन अखेर अस्त पावते. म्हणजे आता ज्या ठिकाणी मेष रास दिसते त्या जागी दोन तासानंतर वृषभ रास येईल, तिच्या जागी मिथुन वगैरे. यामुळे यातील प्रत्येक चौकोन व त्रिकोणातील आंकडे दर दोन तासांनी बदलत जातात, तसेच त्या राशीत असलेले ग्रह त्यांच्याबरोबरच आपल्या जागा बदलत जातात. नकाशातील मुंबई, कोलकाता वगैरे गांवे मात्र आपापल्या जागी स्थिर असतात आणि त्यांच्या आधाराने आपण विमान किंवा आगगाडी कशी जाते हे दाखवतो. पण कुंडलीमधल्या राशीच दर दोन तासांनी आपल्या जागा बदलतात आणि त्याशिवाय ग्रह एका राशीमधून दुसऱ्या राशींमध्ये जात असतात हा त्या दोन्हीमधला फरक आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये दिलेली स्थिती ही गतिमान असून ती फक्त एका विशिष्ट वेळेपुरती असते.

आता ही कुंडली पहा. या कुंडलीमधील वरचा चौकोन लग्नरास दाखवतो. याचा अर्थ पूर्वेच्या क्षितिजावर जिथे सूर्य रोज उगवतो तिथे त्या वेळी अमूक रास होती. त्याच्या खालील चौकोनात पश्चिमेच्या क्षितिजावरील रास दिसते. उजवीकडच्या बाजूला दिसणाऱ्या सगळ्या राशी त्या वेळी आभाळात होत्या आणि डावीकडच्या राशी मावळलेल्या होत्या. या कुंडलीत सूर्य डावीकडे पहिल्याच घरात दिसतो, म्हणजे तो तासा दोन तासापूर्वीच अस्ताला गेला होता. त्यामुळे रात्रीच्या आरत्यांची वेळ झाली होती. चंद्र उजवीकडे दुसऱ्या घरात दिसतो. त्याला मावळायला अजून चार पाच तास अवकाश होता. मात्र प्रत्येक अमावास्येच्या दिवशी सूर्य व चंद्र एकाच राशीत असतात. सूर्यप्रकाशाने उजळलेला चंद्राचा अर्धा भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असतो. चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर सूर्यप्रकाश न पडल्याने काळोख असतो. त्यामुळेच अमावास्येच्या दिवशी आपल्याला चंद्र दिसत नाही. त्यानंतर दररोज पन्नास मिनिटे मागे पडत जाऊन आता चंद्र सूर्याच्या पाच सहा तास मागे होता. याचा अर्थ त्या दिवशी शुद्धपक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथी होती. वेळ समजली आणि तिथी समजली. त्या वेळी सूर्य सिंह राशीत होता याचा अर्थ भाद्रपद महिना सुरू होता. म्हणजे गणपती आणि गौरीचे उत्सव सुरू होते. अशा रीतीने सूर्य व चंद्र यावरून महिना, तिथी आणि वेळ लगेच समजली.”
“पण तुम्हाला वर्ष कसं समजलं?”
“त्यासाठी गुरू आणि शनी या दूरच्या ग्रहांचा उपयोग होतो. गुरू आपल्या कक्षेतील भ्रमण बारा वर्षात पूर्ण करतो. त्यामुळे तो एका राशीत एक वर्षभर राहतो आणि दर बारा वर्षांनी पुन्हा सुरुवातीच्या राशीत परत येतो. या कुंडलीमध्ये गुरू ग्रह त्या दिवसाच्या मानाने एक घर मागे होता. त्या अर्थी तो १ , १३ आणि २५ वर्षापूर्वी त्या जागी होता. शनी तेंव्हाच्या मानाने १० घरे मागे होता. त्याला तर एक रास ओलांडून जायला तब्बल अडीच वर्षे लागतात. त्यामुळे तोसुद्धा कुंडलीत दाखवलेल्या जागी २५ वर्षापूर्वी होता. या दोन्ही गोष्टी पाहिल्यावर २५ वर्षापूर्वीचा काळ निश्चित होतो. कुंडली म्हणजे काय हे माहीत असेल तर एवढी माहिती कळायला कितीसा वेळ लागला?”
“पहा, शास्त्रज्ञ लोकसुद्धा राशी आणि ग्रहांना मानतात!” बाईंनी अजब निष्कर्ष काढला.
“आपल्या महान ऋषीमुनींनी रचलेली शास्त्रे आहेत ती. त्यांना मानावीच लागतील.” मिस्टरांनी दुजोरा दिला.
“अहो, राहू केतू वगैरे ग्रह त्यांच्या राशीला लागल्याशिवाय राहणार आहेत कां?” बाईंनी री ओढली. मी कपाळाला हात लावला.
. . . . . . . .. . . (क्रमशः)

आजीचे घड्याळ (कालगणना) – ४

राशीचक्र

aajeecheghadyal_04

त्या पतिपत्नींच्या बोलण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यांचे कोरडे ठणठणीत घडे जन्मभरासाठी पालथे घालून ठेवलेले होते. ते कांही दहा मिनिटांच्या चर्चेने सरळ होणार नव्हते. तेंव्हा त्यावर आणखी पाणी ओतण्यात कांही अर्थ नव्हता. मग मी ही नसती उठाठेव कशाला करायची? पण छोट्या अमोलच्या डोळ्यात मला जिज्ञासेची चमक दिसत होती. हा एक आशेचा किरण होता. त्याच्याकडे पहात मी म्हंटले, “ते राहूकेतू कोणाच्या राशीला कां, कसे आणि कधी लागतील ते समजण्यासाठी आधी रास म्हणजे काय ते तर माहीत असायला हवं ना!”
अमोल म्हणाला, “खरंच काका, कुणाची रास सिंह आहे कां मकर आहे हे कोण ठरवतं ?”
“अरे, तुला एवढंसुद्धा माहीत नाही कां? कुंडली मांडणारे ज्योतिषीच ते सगळं ठरवतात.” आईने पोराला अज्ञानाचा घोट पाजला.
“तुमचे ज्योतिषी त्यांच्या मनाला येईल तशी वाटेल ती रास सांगतात कां? ते मुलाच्या जन्माची तारीख वेळ वगैरे कांही विचारत नाहीत?” मी खंवचटपणाने विचारलं.
“फक्त तेवढी थोडीशी माहिती त्यांना लागते, पण मग रासबीस तेच ठरवतात.”
“म्हणजे तुमच्याच हातातले घड्याळ पाहून तुम्हाला त्यातली वेळ सांगण्याचा प्रकार झाला हा! खरं तर मुलाचा जन्म ज्या क्षणी होतो तो क्षण त्याची रास ठरवतो. म्हणजे त्या क्षणी आकाशात ग्रहांची जी स्थिती असते त्यावरून ती ठरते. ज्योतिषाने ठरवण्यासारखं त्याच्या हातात कांही नसतं.”
“पण रास म्हणजे काय? ती आपल्या आप कशी ठरते?” अमोलने मुळात हात घातला.
मी म्हंटले, “राशी हा आकाशाचा एक भाग असतो असं मघाशी मी सांगितलं होतं. आपल्या पृथ्वीच्या नकाशात अक्षांश रेखांश दाखवलेले असतात. प्रत्यक्षात जमीनीवर किंवा समुद्रावर कुठेही अशा रेघा मारलेल्या नसतात, पण नकाशात त्यांच्या आधाराने कोणतीही नेमकी जागा शोधायला त्यांचा चांगला उपयोग होतो. तू पाहिले असतील ना?”
“हो. अक्षांशाच्या आडव्या सरळ रेखा असतात आणि रेखांशाच्या उभ्या वक्र रेषा असतात.” अमोल म्हणाला. छोकरा हुषार होता.
“आकाशातील जागा ठरवण्यासाठीसुद्धा त्याचे असेच काल्पनिक भाग पाडले आहेत. बारकाईने अभ्यास करणारे लोक त्याचे अंश, कला, विकलापर्यंत सूक्ष्म निरीक्षण करून किचकट गणिते मांडतात. पण सर्वसाधारण माणसांसाठी आकाशाची विभागणी फक्त बारा राशीमध्ये केली आहे. त्यातील प्रत्येक रास तीस अंशाएवढी असते. राशींच्या सीमा रेखांशासारख्या वक्र असतात. त्यातलासुद्धा उत्तर आणि दक्षिणेकडला बराचसा भाग सोडून देऊन फक्त मधला कांही भाग महत्वाचा आहे.”
“पण सगळं आभाळ एकसारखं दिसतं. ते भाग ओळखायचे कसे?” अमोलने रास्त प्रश्न विचारला.
मी म्हंटले, “तुझं निरीक्षण अगदी बरोबर आहे. तेजस्वी सूर्यापुढे आपल्याला दिवसा कोणतेही तारे दिसत नाहीत. त्यामुळे सर्व आकाश एकसारखं दिसतं, पण रात्री मात्र वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या चांदण्या दिसतात. या ताऱ्यांच्या समूहातूनच वेगवेगळ्या आकारांचा भास होतो. प्रत्येक राशीचे नांव त्या भागात दिसणाऱ्या तारकापुंजाच्या अशा आकारावरून दिले गेले आहे. हे सारे तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना दिसतात, पण त्यांचे एकमेकांपासून असलेले अंतर कधी तसूभरसुद्धा बदलत नाही. त्यामुळे त्यांच्या पुंजांचे आकार अगदी जसेच्या तसे दिसतात. मीन रास पू्र्वेच्या क्षितिजावर असो किंवा पश्चिमेच्या किंवा माथ्यावर असो ती तशीच दिसणार. त्यामुळे थोडी संवय झाली की रात्रीच्या वेळी मात्र राशी ओळखायला येतात.”
“पण त्या अशा फिरत कां असतात?”
“खरं म्हंटलं तर त्या राशींमध्ये दिसणारे सर्व तारे आपापल्या जागेवर स्थिर आहेत, आपल्या सूर्यासारखे. दिवसासुद्धा ते आपापल्या जागेवर असतात, पण सूर्याच्या प्रकाशाने आपल्या वातावरणात इतका उजेड असतो की ताऱ्यांचा मंद प्रकाश आपल्या डोळ्यांना जाणवत नाही. आपली पृथ्वीच स्वतःभोवती दिवसातून एक गिरकी घेते. आपल्या आजूबाजूची जमीन, घरे, डोंगर वगैरे सारे कांही तितक्याच वेगाने फिरत असल्यामुळे आपल्याला ते स्थिर वाटतात आणि आकाशातले सूर्य, चंद्र, ग्रह, तारे पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे जात आहेत असे वाटते. त्यात पुन्हा आपल्याला एका वेळेस फक्त जमीनीच्या वरील अर्धेच आकाश दिसू शकते. उरलेला अर्धा भाग जमीनीच्या मागे दडलेला असतो. जसजशी पृथ्वी फिरते तसतसा पूर्वेकडील भाग दिसू लागतो आणि पश्चिमेकडील भाग दिसेनासा होत जातो.”
“त्यात राशी कशा प्रकारे दिसतात?”
“प्रत्येक राशीची रुंदी तीस अंश इतकी असते. पृथ्वीला तीस अंश फिरायला दोन तास लागतात. त्यामुळे एका राशीचा उदय सुरू झाल्यानंतर ती पूर्णपणे वर यायला दोन तास लागतात. त्याच काळात पश्चिमेकडील क्षितिजावरील राशीचा अस्त होत असतो. म्हणजे सहा राशींएवढा आकाशाचा भाग कोणत्याही वेळी दिसत असला तरी त्यात मधल्या पांच राशी पूर्णपणे दिसतात आणि पूर्व व पश्चिम क्षितिजांवरील दोन राशी अंशतः दिसतात. आपण जर सूर्यास्तापासून दुसरे दिवशीच्या सूर्योदयापर्यंत रात्रभर सतत आकाश पहात राहिलो तर सूर्याच्या आजूबाजूचा थोडा भाग सोडून इतर सर्व राशी पाहू शकतो.”
“या राशींमध्ये ग्रह कसे जातात?”
“राशींचा आकार ज्या ताऱ्यांमुळे ओळखला जातो ते तर पृथ्वीपासून खूप खूप दूर आहेत. आज आपल्याला दिसणारे त्यांचे प्रकाशकिरण कित्येक वर्षांपूर्वी, कदाचित आपण जन्मण्यापूर्वी तिथून निघाले असतील. आभाळामध्ये या सर्व ताऱ्यांची एक पार्श्वभूमी बनली आहे. आपल्या सूर्यमालिकेमधील ग्रह आपल्याला या पार्श्वभूमीवर दिसतात. या खोलीच्या भिंतींवर लावलेली चित्रे, टांगलेले कॅलेंडर, दरवाजे, खिडक्या, हा टेलीव्हिजन, ही शोकेस या सगळ्यांच्या बॅकग्राउंडवर आपण एकमेकांना दिसत आहोत. समज मी आपलं एक बोट असं नाकासमोर धरलं आणि त्याच्याकडे पाहिलं तर मला माझं बोट दिसेल तसेच मागच्या भिंतीवरील कॅलेंडरसुद्धा दिसेल. मी ते थोडंसं फिरवलं तर मला बोटाच्या पलीकडे या खोलीतला टेलीव्हिजन सेट दिसेल. आणखी वळवलं तर बोटापलीकडे खिडकी आणि खिडकीतून दिसणारी समोरची बिल्डिंग दिसेल. माझं बोट माझ्याजवळच असेल पण मला ते केंव्हा कॅलेंडरबरोबर, टीव्हीबरोबर नाहीतर खिडकीसोबत दिसेल. त्याचप्रमाणे मी या खोलीत मधोमध ठेवलेल्या टीपॉयवरच्या फ्लॉवरपॉटकडे पाहिले तर त्याच्या मागच्या भिंतीवरचे कॅलेंडर, किंवा टीव्ही किंवा खिडकी असे जे असेल ते दिसेल. त्याच्याकडे पहात मी त्याच्याभोवती फिरलो तर मला वेगवेगळ्या कोनातून पलीकडे असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे दिसतील. म्हणजे माझे बोट माझ्याभोवती फिरले काय किंवा मी फ्लॉवरपॉटच्या भोवती फिरलो काय दोन्ही वेळा मला वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर ते दिसतील. ग्रहांकडे पाहतांना अगदी असंच होतं. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतांना बुध आणि शुक्र या सूर्याच्या जवळ असलेल्या ग्रहांना सुद्धा प्रदक्षिणा घालते आणि मंगळ, गुरु आणि शनी हे पृथ्वीच्या पलीकडे असलेले ग्रह सूर्याभोवती फिरतांना पृथ्वीला सुद्धा प्रदक्षिणा घालीत असतात. चंद्र तर खास पृथ्वीभोवती फिरत असतो. यामुळे आपल्याला हे सर्व ग्रह नेहमी कुठल्या ना कुठल्या राशींचा भाग असलेल्या ताऱ्यांच्या सोबतीत दिसतात. ते ज्या तारकासमूहाबरोबर दिसतात त्या राशीत ते आहेत असे आपल्याला वाटते. ते सर्व ग्रह, उपग्रह आणि स्वतः पृथ्वी सतत गतिमान असल्यामुळे ते राशींमधून भ्रमण करतांना दिसतात. हे करतांना एका राशीमधून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तिच्या एका टोकांपासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करतांना त्या राशीत त्यांचे वास्तव्य असते, त्यानंतर ते दुसऱ्या राशीतून तिसऱ्या राशीत जातात. हे भ्रमण सतत चाललेले असते. कोणत्याही माणसाच्या जन्माच्या वेळेस ग्रहांच्या जागांची जी परिस्थिती असते त्यावरून त्याची रास ठरवतात. आपल्याकडील पध्दतीनुसार चंद्राच्या स्थानावरून रास ठरते तर पाश्चात्य देशात रूढ असलेल्या पध्दतीनुसार ती सूर्यावरून ठरते. सूर्याच्या भ्रमणाची सौर वर्षाबरोबर सांगड असल्यामुळे कॅलेंडरमधील तारखेप्रमाणे जन्मरास ठरते. नियतकालिकांमध्ये याच राशी (लिओ, लिब्रा वगैरे) दिल्या जातात”

. . . . .. . . . . . . . . . .. (क्रमशः)

आजीचे घड्याळ (कालगणना) – ५

ग्रहांचे भ्रमण

aajeecheghadyal_05

“माणसाच्या जन्माच्या वेळी आकाशातले ग्रह ज्या राशीत दिसत असतील त्यावरून त्याची रास ठरवतात.” असे मी सांगितल्यावर अमोलने उत्सुकतेने विचारले, “ती कशी?”
मी सांगायला सुरुवात केली,”त्याचे वेगवेगळे प्रकार माझ्या पहाण्यात आले आहेत. आपल्याकडे सर्वात अधिक प्रचलित असा पहिला प्रकार आहे तो म्हणजे जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल तीच त्या माणसाची रास. प्रत्येक पंचांगात तारखेसमोरच ती दिलेली असते. ज्या काळात छापखाने नव्हते, त्यामुळे घरोघरी पंचांग, कॅलेंडर वगैरे नसायची, तेंव्हा त्या रात्री चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे हे पाहून त्या बाळाची रास ठरवता येत असे. भारताच्या कांही भागात सौर कालगणनेवर आधारलेले पंचांग उपयोगात आणले जाते. १४-१५ एप्रिलच्या सुमारास जेंव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो त्या दिवशी त्या लोकांचे नवे वर्ष सुरू होते. त्यानंतर जसा सूर्याचा पुढच्या राशीत प्रवेश होईल तसा महिना बदलत जातो. त्यांच्या प्रथेप्रमाणे जन्माच्या वेळेस सूर्य ज्या राशीत असेल ती जन्मरास मानली जाते. आंतरराष्ट्रीय किंवा पाश्चिमात्य पद्धतीतसुद्धा सौर कॅलेंडरमधील तारखेनुसार रास ठरते, पण त्यांच्या तारखा आपल्या पंचांगातील तारखांबरोबर जुळत नाहीत. उदाहरणार्थ आपली मकर संक्रांत १४-१५ जानेवारीला येते. त्या दिवसापासून महिनाभर सूर्य मकर राशीत राहतो, पण कॅप्रिकॉर्न ही सनसाईन २३ डिसेंबर ते २० जानेवारीपर्यंत असते. हा फरक कशामुळे येतो कोणास ठाऊक! सर्व इंग्रजी मासिकात या पद्धतीप्रमाणे रास ठरवून भविष्य वर्तविले जाते. याशिवाय कांही विद्वान लग्नरास महत्वाची मानतात. म्हणजे मुलाचा जन्म झाला त्या वेळी पू्र्व क्षितिजावर ज्या राशीचा उदय होत असेल, ती त्या मुलाची रास मानली जाते.”
“यातली कुठली पद्धत खरी धरायची?” अमोलने विचारले. .
“राशीचा उपयोग लोक कशासाठी करतात? त्यानुसार सांगण्यात येणारी भाकिते, मुहूर्त पाहणे वगैरे गोष्टींसाठी ना? हा तर्काच्या पलीकडला श्रद्धेचा, विश्वासाचा प्रश्न आहे. तो माझा प्रांत नाही. वाटल्यास मी माझे मत नंतर सांगेन, पण आता आपण ग्रहांच्या अवकाशामधील भ्रमणाबद्दल बोलत आहोत. माझ्या दृष्टीने हा मनोवेधक असा विषय आहे. तेंव्हा त्या संदर्भात आपण राशीचक्राबद्दल बोलू.” खगोलविज्ञान आणि ज्योतिष यांत फरक करायचा प्रयत्न करीत मी म्हंटले. .
“एका राशीत दोन तीन ग्रहांची युती झाली असं आपण नेहमी ऐकतो. ती कशामुळे होते?”अमोलने शंका काढली. .
मी म्हंटले, “खरंच हा चांगला प्रश्न आहे. आपल्या सूर्यमालिकेतल्या नऊ ग्रहांची नांवं तुला माहीत असतीलच.” .
“हो. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लूटो.” अमोलने धडाधडा म्हणून दाखवली. .
“सर्वात दूर असलेल्या प्लूटोचं नांव त्यामधून काढून टाकावं असा ठराव शास्त्रज्ञांच्या एका मेळाव्यात केला आहे. युरेनस आणि नेपच्यून देखील अतिशय मंद गतीने चालतात आणि आपली सूर्यप्रदक्षिणा अनुक्रमे तब्बल ८४ आणि १६५ वर्षात पुरी करतात. ते साध्या डोळ्याने दिसत नाहीत आणि दिसले तरी एकेका राशीमधून सरपटत जायला त्यांना सात व चौदा वर्षे लागतील. तेंव्हा आपण इतर ग्रहांबद्दल बोलू.”
“सांगा.” .
“हे सर्व ग्रह सूर्यापासून निरनिराळ्या अंतरावर आहेत. त्यामुळे हे सगळे ग्रह हातात हात घालून फेर धरून सूर्याभोवती रिंगण घालत नाहीत. ते वेगवेगळ्या कक्षांमधून वेगवेगळ्या गतीने फिरतात. सूर्यापासून जो ग्रह जितका दूर असेल तितकी त्या ग्रहाच्या भ्रमणाची कक्षा मोठी असणार आणि त्यामुळे एक फेरी मारायला त्याला जास्त वेळ लागणार. तसेच तो पृथ्वीपासून जितका दूर असेल तितका तो हळू चालतो आहे असे आपल्याला वाटणार. एका रस्त्यावरून पायी चालणारे वाटसरू, सायकलस्वार, मोटारी, स्कूटर्स वगैरे जात असतील तर साहजीकपणेच त्यातले वेगवान प्रवासी सावकाशपणे जाणाऱ्यांच्या मागून येऊन पुढे जाणार. आकाशातील ग्रहांचा जो प्रवास आपण पाहतो त्यात हेच घडतांना दिसते. पण त्यात एक फरक आहे. पृथ्वी स्वतःभोवती चोवीस तासात फिरत असल्यामुळे संपूर्ण राशीचक्र एका दिवसात आपल्याभोवती फिरतांना दिसते, पण ग्रहांना आपल्या प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी कित्येक महिने किंवा वर्षे लागतात. दुसरी गंमत अशी आहे की त्यांचा हा प्रवास बरोबर उलट दिशेने चालतो. मेष, वृषभ, मिथुन अशी राशींची ओळीवार रांग लावली तर पहिली मेष रास इंजिनाच्या जागी असेल आणि बुध, शुक्र वगैरे ग्रह मेषमधून वृषभ राशीत, तिथून मिथुन राशीत असे गार्डाच्या डब्याकडे जातांना दिसतील. पण प्लॅटफॉर्मवर उभे राहून पाहणाऱ्या माणसाला जसे ट्रेनमधले सगळे लोक पुढे जातांना दिसतात तसेच आपल्याला सगळे ग्रह रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे वाटचाल करतांना दिसतात, पण आतला टीसी इंजिनाकडून गार्डाच्या डब्याच्या दिशेला गेला तर तो बसलेल्या प्रवाशांच्या तुलनेत विरुद्ध दिशेला जात असतो. तसेच राशींच्या संदर्भात ग्रहांचे भ्रमण उलट्या दिशेने होते. .

चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह सर्वात जवळचा. तो आपली पृथ्वीभोवताली फिरण्याची एक परिक्रमा फक्त सत्तावीस दिवसात पूर्ण करतो. सत्तावीस दिवसात तो सर्व बाराच्या बारा राशींमधून फिरून पहिल्या राशीत परत येतो. अर्थातच तो ज्या राशीतून फिरत असेल त्यांमधून आधीच जात असलेले इतर ग्रह आपल्याला आभाळात त्याच्या जवळपास दिसणार. एका राशीच्या म्हणजे तीस अंशाच्या कोनात दोन किंवा अधिक ग्रह दिसले तर त्याला युती म्हणतात. या प्रकारे दर महिन्याला चंद्राची प्रत्येक ग्रहाबरोबर युती होते. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आपली सूर्याभोवतालची परिक्रमा फक्त तीन महिन्यात संपवतो म्हणजेच आपल्या (पृथ्वीवरील) एका वर्षातून बुध ग्रह चार वेळा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे आपल्याला तो नेहमीच सूर्याच्या अंवती भोवती दिसतो. खरं तर तो त्याच्या इतक्या जवळ असतो की सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला तो सहसा दिसतच नाही. वर्षातील अनेक महिने त्याची सूर्याबरोबर युती चालू असते. शुक्र हा ग्रह सूर्यापासून थोडा दूर आहे, पण पृथ्वीच्या मानाने त्याच्या जवळ असल्यामुळे तो सुद्धा नेहमी सूर्य ज्या राशीत असेल तिच्या दोन तीन घरे मागे पुढे दिसतो. हा सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह सूर्याच्या पुढे असला तर फक्त सूर्योदयापूर्वी कांही काळ आणि मागे असला तर सूर्यास्तानंतर कांही काळ आकाशात दिसतो. तो माथ्यावर आलेला आपल्याला कधीच पहायला मिळत नाही. त्याचीही सूर्याबरोबर अनेक वेळा युती होते. कधी कधी तर शुक्र हा ग्रह सूर्याबिंबाच्या समोरून आरपार जातो. अर्थातच आपण ती युति डोळ्यांनी पाहू शकत नाही. फक्त कुंडलीत पाहू शकतो. .

आपली पृथ्वी सूर्याभोवती वर्षात एकदा प्रदक्षिणा घालते. किंबहुना ती प्रदक्षिणा घालायला पृथ्वीला जितका वेळ लागतो त्यालाच एक सौर वर्ष असे म्हणतात. सूर्याचा उजेड अत्यंत प्रखर असल्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात तो कोठल्याही राशीमधील ताऱ्यांच्या सोबतीने कधीच दिसत नाही. त्याचा उदय होण्यापूर्वी आणि अस्त झाल्यानंतर ज्या राशी आकाशात क्षितिजांवर दिसतात त्यांवरूनच सूर्य कोणत्या राशीत आहे हे ठरवावे लागते. मंगळ, गुरू व शनी यांना परिभ्रमणासाठी अनुक्रमे सुमारे दोन, बारा व तीस वर्षे लागतात. त्या काळात इतर ग्रह त्यांच्या मागून येऊन पुढे जात असतात. त्यांच्याबरोबर या ग्रहांच्या युत्या होतात. गुरू आणि शनी मात्र एकदा एका राशीत आले की वर्ष दोन वर्षे बरोबर राहतात आणि एकदा दूर गेले की वीस वर्षे पुन्हा भेटत नाहीत!” .
“खरंच हे खूप इंटरेस्टिंग आहे.” अमोल उद्गारला. .
“यात एक गोष्ट नीट समजून घेणं फार महत्वाचं आहे.” मी सांगितले. “आपल्याला जरी आभाळात दोन, तीन, चार ग्रह जवळ जवळ दिसले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांपासून नेहमीसारखेच खूप दूर असतात. चंद्र, शुक्र व शनी यांची सिंह राशीत युती झाली तर आकाशात हे सगळे आपल्याला एकमेकांच्या जवळ दिसतील, पण चंद्र आपल्यापासून जितका दूर आहे त्याच्या दोनशेपटीने शुक्र दूर असतो आणि सात हजार पटीने शनी. सिंह राशीतील तारे तर अब्जावधी पटीने आपल्यापासून दूर असतात. आपली पृथ्वीजवळची जागा सोडून शनी किंवा गुरूला भेटायला चंद्र त्यांच्याकडे जात नाही. तीन चार मुलं एका जागी गोळा होऊन गप्पा मारतात, खातात, पितात, खेळतात, कधी भांडतात तशा प्रकाराने हे ग्रह एकमेकांच्या जवळ कधीही जात नाहीत. कुंडलीमध्ये राशीला घर म्हणायची पद्धत असली आणि एका राशीत असलेल्या ग्रहांची नांवे चिकटून लिहीत असले तरी आकाशात तसली समाईक जागा नसते आणि प्रत्यक्षात ग्रह तिथे जात नाहीत. ते एकमेकांपासून दूर राहूनच आपापल्या कक्षांमधून मार्गक्रमण करीत असतात.”

आतापर्यंत माझे सांगणे ऐकतांना अस्वस्थ होत असलेल्या अमोलच्या आई थरथर कांपत म्हणाल्या, “अहो शास्त्रज्ञ, तुमचे ते शोधबीद तुमच्यापाशीच ठेवा. आमच्या मुलाच्या मनात असलं भलतं सलतं कांही भरवू नका हं! सांगून ठेवते. उगाच कुठल्या ग्रहाचा कोप झाला तर?” .

. . . . . .. . . (क्रमशः)

आजीचे घड्याळ – भाग ६

रात्रीची पाठशाळा

आजीचे घड्याळ ६

अशा हल्ल्याची मला अपेक्षा होतीच. मी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, “मला क्षमा करा. पहिली गोष्ट, मी कांही कोणी शोध लावणारा शास्त्रज्ञ नाही. मी विज्ञानाचा एक साधा विद्यार्थी आहे. दुसरी म्हणजे मघाशी तुमच्या मिस्टरांनी सांगितलं होतं तशा आपल्या महान पूर्वजांनीच निर्माण केलेल्या खगोलशास्त्रातलं गमभन मी अमोलला सोपी उदाहरणे देऊन समजावून सांगतो आहे. त्यात कांहीच नवीन नाही. आपली सूर्यमालिका आणि त्यातल्या ग्रहांच्या कक्षा वगैरे गोष्टी या मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात असतात. मी सुद्धा त्याच्या वयाचा असतांनाच त्या शिकलो आहे. शाळेत शिकत असतांना कदाचित तुमच्या कानांवर पण पडल्या असतील.”
बाई मनातून किंचित वरमल्या होत्या, पण फणका-याने म्हणाल्या,” छे! छे! हे असले तारे बीरे शिकायला मी कांही नाईटस्कूलला नव्हते गेले!”
“हे मात्र तुम्ही बरोबर सांगितलं हं! मी यातल्या अनेक गोष्टी खरं तर रात्रीच्या शाळेतच जास्त व्यवस्थितपणे शिकलो. आमची ही शाळा एखाद्या कोंदट खोलीत न भरता विशाल आकाशाच्या छपराखाली भरत असे. अत्रि, कपिल वगैरे सात महर्षी तिथे आचार्यपदावर आहेत. देवांचे गुरु बृहस्पती आणि दानवांचे गुरु शुक्राचार्यदेखील रोज थोडा तरी वेळ एक फेरी मारून जातात.”
माझे हे अलंकारिक बोलणे बाईंच्या डोक्यावरून जात होते. ते समजण्याएवढी प्रगल्भता त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी आश्चर्याने विचारलं, “खरंच! अशी शाळा कुठे होती?”
“अहो, मानवजात निर्माण होण्यापूर्वीपासून ती शाळा चालू आहे आणि अजूनसुद्धा ती रोज रात्री भरते. तिच्या शाखा जगभर सगळीकडे पसरल्या आहेत.” मी त्यांना अधिकच बुचकळ्यात पाडले. पण अधिक ताणून न धरता सांगायला सुरुवात केली, “अहो, आकाशातले ग्रह आणि तारे यांना पहात पहातच मला खूप शिकायला मिळालं. आधी एक मजेदार गोष्ट सांगतो.”
“सांगा काका.” असे म्हणत अमोल सरसावून बसला.
मी सुरुवात केली, “माझ्या लहानपणी आम्ही सगळे एकत्र कुटुंबात रहात होतो. आमचा मोठा वाडा होता, त्याच्या माळवदावर सिमेंटची गच्ची केलेली होती. उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही रोज रात्री गच्चीवर पथा-या पसरून मोकळ्या हवेत झोपत असू. बहुतेक वर्षी घरोघरच्या माहेरवाशिणी आपल्या मुलांना घेऊन सुटीत आलेल्या असत. त्यामुळे खूप मुले जमत असू. रात्री अंथरुणावर बसून नाहीतर पडल्यापडल्या गाण्याच्या भेंड्या, नकला, कोडी, जोक्स, इकडल्या तिकडल्या भागाची माहिती, मजेदार अनुभव वगैरे सांगणं, चिडवाचिडवी वगैरे होई. त्यातून मनोरंजन आणि माहिती या दोन्हींचा लाभ देणारी ही ‘मस्तीकी पाठशाला’ छान चालत असे. एकदा अशी हाहाहीही करता करता त्यात किती वेळ गेला ते कुणाला कळलंच नाही. माझ्या वडिलांनी सांगितलं, “मुलांनो झोपा आता. रात्रीचे बारा वाजले आहेत.” एक मुलगा कांही तरी निमित्य काढून खाली जाऊन घड्याळ पाहून आला. खरंच रात्रीचे बारा वाजलेले होते. त्याने दुस-या मुलाच्या कानात सांगितलं, त्यानं तिस-याच्या, अशी खुसपुस सुरू झाली. अखेर एका मुलानं धीर करून विचारलं, इथं कुणाच्या मनगटावर घड्याळ नाही, उशाशी गजराचं घड्याळ नाही, भिंतीवरच्या घड्याळाचा तर प्रश्नच इथे येत नाही. मग रात्रीचे बारा वाजले ते तुम्हाला कसं कळलं?”
माझ्या वडिलांनी विचारलं, “तुम्हाला ती ‘आजीचे घड्याळ’ कविता माहीत आहे?”
“मला येते, मला येते.” असे करीत सगळ्या मुलांनी कोरसमध्ये गायला सुरुवात केली,
“आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक ।
देई ठेवुन ते कुठे अजूनही नाही कुणा ठाऊक ।। …….”
कविता संपल्यावर माझे वडील म्हणाले, “तुमच्या कवितेतली ती आजी आपलं घड्याळ मला देऊन गेली आहे.”
ते ऐकल्यावर सगळी मुलं खडबडून उठली आणि “कुठं आहे? आम्हाला दाखवा ना!” असे म्हणत त्यांच्या मागे लागली. थोडा भाव खाऊन झाल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली,” ते आपल्या डोक्यावर अनुराधा नक्षत्र दिसतं आहे ना, ते सूर्यास्ताच्या वेळी उगवलं, आता मध्यानरात्रीला डोक्यावर आलं आणि पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी अस्ताला जाईल. त्याच्यावरून मला वेळ कळली.”
“म्हणजे या चांदण्या रात्रभर एका जागी नसतात कां?” कुणीतरी विचारले.
“अरे हा हाताचा पंजा आपण झोपायला आलो तेंव्हा खाली दिसत होता. आता बघ किती वर आला आहे.” हस्त नक्षत्राकडे बोट दाखवीत दुस-याने उत्तर दिले.
“ही अनुराधा अशी रोज रात्री बारा वाजता आभाळाच्या डोक्यावर चढून बसते कां?” आणखी कोणी आपले डोके लढवीत विचारले.
माझ्या वडिलांनी सांगितले, “नाही. तिला नेहमीच घाई असते म्हणून ती रोज चार चार मिनिटे लवकर येते. एक दोन दिवसातला हा फरक आपल्याला जाणवणार नाही, पण ती आठवड्यानंतर पाहिलंस तर ती अर्धा तास आधी माथ्यावर आलेली दिसेल, महिन्याभराने दोन तास आधी आणि तीन महिन्यांनी ती उगवतांनाच आकाशाच्या माथ्यावर चमकू लागेल. बाकीचे सारे तारेसुद्धा असेच करतील.”
“म्हणजे हे तारे पण घड्याळ पाहून आकाशात चालतात की काय?” कोणी शंका काढली.
“अरे आपली घड्याळं कधी पुढे जातील, कधी मागे पडतील, किल्ली संपल्यावर ती बंदसुद्धा पडतील, पण हे एकूण एक सगळे तारे युगानुयुगे अगदी वक्तशीरपणे आपल्या ठरलेल्या वेळा पाळतात आणि एकाच संथ गतीने चालत आले आहेत. त्यात कधी कुणी खाडा केला नाही, दांडी मारली नाही, आळस केला नाही की आगाऊपणा करून पुढे जायचा प्रयत्न केला नाही.”
“त्यात हे जे मंगळ, गुरु वगैरे ग्रह आहेत तेसुद्धा असेच वेळापत्रक पाळतात का?”
“ते सुद्धा रोज आपल्या आजूबाजूच्या तारकांबरोबर चार मिनिटे आधी आकाशात येतात, पण त्यांची गति किंचित धीमी असते. त्यामुळे ते अगदी हळूहळू मागे पडत जातात. त्यामळेच ते एका राशीतून पुढच्या राशीत जात असतात. पण चंद्र मात्र जरा वेगाने चालतो. तो पठ्ठा रोज नक्षत्र बदलतो. आता खूप रात्र झाली आहे. सगळेजण झोपा.” असे सांगून त्यांनी चर्चेचा समारोप केला.

दुसरे दिवशी पंचांगात चंद्राचे नक्षत्र कसे पहायचे इतर ग्रहांची स्थाने कशी पहायची वगैरे गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकून घेतल्या. त्यानंतर रात्रीच्या वेळी आकाशातल्या तारकांचे निरीक्षण करायचा नादच मला लागला. जसजशी त्यांची अधिकाधिक ओळख होत गेली तसतशी मनातली भीती पार निघून गेली. त्यामुळे पुढे आयुष्यभरात मला कधीही कोठल्या ग्रहाची भीती वाटली नाही.”

. . . . . . . . .(क्रमशः)

पुढील भाग : उत्तरार्ध : आजीचे घड्याळ (कालगणना) भाग ७ ते १२
https://anandghare2.wordpress.com/2010/06/28/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a5%a7%e0%a5%a6/

One Response

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: