आजीचे घड्याळ (कालगणना) उत्तरार्ध – भाग ७ ते १२

दि.२५-०९-२०२० : संपादन – ७ ते १२ या सहा भागांना एकत्र केले.

पूर्वार्ध : आजीचे घड्याळ (कालगणना) भाग १ ते ६
https://anandghare2.wordpress.com/2010/06/26/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a5%ac/

 

आजीचे घड्याळ (कालगणना) – ७

aajeecheghadyal_07

ग्रहदशा

बराच वेळ आमचे बोलणे ऐकत असलेले अमोलचे बाबा म्हणाले, “तुमच्या कुंडलीत भरपूर चांगले उच्चीचे ग्रह असणार, त्यामुळे तुमचं सगळं आयुष्य सुतासारखं सरळ गेलं, सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत गेल्या, पाहिजे ते आपसूक मिळत गेलं, कुठल्या ग्रहांच्या कोपाचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव अजून आलाच नसेल, म्हणून तुम्ही असे बोलताहात. अहो ज्याचं जळतं ना, त्यालाच ते कळतं.”

“एकदा साडेसातीचा चांगला फटका बसला म्हणजे घाबरून त्यांची कशी भंबेरी उडते बघा!” झणझणीत फोडणी पडली.

मी म्हंटले, “मी फार सुखात आहे अशी तुमची कल्पना झाली असणे शक्य आहे, कारण मी आपली रडगाणी सहसा कोणापुढे गात नाही. पण ‘सुख थोडे दुःख भारी दुनिया ही भलीबुरी।’ या सत्य़ाचा कटु अनुभव मला आल्याशिवाय राहील कां? निराशा, अपमान, फसवणूक, द्वेष, मत्सर, निंदा, कागाळ्या, विरोध या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर त्रास इतरांसारखा माझ्या वाटणीला देखील येणारच. त्यांचं प्रमाण कदाचित कमीअधिक असेलही. कुठलंही चांगलं काम हांतात घेतल्यावर मलासुद्धा त्यात अनंत अडचणी येतात. संकटांच्या परंपरांना तर एकामागोमाग एक यायची जणु संवयच असते. ‘याला जीवन ऐसे नांव’ आहे. पण या सगळ्या कटकटी आपल्या जगातल्या परिस्थितीमधून, आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या वागण्यातून निर्माण होतात, अधिकांश वेळा त्यात कुठे ना कुठे आपली चूक असते. त्यावर सगळ्या बाजूंनी नीट विचार केला, प्रामाणिकपणे विश्लेषण करून मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यावर उपाय सापडतो. आपली चूक सुधारता येते, निदान तिची पुनरावृत्ती टाळता येते. जी गोष्ट अपेक्षेनुसार घडणे शक्यच नसेल तिचा नाद वेळीच सोडून देता येतो. आपल्या समस्यांचे ओझे आकाशांतल्या ग्रहांच्या खांद्यावर टाकण्याचा सोपा मार्ग माझ्याकडे नसल्यामुळे कदाचित मी असे प्रयत्न जास्त वेळा केले असतील. त्यामुळे माझा पुढला मार्ग थोडा सुकर झाला किंवा कांही संभाव्य संकटांची चाहूल मला आधी लागून ती टाळता आली असण्याची किंवा त्यापासून होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी करता आल्याची शक्यता आहे. त्यामळे माझ्या आयुष्यातले कांही गुंते सुटून ते तुम्हाला वाटते तसे थोडे सरळ झालेही असेल. “जे मिळालं ते मी माझ्या कर्तृत्वाने मिळवलं आणि जे गमावलं ते मात्र दुर्दैवामुळे.” असा अहंकार मी बाळगत नाही आणि “मला जे कांही मिळालं ते सगळं केवळ कुणा ना कुणाच्या कृपेमुळे” असा खोटा विनयसुद्धा दाखवत नाही. कारण जे कांही थोडे फार प्रयत्न मी केले असतील त्याचं श्रेय त्यांनासुद्धा कुठेतरी मिळायला पाहिजेच ना! “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” असे म्हणत स्वस्थ बसलो असतो तर तेवढेसुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. पण या सगळ्यांचा आकाशातल्या ग्रहांबरोबर कांही संबंध आहे असे मला तरी कुठे दिसलेले नाही.”

“म्हणजे आपला व त्यांचा कांही एक संबंध नाही असं तुम्हाला वाटतं का ?” एक वेगळी तात्विक चर्चा सुरू झाली.

मी म्हंटले, “संबंध कसा नसेल? सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, ऊर्जा मिळते, त्यावर वनस्पती वाढतात आणि त्यातून अन्न मिळतं, तो समुद्रातलं पाणी उचलून ढगांमार्फत ते आपल्यापर्यंत पोचवतो. अशा असंख्य गोष्टी सांगता येतील. माणसाच्या जीवनाचा कोणताही पैलू पाहिला तर त्यावर सूर्यनारायणाचा ठसा कुठे ना कुठे दिसतो. चंद्राकडे नुसतं पाहून मन उल्हसित होतं, रात्रीच्या अंधारात तो थोडा उजेड देतो, समुद्रात लाटा निर्माण करतो अशा कितीतरी चांगल्या गोष्टी सांगता येतील. गुरु, शुक्र वगैरे ग्रहसुद्धा पहातांना मनाला आनंद वाटतो, रात्रीच्या काळोखात ते दिशा आणि वेळ या दोन बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण तर या ग्रहांना कांहीही देऊ शकत नाही. अशी निरपेक्ष मदत करणारे आपले हे मित्र आपल्याला विनाकारण पीडा देतील असे मला वाटत नाही. ज्यांच्यापासून आपल्याला धोका असतो त्याच गोष्टींची भीती वाटते. कुठलाही ग्रह आपल्याला त्रास देईल हे मला पटतच नाही. राग, द्वेष, सूडबुद्धी असल्या नकारात्मक क्षुद्र मानवी भावना मी त्या विशालकाय गोलकांना चिकटवू शकत नाही. त्यामुळे त्यांची भीती बाळगण्याचे मला कांही कारण दिसत नाही.”

“म्हणजे आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेलं हे एवढं मोठं ज्योतिषशास्त्र सगळं खोटं आहे कां?” त्यांनी विचारले.

“या लोकांना कुठे आपल्या पूर्वजांचा अभिमान आहे?” सौ.नी आपले नेहमीचे ठेवणीतले शस्त्र पाजळले.

मी म्हंटले, “आधी मी यांच्या प्रश्नाला उत्तर देतो. मला माझ्या पूर्वजांबद्दल मनापासून असीम आदरभाव व डोळस अभिमान वाटतो. पण यासंबंधी एक गोष्ट आठवते. एकदा एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला,”माझे आजोबा अत्यंत प्रसिद्ध प्रकांड पंडित होते. त्यांना जगातल्या सगळ्या विषयांचं प्रचंड ज्ञान होतं.”
तो मित्र म्हणाला,”पण तुला तर कशातलं कांहीच माहीत नाही. हे असं कसं झालं?”
“काय करणार? माझ्या बाबांनी मला कांहीच शिकवलं नाही.”
“म्हणजे तुझी त्यात कांहीच चूक नाही?”
“कांहीच नाही. माझ्या वडिलांनी मला शिकवलंच नाही तर मला ते कसं येणार?”
“याचा अर्थ तुझे वडील मूर्ख होते.”
“तोंड सांभाळून बोल. तू माझ्या वडिलांबद्दल बोलतो आहेस.”
“मग त्यांनी तुला कांहीच कां शिकवलं नाही?”
“कदाचित त्यांच्या वडिलांनी त्यांना कांही शिकवलं नसेल.”
“याचा अर्थ तुझे आजोबा महामूर्ख होते. स्वतः पंडित असून आपल्या मुलाला कसलेही ज्ञान दिले नाही! असले कसले ते पंडित?”
“मग कदाचित ते मोठे पंडित नसतील.”
“तसंही नाही. खरोखरच ते मोठे गाढ विद्वान असतील. पण जाणकार लोकांनी ते सांगावं यात खरी मजा आहे. आज तू हे सांगणं मला शहाणपणाचं वाटत नाही.”

आपल्या देशात असंच घडत आहे. आपण आपल्या प्राचीन पूर्वजांच्या महानपणाचे ढोल जितक्या जोरात बडवू, आपल्याच मधल्या पिढींतल्या पूर्वजांच्या नाकर्तेपणाचा तितकाच मोठा प्रतिध्वनी त्यातून निघेल. तेंव्हा नुसताच महान पूर्वजांचा पोकळ जयजयकार करण्यापेक्षा त्यांनी केलेलं कार्य स्वतः समजून घेतल्यानंतर त्या माणसानं त्याच्याबद्दल बोलावं असं मला वाटतं. मला ते जितकं समजलं आहे, त्याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.”

“आतां तुमचा प्रश्न, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खोट्या आहेत असे म्हणायचे का? कुठलीही गोष्ट व्यवस्थितपणे समजून न घेता मी त्यावर माझे मत देत नाही. त्या लोकांनी खरोखर नेमकं काय सांगितलं, ते कुठल्या संदर्भात, कोणत्या हेतूने आणि कशाच्या आधारावर सांगितलं असेल हे मला स्वतःला समजल्याशिवाय मी त्यावर बोलणे योग्य नाही. मला ते कधी समजेल असे वाटत नाही. कारण आपण कांही आपल्या पूर्वजांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही की त्यांच्या हस्ताक्षरातले लिखाण वाचू शकत नाही.

“त्यांनी असं म्हंटलं होतं.” असं आजकालच्या लोकांपैकीच एकानं सांगितलं आणि “त्यांनी तसं म्हंटलं होतं” असं दुसऱ्यानं सांगितलं तर ती त्यांची मते झाली. त्यातलं आपल्या बुद्धीला काय पटतं तेच पहावं लागेल आणि आपण कांहीही सांगितलं तरी तो त्या लोकांच्या म्हणण्यावर अभिप्राय होईल. शिवाय फक्त ‘खरं’ किंवा ‘खोटं’ एवढाच निकष धरला तर जगातील सर्व साहित्यिकांना ‘खोटारडे’ म्हणता येईल कारण त्यांनी लिहिलेल्या एकूण एक कादंबऱ्या व नाटके यातले प्रसंग, संवाद वगैरे गोष्टी काल्पनिकच असतात. पण आपण त्यांच्या कल्पनाविलासाचं कौतुक करतो. त्यांना ज्ञानपीठ किंवा नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा आदर करतो. त्यांचे लेखन अक्षरशः खरे की खोटे यावर वाद घालत नाही. तेंव्हा हा पूर्वजांच्या नांवाने भावनांना स्पर्श करण्याचा खेळ आपण करू नये यातच शहाणपण आहे.”

“पण त्यांनी एवढं मोठं ज्योतिषशास्त्र निर्माण करून ठेवलं आहे हे तर तुम्हाला मान्य आहे.”
“हो. ते आपल्यासमोर आलेले आहे. मला त्या लोकांच्या या महत्कार्याचं खरोखर नवल वाटतं आणि अभिमानसुद्धा वाटतो.”
“मग त्यांनी हे एवढं मोठं काम कशासाठी केलं असेल?”
“हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नावर मी वर्षानुवर्षं विचार केला आहे. त्या विचारमंथनातून मला जेवढं उमगलं ते सांगतो.”

. . . . . . . . . . . (क्रमशः)

आजीचे घड्याळ (कालगणना) – ८

आजीचे घड्याळ ८

कालगणना

“आपल्या थोर पूर्वजांनी एवढं मोठं ज्योतिषशास्त्र कशासाठी निर्माण करून ठेवलं आहे?” हा एक बिनतोड सवाल अमोलच्या बाबांनी केला होता. त्या शास्त्राची प्रचंड व्याप्ती पाहता ती कांही सहजासहजी गंमत म्हणून करता येण्याजोगी गोष्ट नाही हे स्पष्ट आहे. परंपरागत भारतीय ज्योतिषशास्त्र ‘खगोल’ आणि ‘होरा’ या दोन्ही अंगांना धरून विकसित झालेले असल्यामुळे त्याचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. ग्रहांच्या अवकाशातून भ्रमणाची गति प्रत्यक्षात सुपरसॉनिक विमानापेक्षासुद्धा जास्त असली तरी ते ग्रह आपल्यापासून फार दूर असल्यामुळे आभाळात ती अत्यंत धीमी दिसते. साध्या डोळ्यांना ती जाणवू शकत नाही. त्यांच्या सूक्ष्म हालचाली वर्षानुवर्षे टिपून त्यांची कोष्टके व सूत्रे बनवणे हे अत्यंत जिकीरीचे काम आहे. ते करण्यासाठी असामान्य बुद्धीमत्ता आणि कमालीची चिकाटी या दोन्ही गुणांची मोठ्या प्रमाणात गरज लागते. ते एकट्या दुकट्याचे काम नाही. अनेक विद्वानांनी त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी केलेल्या निरीक्षणांचे विश्लेषण करून त्यात स्वतःच्या कार्याची भर घालीत ते शास्त्र नांवारूपाला आणलेले आहे. हा सगळा खटाटोप कोणत्या उद्देशाने केला असेल आणि त्यातून काय साध्य झाले असेल हा प्रश्न साहजीकच उपस्थित होतो.

ते समजून घेण्यासाठी क्षणभर आपण प्राचीन काळात जाऊ. त्या वेळी छापखाने नव्हते, त्यामुळे घरोघरी पंचांगे, कॅलेंडरे किंवा दैनंदिनी नसत. कांट्यांची घड्याळेसुद्धा नव्हती. पण तेंव्हासुद्धा माणसांना आजच्याइतकीच तीक्ष्ण स्मरणशक्ती होती. होऊन गेलेल्या किरकोळ गोष्टी थोडे दिवस, तर महत्वाच्या गोष्टी जन्मभर त्यांच्या लक्षात रहात. पण त्या कधी आणि केंव्हा घडल्या हे कशाच्या संदर्भात स्मरणात ठेवायचे किंवा त्या गोष्टी कशा दुसऱ्याला सांगायच्या हा एक प्रश्न होता. त्यासाठी त्याच काळात घडलेल्या दुसऱ्या एकाद्या घटनेचा आधार घ्यावा लागत असे. “आपल्या काळ्या मांजरीला पिल्लं झाली होती ना, त्याच दिवशी महाद्या आपल्याकडे आला होता.” अशा प्रकाराने तो कधी आला होता ते सांगायचे. मोठा कालावधी असेल तर “गांवातल्या नदीला महापूर येऊन शंकराच्या देवळांतल्या पिंडीपर्यंत पाणी आलं होतं तेंव्हा आमचा गणप्या रांगायला लागला होता.” असे सांगून त्यावरून त्याचे वय ठरायचे. माझ्या लहानपणी खेड्यातल्या अशिक्षित लोकांचे अशा प्रकारचे संवाद मी ऐकलेले आहेत. त्या काळातल्या अशिक्षित लोकांना जानेवारी, फेब्रूवारी किंवा आश्विन, कार्तिक या शब्दामधून काळाचा पूर्ण अंदाज लागत नसे कारण ते त्यांच्या रोजच्या जीवनात उपयोगात येणारे शब्द नव्हते. मग ज्या काळात हे शब्दसुद्धा अस्तित्वात नव्हते तेंव्हा लोक काय करीत असतील?

प्राचीन काळातील लोक अशाच प्रकारच्या समकालीन घटनांचा आधार घेत असतील. पण अशा घटना किती लोकांना ठाऊक असतील? आणि किती काळ त्यांच्या लक्षात राहतील? ‘काळ्या मांजरीला पिले झाली’ ही गोष्ट त्या घरातल्या आणि जवळच्या शेजाऱ्यांना तेवढी माहीत असणार आणि फार फार तर ती पिले मोठी होईपर्यंत दीड दोन महिने ती गोष्ट त्यांच्या स्मरणात राहील. इतर लोकांना त्या गोष्टीचा पत्तादेखील लागणार नाही. नदीला कधीतरी आलेला महापूर त्या गांवात त्या काळात रहात असलेल्या लोकांना कळला असणार आणि कदाचित तो त्यांच्या जन्मभर लक्षात राहील, पण बाहेरच्या लोकांना त्यातून कोणता बोध होणार? यामुळे अशा प्रकारच्या घटनांच्या संदर्भाचा उपयोग खूप मर्यादित असतो.

घरात व गांवात घडणाऱ्या घटना थोड्या लोकांच्या लक्षात रहातील. पण निसर्गात होणारे मोठे बदल त्यापेक्षा अधिक विस्तृत भागातील सर्वच लोकांच्या लक्षात येतात. दिवस किंवा रात्र, सकाळ- दुपार- संध्याकाळ या सगळ्यांना समजणाऱ्या घटना आहेत. एकादी गोष्ट केंव्हा झाली हे सांगण्याचा तो उत्तम मार्ग आजसुद्धा आपल्या बोलण्यात वारंवार येतो. नेहमीच घड्याळाकडे पाहून “इतक्या वाजता अमकी गोष्ट झाली” असे कांही आपण बोलत नाही. “तेंव्हा नुकतंच उजाडलं होतं किंवा भर दुपारी असं असं झालं बघा.” असेही सांगतो. त्याचप्रमाणे उन्हाळा, पावसाळा आणि थंडी हे ढोबळ ऋतु तेंव्हा घडणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे लगेच लक्षात येतात आणि राहतात. त्यांचाही उपयोग काळाच्या संदर्भासाठी सर्रास होतो. पण या गोष्टी पुनःपुन्हा होत असतात. सकाळ, दुपार वगैरे रोज होतात आणि उन्हाळा पावसाळा तीन चार महिन्यांच्या अंतराने दरवर्षी येतात. त्यांच्या मधल्या आणि पलीकडच्या कालखंडांचा संदर्भ कसा द्यायचा?

आपल्या वातावरणात, निसर्गात होत असलेले बदल जसे सर्वांच्या लक्षात सहजपणे येत होते तसेच आकाशात दिसणारे बदलसुद्धा समजत होते. जमीनीवर दिसणाऱ्या बदलांपेक्षा हे बदल जास्त वक्तशीर आणि भरोशाचे आहेत हे त्यातल्या जाणकारांच्या लक्षात आले असणार. दिवस आणि ऋतु यांना जोडणारा एक दुवा हवा होता. चंद्राच्या कलांच्या रूपात हा दुवा निसर्गात सापडला. चंद्राचा आकार रोज बदलत असतो. अमावास्येच्या दिवशी तो दिसतच नाही, त्यानंतर कलेकलेने वाढत जात पौर्णिमेला पूर्ण गोलाकार होतो, मग पुन्हा कलेकलेने घटत जाऊन अमावास्येला अदृष्य होतो. हे चक्र फिरत राहते. याच्या आधारावर महिना ठरला.

पण एक महिना दुसऱ्या महिन्यापासून वेगळा कसा ओळखायचा? त्यासाठी चंद्राच्या आजूबाजूला असलेल्या ताऱ्यांचे सहाय्य झाले. आदल्या दिवसाच्या मानाने दुसऱ्या दिवशी चंद्र नेहमीच उशीराने उगवतो हे तर त्यांच्या लक्षात आलेच, त्याशिवाय त्याच्या आजूबाजूला असणारे तारे रोज वेगळे असतात हेही कळले. यावरून या ताऱ्यांची सत्तावीस भागात विभागणी करून सत्तावीस नक्षत्रे निर्माण केली आणि रोज चंद्र एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जातो अशी कल्पना केली. अशा प्रकारे सत्तावीस दिवसानंतर तो पुन्हा पहिल्या नक्षत्रात आलेला असतो पण प्रत्येक २९-३० दिवसांनी येणाऱ्या अमावास्येपर्यंत दोन किंवा तीन घरे पुढे जातो. त्यामुळे पुढला महिना तो वेगळ्या नक्षत्रापासून सुरू करतो. अशा प्रकाराने तिथी व नक्षत्र हे दोन्ही एकत्र पाहिल्यास प्रत्येक महिन्यात वेगळा संच दिसतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्याचे नाव त्या महिन्याला दिले. ‘अश्विनी’पासून ‘आश्विन’,’ कृत्तिके’पासून ‘कार्तिक’ वगैरे महिन्यांची नांवे अशी ठरली.

विद्वानांचे जसे चंद्राकडे लक्षपूर्वक पाहणे चालले होते तसेच सूर्याचे निरीक्षणसुद्धा होत होतेच. रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अर्घ्य देण्यासाठी त्याचे दर्शन ते करीतच असत. त्यामुळे सूर्योदयापूर्वी मंद होत मावळणाऱ्या आणि सूर्यास्तानंतर प्रकाशमान होत उगवणाऱ्या चांदण्यांना पाहून कोणत्या राशीमधून व नक्षत्रातून सूर्याचे भ्रमण चालले आहे याचा अंदाज त्यांना येत असे. निसर्गात होणारे बदल हे त्याच्याबरोबर निगडित आहेत. मृग नक्षत्रात सूर्य गेल्यावर पावसाळा सुरू होतो आणि हस्त नक्षत्रातून बाहेर पडल्यानंतर सर्वसाधारणपणे पाऊस संपतो. मकर राशीत सूर्य गेल्यावर दिवस लहानाचा मोठा होऊ लागतो. मेष, ऋषभ, मिथुन राशीत दिवसाचा काळ मोठा असल्यामुळे उकाडा होतो. कर्क राशीत सूर्य गेल्यावर दिवस लहान व रात्र मोठी होत जाते आणि वृश्चिक व धनु राशीत ती जास्त मोठी होऊन कडाक्याची थंडी पडते. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. पण अमावास्या पौर्णिमा यांच्यावर आधारलेले बारा महिने होऊन गेले तरी सूर्य अजून सुरुवातीच्या जागेपर्यंत पोचत नाही. त्यासाठी आणखी १०-११ दिवस लागतात, तोपर्यंत चंद्र आपल्या तेराव्या महिन्यात पुढे गेलेला असतो. यामुळे सूर्याचा भ्रमणकाळ हा चंद्राच्या भ्रमणकाळाच्या पटीत नाही हे त्यांनी पाहिले.

चंद्राच्या कलांमधील दैनंदिन बदलावर आधारलेला महिना आणि सूर्याच्या राशींमधील भ्रमणावर आधारभूत वर्ष या दोन्ही गोष्टींची अफलातून सांगड प्राचीन काळातील विद्वानांनी घातली. दरवर्षी होणारा १०-११ दिवसांचा फरक तीन वर्षात अधिक महिना आणून त्यांनी भरून काढला. ‘अश्विनी’पासून ‘आश्विन’,’ कृत्तिके’पासून ‘कार्तिक’ अशी महिन्यांची नांवे ठरतात. मग या अधिक महिन्याचे नांव कसे ठरवायचे? ‘अधिक’ नांवाचे नक्षत्र तर नसते ना? त्यासाठी त्यांनी अशी कल्पना काढली की ज्या महिन्यापूर्वी अधिक महिना येईल त्याचेच नांव त्या महिन्याला द्यायचे आणि त्याला अधिक हे विशेषण जोडायचे. हा महिना कधी येणार हे कसे ठरवायचे? सूर्य आणि चंद्र यांची सांगड घालायची ते दर अमावास्येला एकत्र येतात, पण वेगवेगळ्या राशीत. मात्र जर सूर्य एका राशीत अमावास्येलाच येऊन पोचला असेल तर चंद्र त्यानंतर बारा राशीत फिरून आला तरी सूर्य अजून त्याच राशीत असतो. यानंतर येणारा महिना अधिक ठरवतात.

“सूर्यचंद्रांच्या राशींमधून होणाऱ्या भ्रमणावर आधारलेली एक सुंदर व परिपूर्ण अशी कालगणनेची पद्धत आपल्या पूर्वजांनी विकसित केली. आणि तिच्या आधाराने इतर ग्रहांच्या भ्रमणाचा अभ्यास करण्याची सोय करून घेतली हा या शास्त्राचा मुख्य उद्देश होता.” असे मी थोडक्यात सांगितले.

. . . . . . . . . .. . . (क्रमशः)

आजीचे घड्याळ (कालगणना) – ९

aajeecheghadyal_09घटिकापात्र

“खरंच, दिवस व महिना ठरवण्याची खूप चांगली पद्धत आपल्या पूर्वजांनी तयार केली होती.” अमोल म्हणाला.

मी सांगितले,”यातले एक वैशिष्ट्य असं आहे की आज कोणती तिथी आहे हे समजण्यासाठी कागदावर छापलेल्या कुठल्याही कॅलेंडरची जरूरी नाही. निरभ्र आभाळ असेल तर चंद्राची कला आणि तो कोणत्या नक्षत्रात आहे एवढे पाहणे हे महिना आणि तिथी ठरवायला पुरेसे आहे.”

“पण वर्ष कसं ओळखायचं?”

“गुरु आणि शनी यांच्या स्थानावरून त्याचा अंदाज कसा लावायचा हे मी दाखवलंच होतं. प्राचीन काळातल्या आपल्या विद्वानांनी असं पाहिलं की गुरु आणि शनी आज ज्या राशीत आहेत त्यामधून त्यातला कोणताही ग्रह एकदा पुढे गेला की पुन्हा ते दोघेही एकाच वेळी आज असलेल्या आपापल्या स्थानांवर यायला सुमारे साठ वर्षे लागतील. गुरु पांच सूर्यप्रदक्षिणा घालून आणि शनी दोन चकरा पूर्ण करून तेंव्हा पुन्हा आजच्या जागांवर परत येतील. अशा रीतीने हे चक्र फिरत राहील. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात साठ वर्षांचे काळ भरपूर मोठे असतात. या साठ वर्षांना त्यांनी वेगवेगळी नांवे दिली. त्यांना संवत्सर असे म्हणतात. त्यांची यादी माहीत असेल तर नांवावरून ते संवत्सर किती वर्षापूर्वी येऊन गेले आणि किती वर्षानंतर पुन्हा येणार आहे ते समजते. इसवी सन, विक्रम संवत आणि शालिवाहन शक या आजपर्यंत चालत आलेल्या गणना सुमारे दोन हजार वर्षे जुन्या आहेत. त्यापूर्वीच्या सम्राटांनी किंवा यामधल्या काळातील इतर राजांनी अशाच प्रकारच्या किती सनावल्या सुरू केल्या, त्यातल्या किती लोकप्रिय झाल्या आणि त्या किती काळ टिकल्या हे ठाऊक नाही. पण संवत्सरांच्या पद्धतीने कोणत्याही काळात निदान एका माणसाच्या आयुष्यामधल्या घटनांची नोंद क्रमवार करता येणे शक्य झाले हे कांही कमी नाही.”

“तिथी, महिना, वर्ष यांच्या गणना ठरल्या, पण दिवसातली वेळ कशी मोजायची याचीसुद्धा कांही पद्धत त्यांनी तयार केली होती कां?”

“त्या काळात यांत्रिक घड्याळे नव्हती. आमच्या आजीच्या काळापर्यंत ती परिस्थिती होती. म्हणून ‘आजीच्या जवळी’ असलेल्या ‘चमत्कारिक’ घड्याळाचं एवढं कौतुक वाटायचं. पूर्वी वेळेची गणना निसर्गातल्या घटनांवरूनच करायची होती. ते फारच महत्वाचं काम होतं. आज आपण सूर्योदय अमूक वाजून तमूक मिनिटांनी झाला असे म्हणतो. पण ते दाखवणारे घड्याळच नसेल तर काय करणार? भारतातल्या पद्धतीप्रमाणे तर सूर्योदयापासूनच नव्या दिवसाला सुरुवात होत असे. युरोपातली परिस्थिती बरीच वेगळी आहे. अगदी उत्तरेला गेलात तर उन्हाळ्यात मध्यरात्रीसुद्धा सूर्य दिसतो आणि थंडीच्या दिवसात भर दुपारी सुद्धा अंधार असतो. सूर्योदय जर झालाच नाही तर त्यावरून वेळ तरी कशी काढणार? इंग्लंडमध्ये सुद्धा दिवस आणि रात्र यांचा कालावधी कमीत कमी पाच सहा तास ते जास्तीत जास्त अठरा एकोणीस तासाइतका असतो. त्यामुळे सूर्योदयाच्या वेळेत प्रचंड फरक पडतो, म्हणून त्यांनी नाइलाजाने मध्यरात्रीची वेळ ही नव्या दिवसाच्या सुरुवातीची वेळ ठरवली असणार. भारतीय पंचांगाप्रमाणे दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते. त्यानंतर प्रत्यक्ष सूर्यच आकाशात असतांना तो पूर्वेकडून पश्चिमेकडे किती सरकला ते ढळढळीत दिसतेच . सूर्याकडे पाहून डोळे दिपतात म्हणून थेट त्याच्याकडे टक लावून पहायचे टाळले तरी जमीनीवर पडणाऱ्या सांवल्यांची लांबी तर मोजतासुद्धा येते. सावलीवरून वेळ दाखवणारी सनडायल्स प्राचीन काळात अनेक ठिकाणी होती. दिल्ली आणि जयपूर येथील जंतरमंतरमध्ये अशा अजस्त्र आकाराच्या सनडायल्स आहेत. आमच्या घराच्या एका पूर्वपश्चिम दिशेने बांधलेल्या भिंतीवर एक मोठा खिळा ठोकून मी घड्याळात पाहून त्यावर किती वाजता खिळ्याची सांवली कुठे पडते याच्या खुणा करून ठेवल्या होत्या. त्यावरून मला बऱ्यापैकी अचूकपणे वेळ कळत असे. रात्र पडल्यावर ताऱ्यांच्या सहाय्याने वेळेचे निदान करता येत असे हे आपण पाहिलेलेच आहे.

पूर्वीच्या काळातले जीवन आजच्यासारखे यंत्रवत झालेले नव्हते. वेळेनुसार सुरू होणारी आणि सुटणारी ऑफिसे नव्हती, शाळा नव्हत्या की पाळ्यांमध्ये चालणारे कारखाने नव्हते. वेळापत्रकावर धांवणाऱ्या आगगाड्या आणि बस नव्हत्या. कोणाची अँपॉइंटमेंट ठरलेली नसे की टीव्हीवरची मालिका पहायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या रोजच्या जीवनात अगदी काटेकोरपणाने वेळ समजण्याची गरज नव्हती. त्या काळात वीज तर नव्हतीच पण रॉकेलचे कंदीलसुद्धा नव्हते. देवापाशी लावलेल्या समई किंवा निरांजनातल्या ज्योतीचा मिणमिणीत उजेड सोडल्यास घरात सगळीकडे काळोखच असायचा. अशा काळात भल्या पहाटे लवकर उठून समईच्या मिणमिणत्या उजेडात कसली कामे करणार? फार तर देवासमोर बसून कांही स्तोत्रं म्हणता येतील. ती सर्वांना तोंडपाठ असत. झुंजूमुंजू सकाळ झाली की उठायचं, स्नान, न्याहारी वगैरे करून कामाला लागायचं, दुपार झाली की जेवण करून थोडा आराम करायचा. पुन्हा वाटल्यास कांही वेळ काम करून दिवेलागणी व्हायच्या आंत घरी परत यायचं आणि संध्याकाळची जेवणं करून अंधार पडला की झोपी जायचं असा दिनक्रम होता. सांवल्यांवरून आणि कवडशावरून येणारा वेळेचा अंदाज त्याठी पुरेसा होता.

“आता आपण तास, मिनिटे, सेकंद यामध्ये वेळ मोजतो. तसे कांही मोजमाप तेंव्हा होते कां?”

“अभ्यासू विद्वानांनी आपल्या चिकित्सक वृत्तीने अगदी सूक्ष्म कालावधींच्या व्याख्या मात्र केल्या होत्या. त्याचा उपयोग ते मुख्यतः आपल्या शास्त्राभ्यासासाठी करीत असत. दिवस मोठा झाला की रात्र लहान होते आणि रात्र मोठी झाली की दिवस लहान हे चक्र चालू असतांना या दोघांची बेरीज फारशी बदलत नाही हे त्यांनी पाहिले आणि तिचे साठ भाग करून त्याला घटिका असे नांव दिले. ही आजच्या चोवीस मिनिटांएवढी असते. प्रत्येक घटिकेचे साठ भाग आणि त्यातील प्रत्येकाचे पुन्हा साठ भाग करून त्यांना पळ व विपळ अशी नांवे दिली. एक विपळ हा एका सेकंदाच्या पाव हिश्याहून थोडा लहान इतका सूक्ष्म असतो. सूर्य चंद्रांच्या निरीक्षणातून आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे रोजच सूर्य जितका वेळ आभाळात दिसतो त्यापेक्षा चंद्र सुमारे घटकाभर अधिक वेळ आभाळात रेंगाळतो. कदाचित त्यावरूनही त्यांना घटिका हे परिमाण सुचले असावे.”

“या परिमाणांचा उपयोग त्यांना कसल्या अभ्यासात होत असेल?”

“कुठलीही गोष्ट विशेषज्ञांच्या ताब्यात गेली की ते त्यात परफेक्शन आणण्यासाठी खूप काँप्लिकेशन्स करतात हे आपल्याला ठाऊक आहे. ज्योतिषशास्त्रातल्या तज्ञ मंडळींनी सगळ्या ग्रहांच्या भ्रमणाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. समजा एक ग्रह सतरा दिवसात तेवीस अंशाने पुढे सरकला तर तेवीस भागले सतरा इतके अंश, कला , विकला एवढे अंतर तो सरासरी रोज पुढे सरकला अशी त्याची सरासरी गती झाली. तसेच सतरा भागले तेवीस दिवस एवढ्या वेळात जितक्या घटिका, पळे, विपळे येतील तेवढ्या वेळात तो एक अंश पुढे गेला असे गणित मांडता येते. अशा प्रकारची असंख्य निरीक्षणे करून व गणिते मांडून त्यांनी ग्रहांच्या भ्रमणासंबंधीची सूत्रे निर्माण केली. एवढेच नव्हे तर तिथीसाठी एक शास्त्रशुद्ध परिमाण ठरवले. सूर्याच्या तुलनेने चंद्र बारा अंशाने पुढे जाईल तेंव्हा तिथी बदलायची असे ठरवले. त्यामुळे रोजचा दिवस सूर्योदयापासून सुरू झाला तरी तिथी दिवसा किंवा रात्री केंव्हाही बदलते. त्याची वेळ तसेच चंद्राने एका नक्षत्रातून पुढच्या नक्षत्रात प्रवेश करण्याची वेळ घटका पळे या परिमाणात हिशोब करून निश्चित करतात आणि पंचांगात दाखवतात. याखेरीज योग, करण वगैरे संकल्पना निर्माण करून त्याला अधिकाधिक सूक्ष्मता आणली.”

“पण ही इतकी सूक्ष्म वेळ मोजण्याची कोणती व्यवस्था होती?”

“पळे आणि विपळे प्रत्यक्षात मोजण्याची सोय होती की नाही ते मलाही माहित नाही. मला तशी माहिती मिळाली नाही. कदाचित त्या फक्त गणितातल्या संकल्पना असतील. घटिका मोजण्यासाठी मात्र एक विशिष्ट प्रकारचे पात्र असायचे. तळाला खाली छिद्र असलेले हे भांडे एका मोठ्या पात्रात पाणी भरून त्यात ठेवायचे. रिकामे भांडे पाण्यावर तरंगते. पण छिद्रातून हळू हळू पाणी आत शिरल्यावर ते जड होऊन हळू हळू खाली खाली जाते. पूर्ण भरत आले की पुरेसे जड झाल्याने एकदम भरून बुडून जाते. म्हणूनच ‘घटका भरली’ असा शब्दप्रयोग केला जातो. पात्राचा आकार तसेच छिद्राचा आकार नियंत्रित करून ते बरोबर एक घटकेमध्ये बुडावे याची खात्री करून घेत असतील. मुहूर्ताची वेळ यासारख्या महत्वाच्या वेळा दाखवण्यासाठी या घटिकापात्राचा उपयोग करीत असत.”

. . .. . . . . . . . . . .. . (क्रमशः)

आजीचे घड्याळ (कालगणना) – १०

aajeecheghadyal_10

पंचांगाची उपयुक्तता

“निसर्गातल्या, विशेषतः आकाशात घडणा-या घटनांचा उपयोग करून वेळ मोजण्याचं एवढं किचकट शास्त्र विद्वान लोकांनी बनवलं खरं. पण ज्योतिषांना सोडून इतर सामान्य माणसांना त्याचा काय उपयोग झाला असेल?” मिस्टरांनी विचारलं.

मी म्हंटले, “माझ्या मते भाषा आणि गणित यांच्यानंतर कालगणना हा माणसाच्या विज्ञानसाधनेतला एक सर्वात महत्वाचा पायाचा दगड म्हणता येईल. वस्तुमान, अंतर आणि काल या तीन मूलभूत तत्वांच्या परिमाणांच्या गुणाकार, भागाकारातून विज्ञानातील बाकीची सर्व असंख्य सूत्रे बनली आहेत. या तीन तत्वांच्या सखोल अभ्यासामधून आजचा विज्ञान व तंत्रज्ञानाचा डोलारा उभा राहिला आहे. विज्ञान हे सुद्धा विशेषज्ञांचे क्षेत्र झाले असे कदाचित तुम्ही म्हणाल.

आपण तुमचीच गोष्ट घेऊ. तुमची आणि तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची जन्म तारीख, लग्नाची तारीख, नववर्षदिन, भारताचा स्वातंत्र्यदिवस अशा कितीतरी तारखा तुमच्या दृष्टीने महत्वाच्या असतील. आजकाल दसरा, दिवाळी, पाडवा यासारखे आपले सणसुद्धा कॅलेंडरवर लाल रंगात दाखवलेले असतात तेच आपण पाहतो. पण जर हे कॅलेंडरच अस्तित्वात नसते तर केवढा गोंधळ झाला असता? तुम्हाला घरातल्या लोकांची वये किती आहेत हे देखील समजले नसते. तुमचं शिक्षण कधी आणि किती काळ झालं? नोकरी वा व्यवसाय केंव्हा सुरू केला? त्यात पदोन्नतीसारख्या महत्वाच्या घटना कधी घडल्या? तुमच्यावर कोणती संकटे कधी येऊन गेली? आनंदाचे क्षण देणाऱ्या गोष्टी कधी घडल्या? यातले कांहीसुद्धा सांगता आले नसते. हांतावर पोट असणाऱ्या लोकांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यामुळे कदाचित फार फरक पडणार नाही. पण त्या जाणीवांमुळे जीवनाला एक उंची प्राप्त होते. आपण भूतकाळातील घटनांचा क्रम लावला तर त्यांचा अभ्यास आणि सविस्तर विचार करून त्यातून धडे घेऊ शकतो. भविष्यकाळात करण्यासाठी कांही नियोजन करू शकतो. त्यासाठी आवश्यक असलेले छापील इंग्रजी कॅलेंडर आपल्याकडे घरोघरी फार तर शंभर वर्षापूर्वी आले. त्यापूर्वी पंचांगच होते. छापखाने नसल्यामुळे तेही घरोघरी नसायचे, पण आभाळात दिसणारे ग्रहताऱ्यांचे पंचांग आणि घड्याळ तर सर्वांना सहज उपलब्ध होते. आपापल्या कुवतीप्रमाणे त्याचा उपयोग ते करून घेत होते.

घडून गेलेल्या गोष्टी स्मरणामध्ये सुट्या सुट्या राहतात. त्या कधी आणि कोणत्या क्रमाने घडल्या हे समजले तर त्यांची सांखळी बनवून त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढता येतात. बऱ्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत असते. पूर्वीचा इतिहास आणि घटनाक्रम माहीत असेल तर पुढे काय होऊ शकते याची साधारण कल्पना येते. पेरणी केल्यानंतर किती दिवसांनी पीक येईल, कुठल्या झाडांना कुठल्या मोसमात फळे लागतील, वयाप्रमाणे मुलांची वाढ कशी होईल अशासारख्या अनंत गोष्टी वेळेनुसार घडत असतात. यामुळे कालगणनेचं महत्व माणसाला आपोआप समजत जाते. त्याची एक पद्धत निर्माण झाल्यावर त्याचा उपयोग करून जन्म मृत्यू यासारख्या महत्वाच्या गोष्टींची नोंद करण्याची वहिवाट सुरू झाली. पंचांग, कॅलेंडर असे कांहीच नसेल तर त्यात किती मर्यादा येतात ते मी सांगितलेच आहे. व्यक्तीगत आयुष्य असो वा सर्व समाजावर परिणाम करणाऱ्या घटना असोत, नैसर्गिक असोत वा मानवनिर्मित असोत, त्या घटना कधी घडल्या किंवा घडणार आहेत हे समजणे अत्यंत महत्वाचे आहे हे बहुतेक शहाण्या लोकांना पटले आणि अनेक प्रकारांनी तशा नोंदी ठेवल्या गेल्या.”

“पण आपली ही तिथी नक्षत्र वगैरेची जटिल पद्धती सामान्य लोकांना कशी समजली?” त्यांनी रास्त शंका काढली.

मी उत्तर दिले, “एकादी गोष्ट पुन्हा पुन्हा कानावर पडली तर पूर्णपणे नाही तरी थोडी थोडी समजायला लागते. यासाठी आपल्या पूर्वजांनी एक छान युक्ती काढली होती. आपल्या प्रत्येक पूजेच्या धार्मिक विधीमध्ये सुरुवातीलाच … नाम संवत्सरे, ..ऋतौ, .. मासे, ..पक्षे, ..शुभपुण्यतिथौ असे म्हणत त्या दिवसाची पूर्ण माहिती देऊन पुढे चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, सूर्य, गुरु, शनी वगैरे ग्रह कोणत्या राशीमध्ये आहेत या सगळ्यांचा उच्चार करायची प्रथा पाडली गेली. त्यामुळे ती सांगणाऱ्या पुरोहिताला तर एवढी अद्ययावत माहिती ठेवणे भाग पडत असे आणि निदान तेवढा अभ्यास करणारा एक वर्ग निर्माण झाला. तो पूजाविधी पाहणाऱ्या लोकांनाही ती माहिती कानावर पडल्यामुळे आपोआप कळत असे. अशा प्रकाराने त्या माहितीचे प्रसरण होत होते. मोटार कशी बनवायची हे ज्ञान ऑटोमोबाईल इंजिनियरला असलं तरी ती कशी चालवायची एवढं सर्वसामान्य माणूस शिकून घेतो. त्याचप्रमाणे महिना तिथी ऋतु एवढ्या गोष्टी कशा निर्माण झाल्या हे माहीत नसलं तरी त्यांची जुजबी माहिती सर्वसामान्य लोकांना मिळत होती.

ती माहिती आणखी पक्की व्हावी यासाठी अनेक उत्सवांचे दिवस तिथीनुसार ठरवले गेले. ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ त्या त्या कालावधीत कधीही साजरे करता आले असते. पण यात सर्व समाजाचा एकाच वेळी सहभाग होण्यासाठी विशिष्ट दिवशी सणाद्वारे ते साजरे करण्याची प्रथा रूढ झाली. यातील प्रत्येक सणाच्या दिवसाच्या निमित्ताने त्या काळामधल्या महिना व तिथी यांची उजळणी होत राहिली. अशा प्रकाराने आपल्या पूर्वजांनी फक्त कालगणनेची पद्धती निर्माण केली एवढेच नव्हे तर आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांनी ‘लॉँच’ केलेल्या या ‘प्रॉडक्ट’चे यशस्वीरीत्या ‘मार्केटिंग’ केले.”

. . . . . . . . . .. . . . . . .(क्रमशः)

आजीचे घड्याळ (कालगणना) -११

पंचांग की कॅलेंडर ?

“पण मग आपलं इतकं सर्वगुणसंपन्न असं पंचांग सोडून देऊन आपल्या लोकांनी इंग्रजी कॅलेंडरचा स्वीकार कां केला?” मिस्टरांनी विचारले.
मी उत्तर दिले, “मला तर भारतीय संस्कृतीचं प्रेम नाही, आपल्या पूर्वजांबद्दल आदर नाही, मी परकीयांचा धार्जिणा आहे असं तुम्ही राष्ट्रनिष्ठ लोक मला म्हणता. तेंव्हा खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायला हवं.”
ते निरुत्तर होऊन एकमेकांकडे पहायला लागले. मग मीच विचारले, “आपण भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला सूर्योदयानंतर पंचवीस घटकांनी पुण्याला जाणाऱ्या गाडीने जाऊ असं तुम्ही कोणाला सांगता का?”
“तसं बोललं तर ते कुणाला समजणार?”
“बरं, पंचवीस सप्टेंबरला दुपारी चारच्या बसने पुण्याला जाऊ असं म्हणता ना?”
“हो.”
“अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाची मिरवणूक पहायला पुण्याला जाऊ असंही म्हणत असाल. म्हणजे तुम्ही पंचांग सोडलेले नाही.”
“हो. कारण त्यातली अनंत चतुर्दशी सगळ्यांना माहीत असते.”
मी म्हंटले, “अगदी बरोबर! आपलं बोलणं ऐकणाऱ्याला कळावं हा बोलणाऱ्याचा मुख्य उद्देश असतो. आपलं पंचांग बनवतांना ते अधिकाधिक परिपूर्ण व्हावं यासाठी त्यात भरपूर माहिती घातली गेली. सामान्य माणसाला रोजच्या जीवनात त्या सगळ्या माहितीचा उपयोग होईल अशी अपेक्षाही नव्हती आणि त्याला ती रोजच्यारोज वापरण्याची गरजही नव्हती. पंचांगाचं हे मूळ स्वरूप आजसुद्धा तसेच राहिले आहे. संस्कृतऐवजी मराठी भाषा आली, इंग्रजी तारखांचा त्यात समावेश झाला आणि सूर्योदय व चंद्रोदयाची वेळ कलाक मिनिटांमध्य़े देतात एवढे बदल झाले असले तरी एकूण स्वरूप पूर्वीसारखेच राहिले. तिथी व नक्षत्रांच्या वेळा कलाक मिनिटांत दिल्या तरी तिथींमधले क्षय वृद्धी वगैरे टाळता येणार नाहीत. सूर्योदयाची वेळ गांवोगांवी वेगळी राहणार. त्यातही वेगवेगळ्या पंचांगकर्त्यांची मते वेगळी असतात. उत्तर भारतात विक्रम संवत पाळतात तर दक्षिणेत शालीवाहन शक, उत्तरेतला महिना पौर्णिमेनंतर सुरू होतो तर दक्षिणेतला अमावास्येनंतर, उत्तरेमध्ये नववर्ष कार्तिकापासून सुरू होतं तर दक्षिणेमध्ये चैत्रमासापासून. त्यामुळे एकाच दिवशी वेगवेगळ्या जागी निरनिराळ्या तिथी असू शकतात आणि एका तिथीचा अर्थ वेगवेगळा लागू शकतो. असे असंख्य फरक असल्यामुळे पंचांग वापरणे आता सोयिस्कर राहिलेले नाही. ”
“पण म्हणून परकीयांच्या कॅलेंडरला त्याची जागा द्यायची कां?”
“इंग्रजांच्या राज्यापाठोपाठ तिकडल्या औद्योगिक क्रांतीचे वारे भारतात आले. त्यामुळे घड्याळातल्या वेळेनुसार काम करणारी ऑफिसे, कारखाने, शाळा, कॉलेजे सुरू झाली. कामाचे आणि सुटीचे दिवस आणि वार ठरले, हक्काची व किरकोळ रजा यांचे नियम झाले. वेळापत्रकानुसार धांवणाऱ्या आगगाड्या सुरू झाल्या. या नव्या वातावरणात तारीख आणि वेळ यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. फक्त वार आणि तारीख या दोनच गोष्टी आठवड्याच्या कोष्टकात दाखवणारी कॅलेंडरे फारच सुटसुटीत होती. खिशात ठेवता येण्याजोगी छोटी, टेबलावर ठेवण्यासाठी थोडी मोठी आणि भिंतीवर टांगण्यासाठी मोठ्या अक्षरातली अशा त्याच्या विविध आवृत्या निघाल्या. त्यांच्याबरोबर रंगीबेरंगी चित्रे येऊ लागली. त्यात देवदेवतांची सुंदर चित्रे असतात तशाच नटनट्यांच्या मोहक हंसऱ्या छब्या असतात. निसर्गरम्य ठिकाणांची छायाचित्रे असतात तशाच प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती असतात. अशा प्रकारे कळायला अत्यंत सोपे आणि दिसायला आकर्षक असे कॅलेंडर लोकप्रिय झाले नसते तरच नवल!

पण “पंचांगाची जागा कॅलेंडरने घेतली” असे म्हणता येणार नाही. नव्या जीवनशैलीमुळे रोजच्या जीवनात तारखेचा उल्लेख येऊ लागला होता. त्यामुळे ती सुलभपणे समजणाऱ्या साधनाची आवश्यकता निर्माण झाली होती. ती जागा कॅलेंडरने काबीज केली. कॅलेंडरमधील महिना व तारखेबरोबरच त्या दिवसाची तिथी, नक्षत्र, संकष्टीच्या रात्री चंद्रोदयाची वेळ वगैरे माहिती देणारी नव्या प्रकारची कॅलेंडरे अलीकडच्या काळात बाजारात आली आणि त्यांनी प्रकाशनाचे जागतिक उच्चांक प्रस्थापित केले. एका अर्थाने पाहता कॅलेंडरला पंचांग जोडल्यामुळे ते अधिक लोकप्रिय झाले असे म्हणता येईल.”
“किंवा पंचांग एका नव्या स्वरूपात पुन्हा लोकांच्या समोर आले आहे असेही म्हणता येईल.”
“हो. कारण आपले बहुतेक सर्व सणवार निसर्गाबरोबर जोडलेले आहेत आणि त्यामधील अनेक उत्सवात चंद्राला महत्व आहे. कोजागिरीला शरदाचे चांदणे हवे आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती यायलाच हवी. हे सण इतर दिवशी येऊन चालणार नाही. नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी शुक्लपक्षातील चांदण्या रात्री हव्यात, तर दिव्याची अमावास्या किंवा दीपावलीचा दीपोत्सव साजरा करण्यासाठी अमावास्येचा अंधार हवा. महात्मा गांधींचा ‘बर्थ डे’ आपण तारखेने पाळू शकतो. पण राम, कृष्ण, हनुमान, दत्त, गौतमबुद्ध, महावीर, गुरु नानक यांच्या ‘जयंत्या’ कोणत्या तारखेला साजऱ्या करणार? या सगळ्या उत्सवांचे आपल्या जीवनात इतके महत्व आहे की त्यांच्याविना आपण राहूच शकत नाही.

याच कारणामुळे मुसलमान शासकांनी आणलेले हिजरी कॅलेंडर इथे लोकप्रिय होऊ शकले नाही. त्यांची कालगणनेची पद्धत संपूर्णपणे चंद्राच्या दर्शनावर आधारलेली असल्यामुळे त्यांच्या बारा महिन्यांचे वर्ष आपल्यासारखेच ३५४ दिवसात संपते. पण अधिक महिन्याची पद्धत नसल्यामुळे दर सहा वर्षात ऋतु बदलत जातो. ते आपल्या सणांना चालणार नाही. चैत्रगौर ऑगस्ट महिन्यात आली तर आंब्याची डाळ आणि पन्ह्यासाठी कैरी कशी मिळणार? त्याशिवाय आपल्या कृषीप्रधान संस्कृतीमध्ये पिकांची पेरणी, कापणी वगैरे गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात. त्यासाठी महिने आणि ऋतु यांत ताळमेळ असायला पाहिजे. त्यामुळे रोजच्या व्यवहारासाठी इंग्रजी कॅलेंडरचा स्वीकार केला असला तरी पंचांगावर आधारलेली पद्धतीसुद्धा प्रचारात राहिली आहे आणि राहणार आहे.”

. . . . . . . . .. .. . . . . . . . . (क्रमशः)

आजीचे घड्याळ (कालगणना) – १२

aajeecheghadyal_12

घड्याळ

“पंचांग जसं अजूनपर्यंत थोडं तरी आपल्या वापरात आहे तसं घटिकापात्र मात्र राहिलेलं नाही. ते कधीच नामशेष झालं. असं कां झालं असेल?” माझ्या मित्राने विचारले.
मी म्हंटले, “ते तर आता पुराणवस्तुसंग्रहालयातसुद्धा शोधावे लागेल. घड्याळाच्या मुकाबल्यात त्याचा टिकाव लागण्याची शक्यताच नव्हती. भारतातच नव्हे तर जगभर पुरातनकालातली वेळ मोजण्याची साधने आता कालबाह्य झाली आहेत.”
“असं कशामुळे झालं?”
“पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेहमी ‘किती वाजले’ ते घड्याळात पाहतो. घटिकापात्रात ते पाहण्याची सोय नाही. ते पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने भरून बुडले म्हणजे ‘एक घटिका झाली’ असे समजायचे. त्याआधी किती वेळ झाला ते कळणार नाही आणि घटिकापात्र बुडून गेल्याला किती वेळ झाला ते तर नाहीच नाही. यामुळे ते वेळ ‘दाखवणारे’ साधन नव्हते. त्या काळात तशा साधनाची गरजही नव्हती. आज आपण अमूक गोष्ट इतक्या वाजता झाली किंवा होणार आहे असे म्हणतो. पौराणिक किंवा ऐतिहासिक वाङ्मयात तसे उल्लेख दिसत नाहीत. तासाप्रमाणे घटिका ‘वाजत’ नव्हत्या. सूर्योदयानंतर इतक्या घटिकांनी अमका ग्रह तमक्या राशीत जाईल असे सांगण्यासाठी तिचा उपयोग होत असे. एक छोटासा ठराविक कालावधी मोजण्याएवढाच तिचा उपयोग होता. ‘हरिनामाचा गजर करणे’ किंवा ‘औषधी पाण्यात उकळत ठेवणे’ अशी कामे करण्यात लागणारा वेळ त्याने मोजता येत असेल. फार तर मरणासन्न माणसाच्या शेवटच्या घटका मोजून ठेवत असतील. अर्थातच ज्योतिषी लोक आपली निरीक्षणे करण्यासाठी सूर्योदय झाल्याबरोबर घटिका पात्र पाण्यात ठेऊन कालमापन करीत असतील आणि त्याकडे लक्ष ठेऊन दरवेळी घटिका संपताच ते पुन्हा पुन्हा रिकामे करून ठेवत असतील आणि किती घटिका सरल्या ते मोजत असतील. पण हे काम थोडे किचकटच होते आणि विशिष्ट कामासाठी विशेषज्ञ लोकच त्याचा उपयोग करू शकत असणार. सर्वसामान्य माणसाला अशा प्रकारे वेळ मोजण्याची गरज पडत नसेल.”
“त्या काळांत इतर देशात कोणती परिस्थिती होती?”
“त्या काळात जगभर साधारणपणे हीच परिस्थिती होती. घटिकापात्राप्रमाणेच थोडा वेळ मोजणारी साधनेच सगळीकडे उपयोगात असायची. त्यात कुठे मेणबत्तीच्या जळण्यावरून वेळ ठरवीत तर कुठे उदबत्तीच्या संपण्यावरून. थेंब थेंब टपकणाऱ्या पाण्याचासुद्धा त्यासाठी वापर केला गेला. कांच तयार करून त्याला आकार देण्याच्या तंत्राचा विकास झाल्यानंतर सुप्रसिद्ध ‘अवरग्लास’ आले. ही वाळूची घड्याळेसुद्धा घटिकापात्राप्रमाणेच ठराविक कालावधी मोजण्यासाठी उपयोगी पडत. सामुदायिक प्रार्थना आणि प्रवचने वगैरेमध्ये किती वेळ गेला हे त्यावरून ते पहात असत आणि वाटल्यास ते आटपते घेत असत. सनडायल्सवरून मात्र सूर्य माध्यान्हीवर येण्याची वेळ तेवढी नेमकी कळत होती. अजून माध्यान्ह व्हायला किती वेळ आहे किंवा तो होऊन किती वेळ झाला हे इतर वेळी सांवलीच्या लांबीवरून समजायचे. पण ते पाहण्यासाठी स्वच्छ ऊन तर पडायला पाहिजे!”
“आपल्या घटिकापात्राचा आणखी कशा प्रकाराने उपयोग करता आला असता कां?”
“इतर घड्याळांची रचना पाहिल्यावर असे वाटते की घटिकापात्रातही कांही सुधारणा करता आल्या असत्या. दोन, चार किंवा दहा घटिका पाण्यावर तरंगणारी वेगवेगळी पात्रे बनवता आली असती किंवा त्या पात्रांवर बाहेरून आडव्या रेघा कोरून ते पाण्यात कुठपर्यंत बुडले ते पाहून त्यावरून वेळ ठरवता आली असती. ते पात्र हळू हळू पाण्यात खाली जात असतांना होणारी त्याची हालचाल टिपता आली असती. त्याठी एक दोरा बांधून त्याच्या दुसऱ्या टोकाला सरकणारा किंवा फिरणारा कांटा जोडता आला असता. अशा कांही कल्पना सांगता येतील. त्यातल्या कांहींचा उपयोग करून घेतला गेलासुद्धा असेल. किंवा मुळात कुणाला त्याची गरजच वाटली नसेल. आता त्याबद्दल विशेष माहिती नाही.”
“तास मिनिटाची वेळ काट्याने दाखवणारी घड्याळे कशी अस्तित्वात आली?”
“फिरणाऱ्या चाकाचा शोध लागल्यानंतर गाडी, जाते, रहाट, चरखा अशा प्रकारच्या अनेक यंत्रांत त्याचा उपयोग होता होता त्याचा अधिकाधिक विकास होतच होता. दांते असलेली चक्रे (गियर) एकमेकांना जोडून त्यांना वेगवेगळ्या वेगाने फिरवणाऱ्या यंत्रांचा विकास झाल्यानंतर त्यांच्या योगाने फिरणारे तास व मिनिटे दाखवणारे कांटे बनवण्याची कल्पना कोणाला तरी सुचली. अशा प्रकारचे पहिले घड्याळ सुमारे सातशे वर्षांपूर्वी बनवले गेले. ते कांटे फिरवण्यासाठी एका दोरीला टांगलेल्या वजनाचा उपयोग होत होता. पण अशा प्रकारे गुरुत्वाकर्षणाने खाली पडणारी वस्तू एका वेगाने खाली पडत नाही. तिचा वेग सतत वाढत जातो. त्यावर उपाय म्हणून त्याचे खाली पडणे थांबवणारे दुसरे एक छोटे चाक त्यालाच जोडले. हे ‘नियंत्रक चाक’ ठराविक कालावधीने मुख्य चाकाला आळीपाळीने खीळ घालत असे आणि ढील देत असे. या प्रत्येक वेळी उडणाऱ्या खटक्यामुळे घड्याळाची ‘टिकटिक’ सुरू झाली. या टिकटिक करणाऱ्या कांट्यांच्या घड्याळांना एक नाविण्यपूर्ण शोभेची वस्तू म्हणून अमीर उमरावांमध्ये मान्यता मिळाली आणि ती प्रतिष्ठितांचे दिवाणखाने सजवू लागली. त्यामुळे आपोआपच त्यावर कलाकुसर केली जाऊ लागली. आकर्षकता वाढवण्यासाठी दर अर्ध्यातासाला टोले वाजवणारी घंटा कोणीतरी जोडली. एका डोकेबाज संशोधकाने टोल्यांऐवजी कुकू अशी शीळ घालणाऱ्या शिट्या त्याला जोडून दिल्या. जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्ट विभागात अशी कुकू क्लॉक तयार करण्याचा ग्रामोद्योगच सुरू होऊन भरभराटीला आला.”

“पुढे काय झालं?”
“गॅलीलिओ या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञाने लंबकाच्या आवर्तनांना ठराविकच वेळ लागतो हा शोध लावल्यावर त्याच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करकण्यासाठी केला जाऊ लागला आणि अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली. या सुमारास औद्योगिक क्रांतीला वेग आल्याने कारखाने सुरू झाले व एका नव्या संस्कृतीची सुरुवात झाल्यामुळे वेळेचे महत्व अचाट वाढले. सर्वसामान्य लोकांना वेळ कळावी यासाठी गांवोगांवी क्लॉकटॉवर्स बांधण्यात आले. त्याची उंच इमारत गांवात कोठूनही दिसत असे व त्याच्या माथ्यावर बसवलेल्या घड्याळाचे कांटे पाहता येत असत. दर अर्ध्या तासानंतर वाजणारे त्याच्या घंटेचे टोल किती वाजले याची जाणीव करून देत असत. अशा तऱ्हेने घड्याळे ‘वाजायला’ लागली. त्यांच्या घरात ठेवण्याजोग्या छोट्या आवृत्या निघाल्या आणि घरोघर पोचल्या. सुरुवातीला ही घड्याळेसुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या जोराने खाली पडणाऱ्या वजनांवरच चालत. त्यासाठी उंच टॉवर बांधले जाऊ लागले. कांही काळाने त्याऐवजी स्प्रिंगचा उपयोग करता येऊ लागला.”

“आता तर त्याचीसुद्धा गरज नसते. घड्याळे ऑटोमॅटिक झाली आहेत.”
“आकाराने छोट्या पण शक्तीशाली बॅटरीसेल्सचा शोध लागल्यानंतर किल्ली फिरवण्याचीही गरज उरली नाही. इलेक्ट्रॉनिक्समधील विकासानंतर फिरणारी चांकेसुद्धा कालबाह्य झाली. त्यामुळे घड्याळांच्या रचनेत आता खूपच सुटसुटीतपणा आला आहे. त्यातही आता असंख्य मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आजीच्या घड्याळाची कोणाला आठवण राहिलेली नाही. पण त्याचे महत्व मात्र कधीही संपणार नाही. ज्या घड्याळाला प्रत्यक्ष सूर्य ऊर्जा पुरवतो, ज्याचे नियंत्रण पृथ्वी करते आणि चंद्र, मंगळ, गुरू वगैरे ज्याचे कांटे तारकांच्या पडद्यावर फिरत असतात, ते निसर्गाचे घड्याळ यावत्चंद्रदिवाकरौ चालतच राहणार आहे.”

“आम्हालाही या निमित्ताने खूप माहिती मिळाली.” मित्राने कबूली दिली.

. . . . . . . . . . . . . . .(समाप्त)

One Response

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: