तोच चन्द्रमा नभात भाग १


तोच चन्द्रमा नभात भाग १
ग्यानबाचे तर्कट
सूर्य श्रेष्ठ का चन्द्र या मुद्यावर ग्यानबा आणि ज्ञानेश यांचेमध्ये वाद चालला होता. ज्ञानेशने धडाधड मोठमोठी आकडेवारी देऊन सूर्याचा व्यास चन्द्राच्या चारशे पट, क्षेत्रफळ दीड लक्षपट. घनफळ सहा कोटीपट आणि वस्तुमान तीन कोटी पट असल्याने तो केवढा प्रचंड आहे आणि त्यापुढे चन्द्र किती क्षुद्र आहे ते सांगितलं. त्यावर ग्यानबानं विचारलं, “काय रं, तू परतेक्ष आभाळात जाऊन ही सगळी मापं घ्येऊन आलास का? न्हाई ना ? म्या परवा पुनवेच्या सांजच्याला ह्या डोळ्यांनी येका बाजूला सूर्याला मावळतांना आणिक दुस-या बाजूला चन्द्राला उगवताना ध्यान देऊन पाह्यल्यालं हाय. दोघांचं बी गोल डिट्टो सारखंच व्हतं की. मला तर वाटलं की चन्द्रच कांकणभर मोठा दिसत व्हता.” (बरोबरच आहे. यामुळेच खग्रास सूर्यग्रहण होऊ शकतं).

ग्यानबा पुढे म्हणाला, “अरं पहाटेला सुदीक आधी तांबडं फुटतं, काळोख न्हाईसा व्हतो आणि झुंजूमुंजू दिसायला लागल्यानंतर सूर्व्या आपल्या गुहेतून भाईर येतो आणि सांच्याला अंधार व्हायच्या आत पुन्ना गडप होऊन जातो. आपला चान्दोबा मात्तुर अंधाराला घाबरत न्हाई हां. त्यो रातच्याला बी येऊन थोडा तरी परकाश देतो. मग आता दोघात कोन मोठा त्ये तूच सांग.”

“काय अडाणी माणूस हा?” असं तुम्ही म्हणाल, पण मी पाहिलंय् की जगातले अगदी माझ्यासकट बहुतेक सगळे लोक ग्यानबापेक्षा फारसे वेगळे नाहीत. प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानी पाहिलेल्या गोष्टींवर त्यांचा प्रचंड विश्वास असतो, त्यानंतर कानांनी ऐकलेल्या आणि वाचनात आलेल्या गोष्टींवर ते त्या क्रमाने विश्वास ठेवतात.

मी सुध्दा जन्मापासून सूर्यचन्द्रांना पूर्वेला उगवतांना आणि आभाळाच्या या बाजूपासून त्या बाजूपर्यंत हळूहळू जाऊन पश्चिमेला मावळतांना रोजच पहात होतो. त्यामुळे पृथ्वीच्या स्वतःभोवती गिरकी घेण्यामुळे हा सगळा निव्वळ आभास होतो हे शाळेत शिकल्यानंतर सुध्दा ती गोष्ट मनाला पटायला आणि नीट उमजायला अनेक वर्षांचा काळ लागला. शाळेत त्याबरोबर आणखी कांही गोष्टी शिकलो होतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, चन्द्र पृथ्वीभोवती तसेच स्वतःभोवती फिरतो, आपल्याला त्याचा फक्त अर्धाच भाग दिसतो वगैरे वगैरे. पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत चन्द्र तेरा वेळा तिच्याभोवती फिरतो (बहुतेक लोक बारा वेळा असे समजतात). यामुळे त्याचा अवकाशातील मार्ग एखाद्या फुलांच्या हारासारखा किंवा इमरती या मिष्टान्नाच्या आकाराचा असणार असं मला वाटायचं. जवळजवळ चाळीस वर्षे मी असंच समजत होतो.

( क्रमशः )

One Response

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: