तोच चन्द्रमा नभात भाग ३

तोच चन्द्रमा नभात  भाग ३
गिरकी की प्रदक्षिणा की फुगडी
 
चन्द्राची पृथ्वीप्रदक्षिणा आणि स्वतःभोवती फिरणे हे तंतोतंत सारख्याच वेळांत होणे हा एक निव्वळ योगायोग असू शकेल असे माझ्या मनाला कधीच पटले नव्हते. या दोन्हीमधील समानतेचं कारण शोधायला फारसे कष्ट पडले नाहीत. गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणारा टाइडल कपलिंग नांवाचा एका प्रभाव याला कारणीभूत आहे. चन्द्राच्या व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्राचे पाणी वर उचलले जाते व त्यामुळे तात्पुरती भरती ओहोटी येते हे आपल्याला माहीत आहे. पण पृथ्वीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने चन्द्राच्या पृथ्वीकडील बाजूला मात्र एक कायमचाच फुगीरपणा आणला आहे. यामुळे जड बुडाचा विदूषक जसा नेहमी सरळ उभा राहतो तसंच कांहीसं चन्द्राचं झालं आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर चन्द्राच्या अणुरेणूंना पृथ्वीच्या अणुरेणूंनी सर्व बाजूंनी असं कांही जखडून ठेवलं आहे की ते हूं का चूं करू शकत नाहीत आणि चन्द्राची अवस्था घाण्याला बांधलेल्या बैलासारखी  झालेली आहे.

घाण्याभोवती फिरतांना बैल सुध्दा सतत दिशा बदलत असतो. त्यामुळे तो जसा आणि जितका स्वतःभोवती फिरतो तितकाच चन्द्रही त्याच्या स्वतःभोवती फिरत असतो. चन्द्र स्वतःभोवती फिरतो म्हणजे भोव-यासारखी गिरकी घेतो अशी पूर्वी माझी सुध्दा समजूत होती. पण प्रत्यक्षात तसले कांही एक घडत नाही. पृथ्वीभोवती फिरताफिरतांना त्याची स्वतःभोवतीही एक फेरी मारून होते एवढेच. एकाद्या गोल आकाराच्या देवळाला प्रदक्षिणा घालतांना आपणही असेच स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालत असतो. त्या मंदिराचा आकार लहान होत होत शून्य झाला तर मात्र ती यानिकानिच पापानि म्हणत जागच्या जागी घातलेली प्रदक्षिणा होते.

पण चन्द्र खरेच पृथ्वीभोवती तरी फिरतो कां? वर वर पाहता तसे दिसते खरे. पण सूक्ष्म निरीक्षणानंतर असे लक्षात आलं की चन्द्र मुळात पृथ्वीच्या केन्द्रबिन्दूभोवती फिरतच नाही. त्याचे तसे फिरणे पदार्थविज्ञानाच्या नियमात बसतही नाही. मग प्रत्यक्षात काय होत असते? पृथ्वी व चन्द्र हे एका अदृष्य आणि शून्य वस्तुमानाच्या लांब काठीने एकमेकांना एकाद्या डम्बेलसारखे जोडले आहेत असे समजले तर त्या दोघांचा मिळून जो समायिक गुरुत्वमध्य येईल त्याभोवती तो डम्बेल भोव-यासारखा फिरत असतो. पण पृथ्वीचे वस्तुमान चन्द्राच्या ऐंशीपट इतके जास्त असल्यानुळे हा बिन्दू तिच्या पोटातच कुठेतरी येतो. दोघांमधील अंतर कमी जास्त होत असल्यामुळे तो बिन्दूही एका जागी स्थिर न राहता थोडा आंत बाहेर सरकत असतो. एक आडदांड पैलवान दीड दोन वर्षाच्या मुलाबरोबर फुगडी घालतांना कसे दृष्य दिसेल? पैलवान जागच्या जागीच राहील आणि मूल त्याच्याभोवती गिरक्या घेईल. तसाच कांहीसा प्रकार इथे होतो. पृथ्वीचे हे फिरणे तिच्या बाकीच्या भ्रमणाच्या पुढे अत्यंत  सू्क्ष्म असल्यामुळे आपल्याला मात्र ते जाणवतही नाही.

( क्रमशः )

One Response

  1. […] एकमेकांभोवती फिरत असतात हे मी तोच चंद्रमा नभात या मालिकेत दाखवले होते. चंद्रातला प्रत्येक कण […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: