तोच चन्द्रमा नभात भाग ४

तोच चन्द्रमा नभात  भाग ४
 रोजचाच चन्द्र असतोही नवा नवा
 
टाइडल इफेक्ट असेल किंवा नसेल पण चन्द्राचा जो चेहरा आपण अगदी लहानपणापासून पाहिला आहे तो जसाच्या तसा आजही दिसतोच ना! हजारो वर्षापूर्वी संस्कृत कवींनी त्याला शशांक म्हटलेले आहे त्यांनाही त्यावर सशाचीच आकृति दिसली होती म्हणूनच. चन्द्र रोजच्या रोज कलेकलेने वाढत किंवा लहान होत असला तरी दर पौर्णिमेला दिसणारे त्याचे पूर्ण बिंब जसेच्या तसेच असते असे सर्वसामान्य माणसांना वाटते. पण चिकित्सक लोकांना सूक्ष्म निरीक्षण केल्यावर त्यातला फरक जाणवायला लागला.

कधी त्याचा आकार जरासा मोठा वाटायचा तर कधी त्या मानाने लहान. कधी तो जास्त प्रकाशमान वाटायचा तर कधी कमी. पृथ्वी आणि चन्द्र या दोघांच्याही कक्षा लंबवर्तुळाकार आहेत हे सिध्द झाल्यावर याचा उलगडा झाला. जवळची वस्तु मोठी दिसते आणि जसजशी ती दूर जाईल तसतशी लहान होत जाते हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे जेंव्हा चन्द्र सूर्याच्या आणि पृथ्वीच्या दोघांच्याही जवळ असेल तेंव्हा आकाराने मोठा व अधिक प्रकाशमान दिसणार व याच्या उलट स्थितीमध्ये लहान व मंद दिसणार हे उघड आहे.

शास्त्रज्ञांनी जेंव्हा पौर्णिमेच्या चन्द्राचे फोटो बारकाईने पाहिले तेंव्हा त्यांना त्यावरील सशाचा आकारही थोडा थोडा वेगवेगळा वाटायला लागला. त्यांनी ते फोटो एकमेका पाठोपाठ प्रोजेक्ट केले तेंव्हा तो ससा चक्क डुगडुगायला लागला. आता हा काय प्रकार आहे याचा विचार केल्यावर लक्षात आलं की पृथ्वीची कक्षा व चन्द्राची कक्षा या एका सपाट प्लेनमध्ये नसून त्यामध्ये पांच अंशांचा कोण आहे. त्यामुळे पृथ्वीच्या कक्षेच्या पातळीशी तुलना करतां चन्द्र रोजच थोडा वर खाली होत असतो आणि यामुळेच प्रत्येक पौर्णिमेला चन्द्रग्रहण आणि अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. खुर्चीवर बसलेल्या माणसाचा फोटो आपण खाली बसून घेतला तर त्याच्या हनुवटीखालचा भाग त्यात येईल आणि उभे राहून घेतला तर डोक्यावरचा जास्त भाग दिसेल. याचप्रमाणे पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या दिवशी पाहिल्यास आपल्याला चन्द्राचा थोडासा वरचा, खालचा आणि दोन्ही बाजूंचा जास्तीचा भाग दिसू शकतो. या सर्वांची गोळाबेरीज करून आपल्याला पृथ्वीवरून चन्द्राचा जवळ जवळ ५८ टक्के भाग दिसतो. फक्त अर्धाच भाग दिसतो असे म्हणणे हे अर्धसत्य होईल. उरलेल्या ४२ टक्क्याचे दर्शन घेण्यासाठी मात्र रॉकेटमध्ये बसून चन्द्राच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे.

तर असा हा रोजचाच चन्द्र कुणाचा तरी हात हातात आल्यावर धुंद हवेमध्ये कवीला नवा नवा भासतो. पण खरं सांगायचं तर हा रोज वेगळाच असतो, नवा नवाच असतो.

                                                                             ( क्रमशः )

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: