तोच चन्द्रमा नभात – भाग ५

तोच चन्द्रमा नभात – भाग ५
 चन्द्र असतो साक्षीला
 
असा हा नित्य नवा दिसणारा चन्द्र सूर्याइतका श्रेष्ठ नसेल कदाचित, पण अत्यंत आकर्षक आणि लोकप्रिय मात्र नक्कीच आहे. एखाद्या रडणा-या लहान मुलाला त्याची आई खिडकीशी नेऊन चांदोबा दाखवते आणि ते लगेच हंसायला लागतं. “निंबोणिच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई” यासारखी अंगाई गीतं ऐकत आणि “चांदोबा चांदोबा भागलास कां” वगैरे बालगीतं म्हणत मुलं लहानाची मोठी होतात. तरुण वयांत “चांदण्यात फिरतांना” हातात हात धरता धरता “चांद मातला मातला त्याला कशी आवरू” अशी त्यांची अवस्था होते. उतारवयाची चाहूल कपाळावरील चन्द्रकोरीच्या रूपानं लागते आणि कांही लोकांच्या माथ्यावर त्याचा तुकतुकीत पूर्णचन्द्र होतो. अशा त-हेने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर साक्षीला चन्द्र हजर असतो.

अगदी अनादिकालापासून माणसाला चन्द्राबद्दल आकर्षण वाटत आलं आहे. साक्षात प्रभू रामचन्द्रांनीसुध्दा बालपणी चन्द्राला हातात धरण्याचा हट्ट धरला होता आणि त्यांच्या हातात आरसा देऊन व त्यातले चन्द्राचे प्रतिबिंब दाखवून त्यांची समजूत घातली गेली होती. चन्द्र हाच सूर्याचा प्रकाश परावर्तित करणारा एक आरसा आहे असे महर्षी वाल्मिकींना यातून सुचवायचे आहे असेही कदाचित कुणी तरी म्हणेल.
आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये चन्द्राचा अनेक प्रकाराने उल्लेख आलेला आहे.

वेद, उपनिषद, श्रुति, स्मृति, पुराण असल्या कुठल्याही संस्कृत साहित्याचे मूळ भूर्जपत्र कां काय म्हणतात ते वाचणे सोडा मी नुसते दुरून पाहिलेले सुध्दा नाही. खरे तर कुठल्याच विषयाचा सखोल अभ्यास करून त्यात प्रकांड पांडित्य, विशेष प्राविण्य वगैरे मिळवण्यापेक्षा गाठीला जेवढं कांही लागलेले असेल त्याचा उपयोग करण्याकडे माझा कल असतो. त्यामुळे साध्या वांग्याच्या भरितापासून गुंतागुंतीच्या यंत्राच्या डिझाईनपर्यंत जे कांही मी आयुष्यात स्वतःच्या हातांनी केले त्यावर “इतकी साधी गोष्ट माहीत नव्हती तर हा उपद्व्याप कशाला केलास?” असा प्रश्न करणारे तज्ञ मला पदोपदी भेटले आणि मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. कारण मला त्यातून कांही ना कांही शिकायला मिळाले आणि कांही लोक माझ्या हातचे वांग्याचं भरीत मिटक्या मारीत खायला लागले. आतासुध्दा वंशपरंपरा आणि गुरुशिष्यपरंपरा यातून जे कांही ज्ञानाचे कण माझ्या झोळीत आपसूक येऊन पडले आणि आम जनतेला सहज उपलब्ध असलेल्या साधनातून मला जी कांही माहिती मिळाली तेवढ्या तुटपुंज्या आधारावर मला जेवढे समजले ते मी या जागी पुढील भागांमध्ये सांगणार आहे.  
                                                                                                  (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: