तोच चन्द्रमा नभात – भाग ६

तोच चन्द्रमा नभात – भाग ६
 पुराणातला चन्द्र

देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्रमंथनातून “लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा” वगैरे चौदा रत्ने निघाली त्यातलेच एक रत्न अशी चन्द्राच्या उत्पत्तीची कथा पुराणांत सांगितली आहे. त्यापूर्वीच “देवी दैत्यी सागरमंथन पै केले। त्यामाजी अवचित हलहल जे उठले। ते त्वा असुरपणे प्राशन केले। नीळकंठ नाम प्रसिध्द झाले।।” ही घटना होऊन गेलेली होती. हलाहल विषाचे प्राशन करून त्यापासून सर्व जगाचे रक्षण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देव व दानवांनी एकमताने तो सुंदर चन्द्रमा भगवान शंकराला अर्पण केला आणि त्याने त्याला आपल्या मस्तकी धारण केला. गणपती हा शंकराचा प्रियपुत्र.  कधीतरी त्याने तो आपल्या कपाळावर लावला असावा. त्यामुळे “नवमं भालचन्द्रंच” असं एक गणपतीचं नांव पडलं. या गोष्टींमध्ये चन्द्राला फक्त एक चमकदार शोभेची वस्तु मानलेले आहे.

समुद्रमंथनातून शेवटी अमृत निघाले तेंव्हा भगवान विष्णु मोहिनीचं रूप धारण करून तिथे आले आणि त्यांनी चतुराईने ते देवांना वाटले. परंतु एक दानव आपले रूप पालटून देवांच्या गर्दीत घुसला होता. त्याची ही लबाडी सूर्य व चन्द्र यांनी उघडकीला आणली व त्याचा शिरच्छेद केला. पण अमृतप्राशन केलेले असल्यामुळे तो आधीच अमर झालेला होता. त्यामुळे त्यापासून राहू व केतु असे दोन दैत्य निर्माण झाले आणि ते सूर्य चन्द्रांचे हाडवैरी बनले अशी त्यांची कुळकथा आहे.

एकदा गणपति आपल्या उंदरावर बसून जात असतांना तोल जाऊन खाली पडला. नेमका तिथे त्यावेळी चन्द्र हजर होता आणि हे दृष्य पाहून खो खो हंसू लागला. पडून लागलेल्या शारीरिक वेदनेपेक्षा हा अपमान जास्त असह्य होता. त्यामुळे गणपतीने चन्द्राला घोर शाप दिला. चन्द्राने  क्षमायाचना करून  खूप गयावया केल्यावर त्याला उःशाप मिळाला पण गणेशचतुर्थीच्या दिवशी त्याचे दर्शन मात्र कायमचे वर्ज्य झाले अशी कहाणी प्रचलित आहे.

दक्ष प्रजापतिच्या अश्विनी, भरणी वगैरे सत्तावीस कन्यकांबरोबर चन्द्राचा विवाह झाला होता. पण तो सदा न कदा आपल्या आवडत्या रोहिणीच्याच संगत असायचा. यामुळे बाकीच्या सव्वीस जणींनी आपल्या पित्याकडे तक्रार केली. त्याने जांवयाला समजावण्याचा प्रयत्न केला पण जावई कांही त्याला दाद देईना. तेंव्हा रागाच्या भरात सास-याने त्याचा क्षय होत होत अंत होईल असा शाप दिला. यानंतर चन्द्राने क्षमा मागितली, यापुढे सर्व राण्यांना समान वागणूक देण्याचे आश्वासन सुध्दा दिले पण त्याला फार उशीर झाला होता. दिलेला शाप मागे घेण्याचे सामर्थ्य दक्षाकडे नव्हते. शेवटी चन्द्र आणि रोहिणी दोघांनी भगवान शंकराची आराधना केली. तेंव्हा शंकराने चन्द्राला असे वरदान दिले की क्षय होत होत एक दिवस अदृष्य झाल्यानंतर तो पुन्हा प्रगट होऊन वृध्दिंगत होईल आणि पूर्णत्व प्राप्त करेल. आलटून पालटून क्षय व वृध्दीचा हा क्रम त्यापुढे चालत राहील. ज्या ठिकाणी ही तपश्चर्या व वरदान झाले तिथे सोमनाथाचे ज्योतिर्लिंग निर्माण झाले अशी त्यासंबंधीची आख्यायिका आहे.

या सर्व गोष्टीतून चन्द्र सुध्दा आपल्यासारखाच साधाभोळा, सरळमार्गी आणि सौम्य प्रकृतिचा आहे असे वाटतं, त्याच्याबद्दल आपुलकी वाटायला लागते.
                                                      (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: