तोच चन्द्रमा नभात – भाग ९

तोच चन्द्रमा नभात – भाग ९
 प्राचीन खगोलशास्त्र

आपल्या पूर्वजांनी आकाशातील तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर चन्द्राच्या भ्रमणाचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले. इतकेच नव्हे तर ते त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात फार सुंदर रीतीने उपयोग करून घेऊ लागले. एक दिवस (अमावस्येला) चन्द्र अजीबात दिसत नाही, दुस-या दिवसापासून कलेकलेने वाढत जाऊन पंधरावे दिवशी (पौर्णिमेला) तो पूर्ण गोलाकार दिसतो. त्यानंतर पुन्हा लहान होता होता एक दिवस अदृष्य होतो आणि या चक्राची नियमितपणे पुनरावृत्ति होत राहते हे लक्षात आल्यावर त्यांनी अमावास्या ते पौर्णिमा व पौर्णिमा ते पुढील अमावास्या यांमधील दिवसांना प्रतिपदा, द्वितिया वगैरे नांवे दिली आणि सुमारे तीस दिवसांचा एक महिना असे ठरवून त्याचा उपयोग  कालगणना करण्यासाठी करून घेतला. चन्द्र वाढत असू दे वा घटत असो तो रोज आदल्या दिवशीपेक्षा सुमारे दोन घटका उशीरा उगवतो आणि दररोज त्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या तारका असतात हे त्यांनी पाहिलं. एवढंच नव्हे तर आज जे तारे  त्याच्या सोबत आहेत तेच बरोबर सत्तावीस दिवसांनी पुन्हा त्याच्या संगतीत असतात आणि या एका वेगळ्या चक्राची सुध्दा नियमितपणे पुनरावृत्ति होत राहते हे त्यांनी जाणलं. आकाशात पसरलेल्या असंख्य तारका अव्यवस्थितपणे विखुरलेल्या नाहीत. त्या एकमेकापासून ठराविक दिशेला व ठराविक अंतरावरच दिसतात. त्यांचे सोयीनुसार गट केले तर ते गट सुध्दा एकमेकापासून ठराविक अंतर ठेवतात. त्यात तसुभरसुध्दा अंतर पडत नाही वगैरे गोष्टी त्यांना समजल्या होत्या.  चन्द्राच्या प्रत्येक दिवसाच्या मार्गक्रमणावरून त्यांनी आकाशातल्या त्या मार्गावरील तारकांची सत्तावीस समूहात विभागणी करून नक्षत्रांची संकल्पना बनवली.

चन्द्रकोरीच्या आकारावरून तिथि आणि तिच्या जवळ दिसणा-या ता-यांवरून नक्षत्र अशा दोन प्रकारांनी प्रत्येक दिवसाचा संदर्भ निश्चित झाला. एका पौर्णिमेपासून दुस-या पौर्णिमेपर्यंतचा कालावधी २९ किंवा ३० दिवसाचा असतो पण सत्तावीस नक्षत्रामधून फिरून चन्द्र तारकामंडलातल्या आपल्या पूर्वीच्या जागेवर २७ दिवसातच पोचतो व  पौर्णिमेपर्यंत तो दोन किंवा तीन नक्षत्रे पुढे गेलेला असतो. यामुळे प्रत्येक पौर्णिमेचा पूर्णचन्द्र अर्थातच वेगळ्या नक्षत्रात दिसतो. याचा उपयोग करून चित्रा, विशाखा वगैरे नक्षत्रांच्या नांवाने चैत्र, वैशाख वगैरे महिन्यांची नांवे पडली.

दिवस आणि रात्र यांचा कालावधी समान नसतो. सहा महिने दररोज दिवस मोठा होत जातो तसतशी रात्र लहान होत जाते, पुढच्या सहा महिन्यात याच्या नेमके उलट घडते वगैरेचे बारकाईने निरीक्षण त्यांनी केले. त्या अनुषंगाने उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा वगैरे ऋतु सुध्दा एकापाठोपाठ विशिष्ट क्रमाने येतात.  सूर्य आकाशात असतांना कुठलेच तारे दिसत नाहीत पण सूर्योदयापूर्वीच्या व सूर्यास्तानंतरच्या अंधारात निरीक्षण करून सूर्याच्या आजूबाजूला कुठले तारे आहेत पण डोळ्यांना दिसत नाहीत त्याचा अंदाज त्यांनी घेतला. चन्द्राप्रमाणेच सूर्यसुध्दा जवळ जवळ त्याच मार्गाने आभाळात भ्रमण करतो आणि त्याला एक आवर्तन पूर्ण करायला सुमारे बारा महिन्याएवढा कालावधी लागतो हे त्यांनी नमूद केले. या तीन्ही चक्रांची सुमारे बारा महिन्यांनी पुनरावृत्ति होत राहते हे पाहून त्यांनी बारा महिन्यांचे एक वर्ष हे परिमाण ठरवले. अशा प्रकारे संपूर्ण वर्षभरातील प्रत्येक दिवस निश्चित झाला. सत्तावीस नक्षत्रांमधील सर्व तारकांचे बारा गटात विभाजन करून त्यांना बारा राशींच्या नांवाने ओळखू लागले.

रात्रीच्या वेळी आकाशाचे बारकाईने निरीक्षण करतांना त्यांच्या असेही लक्षात आले की सूर्य व चन्द्र यांशिवाय आणखी पांच तेजोगोल इतर असंख्य चांदण्यापेक्षा थोडे वेगळे दिसतात. एवढेच नव्हे तर ते कुठल्याही नक्षत्राचा वा राशीचा भाग होऊन न राहता हळू हळू आपल्या जागा बदलत असतात. त्यांना ग्रह अशी संज्ञा देऊन मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनि ही नांवे दिली. चन्द्र व सूर्याच्या आधाराने दिवस, महिना, वर्ष ही कालगणनेची जी परिमाणे बनली होती त्यांच्या आधाराने या पांच ग्रहांच्या भ्रमणाचा वेध घेतला आणि आपापली निरीक्षणे व निष्कर्ष नमूद करत गेले. अर्थातच हे अत्यंत कौशल्याचे आणि जिकीरीचे काम आहे. ज्या काळी साधी फुटपट्टी किंवा कंपास बॉक्स अस्तित्वात नव्हता, लिहून ठेवायला कागद पेन्सिल नव्हते त्या काळात वर्षानुवर्षे अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून व  त्याचा अभ्यास करून त्या लोकांनी सर्व ग्रहांच्या गतिंची नोंद करून ठेवली हे पाहून मन थक्क होते.

……………………………. (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: