तोच चन्द्रमा नभात – भाग १०

तोच चन्द्रमा नभात – भाग १०
 कालगणनाशास्त्र

प्राचीन कालातील विद्वानांना ग्रहांच्या गतीचे निरीक्षण करतांना असे दिसले की त्यांमध्ये खूपच विविधता आहे. या ठिकाणी म्हणजे पूर्वीच्या काळात ग्रहांची गति याचा अर्थ पृथ्वीवरून पाहिल्यावर आकाशात तारकामंडलाच्या पार्श्वभूमीवर ते कुठून कुठे हलतांना दिसतात एवढाच आहे. पूर्वीच्या काळी साध्या डोळ्यांनी एवढेच निरीक्षण करणे शक्य होते. बुध नेहमीच सूर्याला बिलगलेला आणि शुक्र त्याच्या एक दोन घरे (राशी) आजूबाजूला दिसतो. मंगळ स्वैर विहार करत असतो पण सरासरी सुमारे दीड वर्षामध्ये एक आवर्तन पूर्ण करतो. गुरुदेव एकेका राशीमध्ये एक एक वर्ष मुक्काम ठोकतात तर शनि महाराज नावाप्रनाणे शनैः शनैः म्हणजे संथ गतीने चालत तब्बल तीस वर्षात आपली परिक्रमा पूर्ण करतात. आज वेगवेगळे ग्रह ज्या ठिकाणी दिसत आहेत त्याच कॉम्बिनेशनमध्ये पुन्हा यायला त्यांना आणखी साठ वर्षे लागतील असे या सगळ्या आकड्यांवरून दिसते. याचा विचार करून त्यांनी साठ संवत्सरांना साठ वेगळी नांवे दिली व त्यानंतर त्याच क्रमाने त्यांची पुनरावृत्ती होत राहिली.

सूर्याच्या उगवण्या मावळण्यामुळे सर्वांना सहज समजणारे दिवस रात्र, चन्द्राच्या कलांवर आधारलेले पक्ष आणि महिने व ऋतुचक्रावर म्हणजे पुन्हा सूर्याच्याच आधारे ठरणारे वर्ष अशी एक कालगणनेची चौकट तयार झाली. पण त्यात एक अडचण दिसत होती. चन्द्रावर आधारलेले बारा महिने ३५४ दिवसांत पूर्ण होतात पण सूर्यावर आधारलेले वर्ष ३६५ दिवसाचे असते. हा अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर तीन वर्षात एक अधिक महिना ठरवण्यात आला. पौर्णिमेच्या रात्री चन्द्राबरोबर दिसणा-या नक्षत्रावरून त्या महिन्याचे नांव ठरत होतेच. त्या नियमांत सुधारणा करून अधिक महिना नक्की कधी धरायचा हे निश्चित केले. प्रतिपदा ते पौर्णिमा किंवा अमावस्या असे पंधरा पंधरा दिवस धरले तर महिन्याचे तीस दिवस होतात पण सूर्य व चन्द्र पुन्हा एका रेषेत साडे एकोणतीस दिवसातच येतात. या दोन्ही गोष्टी जमवून घेण्यासाठी तिथींची व्याख्या करून त्याप्रमाणे त्यांचा कालावधि ठरवण्याची सूत्रे बनवली गेली. कुशाग्र बुध्दी असलेल्या तज्ञ मंडळींनी हातात घेतल्यावर हे शास्त्र जसजसे परिपूर्ण होत गेले तसतसे ते जटिलही झालं. दिवसाचे आठ प्रहर, साठ घटिका, पळे, विपळे वगैरे भाग पाडून अगदी सूक्ष्म कालखंडांची गणिते मांडायची व्यवस्था केली.

इतकी शास्त्रशुध्द पध्दति निर्माण करतांना ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचून रोजच्या व्यवहारात त्यांना ती कशी उपयोगी पडेल याकडे विशेष लक्ष दिलं गेलं. पंचांग छापून वाटायची सोय त्या काळी नव्हती. प्रत्यक्ष बोलणं हेच कम्युनिकेशनचे एकमेव माध्यम होते आणि धार्मिक विधि हे समाजाला एकत्र आणण्याचे सूत्र होते. याचा विचार करून प्रत्येक धार्मिक विधीच्या सुरुवातीला अमुक नाम संवत्सरे अशी सुरुवात करून संवत्सर, आयन, ऋतु, मास, पक्ष, तिथि. वार, नक्षत्र वगैरे तपशीलवार सांगून सू्र्य, मंगळ, गुरु वगैरे सर्व ग्रह त्यावेळी कुठकुठल्या राशीमध्ये आहेत या सर्वांचा मोठ्याने उच्चार करायची प्रथा पाडली. तसेच जन्म, मृत्यु, विवाह, गृहप्रवेश यासारख्या महत्वाच्या घटनांची नोंद तिथि, वार, नक्षत्र आणि त्या दिवशी ग्रह कुठकुठल्या स्थानावर होते यासह ठेवायला लागले. थोडासा अभ्यास, प्रशिक्षण आणि सराव याने सर्वसामान्य लोक या गोष्टी करू लागले व हजारो वर्षे करत राहिले.

आज आपल्या हातात घड्याळ, खिशात डायरी आणि भिंतीवर कॅलेंडर असते, तारीख, वार, महिना यांचा उल्लेख रोज वारंवार होत असतो. पण जेंव्हा यातली कुठलीच गोष्ट अस्तित्वात नव्हती त्या काळी वर्ष, महिना,  तिथि,  नक्षत्र वगैरेने परिपूर्ण अशी जी कालगणना पध्दति आपल्या पूर्वजांनी निर्माण केली तो माणसाच्या संस्कृतीच्या विकासातला एक फार मोठा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा होता. जन्म, मृत्यु यासारख्या वैयक्तिक जीवनातील  महत्वाच्या घटना किंवा नैसर्गिक प्रकोप, लढाई यासारख्या सर्व समाजाला ग्रासणा-या घडामोडी या सर्वांची नोंद कशी ठेवावी, त्यांचा अनुक्रम कसा लावावा, त्यांच्या आधाराने पुढील काळासाठी नियोजन कसे करावे अशा अनेक दृष्टीने मुख्यतः चन्द्राच्या निरीक्षणावर आधारलेली ही कालगणना पध्दति अतिशय उपयुक्त ठरली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: