तोच चन्द्रमा नभात – भाग १२

तोच चन्द्रमा नभात – भाग १२
खगोलशास्त्र ते ज्योतिषशास्त्र

“आपल्या गाईला वासरू झालं ना त्याच्या दुस-या दिसी म्हाद्या परगावी ग्येला त्यो आजपत्तुर परत आल्येला न्हाई.” किंवा “नदीला म्हापूर यून अर्धा गाव पान्यात बुडला व्हता नव्हं, त्येच्यानंतर दोन वरसानी ह्ये इटोबाचं नवं द्येऊळ बांदलं बगा इथल्या लोकांनी.” अशा प्रकारचे संवाद आपण ऐकले असतीलच. एक घटना कधी झाली ते त्या सुमारास घडलेल्या दुस-या घटनेच्या संदर्भात आपल्या लक्षात राहते. वर दिलेल्या उदाहरणामधील पहिल्या वाक्यातल्या घटनांचा बोध फक्त एका कुटुंबातल्या लोकांना होईल तर दुस-या वाक्यातील घटनांचा एका गांवातल्या. य़ा सा-या घटना किती दिवसांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी होऊन गेल्या आहेत याबद्दल त्यातला प्रत्येक जण आपापल्या स्मरणशक्तीनुसार अंदाज बांधेल. याच घटना तारीख किंवा तिथीनिशी सांगितल्या तर मात्र कुणा नवख्यालाही ते चटकन कळेल. महत्वाच्या प्रत्येक घटनेची नोंद तिथि, नक्षत्र वगैरेसह करण्याची अद्भुत परंपरा आपल्या पूर्वजांनी सुरू केली. पृथ्वीवर घडणा-या घटनांची वेळ नोंदण्यासाठी त्या वेळच्या आकाशातल्या ग्रहांच्या स्थितिचा संदर्भ घेणे ही केवढी अफलातून कल्पना नाही कां?

या नोंदी करता करता त्यांचा एकमेकांशी संबंध जोडला जाऊ लागला. चन्द्र अमुक एका नक्षत्रात असतांना कुठकुठल्या घटना घडल्या, तमुक नक्षत्रात असतांना जन्मलेल्या मुलांचं पुढे काय झालं, अमक्या वेळी सुरू केलेलं कार्य यशस्वी रित्या पूर्ण झालं की नाही अशा प्रकारच्या चिकित्सा सुरू झाल्या. कुणी कुतुहलानं किंवा छंद म्हणून कांही माहिती जमवली, त्यातून कांही निष्कर्ष काढले, कांही ठोकताळे निघाले. त्यांच्या आधाराने शुभ, अशुभ, अनुकूल, प्रतिकूल वगैरे संकल्पना निर्माण झाल्या. त्यातून एक व्यवसाय उभा राहिला आणि आजतागायत तो जोरात चालू आहे.

आकाशातील सू्र्यचन्द्रादिक महाकाय गोलांना सर्वसामान्य मर्त्य मानवासारखे राग लोभ वगैरे विकार असू शकतील हा विचारच किती हास्यास्पद आहे. त्यांना मन, बुध्दी, भावना असतील आणि ते आपल्यासारख्या अब्जावधी मानवांच्या क्षुद्र जीवनातल्या तुच्छ नफ्यातोट्यात लक्ष घालत असतील याची सुतराम शक्यता सुध्दा केवळ अतर्क्य आहे. पण तरीसुध्दा भले भले शहाणे सुरते लोक अशा प्रकारच्या ज्योतिषावर विश्वास कां ठेवतात? कदाचित असे असेल की प्रत्येक माणूस अनेक आधी, व्याधी, दुःख, चिंता यांनी ग्रस्त असतो. बहुतेक वेळा त्या परिस्थितीला तो स्वतःच कारणीभूत असतो पण त्याचा अहंकार ते मान्य करीत नाही. मान्य केले तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसत नाही, दिसला तरी त्याला तो आवाक्याबाहेरचा वाटतो. त्यामुळे तो हताश होतो. अशा वेळी त्याला कुणाचा तरी, कशाचा तरी आधार हवा असतो. ही भावनिक गरज ज्योतिषी लोक छान भागवतात. त्या माणसाच्या सर्व हाल अपेष्टांची जबाबदारी अलगदपणे उचलून ते कुठल्यातरी ग्रहाच्या खांद्यावर ठेवतात. त्यामुळे त्याला हलकं हलकं वाटतं. हे सारे ग्रह गतिमान असल्यामुळे उद्या परवा परिस्थिती निश्चितपणे सुधारेल असी आशा ते दाखवू शकतात. या सगळ्यामुळे माणसाला धीर येतो, उमेद येते. बुध्दीला ताण देऊन दुःखी होण्यापेक्षा मनाचं समाधान करून घेऊन सुखी होणं तो पसंत करतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: