तोच चन्द्रमा नभात – भाग १४

तोच चन्द्रमा नभात – भाग १४
ये दुनिया गोल है!
 
उघड्यावर कुठेही उभे राहून आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला चारी बाजूला कांही अंतरापर्यंत जमीन, पाणी, झाडे, झुडुपे, डोंगर, माळ वगैरे जे कांही असेल ते दिसते आणि आभाळ एका वर्तुळाकार क्षितिजाला सर्व बाजूंनी टेकले आहे असे वाटते. पण कुठल्याही दिशेने कांही अंतर पुढे गेल्यावर  क्षितिज आणखी पुढे सरकत जाऊन पलीकडचा भाग दिसायला लागतो व पाठीमागचा पूर्वी दिसणारा कांही भाग दिसेनासा होतो. कदाचित दूरचे न दिसणे ही दृष्टीची मर्यादा आहे असे कुणाला वाटेल. पण आपण  एखाद्या टेकडीवर चढतांना जसजसे वर चढू तसतसा दूरवरचा जास्त भाग दिसायला लागतो.  या अर्थी नजर तिथपर्यंत जाऊ शकत असते तरीही तो भाग टेकडीच्या खालून दिसत नसतो. दुसरी एक गोष्ट अशी की जमीनीवरचा अलीकडला पलीकडला वेगवेगळा भाग दिसत असतांना आकाश मात्र तेच्या तेच  राहते.
हे सगळे आपल्या इतके अंगवळणी पडलेले असते की जग हे असेच आहे असे म्हणून आपण त्यावर कांही विचार करत नाही. पण फार पूर्वीच्या काळी कांही चिकित्सक लोकांना त्याचे कुतुहल वाटून त्यांनी त्याबद्दल सखोल विचार केला. जमीन ही दिसते तशी सपाट नसून कदाचित एखाद्या चेंडूसारखी गोलाकार असावी अशी कल्पना त्यातल्या कुणाच्या तरी सुपीक डोक्यात आली. अर्थातच आजूबाजूच्या लोकांनी त्याला मूर्खात काढलं असणार. “पृथ्वी गोल असेल तर खालच्या बाजूची माणसं तिला उलटी लटकतात की काय?” “समुद्रातलं सगळं पाणी वाहून जाणार नाही कां? ” वगैरे प्रश्नांची उत्तरे त्याचेकडे नव्हती. पण तरीसुध्दा कांही लोकांना त्याच्या बोलण्यात तथ्य आहे असे वाटून ते त्यावर आणखी विचार करू लागले. या लोकांना पृथ्वी गोल असल्याचा चक्षुर्वैसत्यम् पुरावा मिळाला तो चन्द्रावर!

चन्द्राचे कलेकलेने वाढणं पाहतांना चन्द्राचा जो भाग सूर्याच्या बाजूला आहे तोच प्रकाशमान होऊन कलेच्या रूपाने आपल्याला दिसतो हे विद्वानांच्या लक्षात आले होतेच. पण एखाद्या दिवशी ‘उगवला चन्द्र पुनवेचा, दाही दिशा कशा खुलल्या, वनीवनी कुमुदिनि फुलल्या’ असे रम्य वातावरण असतांना अचानक चन्द्रबिंब एका बाजूने काळवंडायला लागायचे आणि पाहता पाहता काळे ठिक्कर पडून जायचे. आणखी कांही काळाने ते पुन्हा दिसायला लागून हळूहळू पूर्ववत व्हायचे. चन्द्रग्रहणाचे हे अघटित दृष्य पाहून बरेचसे लोक घाबरून दारे खिडक्या बंद करून बसत असले तरी कांही उत्साही आणि धीट लोकांनी क्षणाक्षणाला बदलणारे चन्द्राचे रूप नजरेने टिपून घेतले. यातला कुठलाही आकार नेहमीच्या कलेसारखा नाही, हा कांही वेगळाच प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात आले.

त्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आपल्या एका बाजूला सूर्य व दुस-या बाजूला चन्द्र असे ते एकमेकांच्या समोरासमोर आहेत हे त्यांना माहीत होते. मग सूर्याचा प्रकाश चन्द्रापर्यंत कां पोचत नाही? त्यामध्ये कुणाचा अडथळा येतो आहे? दोघांच्या मध्ये दुसरे तिसरे कोणी नसून आपली पृथ्वीच आहे हे ही उघड होते. त्यामुळे चन्द्राला ग्रासणारा काळोख ही पृथ्वीची त्याच्यावर पडणारी सांवली आहे हे त्यांच्या लक्षात आले. या सांवलीचे बारकाईने निरीक्षण केल्यावर आणखी कांही गोष्टी समोर आल्या.

या सांवलीला एक विशिष्ट आकार आणि आकारमान आहे. याचा अर्थ पृथ्वी वाटते तशी अमर्याद नाही आणि चन्द्रही दिसतो तितका लहान नाही. तो पृथ्वीच्या सुमारे एक चतुर्थांश आकाराचा आहे. चन्द्रग्रहण संध्याकाळी, मध्यरात्री किंवा पहाटे यातल्या कुठल्याही वेळी असले तरी सांवलीचा वक्राकार तसाच दिसायचा. पृथ्वी ही एखाद्या चेंडूसारखी गोल असेल तरच हे शक्य आहे. अन्यथा चंद्रावर पडणा-या तिच्या सावलीचे वेगवेगळे आकार दिसले असते. पृथ्वी गोल आहे असे प्रतिपादन करण्यासाठी हा एक महत्वाचा पुरावा हाती लागला, तोसुध्दा चंद्राचा अभ्यास करत असतांना.
 
                                                                                            क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: