तोच चन्द्रमा नभात – भाग १५

तोच चन्द्रमा नभात – भाग १५

कोपर्निकसचा धमाका
 
निकोलस कोपर्निकस या पोलंडमधल्या शास्त्रज्ञाने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला सूर्यमालिकेसंबंधी अतिशय क्रांतिकारक संशोधन करून खगोलशास्त्राचे रूपच पालटून टाकले. क्रांतिकारक म्हणजे हा एखादा भडक माथ्याचा, बंडखोर वृत्तीचा युवक असेल असं कुणाला वाटेल. पण प्रत्यक्षात कोपर्निकसचे व्यक्तिमत्व याच्या बरोबर उलट होतं. तो एक अत्यंत बुध्दिमान, शांत, गंभीर, अभ्यासू वृत्तीचा, देवभोळा, प्रसिध्दीपराङ्मुख माणूस होता. त्याने धर्मशास्त्र व वैद्यकशास्त्रासह अनेक विद्यामध्ये प्राविण्य मिळवले होते. चर्चमध्ये राहून येशूची सेवा करण्यात त्याचा सारा जन्म गेला. पण एक प्रतिष्ठित विद्वान म्हणून सुध्दा समाजात आणि सरकार दरबारी त्याला मान होता. खगोलशास्त्र हा त्याचा निव्वळ छंद होता. आपले संशोधन दुस-यांना दाखवून त्यांच्याकडून वाहवा मिळवण्याचा त्याचा उद्देशच नव्हता. तर चिकित्सक वृत्तीने अभ्यास करतांना आपल्या मनात आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे शोधता शोधता त्याने जगासाठी अनमोल असे कार्य केले.

परमेश्वरावर त्याची इतकी अनन्य श्रध्दा होती की त्याने निर्माण केलेले विश्व अत्यंत बिनचूक (perfect) असणार असे त्याला वाटायचे. रात्री आकाशात दिसणा-या तारकांच्या सौन्दर्याचे निरीक्षण करण्याचा छंद त्याला जडला. विविध तारकासमूहाकडे लक्ष देऊन बारकाईने पाहतांना एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. ती म्हणजे सा-या लहान मोठ्या तारका पृथ्वीभोवती फेर धरून फिरत नसून प्रत्यक्षात एका इवल्याशा आणि मंद दिसणा-या धृवता-याला दुरून प्रदक्षिणा घालतांना दिसतात. ही गोष्ट त्याच्या मनाला कांहीशी खटकली. त्याने असा विचार केला की कदाचित आपल्याला नुसता असा भास होत असेल आणि प्रत्यक्ष परिस्थिती कांही वेगळी असू शकेल. पृथ्वी चेंडूसारखी गोल आहे आणि तिला सर्व बाजूने आकाशाने वेढले आहे हा विचार त्या काळापर्यंत बहुतेक विद्वानांना मान्य झाला होता. तिला कुठलेच बंधन नसल्यामुळे कदाचित पूर्वापार समजुतीप्रमाणे ती अचला नसेलही असा विचार कोपर्निकसच्या मनात आला. त्यानुसार आणखी तर्क चालवून त्याने असा निष्कर्ष काढला की सूर्य, चन्द्र व असंख्य तारे रोजच्या रोज पृथ्वीभोवती (किंवा धृवाभोवती) चक्कर मारणार नाहीत. त्याऐवजी पृथ्वीच स्वतःभोवती रोज एक गिरकी घेत असावी. आपण सुध्दा तिच्याबरोबर फिरत असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही आणि आकाशातील ग्रह तारे फिरतात असा भास होतो.

या सिध्दांतामुळे असंख्य तारका आपापल्या जागी स्थिर झाल्या असल्या तरी सूर्य व पांच ग्रहांच्या भ्रमंतीचे गूढ शिल्लक होते. मंगळ व शुक्र हे ग्रह तर उलटसुलट दिशांना इतःस्ततः भरकटत आहेत असं वाटायचे आणि देवभक्त कोपर्निकसला ही गोष्ट पटण्यासारखी नव्हती. त्याने या सर्व ग्रहांच्या रोजच्या रोज होणा-या सूक्ष्म हालचालींचे बारीक निरीक्षण केले. इतकेच नव्हे तर सर्वांची एकमेकाशी तुलना केली. त्यावरून त्याच्या असे लक्षात आले की सूर्याच्या संदर्भात त्यांचे भ्रमण बरेचसे सुसंगत दिसते. त्यामुळे सारे ग्रह सूर्याभोवती फिरत असतील आणि पृथ्वी सुध्दा तेच करीत असेल असे गृहीत धरून गणित मांडून पाहिल्यावर ते बरेचसे अचूक येतांना दिसले. फक्त चन्द्रमा तेवढा पृथ्वीभोवती फिरत असणार हे गणिताने सिध्द होत होते.

हे सगळे विचार, आकडेमोड आणि सिध्दांत त्याने व्यवस्थित लिहून काढले पण प्रकाशित केले नाहीत. एक तर परमेश्वराच्या खालोखाल मानव व त्याची वस्ती असलेली पृथ्वी हेच विश्वाच्या केन्द्रस्थानी आहेत आणि बाकीचे सारे विश्व मानवाच्या सुखसोयीसाठी परमेश्वराने निर्माण केलेले आहे या रूढ समजुतीला त्याच्या संशोधनामुळे जबरदस्त धक्का बसणार होता. त्याच्या जवळच्या लोकांनाही ही गोष्ट रुचण्यासारखी नव्हती. टीकेला किंवा विरोधाला तो जुमानत नव्हता. पण अडाणी लोकांरोबर वाद घालण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या संशोधनावर लक्ष केंद्रित करणे त्याला जास्त श्रेयस्कर वाटत होते.  त्याहूनही मोठे दुसरे कारण असे होते की त्याच्या गणिताने अजूनही शंभर टक्के बिनचूक उत्तरे येत नव्हती त्यामुळे त्याचे स्वतःचेच संपूर्ण समाधान होत नव्हते. तो शेवटपर्यंत आपली चूक कुठे होते आहे हे शोधतच राहिला.

वृध्दापकाळामुळे त्याच्या जीवनाचा अंत समीप आला त्यावेळी कांही शिष्यांनी पुढाकार घेऊन त्याचे लिखाण प्रसिध्द केले. पण दुस-या एका प्रतिष्ठित विद्वानाने प्रस्तावना लिहितांना मुत्सद्देगिरी दाखवून हे सगळे फक्त विलक्षण गुंतागुंतीच्या गणिताचे अद्भुत नमूने आहेत असे नमूद केले. त्यामुळे प्रसिध्दीनंतर लगेचच त्याच्यावर विरोधकांचे हल्ले झाले नाहीत आणि पुस्तकाचा प्रसार होण्याला बाधा आली नाही. कोपर्निकसच्या मृत्युनंतर पन्नास साठ वर्षांनी त्याच्या सिध्दांताचे क्रांतिकारक स्वरूप ठळकपणे विद्वज्जनांच्या व धर्मगुरूंच्या समोर आले आणि त्याने विज्ञानाच्या जगात प्रचंड खळबळ उडवली.
                             
                                                                                                       क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: