तोच चन्द्रमा नभात भाग १६

तोच चन्द्रमा नभात  भाग १६ 
केपलरची त्रिसूत्रे

कोपर्निकसचे निधन सन १५४३ मध्ये झाले. त्याने सुरू केलेले कार्य त्यानंतर आलेल्या विद्वानांनी जोमाने पुढे नेले. सन १५४८ मध्ये इटलीत जन्मलेल्या गिऑर्डनो ब्रूनो याने  मूलभूत शास्त्रीय संशोधन केले नाही. तो एक स्वतंत्रपणे विचार करणारा साहित्यिक आणि तत्वज्ञानी होता. परंपरागत रूढी आणि कल्पनांना आव्हान देणारे अनेक ग्रंथ त्याने लिहिले. अरिस्टॉटल आणि टॉलेमी यांनी मांडलेली बंदिस्त विश्वाची कल्पना मोडीत काढणारी आणि विशाल अमर्याद अशा विश्वाची शक्यता निर्माण करणारी कोपर्निकसची संकल्पना त्याच्या स्वच्छंदी कविमनाला पटली व फार आवडली. धर्मगुरूंच्या विरोधाला न जुमानता कोपर्निकसच्या सिध्दांताला त्याने धीटपणे आणि जाहीररीत्या पाठिंबा दिला, इतकेच नव्हे तर त्याचा हिरीरीने पुरस्कार केला. कलंदर वृत्ती व जहाल वक्तव्य यामुळे तो एका जागी फार काळ टिकला नाही. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे उदारमतवादी देशात राहून तो मायदेशी परतला तेंव्हा तिथल्या दुड्ढाचार्यांनी त्याच्यावर धर्मद्रोहाचा आरोप ठेऊन खटला भरला. त्यानेही आपल्या आचार विचाराबद्दल माफी मागून जीव वाचवण्यापेक्षा हौतात्म्य पत्करले. चर्चला आव्हान देण्याचे धारिष्ट्य करणा-यांना चांगली दहशत बसावी म्हणून त्याला जाहीररित्या जीवंत जाळण्यात आले.

त्याच्याच समवयस्क टाइको ब्राहे याने खगोलशास्त्रामध्ये भरपूर शास्त्रीय संशोधन केले. त्याने नवनवीन अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशी वेधशाळा उभी करून आकाशाचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करून प्रचंड माहिती जमवली. त्याला मिळालेली बरीचशी माहिती कोपर्निकसच्या संशोधनाबरोबर जुळत होती आणि मंगळ, बुध वगैरे ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात हेही त्याला पटले होते. परंतु पृथ्वीसुध्दा सूर्याभोवती फिरते हा कोपर्निकसचा निष्कर्ष मात्र त्याला मान्य झाला नाही. कोपर्निकसलासुध्दा त्रस्त करणा-या त्याच्या गणितात येणा-या चुकामुळे ब्राहेला असे वाटले असेल. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चन्द्र पृथ्वीभोवती यात त्याला मोठा विरोधाभास वाटत होता. सगळ्या ग्रहांच्या लवाजम्यासह सूर्य पृथ्वीभोवती फिरत असावा असा एक वेगळा विचार त्याने मांडला पण ब्राहेला स्वतःचा हा पर्यायी सिध्दांत सिध्द करता आला नाही.

ब्राहेचे शिष्यत्व पत्करून जॉनेस केपलरने खगोलशास्त्राच्या क्षेत्रात प्रवेश केला. ब्राहेने जमवलेल्या माहितीचा त्याने पुरेपूर उपयोग करून घेतला. अत्यंत कुशाग्र बुध्दीच्या केपलरला कोपर्निकसचा सिध्दांत पटला इतकेच नव्हे तर त्याला छळणा-या प्रश्नाचे उत्तरही सापडले. परफेक्शनच्या आग्रहामुळे सर्व ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकारच असणार आणि एकाच गतिने ते सतत चालत असणार असे कोपर्निकसने गृहीत धरले होते व या आधारे मांडलेल्या गणिताप्रमाणे ज्या वेळी ज्या ठिकाणी एखादा ग्रह दिसायला हवा तिथून तो थोडासा मागे किंवा पुढे दिसायचा. याचा बारकाईने अभ्यास केल्यावर सगळे ग्रह इतके शहाणे सुरते नाहीत हे केपलरच्या लक्षात आले. त्यांच्या कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार आहेत. तसेच या कक्षांमधून फिरतांना त्यांची गति समान नसते. जसजसे ते सूर्याच्या जवळ जातात तेंव्हा त्यांचा वेग वाढतो आणि दूर गेल्यावर तो कमी होतो. जो ग्रह सूर्यापासून जितका दूर असेल तितका त्याचा प्रदक्षिणेचा कालावधी मोठा असतो वगैरे महत्वाचे निष्कर्ष त्याने आपल्या गणितातील प्राविण्याच्या आधाराने काढले. केपलरने प्रथमच ग्रहांच्या कक्षांबद्दलचे नियम सूत्ररूपाने मांडले आणि सप्रयोग सिध्द केले. ते खालीलप्रमाणे आहेत.
१.  सर्व ग्रहांच्या कक्षा लंबवर्तुळाकार आहेत सूर्य त्या लंबवर्तुळाच्या एका केन्द्रस्थानी असतो.  ( The orbits of the planets are ellipses, with the Sun at one focus of the ellipse.)
२. ग्रह व सूर्य यांना जोडणारी रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळामधून फिरते (The line joining the planet to the Sun sweeps out equal areas in equal times as the planet travels around the ellipse.)
३. दोन ग्रहांच्या परिभ्रमणकालांच्या वर्गांचा भागाकार त्यांच्या सेमिमेजर अक्षांच्या घनांच्या भागाकाराएवढा असतो. (The ratio of the squares of the revolutionary periods for two planets is equal to the ratio of the cubes of their semimajor axes:
केपलरच्या समकालीन गॅलीलिओने गुरू ग्रहाचे साथीदार (उपग्रह) दुर्बिणीतून पाहून ती बातमी जाहीर केली. त्यावरून केपलरनेच उपग्रह ही एक नवी संकल्पना मांडली व चन्द्राला एक नवी संज्ञा दिली. ज्या काळामध्ये विश्वाची आणि सूर्यमालिकेची रचना कशी आहे यावर सुध्दा विद्वानांमध्ये एकमत नव्हते, पृथ्वीपासून आणि एकमेकापासून सारे ग्रह किती अंतरावर आहेत हे मोजायचे कोणतेही साधन नव्हते, त्या काळात केवळ कांही गृहीतकृत्यांच्या सहाय्याने व आकडेमोडीच्या आधारावर केपलरने हे नियम मांडले. हे असे कां आहे हे मात्र त्यालासुध्दा माहीत नव्हते. शंभर वर्षानंतर न्यूटनने त्याचे स्पष्टीकरण दिले.

                                                                                         क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: