तोच चन्द्रमा नभात – भाग १७

तोच चन्द्रमा नभात – भाग १७
गॅलीलिओची “दूर”दृष्टी

आजूबाजूला पसरलेल्या सजीव व निर्जीव सृष्टीचे गुणधर्म समजून घेणे, त्यात सतत होत असलेल्या बदलांच्या मागचा कार्यकारणभाव जाणून घेणे म्हणजेच विज्ञान आणि या माहितीचा उपयोग करून घेणे म्हणजे तन्त्रज्ञान असे थोडक्यात म्हणता येईल. अनादि कालापासून मानव आपल्या आजूबाजूला आपोआप घडत असलेल्या नैसर्गिक घटनांचे निरीक्षण करत आलाच आहे. विशिष्ट उद्देश ठरवून, त्यासाठी लागणारी सामुग्री जमवून व्यवस्थित सुनियोजित प्रयोग करून त्यातून पध्दतशीरपणे नवी माहिती मिळवण्याचे तन्त्र त्याने अलीकडच्या इतिहासकाळात विकसित केले. आज या प्रकारचे वैज्ञानिक संशोधन अत्यंत वेगाने होत आहे.  चार शतकापूर्वी या शास्त्रीय पध्दतीचा सुदृढ पाया घालण्याचे काम ज्या शास्त्रज्ञांनी केले त्यांमध्ये गॅलिलिओ गॅलिली हा अग्रगण्य होता.

सन १५६४ मध्ये इटलीत जन्मलेल्या गॅलिलिओ गॅलिलीने त-हेत-हेचे संशोधन केले. उंचावरून टाकलेले लहान मोठ्या आकाराचे दगड कसे एकाच वेळी तसेच सरळ रेषेत खाली पडतात, उतारावरून गोल वस्तु कशा गडगडत खाली येतात आणि जोराने हवेत भिरकावल्यावर कुठलीही वस्तु कशा प्रकारच्या वक्ररेषेत पुढे जात जात खाली येते या सगळ्या क्रियांचे त्याने अत्यंत बारकाईने निरीक्षण केले. छपराला लटकणारे दिवे कसे लयीमध्ये झुलतात ते पाहिले आणि त्या दिव्यांचा झोका लहान असो वा मोठा. त्याला तितकाच वेळ लागतो हे सिध्द केले. घोड्याला जुंपून पाणी उपसण्याचा पंप आणि पाण्याच्या दाबावर काम करणारा तराजू अशा प्रकारची उपकरणे त्याने बनवली. पृथ्वीच्या गिरकीमुळे समुद्रात लाटा उठत असाव्यात अशा अर्थाचा एक विचार त्याने मांडला होता पण गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्यावर लाटांचे खरे रहस्य जगाला कळले आणि तो मागे पडला.

जमीनीवर घडणा-या क्रियांबरोबरच आकाशातल्या ग्रहगोलांकडेही गॅलीलिओने भरपूर लक्ष दिले. जगातली पहिली दुर्बीण बनवली आणि त्यातून चन्द्रावरचे डोंगर, द-या आणि सूर्यावरचे डाग त्याने पहिल्यांदा  पाहिले. चन्द्राप्रमाणेच शुक्राच्याही कला दिसतात हे नमूद केले, गुरु ग्रहाचे चार उपग्रह जगाला दाखवले आणि शनीभोवती असलेल्या कड्यांचे पहिले अंधुक दर्शन घेतले.  तो जसा प्रयोग करण्यात निपुण होता तसाच गणितातसुध्दा तरबेज होता. कोपर्निकसने मांडलेली किचकट गणिते आणि केपलरने केलेली त्यापेक्षा कठिण मीमांसा व्यवस्थितपणे समजून विश्वाची रचना ही अशीच असली पाहिजे हे त्याला पूर्णपणे पटले.

गॅलीलिओ प्रत्यक्ष पोपच्या देशात, इटलीतच रहात होता. निष्ठुर धर्मगुरूंनी स्पष्टवक्त्या ब्रूनोचा कसा कांटा काढला हे त्याने जवळून पाहिले होते. तेंव्हा “सिर सलामत तो पगडी पचास” या उक्तिप्रमाणे सत्तेपुढे नमते घेणे त्याला भाग पडले. कोपर्निकसच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे हे सगळे फक्त काल्पनिक गणित आहे असे सांगून सुरुवातीला त्याने आपला बचाव करून घेतला. पण त्याने कोपर्निकसच्या धर्मविरोधी सिध्दांताचा प्रसार करता कामा नये असा आदेश त्याला देण्यात आला. तो त्याने अनेक वर्षे वरकरणी पाळला. त्याची कांही पुस्तके प्रसिध्द झाल्यावर म्हातारपणी पुन्हा त्याच्यावर खटला भरला गेला व क्षमायाचना केल्यावर एकांतवासाची सौम्य शिक्षा देण्यात आली. त्यातच त्याचे सन १६४२ मध्ये निधन झाले.  आधुनिक विज्ञानाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या कामगिरीबद्दल जग सदैव त्याचे ऋणी राहील. 

               (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: