तोच चन्द्रमा नभात – भाग १९

तोच चन्द्रमा नभात – भाग १९
हा खेळ सांवल्यांचा
 
पृथ्वीची चन्द्रावर सांवली पडली की चन्द्रग्रहण आणि चन्द्राची सांवली पृथ्वीवर पडली की सूर्यग्रहण होते एवढे ज्ञान शाळा शिकलेल्या सगळ्यांनाच असते. पण या सांवल्याच्या खेळातल्या कांही गमती जमती मी आज सांगणार आहे. आपण हाताच्या बोटांनी वेगवेगळे आकार करून भिंतीवर पक्षी, ससा, कुत्रा वगैरै आकारांच्या सांवल्या पाडतो तेंव्हा खोलीतला दिवा, आपली बोटं आणि भिंत यांमधली अंतरे कमी जास्त झाली की त्याप्रमाणे सांवली लहान मोठी होते. पृथ्वी आणि चन्द्राच्या कक्षा लंबवर्तुळाकार असल्यामुळे सूर्य, पृथ्वी आणि चन्द्र यांचेमधील अंतरे बदलतात त्याप्रमाणे त्यांच्या सांवल्याही लहान मोठ्या होतात आणि या खेळाला रंगत येते.

पृथ्वीची अगदी सर्वात लहान छायासुध्दा चन्द्रापेक्षा खूप मोठी असते. त्यामुळे चन्द्र तिच्या मधून गेला तर खग्रास चन्द्रग्रहण होते. पण ब-याच वेळा तो अर्धवटच सांवलीत येऊन बाजूबाजूने सटकतो तेंव्हा खंडग्रास ग्रहण होते. पृथ्वीची सांवली जसजशी चन्द्रावर पडत जाते तसतसा त्याचा तेवढा भाग काळोखात बुडल्याने दिसेनासा होतो. ग्रहणकाळामध्ये पृथ्वीवरील कुठल्याही खंडातल्या कुठल्याही ठिकाणाहून चन्द्राचे रूप एकसारखेच दिसणार. स्थानिक वेळा निरनिराळ्या असतील आणि चन्द्राचे आकाशातील स्थान वेगळे असेल पण आकार एकसारखाच दिसेल.

सूर्यग्रहण मात्र संपूर्ण पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. याचे कारण चन्द्राची पृथ्वीवर पडणारी  छाया खूपच छोटी असते. चन्द्राचे परिभ्रमण आणि पृथ्वीचे स्वतःभोवती गिरकी घेणे या दोन्हीच्या संयुक्त प्रभावाने ही छाया एका अरुंद पट्ट्याच्या आकारात पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वेगाने सरकत जाते. जाता जाता ती जेवढा काळ ज्या ठिकाणावर असेल तेवढा वेळ तिथे खग्रास सूर्यग्रहण दिसते. आज होणा-या ग्रहणात ही छाया ब्राझीलच्या पूर्व किना-यावर तिथल्या सूर्योदयाच्या वेळी प्रथम दिसेल. तिथून अटलांटिक महासागर ओलांडून आफ्रिका खंडाचा घाना, टोगो, नायजेरिया, चाड, लिबिया वगैरे सहारा वाळवंटाचा भाग पार करून स्थानिक दुपारी तुर्कस्थानमार्गे युरोपात प्रवेश करेल आणि पूर्व ईशान्य दिशेने सरकत सरकत कझाकस्थान, रशियामधील पूर्व आशिया वगैरेमधून जात जात  मंगोलिया मध्ये तेथील सूर्यास्ताच्या वेळी लुप्त होईल. सुमारे १४५०० किलोमीटर एवढ्या लांबीच्या या पट्ट्याची रुंदी फक्त १२९ ते १८८ किलोमीटर असेल व पृथ्वीचा फक्त ०.४ टक्के भाग त्याखाली येईल. आफ्रिकेच्या वाळवंटात त्याचा चार मिनिटाचा जास्तीत जास्त अवधी  राहील. इतर ठिकाणी ते दोन तीन मिनिटे दिसेल. चन्द्राच्या छायेबरोबर त्याची एक उपछाया असते. ती मात्र पृथ्वीचा निम्याहून अधिक भाग व्यापेल व तेवढ्या भागात वेगवेगळ्या अवधीत खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

पृथ्वीवर जेंव्हा ग्रहण दिसते तेंव्हा चन्द्रावरून काय दिसत असेल?  आधी चन्द्राच्या आकाशाचा थोडासा वेध घेऊ. त्याचा अर्धाच भाग आपल्यासमोर असल्याने आपण तेवढ्याचाच विचार करू. पृथ्वीवर अमावस्या असते, चन्द्र अजीबात दिसत नाही,  त्यावेळी अर्थातच तिथे सगळीकडे  अंधारी रात्र असते. आपल्याला प्रतिपदेची कोर दिसते त्यावेळी तिथे कांही भागात सूर्योदय होतो व हा सू्र्य त्या ठिकाणच्या आभाळात पौर्णिमेपर्यंत सतत तळपत राहतो. मध्यंतरीच्या काळात तो तिथल्या पूर्वेकडून पश्चिमेकडे हळू हळू सरकत असतो तसाच वेगवेगळ्या प्रदेशात उगवत असतो. पंधरा दिवसांनी एकदाचा मावळला का पुन्हा आणखी पंधरा दिवसांनी उगवतो. अशा प्रकारे पृथ्वीवरचा एक महिना म्हणजे चन्द्रावरचा फक्त एक दिवस असतो. चन्द्राच्या आकाशात सूर्याच्या चारपट इतकी मोठाड दिसणारी पृथ्वी एखाद्या झुंबरासारखी एका ठिकाणी स्थिर असते. ती कधी उगवतही नाही की मावळतही नाही. पण जागच्या जागीच ती स्वतःभोवती फिरत असल्याने अमेरिका, आफ्रिका, आशिया वगैरे खंड व पॅसिफिक, अॅटलांटिक वगैरे महासागर क्रमाक्रमाने रोज एकदा दर्शन देतात. पृथ्वीवर ज्या वेळी पौर्णिमा असते त्या काळात तिची रात्रीच्या काळोखाची बाजू चन्द्रासमोर असते त्यामुळे ती जागच्या जागीच अदृष्य होते व वद्य प्रतिपदा, द्वितिया इत्यादि तिथीप्रमाणे कलेकलेने वाढत जात इथल्या अमावस्येच्या दिवशी चन्द्रावर तिचे पूर्णबिंब दिसते. त्यानंतर शुक्ल पक्षातील प्रतिपदा, द्वितियेला कलेकलेने लहान होत पौर्णिमेला ती पुन्हा दिसेनाशी होते.

आपल्याला चन्द्रग्रहण दिसते याचा अर्थ चन्द्राच्या कांही भागावर पडलेल्या पृथ्वीच्या सांवलीमुळे सूर्याचे किरण चंद्राच्या त्या भागापर्यंत पोचूच शकत नाहीत. म्हणजे तिथे खग्रास सूर्यग्रहण दिसते. इकडे खग्रास चन्द्रग्रहण असेल तेंव्हा तर संपूर्ण चन्द्रच अंधारात बुडलेला असतो. जेंव्हा पृथ्वीची उपछाया चन्द्रावर पडते त्या काळात तिथे खंडग्रास सू्र्यग्रहण दिसेल पण तिथे अंशतः तरी सूर्यप्रकाश पडतच असल्यामुळे त्यातला फरक पृथ्वीवरून जाणवत नाही. पृथ्वीवर सूर्यग्रहण असते तेंव्हा चन्द्राची छोटीशी सांवली पृथ्वीच्या पूर्णबिंबावरून हळूहळू सरकत जातांना दिसेल. आपल्या कॉम्प्यूटरच्या मॉनिटरवरून एखादा छोटा कीटक चालत गेला तर कसे दिसेल अशा प्रकारचे हे दृष्य असते.
            

   (क्रमशः)

One Response

  1. […] करावीशी वाटली तर मी ती इथे दिली आहे. तोच चन्द्रमा नभात – भाग १९ – हा खेळ सा… […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: