तोच चन्द्रमा नभात – भाग २०

तोच चन्द्रमा नभात – भाग २०
चन्द्रावरील दृष्य

चन्द्रावरून पृथ्वी कशी दिसते ते आपण पाहिले पण प्रत्यक्ष तिथले दृष्य कसे असते? चन्द्राचा पृष्ठभाग सुध्दा डोंगर, द-या, खड्डे, विवरे वगैरेंनी भरलेला आहे.  त्यात पाणी साठले तर तलाव, सरोवरे आणि समुद्र निर्माण होऊ शकतील पण तेथील पृष्ठभागावर टिपूसभर सुध्दा पाणी नाही. खोल द-यांमध्ये पाण्याचे अंश अलीकडेच चांद्रयानाला मिळाले आहेत. दगड धोंडे, गोटे, माती आणि धूळ आहे. ती युगानुयुगे जागच्या जागीच पडून आहे कारण तिला कोठेही वाहून न्यायला पाण्याचा प्रवाह नाही की उडवायला वा-याचा झोत नाही. कधीतरी उल्कापात झाला किंवा चन्द्राच्या गर्भात ढवळाढवळ होऊन वरची जमीन थरथरली ( याला भूकंप म्हणावे कां?) तर त्या जमीनीवर थोडीशी हालचाल होणार.

चंद्रावरील जमीन दिवसा सूर्याच्या किरणांनी चुलीवरच्या तव्यापेक्षा जास्त तापते. पण त्यावर पेट्रोल ओतले तरी भडका उडणार नाही कारण ज्वलनासाठी लागणारा प्राणवायु नाही. फक्त क्षणार्धात ते उडून जाऊन अदृष्य होईल. रात्री तीच जमीन कुठल्याही डीप फ्रीझर पेक्षा अधिक थंडगार होऊन जाते. इतकी की तिथे हवा असली तर सुध्दा गोठून द्रवरूप होऊन गेली असती. पृथ्वीवरील कुठलाही जीव जंतु असल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून जीवंत राहू शकणार नाही आणि दुस-या प्रकारचे चित्रविचित्र किंवा हिडीस किळसवाणे जीव फक्त हल्लीच्या इंग्लिश सिनेमात पहायला मिळतात. ते प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेलेच बरे.

चंद्रावर हवाच नाही म्हटल्यावर तेथील आभाळात ओझोनचा थरही नाही, धुळीचे कण नाहीत की वाफ नाही, ढग जमण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे रात्र असो वा दिवस असो, चन्द्रावरचे आकाश नेहमीच निरभ्र आणि काळे भोर दिसते. किंबहुना चंद्रावर पृथ्वीसारखे आकाश नसतेच. थेट अवकाशच असते. सगळ्या चांदण्यांच्या मध्येच अत्यंत प्रखर असे सूर्याचे बिंब झळकते. सध्या सूर्य कोणत्या राशीत आहे याची चन्द्रावरून प्रत्यक्ष आकाशात बघून खात्री करून घेता येईल.

चन्द्रावर गुरुत्वाकर्षणाचे बल पृथ्वीवरच्या बलाच्या फक्त एक षष्टांश आहे. त्यामुळे सगळ्याच वस्तूंचे वजन तितक्या प्रमाणात कमी होते. सर्वसामान्य माणसाचे वजन फक्त दहा पंधरा किलो भरेल आणि लहान मूलसुध्दा मोठ्या माणसाला सहज उचलून डोक्यावर घेऊ शकेल. पृथ्वीवर दोन फूट उंच आणि चार फूट लांब उडी मारणारा बेडूक चन्द्रावर केवढी छलांग मारेल? प्रसन्नाची वेल फ्लाइटेड डिलिव्हरी बाउंडरी लाइनच्याही पलीकडे जाऊन पडेल कां मैदानात पडेल? बंदुकीची गोळी किती दूर जाईल? कां सरळ अवकाशात झेप घेईल? अशा प्रकारच्या प्रश्नांची गणिते कॉलेजमध्ये असतांना सोडवली होती. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा माणसाने चन्द्रावर स्वारी केली तेंव्हा तो लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, भाला फेक वगैरे क्रीडा प्रकार करून पाहील असे वाटत होते पण तसे कांहीच झाले नाही यामुळे कांहीशी निराशाच झाली.

                                                                                         (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: