तोच चन्द्रमा नभात – भाग २१

तोच चन्द्रमा नभात – भाग २१

कृत्रिम चन्द्र

पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडण्याची इच्छा अनादि कालापासून माणसाच्या मनात होती. अनेक साहसी लोकांनी त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले.  कोणी पाठीला पंख बांधून उंच कड्यावरून उडी मारली, कोणी प्रचंड आकाराच्या पतंगाला धरून, तर कोणी धुराने भरलेल्या प्रचंड फुग्याला लोंबकळून हवेत तरंगण्याचे प्रयत्न केले.  त्यातल्या कांही प्रयोगांना कांही प्रमाणात यश मिळाले. पण ख-या अर्थाने हवेत उडण्याचे आणि उडल्यानंतर उड्डाणावर नियंत्रण ठेवण्याचे यशस्वी प्रात्यक्षिक विसाव्या शतकाच्या सुरुवातीला राईट बंधूंनी करून दाखवले.  त्यानंतर या क्षेत्रात झपाट्याने प्रगती होऊन लश्करी व नागरी हवाई वाहतूक सुरू झाली.

या सर्व प्रकारांमध्ये पक्ष्याप्रमाणेच आजूबाजूच्या हवेच्या दाबाचा आधार घेऊन त्यावर तरंगण्याचे तंत्र वापरले होते. आकाशात जसजसे वर जाऊ तसतसा हवेचा दाब कमी होत असल्यामुळे त्याच्या आधाराने तरंगणे कठिण होऊन उड्डाणाला मर्यादा पडतात. एका झटक्यात उंच उसळी  मारून वर झेप घेण्याचे प्रयत्नही या बरोबरच सुरू होते.  कांही लोकांनी तर स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायचे धाडस सुध्दा केले.  बंद नलिकेमध्ये ठराविक कालांतराने एकामागोमाग एक स्फोट घडवून त्यावर चालणारी इंजिने निर्माण झाली तसेच इंधनाचे सलगरित्या ज्वलन करून ती गरम हवा छोट्या छिद्रातून वेगाने बाहेर सोडून त्यापासून गति निर्माण करण्याच्या जेट तंत्राचा विकास झाला व त्या तत्वावर अग्निबाण (Rockets) तयार झाले. वातावरणाच्या बाहेर अवकाशात जाऊन पोचणारे शक्तिशाली अग्निबाण सुध्दा बनवले गेले.

अशाच अग्निबाणांच्या सहाय्याने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएट युनियनने प्रथम स्पुटनिक हा पहिला युगप्रवर्तक उपग्रह अवकाशात सोडला.  मोठ्या भोपळ्याएवढा हा कृत्रिम चन्द्र दर ९६ मिनिटामध्ये एक पृथ्वीप्रदक्षिणा घालायचा आणि अधून मधून रेडिओलहरीद्वारा संदेश पाठवायचा. सुमारे तीन महिने तो आपल्या कक्षेमध्ये फिरत राहिला. अमेरिकेने व इतर देशांनीही  आपापल्या अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाला वेग आणला आणि अनेक प्रकारचे रॉकेट्स व उपग्रह सोडले. त्यानंतर इतर अनेक देशांनीसुध्दा आपापले कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवले. हे तंत्रज्ञान विकसित केलेल्या देशांमध्ये आज भारताचा प्रामुख्याने समावेश केला जातो. आज या उपग्रहांच्या द्वारे मिळणा-या संदेशावर टेलीफोन, टेलीव्हिजन, इंटरनेट वगैरे आधुनिक उपकरणे घरोघरी सुरळीतपणे चालत आहेत. 
 
१२ एप्रिल १९६१ रोजी युरी अलेक्सिविच गागारिन हा पहिला मानव अंतराळात जाऊन आला. त्याच्या पाठोपाठ १६ जून १९६३ ला व्हॅलेंतिना तेरिश्कोव्हा ही पहिली महिला तिकडे फेरफटका मारून आली आणि १८मार्च १९६५ रोजी अलेक्सि लेव्हनोव्ह या अंतराळवीराने आपल्या यानाच्या बाहेर पडून सर्वप्रथम अवकाशात चालण्याचा विक्रम केला. रशियाच्या या नेत्रदीपक यशाने अमेरिका खडबडून जागी झाली. अंतरिक्षविषयक तन्त्रज्ञानाच्या क्षेत्रात  रशियाबरोबर सुरू असलेल्या शर्यतीत तिला मात देण्यासाठी अमेरिकेने कांही तरी भव्य दिव्य असे करून दाखवणे आवश्यक होते. यासाठी तिथल्या शास्त्रज्ञ तंत्रज्ञांनी चक्क चन्द्रावरच माणूस पाठवण्याची मोहीम आखली.

                                                                                                                           (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: