तोच चन्द्रमा नभात – भाग २२

तोच चन्द्रमा नभात – भाग २२
चन्द्रावर स्वारी

एका गांवाहून दुस-या गांवाला जाण्यासाठी माणसे वाहनांत बसतात, वाहन सुरू होते आणि कांही काळाने ते त्यांना इच्छित ठिकाणी पोचवते. विमानाने प्रवास केला तर आधी विमान जमीनीवरून आकाशात उंच उडते, हवेतून मार्गक्रमण करीत दुस-या जागी पोचते आणि तेथील धांवपट्टीवर खाली उतरते. अशा तीन अवस्थामधून ते जाते. पृथ्वीवरून चन्द्रापर्यंतचा प्रवास जास्तच गुंतागुंतीचा असतो. आकाशात समोर चन्द्र दिसत असला तरी इथून अग्निबाणाने उड्डाण करून नाकासमोर जात थेट चन्द्रावर जाऊन धडकता येत नाही. हा प्रवास टप्प्या टप्प्यानेच करावा लागतो.

पृथ्वी स्वतःभोवती फिरतांना जमीन, पाणी, हवा तसेच जगातल्या सर्व जड आणि चेतन वस्तूंना बरोबर घेऊन फिरत असते. यामुळे तिच्यावरून सोडलेल्या यानाला सुध्दा तिच्याबरोबर तिच्याभोवती फिरण्याची गति मिळालेली असते व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे ते सरळ रेषेत न जाता वळत वळत जाते. जसजसे ते दूर जाईल तसतसा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा जोर कमी होत जातो तर पलीकडल्या बाजूने चन्द्राचे आकर्षण वाढत जाते. या सर्व कारणांमुळे चन्द्रापर्यंत जाऊन परत येईपर्यंत अनेक वेळा त्या आपली गती आणि दिशा बदलण्याची गरज पडते. अर्थातच या प्रवासासाठी अनेक प्रकारच्या अग्निबाणांनी सुसज्ज अशा मोठ्या यानांची आवश्यकता असते. आणि ते यान पृथ्वीवरून अवकाशात नेण्यासाठी बलशाली अग्निबाण पाहिजेत.

पृथ्वीवरून निघून चन्द्रापर्यंत पोचणारी मानवविरहित याने पाठवण्याचा कार्यक्रम रशियाने १९५९ सालीच हाती घेतला. १३ सप्टेंबर १९५९ ला ल्यूना २ हे यान चन्द्रावर जाऊन धडकले. अमेरिकेने आपला रेंजर प्रोग्रॅम त्याच वर्षी हाती घेतला परंतु पहिली सहा उड्डाणे अपयशी ठरली. अखेर सातवा प्रयोग यशस्वी होऊन ३१ जुलै १९६४ रोजी रेंजर ७ हे यान सुखरूपपणे चन्द्रवर उतरले आणि त्यावर बसवलेल्या कॅमे-याने हजारो छायाचित्रे घेऊन पाठवली.  माणसांना चन्द्रावर नेऊन सुखरूपपणे परत आणण्यासाठी कशा प्रकारची वाहने लागतील यावर संशोधन सुरूच होते.

सॅटर्न ५ नांवाचा १११ मीटर  म्हणजे ३३ मजली इमारतीएवढा उंच असा भीमकाय अग्निबाण बनवून त्याच्या जोरावर  अपोलो ८ हे यान अमेरिकेने चन्द्रावर पाठवले. बोरमन, लॉवेल आणि एंडर्स या तीन अंतराळवीरांनी  २१ डिसेंबर १९६८ रोजी या यानात बसून पृथ्वीवरून अवकाशात उड्डाण केले. पहिल्या टप्प्यात पृथ्वीभोवती एका कक्षेत स्थिरावून प्रदक्षिणा घातल्यावर तिथून चन्द्राच्या दिशेने झेप घेतली. चन्द्राच्या जवळ पोचल्यावर  थोडासा रोख बदलून चन्द्राभोवती प्रदक्षिणा घातल्या, सर्व बाजूने त्याचे जवळून दर्शन घेतले, फोटो काढले . पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणकक्षेच्या बाहेर चन्द्राच्या सान्निध्यात अशा आगळ्या वेगळ्या प्रकाराने नाताळचा सण साजरा करून ते स्वगृही परतले.

त्याच्या पुढच्या वर्षी १६ जुलै १९६९ ला सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी  अपोलो ११ या यानात बसून तीन अमेरिकन अंतराळवीर चन्द्रावर स्वारी करण्याच्या मोहिमेवर निघाले व १२ मिनिटांत  पृथ्वीभोवती फिरायला  लागले. दीड प्रदक्षिणा घातल्यावर  सुमारे अडीच तासानंतर ते चन्द्राच्या दिशेने निघाले व तीन दिवसांनंतर चन्द्राच्या जवळ पोचून त्याच्याभोवती घिरट्या घालू लागले. चन्द्रावर उतरण्याची जागा त्यांनी अनेक वेळा नीट पाहून घेतली व पाहिजे तशी समतल आहे याची खात्री करून घेतली.

२० जुलैला नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रिन ही जोडगोळी ईगल या छोट्या यानात बसून चन्द्रावर उतरण्यासाठी बाहेर पडली. मायकेल कॉलिन्स हा त्यांचा सहकारी कोलंबिया या मोठ्या यानामध्येच बसून राहिला. सुमारे अडीच तासांनंतर  ईगल चन्द्रावर उतरले आणि त्यानंतर सहा तासांनी नील आर्मस्ट्रॉंगने चन्द्रावर पहिले मानवी पाऊल उमटविले. पृथ्वीवरून निघाल्यापासून १०९ तास २४ मिनिटांनी तो या यशाचा धनी झाला. चन्द्रावर उतरल्यानंतर २१ तासांनी त्याने परतीच्या प्रवास सुरू केला व पृथ्वीवरून निघाल्यापासून १९५ तासानंतर २४ जुलै १९६९ रोजी विजयपताका फडफडावीत धरतीवर परत आला.

                                                                                                                           (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: