तोच चन्द्रमा नभात – भाग २३

तोच चन्द्रमा नभात – भाग २३
स्वारी की सहल ?

अपोलो ११ च्या मोहिमेची तयारी अगदी युध्दपातळीवर केली होती. चन्द्रावर पोचल्यावर अंतराळवीरांनी तेथे अमेरिकेचा राष्ट्रीय झेंडा रोवला. पृथ्वीवर परतल्यानंतर सा-या देशाने त्या विजयी वीरांचे थाटामाटात स्वागत आणि भरपूर कोडकौतुक केले ही सगळी वर्णने एखाद्या स्वारीलाच साजेशी आहेत. पण मग या लढाईत पराजय कुणाचा झाला? चन्द्रावर तिथल्या जमीनीचे रक्षण करायला कोणीसुध्दा हजर नव्हते. अंतराळवीरांना तिथे येण्यास कुणीच प्रतिबंध वा प्रतिकार केला नाही. कुठल्याही प्रकारची झटापट झालीच नाही. दोन पृथ्वीवासी तिथे आले, काही काळ हिंडले फिरले आणि माघारी गेले. ही तर सरळ सरळ एका सहलीची हकीगत झाली.

नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ आल्ड्रिन यांनी चन्द्रावर काय काय बरे केले? ईगल हे त्यांचे यान चन्द्रावर उतरल्यानंतर ते कांही लगेच दरवाजा उघडून बाहेर पडले नाहीत. आधी आत बसूनच त्यांनी यानाच्या सर्व तान्त्रिक बाबींची कसून तपासणी करून परत जाण्यासाठी ते पूर्णपणे सक्षम असल्याची खात्री करून घेतली, तसेच बाहेरील परिस्थितीचे पूर्ण निरीक्षण करून तिथे उतरण्यात कुठल्याही प्रकारचा धोका नाही याची खातरजमा करून घेतली. अधून मधून खाणे पिणे घेत यानाच्या बाहेर निघण्याची साग्रसंगीत तयारी केली. या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करून यान उतरल्यानंतर साडेसहा तासांनी ते बाहेर आले आणि चन्द्राच्या मातीवर त्यांनी आपल्या पाउलखुणा, खरं तर बूटखुणा उमटवल्या.

चन्द्रावरील विषम तपमान आणि हवेचा अभाव यापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी अगदी नखशिखांत दोन तीन थरांचे आवरण करणारा खास हवाबंद पोशाख परिधान केला होता. संपूर्ण चेहरा झाकून टाकणारी टी.व्ही.च्या पडद्यासाखी कांच तोंडावर बसवली होती. पोशाखाच्या आतल्या अंगालाच श्वसनासाठी प्राणवायु पुरवणारी, हवेचा दाब व तपमान यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तसेच बोलण्यासाठी माईक व आवाज ऐकू येण्यासाठी स्पीकर  वगैरेंची व्यवस्था होती. असला अंगापेक्षा बोंगा जड पोशाख घातल्यावर हात पाय हलवणे किती कठीण झाले होते? कसाबसा तोल सांवरत मोठ्या मुष्किलीने एक एक पाऊल टाकत चालणे तेवढे शक्य होते. त्यामुळे टेनिस, बास्केटबॉलसारखा खेळ किंवा उंच उडी, लांब उडी, भाला फेक, थाळी फेक यासारखे क्रीडाप्रकार करून पाहणे सोडा, साधी शिवाशिवी किंवा कॅच कॅच खेळणेसुध्दा त्यांना शक्य नव्हते.

तिथे गेल्यावर उरकायच्या कामांची यादी बनवलेली होतीच. आधी चांगली जागा पाहून अमेरिकेचा झेंडा रोवला. पृथ्वीसंबंधी आणि अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाची माहिती देणारा एक फलक उभा केला. अनेक वैज्ञानिक प्रयोग व निरीक्षणे करण्यासाठी इकडून नेलेली अनेक प्रकारची उपकरणे नीटपणे मांडून ठेवली. वेगवेगळ्या ठिकाणांवरून वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे बावीस किलो इतके दगड, धोंडे व मातीचे नमूने गोळा करून ते पिशव्यांमध्ये भरले. हजारोनी फोटो काढले, व्हीडिओ रेकॉर्डिंग केले. हे सगळे करता करता त्यांचे पृथ्वीवरील खास लोकांबरोबर संभाषण चाललेलेच होते. जवळजवळ अडीच तास अशा प्रकारे घालवल्यावर ते दोघे ईगल या आपल्या यानामध्ये परतले. तिथे बसून जेवण केले, आराम केला आणि एक झोप काढली. उठून ताजेतवाने झाल्यावर चन्द्रावरून उड्डाण करण्याच्या यंत्रसामुग्रीची कसून तपासणी केली.  कोलंबिया या चन्द्राभोवती घिरट्या घालत असलेल्या मुख्य यानात बसलेल्या आपल्या सहका-याबरोबर संपर्क तर सतत साधलेलाच होता. त्याच्या भ्रमणाबरोबर आपल्या उड्डाणाची  सुसंगति साधून अवकाशात कुठे, केंव्हा आणि कसे भेटायचे हे नक्की केले आणि परतीचा प्रवास सुरू केला.

अपोलो मालिकेत त्यानंतर आणखी पांच यशस्वी आणि एक अयशस्वी अशा सहा मोहिमा झाल्या. एकूण बारा अमेरिकन अंतराळवीर चन्द्रावर जाऊन आले. त्यांशिवाय बारा वीर चन्द्राभोवती घिरट्या घालून आले. १९७२ नंतर ही मालिका बंद करण्यात आली.                                                                                                                                                        (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: