तोच चन्द्रमा नभात – भाग २४

तोच चन्द्रमा नभात – भाग २४
बनवाबनवीचा आरोप

कथानायकाचे अचाट सामर्थ्य व पराक्रम, डायनोसारससारख्या भीमकाय प्राण्यांचा धुडगुस आणि महाभयानक शस्त्रास्त्रांनी घडवलेला सर्वनाश वगैरेची अद्भुत दृष्ये आपण सिनेमाच्या पडद्यावर पाहतो तेंव्हा हे सर्व खोटे आहे याची आपल्याला पूर्ण जाणीव असते. टेलीव्हिजनवर सरमिसळ कार्यक्रम पाहतो तेंव्हा ब-याच वेळा सत्य घटनावरसुध्दा विश्वास बसत नाही. आपण वर्तमानपत्रावर बहुतेक वेळा विश्वास ठेवतो पण ब-याच वेळा छापून आलेल्या बातम्यांमध्येच विसंगति आढळते तेंव्हा त्या विश्वासाला धक्का बसतो.

अमेरिकेच्या चन्द्रावर माणसांना पाठवण्याच्या मोहिमेचा प्रचंड गाजावाजा झाला. तेंव्हापासूनच कांही लोक त्याबद्दल साशंक होते पण त्यांच्याकडे प्रसार माध्यमांनी फारसे लक्ष दिले नाही. कारण उघडच आहे.  कांही लोकांनी  चिकाटीने आपले प्रयत्न चालूच ठेवले. प्रकाशित झालेल्या हजारो छायाचित्रांची आणि मुलाखतींमध्ये केलेल्या विधानांची बारकाईने छाननी केली. त्यातील विसंगत जागा शोधून काढल्या.  अशा पुराव्यांच्या आधाराने एक “कारस्थान  सिध्दांत (Conspiracy theory)” तयार केला आणि १५ फेब्रूवारी २००१  रोजी फॉक्स टी.व्ही चॅनेलवर तासाभराचा स्फोटक कार्यक्रम प्रसारित केला. या कार्यक्रमात कांही प्रसिध्द लोकांच्या मुलाखतीसुध्दा दाखवल्या. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील नेवाडा वाळवंटाच्या कुठल्या भागात नील आर्मस्ट्रॉंगने चन्द्रावरचे ते सुप्रसिध्द तथाकथित पहिले पाऊल ठेवल्याचे चित्रीकरण झाले असावे याचीही माहिती दिली. इतक्या सविस्तर वृत्तांतामुळे अर्थातच ‘तहलका मच गया’. त्याच सुमारास ई मेल लोकप्रिय होत होते त्यामार्फत ही धक्कादायक बातमी जगभर घरोघर पोचली.

कारस्थानाच्या आरोपामागील कांही मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे होते.
१. फडफडणारा अमेरिकेचा राष्ट्रध्वज (निर्वात जागी हे कसे शक्य आहे?)
२. दोन अंतराळवीरांच्या एकाच वेळी वेगवेगळ्या दिशेने पडलेल्या सांवल्या (शूटिंगसाठी २ स्पॉटलाईटचा वापर?)
३. आर्मस्ट्रॉंगचा यानातून खाली उतरतांना फोटो ( कुणी घेतला?)
४. काळ्या भोर आकाशात तारे कां दिसत नाहीत?
५. यान जिथे उतरले त्या जागी इंजिनाच्या झोतामुळे खड्डा कां पडला नाही? तिथली धूळ उडून कां गेली नाही?
अमेरिकेतीन व्यक्तिस्वातंत्र्यामुळे तिथे कोणीही कांहीही प्रसिध्द करू शकतो. तरीही टी.व्ही चॅनेलने आपल्या या स्वातंत्र्याचा उपयोग करतांना “या कार्यक्रमात मांडलेले विचार वादग्रस्त आहेत. प्रेक्षकांनी सर्व बाजू विचारात घेऊन आपापला निष्कर्ष काढावा” असा खुलासा करून स्वतःच्या बचावाची पळवाट मोकळी ठेवली होती. या अर्थी ते सुध्दा ठामपणे या आरोपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. या प्रचाराला मिळालेल्या अमाप प्रसिध्दीमुळे नासा ला तिची दखल घेणे भागच पडले. त्यांनी शक्य तितके तांत्रिक खुलासे केले. वरील मुद्यांची उत्तरे अशी आहेत.
१. झेंडा नीट रहावा आणि फोटोत दिसावा यासाठी त्याच्या वरच्या कडेला एक आडवी दांडी लावलेली होती. झेंड्याची काठी जमीनीत ठोकतांना त्यावर जो जोर लावला त्यामुळे तो थरथरत राहिला. यामुळे फडकण्याचा भास निर्माण झाला असावा.
२. सपाट जमीनीवर उभे राहिलेल्या दोन माणसांच्या सांवल्या समांतर पडतात पण जर ते वेगवेगळ्या उतारावर उभे असतील तर उतारावरील सांवल्या तिरक्या दिसतात
३. यानाच्या बाहेरच्या बाजूला आधीपासूनच कॅमेरा लावलेला होता
४. फोटो घेणा-याचा उद्देश प्रखर उजेडातील वस्तु वा व्यक्ति यांचे फोटो काढणे हा होता व त्याप्रमाणे कॅमे-याची फास्ट स्पीड ठरवली होती.  अंधुक तारे इतक्या कमी एक्स्पोजरमध्ये फोटोमध्ये दिसणार नाहीत. योग्य ती स्पीड वापरून ता-यांचे अनेक फोटो वेगळ्याने काढलेले आहेत.
५. चन्द्रावर हवा नसल्यामुळे यान उतरतांना जी धूळ उडाली ती पुन्हा तिथेच खाली बसली, फारशी इकडे तिकडे पसरली नाही.

अशा प्रकारची कांही तांत्रिक उत्तरे दिल्यावर “ज्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातले ओ को ठो कळत नाही असे लोक अर्थाचा अनर्थ करीत बिनबुडाचे आरोप करून या महान देशाच्या थोर शास्त्रज्ञांचा अपमान करीत आहेत. अत्यंत कठिण परिस्थितीमध्ये जिवाचा धोका पत्करून अंतराळांत जाऊन आलेल्या वीरांची तपश्चर्या मातीमोल ठरवीत आहेत” वगैरे भावनेला हात घालणारा प्रचारही केला.  पृथ्वीवरील कोठल्याही खंडामध्ये न आढळलेले चन्द्रावरील दगडमातीचे शेकडो किलो नमूने हा सर्वात मोठा प्रत्यक्ष पुरावा नासाकडे होता.  नासाने स्पष्ट उल्लेख केला नसला तरी त्याकाळातील प्रतिस्पर्धी देश रशियाने कुठल्याही कारस्थानाच्या नांवाने बोंब मारली नाही हा अप्रत्यक्ष पुरावा होताच.  ज्या किरकोळ विसंगतींचे  समाधानकारक उत्तर देता आले नाही त्यांना तपशीलातील क्षुल्लक मानवी चुका किंवा न उलगडलेली वैज्ञानिक कोडी वगैरे नावाखाली झाकून टाकले.

हे वादळ जसे अचानकपणे उठले तसे लवकरच शांत झाले.  सर्व युक्तिवादांचा त्रयस्थपणे विचार केल्यावर असे वाटते की  शंभर टक्के खरी माहिती जगापुढे मांडली गेली नसावी. ती मांडतांना तपशीलात फेरफार झाले असतील, रंजकतेसाठी तिखटमीठ लावून वर्णन केले असेल, बराचसा भाग गुप्त ठेवला असेल. कांही कारणाने मूळ फोटो देता येण्यासारखा नसेल म्हणून दुसरे चित्रीकरण झाले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यात गफलत झाली असेल. पण मानव चन्द्रावर जाऊन आला यात मात्र कांही शंका नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: