तोच चन्द्रमा नभात – भाग २५

तोच चन्द्रमा नभात – भाग २५
त्यांत काय विशेष?

अंतराळवीर चन्द्रावर जाऊन आपले झेंडे तिथल्या मातीत रोवून आले. सगळ्या जगाने त्यांचे आणि त्यांना तिकडे पाठवणा-या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांचे कौतुक केले. अमेरिकेत तर मोठ्या जल्लोशात आनंदोत्सव साजरे झाले. आपल्या भारतातल्या कांही प्रातिनिधिक लोकांच्या कांही प्रतिक्रिया पाहू.

आमच्या गोदाक्का म्हणाल्या, “म्हणजे आपला रवी कुठे गेलाय् तसंच ना?” आमचा हा रवी रिक्शात बसून स्टेशनला, तिथून आगगाडीने मुंबईला आणि पुढे विमानाने जर्मनीला गेलेला, तसाच हा गोरा साहेब कसल्या तरी वाहनात बसून आणखी पुढे चन्द्रावर गेला असेल असे त्यांना वाटले असणार. आमचे अण्णा म्हणाले, “अरे आपले नारदमुनि तर नारायण नारायण म्हणत त्रिभुवनात संचार करायचे. आणिक त्यांना हे असलं रॉकेट फिकेट कांही सुध्दा लागायचं नाही.” आपले ऋषीमुनीच नाही तर दैत्य दानवसुध्दा क्षणात अदृष्य व्हायचे आणि वाटेल त्या दुस-या एखाद्या जागी मुंगीपासून हत्तीपर्यंत वाटेल ते रूप घेऊन प्रकट व्हायचे. पुराणातल्या या सर्व गोष्टी सत्य घटना आहेत असा त्यांचा दृढविश्वास. त्यांना आर्मस्ट्रॉंगचे कसले कौतुक वाटणार?

चमत्कार करण्याच्या या पुराणातल्या विद्या आणि सिध्दी आजतागायत अस्तित्वात आहेत असेही ब-याच लोकांना वाटते. तसे सांगणारे बुवा आणि बाबा सुध्दा जिकडे तिकडे आहेत. आपल्या पुण्याला असेच एक योगिराज राहतात. चांगले सुशिक्षित लब्धप्रतिष्ठित गृहस्थ. योग, ज्योतिष वगैरे विषयांवर त्यांनी पुस्तके लिहून प्रसिध्द केली आहेत. ते म्हणे सूक्ष्म रूप धारण करून ब्रम्हांडात संचार करतात. कधी गुरूच्या एका चन्द्रावरून दुस-यावर उडी मारतात तर कधी शनीच्या भोवती फिरणा-या वलयांवर बसून त्याला एक चक्कर मारून येतात. जेवण झाल्यावर पान खाऊन यावे इतक्या सहजपणे ते पटकन चन्द्रावर जाऊन येतात म्हणे. हे गृहस्थ स्थूल रूपाने गांवोगांवी जाऊन व्याख्याने देतात, त्यात आपल्या या अंतराळ प्रवासाच्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकवतात आणि आपली पुस्तके भारावलेल्या श्रोत्यांच्या गळ्यात बांधतात.

त्यांची ख्याति ऐकून मी सुध्दा त्यांच्या एका बैठकीला गेलो होतो. स्वारी संभाषणकलेमध्ये अत्यंत तरबेज. तल्लख बुध्दीमत्ता आणि अस्खलित भाषण यांच्या जोरावर सगळ्या सुशिक्षित आणि कांही तर उच्चशिक्षित श्रोत्यांना त्यांनी तासभर मंत्रमुग्ध करून ठेवले होते. दैनिकांच्या पुरवण्या किंवा साप्ताहिके, मासिके वगैरेमध्ये सर्वसामान्य वाचकांसाठी जे शास्त्रीय लेख कधी कधी येतात त्यात जितपत माहिती छापून येते तसली चन्द्रासंबंधीची माहिती स्वतःच्या डोळ्याने पाहिल्याचा आव आणत त्यांनी सांगितली. कारण उघडच आहे. खरोखरचे वैज्ञानिक संशोधन करायचे असेल तर त्यासाठी कांही उपकरणे लागतात. ती बिचारी जड असल्यामुळे न्यूटनचा सिध्दांत पाळतात. त्यामुळे ती बरोबर न्यायची म्हणजे मग रॉकेट, लॉंचिंग स्टेशन वगैरे बारा भानगडी आल्या. त्यांचा सूक्ष्म देह कसा नैनम् छिन्दंति शस्त्राणि, नैनम् दहति पावकः अशा द्रव्यांचा बनलेला. मनात आले की कुठेही कसाही सुटसुटीतपणे जाऊ शकतो. त्यामुळे त्यातल्या सूक्ष्म डोळ्यांना दिसेल, सूक्ष्म बुध्दीला समजेल एवढेच ज्ञानाचे कण ते गोळा करू शकत होते. आणि तेवढे ज्ञान ऐकून लोक भारावून जाऊन वाहवा करीत असतील तर आणखी काय पाहिजे?

अशाच दुस-या एका राष्ट्रभक्त विद्वानाच्या भाषणाची टेप ऐकली. बरेचसे लोक मोठ्या भक्तिभावाने त्याचे सार्वजनिक श्रवण करीत होते. शेष भगवानांनी आता आकाशात प्रत्यक्ष दर्शन द्यायला सुरुवात केली आहे. पुण्यवान अमेरिकन शास्त्रज्ञांनी त्याचे वेटोळे आणि फणा दुर्बिणीतून प्रत्यक्ष पाहिला आहे आणि विश्वाची उत्पत्ति त्यापासून झाली हे त्यांनी मान्य केले आहे असा साक्षात्कार त्या विद्वानांना कुठे तरी एन्ड्रोमेडा नांवाच्या गॅलॅक्सीचे एक चित्र पाहून झाला. शास्त्रज्ञांना ही गॅलॅक्सी निदान हजार वर्षापासून माहीत आहे, शंभर वर्षापूर्वी त्याचे फोटो काढले होते, अशा प्रकारच्या शंभरावर स्पाइरल गॅलॅक्सीज आकाशात आहेत वगैरे शास्त्रीय माहिती या लोकांना कोण सांगणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: