तोच चन्द्रमा नभात – भाग २७

तोच चन्द्रमा नभात – भाग २७
गणपति आणि चन्द्र

अथर्वशीर्षामध्ये जरी गणपतीलाच चन्द्रमास्त्वम् म्हंटले असले असले तरी परमेश्वराची ही दोन वेगळी रूपे आहेत. गणपति हा विद्येचा, ज्ञानाचा दाता. कुठल्याही कार्याचा प्रारंभ करतांना आधी त्याची आराधना करून कार्य निर्विघ्न पार पडू दे अशी प्रार्थना करतात. महत्वाचे आणि मोठे कर्म करणा-याने त्याची सुरुवात त्यासंबंधित ज्ञानार्जनेने करायची असते हे त्याच्या लक्षात आणून देणे इथे अभिप्रेत आहे. कामाला सुरुवात करण्यापूर्वीच त्यासंबंधी सर्व ज्ञान असले तर त्यातले संभाव्य धोके, अडचणी वगैरेची आधीच कल्पना असते व त्यानुसार तयारी करून त्यावर मात करता येते. यासाठी काम व्यवस्थितपणे समजून घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी आवश्यक ती विद्या आणि कला आत्मसात करणे जरूरीचे आहे. हे करणे ही खरी श्रीगणेशाची आराधना.

चन्द्र हा सौन्दर्याचे प्रतीक आहे किंवा मानदंड आहे. चन्द्रमुखी, मुखचन्द्रमा वगैरे शब्दांचा प्रयोग साहित्यामध्ये सढळपणे केला जातो. चन्द्राचे अस्तित्व, त्याचे दर्शन प्रेमभावनेला पोषक आहे. अशा प्रकारे गणपतिचा बुध्दीशी संबंध आहे तर चन्द्राचा हृदयाशी.

परंपरागत प्रथेप्रमाणे गणपतिच्या व्रतांमध्ये चन्द्राला खास महत्व  आहे. गणेशचतुर्थीचे दिवशी चन्द्राचे दर्शन एकदम वर्ज्य ठरवले आहे तर संकष्टी चतुर्थीच्या व्रचाची सांगता चन्द्रोदय झाल्यानंतरच होते. काय विरोधाभास आहे ना?  थोडा विचार केला तर त्यामागील सुसंगत कारण लक्षात येईल. गणेशचतुर्थीला भक्ताने स्वतःला गणपतिच्या आराधनेमध्ये वाहून घ्यावे. त्या दिवशी एकाग्र चित्ताने निव्वळ ज्ञानसाधना करावी. अत्यंत देखणी अशी चवतीच्या चन्द्राची कोर आकाशातून खुणावत असली तरी निग्रहाने आपले चित्त ढळू न देता तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून ज्ञानसाधनेवर चित्त केन्द्रित करण्याचा प्रयत्न करावा, बुध्दीने मनावर ताबा मिळवावा असा हेतु आहे.

संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी भक्ताचे लक्ष विचलित करायला चन्द्र आकाशात हजरच नसतो. पण माणूस केवळ ज्ञानसाधनेच्याच मागे लागून वाहवत गेला तर तो भावनाशून्य होण्याची शक्यता असते.  माणसातील माणुसकी टिकवून धरण्यासाठी त्याला यापासून वेळीच सावध करणे आवश्यक आहे. चन्द्रदर्शन हाही व्रताचाच एक भाग करून बुध्दी आणि मन, ज्ञान आणि भावना यातील समतोल साधण्याचा सुंदर उपाय आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवला आहे. शुक्लपक्षामध्ये पौर्णिमेपर्यंत चन्द्राचे दर्शन सुलभपणे होत असते. पण कृष्ण चतुर्थीला मुद्दाम चन्द्र उगवण्याची वाट पहात उपाशी रहाण्याने  त्याचे महत्व चांगले लक्षात येते.

ही प्रतीके आणि उद्देश आता फार जुनी झाली आहेत. आजकालसुध्दा शहरांमधले बरेचसे लोक संकष्टीचे व्रत करतात. म्हणजे डब्यात पोळी भाजीचे ऐवजी साबूदाण्याची खिचडी नेतात. बहुतेक ऑफीसेसच्या कॅंटीनमध्ये त्या दिवशी बटाटेवडा आणि मेदूवड्याबरोबर साबूदाणावड्याचा ऑप्शन असतोच. तो खाऊन गणपतीवर उपकार केल्याचा आव आणतात. घरामध्ये “भिंतीवरी कालनिर्णय असावे”, तसे असते. त्यांत चन्द्रोदयाची वेळ पहातात आणि घड्याळात तितके वाजले की जेवायला बसतात. कधीकधी “या वेळी किती उशीरा हा चन्द्रोदय ठेवला आहे? आमच्या सगळ्या सीरीयल्सची वाट लावली.” असे म्हणत पंचांगकर्त्या साळगांवकरांच्या नांवाने खडे फोडतात. आकाशात एक चन्द्र असतो आणि त्याने केंव्हा उगवावे हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ठरलेले असते वगैरे गोष्टी त्यांच्या गांवीही नसतात.

                                                                                                                       (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: