तोच चन्द्रमा नभात – भाग २८ (करवा चौथ)

तोच चन्द्रमा नभात – भाग २८   ……  संपादन दि. १७-१०-२०१९

करवा चौथ

करवा चौथ

ऊन, पाऊस, वारा यापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी माणसाने घराचा निवारा बांधून रहायला सुरुवात केली. पण त्याला बाहेरच्या जगाशी जोडणारी दारे आणि खिडक्या ठेवल्या. दोन पावले चालून घराबाहेर अंगणात येऊन तो कोवळे ऊन, पावसाची भुरभूर आणि मंद मंद वाऱ्याची झुळुक यांचा मनसोक्त आनंद  लुटायचा. सूर्यकिरणांचे इन्द्रधनुष्य किंवा चन्द्राभोवती पडलेले खळे यासारखी अद्भुत नैसगिक दृष्ये त्याला सहज दिसायची. शहरातल्या माणसाने मात्र स्वतःलाच चार भिंतींच्या आंत कोंडून घेतले आणि निसर्गापासून तो पुरता दुरावला. सर्वसामान्य माणसाची ही तऱ्हा तर नाटक सिनेमाच्या कृत्रिम जगात वावरणाऱ्या लोकांचं विचारायलाच नको. तिथं तर घरही खोटं, त्यातली माणसं, अगदी आईवडील, भाऊबहिणसुध्दा खोटे खोटे. ओढून ताणून आणलेले हंसणे आणि ग्लिसरिनचे अश्रु ढाळून रडणे. तिथल्या लोकांना कदाचित फक्त स्टूडिओमधला कांचेचा चन्द्रच माहीत असणार.

आजकाल सगळ्या कौटुंबिक हिंदी सिनेमा आणि सीरियल्समध्ये एक तरी करवा चौथचा सीन  असतोच. त्यांत नायिका आपल्या नणंदा, भावजया, सासू वगैरे असतील नसतील तितक्या सगळ्या स्त्रीपात्रांबरोबर हातात पूजेची तबके घेऊन घराच्या गच्चीबर जाऊन उभी राहते. सगळ्यांनी नखशिखांत साज श्रृंगार केलेला असतो. नायिका आपली प्रोफाईल व्यवस्थितपणे दिसेल अशा पध्दतीने हात वर करून त्यात एक चाळण धरून त्यामधून  चन्द्राचे दर्शन घेते.

वास्तविक पहाता ही करवा चौथ दसऱ्यानंतर आणि दिवाळीच्या आधी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे दिवशी येते. चन्द्रोदय होऊन चन्द्राला आभाळात इतक्या वर चढेपर्यंत रात्रीचे दीडदोन तरी वाजत असतील. पण नायिकेला इतका नट्टा पट्टा करायला एवढा वेळ लागणारच नाही कां? आपल्या मराठी मंडळींना दिवसभर साबूदाण्याची खिचडी खाऊनसुध्दा चन्द्रोदय होईपर्यंत जेवायला बसायची घाई झालेली असते. पण या हिंदी लोकांचा स्टॅमिना दांडगा असतो.  दिवसभर अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबसुध्दा न घेऊन इतक्या रात्रीपर्यंत यांचा चेहरा केवढा टवटवीत?  त्या आपल्या हातातल्या चाळणीतून पहातात आणि काय चमत्कार पहा, चतुर्थीच्या पाउण चन्द्राऐवजी त्यांना चक्क पौर्णिमेच्या पूर्ण चन्द्राचे दर्शन घडते. कधीकधी त्यावरील ससा गायब झालेला असतो. हा चमत्कार बघून तो घाबरून पळून जात असावा बिच्चारा!

हा सगळा प्रकार कुणालाही कधी खटकत नाही. कारण पुरुष प्रेक्षकांची दृष्टी नायिकेवर खिळलेली असते आणि स्त्री प्रेक्षकांचे सगळे लक्ष तिच्या अंगावरील दागिन्यांकडे.  मग बिचाऱ्या चन्द्राकडे पहाणार तरी कोण?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: