तोच चन्द्रमा नभात – भाग २९

तोच चन्द्रमा नभात – भाग २९
हिन्दी सिनेमातील गाणी

चन्द्र हा कवीलोकांचा अत्यंत प्रिय विषय आहेच. हिन्दी सिनेमाच्या गीतकारांनी तर त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. अगदी मी जन्माला आलो त्या काळातील “तू मेरा चाँद मै तेरी चाँदनी ओ ओ ओ, नही दिलसे लगाना कोई दिल्लगी” या गाण्यापासून ते अलीकडच्या काळातील “चाँद मेरा दिल, चाँदनी हो तुम चाँदसे है दूर चाँदनी कहाँ”  आणि त्यानंतरही “चाँद, चाँदनी, चंदा, चंद्रमा” वगैरे शब्द हिंदी गाण्यांमधून सतत कानावर पडत राहिले आहेत.

कधी त्यामध्ये “वो चाँद खिला वो तारे हॅंसे, ये रात अजब मतवाली है”, “रातका समा झूमे चंद्रमा तन मोरा नाचे रे जैसे बिजूरिया”, “ये रात भीगी भीगी, ये मस्त फिजाएं, उठ्ठा धीरेधीरे, ये चाँद प्यारा प्यारा”   असे धुंद करणा-या चांदण्या रात्रीचे वर्णन आहे.  त्यापुढे “क्यूं आगसी लगाकर गुमसुम है चाँदचाँद सोनेभी नहीं देता मौसमका ये नजारा” अशी लटकी तक्रार आहे. एक प्रिया चन्द्राकडे बोट दाखवत म्हणते, “चॉन्दको देखो जी, मस्ती लुटाए, जादू जगाए, दिलमें हमारे रे” त्यावर प्रियकर म्हणतो, “चॉन्द ये कहता है धरती की रानी, हॅंसती जवानी दिन हैं तुम्हारे रे।”  कुणाला “आधा है चन्द्रमा रात आधी, रह ना जाये तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी” अशी भीती वाटते. तर एक विरहिणी “चाँद फिर निकला, मगर तुम न आये, जला फिर मेरा दिल, करूं क्या मै हाये ” असे म्हणत उसासे सोडते आहे. 

पूर्वीच्या काळच्या नायिका लाजत लाजत चन्द्राला “दमभर तो उधर मुंह फेरो, ओ चन्दा आ आ आ, मैं उनसे प्यार कर लूंगी, बातें हजार कर लूंगी” वगैरे  सांगायच्या. आजकालची तरुण पिढी चन्द्रालाच लाज वाटायला लावते आणि बिन्धासपणे “चाँद छुपा बादलमें शरमाके, मेरी जाना, सीनेसे लग जा तू बलखाके मेरी जाना” असे आपल्या जोडीदाराला सांगते. पूर्वीच्या सुन्दरीसुध्दा “मुझे देख चाँद शरमाये” असे म्हणायच्या, “चंदा देखे चंदा तो वो चंदा शरमाये, गोरी गोरी चॉन्दनीमे गोरी जब मुसकाये” असे व्हायचे पण चन्द्राचे ते लाजणे वेगळे. कारण “चाँद आहें भरेगा फूल दिल थाम लेंगे, हुस्नकी बात चली तो सब तेरा नाम लेंगे”  अशा अनुपम लावण्याला दिलेली ती दाद असे.

चन्द्र हा एक सौन्दर्याचा मानदंड आहे. “चौदहवीका चाँद हो, या आफताब हो, जो भी हो तुम खुदाकी कसम लाजवाब हो।”,  “तुझे मैं चॉन्द कहता था मगर उसमें भी दाग है।”, “च़ान्दसी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था।”, “ये चॉन्दसा रोशन चेहेरा, झुल्फोंका रंग सुनहरा, ये झीलसी नीली ऑंखें कोई राज है इनमें गहरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हे बनाया।”, “चेहेरा है या चांद खिला है जुल्फ है या घनघोर घटा”  वगैरे गाण्यांमध्ये चन्द्रमुखींबरोबर त्याची तुलना केली आहे. कोणी प्रेमवीर आपल्या प्रेमिकेला “तेरा चेहेरा कितना सुहाना लगता है, तेरे आगे चाँद पुराना लगता है” असे म्हणतो तर कोणी “रूप सुहाना लगता है, चाँद पुराना लगता है, तेरे आगे ओ जानम.” तिसरा एकजण “चाँद सितारे फूल और खुशबू ये सौ साल पुराने हैं, ताजा ताजा कली खिली है हम उसके दीवाने हैं।” असे सांगतो.

प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेले सगळेच नायक आपापल्या नायिकांना “चाँद तारे तोड लाऊं ” असे भरघोस आश्वासन देत असतात. पण एकजण त्यांची ग्वाही देऊन “मै शायद तुम्हारे लिये अजनबी हूं मगर चाँदतारे मुझे जानते हैं” असे म्हणतो तर दुसरा त्यांनाच “याद रखना चांदतारों इस सुहानी रातको” असे बजावतो. “चॉन्दको क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर, वो बेचारा दूरसे देखे करे न कोई शोर।” या गाण्यात चन्द्राला तटस्थ ठेवले आहे.

एक नायिका “चन्दाभी प्यारा है, सूरजभी प्यारा, पर सबसे प्यारा है सजना हमारा” असे आपल्या सजणाचे गुणगान करते. तर दुसरी आपल्या भावाला उद्देशून “मेरे भैया, मेरे चंदा, मेरे अनमोल रतन” असे म्हणते. एक माता आपल्या छकुल्याला “चन्दा भी. तू मेरा सूरज भी तू, ओ मेरे ऑंखोंका तारा है तू” असे म्हणते तर दुसरी “तुझे सूरज कहूं या चंदा, तुझे दीप कहूं या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जगमें मेरा राजदुलारा।” अशी आशा बाळगते आणि  एक जोडपे  “चन्दासे होगा वो प्यारा, परियोंसे होगा दुलारा,  नाचेगा ऑंगनमें छमछम, नन्हासा मुन्ना हमारा” अशी सुखस्वप्ने पहाते.

“तुम गगनके चन्द्रमा हो मै धराकी धूल हूं,  तुम हो पूजा मै पूजारी, तुम क्षमा मैं भूल हूं।”  आणि “तू चंदा, मै चाँदनी. तू तरुवर मै शाख रे, तू बादल मै बिजुरी, तू पंछी मै पात रे।” या गीतांत  नितान्त सुन्दर काव्य आहे. तर “चारुचन्द्रकी चंचल चितवन बिन बादल बरसे सावन” यांत सुंदर अनुप्रास साधला आहे. “चन्दूके चाचाने चन्दूकी चाचीको चॉन्दीके चमचेसे चटनी चटायी” हे अनुप्रासाचेच एक टंगट्विस्टर आधुनिक रूप. “चन्दामामा दूरके, पुए पराय़े बूरके, आप खायें थालीमें, मुन्नेको दें प्यालीमें।” हे एक अतिशय गाजलेले मजेदार बालगीत तर “चंदाको ढूंढने सभी तारे निकल पडे, गलियोंमे वो नसीबके मारे निकल पडे ” ही एक करुण कहाणी. “नदिया चले, चले ये धारा, चंदा चले, चले ये तारा, तुझको चलना होगा।” या गाण्यात चन्द्राच्या कर्तव्यदक्षतेचे उदाहरण देऊन आगेकूच करायचा संदेश दिला आहे.

अनेक गाणी चन्द्राला उद्देशून म्हंटलेली आहेत. त्यात त्याला विविध प्रकारची कामे सांगितली आहेत. “चंदा रे, चंदा रे, कभी तो जमींपर आ, बैठेंगे बातें करेंगे।” यात त्याला चक्क गप्पा मारायला येण्याचे आमंत्रण दिले आहे. “ओ रातके मुसाफिर, चन्दा जरा बता दे, मेरा कसूर क्या है, ये फैसला सुना दे।” या गाण्यात त्याचेकडे न्याय मागितला आहे. तर “ओ चाँद जहाँ वो जाये, तुम साथ चले जाना, कैसे हैं कहाँ हैं वो हर रात खबर लाना।” या गाण्यात डेली रिपोर्ट द्यायला सांगितले आहे.  “धीरे धीरे चल, चाँद गगनमे, कहीं ढल ना जाये रात, टूट ना जाये सपने”  या गाण्यात त्याला मंदगतीने चालायला सांगितले आहे तर “रुक जा रात ठहर जा रे चन्दा, बीते ना मिलनकी बेला।” या गाण्यात त्याला “स्टॅच्यू” ची ऑर्डर दिली आहे.  आता त्या बिचा-या चन्द्राने तरी कुणाकुणाचे ऐकावे?
अशा किती रंगामध्ये, किती ढंगामध्ये सजवून हिंदी गीतांमधून चन्द्राचे दर्शन किती प्रकारांनी घडवले आहे याची गणती करणे अशक्य आहे.

                                                                                                             ( क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: