तोच चन्द्रमा नभात – भाग ३०

तोच चन्द्रमा नभात – भाग ३०
मराठी गाणी- बालगीते

मराठी भाषेत गाण्यांचे किती तरी प्रकार आहेत.  बालगीते, भक्तिगीते, भावगीते,  लोकगीते, नाट्यसंगीत, सिनेमातली गाणी वगैरे वगैरे. या सगळ्या प्रकारांमध्ये आपला चांदोबा मात्र कुठे ना कुठे डोकावतोच.

आपल्या तान्ह्या बाळाला झोपवण्यासाठी थोपटता थोपटता त्याची आई गुणगुणते
लिंबोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई ।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।

बाळ झोपी गेल्यावर सुध्दा आईचं लक्ष त्याच्याकडे असतंच.  त्याला झोपेतच मंद मंद हंसतांना पाहून ती म्हणते
चांद मोहरे चांदणे झरे,  झोपेतच गाली असा हंसशी कां बरे।।

हा छोटासा बाळ जेंव्हा साक्षात कौसल्येचा रामचन्द्र असतो तेंव्हा ती माउली काय म्हणते?
सावळा गं रामचन्द्र  रत्नमंचकी झोपतो। त्याला पाहता लाजून चन्द्र आभाळी लोपतो।।
सावळा गं रामचन्द्र चन्द्र नभीचा मागतो। रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो।।

बाळ बोबडे बोल बोलायला लागतं तसे आई त्याला गाणी शिकवायला लागते. गेल्या कमीतकमी तीन पिढ्या एक अत्यंत लोकप्रिय गाणं म्हणत मोठ्या झाल्या आहेत.  ते आहे
चांदोबा चांदोबा भागलास कां, लिंबोणीच्या झाडामागे लपलास कां।
लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी।
मामा मामा येऊन जा, तूप रोटी खाऊन जा।
तुपात पडली माशी, चांदोमामा राहिला उपाशी।।

आता यात काय गंमत आहे कोण जाणे. पण त्याची लोकप्रियता पिढ्यान् पिढ्या टिकून आहे.  कविवर्य मंगेश पाडगांवकरांनी या गाण्याला  कांही आशय देण्याचा प्रयत्न केला आहे तो अशा प्रकारे
चांदोमामा चांदोमामा भागलास काय। घरचा अभ्यास केलास काय।
चांदोमामा चांदोमामा लपलास काय। पुस्तक हरवून बसलास काय।
चांदोमामा चांदोमामा रुसलास काय। गणितात भोपळा घेतलास काय।

लहान मुलांना सगळ्यात प्रिय खाऊ म्हणजे चॉकलेट. त्याचाच बंगला बांधला तर त्याच्या आजूबाजूला कसले दृष्य असेल?
चांदीच्या झाडामागे चांदोबा राहतो। मोत्यांच्या फुलांशी लपालपी खेळतो।

कधी कधी मुलाचा सख्खा मामा त्याला हंसत खेळत बाराखडी शिकवण्यासाठी  अ आ आई म म मका हे गाणं म्हणतो त्यातसुध्दा चांदोमामा पाहिजेच
प प पतंग आभाळात उडे। ढ ढ ढगात चांदोमामा दडे।।

एखादी चिमुरडी पोर एक गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान वहिनी आणण्यासाठी आपल्या दादाच्या मागे लागते. या खास वहिनीला घरी कशी आणायची?
वहिनीला बसायला चांदोबाची गाडी । चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी ।
हरणांची जोडी तुडवी गुलाबाचे रान।   ….. असा सगळा तिचा थाटमाट!

दुसरी एक छकुली चन्द्राला (किंवा चन्द्रिकेला)  चंदाराणी म्हणते आणि विचारते
चंदाराणी, चंदाराणी, कां ग दिसतिस थकल्यावाणी ?
शाळा ते घर घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा,
रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी?
वाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई।
म्हणुनिच कां तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी।।

आपल्या घरामध्येच  गोजिरवाणे हंसरे तारे असतांना आभाळातल्या चांदण्या पहायची गरजच कुठे आहे असं विचारीत एक आई म्हणते
गोकुळ येथे आनंदाचे, झरे वाहती शांतिसुखाचे ।
वैभव पाहुन मम सदनीचे ढगाआड गं चंद्र दडे ।। मी पाहू कशाला नभाकडे ।।

आमच्या लहानपणी शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये पहिली कविता होती
देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो ।
सुंदर  चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे ।
आणि शेवटी
इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील ।।  
शालेय शिक्षणाची सुरुवात अशा सुंदर आणि सकारात्मक विचाराने व्हायची.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: