तोच चन्द्रमा नभात – भाग ३१

तोच चन्द्रमा नभात – भाग ३१
मराठी गाणी- प्रेमगीते

चांदण्या रात्रीच्या धुंद करणा-या वातावरणाचे वर्णन सराठी कवितेत विविध त-हेने आले आहे.

एक कवि म्हणतात,
उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा ।
दाही दिशा कशा खुलल्या, वनिवनि कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनि जाहल्या, प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा।।

तर दुसरे सांगतात,
पान जागे फूल जागे भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला।
चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला, चंद्र आहे साक्षिला चंद्र आहे साक्षिला।।

अशा धुंद वातावरणाचा लाभ घ्यायलाच पाहिजे ना?  कोणी प्रेमी युगल म्हणते,
शुक्रतारा मंद वारा, चांदणे पाण्यातुनी,
चंद्र आहे स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी।
आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा,
तू असा जवळी रहा, तू अशी जवळी रहा ।।

एक प्रेमिका म्हणते,
शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला ।
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला ।
साजणा रे मोहना रे ऐक ना रे, तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी,
सगे सोयरे मी सांडिले पाटी ।
मोहन मधुर राती, भराला येऊ दे प्रीती ।
प्रीतीची हीच ना रीती, कशाला कुणाची भीती ।
झाडामागे चांद हा वरती आला, ये ना ये ना जीव आतुर झाला।
मी भुलावे, स्वैर व्हावे, गीत गावे ।।

साजणाने तिला प्रतिसाद दिल्यावर मग तर काय विचारता? ती म्हणते,
चांदण्यात फिरतांना माझा धरलास हात, सखया रे आवर ही चांदरात।

तर तो उद्गार काढतो,
चांद माझा हा हासरा, नाचवी कसा प्रेमसागरा, प्रीतलहरी ये भरा।।
किंवा
हात तुझा हातातुन धुंद ही हवा, रोजचाच चंद्र आज वाटतो नवा नवा ।।

आणि त्या सुखाचा उपभोग घेता घेता..
क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे, विरघळून चंद्र आज रक्तातुन वाहे,
आज फुले प्राणांतुन केशरी दिवा, रोजचाच चंद्र आज वाटतो नवा नवा ।।

कधी कधी लपवाछपवीचे खेळ सुरू होतात, मग..
पुरे बहाणे, गंभीर होणे, चोरा तुझिया मनी चांदणे,
चोर ही जाणे, चंद्रही जाणे, केली चोरी छपेल कां?
प्रीत लपवुनी लपेल कां?

अशा अवस्थेत कोणी सावधगिरीचा इशारा देत विचारतं,
हंसले मनि चांदणे, जपुन टाक पाऊल साजणी, वाजतील पैंगणे ।
पानांच्या पाठीत लपोनी चंद्र पाहतो गडे,
सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे ।

नव्या संसाराची चित्रे कल्पनेमध्ये रंगवतांना एक युवती म्हणते,
हे माहेर सासर ते, ही काशी रामेश्वर ते,
उजळिते कळस दो घरचे, चंद्रिका पूर्ण चंद्राची ।
होणार सून मी त्या घरची।।

तिचा पति तिला सांगतो,
नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी।
अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी,
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी,
घर न प्रीतिकुंज हा, बैस ये सुहासिनी।।

लाजरी बुजरी नववधु विचार करते,
कशी करू स्वागता, एकांताचा आरंभ कैसा, असते कशी सांगता?
फुलते कळि की फुलवी वारा, चंद्र हंसवि की हंसवी तारा,
कुठले आधी कुठले नंतर, येई ना सांगता।

अशी किती गाणी सांगू?

                                                               (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: