तोच चन्द्रमा नभात – भाग ३२

तोच चन्द्रमा नभात – भाग ३२

मराठी गाणी- विरहगीते

चांदण्या रात्रीच्या धुंदीमध्ये न्हाऊन निघणे सर्वच प्रेमिकांच्या नशीबात नसतं. अनेकजण विरहव्यथा भोगत असतात. त्यातलीच कुणी आर्जवे करते किंवा करतो,
रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा,
जाणिवा थकल्या जिवाच्या एकदा ऐकून जा ।
निवळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी,
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी,
जागती नेत्रातली ही पाखरे पाहून जा, एकदा येऊन जा।।

कुणाला तर हा आवेग अनावर झाला आहे. तिच्याच शब्दात सांगायचे तर,
चांद मातला मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा पेटला, मला कशी सांवरू ?
अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा,
गेल्या हरवून दिशा, झाले खुले पाखरू ।
चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी,
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू ।।

कुणा जोडप्याची भेट झाली आहे पण अर्धंमुर्ध बोलणं होईपर्यंत पुन्हा विरहाचा क्षण आला आहे. त्यांची व्यथा ते सांगतात,
चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली,
भेट अर्धी, गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली ।।
मोकळे बोलू कसे मी, शब्द ओठी थांबले,
लाज-या डोळ्यात माझ्या चित्र अर्धे रेखिले,
ओठ अर्धे विलगले, अर्ध उकले पाकळी ।।
भेट अर्धी, गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली ।।

कधी कधी असं होतं की प्रियकर बिचारा इतका थकलेला भागलेला असतो की चांदण्या रात्रीचा आनंद पूर्णपणे उपभोगण्याचं त्राणच त्याच्यात नसतं. तेंव्हा अतृप्तावस्थेतील ती म्हणते,
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास कां रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?
सांग त्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू?
उमलले अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे?

मधुचंद्र चित्रपटातल्या नायक नायिकांना मधुचंद्राची रात्रसुध्दा तुरुंगवासामध्ये वेगवेगळी घालवावी लागते. बिच्चारे म्हणतात,
मधू इथे अन चंद्र तिथे, झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात।
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे?
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात।

काही जोडप्यांच्या बाबतीत असं होतं की प्रेमाचा पहिला बहर ओसरून गेल्यावर वास्तवाचे कांटेकुटे बोचू लागतात आणि व्यथित अंतःकरणाने तो म्हणतो,
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी,
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी ।।
सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे
मी ही तोच तीच तू ही, प्रीति आज ती कुठे
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी ।

कुणाकुणाला प्राप्त परिस्थितीपुढे नमते घेऊन प्रेम वगैरे विसरून जावेच लागते. अशी एक अभागिनी म्हणते,
चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा,
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा ।
चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले,
रेखिले प्राणांत जे मी, तेच तू विसरून जा ।।

कुणाच्या मनात पूर्वीच्या गोड आठवणी येतात,
चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला,
जरा लाजुनी, जाय उजळुनी, काळोखाच्या राती,
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ।।
किंवा
अजून फिक्कट चंद्राखाली, माझी आशा तरळत आहे,
गीतामध्ये गरळ झोकुनी अजून वारा बरळत आहे ।।
अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ।
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते ।।

कांही युवति चंद्रालाच मोठा भाऊ मानून मार्गदर्शन करायची विनंति करतात.
चंद्रा दाखव मजला वाट,
एकलीच मी जाते घ्याया आज सख्याची गाठ ।।
भंवतालीचे जग हे अवघे, आज मजकडे बघते रागे,
जाऊ नको तू मेघामागे,
या भगिनीचा भाऊ होऊन ये रे पाठोपाठ ।।

तर कांही त्याच्याकडे प्रीतीचे वरदान मागतात.
दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी, रानहरिणी दे गडे भीती तुझी ।। 

पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची उपमा सुंदर चेहे-याला नेहमी दिली जातेच पण चवतीच्या चंद्रकोरीचा सुध्दा केवढा झोक?
कशी झोकांत चालली कोळ्याची पोर ?  
जशी चवतीच्या चंद्राची कोर ।।

                 (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: