तोच चन्द्रमा नभात – भाग ३३

तोच चन्द्रमा नभात – भाग ३३

समारोप

प्रेम, सौंदर्य वगैरे दर्शवणारी चन्द्राची इतकी रूपे पाहिली. आता थोडी वेगळी रूपे पाहू.  यमुनेच्या पलीकडे रहाणा-या कुब्जेला पहाटेच्या वेळी श्रीकृष्ण भेटायला गेला त्या प्रसंगाचे वर्णन करतांना कवयित्री म्हणते,
मावळतीवर चंद्र केशरी पहाटवारा भंवती भणभण ।
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकुन अपुले तनमन ।
अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे कां पांवा मंजुळ ।
अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ ।।

संत जनाबाईची श्रध्दा पाहून तिचा कामाचा भार हलका करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग तिच्या घरी येऊन तिला दळण दळायला मदत करतो तेंव्हा ती हर्षभरित होऊन म्हणते,
आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात ।
पंढरीचा रावा दळी जनीच्या घरात ।। 

कन्येसाठी कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबांची आठवण काढून त्यांची यशस्विनी लाडकी लेक म्हणते,
सूर्य चंद्र तुमचे डोळे, दुरूनीच हो बघतात ।
कमी नाही आता कांही, कृपादृष्टीची बरसात ।
पांच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात ।
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा ।।

वाल्मिकी मुनींच्या आश्रमात आपल्या मुलांना वाढवत असतांना सीतामाई म्हणते,
श्रीरामा, घनश्यामा, बघशिल कधी  तू रे, तुझी लवांकुश बाळे ।
वनवासाच्या घरात माझ्या, अरुण चंद्र हे सवे जन्मता ।
विरह प्रीतीचे दुःखही माझे, हंसते रघुनाथा ।।

धारातीर्थी पडलेल्या मुलाचा पिता आपला शोक आवरून म्हणतो,
पोचशी तू दिव्यलोकी सूर्यमंडळ भेदुनी ।
चंद्र तारे धन्य तुजला आरती ओवाळुनी ।
गौरवाचा ग्रंथ लाभे जीवनी तव भारता ।।
झुंजता रणभूवरी तू, अमर होशी रे सुता ।
भाग्य माझे थोर म्हणुनी जाहलो तव मी पिता ।।

ओंकारस्वरूप समर्थ सद्गुरूंना नमन करतांना संत एकनाथ म्हणतात,
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, त्यापुढे उदास चंद्र रवि ।
रवि, शशि, अग्नि, नेणति ज्या रूपा, स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ।।

विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले संत गोरा कुंभार आळवणी करतात,
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, नम करा थोर ।।

ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी पसायदान मागतांना संत ज्ञानदेव विनंति करतात,
चंद्रमे जे अलांछन ।  मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन ।  सोयरे होतु ।।
जगातल्या सर्व लोकांचे प्रत्यक्ष सूर्य चंद्राबरोबर नाते जुळावे, ते सुध्दा काळिमा नसलेला चंद्र आणि दाहक नसलेला सूर्य यांच्याबरोबर, असे मागणे त्यांनी केले आहे.  सर्व लोकांनी सज्जन आणि  तेजस्वी

व्हावे पण त्याबरोबर निष्कलंक रहावे आणि तापदायक होऊ नये असा संदेश या पसायदानांमध्ये दिलेला आहे.
या मालिकेची सुरुवात ज्ञानेश आणि ग्यानबा यांच्या मजेदार संभाषणापासून झाली होती आणि तिची सांगता श्रीज्ञानेश्वरांच्या ओवीने होत आहे.

..  . . . . . .  . . .  समाप्त . .  .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: