माझीही अपूर्वाई – भाग १ ते ६

माझीही अपूर्वाई – भाग १

आमच्या जमखंडी गांवापासून सर्वात जवळचे ‘कुडची’ नांवाचे एम्.एस्.एम्. रेल्वेच्या त्या काळातल्या मीटर गेज लाईनवरचे स्टेशनसुद्धा सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. गांवापासून स्टेशनला जोडणारा एक रस्ता होता पण तिथपर्यंत पोचण्यासाठी पूर्वीच्या काळांत कोठलीच सोयिस्कर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. त्या मार्गाने जाणारा ‘सर्व्हिसची मोटरगाडी’ नांवाचा एक प्रकार होता. ती गाडी गांवामधून म्हणजे नक्की कुठून व केंव्हा निघेल, वाटेत कुठे कुठे किती वेळ थांबत थांबत किंवा बंद पडत आणि दुरुस्त होत ती शेवटी कुठे आणि केंव्हा पोचेल याचे कांहीच नियम नसायचे. केवळ ड्रायव्हरच्या मर्जीनुसार ती चालायची. त्याच्या सोबत एक क्लीनर असायचाच, पण गाडी स्वच्छ करण्याचे काम तो क्वचितच करीत असेल. ड्रायव्हरसाठी बिड्या, चहा, पाव, भजी वगैरे आणून देणे, त्याच्याशी गप्पा मारणे, इंजिनात (रेडिएटरमध्ये) पाणी भरणे व मुख्य म्हणजे गाडीच्या समोरून जोर लावून हँडल फिरवून दरवेळी गाडी ‘इस्टार्ट’ करणे ही कामे तो करीत असे. वाटेत भेटणाऱ्या इतर सर्व्हिस मोटारी व मालमोटारींचे ड्रायव्हर व क्लीनर मंडळींबरोबर कुठल्या तरी आडगांवातल्या एखाद्या झाडाच्या आडोशाने बसून बिड्या फुंकत पत्ते कुटणे हा या सर्व मंडळींचा आवडता छंद. गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या होत असलेल्या हाल अपेष्टा किंवा त्यांनी केलेल्या आरडाओरडीचा यत्किंचित परिणाम त्यांच्यावर होत नसे. निर्ढावलेले प्रवासी सुद्धा गाडीतून खाली उतरून निवांतपणे आपापल्या चंच्या उघडून तंबाखूचा बार भरीत किंवा बिडी शिलगावीत त्यांच्यात सामील होऊन जात. कुटुंबवत्सल लोक मोठमोठाले टिफिन कॅरियर आणि फिरकीचे तांबे भरभरून खायच्या प्यायच्या गोष्टी नेहमीच प्रवासात बरोबर आणीत. वाटेत कुठे गाडी काही काळ थांबणार आहे असे दिसले की तिथेच त्यांची पिकनिक सुरू होत असे. मुक्कामाला पोचायची घाई क्वचितच कोणाला असे. त्यातून कोणी तक्रार केलीच तर “गाडीचं इंजिन तापलं आहे, ते थंड झाल्याखेरीज गाडी सुरू होणार नाही.” हे डायवरसायबाचे उत्तर ठरलेले असे.

मी लहान असतांनाच एस्.टी.च्या बस गाड्या सुरू झाल्या आणि त्यांचे वेळापत्रक वगैरेसारखी कांही नियमितता त्यांत आली. तरीही रस्त्यांची वाईट अवस्था व वाटेत आडवे येणारे नदीनाले वगैरेंच्या अनिश्चितता जमेस धरून “शहाण्याने नेहमी एक गाडी मागे ठेऊन आधीची गाडी धरावी” असे धोरण जुन्या काळचे लोक पाळीत असत. रेल्वेमध्ये आरक्षण ही भानगड नव्हतीच. पहिला आणि दुसरा वर्ग सरकारी अधिकारी किंवा फार श्रीमंत लोकांसाठी असायचा. सामान्यांनी तिकडे पहायचे सुद्धा नाही. इतर सारे डबे तिसऱ्या वर्गाचे आणि सर्वांसाठी खुले असायचे. पण हे फक्त तत्वापुरते झाले. प्रत्यक्षात गाडी मुळात जिथून निघायची ते स्टेशन सुटले की डब्यांचे दरवाजे बंद करून व त्यांच्या आंतल्या बाजूला ट्रंकाची चळत लावून ते जे घट्ट मिटायचे ते फक्त एखादे मोठे जंक्शन आले किंवा त्या ट्रंकांच्या मालकांचे उतरायचे स्टेशन आले तरच पुन्हा उघडायचे. मधल्या स्टेशनांवरची सारी रहदारी खिडक्यांतूनच व्हायची. त्या काळांत खिडक्यांना गज नसायचे. त्यामुळे पोचवायला आलेल्या मंडळींनी हमालांच्या मदतीने प्रवाशांना त्यांच्या सामानासुमानासकट बाहेरून खिडकीच्या आंत कोंबायचे आणि त्याचे उतरण्याचे स्थानक आले की डब्यातले इतर प्रवासी त्यांना उचलून आंतून बाहेर ढकलत आणि त्याचे सामान म्हणजे बोचकी, वळकट्या वगैरे प्लॅटफॉर्मवर फेकीत आणि ट्रंका हातात देत असत.

अशा बिकट परिस्थितीमुळे प्रवास करणे ही जिकीरीची गोष्ट असायची. माझे रेल्वेमधून प्रत्यक्ष प्रवास करण्याचे योग फार कमी आले. दिवाळीच्या सुटीसाठी मोठी भावंडे घरी यायची किंवा माहेरपणासाठी बहिणी यायच्या त्यांच्या तोंडून ऐकलेल्या हकीकतींमध्ये या रणधुमाळीतून आपण कशी शिताफीने गाडीत जागा मिळवली याचा वीररसपूर्ण वृत्तात किंवा खिशातले किती पैसे आणि सामानातल्या कोणकोणत्या वस्तु चोरीला गेल्या, हरवल्या किंवा कुठेतरी राहून गेल्या वगैरेची करुण कहाणी, त्यातूनही लहानग्यांची कशी काळजी घेतली याची वात्सल्यगाथा, कुठल्या भल्या माणसाने ऐन वेळी कशी मदत केली याबद्दल कृतज्ञता असे विविध रस असत. युद्धस्य कथाः रम्याः असे म्हणतात, तशातलाच थोडा प्रकार. कदाचित यामुळेच मला प्रवासवर्णनांची पुस्तके वाचायला खूप आवडायची. पु.ल.देशपांडे यांच्या युरोपच्या यात्रेचे सचित्र वर्णन शि.द.फडणीसांच्या कुंचल्यातून उतरलेल्या मार्मिक रेखाचित्रांसह अपूर्वाई या नांवाने किर्लोस्कर की मनोहर मासिकांत धारावाहिक स्वरूपांत यायला लागले तेंव्हा दर महिन्याला ते वाचण्याची अहमहमिका लागायची.

मी इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेतल्यानंतर तिथला जो तो मुलगा पुढील शिक्षणासाठी परदेशी जायचीच भाषा करतो आहे असे दिसले. मला सगळ्या परीक्षांमध्ये बऱ्यापैकी मार्क पडत गेले असल्याने कदाचित आपल्यालाही गुणवत्तेच्या आधारावर कुठे तरी जायची संधी मिळणार असे वाटायला लागले. तोपर्यंतच्या काळात मी भारतातसुद्धा फारसा प्रवास केलेला नव्हता. त्यामुळे मदुराईची गोपुरे किंवा दिल्लीचा कुतुबमीनारसुद्धा न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगइतकेच उंच व दूर भासायचे. ‘पुलंच्या अपूर्वाईने चाळवलेले कुतूहल’ यापलीकडे परदेशाचे आकर्षणही वाटत नव्हते. तरीही ‘जायची संधी मिळालीच तर त्या दृष्टीने पूर्वतयारी केलेली बरी’ असे मी मनात ठरवले.

‘देश तसा वेष’ धारण करण्यात फारशी अडचण नव्हती. इथेसुद्धा मी शर्ट पँट तर वापरतच होतो. वेळ आल्यावर एखादा सूट शिवून घेतला की झाले. त्याची इतक्यात घाई नव्हती. तिकडचे अन्नपाणी खाण्यापिण्याची संवय कशी करायची? घरातले संस्कार आणि राज्यात असलेली कडक दारूबंदी यामुळे पिण्याचा प्रश्नच नव्हता. कँपातल्या हॉटेलांत जाऊन थोडेसे अभक्ष्यभक्षण करून पाहिले. पण हे शिक्षण फार महाग पडत होते, शिवाय जिभेला विशेष रुचत नव्हते त्यामुळे ते फार काळ टिकले नाही. आमची इंग्रजी बोलीभाषा सुद्धा तर्खडकरी स्पष्ट उच्चाराची होती. ती सुधारती कां ते पहावे म्हणून कॉन्व्हेंटमध्ये शिकून आलेल्या मुलांशी गट्टी केली. व्याकरण किंवा शब्दसंभार या बाबतीत ते माझ्यापेक्षा फारसे पुढे नव्हते हे त्यातून समजले. पण बोलण्यातले नखरे, तोरा आणि आंग्लभाषेतल्या शिव्या शिकायला मिळाल्या व त्याने आत्मविश्वास वाढला. तिकडचे लोक बोलत असलेली त्यांची यस् फॅस भाषा समजून घेण्यासाठी इंग्रजी सिनेमे पहाण्याचा सपाटा लावला. ते थोडे आवडायलाही लागल्यामुळे तो छंद बराच काळ चालू राहिला.

हळूहळू वरच्या वर्गातल्या मुलांबरोबर ओळख होत गेली. त्यातली कांही मुले परदेशी जाण्यासाठी वेगळ्याच प्रकारची तयारी करीत होती. वेगवेगळ्या कॉलेजांचे व युनिव्हर्सिटींचे फॉर्म मागवणे, ते भरून परकीय चलनातील फीसह तिकडे पाठवून देणे, परकीय चलन मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळवणे, फॉर्मसोबत पाठवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेची प्रमाणपत्रे आणि शिफारसी गोळा करणे, ‘जीआरई’ व ‘टोफेल’ नांवाच्या विशिष्ट परीक्षांना बसण्यासाठी फॉर्म भरणे, त्यात चांगला स्कोअर होण्यासाठी कसून वेगळी तयारी करणे वगैरे बारा भानगडी ते करतांना दिसत होते. त्याशिवाय पासपोर्ट काढणे आणि परदेशातल्या सरकारकडून व्हिसा मिळवणे अत्यंत जरूरीचे होते. तो मिळवण्यासाठी तिथला सगळा खर्च भागवता येईल इतकी गडगंज रक्कम आपल्यापाशी आहे याचे पुरावे पाहिजेत. ते नसेल तर तिकडे स्थाईक झालेल्या कुणीतरी आपली हमी घेतली पाहिजे. अखेरीस विमानाचे महागडे तिकीटसुद्धा आपल्याच खर्चाने आपणच काढायचे. म्हणजे अगदी दर वर्षी विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवणाऱ्याला सुद्धा मार्कशीटाबरोबर विमानाचे तिकीट आपसूक मिळेल अशी शक्यता नव्हती. त्यालाही या सगळ्या दिव्यातून जायलाच हवे होते.

मला तर त्या वेळी यातले कांहीसुद्धा करणे आंवाक्याबाहेरचे होते. शिवाय नोकरीच्य़ा निमित्याने परदेशी जायला मिळाले तर मिळेलच. तेंव्हा आता कशाला उगाच जिवाला त्रास करून घ्यायचा असा सूज्ञ विचार केला आणि उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा बेत तहकूब करून सध्या तरी आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचे असे ठरवले.
—————————
माझीही अपूर्वाई – भाग २

माझे शिक्षण संपताच लगेच नोकरीचा शोध सुरू झाला. त्या काळात कँपस सिलेक्शन फारसे प्रचारात नव्हते. वार्षिक परीक्षा वेळेवर होत असत व त्यांचे निकालही ठरलेल्या दिवशी लागत. त्या सुमारास वर्तमानपत्रांमधील पानेच्या पाने भरून नोकऱ्यांच्या जाहिराती येत. त्या नित्यनियमाने वाचून जिकडे तिकडे अर्ज टाकायला सुरुवात केली. एखाद्या परदेशी कंपनीमध्ये नोकरी मिळाल्यास त्यांच्या खर्चाने परदेशाटन घडणे जवळजवळ निश्चित होते. परंतु त्यातील बहुतेकांची निवड पद्धतही गुंतागुंतीची असायची. आधी आलेल्या अर्जांची छाननी व त्यातून निवडलेल्या लोकांची लेखी चांचणी होऊन मग उमेदवारांमध्ये सामूहिक चर्चा होई आणि परसोनेल ऑफीसर, टेक्निकल एक्स्पर्ट आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट या सगळ्यांबरोबर एकत्र किंवा वेगवेगळे इंटरव्ह्यूज होत. यांत कधी कधी परदेशी माणसेही असत. या सर्व अडथळींमधून पार करून गेल्यानंतर ती नोकरी हाती लागत असे. तीही नशीब जोरांवर असेल तर!

नोकरीसाठी फारशी खटपट करावी लागण्यापूर्वीच माझी अणुशक्तीकेंद्रामध्ये निवड झाली. ‘सरकारी नोकरी’ म्हणून ओळखीच्या कांही लोकांनी नाके मुरडली, पण त्या काळांतील एकंदरीत परिस्थिती पाहता मला चांगली वाटली म्हणून ही संधी मी सोडली नाही. रोजच्या कामातच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संबंध येत असल्याने जगभरातील अनेक संस्थांमधील कित्येक लोकांबरोबर पत्रव्यवहाराद्वारे नेहमी संपर्क घडत असे. नेहमी ऑफीसामधले कोणी ना कोणी सीनियर इंजिनियर या ना त्या देशाला जातच असत. खास त्यांचीच सोय पाहण्यासाठी ऑफिसातला एक हरहुन्नरी व हुषार माणूस नेमलेला होता. त्यामुळे कधी नी कधी एक दिवस आपणही कोठे तरी जाणार आहोत हे निश्चित होते. पण पासपोर्ट, व्हिसा, परकीय चलन वगैरेची व्यवस्था ऑफीसच्या बाहेरूनच करावी लागत असल्यामुळे मनात आले की निघाले इतके ते सोपे नव्हते. या दौऱ्यांचा दुरुपयोग केला जाऊ नये यासाठी त्यावर अनेक निर्बंध होते, त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील अनेकांची आगाऊ परवानगी घ्यावी लागत असे. अशा अनेक कारणांमुळे कुठे तरी जायचा प्रस्ताव येई आणि कांही कारणाने तो मध्येच बारगळून जाई असेही सगळ्यांच्याच बाबतीत वारंवार होत असे. एखाद्याचा पहिलाच प्रस्ताव सर्व पातळ्यांवर मंजूर होऊन मार्गात कसलीही आडकाठी न येता तो नशीबवान माणूस परदेशी चालला गेला असे फार क्वचित घडत असे.

माझ्याकडे असलेल्या कामातील गुंतागुंतीच्या तांत्रिक प्रश्नासंबंधी चर्चा व थोडी प्रत्यक्ष पाहणी किंवा निरीक्षण करणे वगैरे कामांसाठी जर्मनी व यू.के. या देशातील कांही कारखान्यांना भेट देण्याचा एक कार्यक्रम निश्चित झाला व त्याची आंखणी सुरू झाली. परदेशांतील संस्थांबरोबर पत्रव्यवहार करून त्यांना सोयिस्कर अशा तारखा ठरवणे, त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवणे आणि वेळेवर पासपोर्ट, व्हिसा, विमानाचे तिकीट व परकीय चलन प्राप्त करणे ही एक मोठी कसरत असते. या सगळ्या गोष्टींबद्दल गुप्तता बाळगायची असतेच. शिवाय वेगवेगळ्या बाबतीत नेमके कुठे काय चालले आहे याचा आपल्याला स्वतःलाच सुगावा लागत नाही, तेंव्हा कुणाला काय सांगणार?

अखेर हे सगळे ग्रह एकदाचे व्यवस्थितपणे जुळून आले आणि माझ्या निर्याणाची तारीख ठरली. तिला जेमतेम दोन तीन दिवसांचाच अवधी होता आणि अजून सगळी कागदपत्रे प्रत्यक्षात हातात आलेलीही नव्हती. पण सगळी खबरदारी घेऊनही माझ्या दौऱ्याची कुणकुण आमच्या परिसरात फिरत असणाऱ्या कांही रोगजंतूंना बहुतेक लागलीच आणि कदाचित परदेशभ्रमणाची ही संधी सोडायची नाही या विचाराने त्यांनी माझ्या शरीरात प्रवेश करून ठाण मांडले. या वेळी स्वतःला कितीही शिंका आल्या तरी चालल्या असत्या पण एकाही माशीला शिंकू द्यायचे नाही असा माझा निर्धार होता. त्यामुळे घरगुती काढे, डॉक्टरी उपचार, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक वगैरे जो जी सांगेल ती औषधे घेऊन मी रोगजंतूंवर चौफेर हल्ला चढवला आणि त्यांना आटोक्यात आणले. तोपर्यंत जाण्याचा दिवस उजाडलाही होता.
————————-
माझीही अपूर्वाई – भाग ३

परदेशगमन करणारा आमच्या कुटुंबातला मी पहिलाच सदस्य होते. आते, मामे, चुलत, मावस वगैरे नात्यातलेही अजूनपर्यंत कोणी देशाबाहेर गेलेले नव्हते. मात्र ऑफीसात तसेच शेजारपाजारी बरीच अनुभवी मंडळी होती. त्यांतील एक दोघांना भेटून कांही व्यावहारिक महत्वाच्या टिप्स घेतल्या. निव्वळ ऐकीव माहितीच्या आधाराने अनाहूत सल्ला देणारेही बरेचजण भेटतात. कोणी सांगे की “तिथे कपडे धुण्याची काहीच सोय नसते तेंव्हा निदान दिवसागणिक एक एक कपड्याचा जोड तरी आपल्या बरोबर घेऊन जायलाच हवा.” तर दुसरा म्हणे की “तिकडे घाम येत नाही की धूळ उडत नाही. त्यामुळे कपडे मुळीच मळत नाहीत, त्यातून सगळे अंग झाकणारा ओव्हरकोट वरून घालावा लागतोच. मग उगाच कपड्यांचे ओझे न्यायची गरजच कुठे असते?” कोणाच्या मते “चेक्ड इन बॅगेज तिकडे गेल्यावर मिळेलच याचा कांही नेम नसतो, कधी कधी गहाळ होते किंवा खूप उशीराने पोचते, तेंव्हा जास्तीत जास्त गोष्टी आपण आपल्या हँड बॅगेजमध्ये ठेवलेल्या बऱ्या.” तर आणखीन कोणाच्या मते “हँडबॅगेजमधल्या कुठल्या वस्तू सिक्यूरिटीवाले काढून टाकतील ते सांगता येत नाही. त्यामुळे हँडबॅगेज शक्यतो घेऊच नये.” शिवाय “तिकडून परत येतांना तुम्ही चार गोष्टी आणणार म्हणजे सामान वाढणारच. ते ठेवायसाठी बॅगेत पुरेशी रिकामी जागा ठेवायला पाहिजे म्हणजेच मोठाली बॅग न्यायला हवी.” आणि “एक्सेस बॅगेजचा चार्ज प्रचंड असतो. त्यामुळे फार कांही आणायचा मोह धरू नका बरं.” वगैरे वगैरे परस्परविरुद्ध उपदेश मिळाले.

सगळ्यांचेच सांगणे थोडे थोडे ऐकून घेऊन त्यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करीत मी त्यानुसार बॅगा भरल्या आणि विमानतळावर पोचलो. काउंटरवरल्या एका सुहास्यवदनेने माझे स्वागत करून मला विमानातली कोठली जागा आवडेल याची विचारणा केली. हे एक मी नव्यानेच ऐकत होतो. अंतर्गत विमानप्रवासात काउंटरसमोरच्या लांबलचक रांगेत उभे राहून आपली पाळी आल्यावर हातात पडलेले बोर्डिंग कार्ड घ्यायचे आणि त्यावर लिहिलेल्या सीटवर निमूटपणे जाऊन बसायचे असते एवढेच मला यापूर्वी ठाऊक होते. आता संधी मिळताच मी ‘नॉनस्मोकिंग विंडोसीट’ मागितली. पुन्हा एकदा गोड हंसून तिने माझ्या या दोन्हीपैकी एकच इच्छा पूर्ण होणे शक्य आहे असे नम्रपणे सांगितले. स्मोकिंगची मला आवडही नव्हती किंवा धुराचा त्रासही होत नसे, विंडोसीटवर बसल्या बसल्या खिडकीतून खालचे फारसे काही दिसत नाही आणि वरच्या आभाळात पहाण्यासारखे काहीही नसते याचा अनुभव मी घेतलेला होता. बहुतेक वेळी विमानाचे अवाढव्य पंखच समोरचा बराचसा व्ह्यू अडवतात. सुरुवातीला तर त्यावरचे सारखे उघडझाप करणारे फ्लॅपर्स पाहून नक्की त्यांतले कोठले तरी स्क्र्यू ढिले झाले असणार अशीच शंका मला येऊ लागली होती व माझीच झोप उडाली होती. इतके असले तरी परदेशी चाललो आहे, तिकडचे काही दृष्य दिसले तर तेवढेच पाहून घ्यावे अशा विचाराने विंडो सीट मागून घेतली. माझ्या आजूबाजूला बसलेले प्रवासी धूम्रपानाचे शौकीन नव्हते. त्यामुळे दुसरी इच्छासुद्धा आपोआप पूर्ण झाली. मुंबईहून निघतांना रात्रच होती. सकाळी मान वाकडी तिकडी वळवून दूरवर दोन चार बर्फाच्छादित शिखरे पाहिली आणि हाच तो सुप्रसिद्ध आल्प्स पर्वत असणार अशी मनाची समजून करून घेतली.

विमान सुटताच आमच्या विभागाचे काम पहाणारी गौरवर्णीय हवाईसुंदरी जवळ आली आणि मला कोठले पेय घेणे आवडेल याची तिने विचारणा केली. आली कां पंचाईत? मी कॉलेजात असतांना परदेशी जाण्याचा जो ‘अभ्यास’ केला होता, त्यात हे प्रकरण राहून गेले होते हे मागच्या भागात आलेच आहे. त्यानंतर कधी मित्रांच्या संगतीने दोन चार प्याले पोटांत रिचवले होते तर कधी इतरांप्रमाणे सोनेरी रंगाच्या पेयाने भरलेला ग्लास नुसताच हातात धरून पार्टीमध्ये हिंडतांना त्यातले घोट, दोन घोट घशाखाली ढकलले होते. त्यामुळे कोठलाही काकाजी मला “हाय कम्बख्त, तूने पी ही नही” असे म्हणू शकला नसता. पण मला एकंदरीत या विषयातली गती कमीच होती. त्यातून यातले सकाळी उठल्यानंतर काय घ्यायचे आणि रात्री कशाने तहान भागवायची? जेवणापूर्वी कोठले ड्रिंक घ्यायची पद्धत आहे आणि जेवल्यानंतर कुठल्या नशेत झोपी जायचे असते? याचे काही नियम असतात असे ऐकले होते. ड्रिंक मागवतांना “अमक्याच्या बरोबर तमके” अशा जोडीची फरमाईश करतांना लोकांना पाहिले होते. त्यामुळे आता या वेळी नक्की काय मागावे हा प्रश्न पडला. “तुमच्याकडे कोणकोणती पेये आहेत?” अशी विचारणा करणे म्हणजे आपण अगदी नवखे आहोत हे खरे असले तरी तसे दाखवून देणे होते. शिवाय तिने चार नांवे सांगितली असती तरी त्याने प्रश्न सुटणार नव्हता. “तुझ्या कोमल हाताने तुझी इच्छा असेल ते पेय माझ्या प्याल्यात भरून दे” असे सांगणे जरा अतीच रोमँटिक झाले असते. त्यानंतर तिने हातात काही देण्याऐवजी श्रीमुखात भडकावण्याची शक्यता होती. असे विचार मनात येत असतांना हवाई सुंदरीने आणलेल्या ट्रॉलीवर सफरचंदाचे चित्र काढलेला एक उभा डबा दिसला. त्याकडे बोट दाखवीत मी सफरचंदाचा रस मागून घेतला.

रसपानाच्या पाठोपाठ जेवण आले. मध्यरात्रीचा दीड वाजून गेला होता. खरे तर ही कांही आपल्याकडच्या जेवणाची वेळ नव्हती. पण रात्रीच्या जेवणाच्या वेळेला प्रवासाच्या धावपळीत असल्याने आणि मानसिक ताणामुळे फारसे अन्न पोटांत गेले नव्हते. आता स्थिरस्थावर झाल्यावर भूक जाणवायला लागली होती. शिवाय दुसरे दिवशी सगळ्याच जेवणांच्या वेळा बदलणार होत्या. त्यामुळे मिळेल ते कांहीतरी थोडे खाऊन घ्यायचे ठरवले. पुन्हा एकदा तीच ‘सुकांत चंद्रानना’ ट्रॉली घेऊन आली. “व्हेज ऑर नॉनव्हेज” असे विचारतांच मी त्या दिवशी नॉनव्हेजमध्ये काय ठेवले होते याची चौकशी केली. तिने “वीयल्” का असेच कांही तरी सांगताच माझी विकेट उडाली. ट्रॉलीमधून मसाल्याचा मंद सुगंध येत होताच. त्याच्या अनुषंगाने मी शाकाहारी जेवण मागवले आणि काश्मीरी पुलावाने भरलेली थाळी घेतली. त्या दिवशी विमानात प्रवासीच कमी होते की सगळ्यांनी उपास करायचे ठरवले होते, काय झाले होते कोणास ठाऊक? थोड्या वेळाने तिने आपण होऊन नॉनव्हेज पदार्थाने भरलेली वीयलची एक प्लेट मला आणून दिली आणि आणखी पुलाव हवा असेल तर तो घेण्याचा आग्रहसुद्धा केला. तिने आणलेला पदार्थ खाऊनसुद्धा तो जीव जमीनीवर चालणारा होता, की पाण्यात पोहणारा होता की हवेत उडणारा होता याचा पत्ता कांही मला लागला नाही.

सीटच्या समोर असलेल्या खणात एक स्टेथॉस्कोपसारखे दिसणारे उपकरण ठेवले होते. आजूबाजूचे प्रवासी त्याचे दोन स्पीकर कानांत अडकवून प्लग कुठेतरी खुपसत होते. मीही आपल्या सीटजवळचे सॉकेट शोधून काढले. तिथेच एक कॅलक्युलेटरसारखे दिसणारे पॅड होते. त्याची बटने दाबताच कानावर पडणाऱ्या संगीताचे प्रकार बदलत होते. चपटे व्हीडीओ मॉनीटर अजून बाजारातही आले नव्हते त्यामुळे ते विमानात ठेवायची पद्धत त्याकाळी अजून सुरू झाली नव्हती, फक्त श्रवणाची सोय होती. हातातल्या पॅडवरल्या बटनांशी चाळे करता करता कुठल्या तरी संगीताच्या चालीवर निद्राधीन झालो. जाग येईपर्यंत उजाडले होते व सकाळच्या चहा नाश्त्याचे ट्रे घेऊन येणाऱ्या ट्रॉल्यांचा खडखडाट सुरू झाला होता. ते आन्हिक उरकेपर्यंत आपण रोम येथे येऊन पोचलो असल्याची घोषणा झाली. बसल्या बसल्या अंग आंबून गेले होते. आता थोडा वेळ मोकळेपणी हिंडावे फिरावे असे वाटत होते. पण मला रोमला उतरायचे नव्हते. त्यापुढे फ्रँकफर्टपर्यंत जायचे होते. त्यामुळे जागेवर बसूनच रहावे लागणार की काय असे वाटत होते. इतक्यात “विमानातल्या सर्व प्रवाशांनी आपापल्या केबिन बॅगेजसकट इथे उतरून ट्रान्झिट लाउंजमध्ये जाऊन थांबावे.” अशी घोषणा झाली आणि मी तर मनातल्या मनात “देव पावला” असेच म्हंटले. थोड्याच वेळात रोमच्या ‘लिओनार्दो दा विंची’ विमानतळावर आमचे विमान उतरले आणि युरोपच्या मातीवर आमच्या पायातल्या बुटांचे ठसे उमटवले. यापूर्वीच नील आर्मस्ट्रॉंग वगैरे मंडळी चंद्रावर जाऊन आली असतीलही. पण युरोपच्या भूमीवर पाय ठेवणे हीच माझ्या दृष्टीने केवढी अपूर्वाईची गोष्ट होती.
——————————-
माझीही अपूर्वाई – भाग ४

युरोपात पोचल्यामुळे माझ्या मनातला हर्ष गगनांत मावेनासा झाला होता. पण युरोपच्या त्या भूमीवरून नजर वर करून समोर पाहताच पायाखालची जमीन सरकते की काय असा भास झाला, कारण खांद्याला स्वयंचलित बंदुका अडकवलेल्या व कमांडोजसारखा वेष धारण केलेल्या सैनिकांचा एक छोटा जथा समोर उभा होता. त्यातल्या चार पांच जणांनी सर्व प्रवाशांना एका रांगेतून चालवत ट्रान्जिट लाउंजमध्ये नेले. उरलेले सैनिक बहुधा रिकाम्या झालेल्या विमानात तपासणी करायला गेले असावेत. हे सगळे कशासाठी चालले होते याचा सुगावासुद्धा कोणी प्रवाशांना लागू दिला नाही. फार फार तर “नॉर्मल सिक्यूरिटी प्रिकॉशन्स” एवढे संक्षिप्त उत्तर मिळाले. पण ते काही तरी वेगळे असणार, कारण त्यानंतरही मी अनेक वेळा परदेशी जाऊन आलो पण असली सिक्यूरिटी कधीच पाहिली नाही.

ट्रान्जिट लाउंजमध्ये पोचल्यानंतर आमच्यावर कसलेही बंधन नव्हते. त्या ठिकाणी मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. मुंबईच्या त्या काळातल्या विमानतळावर प्रवेशकक्षामध्ये चार पांच स्टॉलवजा दुकाने दिसली होती तेवढीच. सिक्यूरिटी गेटच्या पलीकडे चहा कॉफी किंवा कोकाकोला यापलीकडे काहीही मिळाले नसते. रोमच्या विमानतळावर तर अगदी एक्झिट गेटला खेटून चक्क बाजार भरला होता. विविध वस्तूंनी भरलेल्या दुकानांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक दुकानात कांचेच्या भव्य शोकेसेसमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू आकर्षक रीतीने सजवून गौर मांडल्यासारख्या मांडून ठेवल्या होत्या व त्यावर प्रखर प्रकाश टाकून त्यांची चमक आणखीनच वाढवली होती. त्या काळात मुंबईमध्ये मॉल्स आले नव्हते. अकबरअलीज किंवा सेंच्युरी बाजारसारख्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये थोडी सजावट असायची पण तेथील आगाऊ विक्रेते गिऱ्हाइकाला ती नीटशी पाहू देत नसत. इथे मात्र ती अडचण अजीबात नव्हती.

आधी मी बिचकत बिचकत दुकानाबाहेरूनच दिसेल तेवढे पहायचा प्रयत्न केला. पण अनेक लोकांना आंत शिरून मनसोक्त नेत्रसुख घेतांना पाहिले आणि अखेरीस बाहेर निघतांना ग्राहकाकडून पैसे घेणाऱ्या व्यक्तीखेरीज दुकानात दुसरा कोणी नोकर दिसला नाही. अर्थातच शॉप लिफ्टिंगला आळा घालण्यासाठी जागोजागी छुपे कॅमेरे लावलेले असणार. पण दोन्ही हात मागे बांधून कुठल्याही वस्तूला स्पर्श न करता मनमोकळेपणे फिरण्याची सर्वांना मुभा होती. माझ्या दौऱ्याची अजून सुरुवातही झालेली नसल्याने खिशातील थोडेफार पैसे अडी अडचणीसाठी राखून ठेवणे इष्ट होते याची जाणीव होती. एकेका वस्तूच्या किंमतींची लेबले वाचल्यावर तर ती विकत घेण्याचा विचारसुद्धा मनात डोकावू शकला नाही. माझे हे निरीक्षण चालले असतांनाच आमच्या विमानाच्या प्रस्थानाची घोषणा झाली व त्याबरोबरच सर्व प्रवाशांनी त्वरित आपापल्या जागांवर येऊन बसण्याची सूचनाही झाली.

रोमहून निघाल्यावर तासा दीडतासांत फ्रँकफर्ट आले. इतर प्रवाशांच्यासोबत चालत चालत व ‘एक्झिट’, ‘बॅगेज क्लेम’ वगैरे पाट्यांवरील बाणांच्या दिशा पहात पहात एका मोठ्या हॉलमध्ये आपल्या बेल्टपाशी येऊन पोचलो तोपर्यंत त्याचे सामानासकट फिरणे सुरूही झाले होते. दुरूनच आपली सूटकेस येत असलेली पाहून मी सुटकेचा निःश्वास सोडला व जवळ येतांच तिला उतरवून घेतले. खिशातून तिकीटासोबतची बॅगेजची स्लिप काढून ती आता कोणाला दाखवायची या विचारांत असतांनाच एक युनिफॉर्मधारिणी महिला माझ्या जवळ आली व तिने मोडकेतोडके इंग्रजी व उरलेले हातवारे या भाषेत माझा प्रॉब्लेम विचारला. मीही तशाच प्रकारे “माझे सामान मिळाले आहे, आता पुढे काय करायचे?” ते विचारले. सारे प्रवासी जिकडे जात होते त्या दिशेने मलाही जायची खूण तिने केली. कोणता प्रवासी कोणते सामान घेऊन बाहेर पडत होता या संबंधी कसलीच तपासणी त्या ठिकाणी दिसत नव्हती. पण “अशा चुका किंवा चोऱ्या फारच क्वचित होतात व त्या टाळण्यासाठी प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी करण्यापेक्षा एखाद दुसऱ्याला घसघशीत नुकसानभरपाई देणे विमानकंपन्यांना परवडते, नाही तरी सामानाचा विमा उतरवलेला असतोच.” असे स्पष्टीकरण कालांतराने मिळाले. पण त्या क्षणी तरी मला नुकसानाची भरपाई कितीही मोठी मिळणार असली तरी ती नको होती, माझे आपले सामानच हवे होते, कारण कामाशिवाय इतर उचापती करायला माझ्याकडे अवधीच नव्हता.

बाहेर येऊन इमिग्रेशनचा ठप्पा पासपोर्टावर मारून घेतल्यानंतर पुन्हा पुढे काय करायचे हा प्रश्न पडला. मला फ्रँकफर्टहून लुफ्तान्साच्या विमानाने स्टुटगार्टला जायचे होते. त्या वेळेस भारतात फारसे संगणकीकरण झालेले नसल्यामुळे थ्रू चेक इन मिळण्याची सोय नव्हती. त्यामुळे सामानाची ट्रॉली ढकलत नेत चौकशी करण्याची खिडकी शोधून काढली. इथे मात्र इंग्रजी भाषा समजणारी व्यक्ती होती. तिने मला माझ्या फ्लाईटचा गेट नंबर सांगितला. भारतातल्या संवयीप्रमाणे एका मिस् कनेक्शनचे मार्जिन ठेऊन मला दोन फ्लाईट्समध्ये चांगला चार पांच तासांचा अवधी दिला गेला होता. पण रोममधली सुरक्षा जॉंच जमेला धरूनसुद्धा आमचे विमान जवळ जवळ वेळेवरच पोचले होते व मी अर्ध्या तासात सामानासह बाहेर आलो असल्यामुळे माझ्यापाशी भरपूर मोकळा अवधी होता. इतक्या लवकर पुढच्या फ्लाईटच्या बोर्डिंग गेटपाशी जाऊन बसण्यात कांहीच अर्थ नव्हता.

इकडे तिकडे पाहता लुफ्तान्साचे जे पहिले काउंटर दिसले तिथे गेलो. तिथल्या महिलेने मला तासाभराच्या आंत सुटणाऱ्या आधीच्या फ्लाईटमध्ये बसण्याची संधी देऊ केली. पण मी तिथे लवकर जाऊन तरी काय करणार होतो? मला तिथली कांहीच माहिती नव्हती आणि माझा यजमान त्याला दिलेल्या वेळेवरच तिथल्या विमानतळावर पोचणार होता. हे सांगितल्यावर तिने लगेच मला माझ्या फ्लाईटचे बोर्डिंग कार्ड काढून दिले व सामानाच्या ओझ्यातून मुक्त केले. आता मी उरलेला वेळ आपल्या मनासारखा घालवू शकत होतो. तो चांगल्या प्रकारे घालवण्यासाठी तिने मला एअरपोर्टच्या इमारतीचा एक सुबक नकाशाही दिला.

फ्रँकफर्टचा अतिभव्य विमानतळ पाहिल्यावर असे लक्षात आले होते की त्यापुढे रोमचा विमानतळ साधा ट्रेलरसुद्धा नव्हता. इथल्याइतकी विविध प्रकारची दुकाने मला युरोपातल्या कोठल्या शॉपिंगसेंटरमध्येही पुढे दिसली नाहीत. त्या जागी काय म्हणून नव्हते ? उपयोगाच्या वस्तू होत्या तशाच शोभेच्याही होत्या. अद्ययावत कपडेलत्ते होते तशी सुगंधी अत्तरेही होती. साध्या कागद पेन्सिलीपासून कॉम्प्यूटरपर्यंत सगळे कांही विकायला ठेवलेले दिसत होते. इतकेच नव्हे तर खाण्यापिण्याची चंगळ होती तशीच मनोरंजनाची अनेक साधने होती. श्लील व अश्लील सिनेमापासून कॅसिनोज व बिलियर्डच्या खेळांपर्यंत मागाल ते त्या इमारतीच्या आवारात उपलब्ध होते. चार पांच तासच काय अख्खा दिवस तेथे घालवणे कठीण नव्हते. फक्त त्यासाठी आपल्या जवळ मुबलक पैसा असायला हवा होता!

नकाशाच्या आधाराने फिरता फिरता एका जागी खाली रेल्वे स्टेशन असल्याचे समजले. तिथून फ्रँकफर्ट शहराला जाण्यासाठी फक्त दहा पंधरा मिनिटांचा प्रवास होता व जाण्या येण्यासाठी मुबलक गाड्या होत्या हे पाहून त्या प्रेक्षणीय शहराची एक धांवती चक्कर मारायच्या विचाराचा किडा मनात वळवळला. विमानतळावर सगळ्या इंग्रजी पाट्या वाचीत फिरतांना माझा आत्मविश्वास वाढलेला होता. स्वयंचलित यंत्रामधून तिकीट काढून रेल्वेगाडीत जाऊन बसलो व शहराच्या मुख्य स्टेशनावर खाली उतरलो. आता मात्र माझे पुरते धाबे दणाणले, कारण एअरपोर्ट सोडतांच इंग्रजी भाषेनेही साथ सोडली होती. स्टेशनासकट शहरातल्या सगळ्या पाट्या जर्मन भाषेत व इंग्रजी जाणणारा एक इसम रस्त्यात भेटायला तयार नव्हता. कुठून ही दुर्बुद्धी सुचली असा विचार करीत स्टेशनात परत आलो तर विमानतळाला जाणारी गाडी कशी शोधायची व त्याचे तिकीट तरी कसे काढायचे याचीसुद्धा पंचाईत झाली. एअरपोर्ट ही अक्षरेच कुठे दिसत नव्हती. त्या जागेसाठीसुद्धा अर्थातच जर्मन भाषेतील मला माहीत नसलेला शब्द लिहिलेला होता. घोळात घोळ होऊन भलत्याच गांवाला पोचलो असतो तर पुढचे विमान गांठणे कठीण होते. यापुढे असले साहस करायचे नाही असा कानाला खडा लावला आणि सारे अभिनयकौशल्य पणाला लावून खाणाखुणा करत कसाबसा विमानतळाकडे परतीचा मार्ग शोधून काढला. तरीही रेल्वेगाडीच्या खिडकीमधून विमानतळ दिसू लागल्यावरच माझ्या जिवात जीव आला.

मी थोडी क्षुधाशांती करून विंडो शॉपिंग करण्यात उरलेला वेळ काढला आणि भारतातल्या संवयीप्रमाणे एक तास आधी गेटवर गेलो. त्या कक्षाचा दरवाजा चक्क बंद होता आणि कांही माहिती सांगायला त्या ठिकाणी चिटपांखरूसुद्धा नव्हते हे पाहून शंकांच्या पाली मनात चुकचुकायला लागल्या. पण सगळ्या मॉनीटर्सवर तर त्याच गेटचा क्रमांक माझ्या फ्ताईट क्रमांकासोबत येत होता. ते पाहण्यात माझी कांही चूक होत नव्हती. गेट नजरेच्या टप्प्यात राहील इतपतच फिरत राहिलो. विमान सुटायला जेमतेम वीस पंचवीस मिनिटे उरलेली असतांना लुफ्तान्सा कंपनीची माणसे आली आणि दरवाजा उघडून मला आंत प्रवेश दिला. ती फ्लाईट फक्त पंधरा वीस मिनिटांची असल्यामुळे तेवढ्या वेळांत चहापाणी पुरवणे शक्यच नव्हते. बोर्डिंग गेटवरच एक व्हेंडिंग मशीन ठेऊन ज्याला जे पाहिजे ते पेय स्वतःच घेण्याची व्यवस्था केली गेली. त्याचा लाभ घेईपर्यंत भराभर इतर उतारू येत गेले व पांच मिनिटात विमान गच्च भरले. त्यानंतर पांचच मिनिटांत त्याने उड्डाणही केले. वेळेच्या बाबतीतल्या या पराकोटीच्या काटेकोरपणाबद्दल मला जर्मन लोकांचे अतिशय कौतुक वाटले.

स्टूटगार्ट विमानतळ त्या मानाने खूपच छोटेखानी आहे. त्या उड्डाणात मी एकटाच भारतीय प्रवासी होतो आणि माझ्या रंगावरूनच नव्हे तर चेहेऱ्यावरील वेंधळ्या भावावरून सुद्धा कोणीही मला पटकन ओळखले असते. तरीही मला उतरवून घेण्यासाठी आलेले सद्गृहस्थ माझ्या नांवाचा फलक हातात उंच धरून उभे होते व मला पाहताच ते पुढे आले व त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. ते काही वर्षे अमेरिकेत राहून आले होते. त्यांना बऱ्यापैकी इंग्लिश समजत असल्याने माझ्याबरोबर होत असलेला सारा पत्रव्यवहार तेच सांभाळत होते. त्यामुळे त्यांचे नांव माझ्या चांगले परिचयाचे होते. आता त्याला एका उमद्या व्यक्तिमत्वाची जोड मिळाली. त्यांनी मला बरोबर घेऊन न्यूर्टिंजन नांवाच्या गांवातल्या ज्या ठिकाणी माझ्या तात्पुरत्या निवासस्थानाची सोय केलेली होती तेथे नेले, माझी सर्व व्यवस्था नीट झाली आहे याची खात्री करून घेतल्यानंतर दुसरे दिवशी भेटण्यासाठी माझा निरोप घेतला.
अशा रीतीने माझ्या प्रवासाचा पहिला टप्पा तर सुरळीतपणे पूर्ण झाला.
————————-
माझीही अपूर्वाई – भाग ५

न्यूर्टिंजन या गावात मी जिथे उतरलो होतो ते हॉटेल हा एक तीन किंवा चार बेडरूम्सचा फ्लॅट होता. हॉलमध्येच दरवाजाजवळ एक टेबल खुर्ची मांडून व बाजूला छोटेसे पार्टीशन करून कामचलाऊ ऑफीस बनवले होते. त्याच्या पलीकडे चार खुर्च्यांचे डायनिंग टेबल होते. भिंतीला लागून एक लांबट आकाराचे टेबल होते. त्यावर जॅम, सॉस वगैरेच्या बाटल्या आणि क्रॉकरी ठेवली होती. दुसरे दिवशी सकाळी त्यावर कॉर्न फ्लेक्स, टोस्ट, बटर वगैरे मांडून ठेवलेले मिळाले. एका बाजूला किचन होते. त्यात मी पूर्वी कधी न पाहिलेल्या आकारांच्या मोठमोठ्या ओव्हन्स, ग्रिल्स आणि हॉट प्लेट्स होत्या. दुसऱ्या बाजूला पॅसेजला लागून असलेल्या सेल्फकंटेन्ड बेडरूम्समध्ये दोन दोन लोकांच्या रहाण्याची व्यवस्था होती. माझ्या वास्तव्याच्या काळात तरी मला दुसरा कोणी पाहुणा भेटला नाही. कदाचित मी फारच थोडा वेळ हॉटेलात घालवत असल्यामुळेही तसे झाले असेल. वरच्या मजल्यावर मालक रहात होता व तो आपल्या कुटुंबाच्या सहाय्याने ते हॉटेल चालवत होता. इतर कोणी नोकरवर्ग केंव्हाही दिसलाच नाही. अशा प्रकारची फॅमिली रन हॉटेल्स युरोपात चांगलीच प्रचलित आहेत व मध्यमवर्गीय प्रवाशांना अल्प खर्चात चांगली रहाण्याची सोय ती उपलब्ध करून देतात.

ते हॉटेल पाहिल्यावर मला आपल्याकडील देवस्थानांचे पूजारी भाविक यात्रेकरूंची आपल्या घरी उतरण्याची सोय करतात त्याची आठवण झाली. मात्र तिकडचा प्रकार एकदम पॉश व प्रोफेशनल होता. सगळ्या खोल्या चकाचक स्वच्छ होत्या. जमीनीवर गालिचा अंथरलेला, खिडक्यांना पडदे लावलेले होते. बेडरूम व बाथरूममध्ये सर्व आधुनिक सुखसोयी उपलब्ध होत्या. अगदी छोटेखानी हॉटेल असले तरी त्याचे नांव, पत्ता, फोन नंबर वगैरे सुबक अक्षरात छापलेली त्याची स्टेशनरी होती. इतकेच नव्हे तर चादरी, टॉवेल्स, बेडशीट्स, कप, ग्लास, कांटे, चमचे वगैरे सगळ्या गोष्टींवर हॉटेलचे नांव त्याच्या बोधचिन्हासह छापलेले किंवा कोरलेले होते. निव्वळ याच गोष्टी पाहिल्या असत्या तर हे एक मोठे तारांकित हॉटेल असेल असेच कोणाला वाटले असते. अशा प्रकारच्या हॉटेलात सर्वसामान्यपणे फक्त ब्रेकफास्टची सोय असते. किंबहुना ‘बी अँड बी’ (बेड अँड ब्रेकफास्ट) याच नांवाने ती ओळखली जातात असे म्हणता येईल. मी सांगितले असते तर कदाचित त्याने मला रात्री आपल्यातलेच चार घास जेवणसुद्धा खाऊ घातले असते असे वाटत होते, पण मलाच भूक नव्हती आणि झोपण्यापूर्वी दोन चार बिस्किटे किंवा केक खाऊन झोपायचे असे मी ठरवले होते.

थोडी विश्रांती घेऊन, कपडे बदलून फिरायला बाहेर पडलो. घड्याळात संध्याकाळचे आठ वाजले होते. आपल्याकडे या वेळेस काळोख झालेला असतो. तिथे मात्र स्वच्छ ऊन पडले होते. न्यूर्टिंजन हे फारच छोटे गांव दिसले. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जायला दहा पंधरा मिनिटे सुद्धा लागली नाहीत. बहुतेक इमारती दोन किंवा तीन मजली होत्या. त्यात कांही बंगले आणि कांही अपार्टमेंट्स होते. झोपड्या किंवा टपरी नव्हत्याच. सगळीकडे व्यवस्थित कॉंक्रीट किंवा डांबरी रस्ते आणि पेव्ह्ड फूटपाथ होते. रस्त्याला लागून असलेल्या बहुतेक इमारतींच्या दर्शनी भागात दुकाने होती. विमानतळावर पाहिले होते तशाच प्रकाराने सगळ्या दुकानांत कांचेच्या आड सर्व वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या. त्या इवल्याशा गांवात रेफ्रिजरेटर व टी.व्ही.ची दुकाने सुद्धा होती. एक मोटारगाड्यांचे शोरूम पाहून तर मी चाटच पडलो. कांही दुकानांत प्रकाश दिसत होता पण आंत एकही माणूस नव्हता. तिकडे सगळी दुकाने ऑफीस टाईमप्रमाणे सकाळी उघडतात व संध्याकाळी बंद होतात म्हणे. या काळांत सारीच मंडळी आपापल्या ऑफीसात असणार. त्यामुळे ती दुकानात केंव्हा जातात आणि दुकानात ऑफीसटाईममध्ये कोणते ग्राहक येतात हे कोडे कांही मला सुटले नाही. आणि मला पाहिजे असलेल्या कुकीज व बिस्किटे कांचेतून दिसत होती पण हातात येत नव्हती.

फिरता फिरता एका आडरस्त्यावर आपल्याकडे वडापावाचा ठेला असतो तसा एक प्रकार दिसला. त्याच्या समोर एक जोडपे उभे होते. ठेल्यावरच्या आजीबाई तोंडाने जर्मन भाषेत मला अगम्य अशा गप्पा हंसत खिदळत मारता मारता हाताने पावाला चिरून त्यात बटर, चीज, लेट्यूसची पाने वगैरे कांही कांही कोंबत होती. सगळे सारण भरल्यावर तो पदार्थ मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कांही सेकंद भाजून तिने त्यांना खायला दिला. तिथे आणखी काय काय उपलब्ध आहे असे विचारायला भाषेची अडचण होती. ते दृष्य पाहून झाल्यावर मलाही तोच पदार्थ बनवून द्यायला मी तिला खुणेने सांगितले. तिला ते बरोबर समजले व तिने त्याबरहुकूम ते सँडविच कम बर्गर तयार करून मला दिले आणि समोरच्या गल्ल्यातले एक नाणे दाखवून त्याची किंमत सांगितली. असा ‘शब्देविण संवादू’ साधून त्या वेळेची सोय तर झाली.

दुसरे दिवशी सकाळी मी ठरलेल्या वेळेआधीच तयार होऊन नाश्ता खाऊन बसलो होतो. माझा मित्र बरोबर वेळेवर हजर झाला व मला कारखान्यात घेऊन गेला. प्रवेशद्वारापाशीच जर्मनी व भारत या दोन्ही देशांचे ध्वज उभारले होते आणि माझे स्वागत करणारा फलक लावला होता. हा एक औपचारिक प्रकार होता, दुसऱ्या दिवशी त्याच जागी आणखी कोणाचे नांव असेल व ते सुद्धा कोणी वाचणार नाही याची मला कल्पना होती. तरीही त्या ठिकाणी आपले नांव वाचतांना आणि तिरंगा झेंडा फडकतांना पाहून बरे वाटले. आंत गेल्यावर थेट मार्केटिंग विभागाच्या प्रमुखाची भेट घेतली. पाहुण्यांची व्यवस्था पाहणे ही त्याला नेमून दिलेली जबाबदारी होती. हवा पाणी, प्रवास वगैरेवर दोन तीन वाक्ये बोलून होताच त्याने एक टाईप केलेला कागद माझ्या हातात दिला. माझ्या भेटीतील प्रत्येक दिवसाचा तासागणिक कार्यक्रम त्यावर दिला होता. एखाद्या शाळेच्या वर्गाचे वेळापत्रक असावे असे ते दिसत होते. दररोज किती वाजता मी कोणत्या खात्याला भेट द्यायची व तेथील कोणता अधिकारी माझ्याशी चर्चा करेल ते त्याच्या नांवानिशी लिहिले होते. अर्थातच या कागदाच्या प्रती सगळ्या संबंधित मंडळींना दिलेल्या असणार हे उघड होते.

त्या कागदावर ओझरता दृष्टीक्षेप टाकताच मी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या कार्यक्रमाची आंखणी अत्यंत विचारपूर्वक केलेली होती व मला अभिप्रेत असलेले सर्व उद्देश त्यांत नमूद केलेले होते याबद्दल त्यांचे आभार मानले व तो अजेंडा बनवणाऱ्याचे तोंडभर कौतुक केले. पण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कोणतीही नवीन गोष्ट करीत असतांना त्यांतील कांही प्रक्रिया नीटपणे समजून घ्यायच्या असतात, हातात असलेल्या कामातील सध्याच्या समस्या विचार विनिमयाने सोडवाव्या लागतात, संभाव्य अडचणीवर उपाय शोधून ठेवणे इष्ट असते, उभयपक्षांना हव्या असलेल्या सुधारणा व त्यांनी केलेल्या सूचना यांवर मनमोकळेपणाने चर्चा करायची असते. यासाठीच तर मी साता समुद्रापलीकडून इकडे आलो होतो. अशा प्रकारच्या गोष्टींना मिनिटांचे कडक बंधन घालता येत नाही. कांही छोटेसे प्रयोगही करून पहायचे असतात, त्यासाठी तात्पुरती व्यवस्था करावी लागते. या सगळ्या गोष्टी मर्यादित वेळेत करण्यासाठी मी एक नेटवर्क बनवून आणले होते. ते त्यांना देऊन आपण प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम व साध्य ठरवून घेऊ पण त्याला तासांचे बंधन नको, त्यासाठी रोज इथे वाटेल तितका वेळ थांबायची माझी तयारी आहे असे सांगितले. त्यांनीही या सूचनेचे आनंदाने स्वागत केले. रोज रात्रीच्या भोजनापर्यंत थांबून आणि कधी त्यानंतरही पुन्हा परत येऊन तास दोन तास काम करून आम्ही यादीमधील सर्व कामे मनासारखी पूर्ण केली. शेवटच्या दिवशी मात्र फक्त मागील दिवसात केलेल्या कामाचा आढावा घेऊन मिनिट्स ऑफ मीटिंग बनवणे एवढेच उरले होते. त्याचा कच्चा मसूदासुद्धा तयार करून ठेवला होता. उभयतात कांही मतभेद नसल्यामुळे ते काम झटपट पार पडले व मला अर्धा दिवस उसंत मिळाली.

मी भेट देत असलेला कारखाना न्यूर्टिंजनसारख्या तीन चार खेडेगांवांच्या मधोमध मोकळ्या जागेवर उभारलेला होता. त्या भागात खास प्रेक्षणीय असे काहीच नव्हते. माझ्या दृष्टीने पाहता तो देश, तिथली जमीन, त्यावरची शेते, झाडे झुडुपे, सतरा अठरा तास लख्ख उजेड असलेला दिवस, मी झोपल्यानंतर सुरू होऊन जाग येण्यापूर्वीच संपणारी, कधीच दृष्टीला न पडलेली काळोखी रात्र, प्रदूषणापासून मुक्त, शुद्ध थंडगार कोरडी हवा, तिथली धष्टपुष्ट गौरकाय माणसे, त्यांची घरे, दुकाने, सपाट व प्रशस्त रस्ते, त्यावरून सुसाट वेगाने धांवणारी वाहने वगैरे सगळेच अगदी नवे होते. पण ते जाता येता दृष्टीला पडत होते तेवढेच. सर्वसामान्यपणे पर्यटक जे कांही निवांतपणे पहातात त्यातले मी कांहीच पाहिले नव्हते. माझ्या यजमानांनी याची थोडीशी भरपाई करायची असे ठरवले. सगळे ऑफीशियल काम संपल्यानंतर एका उत्साही तरुणाला माझ्यासोबत पाठवून जवळच्या स्टूटगार्ट शहरात फिरवून आणले. तिथल्या काही वैशिष्ट्यपूर्ण इमारती, चर्चेस वगैरेंचे ओझरते दर्शन घेतले.

जर्मनीतली भेट यशस्वीरीत्या संपल्यानंतर दौऱ्याचा पुढचा भाग इंग्लंडमध्ये घालवायचा होता. पहाटे उठून टॅक्सीने स्टूटगार्ट एअरपोर्टवर गेलो. बाहेर उजाडले असले तरी तिथे सगळीकडे सामसूम होती. लंडनला जाण्यासाठी पॅनॅम एअरलाईन्सचे तिकीट माझ्याकडे होते. पण तिचा काउंटर कुठे सापडत नव्हता. लुफ्तान्साचा काउंटर उघडलेला होता. तिथे चौकशी करायला गेलो तर त्यांचे विमान लगेच निघण्याच्या तयारीत आहे व मी त्याने जाऊ शकतो असे सांगितले. माझ्याकडच्या तिकीटाचे फॉईल काढून घेऊन बोर्डिंग कार्ड हातात दिले. आपल्याकडे एका बस कंपनीचे तिकीट दुसऱ्या कंपनीला चालत नाही. पण मला तर आश्चर्य व्यक्त करायलाही वेळ नव्हता. धांवत पळत जाऊन विमान पकडले आणि दीड दोन तासात लंडनच्या सुप्रसिद्ध हीथ्रो विमानतळावर उतरलो.
—————————————–
माझीही अपूर्वाई – भाग ६

‘इंग्लंड’, ‘इंग्रज’ व ‘इंग्रजी’ यांना माझ्या भावविश्वात महत्वाचे स्थान आहे. शाळेत असतांना इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमात तर इंग्लंडविषयी बरेचसे शिकायला मिळालेच, पण संस्कृतचा अपवाद सोडल्यास विज्ञान, भाषा यासारख्या इतर विषयांतही कुठे ना कुठे त्याचा उल्लेख यायचा. मी एकंदरीतच जितक्या इतर देशांचा अभ्यास केला असेल त्यांत ‘ग्रेट ब्रिटन’ किंवा ‘युनायटेड किंग्डम’चा सर्वात वरचा क्रमांक लागेल. तरीही या दोन्ही संज्ञांमध्ये नेमका काय फरक आहे ते मात्र मला नक्की सांगता येत नाही ही गोष्ट वेगळी! ‘इंग्लंड’ हा त्यातला एक विभाग आहे हे माहीत असले तरी ते नांव आपल्याकडे जास्त प्रचलित आहे म्हणून तेच नांव सोयीसाठी इथे घेतले आहे.

इंग्रज लोकांनी भारतावर आक्रमण केले, येथील राजांमध्ये आपापसात कलह लावून कुटिल नीतीने सारा देश आपल्या अंमलाखाली आणला. इथल्या प्रजेची लूटमार केली, तिच्यावर अनन्वित जुलूम जबरदस्ती केली, फोडा आणि झोडा या नीतीने दुफळी माजवली वगैरे त्यांच्या दुष्टपणाच्या कहाण्या ऐकतांना संताप तर येणारच. पण या सगळ्या इतिहासातल्या गोष्टींचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसल्यामुळे त्याची तीव्रता फार दाहक झाली नव्हती. त्याचे द्वेषात रूपांतर झाले नव्हते. इंग्रजांच्या राज्यकालात कांही चांगल्या गोष्टीसुद्धा घडल्या हे मान्य करण्याइतपत अलिप्त वृत्ती धारण करणे मला शक्य झाले होते. फार तर इंग्रजांच्याबद्दल मनात एक आढी निर्माण झाली एवढेच. तरीही सर आयझॅक न्यूटन, जेम्स वॅट, एडवर्ड जेन्नर, शेक्स्पीयर, जॉर्ज बर्नार्ड शॉ प्रभृती विभूंतींच्या बद्दल माझ्या मनात फक्त निर्भेळ आदराची भावनाच निर्माण झाली होती. ते शत्रूपक्षाचे आहेत असे मला तरी कधी वाटलेच नाही.

उच्च शिक्षणासाठी इंग्रजी भाषेचा उपयोग करणे सुरू झाले व त्यानंतर नोकरीतले दैनंदिन कामकाज त्याच भाषेत होत राहिले. रोजच्या व्यवहारात सर्वात अधिक लिहिणे, वाचणे, ऐकणे व बोलणे त्याच भाषेत होत गेले. त्यामुळे ती भाषा आता परकी वाटतच नाही. आपण जी भाषा रोज उपयोगात आणतो, ज्या भाषेतून जास्तीत जास्त संवाद साधतो ती भाषासुद्धा आपलीच होते, नाही कां? ती आपल्या देशात जन्मली नसेल पण आज ती इथे सर्रास वापरली तर जातेच आहे ना? त्या भाषेत लिहिलेल्या लिखाणातून आपल्याला नवनवीन गोष्टींची माहिती होतेच ना? त्या भाषेत लिहिलेल्या कथा, कविता, कादंबऱ्या वाचतांना आपल्या मनाला आनंद मिळतोच ना? मग तिच्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण होणे साहजीकच आहे.

लंडनला जात असतांना अशासारखे विचार मनात येत होते. आपण आपल्या शत्रूच्या गढीत शिरायला चाललो आहोत असे न वाटता जुन्या मित्राच्या घरी जात आहोत ही भावना प्रबळ होती. लहानपणापासून ज्याचा गाजावाजा कानावर पडत आला होता ते लंडन शहर ‘याचि देही याचि डोळा’ पहायला मी चाललो होतो ही सत्य परिस्थिती होती. राग, द्वेष, मत्सर, भय अशा नकारात्मक भावना मनात येत नव्हत्या. ही मायानगरी प्रत्यक्षात कशी असेल याची उत्सुकता, वाचनांत किंवा ऐकण्यात आलेली एक अद्भुत जागा डोळ्यांनी पाहण्याची आतुरता, कित्येक वर्षांपासून मनात दडलेली इच्छा पूर्ण होणार असल्याचे समाधान आदि सकारात्मक भावना मनांत घेऊन मी हीथ्रो विमानतळावर उतरलो.

मी नुकतेच फ्रँकफर्टचे विशाल विमानतळ पाहिलेले असल्यामुळे हीथ्रोच्या भव्यतेने माझे डोळे मुळीच दिपले नाहीत. उलट इमिग्रेशनच्या रांगांमधील काळ्यागोऱ्यांमधला भेदभाव पाहून मला वैतागच आला. खुद्द इंग्लंडच्या रहिवाशांना त्यांच्याच देशांत मुक्त प्रवेश असावा हे एक समजण्यासारखे आहे. पण युरोपियन व अमेरिकनांसाठी वेगळी खिडकी व जलद गतीने चालणारी वेगळी रांग होती. आशिया व आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येकाची मुलाखत घेऊनच त्यांना प्रवेश मिळत होता. यासाठी त्यांची मंदगतीने सरकणारी वेगळी रांग होती. एकदा सर्व चौकशी करून व्हिसा देऊ केल्यानंतर पुन्हा प्रवाशांना तेच प्रश्न विचारण्यात काय अर्थ होता? तरीही प्रत्येकाला त्या सवालजबाबामधून जावेच लागत होते. मात्र जर्मनीमध्ये असतांना तिथली स्थानिक भाषा समजत नसल्यामुळे सतत जी अस्वस्थता वाटत होती ती लंडनला पोचताच निघून गेली. इथे गरज पडल्यास कोणाशीही संवाद साधणे शक्य होते. एअरपोर्टपासूनच बरेच भारतीय वंशाचे लोकही दिसायला लागले. गर्दीमधील सलवार कमीज, साड्या आणि पगड्या पाहून चांगले वाटत होते.

माझ्या परदेशदौऱ्यातला पहिला आठवडा जर्मनीत काम केल्यानंतर शनिवार व रविवार हे मधले दोन सुटीचे दिवस थोडे जिवाचे लंडन करून घालवायचे आणि सोमवारपासून इंग्लंडमधल्या कॉव्हेन्ट्री या गांवातील यंत्रोद्योगाला भेट द्यायची असे वेळापत्रक मी बनवले होते. त्या दृष्टीने शनिवारी लंडनला आगमन व रविवारी तेथून प्रयाण ठेवले होते. पण दीड दोन दिवस नक्की काय करायचे याची मलाही स्पष्ट कल्पना नव्हती. कांही ठरवण्यापूर्वी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मी “मी आपणास कांही मदत करू कां?” असा फलक लावलेल्या खिडकीकडे गेलो. अशा जागी आपल्याला कितपत उपयुक्त माहिती मिळेल याविषयी मी आधी साशंकच होतो. समोरील दोन तीन माणसे दहा बारा सेकंदात सरकली व माझा क्रमांक आला.

पलीकडच्या बाजूला एक हंसतमुख तरुण बसला होता. मी सरळ त्याला माझा कार्यक्रम सांगितला आणि त्याचा सल्ला मागितला. माझे बोलणे ऐकता ऐकताच तो हाताने कांही कागद गोळा करतांना दिसत होते. माझे बोलणे संपताच त्याने बोलायला सुरुवात केली,”हा लंडन विमानतळाचा नकाशा. आता तुम्ही इथे उभे आहात. या इथून लिफ्टने खाली रेल्वे स्टेशनला जा. हा मेट्रो रेल्वेचा नकाशा. ही लाईन पकडून या स्टेशनवर जा. तिथे गाडी बदलून त्या लाईनने ‘किंग क्रॉस’ स्टेशनवर जा. तिथे गेल्यावर उद्या संध्याकाळी सुटणाऱ्या गाडीने कॉव्हेंटरीला जायचे रिझर्वेशन करू शकता. रेल्वेच्या ‘लेफ्ट लगेज’ ऑफीसात आपले सामान जमा केलेत तर तुम्हाला मोकळेपणाने फिरता येईल. त्यानंतर पुन्हा या मेट्रो लाईनीने अमक्या स्टेशनांवर जा. तिथे बाहेर पडतांच ‘लंडन सिटी साईट सीइंग’ची ओपन टॉप बस मिळेल. या बसमध्ये बसल्या बसल्याच लंडनमधली सगळी महत्वाची ठिकाणे ते दाखवतील. प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी त्याचे थांबे आहेत. वाटल्यास त्यातल्या कोणत्याही ठिकाणी उतरलात तरी हरकत नाही. दर पंधरा मिनिटांनी तिथे पुढची बस येत राहील. त्याच तिकीटावर तुम्ही दुसऱ्या बसमध्ये चढून पुढील ठिकाणे पाहू शकता. एक चक्कर मारून झाल्यावर तुम्हाला एकंदर अंदाज येईल व नकाशाच्या सहाय्याने तुमच्या आवडीची ठिकाणे सावकाशपणे पाहू शकाल. यातील अमकी अमकी ठिकाणे पहाणे तुम्हाला जास्त आवडेल असे मला वाटते. हे तुमचे रेल्वेचे तिकीट आणि हे साईट सीइंगच्या बसचे तिकीट. याचे इतके पौंड झाले. आणखी कांही शंका असल्यास जरूर विचारा.” तो भराभर हातातील नकाशावर पेन्सिलीने खुणा करीत सांगत गेला. इतके सुस्पष्ट मार्गदर्शन मी यापूर्वीही कधी पाहिले नव्हते आणि नंतरही कधी मला मिळाले नाही. ‘चौकशी’ च्या खिडकीवर तर नाहीच नाही. या माणसाने शंकेला कुठे जागाच ठेवली नव्हती.

त्याने मागितलेले पौंड देऊन सगळे कागद गोळा केले व त्याचे आभार मानले. त्या दोन दिवसात मला पुन्हा कोणालाही कांहीही विचारण्याची गरज पडली नाही. एकदा समग्र लंडन दर्शन करून घेऊन त्याने सुचवलेली प्रेक्षणीय स्थळे सविस्तर पाहिली आणि कॉव्हेंटरी गांठली. पुढील आठवडा पहिल्यासारखाच धामधुमीत गेला. फरक एवढाच की कॉव्हेंटरी हे एक मोठे शहर असल्यामुळे तिथे रात्री उशीरापर्यंत उघडी राहणारी काही दुकाने होती. सिटी बसेसची सोय होती आणि बहुमजली इमारत असलेले मोठे हॉटेल होते. त्यामुळे संध्याकाळी परत आल्यावर थोडी बहुत हालचाल करता येत होती. भाषेच्या अज्ञानामुळे आलेले परावलंबित्व राहिले नव्हते. जर्मनीमधील लोकांना तांत्रिक गोष्टी सुद्धा सांगतांनाच मला नाकी नऊ येत होते तसे इथे होत नव्हते. मी ज्या लोकांबरोबर काम करीत होतो त्यांच्याशी थोड्या अवांतर विषयांवर बोलणे शक्य होते.

असेच एकदा माझ्या समवयस्क इंग्लिश इंजिनियराबरोबर सहजच बोलत असतांना आमच्या जीवनांची तुलना होत होती. मी त्याच्यापेक्षा किंचित मोठ्याच आकाराच्या निवासस्थानात रहात होतो, माझ्या घरातसुद्धा टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन वगैरे सारी आधुनिक उपकरणे होती. दोघांनाही ऑफीसला जायला साधारण तितकाच वेळ लागायचा, फक्त तो स्वतःच्या गाडीने जायचा आणि मी ऑफीसच्या. आमच्या जेवणातले पदार्थ वेगळे असले तरी दोघेही आपापल्या आवडीचा तितकाच सकस आहार रोज घेत होतो. फावला वेळ घालवण्याचे आमचे छंदही साधारणपणे सारखेच होते. अशा प्रकारे आमच्या नित्याच्या जीवनात फारसा फरक नव्हता. मात्र हे सगळे करून त्याची महिन्याला पडणारी शिल्लक मात्र माझ्या महिन्याच्या पूर्ण पगारापेक्षाही अधिक असे. त्यामुळे तो दोन तीन वर्षांत एकदा तरी फ्रान्स, स्पेन, इटली, स्विट्झर्लँड अशासारख्या देशातल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देत असे. जमल्यास लवकरच भारताला येण्याचाही त्याचा विचार होता. मला मात्र जन्मभर काटकसर करूनसुद्धा असे निव्वळ मौजमजेसाठी परदेशभ्रमण करणे त्या वेळी शक्यतेच्या कोटीत दिसत नव्हते.

ही वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट झाली. त्यानंतर परिस्थिती बदलत गेली. जे अशक्य वाटत होते ते आटोक्यात आले. मीसुद्धा केवळ मौजमजा आणि विश्राम करण्यासाठी दोनदा इंग्लंडमधील लीड्सला जाऊन राहून आलो. त्या वेळी इतरत्र फिरण्यासाठी अनुकूल हवामान नव्हते. त्यामुळे युरोप पाहता आले नाही. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करून केसरीची ग्रँड युरोप टूर घेऊन फिरून आलो. अमेरिकालाही जाऊन तिथे काही दिवस राहून आलो. पण पहिल्या परदेशगमनाची जी अपूर्वाई होती ती अपूर्वच वाटत राहणार.

. . . . . (समाप्त)

संपादन दि.२2 जानेवारी २०१९.
———————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: