तेथे कर माझे जुळती – भाग २ स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी

स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी

पं.भीमसेन जोशी यांचे नांव मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा मी चौथी किंवा पांचवी इयत्तेत शिकत होतो. त्या काळात टेलीव्हिजन आणि टेपरेकॉर्डर नव्हतेच, ट्रान्जिस्टरसुध्दा आले नव्हते. आमच्या लहान गांवात आमच्याच नव्हे तर माझ्या कोणा मित्राच्या घरी व्हॉल्व्हचा रेडिओ देखील नव्हता. त्यामुळे तोपर्यंत माझ्या कानावर शास्त्रीय संगीत कधीच पडलेले नव्हते.  त्यातल्या सूर, ताल, लय वगैरे गोष्टी कशाबरोबर खातात ते ठाऊक नसले तरी मला गाणी ऐकण्याची व गुणगुणण्याची आवड मात्र होती. जात्यावरच्या ओव्या, मंगळागौर, हदगा वगैरेंच्या खेळांमधली मुलींची गाणी, भजनातले अभंग, जोगवा, भारूड वगैरे प्रकार यासारखी लोकगीते आणि गावात कोणीतरी लावलेल्या लाऊडस्पीकरवरून कधी कधी ऐकू येणारी मराठी, कानडी आणि हिंदी लोकप्रिय गाणी वगैरे जे कांही माझ्या कानांवर पडायचे ते आवडत असे आणि त्यांच्या चालीसह लक्षात रहात असे. पण संगीताचे एक गहन शास्त्र आहे आणि सगळी गाणी त्याच्या आधारावर रचलेली असतात याची जाणीव मात्र मला नव्हती. “गाणं गाण्यात असं काय असतं? कुणीही ते गुणगुणावं” अशीच त्या वयात माझी समजूत होती. त्यामुळे ‘पंडित भीमसेन जोशी’ असे भारदस्त नांव असलेले कोणी विद्वान फक्त दोन चार गाणी म्हणून दाखवण्यासाठी पुण्याहून इतक्या दूर आमच्या आडगांवात येणार आहेत हे ऐकून मला त्याचे नवलच वाटले.

त्यांच्या  गायनाचा कार्यक्रम एका सार्वजनिक जागेत होता. त्यांचे गायन ऐकण्यासाठी किंवा अधिक करून त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सारा गांव लोटला होता. त्या गर्दीतून वाट काढत मी स्टेजच्या जितक्या जवळ जाता येईल तितके जाऊन तिथे बसकण मारून घेतली. त्या काळात तिथला वीजपुरवठा मुळीच भरंवशाचा नसल्यामुळे दिवेलागणी होतांच जेवणे आटोपून झोपी जायची रीत होती. त्याचा विचार करता पंडितजींचे गायन रात्री थोडे उशीरानेच सुरू झाले. पहिला अर्धा पाऊण तास त्यांनी कुठल्याशा एका रागाची विलंबित लयीतील बंदिश नेहमीप्रमाणेच चांगली रंगवली होती, पण माझ्यासारख्या अज्ञ बालकांना आणि अननुभवी गांवक-यांना मात्र “हे गायक नुसतेच आ..ऊ .. काय करताहेत? ते आपली गाणी म्हणायला केंव्हा सुरू करणार आहेत?” असे प्रश्न पडत होते. गर्दीमधले बरेच लोक डुलक्या घेऊ लागले होते हे त्यांच्या जांभयांवरून दिसत होते. द्रुत लयीमधली बंदिश सुरू झाल्यानंतर सर्व श्रोत्यांत चैतन्य आले.  पंडितजींनी गायिलेली अभंगवाणी आणि संत पुरंदरदासांची पदे तर सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटात डोक्यावर घेतली.  ते गाणे ऐकून मला एका वेगळ्याच विश्वात जाऊन आल्यासारखे वाटले. गाण्याची एक ओळ इतक्या असंख्य वेगवेगळ्या प्रकाराने सुरेलपणे इतकी छान गाता येते हे पाहून आणि ऐकून मी आश्चक्याने थक्क होऊन गेलो होतो. शास्त्रीय संगीत ऐकण्याची सुरुवातच मी पं.भीमसेनांच्या गायनाने केली होती हे माझे केवढे सुदैव?

मोठा झाल्यानंतर शास्त्रीय संगीत ऐकण्याची थोडी गोडी लागली. शिकाऊ मुलामुलींच्या लहानशा घरगुती बैठकींपासून ते दिग्गज कलाकारांच्या मोठ्या मैफिलींपर्यंत आणि गणेशोत्सवाच्या मांडवांपासून ते टाटा थिएटरसारख्या अद्ययावत वातानुकूलित सभागृहांपर्यंत अनेक जागी अनेक कार्यक्रमांना श्रोता म्हणून हजेरी लावली. हा आपला प्रांत नव्हे हे लवकरच लक्षात आल्यामुळे ते शिकण्याचा निष्फळ प्रयत्न मात्र कधी केला नाही. पं.भीमसेन जोशी यांचे गाणे कुठे तरी आहे असे समजले आणि तिथे जाणे मला शक्य असले तर आपोआपच माझी पावले तिकडे वळायची.  कार्यक्रम झाल्यानंतर शक्य झाल्यास स्टेजवर जाऊन त्यांचे जवळून दर्शन घेण्याचा प्रयत्नही कधी कधी केला.

असाच एकदा दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये त्यांचे गायन ऐकून मध्यरात्री घरी परतलो होतो.  दुसरे दिवशी ऑफीसच्या कामासाठी मला दिल्लीला जायचे होते. त्यामुळे पहाटे लवकर उठून विमानतळावर जाऊन पोचलो. चेक इन करून झाल्यावर पुढल्या अनाउन्समेंटची वाट पहात बसलो असतांना पंडितजींचे शिष्यवर श्री.माधव गुडी येतांना दिसले. ते सुध्दा त्याच काउंटरवर चेक इन करून गेले. त्यानंतर सिक्यूरिटी चेकची अनाउन्समेंट झाल्यावर मी लगेच गेटकडे जायची घाई न करता त्या रांगेशेजारी बसून राहिलो. अपेक्षेप्रमाणे श्री.माधव गुडी यांच्याबरोबर पं.भीमसेन जोशी सिक्यूरिटी चेकसाठी आले. शिताफीने पुढे जाऊन मी त्यांच्या मागे रांगेत उभा राहिलो. हळूच त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांचे कालचे गायन छान झाले असे त्यांना सांगणे म्हणजे “काल तुझा प्रकाश लख्ख पडला होता.” असे सूर्याला सांगण्यासारखे होते. शिवाय त्यांनी कुठल्या तरी रागरागिणीबद्दल कांही उल्लेख केला तर माझी पंचाईत झाली असती. त्यामुळे मी हवापाण्याबद्दल कांहीतरी बोललो. त्यांनीही एकाद्या वडिलधारी माणसाप्रमाणे आपुलकीने माझी विचारपूस केली. रांगेमध्ये उभे असलेल्या समोरच्या एकाद्या माणसाबद्दल पोलिसांना जबरदस्त संशय यावा आणि त्यांनी त्याची चांगली कसून तपासणी करावी असे क्षणभर माझ्या मनात आले. पण तसे कांही झाले नाही आणि दोन तीन मिनिटात आमची ‘सुरक्षा जाँच’ आटोपून गेली. त्यानंतर पंडितजी एक्झिक्यूटिव्ह क्लासमध्ये जाऊन बसले आणि मी माझ्या जागेवर. विमान दिल्लीला पोचल्यानंतर मी बाहेर येऊन विमानतळाच्या इमारतीत जाईपर्यंत ते अदृष्य झाले होते आणि मला आपल्या कामाच्या ठिकाणी जायचे होते.  ही ‘ छोटीसी मुलाकात’  माझ्या स्मरणात मात्र कायमची राहिली.

पंडितजींच्या गायनाबद्दल इतके लिहिले गेले आहे की त्यात कांही भर घालण्याची पात्रता माझ्याकडे नाही. गायक मंडळी एकाद्या बुजुर्गाचे नांव उच्चारतांना आपला हात एका कानाला लावतात. मला तर दोन्ही हातांनी आपले दोन्ही कान पकडावे लागतील, पण मग मी हा लेख टाइप कसा करणार? मी त्यांचे कांही कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिले तसेच टी.व्ही.वर पाहिले. त्यांच्या मुलाखतीसुध्दा आवर्जून पाहिल्या. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे दर्शन मला घडले तेसुध्दा अत्यंत प्रभावशाली होते. कांही इतर मोठे कलाकार चालता बोलतांना आपला तोरा दाखवतात, नखरे करतात, कोणाच्या सतत तक्रारी चाललेल्या असतात, कांही लोक आपली बढाई करत असतात तर कांही लोक उगाचच “मी क्षुद्र, नगण्य आहे, माझी कांही लायकी नाही.” वगैरे म्हणत विनयाचा कृत्रिम आव आणतात. पंडितजींनी कधीही यातले कांही केले नाही. त्यांनी ना कधी स्वतःची फुशारकी मारली ना कधी आपल्याकडे लटका कमीपणा घेतला. पुण्याला इतकी वर्षे राहूनसुध्दा ‘पुणेरी’ म्हणून (कु)प्रसिध्द झालेला खोचकपणा, तिरकसपणा, शिष्टपणा, बिलंदरपणा यातल्या कशाचाही स्पर्श त्यांच्या चित्तवृत्तीला झालेला मला कधी दिसला नाही. हुबळी धारवाडकडची मंडळी सर्वसाधारणपणे जशी आपुलकीने, साधेपणाने पण थेट बोलतात, त्यांच्या वापरातले मराठी शब्द आणि त्यांचे उच्चार जशा प्रकारचे असतात त्याची आठवण पंडितजींचे बोलणे ऐकतांना येते. त्यांचे संगीताबद्दलचे अथांग ज्ञान, त्यांनी केलेली खडतर संगीतसाधना, मोठमोठ्या लोकांबरोबर झालेल्या भेटी, जगाचा मोठा अनुभव व त्यातून केलेले मार्मिक निरीक्षण आणि शिवाय त्यांचा हजरजबाबीपणा याने त्यांची मुलाखतसुध्दा श्रवणीय होते. “मी (कै.)यशवंतरावांना सांगितलं की तुम्हाला ते दर पांच वर्षांनी इलेक्शनला उभं रहावं लागतंय् की नै बघा, पण माझं इलेक्शन एकदाच त्या भगवंताने करून सोडलं आहे.” असे त्यांनी एकदा एका मुलाखतीत गंमतीने सांगितले होते ते माझ्या लक्षात राहिले आहे.

त्यांचे प्रत्यक्ष तसेच रेकॉर्ड केलेले गाणे मी अनेक वेळा ऐकले असले तरी सवाई गंधर्व महोत्सवात ते जसे गातात त्याला तोड नाही असे बरेच लोकांकडून ऐकले होते. पण कामाच्या व्यापात ते ऐकणे मला कांही जमले नाही. त्यामुळे अशा आयुष्यात राहून गेलेल्या आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर करायच्या कामांच्या यादीमध्ये सवाई गंधर्व महोत्सवाचे नांव बरेच वर होते. दोन तीन वर्षांपूर्वी एकदाचा तो योगही आला खरा, पण त्या वेळी पंडितजींची प्रकृती खूपच अस्वस्थ असल्यामुळे ते जवळ जवळ अंथरुणाला खिळून होते. तरीसुध्दा ते मोटारीत बसून स्टेजच्या जितके जवळ येता येईल तितके आले आणि माइकवरून त्यांनी श्रोत्यांना अभिवादन आणि संबोधन केले. त्यावेळी तिथे जमा झालेल्या जनसागराने त्यांना उत्स्फूर्तपणे दिलेली मानवंदना निव्वळ अविस्मरणीय म्हणता येईल.

पं.भीमसेन जोशी यांना असंख्य बक्षिसे, पारितोषिके, सन्मानचिन्हे वगैरे मिळाली आहेत. त्यांना मिळालेल्या या वस्तूंनी त्यांचे घर खचाखच भरून गेले आहे असे ऐकले. त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटण्याचे भाग्य माझ्या पत्नीला मिळाले. त्या वेळेस काढलेली छायाचित्रे या लेखाच्या अग्रभागी दिली आहेत. या सर्व सन्मानांचा मुकुटमणी असा ‘भारतरत्न’ हा भारतातला सर्वोच्च सन्मान जाहीर करण्यात आला तेंव्हा त्यांच्या सर्व चाहत्यांना अपार आनंद झाला. या निमित्यांना पंडितजींना सादर प्रणाम.

*********

भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे २४ ०१-२०११ रोजी देहावसान झाले. त्या दिवशी त्यांच्याविषयी लिहिलेले चार शब्द.

आज आपले प्रिय भीमण्णा आपल्यात राहिले नाहीत. त्यांना श्रध्दांजली म्हणून त्यांनी अजरामर केलेल्या अगणित गाण्यांपैकी काही गाण्यांचे शब्द आणि यू ट्यूबवरील दुवे देत आहे.

अभंगवाणी
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई
पुंडलीक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू
माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा
एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देवविठ्ठल देवपूजा
माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल
गुरू विठ्ठल गुरूदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला म्हणून कळिकाळा पाड नाही

इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची
ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव नाचती वैष्णव मागेपुढे
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे
उजेडी राहिले उजेड होउन निवृत्ती सोपान मुक्ताबाई

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
दरबारी आले रंक आणि राव, सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होउनी निस्संग
जनसेवेपायी काया झिजवावी, घाव सोसुनीया मने रिझवावी
ताल देउनीया बोलतो मृदंग
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाय़ी एकएक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग
भावभक्ती भीमा उदक ते वाहे बरवा शोभतहे पांडुरंग
दया क्षमाशांती हेचि वाळवंट मिळालासे थाट वैष्णवांचा
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाचि वेणुनाद शोभतसे
दश इंद्रियांचा एकमेळा केला ऐसा गोपाळकाला होत असे
देखिली पंढरी देही जनी वनी एका जनार्दनी वारी करी

भक्तीगीत

भीमसेन जोशी लता मंगेशकर- श्रीनिवास खळे
बाजे रे मुरलिया बाजे
अधर धरे मोहन मुरलीपर होठपे माया बिराजे
हरे हरे बाँसकी बनी मुरलिया मरममरमको छुए अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया जिसपर कनकमुंदरीया साजे
पीली मुंदरी अंगुरी स्याम मुंदरीपर राधाका नाम
आखर देखे सुने मधुर स्वर राधा गोरी लाजे
भूल गयी राधा भरी गगरिया भूल गयी गोधनको चारिया
जाने न जाने ये वो जाने जाने रग जग जागे

शास्त्रीय संगीत

पं,भीमसेन जोशी
मियाकी मल्हार
ममदसारंगीलेरे तुमबिन मैका

मुलतानी
नैननमे आनबान

वृंदावनी सारंग
गाऊंमै तोरे बलिहारी

दरबारी कानडा
झनकनकवा मोरेबिचवा

यमनकल्याण
श्याम बजाये आज मुरलिया

भैरवी
जो भजे हरीको सदा वोही परम पद पावेगा

भज मन रामचरम सुखदायी

जुगलबंदी पं,भीमसेन जोशी डॉ बालमुरलीकृष्ण
मानस भजरे गुरुदेवम्
अमृतमधुरसंगीतसुधाकरम्
अमलगुणान्वितम्अद्भुतचरितम्
तंबुरवीणावंशीलोलम् त्यागराजगुरुस्वामीनम् सततम्

जुगलबंदी पं,भीमसेन जोशी डॉ बालमुरलीकृष्ण
तराना
तगिततिदतिंदनादतिदना

पं.भीमसेन जोशी
जयजगदीश्वरी मात सरस्वती

कन्नड पद

भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
चित्रपटः NODI SWAMI NAAVIRODU HEEGE … Sung my maestro pt.Bhimsen Joshi..lyrics by purandara dasaru.. feat: ananthnag shankarnag , julie lakshmi

देवा बंदानम्म स्वामीबंदानो – पुरंदरदास

पंडितजींना कोटी कोटी प्रणाम

2 प्रतिसाद

  1. I have also attended his live Mahfil thrise in my life.
    he was God Of Music.

  2. […] पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दल मी लिहिलेले लेख आणि त्यांच्या गायनाच्या ध्वनिफितींचे दुवे इथे पहावेत.https://anandghare2.wordpress.com/2010/07/18/%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%b0… […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: