तेथे कर माझे जुळती – भाग ३ प्रभाकर जोशी

आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. त्यातली कांही प्रसिध्दीच्या शिखरावर जाऊन पोचतात, कांही आपापल्या क्षेत्रात चांगले नांव कमावतात तर कांही फक्त त्यांच्या परिचयातल्या लोकांनाच माहीत असतात. पण अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रभाव पडत असतो. अशाच कांही व्यक्तींबद्दल मी ‘तेथे कर माझे जुळती’ या मालिकेत लिहायला सुरुवात केली आहे. परमपूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले आणि स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या दोन उत्तुंग व्यक्तींविषयी मी पहिल्या दोन भागात लिहिले होते. त्यांच्या जीवनकार्याबद्दल आजवर अमाप लिहिले गेले आहे, त्यात आणखी भर घालण्याएवढी माझी पात्रता नाही. त्यामुळे त्यांच्या मोठेपणाबद्दल फारसे कांही न लिहिता माझ्या व्यक्तीगत जीवनाच्या वाटेवरील कुठल्या वळणावर योगायोगाने मला त्यांच्याबरोबर कांही क्षण घालवण्याची संधी मिळाली आणि त्याचा माझ्यावर काय परिणाम झाला या मी मनाशी जपून ठेवलेल्या आठवणींबद्दलच लिहिले होते. आज या लेखात मी माझ्या परिचयाच्या एका जवळच्या व्यक्तीबद्दल लिहितांना याच्या नेमके उलट करणार आहे. ते मला कधी, कुठे, किती वेळा आणि किती वेळ भेटले वगैरे व्यक्तीगत स्वरूपाचा मजकूर शक्य तो टाळून त्यांचे जे वेगळेपण मला त्यातून जाणवले तेवढेच या ठिकाणी सांगणार आहे.

योगायोगाने तेसुध्दा पुण्याचे जोशीच आहेत. श्री.प्र.ह.जोशी या नांवाने ते साहित्य, संगीत, नाट्य वगैरे क्षेत्रात सुपरिचित आहेत, आमचे प्रभाकरराव आणि बच्चेकंपनीचे आवडते जोशीकाका. त्यांचे बालपण मुधोळ, बागलकोट वगैरे लहान लहान गांवात गेले. त्या काळी तो भाग त्रिभाषिक मुंबई प्रांताच्या कानडी विभागात होता, राज्यपुनर्रचनेनंतर तो म्हैसूर राज्याला जोडला गेला आणि कालांतराने त्या राज्याचेच नांव बदलून ‘कर्नाटक’ असे ठेवले गेले. पण तोंपर्यंत प्रभाकरराव उच्च शिक्षण आणि अर्थार्जनासाठी महाराष्ट्रातील कोल्हापुराला आले होते. अधिक चांगली संधी मिळताच ते पुण्याला आले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे पुणे हीच त्यांची मुख्य कर्मभूमी आहे असे म्हणता येईल. त्यांच्याबरोबर माझी ओळख पुण्यातच झाली. त्यांच्या बोलण्याची ढब, शब्दोच्चार आणि बोलण्यात येणारे उल्लेख यावरून मी बरेच दिवस त्यांना कोल्हापूरचे समजत होतो. माझ्याप्रमाणेच ते सुध्दा कानडी मुलुखातून आले आहेत हे मला कालांतराने कळले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात झपाट्याने बदलत गेलेले तिकडचे समाजजीवन आम्ही दोघांनी जवळून आणि डोळसपणे पाहिले होते, त्याशिवाय त्या भागातले रीतीरिवाज, समजुती, वाक्प्रचार, खास खाद्यपदार्थ वगैरे अनेक समान धागे मिळाल्यामुळे आम्हाला संवाद साधायला मदत झाली.

पहिल्या भेटीत एकमेकांची ओळख करून घेतांना शिरस्त्याप्रमाणे आम्ही दोघांनी आपण कुठे काम करतो ते सांगितले. प्रभाकररावांनी सांगितलेल्या संस्थेची आद्याक्षरे ऐकून माझ्या डोक्यात कांहीच प्रकाश पडला नाही. हे पाहून त्यांनी त्यांच्या संस्थेचे पू्र्ण नांव सांगितले. कदाचित मी पुणेकर नसल्यामुळे तरीही मला त्यातून फारसा बोध झाला नाही. ती संस्था संरक्षण खात्याशी संबंधित आहे एवढे समजल्यानंतर मी जास्त चौकशी केली नाही. त्यांनीही मी काय काम करतो ते कधी विचारले नाही. बोलण्यासारखे इतर असंख्य विषय असल्यामुळे एकमेकांच्या ऑफीसमधल्या कामाबद्दल बोलण्याची आम्हाला कधीच गरज पडली नाही. प्रभाकररावांच्या व्यक्तीमत्वाच्या तानपु-यात अगणित तारा आहेत. त्यातली एकादी तार माझ्यातल्या एकाद्या तारेबरोबर जुळायची आणि तिच्या झंकारातून एक प्रकारचा सुसंवाद साधायची असेच नेहमी होत गेले.

संरक्षणखात्यातल्या संस्था नेहमीच मुख्य शहरापासून दूर, सहसा कोणाच्या नजरेला पडू नयेत अशा जागी असतात. प्रभाकररावांचे कार्यस्थळही असेच त्या काळच्या पुण्याच्या विस्तारापासून दूर आडवाटेला होते आणि पेशवाईपासून चालत आलेल्या पुण्यपत्तनाच्या पुरातन भागात ते रहात होते. त्यामुळे ते सकाळी लवकर घरातून निघत आणि परत येईपर्यंत त्यांना बराच उशीर होत असे. या जाण्यायेण्याच्या दगदगीमुळेच सर्वसामान्य माणूस थकून जाईल आणि निवांत फावला वेळ कशाला म्हणतात असा प्रश्न तो विचारेल. प्रभाकररावांच्याकडे मात्र चैतन्याचा एक अखंड वाहणारा श्रोत असावा. नोकरी आणि त्यासाठी जाण्यायेण्याला लागणारा आणि इतर जीवनावश्यक कामांना देण्यात येणारा वेळ आणि श्रम खर्च करून उरलेल्या वेळातला थोडा वेळ ते स्वतःसाठी बाजूला काढून तो साहित्य, संगीत, कला वगैरेंच्या आविष्कारात घालवत. कथा, कविता, विनोद, लेख, संवाद वगैरे विविध प्रकारचे लेखन ते करायचे. त्यांचे हस्ताक्षर मोत्यांसारखे सुरेख आहे. आपल्या लेखनाच्या सुवाच्य आणि सुडौल प्रती काढून ते पुण्यातल्या नियतकालिकांकडे पोंचवत आणि छापून येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करीत. मला हे सगळे अद्भुत वाटत असे. त्यांचे पाहून मलाही चार ओळी लिहायची हुक्की अधून मधून यायची, पण त्या कागदावर उतरेपर्यंत त्यात काना, मात्रा, वेलांट्यांच्या चुका होत असत, अक्षरे किंवा शब्द गाळले जात, किंवा ते बदलावेत असे वाटे आणि त्या खाडाखोडीनंतर तो कागद कोणाला दाखवायला सुध्दा संकोच वाटत असे. असले लिखाण घेऊन एकाद्या अनोळखी माणसाकडे जाण्याचा विचार माझ्या कल्पनेच्या पलीकडचा होता. त्यातूनही एकदा महत्प्रयासाने मी दोन तीन विडंबनात्मक चारोळ्या लिहून पोस्टाने एका जागी पाठवल्या. वर्षदीड वर्षानंतर अचानक त्या कांही मुद्रणदोषांना सोबत घेऊन छापून आल्या, पण त्याच्या खाली माझे आडनांव घाटे असे छापले होते. माझ्या परीने मी लिहिलेली अक्षरे ती वाचणा-याला वेगळी दिसली असतील तर त्यांचा तरी काय दोष म्हणा. पण त्याचे पारिश्रमिकसुध्दा कोणा घाट्यानेच बहुधा परस्पर लाटले असावे.  प्रभाकररावांचे साहित्य मात्र कसल्याही ओळखी पाळखीच्या आधाराशिवाय नियमितपणे प्रकाशित होत होते, याचे मला प्रचंड कौतुक वाटत असे.

माझ्या शाळेतल्या ज्या मुलांचे हस्ताक्षर चांगले होते ती मुले पुस्तकांतली चित्रे पाहून ती हुबेहूब तशीच्या तशी त्यांच्या वहीत काढायची. या दोन्ही कामांसाठी हांताच्या बोटांच्या हालचालींवर एकाच प्रकारचे नियंत्रण मिळवावे लागत असणार. पण स्वतंत्र चित्रे काढण्यासाठी ते पुरेसे नाही. त्यासाठी प्रतिभेचे लेणे लागते. व्यंगचित्र काढायचे असेल तर विलक्षण निरीक्षण, मार्मिकता, विनोदबुध्दी वगैरे इतर अनेक गुण त्यासोबत लागतात. प्रभाकररावांकडे या सगळ्यांचा संगम असल्यामुळे ते आकर्षक व्यंगचित्रे किंवा हास्यचित्रे काढीत असत आणि ती सुध्दा छापून येत. या निमित्याने संपादन, प्रकाशन वगैरे बाबीसुध्दा त्यांनी पाहून घेतल्या. इतर साहित्यिकांकडून साहित्य मिळवून आणि त्यात स्वतःची भर घालून त्यांनी ………… नांवाने एक स्वतंत्र दिवाळी अंक काढला. कालांतराने तो बंदही केला. मला ज्या अशक्यप्राय वाटत अशा कित्येक गोष्टी ते अगदी सहज हातात घेत, त्या यशस्वीपणे पूर्ण करेपर्यंत त्यासाठी कठोर मेहनत घेत आणि त्यानंतर तितक्याच सहजपणे त्या सोडून देत हा अनुभव त्यांच्या बाबतीत मला येतच राहिला.

साहित्याच्या क्षेत्रातला एक अभूतपूर्व असा नवा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे करून दाखवला. अनेक नव्या कवींच्या अप्रकाशित रचना गोळा करून त्यांनी त्या आपल्या सुरेख हस्ताक्षरात मोठ्या अक्षरात वेगवेगळ्या ड्रॉइंग पेपरवर लिहून काढल्या, त्यावर समर्पक अशी रेखाचित्रे रेखाटली आणि त्या सर्व कविता मोठमोठ्या आकाराच्या बोर्डांवर लावून पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे चक्क प्रदर्शन भरवले. त्याच्या उद्घाटनासाठी मान्यवरांनी हजेरी लावली, स्थानिक वर्तमानपत्रांत त्याचे वृत्तांत छापून आले आणि रसिक पुणेकरांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. त्यात प्रदर्शित केलेल्या काव्यांची एक पुस्तिकासुध्दा ते दरवर्षी काढत. ‘काव्यगंध’ या नावाचा हा उपक्रम त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे चालवला. अशा प्रकारची प्रदर्शने नाशिक, नागपूर आदी अन्य शहरात भरवण्याबद्दल विचारणा झाली. परदेशात गेलेल्या मराठी बांधवांनी त्यासंबंधी उत्सुकता दाखवली. विविध प्रकारच्या कवितांचे पोस्टर्स घेऊन आमचे प्रभाकरराव लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिसच्या दौ-यावर गेले आहेत असे एक रम्य चित्र मला दिसायला लागले होते. अखेर हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन ‘काव्यतरंग’ या नांवाने भारतातच झाले. त्यासाठी परदेशस्थ कवींनी आपल्या रचना ईमेलद्वारे इकडे पाठवणे अधिक सोयिस्कर झाले असावे.

जितक्या सहजपणे प्रभाकररावांची बोटे कागदावर चालून सुरेख अक्षरे किंवा चित्रे काढतात तितक्याच कौशल्याने ती हार्मोनियमच्या पट्ट्यांवरून फिरून त्यातून सुमधुर अशी नादनिर्मिती करतात. एकाद्या उस्ताद, खाँसाहेब किंवा बुवांचे गंडाबंधन करून संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्याइतका वेळ त्यांना कधीच मिळाला नसणार, पण एकलव्याप्रमाणे एकाग्रचित्ताने साधना करून त्यांनी आपले वादनकौशल्य कमावले आहे. गोड गळ्याची देण असलेली कोणतीही व्यक्ती एकादी गाण्याची ओळ ऐकून ती तशीच्या तशी गुणगुणू शकते तितक्याच सहजपणे ते कुठलीही लकेर ऐकल्यावर पहिल्याच प्रयत्नात तशीच्या तशी पेटीतून काढतात.  त्यामुळे ओळखीचे चार संगीतप्रेमी भेटले आणि त्यांची मैफल जमली की प्रभाकरराव पेटीवर बसणार हे गृहीतच धरले जाते. तेसुध्दा कसलेही आढेवेढे न घेता तयार होतात, गाणारा कुठल्या पट्टीत गाणार आहे वगैरे चौकशी न करता त्याची पट्टी अचूक पकडतात आणि कोमल ऋषभ किंवा शुध्द निषाद (हे कशा प्रकारचे प्राणी असावेत?) असली चर्चा न करता त्याच्या गाण्यात आपले रंग भरतात. एकाद्या दर्दी गायकाने काळी चार किंवा पांढरी पांच अशा विशिष्ट पट्टीतले सूर मागितलेच तर त्यातील षड्ज आणि पंचम दाखवून ते त्याचे गाणे सुरू करून देतात आणि त्याला उत्तम साथ करतात. त्यांचे घरच संगीतमय आहे. त्यांच्याकडे अनेक निवडक सुरेल ध्वनिमुद्रिका, टेप्स आणि आता सीडीज यांचा मोठा संग्रह आहे आणि त्यातल्या छान छान चिजा ते उत्साहाने ऐकवतात. अर्थातच स्वतः ते भरपूर ऐकत असणारच.  आपली पत्नी आणि मुलगा यांच्याबरोबर त्यांनी घरचाच एक मिनिऑर्केस्ट्रा तयार केला आहे. या त्रिकूटाने निवडक गाण्यांचे कांही सार्वजनिक कार्यक्रम करून रसिकांचे मनोरंजन केले आहे.

कांही वर्षांपूर्वी एकदा ते हिमालयातल्या एका दुर्गम अशा जागी गेले असल्याचे अचानक कोणाकडून तरी ऐकले. मला त्याचा कांही संदर्भच लागेना. त्यांच्या बोलण्यात कधी गिर्यारोहणाचा उल्लेख आला नव्हता. त्यातून ते ऑफीसतर्फे तिकडे गेले असल्याचे समजल्यावर मी अधिकच गोंधळलो. हिमालयातल्या समुद्रसपाटीपासून खूप उंचावर असलेल्या जागी जे अतीशीत आणि विरळ वातावरण असते त्याचा सैनिकांच्या सामुग्रीवर काय परिणाम होतो अशा प्रकारच्या कसल्याशा अभ्यासासाठी गेलेल्या तज्ज्ञांच्या समीतीमध्ये त्यांचा समावेश होता असे नंतर समजले.  कदाचित ते अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये त्यापूर्वीसुध्दा इतरत्र गेलेही असतील, पण त्याची वार्ता माझ्या कानावर आली नव्हती. साहित्य, संगीत, कला वगैरेमध्ये रमणारे हे गृहस्थ उच्च दर्जाचे शास्त्रीय संशोधनाचे कार्य करत होते हे मला माहीतच नव्हते. त्यांच्याकडे कांही प्रशासनिक कार्य असेल किंवा हिशोब ठेवणे वा तो तपासणे अशा स्वरूपाचे काम असेल असे मला उगाचच वाटत असे. मी सुध्दा आपल्या कामाबद्दल कोणापुढे कधी चकार शब्द काढत नसल्याने माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल लोकांच्या मनात काय कल्पना असतील कोण जाणे.

प्रभाकरराव सेवानिवृत्त होणार असल्याचे समजल्यावर ते पूर्णवेळ साहित्य आणि संगीताला वाहून घेऊ शकतील आणि त्या क्षेत्रात कांही भरीव स्वरूपाचे प्रकल्प हातात घेतील असे मला वाटले होते. कदाचित ते एकादा मोठा ग्रंथ लिहून त्याचे प्रकाशन करतील, एकादे संगीत नाटक रंगमंचावर आणतील, कविता, चुटकुले आणि चित्रे यांची प्रदर्शने वेगवेगळ्या शहरात भरवतील, विविधगुणदर्शनाचे कांही अफलातून कार्यक्रम सादर करतील, होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकादी कार्यशाळा सुरू करतील अशा त्यांच्या संभाव्य कामाबद्दल अनेक प्रकारच्या कल्पना माझ्या मनात आल्या. पण त्यांनी जे कांही मनात ठरवले होते ते माझ्या कल्पनेच्या अत्यंत स्वैर भरारीच्या (वाइल्डेस्ट इमॅजिनेशनच्या) पार पलीकडले होते. त्यांनी पुण्याहून चाळीस पन्नास किलोमीटर दूर एका खेड्यात एक जमीनीचा पट्टा घेऊन या वयात त्यात स्वतः काबाडकष्ट करून मातीतून मोती पिकवायचे ठरवले. आपले इतर व्याप सांभाळण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना पुण्यात राहणे आवश्यक होते. इतक्या दूर रोज ये जा करण्यासारखी सोयिस्कर बससेवा उपलब्ध नव्हती आणि रोज आपल्या मोटारीने जाणे येणे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे ते सलगपणे बरेच दिवस एकट्यानेच त्या शेतावर एका कामचलाऊ छप्पराखाली रहात असत आणि अधून मधून गरजेपुरते पुण्याला येऊन परत जात असत. जमीनीची नांगरणी करण्यापासून ते आलेल्या पिकांची कापणी व मळणी आणि झाडांची लागवड करण्यापासून फळांची व भाज्यांची वेचणी इथपर्यंत सारी कामे त्यांनी स्वतःच्या हाताने केली, वेगवेगळ्या प्रकारची बीबियाणे, खते, कीटकनाशके वगैरेंचा उपयोग करून पाहिला आणि या सर्वातून एक वेगळ्याच प्रकारच्या निर्मितीचा आनंद लुटला. त्यांचा हा यशस्वी प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याची अनिवार इच्छा मला अनेक वेळा झाली, पण ते जमण्यापूर्वीच त्यांनी या प्रकल्पाचा गाशा गुंडाळला. त्याबद्दल अत्यंत शांतपणे त्यांनी सांगितले की शेती करावी किंवा न करावी या दोन्ही बाजूंना पहिल्यापासून परस्परविरोधी अनेक कारणे होतीच. आधी पहिली बाजू जड होती म्हणून मी तसा निर्णय घेतला होता, त्यानंतर तिकडची कारणे हलकी होत गेली आणि इकडची वजनदार होऊन पारडे उलट बाजूने झुकल्यावर तो बदलला.

त्यांनी शेती करणे सोडून दिले असले तरी त्यानिमित्याने त्यांचे वनस्पतीविश्वाशी जडलेले नाते तुटले नाही. आता त्यांनी आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवरच छोटीशी किचन गार्डन तयार केली आहे. त्यामुळे गच्चीवर प्रत्यक्ष परिणाम होऊ नये किंवा कोणाला तसे बोलायला जागा मिळू नये म्हणून लाकडाच्या चौकटी ठेऊन त्यावर दुधाच्या प्लॅस्टिकच्या लहान लहान पिशव्यांमध्ये ही रोपवाटिका तयार केली आहे. त्यात लावलेल्या रोपांसाठी सेंद्रिय खत निर्माण करण्याविषयी त्यांचे आगळ्या प्रकारचे संशोधन चालले आहे. पारंपरिक पध्दतीत सर्व पालापाचोळा एका खड्ड्यात पुरून ठेवतात आणि कांही महिन्यानंतर त्याचे नैसर्गिक रीतीने खतात रूपांतर होते.  यात वेळ लागतो आणि यासाठी लागणारी मोकळी जागा शहरात कुठून मिळणार? प्रभाकररावांनी एक नवा प्रयोग सुरू केला. मिळेल तो पाला गोळा करून ते आपल्या गच्चीवर बसवलेल्या सोलर कुकरमध्ये चांगला शिजवून घेतात आणि त्याचा लगदा थोड्या मातीत मिसळून झाडांच्या मुळापाशी घालतात आणि त्यावर मातीचा थर पसरवतात. यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते असे त्यांचे निरीक्षण आहे. आता किती मातीमागे किती दिवसांनी किती लगदा घालायचा याचे ते ऑप्टिमायझेशन करताहेत.

त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतांनाच आम्ही टेलिव्हिजनवरील बातम्या पहात होतो. बातम्यांच्या खाली शेअर्सचे भाव स्क्रोल होत होते इकडे माझे लक्षसुध्दा नव्हते. मध्येच “मी एका मिनिटात येतो” असे सांगून प्रभाकरराव उठून आत गेले आणि बाहेर आल्याआल्या त्यांनी सांगितले, “अमक्या अमक्या कंपनीचा भाव साडेअठरा झालेला पाहिला म्हणून तिचे शंभर शेअर विकून आलो.” शेअरबाजारात खरेदीविक्री करणे ही आता कोट्याधीशांची मक्तेदारी राहिलेली नाही हे मला ऐकून ठाऊक झाले असले तरी प्रत्यक्षात ते करणारे मी अजून पाहिले नव्हते. मी अचंभ्याने आणि भाबडेपणाने त्यांना विचारले, ” अहो इथे तर हजारो कंपन्यांचे भाव स्क्रोल होतांना दिसत आहेत, त्यातली नेमकी हीच कंपनी तुम्ही कशी निवडली?”
त्यांनी त्यावर सांगितले, “मी याचा सखोल अभ्यास सुरू केला आहे.” एक वही दाखवून त्यांनी पुढे सांगितले, “या इतक्या निवडक कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात रोज होणारा चढउतार मी तारखेनुसार इथे लिहून ठेवला आहे. रोजच्या रोज बदलणारे त्याचे आंकडे पाहून तो कमी होत असला किंवा वाढत असला तरी त्याचा एक अंदाज बांधता येतो. आणि एकादा अंदाज जरी चुकला तरी बाकीचे अनेक अंदाज बरोबर येतात. त्यामुळे एकंदरीत आपला फायदाच होतो. आता याच कंपनीचे पहा, महिन्याभरापूर्वी अमक्या किंमतीला बरा वाटत होता म्हणून मी तिचे दोनशे शेअर्स विकत घेतले होते, पण तो भाव कमी व्हायला लागला तेंव्हा त्यातले शंभर विकून टाकले, तो आणखी कमी झाल्यावर आता याहून कमी होणे शक्यच नाही असे वाटल्यावर तेवढ्याच किंमतीत दीडशे शेअर्स विकत घेतले, म्हणजे माझ्याकडे अडीचशे शेअर्स झाले. आज शंभर विकून त्यात माझे जवळ जवळ अर्धे पैसे वसूल झाले. दोन चार दिवसात याची किंमत अजून वाढली की आणखी शंभर विकेन, म्हणजे माझे सारे पैसे परत मिळून वर माझ्याकडे पन्नास शेअर्स राहतील. त्याचा भाव उतरला तर मी वाट पाहीन किंवा विकलेले शेअर्स कमी किंमतीत पुन्हा विकत घेईन. वगैरे वगैरे …. ” त्यांचे बरेचसे सांगणे माझ्या डोक्यावरून चालले होते. कोणाच्या तरी सांगण्यावरून मीही पूर्वी कधी तरी थोडेसे शेअर्स विकत घेऊन ठेवले होते आणि आपल्या मुलांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करत आलो होतो. त्यांचा भाव वर चढला की मला आनंदाचे भरते येते आणि कोसळला की मलाही रडू कोसळते. अगदी गरज पडल्याखेरीज ते विकून टाकायचा विचारही कधी माझ्या मनात येत नाही. मलाही आता त्यांच्याकडे अलिप्त भावनेने पहायला शिकले पाहिजे असे वाटायला लागले.

अशा खूप छोट्या छोट्या गंमती माझ्या आठवणीत आहेत. त्या प्रत्येकात आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावरच आली होती.  नव्या भेटीत प्रभाकररावांचे कोणते नवे रूप समोर येईल याचा विचारच मी आता करत नाही. त्यामुळे आता आश्चर्य वाटणे जरा कमी झाले आहे. मात्र त्यांची आठवण निघाली की दर वेळी बोरकरांची एक ओळ मला आठवते, “दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: