तेथे कर माझे जुळती – ४ प्रकाश झेंडे (उत्तरार्ध)

प्रकाश झेंडेच्या बरोबर नव्याने जुळलेले नाते अरेतुरेचे राहिले नव्हते. आम्ही दोघेही तोपर्यंत चांगले बापई गृहस्थ झालो होतो. त्यांना संगीत, नाट्य वगैरे कलांची आवड होती, तसेच जाण होती. आमच्या वसाहतीच्या आसमंतात होणा-या शास्त्रीय संगीताच्या मैफलींपासून लहान मुलांच्या नाचगाण्यांच्या कार्यक्रमापर्यंत सर्व जागी ते आवर्जून उपस्थित होत असत. फावल्या वेळात ते सतारवादन शिकत. त्यामुळे सूर, ताल आणि लय यांच्यावर आधारलेले शास्त्रीय संगीताचे व्याकरण त्यांना अवगत होते. सूर, ताल आणि लय साधारणपणे सांभाळले तर गाणे चालीवर येते, पण तो त्याचा नुसता सांगाडा असतो. त्याला सौष्ठव आणि सौंदर्य मिळवून देण्यासाठी त्यात अनेक गोष्टींची भर घालावी लागते, कलाकार मंडळी त्याला आपल्या कौशल्याने अलंकृत करून अधिकाधिक सजवतात वगैरे बरेचसे बारकावे त्यांना ठाऊक होते. झी टीव्हीच्या सारेगमप कार्यक्रमात अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत जसे कॉमेंट्स करतात तशा प्रकारची टीकाटिप्पणी ते वीस पंचवीस वर्षांपूर्वी करत असत.  प्रकाश झेंडे सर्वसामान्य लोकांपेक्षा निश्चितच वेगळे होते. साधारणपणे घरचे खाऊन लष्कराच्या भाक-या भाजायला सहसा कोणी तयार होत नाही. पण झेंड्यांना सार्वजनिक कामात भाग घेण्याची विलक्षण आवड होती. निव्वळ प्रकाशाच्या झोतात येण्यासाठी पुढेपुढे करणा-यातले ते नव्हते, पण त्यापासून दूर राहून मुद्दाम तो टाळण्याचा प्रयत्नही ते करत नसत. त्यांनी केलेले काम लोकांना समजावे इतपत ते सर्वांच्या नजरेसमोर येत असत. वसाहतीत चालत असलेल्या बहुतेक स्वयंसेवी संस्थाच्या कारभारात ते उत्साहाने सहभागी होत.   त्यातच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेली स्वरमंडल नांवाची एक संस्था होती. मी त्याचा एक संस्थापक सदस्य आणि आजीव सभासद होतो. संस्थेच्या कार्यक्रमाचे वेळी तबले, पेट्या वगैरेंची हलवाहलवी करणे, जाजमे आणि सतरंज्या पसरणे व घड्या करून किंवा गुंडाळून ठेवणे अशा नैमित्यिक कामात माझा खारीचा वाटाही असे. नित्याच्या व्यवस्थापनात मात्र मी कधीच रस दाखवला नव्हता. मला त्याची हौसही नव्हती आणि त्यासाठी माझ्याकडे वेळही नसायचा. प्रकाश झेंडे कॉलनीत रहायला आल्यानंतर लवकरच त्या संस्थेचे सभासद झाले आणि थोड्या कालावधीतच व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनले. ही संस्था ज्यांनी उभी केली होती तेच तिचा सर्व कारभार चालवत असत. आपण त्यांना नानासाहेब म्हणू. दर तीन वर्षांनी सभासदांची सर्वसाधारण सभा होत असे. त्याला उपस्थित असलेल्या मोजक्या लोकांतल्या चार जणांना व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनण्याची गळ घातली जाई आणि अर्थातच ते बिनविरोध निवडून येत.  हिमालयाची सांवली या नाटकातल्या एका वाक्याप्रमाणे हे सदस्य म्हणजे निव्वळ नानासाहेबांनीच शेंदूर फासून कोनाड्यात बसवलेले धोंडे असायचे. पण झेंड्यांना असे नुसते मिरवायचे नव्हते, त्यांना मन लावून काम करायची इच्छा होती. वर्षभरातच हे दिसून आले. एका संध्याकाळी मला त्यांचा फोन आला आणि मी घरात आहे याची खात्री करून घेतल्यावर पाठोपाठ ते ही आले. आल्या आल्या त्यांनी सरळ मुद्द्याला हात घातला. “स्वरमंडळाचं कसं काय चाललं आहे असं तुम्हाला वाटतं ?” त्यांनी मला विचारले. हे असे कां विचारत आहेत याचे मला थोडे आश्चर्य वाटले. मी अंदाजाने सांगितलं, ” आजकाल थोडी मुलं आणि खूप मुली गायन शिकायला येतात, परीक्षांना बसतात आणि चांगल्या मार्कांनी पास होतात असं मी ऐकत आहे त्या अर्थी सगळं कांही ठीकच दिसतंय्.”  “ते उत्तमच आहे, पण आर्थिक बाजू कशी आहे असं तुम्हाला वाटतं ?” आता हे व्यवस्थापकीय सदस्य आपल्याला देणगी बिणगी मागणार आहेत की काय अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. त्यामुळे सावध होऊन मी म्हंटले, “अहो, पूर्वीच्या काळच्या मानाने आता कितीतरी पटीने विद्यार्थी येत आहेत. त्यांच्या फीमधून सगळा खर्च सहज निघत असेल.” “गेल्या दहा वर्षात तुम्ही कधी स्वरमंडळाचा जमाखर्च किंवा ताळेबंद पाहिला आहे ?” “नाही बुवा. मी कुठे पाहणार ?” “बरं, संस्थेचे अधिनियम तरी वाचले असतील.” ‘सार्वजनिक संस्थांचे अधिनियम’ इतके रटाळ आणि अवाचनीय पुस्तक कोण वाचतो ? संस्था स्थापन झाली होती तेंव्हा त्या पुस्तिकेच्या शेवटच्या पानावर इतर अनेक सदस्यांच्या सह्यांच्या खाली माझी स्वाक्षरी ठोकून दिली असणार, हे उघड होते. “अहो हे सगळं आत्ता या वेळी मला कां विचारत आहात? तुम्ही मॅनेजिंग कमिटीचे मेंबर आहात, तुम्हाला हे सगळे माहीत असण्याची जास्त शक्यता आहे.” मी वैतागून म्हंटले. “हो ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. मागलं आर्थिक वर्ष संपून चार महिने व्हायला झाले. खरं तर वर्ष संपताच त्या वर्षाचा जमाखर्च आणि ताळेबंद तयार करून त्यांचं ऑडिट करून घ्यायचं असतं, ऑडिटरच्या रिपोर्टसह ते सभासदांच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडायचे असतात, त्याची मंजूरी घेऊन एक प्रत चॅरिटी कमिशनरकडे पाठवायची असते अशी कितीतरी कामे असतात. पण अजूनपर्यंत मला कांही हांलचालच दिसत नाही. दर वर्षी असंच असतं का?” “मला कांही कल्पना नाही. तुम्ही नानासाहेबांना विचारलंत कां?” “अनेक वेळा विचारून झालं, पण त्यांना कधी वेळच नसतो आणि याची कांही फिकीरही दिसत नाही. असं कसं चालेल?” मी म्हंटले, “खरंच त्यांना सवड होत नसेल. घरची आणि ऑफिसची सगळी कामं सांभाळून पुन्हा संस्थेचा रोजचा कारभार बघण्यात त्यांचा सगळा वेळ संपून जात असेल. आणि स्वरमंडळाचं एकंदर उत्पन्न तरी असून असून असं कितीसं असणार आहे ? तुमच्या माझ्या पगाराइतकं सुध्दा नसेल.”    “मुळात माझ्या मनात तो प्रश्न नाहीच आहे. आज संस्थेची आर्थिक घडी व्यवस्थित आहे. पण उद्या काय होणार आहे ? आज आपले नानासाहेब सर्व पैसे गोळा करतात, त्यातले खर्चही तेच करतात आणि बँकेचा व्यवहारही तेच पाहतात. पण त्याचा रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर उद्या वेळ आली तर इतरांना ते कसे कळणार ? या वर्षी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर ते कॉलनीत राहू शकणार नाहीत, बाहेर कुठे राहणार आहेत की मुंबई सोडून जाणार आहेत हे कुणाला ठाऊक नाही. त्यानंतर ते उपलब्ध नसतील तर त्यांना कुठे शोधणार आणि रोजच्या कारभाराचे काय होईल हा प्रश्न मला सतावतो आहे. चांगल्या अवस्थेतली संस्था एका माणसाच्या अभावी बंद पडायची वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे.” “पण यात आम्ही काय करू शकतो?” “आपण सर्व सभासदांची विशेष बैठक बोलावून त्यांना विचारू शकतो. त्यांना उत्तरे द्यावीच लागतील. नाही तर त्यांच्या विरुध्द कारवाई करण्याची वेळ येईल. पण आता स्वस्थ बसून राहण्यात काय अर्थ आहे ?” “समजा, ते बधले नाहीत, तर आपण कोणती पर्यायी व्यवस्था करू शकणार आहोत ?” “मी इतर सभासदांशी यावर बोललो आहे. ते कांही कामे वाटून घ्यायला तयार आहेत. आणखी कांही सदस्यांना नॉमिनेट करून संस्था चालवणे अशक्य नाही. पण ती वेळ नाहीच आली तर ते जास्त चांगले. नाही कां?” झेंडे संपूर्ण तयारीनिशी आले होते.  मी त्या विशेष सभेला यायला कबूल झालो, तसेच इतर दोन चार मित्रांना तयार केले. नानासाहेबांनी खरोखरच वेळेअभावी कधी हिशोब ठेवलाच नव्हता की त्यांना तो दाखवायचा नव्हता कुणास ठाऊक. पण ते कांही त्या सभेला आले नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण यापुढे या संस्थेच्या कामाचा भार पेलू शकणार नाही. तेंव्हा ताज्या दमाच्या तरुण मंडळींनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सांभाळावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी पाठवले होते.  ते वाचून दाखवण्यात आले. सुरुवातीपासून नानासाहेबांनी या संस्थेसाठी केवढी जिवापाड धडपड, पायपीट आणि धांवपळ केली याची आठवण करून त्यांना पुढील आयुष्यातही आयुरारोग्य लाभो अशी आशा व्यक्त करण्यात आली, पर्यायी व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली आणि कसल्याही प्रकारचा कडवटपणा न आणता ती संस्मरणीय बैठक संपली. प्रकाश झेंडे यांचे यातले कौशल्य पाहून मी थक्क झालो. ऑफीसातल्या कामाच्या वाटणीची सोयीनुसार नेहमीच पुनर्रचना होत असते. अशा एका पुनर्रचनेत प्रकाश झेंडे त्यांच्या विभागासह माझ्या हाताखाली आले. तोपर्यंत मला सर्किट डायग्रॅम वाचता यायला लागले असले तरी मध्यंतरीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातल्या प्रगतीची प्रचंड घोडदौड चालली होती. संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता. यातल्या प्रमुख नवनव्या गोष्टींची ओळख करून घेण्यात मला झेंड्यांची खूप मदत झाली. सर्वात जास्त महत्वाच्या बाबी थोडक्यात पण नीट समजतील अशा पध्दतीने समजावून सांगण्यात त्यांची विलक्षण हातोटी होती. एका बाजूने पाहता त्यांचा कान माझ्या हातात होता, त्यामुळे त्यांच्याकडून घेतलेल्या माहितीवरून मी त्यांच्याच चुका काढणे शक्य होते हे त्यांना माहीत होते. तर दुस-या बाजूला त्यांच्या हाताखाली काम करणारी तरुण मुले जास्त आधुनिक शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन आलेली असल्यामुळे त्यांचेकडे अद्ययावत प्रणालींचे अधिक चांगले ज्ञान होते आणि मी त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कातसुध्दा होतो याची जाणीव त्यांना होती. तरीही कांहीही हातचे न राखता त्यांनी मला सगळे बारकावे व्यवस्थित दाखवले. एकादा पुरेसा सक्षम संगणक काय काय चमत्कार करू शकतो आणि इतर बाबतीत तो तितकाच मठ्ठ असल्यामुळे त्याचा उपयोग करण्यासाठी त्याला किती पढवावे लागते आणि तरीसुध्दा तो कसले गोंधळ घालू शकतो वगैरे गोष्टी त्यांनी मला छान समजावून सांगितल्या. पण हा सहवास जास्त दिवस टिकला नाही. आम्हा दोघांनाही वेगवेगळ्या विभागातल्या वरच्या जागांवर वेगवेगळ्या कामगिरींसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे ऑफीसमधल्या गाठीभेटी बंद झाल्या. मात्र बाहेर आम्ही भेटत राहिलो. एकदा कसल्याशा गाण्याच्या कार्यक्रमाच्या मध्यंतरात झेंडे आणि त्यांचे दोन तीन मित्र यांच्याबरोबर मी बोलत उभा होतो. म्हणजे ते लोक आपसात बोलत होते आणि मी आपला अधून मधून ‘खरंच’, ‘व्वा’, ‘हो का’ वगैरे उद्गार काढत नुसताच उभा होतो. अखेर स्थानापन्न होण्यासाठी सभागृहात परत येतायेता त्यातल्या एकाने ” आता पुन्हा आपली भेट हितगुजमध्ये होणार आहेच.” असे म्हंटले, त्याचा अर्थ कांही मला समजला नाही. त्या भागातल्या बहुतेक सर्व खाद्यगृहांना आणि सभागृहांना मी भेटी दिलेल्या असल्यामुळे हितगुज या नांवाचे चांगले हॉटेल किंवा हॉल तिथे नाही याची मला खात्री होती. “असेल कांहीतरी” म्हणून मी तो विषय त्या वेळी सोडून दिला, पण पुन्हा जेंव्हा झेंडे भेटले तेंव्हा मनातल्या कुतुहलाच्या किड्याने पुन्हा उचल खाल्ली आणि मी त्यांना त्यासंबंधी विचारून टाकले. “तुम्हाला माहीत नाही कां? आम्ही मराठी मंडळी दर महिन्यातल्या पहिल्या रविवारी एकत्र बसून साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांवर तासभर चर्चा करतो.” त्यांनी सांगितले. यातल्या कुठल्याच ‘सा’ शी माझा कधी फारसा संबंध आला नव्हता आणि त्याविना माझे जीवन ठीकच चालले होते. “हो कां? माझ्या कानांवर अजून हे आलेच नव्हते. कदाचित मला यात रस नसेल असे सगळ्यांना वाटले असेल.” असे म्हणून मला तो विषय संपवायचा होता, पण झेंड्यांनी सांगितले, “पुढच्या बैठकीला तुम्ही येऊन एकदा प्रत्यक्ष बघाच. तुम्हाला आवडेल.” मी नुसते तोंडदेखले ‘हो’ म्हंटले असले तरी त्यांनी पुढच्या बैठकीची सविस्तर माहिती दिली. अमक्या बिल्डिंगमधल्या तमक्यांच्या घरी ती मीटिंग असल्याचे सांगितले आणि पुढच्या महिन्यातल्या पहिल्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता नक्की तिथे यायचा आग्रह धरला. “अहो, पण मी त्यांना ओळखतसुध्दा नाही. त्यांच्या घरी अगांतुक पाहुणा म्हणून कसा येऊ?” मी शंका काढली. त्यावर त्यांनी लगेच उत्तर दिले, “तिकडे मी असेनच ना? तुमची ओळख करून देईन. तसे बहुतेक लोक आपल्या परिचयातलेच आहेत. परवाच तर आपण पाटील, कुलकर्णी आणि देशपांड्यांशी बोलत होतो. ते सगळे नेहमी येतात. हितगुजमध्ये आम्ही खाणं पिणं ठेवलेलंच नाही, त्यामुळे तुम्हाला कसलाही संकोच वाटायचं कारण नाही.” आता माझ्यापाशी न जाण्याचे कारण उरले नव्हते. शिवाय माझे कुतूहल वाढले होते. त्यामुळे मी जायचे ठरवले. मीटिंगला आठवडाभर उरला असतांना झेंड्यांनी मला पुन्हा आठवण करून दिली आणि त्या दिवशी इतर कोणता प्रोग्रॅम ठरवायचा नाही अशी जवळजवळ आज्ञा केली.  मीही कॅलेंडरवर त्या तारखेवर खूण करून ठेवली. पण मध्यंतरी कॅलेंडर बघण्यासाठी कांही काम पडले नाही तर त्या खुणा महिना संपल्यावर मागील महिन्याचे पान फाडतांनाच दिसतात असा अनुभव बरेच वेळा येतो. कदाचित या बाबतीतसुध्दा तसेच झालेही असते. पण झेंड्यांनी त्या दिवशी सकाळी पुन्हा आठवण करून दिल्यामुळे मी त्या बैठकीला गेलो. तिथले एकंदर वातावरण मला रुचले आणि शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी मी पुन्हा एकदा मराठी वाचनलेखनाकडे वळत गेलो आणि त्याची गोडी वाढत गेली. त्यानंतर दर महिन्याला नेमाने आमच्या भेटी होत राहिल्या. चर्चा हाच या बैठकींचा उद्देश असल्यामुळे मनमुराद चर्चा झाल्या. त्यातून झेंड्यांचे वाचन, त्यांच्या जीवनातले अनुभव, त्यावर त्यांनी केलेला विचार, यातून विकसित गेलेले त्यांचे बहुरंगी व्यक्तीमत्व या सगळ्यांची ओळख होत गेली.  सुमारे पांच सहा वर्षापूर्वी त्यांच्याच घरी झालेली हितगुजची बैठक अविस्मरणीय ठरली. त्यांचे वडील कृषीविज्ञानातले मोठे तज्ज्ञ होते. सेवानिवृत्तीनंतरसुध्दा ते अनेक कृषीविद्यापीठांना संशोधनकार्यात मार्गदर्शन करायचे. पंतनगरच्या भारतातल्या सर्वाधिक महत्वाच्या विश्वविद्यालयाने त्यांचा जीवनगौरव करून त्यांना मानपत्र आणि मानचिन्ह प्रदान केले होते. याची माहिती देऊन प्रकाश यांनी अत्यंत अभिमानाने त्या गोष्टी सर्वांना दाखवल्या. त्यानंतर एका खास आणि दुर्मिळ अशा ध्वनिफीतीचे सार्वजनिक श्रवण झाले. सात आठ वर्षांपूर्वी पोखरण येथे ज्या चांचण्या घेतल्या गेल्या होत्या त्यात सहभागी झालेल्या एका सैनिकी अधिका-याचा त्याच्या गांवी जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्याला उत्तर देतांना त्याने जे विस्तृत भाषण केले होते त्याची ध्वनिमुद्रित प्रत कोठून तरी झेंड्यांनी प्राप्त केली होती. अशा विषयात अत्यंत गुप्तता बाळगली जात असल्यामुळे त्यात कसल्याही प्रकारची तांत्रिक माहिती असणे शक्यच नव्हते, पण राजस्थानातल्या मरुभूमीवर भर उन्हाळ्यात रहायचा त्यांचा अनुभव चित्तथरारक होता. त्या काळात त्यांना आलेल्या इतर मजेदार अनुभवांच्या सुश्राव्य अशा कथनामुळे ते भाषण अत्यंत श्रवणीय होते.  या चांचणी प्रयोगाशी ज्यांचा प्रत्यक्ष किंवा अपरोक्षरीत्या संबंध आला होता अशा कांही व्यक्तींना या कार्यक्रमासाठी मुद्दाम पाचारण केले होते. बरेच वेळ आपण त्या गांवचेच नाही अशा मुद्रेने बसलेल्या लोकांना हळूहळू बोलते केल्यानंतर त्यांनीसुध्दा कांही हृदयस्पर्शी व्यक्तीगत अनुभव सांगितले. ही संस्मरणीय बैठक चांगली दोन अडीच तास रंगली होती. अखेर घरच्या लोकांचे चौकशी करणारे फोन येऊ लागल्यानंतर ती आटोपती घ्यावी लागली. त्या बैठकीची आठवण ताजी होती. त्या निमित्याने झालेल्या चर्चेत झेंड्यांच्या व्यक्तित्वाचे त्यादिवसापर्यंत अवगत नसलेले कांही पैलू समजले होते. याच्या आधी सुध्दा वेगवेगळ्या संदर्भात त्यांनी अनेक अजीबोगरीब अनुभव सांगितले होते. त्यांच्या समृध्द जीवनातल्या खूप कांही गोष्टी त्यांच्याकडून मला ऐकायच्या होत्या. त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप कांही होते आणि मुख्य म्हणजे ते सांगायची त्यांची तयारी असे आणि त्याचे मनोरंजक पध्दतीने कथन करणे त्यांना अवगत होते. त्यांच्यासह मोजक्या मंडळींना बरोबर घेऊन एकादी गिरिविहाराची सहल काढावी आणि त्यात मनसोक्त गप्पा मारून घ्याव्यात अशी माझी खूप इच्छा होती. पण देवाच्या मनात कांही वेगळेच होते. एका काळरात्री मला घाईघाईने एका आप्ताच्या अंत्ययात्रेला जावे लागले होते. ते काम आटोपेपर्यंत मध्यरात्र होऊन गेल्यामुळे तिथेच मुक्काम करून झुंजूमुंजू होताच मी घरी परतलो. घरी येऊन पोचतो न पोचतो तोपर्यंत प्रकाशच्या एका जवळच्या मित्राचा फोन आला आणि त्याने धक्कादायक वर्तमान सांगितले, “प्रकाश आता आपल्यात राहिला नाही.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: