तेथे कर माझे जुळती – ४ प्रकाश झेंडे (पूर्वार्ध)

या लेखात मी आणखी एका परिचिताचे व्यक्तीचित्र काढणार आहे, त्यामुळे अर्थातच व्यक्तीगत बाबींचे उल्लेख शक्यतो टाळणार आहे.

मी नोकरीला लागून दोन अडीच वर्षे झाली असतील. कसल्याशा किचकट तांत्रिक समस्येमध्ये गुंतलेला असल्यामुळे त्या विषयाचा एकाग्रचित्ताने अभ्यास करत असतांना माझ्या पार्टीशनवर कोणी तरी टकटक केली. मी थोड्या अनिच्छेनेच मान वळवून पाहिलं. एक निरागस, उमदा आणि हंसतमुख युवक उभा होता. माझ्याशी नजरानजर होताच म्हणाला,  “माझं नांव प्रकाश झेंडे. मला तुमची थोडी मदत हवी आहे.”
मी यांत्रिकपणाने म्हंटलं, “बोला.”
खिशातून एक कागद काढून त्यानं सांगितलं, “मला हा सर्किट डायग्रॅम देता कां?”
“सर्किट डायग्रॅम आणि माझ्याकडे …” पुढे मी न उच्चारलेले “कसा असेल?” हे शब्द त्याने आधीच ओळखले आणि एकदम “याचा अर्थ तुमच्याकडे तो नाही, धन्यवाद.” एवढे म्हणून दाहिनेमुड् करून तो तरातरा चालला गेला. मी अवाक् होऊन त्याची पाठमोरी आकृती पहात माझ्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आलो तेंव्हा कांहीतरी चुकल्याची जाणीव मला झाली. पण तोवर तो अदृष्य झाला होता. मी पुन्हा वळून माझ्या कामाला लागलो.

दुपारच्या भोजनासाठी मी कँटीनमध्ये गेलो तेंव्हा प्रकाश तिथे बसून आपल्या दोनतीन मित्रांबरोबर हंसतखिदळत जेवण करत होता. ते सुध्दा नव्यानेच नोकरीवर रुजू झालेले त्याचे बॅचमेट होते. आपली थाळी घेऊन मी त्यांच्या टेबलावर जाऊन बसलो, माझे नांव आणि बॅच क्रमांक सांगून आपली ओळख करून दिली, त्यांची नांवे विचारून घेतली. नवे ऑफीस त्यांना कसे वाटते याबद्दल विचारले. त्यांच्या मनात त्याबद्दल असंख्य प्रश्न असणे साहजीक होते, ते हळूहळू बाहेर येऊ लागले. संभाषणाला सुरुवात झाली.

जेवण संपल्यावर प्रकाशला आपल्याबरोबर घेऊन आमच्या ऑफीसच्या लायब्ररीत गेलो, सकाळी त्याला जे काय हवे होते ते मिळाले कां हे विचारलं. त्याने पुन्हा खिशातला कागद बाहेर काढून दाखवला. मी त्याला विचारलं, “हा सर्किट डायग्रॅम माझ्याकडे मिळेल असं तुला कुणी सांगितलं?”
“माझ्या बॉसनं, म्हणजे मिस्टर गुलाटी यांनी.”
काय झाले असेल ते आता माझ्या थोडे लक्षात आले. हे मिस्टर गुलाटी वयाने माझ्याहून निदान पंधरा वीस वर्षांनी मोठे होते, चांगले उंचेपुरे गृहस्थ, उग्र चेहेरा, तारवटलेले असावेत असे वाटणारे मोठे मोठे डोळे, भरघोस मिशा वगैरेंनी युक्त असे त्यांचे भारदस्त व्यक्तीमत्व होते. त्यांना पाहून अमरीश पुरीने साकार केलेल्या एकादा मग्रूर जमीनदाराची आठवण यावी. योगायोगाने पूर्वी कधीतरी त्यांना हवी असलेली कसलीशी माहिती मी शोधून काढून पुरवली असल्याने त्यांचा माझ्याबद्दल बरा ग्रह झाला असावा. तो टिकवून धरणे शहाणपणाचे होते. प्रकाशच्या हातातला कागद घेऊन पहात त्याला सांगितलं, “मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यामुळे माझा कुठल्याही सर्किट डायग्रॅमशी कधी प्रत्यक्ष संबंध आला नाही, पण आपण दोघे मिळून हा शोधून काढू.”

मग मी एक भला थोरला सविस्तर प्रॉजेक्ट रिपोर्ट कपाटातून काढला, तो चाळून ते सर्किट कशासंबंधी असेल याचा अंदाजाने शोध घेतला, कांही विशिष्ट यंत्रसामुग्रीची मॅन्यू्अल्स उघडून त्यांतले कांही संदर्भ काढले आणि ते घेऊन ड्रॉइंग रेकॉर्ड्सच्या विभागात गेलो. संदर्भातल्या ड्रॉइंग लिस्टांमध्ये पाहून तो सर्किट डायग्रॅम शोधून काढून उलगडला. इतका गुंतागुंतीचा असला डायग्रॅम मी माझ्या आयुष्यात प्रथमच पहात होतो. तो कसा वाचायचा हे प्रकाशला ठाऊक असले तरी त्या यांत्रिक प्रणालीबद्दल तो अनभिज्ञ होता. त्यामुळे त्याच्याही डोक्यात फारसा प्रकाश पडला नसणार. तरीही मी त्याला विचारले, “हाच डायग्रॅम तुला हवा होता ना?”
“कांही कल्पना नाही. मिस्टर गुलाटींना विचारीन.” त्याने थंडपणे उत्तर दिले.
“आपण जे कांही शोधतो ते कशासाठी शोधत आहोत हे माहीत असले तर ती गोष्ट मिळाल्यानंतर होणारा आनंद अनेकपटीने जास्त असतो.” मी आपल्या सीनिअरपणाचा फायदा घेऊन त्याला उपदेशामृताचा डोस पाजला. पण बॉसने सांगितले एवढे कारण खरे तर या शोधासाठी पुरेसे होते.
“तुला आणखीन कांही गरज पडली तर मला सांग बरं.” मी कांहीशा मानभावीपणाने त्याला सांगितले, पण ती गरज पडणार नाही हे मला समजायला हवे होते. आम्ही दोघे लायब्ररीत शिरल्यापासून बघितलेल्या प्रत्येक बाबीचे टिपण त्याने आपल्या कागदावर लिहून ठेवले होते, त्यामुळे ऑफीसमधली कोणती तांत्रिक स्वरूपाची माहिती कुठे मिळेल याचा बराचसा अंदाज त्याला आला होता. तसेच निदान या मेकॅनिकल इंजिनिअरला इलेक्ट्रॉनिक्सबद्दल विचारणे म्हणजे किराणा मालाच्या दुकानात जाऊन पंख्याचा रेग्युलेटर मागण्यासारखे आहे याची जाणीव त्याला झाली होती.

ऑफिसातल्या आमच्या बसण्याच्या जागा वेगवेगळ्या मजल्यांवर होत्या आणि कामाच्या संदर्भातही आमचा एकमेकांशी संपर्क येत नव्हता. कधी कॉरिडॉरमध्ये तर कधी कँटिनमध्ये गांठभेट झाली तर नमस्कार, कसंकाय , हॅलोहाय् होत असे, पण त्या कालखंडात पुन्हा कधी एकत्र बसून बोलण्याची वेळ आली नाही. पुढे आमची ऑफीसेच मुंबईतल्या दूर दूरच्या वेगवेगळ्या भागात गेल्यामुळे तेही थांबले. इतर सहका-यांच्या बोलण्यातून एकमेकांची जी थोडी खुशाली समजत असे तेवढीच राहिली होती.

ज्येष्ठताक्रमानुसार मला आधी ऑफीसच्या कॉलनीत घर मिळून मी तिकडे रहायला गेलो. त्यानंतर कांही वर्षांनी प्रकाशलाही कॉलनीच्या वेगळ्या भागातल्या एका इमारतीत जागा मिळाली. आमच्या रोजच्या जाण्यायेण्याच्या वाटा वेगळ्या असल्या तरी पोस्ट ऑफीस, बँक, दवाखाना, शाळा, बाजार वगैरे समाईक सार्वजनिक जागांवर अधून मधून भेट घडू लागली आणि उभ्या उभ्या दोन चार वाक्यांची देवाणघेवाण होऊ लागली. प्रकाशचा स्वभाव मनमिळाऊ आणि बोलका होता. थोडी थट्टामस्करी करायची आवड त्याला होती. त्याला अनेक विषयांत रस होता तसेच गती होती. त्याचे वाचन दांडगे होतेच, पण वाचनात आलेले शब्दप्रयोग व वाक्ये त्याच्या स्मरणात रहात आणि बोलण्यातून ते डोकावत असत. त्यामुळे त्याचे बोलणे रंगतदार होत असे. क्वचित कधी त्यात टोमणे किंवा उपहास यांचा आभास व्हायचा, कदाचित मुळामुठेच्या पाण्यातूनच त्याचे बाळकडू मिळत असावे, पण एकंदरीत त्याच्याशी वार्तालाप करतांना मजा येत असे.

. . .  . . . . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: