ज्ञानेश्वर माउली

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ व त्यांच्या इतर साहित्यिक रचनांवर कोणताही अभिप्राय देण्याएवढी माझी पात्रता नाही. पं.भीमसेन जोशी, स्व.बाबूजी, मंगेशकर मंडळी यांच्यापासून अजित कडकडे, सुरेश वाडकर वगैरेपर्यंत अनेक गायकगायिकांनी आजवर आपल्या सुस्वर संगीतामधून त्यांचे जे अभंग व ओव्या आपल्या मनावर ठसवल्या आहेत त्यावरूनच त्यातील दिव्यत्वाची प्रचीती येते. ज्ञानेश्वर महाराजांचे श्रेष्ठत्व पटवून देण्यासाठी त्याला चमत्कारांचा आधार देण्याची कधीच आवश्यकता नव्हती. विज्ञानामधून सिद्ध झालेल्या निसर्गाच्या नियमांचा भंग करणाऱ्या चमत्कृतीपूर्ण घटना वगळूनसुद्धा ज्ञानदेवांचे जीवनचरित्र अद्भुत म्हणावे लागेल.

जन्माला आल्यापासूनच त्यांची “संन्याशाची मुले” म्हणून हेटाळणी सुरू झाली. लहानपणीच माथ्यावरचे आईवडिलांचे छत्र अत्यंत दुर्दैवी पद्धतीने हरपले. मोठा भाऊ निवृत्ती अरण्यात वाट चुकून हरवला. त्याला वाघाने खाल्ले असल्याची आशंका असल्याने तो परत येईल अशी फारशी आशा नव्हती. ज्या समाजाकडून त्यांचा पदोपदी अपमान होत होता त्याच्याकडेच भिक्षांदेही करून बालवयातील ज्ञानदेवांना आपल्या दोन लहान भावंडासह स्वतःचे पोट भरण्यासाठी धडपड करावी लागली. तरीही आपली ज्ञानपिपासा आणि अस्मिता जागृत ठेऊन जेवढे ज्ञान कानावर येत होते, दृष्टीला पडत होते ते त्यांनी ग्रहण करून ठेवले. निवृत्तीनाथ गुरूकडून दीक्षा घेऊन परत येताच ज्ञानेश्वरांनी त्याचे शिष्यत्व पत्करले आणि रीतसर शास्त्राभ्यास सुरू केला.

त्या काळात धर्मशास्त्राचे सगळे ज्ञान संस्कृत भाषेमधील ग्रंथात दिलेले होते. पाठांतर करून ते पिढ्यानपिढ्यांनी जतन करून ठेवलेले असले तरी निव्वळ घोकंपट्टी करणाऱ्या लोकांना त्यामागील तत्वांचा बोध होत नव्हता. ते जाणू शकणारे पंडित काशी किंवा पैठण अशा तीर्थस्थळी रहात असत आणि संपर्कसाधनांच्या अभावी त्यांचा विचार घेणे सर्वसामान्य लोकांना अशक्य होत असे. याचा अतिशय दुःखद अनुभव ज्ञानदेवांच्या वडिलांना आला आणि त्यात त्यांचे कुटुंब होरपळून निघाले. ही परिस्थिती बदलण्यासाठी ते ज्ञान लोकांच्या बोलीभाषेत आणणे आवश्यक आहे हे ज्ञानेश्वरांच्या लक्षात आले. इतर सर्व धर्मग्रंथांचे सार असे ओळखल्या जाणाऱ्या भगवद्गीतेवर ‘भावार्थदीपिका’ या नांवाचे भाष्य त्यांनी मराठी भाषेत लिहिले. तेच आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखले जाते. त्या काळात हा एक क्रांतिकारक आणि धक्कादायक उपक्रम होता. तो करतांना मूळ गीतेमधील गोडवा किंचितही कमी होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. “माझा मराठाचि बोलू कवतुके, तरी अमृताते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन।” एवढा आत्मविश्वास त्यांनी दाखवला. त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांचे समकालीन संत नामदेव म्हणतात,

“संस्कृत भाषा जनासी कळेना, म्हणूनि नारायणा दया आली हो ।
देवाजीने परी घेतला अवतार, म्हणति ज्ञानेश्वर तयालागी हो ।।
ज्ञानेश्वरी ग्रंथ साराहूनि सार, फोडिले भांडार वैकुंठीचे ।
नामा म्हणे माझा ज्ञानराज प्राण । तयाचे चरण वंदीन मी ।।”

ज्ञानदेवांनी हा ग्रंथ तर लिहिला पण त्यातील भाव लोकांपर्यंत कसा पोचवायचा हा एक प्रश्न होता. त्या काळात मुद्रण आणि प्रकाशनाची सोय नव्हती. एका पोथीमधील एक एक शब्द काळजीपूर्वकरीत्या सुवाच्य अक्षरात लिहून तिची दुसरी प्रत काढावी लागत असे. त्या पोथीचे दहा जणांच्या समक्ष वाचन केले किंवा कोणी ती तोंडपाठ करून तिचे सार्वजनिक पारायण केले तरच त्यातील मजकूर इतरांना समजत असे. ज्ञानेश्वरांनी लिहिलेला भावार्थ या पद्धतीने फारच थोड्या लोकांपर्यंत पोहचू शकला असता. शिवाय गीतेमधील योगांच्या संकल्पना समाजातील निरक्षर घटकांना कळायला कठीण होत्या. त्यामुळे सर्व समाजाला चटकन समजू शकतील, लक्षात ठेवता येतील अशा सोप्या शब्दात लिहिलेल्या चार ओळींच्या अनेक अभंगांची रचना त्यांनी केली.

“देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करीं ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेग करीं । वेद-शास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥”

यासारखे रोज म्हणता येतील असे हरिपाठाचे अभंग त्यांनी सामान्य जनांना शिकवले. “रूप पाहता लोचनी, सुख जाले वो साजणी।” यासारखी विठ्ठलाची स्तुती करणारे अनेक अभंग लिहिले. त्याची भक्ती करण्यामध्ये संसाराचे सुखाचा मार्ग आहे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगितले. एका अभंगात ते सांगतात,

“अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बाप रखुमादेवीवरु विठ्ठलेचे भेटी । आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥”

“एकतत्व नाम दृढ धरीं मना । हरीसि करुणा येईल तूझी ॥१॥
तें नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद । वाचेसीं सद्‌गद जपें आधीं ॥२॥
नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा। वायां आणिका पंथा जाशी झणें ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं। धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥”

यासारख्या अभंगातून “भक्तीमार्ग अगदी सोपा आहे. त्याचे पालन करणे सर्वांना शक्य आहे. ईश्वरप्राप्तीसाठी मोठी तपश्चर्या करण्याची गरज नाही.” अशा अर्थाचा उपदेश जनसामान्यांना केला. “जे जे भेटिजे भूत । ते ते मानिजे भगवंत” असे सांगून सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची प्रेरणा दिली. त्यांना भजनामध्ये गोडी वाटावी यासाठी “कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसि कां दिली वांगली रे ॥” यासारखी आकर्षक भारुडे लिहिली. “पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥ उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥” आणि “रंगा येईं वो येईं, अंगणी । विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई ।।” यासारख्या मनोरंजक रचना केल्या. “घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा का ॥” यासारख्या विराण्या  रचल्या. इतकेच नव्हे तर मोक्षपट नांवाच्या एका खेळाची संकल्पना त्यांनी दिली. आजकालच्या सापशिडीच्या खेळासारख्या एका पटावरील घरात वेगवेगळ्या पापपुण्यांची नांवे लिहिलेली असत. कवड्या किंवा फांसे टाकून मिळालेल्या दानाप्रमाणे आपली सोंगटी पुढे सरकवत न्यायची. परोपकारासारख्या पुण्यश्लोक घरात पोचल्यास तेथील सोपान चढून वरचे घर गांठायचे आणि चोरीसारख्या पापमय घरात गेल्यास सापाने गिळंकृत केल्यामुळे त्याच्या शेपटीपर्यंत खाली घसरत यायचे असा हा खेळ होता. पापपुण्याच्या खऱ्या कल्पना अगदी खेळता खेळता लोकांच्या मनात मुराव्यात यासाठी केलेला तो अफलातून प्रयत्न होता. आता तो मूळ स्वरूपात फारसा पहायला मिळत नाही.

भक्तीमार्गाचेच थोडे उच्च पातळीवरील वर्णन ज्ञानदेवांनी या अभंगात केलेले आहे.
“समाधि साधन संजीवन नाम । शांति दया, सम सर्वांभूतीं ॥१॥
शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू । हरिनाम उच्चारू दिधला तेणें ॥२॥
यम-दम-कळा, विज्ञानेंसी ज्ञान ।परतोनि अज्ञान न ये घरा ॥३॥
ज्ञानदेवा सिद्दी-साधन अवीट । भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं ॥४॥”

तर थोडे गूढ वाटणारे वर्णन असे आहे.
“इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी ।
मोगरा फुलला, मोगरा फुलला। फुले वेचिता अति बहरू कळियासी आला ।।१।।
मनाचिये गुंथी गुंफियला शेला । बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला ।।२।।”

सामान्य लोकांसाठी लिहिलेल्या अभग व ओव्यामधूनसुद्धा त्यांच्या विचारांची उंची कशी दिसते पहा! विठ्ठलाचे दर्शन घडल्यावर मनाला होणारा आनंद ते “अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू । मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥” असा व्यक्त करतात तर चंचल मनाला स्थिर राहण्यासाठी ते आवाहन करतात,
“रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥
चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥
सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥”

ज्ञानेश्वरी लिहितांना प्रारंभी गणपतीची आराधना करतांनासुद्धा सरळसोटपणे  “वक्रतुंड महाकाय” अशी गजाननाच्या शारीरिक वर्णनापासून सुरुवात न करता ते अशी करतात.
“ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥ म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥”

सामान्य लोकांना समजायला सोपा असा भक्तीमार्ग त्यांनी दाखवला असला तरी “चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम् ।” या शब्दात आदि शंकराचार्यांनी सांगितलेले अद्वैत त्यांनी अनुभवलेले होते. निर्गुण निराकार परब्रह्माची ओढ त्यांच्या मनात होती. तशा अर्थाच्या कित्येक रचना त्यांनी केल्या आहेत. खालील रचनांमध्ये ते स्पष्टपणे दिसते.

अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।  तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंच भाव । फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें । कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीची निवृत्ति अपणांसकट ।  अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥
निवृत्ति परमानुभव नेमा । शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले । अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥
आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें । नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥
रखुमादेवीवरू सहज नीटु जाला । हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥

“कानडा हो विठ्ठलू” या अभंगात ते निराकार विठ्ठलाचे वर्णन करून अखेरीस म्हणतात,
“बाप रखुमादेवीवरू हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला।।
दृष्टीचा डोळा पाहों मी गेले तंव। भीतरी पालटु झाला।।”

द्वैत आणि अद्वैत या दोन्ही विचारात त्यांना विरोधाभास दिसत नाही. दोन्ही मार्ग आपापल्या जागी योग्यच आहेत असे ते  “तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।  सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ।।” या अभंगात सांगतात. तर दुस-या ठिकाणी म्हणतात,
“अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥
दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥३॥
बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥४॥
कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥५॥”

संस्कृत भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान जनसामान्यांना आकलन व्हावे म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली याचे जनाबाईसारख्या सुसंस्कृत मनाच्या, सगुणभक्ती आचरणाऱ्या आणि परमात्मज्ञानाची उत्सुकता बाळगणाऱ्या साधकाला खूपच अप्रूप होते. त्यामुळे  असा ज्ञानेश्वर आपला सखा, नातेवाईक असावा असे वाटल्यामुळे ती म्हणते.

ज्ञानाचा सागर। सखा माझा ज्ञानेश्वर ।। १।।
मरोनिया जावे। बा माझ्या पोटा यावे ।। २ ।।
ऐसे करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ।। ३ ।।
जावे वोवाळूनी । जन्मोजन्मी दासी जनी ।।४।।

संतशिरोमणी तुकाराम महाराजांनीसुद्धा ज्ञानेश्वराच्या श्रेष्ठपणाचे गुणगान असे केले आहे.
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥१॥
मज पामरासी काय थोरपण । पायीची वहाण पायी बरी ॥२॥
ब्रम्हादिक जेथे तुम्हा वोळखणे । इतरां तुळणे काय पुढे ॥३॥
तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोली । म्हणोनि ठेविली पायी डोई ॥४॥

राम जनार्दनांनी त्यांची आरती रचली आहे.
आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा । सेविती साधूसंत मनु वेधला माझा ।।
लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग, नाम ठेविले ज्ञानी ।।
प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मचि केले । राम जनार्दनी, पायी ठकचि ठेले ।।

अशा प्रकारांनी अनेक संतांनी तर ज्ञानेश्वराच्या कार्याचा गौरव केलाच. संतपरंपरेचा जो धर्म होता तोच माझा धर्म आहे असे अभिमानाने सांगणा-या आजच्या युगातील कवीश्रेष्ठ ग.दि.माडगूळकरांनी ज्ञानेश्वर आणि त्याची भावंडे यांचे देदिप्यमान रूप या गीतामध्ये दाखवले आहे.

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ।
ज्ञानियांचा राजा, भोगतो राणीव, नाचती वैष्णव, मागेपुढे ।
मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड. अंगणात झाड, कैवल्याचे ।
उजेडी राहिले, उजेड होऊन. निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ।

ज्ञानेश्वरांनी अगदी लहान वयात अनेक प्रकारांच्या रचना केल्या. त्यांची अगाध विद्वत्ता, लालित्यपूर्ण शब्दरचना, कल्पनेची भरारी, साध्या सोप्या तसेच गूढ रहस्यमय रचना करण्याची हातोटी वगैरे विविध अंगांनी त्या बहरल्या आहेत हे पाहून मन थक्क होते. हे सगळे करतांना आपण हा एक यज्ञ करीत आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली. यातून त्यांना आपला कसलाही स्वार्थ साधण्याची मनोकामना नव्हती. संपूर्ण विश्वाचे कल्याण होवो असे पसायदान त्यांनी अखेरीस मागितले आहे.

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजये । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

“चिंता करतो विश्वाची” असे सांगणारे ज्ञानदेव अवघ्या जगावर प्रेम करीत होते. त्यांनी भोगलेल्या कष्टामुळे आलेल्या कडवटपणाचा लवलेशसुद्धा त्यांच्या स्वभावात आला नाही की त्याची छायासुद्धा त्यांच्या लेखनात डोकावली नाही. “पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद। ” इतक्या सहज भावनेने त्यांनी त्यांना त्रास देणा-या लोकांना क्षमा केली. म्हणूनच आजसुद्धा त्यांचे भक्त त्यांना ‘ज्ञानेश्वर माउली’ या नांवाने संबोधतात.

 

………. संपादन दि.२५-०६-२०१९

2 प्रतिसाद

  1. तुम्ही सुद्धा खुप छान लिहिले आहे,बरे का..!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: