शास्त्र व विज्ञान यांतील फरक

नियतकालिकांमध्ये येणा-या कांही लेखांमध्ये व माध्यमांद्वारे होणा-या चर्चेत “शास्त्र” व “विज्ञान” या शब्दांचा मुक्तपणे उपयोग केला जातो असे दिसते. त्यातील वैचारिक गोंधळ लक्षात घेऊन या दोन संकल्पनांवरचे माझे विचार मांडत आहे. मला असे वाटते की हे दोन्ही शब्द प्राचीन काळापासून उपयोगात आलेले आहेत, पण संदर्भानुसार त्यांचे अर्थ मात्र बदलत आलेले आहेत.

अनेक धार्मिक विधि आपण “वेदशास्त्रपुराणोक्त” रीतीने करतो. त्यात “शास्त्र” याचा अर्थ कांही नियम वा रीतीभाती असा होतो. न्याय, व्याकरण, संगीत, नाट्य अशा अनेक विषयांमधील परंपरागत नियमबध्दता शास्त्र या संकल्पनेत येते. “आपणा आपण जाणिजे तया नाम ज्ञान” असे म्हंटलेले आहे. गीतेमधील “ज्ञान, विज्ञान” यांत स्वतःबद्दल किंवा आत्मापरमात्म्याची माहिती म्हणजे “ज्ञान” आणि बाह्य जगाची माहिती “विज्ञान” असे ढोबळमानाने म्हणता येईल. “सायन्स” ही संकल्पना त्याकाळांत जगात कुठेही अस्तित्वात नव्हती. अगदी अलीकडेपर्यंत पाश्चात्य देशात सुध्दा सायन्स हा फिलॉसॉफीचा म्हणजे तत्वज्ञानाचा एक भाग होता. आजदेखील सायन्समध्ये संशोधन केल्यानंतर त्या शास्त्रज्ञांना पीएचडी म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी मिळते. सतराव्या अठराव्या शतकात युरोपमध्ये सायन्सला वेगळे करण्यात आले व विसाव्या शतकात मराठीमध्ये “विज्ञान” हा “सायन्स” या शब्दाचा पर्याय झाला. परंतु “शास्त्र” या शब्दाचा सुध्दा “सायन्स”ला प्रतिशब्द म्हणून सर्रास उपयोग सुरूच राहिला.

व्याकरण शास्त्र, संगीत शास्त्र यासारख्या “शास्त्रां”मध्ये माणसांनी केलेल्या आणि सांगितलेल्या नियमांचा समावेश होतो, ते नियम कालानुसार बदलू शकतात व वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. विज्ञान किंवा सायन्समध्ये फक्त निसर्गनिर्मित किंवा (आस्तिक लोकांच्या विचारानुसार) परमेश्वराने केलेले नियमच येतात व ते सर्वांना समान प्रकारे लागू होतात हा एक या दोन्ही संकल्पनांमध्ये महत्वाचा फरक आहे. निसर्गाचे हे नियम माणूस फक्त समजून घेऊ शकतो, तो नवे नियम करू शकत नाही की अनादीकाळापासून पासून चालत आलेले नियम बदलू शकत नाही.  विज्ञानाचे नियम स्थळकाळातीत असतात. कोणीही ते सप्रयोग सिद्ध करू शकतो. सायंटिस्ट्स किंवा वैज्ञानिकांची इतर शास्त्रीपंडितांबरोबर तुलना होऊच शकत नाही कारण वैज्ञानिक निसर्गाचा अभ्यास करून त्यांना जे सत्य दिसेल, जाणवेल, जे आकलन होईल तेच सांगतात तर इतर शास्त्री पंडित आपली स्वतःची मते, कल्पना, विचार मुक्तपणे मांडतात, त्यांच्या क्षेत्रांत ते स्वतःचे नवे नियम बनवू शकतात, तसे वैज्ञानिक करू शकत नाहीत.

उदाहरणार्थ हिन्दू असो वा ख्रिश्चन असो दोघांनाही पदार्थविज्ञानाच्या नियमाप्रमाणे ऊष्णतेचे चटके बसतील आणि त्यांनी जमीनीवरून वर किंवा कड्यावरून खाली उडी मारली तर ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली येतील. हे परमेश्वराने बनवलेले विज्ञान आहे. पायातले जोडे बाहेर काढून ठेऊन व डोक्यावर टोपी किंवा पागोटे घालून देवळात प्रवेश करावा आणि डोक्यावरील टोपी काढून पण पायांतले बूट न काढता चर्चमध्ये जावे हे माणसांनी सांगितलेले शास्त्र आहे. परमेश्वर किंवा गॉडने तसे सांगितलेले नाही. असले नियम स्थानिक परिस्थितीनुसार तयार झालेले आहेत.

मराठी भाषेत शास्त्र व विज्ञान हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरून फार मोठा गोंधळ निर्माण करून ठेवला गेलेला आहे. सोवळे ओवळे, उपास तापास वगैरे अनेक परंपरागत गोष्टी हिंदू धर्म”शास्त्रात” व्यवस्थित बसतात, पण त्यांना विज्ञानाचा आधार नाही. मनातून एखादी गोष्ट करायची नसेल तेंव्हा सुध्दा इतरांसाठी आपण “शास्त्रा”पुरती ती थोडीशी करतो. इथे शास्त्राचा विज्ञानाचा संबंध येत नाही.
विज्ञान या विषयामध्ये तर्कशुद्ध विचार असणे महत्वाचे असते.  ध्वनीस्पंदने, विद्युतलहरी अशा संकल्पना भोंगळपणे वापरण्याला तेथे वाव नाही. तशा वापरतांना त्यांच्या ऊर्जेचे मोजमाप, कंपनसंख्या, शरीरातील विशिष्ट भागांवर त्याचा प्रत्यक्ष होणारा निश्चित परिणाम, त्याचे मोजमाप वगैरे समजून घेणे आवश्यक असते. कुठल्या तत्वाचा कोणी शोध लावला यापेक्षा तो कसा सिद्ध केला गेला हे महत्वाचे असते. आधीच एक निष्कर्ष गृहीत धरून त्याअनुषंगाने मुद्दे मांडणे हे नीतिशास्त्र, पाकशास्त्र, विधिसंस्था वगैरेमध्ये ग्राह्य असेल पण ते विज्ञानाला धरून नाही. तिथे आधी मान्य असलेल्या सिध्दांतांच्या आधाराने तर्क करून किंवा प्रत्यक्ष प्रयोग करून आणि त्यातील निरीक्षणांचा सखोल अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढावा लागतो. वस्तुनिष्ठता, स्थलकालनिरपेक्ष असणे व प्रयोगाने सिध्द करण्याजोगे असणे हे विज्ञानाचे कांही निकष आहेत असे कांही ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी या विषयावरील जाहीर चर्चेत सांगितले होते.

वेगवेगळ्या ठिकाणी या विषयावर होत असलेल्या चर्चेत यांत गल्लत झालेली दिसते. हवा डोळ्याला दिसत नाही पण अस्तित्वांत असते तसाच अदृष्य देवसुध्दा सगळीकडे भरलेला असतो असे म्हणणे किंवा प्राध्यापकाचा मेंदू डोळ्याला दिसत नाही म्हणजे तो अस्तित्वांतच नाही असा आचरट युक्तिवाद करणे हे कथाकीर्तनासारख्या शास्त्रांत कदाचित बसेल पण विज्ञानांत निश्चितपणे नाही. डोळ्याला न दिसणा-या हवा किंवा प्राध्यापकाच्या मेंदूसारख्या वस्तूंच्या अस्तित्वाची दुसरी एखादी खूण पटत असते म्हणून त्या अस्तित्वात असतात, तशीच देवाची खूण ज्याला पटत असेल तर त्याने आहे म्हणावे, नसेल त्याने आहे किंवा नाही यातले कांहीच म्हणायची गरज नाही. विज्ञानाच्या प्रथेप्रमाणे आज ज्या सिध्दांतांचा प्रत्यक्ष पुरावा आहे ते सिध्द झाले आहेत असे म्हणायचे आणि ज्यांचा पुरावा नसेल तर ते आज मान्य करता येणार नाहीत, पण ते कधीही सिध्द होणारच नाहीत असेही नाही.

 त्यामुळे देव अस्तित्वात आहेच असे सारे शास्त्रीपंडित आग्रहाने सांगतात, तर वैज्ञानिक याबद्दल संदिग्धता बाळगतांना दिसतात. दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत कारण शास्त्र आणि निज्ञान या वेगळ्या गोष्टी आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: