त्रयोदशीची चन्द्रकोर

छत्रपति शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचा उल्लेख प्रतिपत् चन्द्ररेखेव असा केला आहे.  द्वितीया आणि तृतीयेच्या रेखीव चन्द्रकोरीचे सुंदर वर्णन साहित्यात अनेकदा सापडते. अंगाने थोड्या भरलेल्या चवतीच्या चन्द्राच्या कोरीची उपमा एका कवीने झोकात चाललेल्या कोळ्याच्या पोरीला दिली आहे.  त्यानंतर एकदम खुदाकी कसम लाजवाब असा चौधवीका चाँद आणि पौर्णिमेचे पूर्ण चन्द्रबिंब येते. त्रयोदशीच्या चन्द्रकोरीचा उल्लेख साहित्यामध्ये कधीच आणि कुठेच झालेला मी तरी ऐकला नाही.

पण आज सकाळी मी तिला अचानक प्रत्यक्ष पाहिलं आणि तिच्याकडे पहातच राहिलो.  मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलो तेंव्हा अजून झुंजूमुंजू उजाडले नव्हते. आभाळातल्या घनदाट अंधारावर माघ वद्य त्रयोदशीची ती देखणी चन्द्रकोर मोठ्या दिमाखात राज्य करत होती.  तिच्या जवळच दिसणारा तेजस्वी शुक्र एकाद्या सेनापतीच्या ऐटीत चमकत होता.  पूर्व दिशेला क्षितिजाच्या थोडेसे वर विलसलेले ते अनुपम लोभसवाणं दृष्य पहात रहावेसे वाटत होते.

पण थोड्याच वेळात क्षितिजाच्या पलीकडे उभे असलेल्या उजेडाच्या दूतांचे आगमन झाले आणि त्यांनी लाल, पिवळ्या, केशरी रंगांच्या पिचका-या भरभरून आभाळात उडवायला सुरुवात केली.  बिचारी चन्द्रकोर आणि तिचा सेनापति या हल्ल्यापुढे निष्प्रभ होत गेले.  त्यानंतर सम्राट आदित्याचे आगमन होईपर्यंत शुक्र तर पार दिसेनासा झाला  आणि चन्द्राची चिमुकली कोर जेमतेम अंधुकशी दिसत राहिली.

मला कविवर्य भा.रा.तांबे यांच्या मावळत्या दिनकराची आठवण झाली.  दिवसभर वणवण करून दमल्या भागलेल्या भास्कराला दोन्ही करांनी अर्घ्य देऊन प्रणाम करावा असे कविवर्यांना वाटले होते.  त्यांच्या कवितेतला सूर्यनारायण वणवण करून अशक्त झाला असला तरी प्रत्यक्ष क्षितिजापलीकडे जाईपर्यंत आभाळाच्या राज्यावर त्याचीच निर्विवाद सत्ता चालणार होती.  तो दिसेनासा झाला आहे याची पक्की खात्री पटल्यानंतरच तारका हळू हळू आभाळाच्या दरबारात हजर होणार होत्या. पण आज जिच्या अनुपम लावण्याकडे मी थोड्याच वेळापूर्वी टक लावून पहात होतो ती राजकन्येसारखी देखणी तेजःपुंज चन्द्रकोर  माझ्या डोळ्यादेखत क्षणाक्षणाला क्षीण होत होत पहाता पहाता अगदी नगण्य होऊन गेली.  आता याच अवस्थेत पुढील दहा अकरा तास ती एकाद्या व्रतस्थ योगिनीप्रमाणे अस्ताचलापर्यंत जाण्यासाठी उरलेले मार्गक्रमण करणार होती.  तिला माझे दंडवत.

Saturday February 25, 2006

पुनश्च त्रयोदशी

बरोबर एक महिन्यापूर्वी अचानकपणे मला वद्य त्रयोदशीच्या पहाटेच्या रेखीव चन्द्रकोरीचे विलोभनीय दर्शन घडले होते आणि त्यानंतर मनात आलेले विचार त्या दिवशी मी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते. ब्लॉगगिरी सुरू केल्यापासूनच मनात सुचेल तसे सैरभैर लिहिण्यापेक्षा एखाद्या विषयाचा धागा धरून लिहावे असं मनात होते पण त्यासाठी विषय ठरत नव्हता.  त्या दिवशी तो अचानक माझ्या हाती आला आणि तो निदान महिनाभर तरी पुरेल असे वाटले. आणि तसेच झाले सुध्दा. चन्द्रमा या विषयावर महिन्याभरामध्ये अठरा भाग लिहूनसुध्दा अजून कितीतरी बाकी राहिले आहे.

पुढच्या त्रयोदशीची चन्द्रकोर आवर्जून पहायचीच असे मी त्या दिवशी ठरवले होते. पण अचानक काल पुण्याला जाणे झाले आणि तिथेच मुक्काम केला. राहण्याचो ठिकाण भरवस्तीमध्ये गजबजलेल्या रस्त्यावर होते.  तिथे रस्त्यावरून धूळ उडवीत आणि धूर सोडीत जाणारी असंख्य वाहने आणि फूटपाथवर घोळक्या घोळक्याने फिरणारी आणि मधून मधून केकाटणारी अनोळखी कुत्री यांच्यामधून रोजची प्रभातफेरी करावी अशी कांही अनुकूल परिस्थिती अजीबात नव्हती.  शिवाय आमचे यजमान कुटुंब सूर्यवंशी उत्तानपाद राजाचे अनुयायी.  उन्हाची तिरीप डोळ्यावर येईपर्यंत अंथरुणात लोळत पडणारी मंडळी.  आपण पहाटे उठून खुडबूड करून त्यांच्या साखरझोपेत कशाला व्यत्यय आणायचा?  त्यामुळे ही लोभसवाणी चन्द्रकोर पुन्हा पहायला आणखी महिनाभर थांबावे लागणार असेच दिसत होते.

आज पहाटे नेहमीप्रमाणे जाग आली आणि संवयीनेच आळोखे पिळोखे देत उभे राहिल्यावर लक्षांत आले की आपण आज वेगळ्या ठिकाणी आहोत. खिडकीशी जाऊन बाहेर डोकावले. खाली रस्यावर सोडियम लॅंप्सचा पिवळा धम्म भगभगीत उजेड पसरला होता. त्याच्या आणि घरोघरी लागलेल्या दिव्यांच्या उजेडात हवेतले धूलिकण न्हाऊन निघाल्यामुळे आकाशही काळेभोर दिसण्याऐवजी धुरकट झाले होते त्यामुळे मिणमिणत्या चांदण्या नीट दिसतसुध्दा नव्हत्या. पण समोरच्या इमारतीच्या दोन बोटे वर ती कोरीव चन्द्रकोर मात्र आपल्या दिव्य तेजाने तळपत होती आणि आणखी चार बोटावर तेजस्वी शुक्रसुध्दा झगमगत होता. त्यांना पाहिले आणि माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले.

Monday March 27, 2006

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: