लीड्सच्या चिप्स – भाग १ – नमनाला धडाभर तेल

कामासाठी असो की फिरण्यासाठी असो, ज्या ज्या ठिकाणी जाणे घडेल त्या भागामध्ये गेल्यावर चौकसपणाने आजूबाजूला पहायचा नाद मला अगदी लहानपणीच लागला होता. तेंव्हा वडीलधारे लोक त्याचे कौतुकसुध्दा करायचे. पुढे ती एक जित्याची खोडच झाली. वयोमानाप्रमाणे त्यात इतर विकारांची भर पडत गेली.  विस्मरणशक्ती वाढीला लागली आणि कदाचित त्याचाच परिणाम असा झाला असेल, की आपण पाहिलेल्या गोष्टी इतरांना सांगाव्यात अशी एक नवीनच हौस निर्माण झाली. पण माझ्या फालतू गप्पा ऐकायला इथं कुणाला वेळ आहे? आधीच ओळखीच्या लोकांची संख्या दिवसेदिवस घटत चालली आहे.  जे शिल्लक आहेत त्यांनाच मी वेठीला धरायला सुरुवात केली तर कदाचित ते लोक माझी ओळख दाखवायचेच सोडून द्यायचे. मग असे वाटले की लिहून काढावे. पण वाचणार तरी कोण? जिथे श्रोता मिळायची वानवा आहे तिथे वाचक कुठून आणायचा?
 वाचनाची आवड असणारे भरपूर लोक आहेत पण त्यांच्यापर्यंत पोचायचे कसे?  मूळ स्वभावातलाच भिडस्तपणा म्हणा, किंवा आळशीपणा, कदाचित आकडूपणाही असेल, पण आपल्या लिखाणाची बाडे पाठीवर घेऊन प्रकाशकांचे उंबरे आणि आपल्या स्वतःच्या चपला झिजवायचे काम कांही आपल्याला जमण्यासारखे नाही.  नंतर असेही वाटले की असा नकारात्मक विचार करून उदास होण्यात कांही अर्थ नाही. त्यापेक्षा आपल्याला जे कांही सांगावेसे वाटते आहे ते लिहून टाकावे. योगायोगाने किंवा कोणाच्या कृपेने इंटरनेटवर थोडीशी जागा सुध्दा मिळाली आहे त्यात पांढ-यावर काळे करून टाकायचे सोपे काम आपण करावे आणि तिथपर्यंत पोचून ते वाचायचे अवघड काम वाचकांवर सोपवावे.

२००५ डिसेंबर ते २००६ जानेवारी महिन्यात मी इंग्लंडमधल्या लीड्स या गांवाला भेट देऊन आलो. तशी ती माझी इंग्लंडला जायची चौथी आणि लीड्सची दुसरी खेप होती त्यामुळे त्यात अपूर्वाईचा भाग नव्हता. कदाचित त्यामुळेच या वेळी मला एका वेगळ्या दृष्टीकोनातून सगळ्या गोष्टी नीटपणे पहायची, शांतपणे जाणून घ्यायची संधी मिळाली. त्याच्या आधाराने कांही बाही लिहायचा हा एक प्रयत्न आहे. सुरुवातीला या लेखमालेचे नांव काय ठेवावे हेच सुचत नव्हते. “लीड्सयात्रा” पासून सुरुवात केली, पण यात्रा म्हंटले की कुठेतरी ती तीर्थयात्रा असावी असे वाटते,  तशी ती नव्हती. “लीड्सचा प्रवास किंवा सफर” असे कांहीतरी म्हंटले तर ते नुसतेच प्रवासवर्णन होईल. आता विमानाचा प्रवास ही काही वर्णन करण्याजोगी सफर आहे कां? इथे बसले आणि तिथे उतरले, यांत पाहण्यासारखे आणि सांगण्यासारखे कितीसे आहे?  तरीही जमेल तेवढे लिहून काढले आणि ब्लॉगवर चढवले.  “यॉर्कशायरचे लीड्स” असा मथळा दिला तर चालले असते, पण त्यामुळे हा लेख अत्यंत गंभीर प्रकृतिचा किंवा किचकट माहितीने भरलेला असेल अशी कल्पना झाली असती. शिवाय ज्या गांवी जायचेच नाही तिथला रस्ता कशाला विचारा असा सूज्ञ विचार करून सुजाण वाचक कदाचित तिकडे फिरकणार सुध्दा नाहीत अशी एक आशंका वाटली. मला तर तिथल्या संपूर्ण अनुभवांचे कथन करायचे आहे;  त्यात मग खास प्रेक्षणीय जागा आल्या, भेटलेली त-हेत-हेची माणसे आली,  तिथल्या मुक्कामात वाचलेल्या पुस्तकांतल्या मजेदार गोष्टीसुध्दा आल्या.

लीड्सलाच मला कुणीतरी सांगितलं की मॅकडोनाल्ड, के.एफ.सी. आणि पिझाहट वगैरेनी फास्ट फूडचे मार्केट काबीज करण्यापूर्वी इंग्लंडमध्ये या क्षेत्रावर फिश अँड चिप्सचे साम्राज्य होते आणि त्याची सुरुवात लीड्स इथे झाली म्हणे. म्हणजे तिकडचे लोक त्याआधी मत्स्याहार घेत नव्हते किंवा बटाट्याचे काप त्यांना माहीत नव्हते अशातला भाग नाही. पण व्यवस्थितपणे टेबलांवर बसून, गळ्यात नॅपकीन बांधून,  सव्य अपसव्याचे सगळे टेबल मॅनर्स सांभाळीत काट्याचमच्याने साग्रसंगीत जेवण करण्या ऐवजी पटकन उभ्याउभ्या कांहीतरी खायला देणारी दुकाने नव्या जमान्यात सुरू झाली आणि त्यांनी सुरुवात केली ती फिश अँड चिप्स या डिशपासून. अशा प्रकारे दुकानांची कल्पना आधी लीड्समध्ये निघाली आणि नंतर तिचा जगभर प्रसार झाला असे त्या लोकांचे म्हणणे आहे. खरे खोटे देव जाणे. या किंवदंतिवरून मला “लीड्सच्या चिप्स” हे नांव सुचले. असे वाटले की आपल्या लेखाला हे नांव दिलं तर मला त्यामध्ये  हलके फुलके, खुसखुशीत, लुसलुशीत असे कांहीतरी लिहायला संधी मिळेल, पुढ्यातल्या ताटात काय वाढून ठेवलं आहे याची थोडी पूर्वकल्पना वाचकांना येईल आणि त्याचा आस्वाद घ्यायचा मोह त्यांना होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: