लीड्सच्या चिप्स- भाग २- केंद्रीय ग्रंथालयाला भेट

अगदी लहानपणी, म्हणजे इंग्रजी भाषेचे ए बी सी डी सुध्दा शिकण्यापूर्वीपासून रेडिओवरील क्रिकेटची कॉमेंटरी कानावर पडत होती. थोडंसं यस् फ्यस् समजायला लागल्यापासून तिचे भक्तिभावानं श्रवण सुरू झाले. त्यामुळे लॉर्डस, ओल्ड ट्रॅफर्ड, हेडिंगली लीड्स वगैरे इंग्लंडमधल्या क्रिकेट ग्राउंड्सची नांवे चांगली ओळखीची झालेली होती. मग त्यातल्या कुठल्या मैदानावर कोणत्या खेळाडूने कधी व किती धावा काढल्या आणि किती विकेट्स घेतल्या याची माहिती गोळा करून ती लक्षात ठेवायचा नाद लागला. माझा मात्र प्रत्यक्ष मैदानावर भोपळ्यांचाच घाऊक व्यवहार घडत असल्यामुळे एक क्रिकेटर म्हणून तिकडे जायची संधी मिळण्याचा विचार सुध्दा मनात येणे शक्यच नव्हते. इतिहास भूगोलाच्या धड्यांमध्ये एडिंबरो, मॅंचेस्टर, बर्मिंगहॅम वगैरे भारदस्त नावांच्या शहरांपुढे लीड्ससारख्या साध्यासुध्या नावाचा काय पाड लागणार ? कधी त्याचा उल्लेख झालाही असला तरी आता ते स्मरत नाही. कदाचित तिथे क्रिकेट स्टेडियम शिवाय कांहीसुध्दा नसेल असं तेंव्हा वाटले असेल. परदेशगमन हीच केवळ अपूर्वाईची गोष्ट वाटावी अशा त्या काळात कांही काम धंदा नसतांना निव्वळ विश्रांतिसाठी आपण कधीतरी त्या गूढ गांवी जाऊन राहू असे कुणी सांगितले असतं तर ते स्वप्नातसुध्दा खरे वाटले नसते.

पण काळ झपाट्यानं बदलत गेला आणि दस्तूर खुद्द सुटी घालवण्यासाठी म्हणून लीड्सला जाऊन डेरेदाखल झाले. आराम करायचा म्हणजे नुसते हात पाय पसरून लोळत पडायचं असे थोडेच आहे? “केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्रग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार” असे एक सुभाषित आहे. त्यातील देशाटन झालेलेच होते. इथल्या स्थानिक प्रकांड पंडितांची साधी भेट सुध्दा होणं दुरापास्त तेंव्हा मैत्री कशी होणार? इतर भारतीय मंडळींबरोबर गप्पागोष्टी व्हायच्या. ती ही सर्व सुविद्य आणि कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून इथे आलेली असल्यामुळे या संभाषणातून ज्ञानाचे कांही कण प्राप्त होत होते. कडाक्याच्या थंडीच्या या मोसमात सभा संमेलने कमीच होणार आणि तिथे प्रवेश कसा मिळणार?  तेंव्हा बसल्या बसल्या मिळतील ते ग्रंथ वाचून विशिष्ट स्थानिक  विषयांसंबंधी थोडीफार माहिती गोळा करायचे ठरवले आणि केन्द्रीय ग्रंथालयाला भेट दिली.

या ठिकाणी येऊन व बसून आपल्याला हवे ते पुस्तक वाचायला सर्वांना मुक्तद्वार प्रवेश आहे. दरवाजात कोणी ओळखपत्र विचारत नाही. अगदी चिटुकल्या पिटुकल्या मुलांना सुध्दा इथे यायला मज्जाव नाही. उलट त्यांच्यासाठी एक खास स्वतंत्र दालन आहे. त्यात सर्व वयोगटातील लहान मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रमय पुस्तके तर आहेतच, छोट्या बाळांसाठी लोळायला गाद्या, खेळायला आकर्षक खेळणी आणि रंगवण्यासाठी चित्रे आणि साहित्यसुध्दा ठेवले आहे. तिथे येऊन मुलांनी रंगवलेली चित्रे आजूबाजूच्या भिंतींवर प्रदर्शित करतात. आठवड्यातून एक दिवस ठरलेल्या वेळी एक आजी इथे येऊन लहान मुलांना छान छान गोष्टीसुध्दा सांगतात. अगदी शैशवावस्थेतच मुलांच्या मनात पुस्तकांबद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी किती धडपड? मी जेंव्हा लायब्ररीला जायला निघालो तेंव्हा दोन वर्षाच्या ईशा आणि इरा लायबोली लायबोली करत माझ्या मागे का लागल्या याचे मला प्रचंड कुतूहल वाटले होते. भारतात एवढ्या लहान मुलांना कोणी लायब्ररीत येऊच दिले नसते. त्यामुळे लाय़ब्ररी हा शब्द तरी त्यांना कसा ठाऊक होता याचेच मला आश्चर्य वाटले होते. तिथे गेल्यानंतर ही सगळी कोडी उलगडली. तिकडे एका सभासदाच्या नांवावर अनेक पुस्तके वाचायला नेता येतात, फक्त ती दिलेल्या मुदतीत परत आणून दिली नाहीत तर त्यासाठी दंड भरावा लागतो. त्यासाठी सभासदाने प्रत्यक्ष लायब्ररीत यायचीही गरज नाही. त्यामुळे शिल्पाच्या कार्डावर मला पाहिजे तितकी पुस्तके निवडून ती घरी आणता आली.
 
लीड्स या विषयावरच्या पुस्तकांचा एक स्वतंत्र विभाग आहे. त्यात शेकड्यांनी पुस्तके ठेवलेली आहेत. या इंग्रज लोकांना इतिहासाचे मात्र भारीच वेड ! लीड्स या विभागातली जवळ जवळ ऐंशी ते नव्वद टक्के पुस्तके इतिहासानेच भरलेली होती. आणि कशाकशाचा म्हणून इतिहास लिहावा? प्रदेशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील घडामोडींचा तपशील देणारे ग्रंथ तर आहेतच. पण लीड्स सेंट्रल लायब्ररीमधील लीड्ससंबंधी पुस्तकांचे विषय पहा. लीड्समधील म्यूझियम्स, लायब्ररीज, हॉस्पिटल्स, चर्चेस, सिनेगॉग्स, वूलन टेक्स्टाईल्स इंडस्ट्री, इलेक्ट्रिसिटी, फाउन्ड्री, ट्रान्स्पोर्ट, आर्किटेक्चर, पुतळे, रंगभूमी, सिनेमा अशा प्रत्येक गोष्टींचा साद्यंत इतिहास नमूद करणारी स्वतंत्र पुस्तके आहेत. इतकेच नव्हे तर इथली माती (सॉइल्स), इथे येऊन स्थाईक झालेले जिप्सी आणि ज्यू लोक, इथला लोकप्रिय लीड्स युनायटेड फुटबॉल क्लब आणि बीयर बनवणारी टेटली कंपनी अशासारख्या विविध विषयावर लिहिलेली पुस्तके इथे दिसली.
                                 
.  . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . .     (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: