बोलू ऐसे बोल (भाग १)

केयूरा न विभूषयन्ति पुरुषं माला न चंद्रोज्ज्वलाः ।
न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः ।
वाण्यैका समलङ्करोति पुरुषं या संस्कृतार्धायते ।
क्षीयंते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ।।

असे एक संस्कृत सुभाषित आहे. स्नान करून चंदनाचा लेप लावणे, हातात फुलांचा गजरा आणि गळ्यात चंद्रासारखी उज्ज्वल मोत्यांची माळ परिधान करणे, केसात मोराच्या पिसाचा तुरा खोवणे वगैरे शृंगारामुळे पुरुषाला खरी शोभा येत नाही. त्याचे बोलणे हे त्याचे खरे आभूषण आहे असे सुभाषितकारांनी त्यात म्हंटले आहे. आताच्या काळात सांगायचे झाले तर सूट बूट आदि “एक नूर आदमी तर दस नूर कपडा” चढवून, केसांचा कोंबडा करून, पॅरिसचे परफ्यूमचा स्प्रे घेऊन भपकेबाज केलेले व्यक्तिमत्व कदाचित प्रथमदर्शनी छाप पाडेल पण एकदा बोलणे सुरू झाले की जो माणूस बोलण्यात चतुर असेल तोच बाजी मारेल. पण हे सर्व फक्त पुरुषांसाठी झाले.

स्त्रियांची गोष्ट जरा वेगळी आहे. सौंदर्य प्रसाधन किंवा खेडवळ भाषेत नट्टा पट्टा हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच एक अविभाज्य भाग असतो. दोन तीन वर्षाची चिमुरडी पोर सुद्धा वारंवार आरशात पाहून स्नोव्हाईटच्या सावत्र आईप्रमाणे त्याला “सांग दर्पणा कशी मी दिसते” असे विचारत असते. स्त्रियांच्या जागतिक सौदर्य स्पर्धा होतात, वैयक्तिक पातळीवर एकमेकींशी तुलना होतच असतात. शहरात जागोजागी त्यांच्यासाठी सौंदर्यवर्धन केंद्रे (ब्यूटी पार्लर्स) असतात आणि बहुतेक जणी चेहरा सजवण्याचे आपले साहित्य नेहमीच बरोबर बाळगतात. पण यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे वाग्देवीचे वरदान त्यांना जन्मतःच मिळते. या बाबतीत तिने स्त्रीवर्गाच्या बाजूने पक्षपात केला आहे असे दिसते. कुठल्याही विषयावर किंवा कुठल्याही विषयाशिवायसुद्धा बहुतेक महिला तासनतास बोलत राहू शकतात. हे मी टीका करण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाही, कौतुकाने लिहिले आहे.

खरेच मला कधी कधी त्यांचा हेवा सुद्धा वाटतो कारण माझी गोष्ट मात्र बरोबर याच्या उलट होती. मुखस्तंभ, मुखदुर्बळ वगैरे विशेषणे मला लहानपणी मिळायची. आता लोक तोंडावर मितभाषी, अबोल म्हणतात आणि पाठीमागे शिष्ट नाहीतर तुसडा म्हणतात. असतो एकेकाचा स्वभाव त्याला काय करणार? पण माझ्या आईला मात्र माझी फार काळजी लागली होती. इतर मुलांसारखा कांगावा, कागाळ्या आणि आक्रस्ताळेपणा करणे सोडाच पण साधी तक्रार करण्यासाठी किंवा काय पाहिजे ते मागून घेण्यासाठीसुद्धा तोंड न उघडणा-या या मुलाला निष्ठुर जग कच्चे फाडून खाईल अशी भीती तिला वाटायची. त्यामुळे मला बोलके करण्याचे तिचे प्रयत्न सतत सुरू असायचे. कधी ती मला शेजारच्या रखमाकाकूकडे एक निरोप देऊन पाठवून द्यायची. मी धांवत धांवत जाऊन “आईनं तुम्हाला गुरुवारी शेवया करायला बोलावलं आहे.” असं सांगून उड्या मारीत परत येऊन जाई. आई विचारायची, “काय रे, काकू काय म्हणाल्या?” त्यांनी कांही म्हणायच्या आतच मी परत आलो आहे हे तिला समजायचं. मग ती सांगायची, “त्यांना वेळ आहे कां ते विचार आणि त्यांचं उत्तर मला येऊन सांग.”

मी अनिच्छेनेच पुन्हा एकदा जाऊन “आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना की आईनं गुरुवारी बोलावलंय् म्हणून? मग तुम्हाला वेळ आहे की नाही ते आईनं विचारलंय्.” असं कांही तरी तुसडेपणाने विचारायचा. त्याकडे लक्ष न देता आवाजात मोठा गोडवा आणत त्या विचारायच्या, “हा बघ मी तुझ्यासाठी वाटीत लाडू काढून आणला होता. आधी बस, तो खाऊन घे बाळा.” खरं तर त्यांनी केलेला लाडू मला फार आवडायचा, पण एक कडंग लाडू खायला घालून तो खाऊन होईपर्यंत त्या सतरा प्रश्न विचारून आमच्याकडे कोण कोण आले गेले, ते काय म्हणाले वगैरे चौकशा करणार आणि ते सगळं तिखटमीठ लावून गांवभर करणार हे ओळखून मी उत्तर द्यायचा, “काकू, माझा एक दांत हलतो आहे, त्यामुळे आज मला लाडू खाता येणार नाही, पण तुम्हाला वेळ आहे की नाही ते सांगा ना!”

माझी आई बरेच वेळा मला बाजारातून चार वस्तू घेऊन यायला पाठवायची. जातांना नीट चौकशी करून सगळे सामान आणायला बजावून सांगायची. “त्यात कसली चौकशी?” या माझ्या प्रश्नावर ती सांगायची, “अरे, यात कोणकोणचे प्रकार आहेत? त्यांच्या किंमती काय आहेत? हा माल कधी आला? नवीन माल कधी येणार आहे? वगैरे सगळं विचारून, पाहून घेऊन, नंतर आपल्याला काय पाहिजे ते सांगायचं असतं, नाहीतर ते लोक कांहीही आपल्या गळ्यात बांधतात.” अर्थातच त्या काळी आजच्यासारखी लेबले लावून पॅकबंद माल विकायला ठेवण्याची पद्धत नव्हती. मी आज्ञाधारकपणे चार वस्तूंची नांवे आणि चार प्रश्न लक्षात ठेवून घेत असे. त्या वयात स्मरणशक्ती जरा बरी होती, त्यामुळे आतासारखी चिठो-यावर ते लिहून न्यायची गरज पडायची नाही. बहुतेक वेळी मी आणलेले सामान बरोबरच असे. त्यातूनही कधी गुळाचा दर्जा जरा कमी असला तर, “राहू दे, आपण आमटी भाजीत घालून संपवून टाकू.” आणि तो जास्तच महागडा व उच्च दर्जाचा असेल तर, “या संकष्टीला आपण मोदकांचा नैवेद्य करू” असे कांहीतरी आई पुटपुटे, पण मला मात्र त्या वेळी ती कांही बोलायची नाही कारण मी लगेच ते निमित्त करून “आपल्याला कांही तो बाजार बिजार जमत नाही.” असे म्हणून मोकळा होऊन जाईन ही भीती होती, आणि मला बाजारात पाठवण्यामागे बाजारातून वस्तू आणायचा तिचा मूळ हेतू नसायचाच.

क्वचित कधी एकादा अगदीच टाकाऊ आणि निरुपयोगी पदार्थ आणलाच तरीही ती कांही न बोलता मला त्या दुकानात घेऊन जायची आणि दुकानदाराला सांगायची, “तुम्ही बहुधा चुकून कांही वेगळाच पदार्थ आज पाठवला आहे हो. अगदी समजा की या मुलानं वेगळं कांही तरी मागितलं तरी आम्ही नेहमी कुठलं सामान घेतो ते तर तुम्हाला माहीतच आहे ना? तुमच्याकडे काय आज पहिल्यांदा सामान घेतोय्?” दुकानदार निमूटपणे तो पदार्थ बदलून द्यायचा. येता येता मी म्हंटलं, “आई पण?” माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच ती विचारायची, “यात त्याची कांही चूक नाही असंच तुला म्हणायचंय ना? अरे मला ते माहीत आहे आणि त्यालाही हे माहीत आहे. त्यालाच माल बदलून द्यायला आपण सांगितलं असतं तर त्यानं उगीच नखरे दाखवले असते, वेळ घालवला असता आणि उपकाराचं ओझं आपल्या डोक्यावर चढवलं असतं. तसलं कांही झालं नाही, आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळाली आणि आपण त्याचंही कांही नुकसान केलेलें नाही. मग झालं तर. आपण काय बोलतो यापेक्षा सुद्धा त्यामागचा उद्देश आणि त्याचे परिणाम महत्वाचे आहेत.” आईने दिलेली हीच शिकवण तीस चाळीस वर्षानंतर एका पंचतारांकित हॉटेलामधील वातानुकूलित सभागृहात एका आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व्यवस्थापन तज्ञाच्या तोंडून ऐकायला मिळाली तेंव्हा मलाच मनांत हंसू आलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: