वानवडीचा मुक्काम- महादजी शिंदे यांची छत्री

पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिंदे यांची ‘छत्री’ आहे असे शाळेत असतांना इतिहासाच्या (कां भूगोलाच्या?) पुस्तकात वाचतांना खूप मजा वाटली होती. लढाईच्या धामधुमीत सरदार शिंदे इथे आपली छत्री विसरून गेले होते की त्यांनी आपली आठवण रहावी म्हणून मुद्दाम कोणाला ती दिली होती अशी पृच्छा सुद्धा मी केली होती. ती छत्री म्हणजे एक स्मारक म्हणून बांधलेली इमारत आहे असे समजल्यावर तितकीशी मजा राहिली नाही. तरीही ते नांव स्मरणाच्या कुठल्यातरी कोप-यात कोरले गेले आणि पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर पुसले गेले नाही.

त्यानंतर अनेक वर्षांचा काळ गेला. अनेक वेळा पुण्याला जाणे व तेथे राहणेही झाले. पण कोणाच्याही बोलण्यात वानवडीचा साधा उल्लेख सुद्धा कधी झाल्याचे आठवत नाही. आपण पुण्याला ‘वानोरी’ इथे फ्लॅट घेणार असल्याचे मुलाने सांगितले आणि स्मरणात गाडली गेलेली जुनी आठवण एकदम जागी झाली. वानवडीची किंवा महादजी शिंदे यांची माहिती माझ्या मुलाला केंद्रीय विद्यालयात शिकतांना बहुधा कधीच मिळाली नसावी. त्यामुळे मी त्याबद्दल विचारल्यावर सुद्धा त्याच्या डोक्यात कुठलीच ट्यूब पेटली नाही.

आम्ही दिवाळीनिमित्त वानवडीला मुलाकडे रहायला आल्यावर त्या प्राचीन छत्रीसाठी शोधाशोध सुरू केली. वाढत चाललेल्या पुणे शहराने प्रसरण पावतांना वानवडीला पूर्णपणे गिळंकृत केले असल्याने आता ते ‘पुण्याजवळ’ राहिलेले नाही. त्याचाच भाग झाले आहे. ‘विंडसर’, ‘ऑक्सफर्ड’, ‘रहेजा’, ‘गंगा’, ‘सेक्रेड हार्ट’ अशा नांवांच्या मोठमोठ्या वसाहती उभ्या राहून तेथील सगळे वातावरण कॉस्मोपॉलिटन होऊन गेले आहे. मधेमधेच कोठे कोठे मराठमोळी जुनी वस्ती दिसते. त्याचेही बरेच शहरीकरण झालेले दिसते.

अशाच एका छोट्या रस्त्याच्या टोकाला महादजी शिंदे यांची सुप्रसिद्ध छत्री उभी आहे. ते जरी सन १७९४ मध्ये स्वर्गवासी झाले होते, तरी त्यांच्या वंशजांनी शंभराहून अधिक वर्षांनंतर सन १९१३ मध्ये हे स्मारक या जागेवर बांधले अशी नोंद केलेली संगमरवरी शिला तिथे बसवली आहे. कदाचित यापूर्वी वेगळ्या प्रकारची समाधी त्या जागी असेल. नक्षीदार खांब आणि सुरेख शिखर असलेले हे एक महादेवाचे प्रेक्षणीय असे मंदिर आहे. या दुमजली सुंदर इमारतीच्या गाभा-यात शिवलिंग आहे. चुनागच्चीच्या सुबक कोरीव काम केलेल्या भिंतीवर स्टेन्ड ग्लासच्या खिडक्या आहेत. आंत गेल्यावर मधोमध उंच सीलिंग असलेला दिवाणखाना असून बाजूने सज्जे आहेत. त्याच्या कडेने शिन्देकुलातील महारथींच्या तसबिरी मांडून ठेवल्या आहेत. शिंदे घराण्याचे आद्य संस्थापक सरदार राणोजी शिंदे यांच्यापासून अलीकडेच वारलेल्या माधवराव यांच्यापर्यंत सर्वांच्या तसबिरी या वास्तूच्या दिवाणखान्याच्या भिंतीवर टांगल्या आहेत. त्यातच एक विजयाराजे यांचा फ्रेम न केलेला फोटो आहे. गाभा-याची वेगळी इमारत आहे त्यावर अत्यंत सुन्दर रेखीव काम केलेला उंच घुमट आहे.

येथील एका शिलेवरील लिखाण थोडे संस्कृतमध्ये व त्याहूनही थोडक्यात मराठीमध्ये केले असून हिंदीमध्ये लिहिलेली एक स्वतंत्र शिला आहे. त्यावर सुद्धा तत्कालीन संस्थानिकाचे नांव शिंदे न लिहिता सिंधिया असे लिहिलेले आहे. शिंदे ते सिंधिया हा बदल कधी झाला हा आणखी एक संशोधनाचा विषय होईल.

संस्कृत लेखावर श्रीनाथ असे लिहिलेले पाहून ते एखादे स्तोत्र असावे असे वाटले. पण खालील मजकूर वाचल्यावर ते महादजी शिन्दे यांनी रचलेले नसून त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या छत्रीबद्दल असल्याचे समजते. शिन्देकुलरत्न महादजी हे संवत १८५० माघ शुद्ध १३ बुधवारी वैकुंठवसी झाले. त्यांचे प्रप्रपौत्र महाराज माधवराव शिन्दे यांनी संवत १९८१ ज्येष्ठ शुद्ध ५ शनिवारी या छत्रीची प्रतिष्ठापना केली असे त्यात लिहिले आहे.

या संकुलाच्या आवारात छत्रीची एक वेगळी छोटीशी चौकोनी इमारत असून त्यावर एक घुमट आहे. ही इमारत मात्र बंदच ठेवलेली दिसली. तिच्या खिडकीमधून आतील समाधीचे दर्शन होते. तेथे त्यांचा मुखवटा ठेवला असून एक घोड्याची मूर्ती आहे. महादजींनी सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात मराठी राज्याचे सेनापतीपद भूषवले होते व वडगांवच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला होता. ग्वाल्हेर येथे त्यांची राजधानी असली तरी पुण्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते व तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ वानवडी येथे  ही छत्री बांधण्यात आली.

छत्री व देवळाच्या इमारतींच्या भोवताली एखाद्या तुरुंगासारखी पुरुषभराहून उंच भिंत आहे. आत जाण्यासाठी एक कमान व प्रवेशद्वार आहे. त्याच्या समोर एक मोठा जुना वृक्ष आहे. “वानवडीला गेला होता, तिथला ढोल पाहिलात का?” असे कोणीतरी मला विचारले. हा वाजवायचा ढोल होता की त्या वटवृक्षातली पोकळी होती ते काही त्यालाही सांगता आले नाही.

हे एक ऐतिहासिक आठवणी जाग्या करणारे प्रेक्षणीय ठिकाण आहे. या स्मारकाची व्यवस्थित निगा राखलेली असल्याने आजही ते चांगल्या सुस्थितीत आहे.  एकंदरीत पहाता वानवडीचा मुक्काम थोडा सत्कारणी लागला असे म्हणायला हरकत नाही.

One Response

  1. […] महादजी शिंदे यांची छत्री (समाधी) पुण्यामध्ये वानवडी इथे आहे. मी तिची माहिती या लेखात दिली आहे. https://anandghare2.wordpress.com/2010/08/17/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%80%… […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: