महाकवी कालिदास आणि त्याच्या रचना

तीन निरनिराळ्या लेखाचे एकत्रीकरण आणि संपादन दि.०२-०७-२०१९

चित्रे विकीपीडियावरून साभार

भाग १ : महाकवि कालिदास

कालिदास

संस्कृत भाषेची साधी तोंडओळख असलेल्या माणसालासुध्दा कवी कालीदासाचे नांव नक्की ठाउक असते. कालिदासाच्या रचनांचे अनुवाद बहुतेक सर्व भारतीय तसेच परकीय भाषांमध्ये प्रसिध्द झालेले आहेत आणि त्यावर आधारलेल्या अगणित साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे जगभरातील साहित्यिक जगतात कालिदास हे नांव अत्यंत आदराने घेतले जाते.  त्याने लिहिलेली मालविकाग्नीमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञानशाकुंतल ही तीन नाटके, रघुवंश व कुमारसंभव ही महाकाव्ये आणि मेघदूत हे खंडकाव्य एवढे प्रमुख ग्रंथ आज उपलब्ध आहेत. त्याने केलेल्या इतर रचना कदाचित काळाच्या उदरात लुप्त झाल्या असाव्यात. तसेच त्याच्या नांवाला जोडल्या जात असलेल्या इतर कांही रचनांबद्दल तज्ञांच्या मनात मतभेद आहेत.

कालिदासाने स्वतःबद्दल कांहीच लिहून ठेवलेले नाही. त्यामुळे त्याच्या चरित्राबद्दल विश्वसनीय अशी माहिती कमी आणि कपोलकल्पित आख्यायिकाच जास्त ऐकायला मिळतात. त्याचा जीवनकाल नक्की केंव्हा होता यावर एकमत नाही. तो विक्रमादित्य राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता असे सर्वश्रुत आहे. पण विक्रमादित्य हे नांव धारण करणारे निदान चाळीस राजे भरतखंडात होऊन गेले, कदाचित एकाहून अधिक कालीदासही होऊन गेले असतील. त्यामुळे त्यातला महाकवी कालीदास नेमका कुठे आणि कोणत्या काळात होऊन गेला हे सांगणे कठीण आहे. तो उज्जयनी येथील विक्रमादित्य राजाच्या दरबारात होता असे बहुतेक लोक मानतात, पण काश्मीरपासून बंगालपर्यंत अनेक जागी कालीदास तिथला होता असे मानले जाते. त्याने लिहिलेल्या नाटकांमधील राजा अग्निमित्र हे पात्र इतिहासात प्रत्यक्षात होऊन गेलेल्या राजा अग्निमित्राच्या चरित्रावरून घेतले असेल तर कालिदास हा अग्निमित्रानंतरच्या काळात होऊन गेला असणार.  कदाचित त्या राजाचे नाव कालिदासाच्या नाटकातल्या पात्राच्या नावावरून ठेवले असेल अशी शक्यतासुध्दा आहे. संस्कृत आणि भारतीय भाषांमधील वाङ्मयातील अनेक साहित्यकृतींमध्ये कालिदासाच्या रचनांचा उल्लेख सापडतो. त्याअर्थी कालीदास नक्कीच त्या रचना लिहिल्या जाण्यापूर्वी होऊन गेला असणार. अशा प्रकारे तर्क करून त्याचा कालखंड हा येशू ख्रिस्ताच्या आधीची पांच शतके आणि नंतरची पांच शतके या हजार वर्षांच्या दरम्यान केंव्हा तरी होऊन गेला असावा.

कोणा पूर्णपणे अनोळखी माणसाकडल्या छायाचित्रांचा संग्रह अचानक आपल्या हाती पडला तरी त्या छायाचित्रांमधील माणसांचे वेष, पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या रेडिओ, टेलीव्हिजन, टेलीफोन, घड्याळ यासारख्या घरातल्या गोष्टी किंवा पाठीमागील इमारती, त्यांच्या छपरावरील अँटेने किंवा डिस्क, टॉवर, रस्त्यावरली वाहने अशा अनेक बाबीवरून आपल्याला आपल्या आयुष्यात त्या चित्राचा कालखंड कोणता असेल याचा अंदाज येतो.  याचे कारण गेल्या अर्धशतकात समाजजीवनात वेगाने जो बदल होत गेला तो आपण पाहिलेला आहे. सामाजिक कथा कादंबऱ्यातल्या तपशीलवार उल्लेखांवरून त्यातील घटना कोणत्या काळात घडल्या आहेत हे वातावरणनिर्मितीसाठी जाणीवपूर्वक दाखवले जाते, तसेच त्यातील भाषाशैलीवरून ते पुस्तक कोणत्या काळात लिहिले गेले असावे याचा अंदाज आपण करू शकतो. ऐतिहासिक किंवा पौराणिक गोष्टींबद्दल तो करणे थोडे कठीण जाते. कालिदास स्वतः हजाराहून अधिक वर्षांपूर्वी होऊन गेला आणि त्याच्या सर्व रचना पौराणिक काळातील घटनांवर आधारलेल्या आहेत. त्यामुळे त्याने आपल्या काव्यातून आणि नाटकांतून रंगवलेला काळसुध्दा प्रत्यक्ष त्याच्या जीवनकालातला नाही. अशा परिस्थितीत इतर अनेक साहित्यकृतींच्या तुलनेवरून तज्ञ लोकच कांही आडाखे बांधू शकतात आणि त्याची शहानिशा करणे केवळ अशक्य असते. कालिदास कधी कां होऊन गेला असेना, सर्वसामान्य वाचकाला त्याच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेता येण्यात त्यामुळे कांही फरक पडत नाही. संस्कृत भाषा न शिकलेल्या लोकांनी त्याचे संस्कृतमधील ग्रंथ मुळातून वाचण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांच्या इंग्रजी, मराठी अनुवादांचे सोप्या भाषेत काढलेले सार प्राशन करूनच त्यांना समाधान मिळते.

कालीदासाबद्दल अशी वदंता आहे की तो आधी महामूर्ख समजला जात असे. म्हणजे तो तसा वागत असे. एका राज्याची राजकन्या धर्मशास्त्रांच्या अभ्यासात पारंगत होती, पण तिला तिच्या ज्ञानापेक्षा त्या ज्ञानाचा दुरभिमान जास्त वाटत होता. जो कोणी आपल्याला शास्त्रावरील वादविवादात हरवेल त्याच्याशीच आपण विवाह करू असे तिने जाहीर केले होते. पण जो या चर्चेत हरेल त्याचे मुंडण करून त्याला गाढवावर बसवून हाकलून दिले जाईल असा उपनियम त्या पणाला जोडला होता. कांही विवाहोत्सुक युवकांनी प्रयत्न करून पाहिला आणि स्वतःचे हंसे करून घेतले. अपमानित झालेल्या त्या युवकांनी राजकन्येची चांगली खोड मोडायचे ठरवले. कांही करून तिचे लग्न एका मूर्खशिरोमणीबरोबर लावून द्यायचा घाट त्यांनी घातला आणि ते मूर्खाच्या शोधात निघाले.

एका झाडावर बसलेला कालिदास त्यांना दिसला. तो एका उंच अशा फांदीच्या टोकावर बसून तिच्या मुळावर घाव घालत होता. इतका मूर्ख माणूस दुसरा मिळणार नाही म्हणून त्यांनी कालीदासाची या कामासाठी निवड केली.  त्याला चांगली वस्त्रे परिधान करयला लावून, कपाळावर चंदनाचा टिळा, मस्तकावर पगडी वगैरेंनी सजवून राजकन्येपुढे नेले. हे महान पंडित असून त्यांनी मौनव्रत धारण केले असल्यामुळे ते फक्त मूकविवाद करतात असे कालिदासाचे वर्णन केले आणि कालिदासाला आपले तोंड बंद ठेऊन फक्त हातवारे करायचे असे सांगितले.

राजकन्येने प्रथम एक बोट वर करून दाखवले. तिला त्यातून “ब्रह्म एक आहे.” असे सांगायचे होते. कालिदासाला त्याचा अर्थ “तुझा एक डोळा फोडीन.” असा वाटला. त्याने रागाने “मी दोन्ही डोळे फोडीन.” अशा अर्थाने दोन बोटे दाखवली. राजकन्येने त्याचा  “ब्रह्म आणि माया अशी दोन रूपे आहेत. ” असा घेतला.
तिने पंजाची पांच बोटे दाखवून  “हे विश्व पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे. ” असे दाखवले. पण ती पंजाने थप्पड मारणार आहे असे कालिदासाला वाटले. त्यानेही आधी पंजा उगारला आणि त्याची मूठ बनवून “आपण गुद्दा मारू.” असे दर्शवले.  “पंचमहाभूते मिळून एक शरीर किंवा वस्तू निर्माण करतात.” असा त्याचा अर्थ राजकुमारीने घेतला. अशा प्रकारे चाललेल्या वादविवादात अखेरीस राजकन्येने आपला पराभव मान्य केला आणि कालिदासाचे श्रेष्ठत्व मान्य करून त्याचेबरोबर विवाह केला.

पण पहिल्या रात्रीच आपली घोर फसवणूक झाली असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने रागाच्या भरात कालिदासाला आपल्या महालाच्या सज्ज्यातून खाली ढकलून दिले. तो जिथे जमीनीवर पडला तिथे समोर कालीमातेची मूर्ती होती आणि आ वासून खाली पडतांना त्याची जीभ त्याच्याच दातांमध्ये चावली जाऊन तिचा तुकडा थेट कालीमातेच्या पायाशी जाऊन पडला. या बलिदानाने प्रसन्न होऊन कालीमातेने त्याला विद्येचे वरदान दिले आणि तो विद्वान बनला. अशी एक दंतकथा आहे.

या कथेचेही कांही पाठभेद आहेत. त्यातल्या एकात पत्नीने झिडकारल्यानंतर आणि आपल्याला वापरले गेल्याचे लक्षात आल्यावर निराशाग्रस्त झालेला कालीदास जीव देण्यासाठी एका नदीच्या किनाऱ्यावर जातो. त्या ठिकाणी एका जागी गांवातल्या स्त्रिया दगडावर आपटून कपडे धूत असतात. ज्या दगडांवर कपडे आपटले जात असतात ते गुळगुळीत झालेले असतात, तर आजूबाजूचे इतर दगड खडबडीत राहून त्यांचे कंगोरे दिसत असतात. “जर कापडाने ठोकून दगडाचा आकार बदलत असेल तर ज्ञानाचे घांव घालून आपले मठ्ठ डोके कां सुधारणार नाही?” असा विचार त्याच्या डोक्यात चमकतो आणि तो अत्यंत कष्टाने ज्ञानार्जन करून शास्त्रार्थ जाणणारा पंडित होऊन परत घरी येतो. आल्या आल्या त्याची पत्नी त्याला  “अस्ति कश्चित वागार्थः।”  (” कांही अर्थपूर्ण बोलणार आहेस का?” साध्या भाषेत सांगायचे तर “तुला बोलायला तोंड तरी आहे का?”) असे विचारते. यातील  अस्ति,  कश्चित आणि वागार्थः या तीन शब्दांनी सुरू होणारी कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश ही तीन दीर्घकाव्ये रचून तो तिला चोख उत्तर देतो. असे दुसऱ्या एका गोष्टीत सांगतात.

——–
२. कालिदासाचा परीसस्पर्श (अभिज्ञान शाकुंतल)

Raja_Ravi_Varma_-_Mahabharata_-_Shakuntala

आषाढ महिन्याच्या प्रतीपदेला म्हणजे आषाढस्य प्रथम दिवसे कविकुलगुरू कालीदास दिन साजरा केला जातो. आता आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याच्याबद्दल लिहिलेले लेख या स्थानावर सादर करत आहे. मागे एका कालिदास दिनाच्या निमित्याने ‘हितगुज’च्या बैठकीत प्रा. विक्रम आपटे यांनी या विषयावर अत्यंत सुरेख आणि रसाळ असे व्याख्यान दिले होते त्याचा हा गोषवारा.

कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल हे नाटक जगप्रसिध्द आहे. एक अजरामर अशी ‘ऑल टाइम ग्रेट’ समजली जाणारी ही साहित्यकृती आहे. मात्र याची मूळ कथा कांही कालीदालाने स्वतः रचलेली नाही. किंबहुना त्याची सर्वच नाटके पौराणिक कथांवर आधारलेली आहेत. शेक्स्पीअरची नाटकेसुध्दा अशा इतरांनी सांगितलेल्या गोष्टींवरच रचलेली आहेत. पण मूळ कथाबीजांचा या महान लेखकांनी आपल्या कल्पकतेने आणि प्रतिभेने कसा विस्तार केला यावरून त्यांचे आगळेपण दिसते.

महाभारतात दुष्यंत शकुंतला आख्यानाची जी कथा दिली आहे तिच्यानुसार दुष्यंत राजा शिकार करता करता कण्व मुनींच्या आश्रमापाशी येतो. मुनींचे दर्शन घेण्यासाठी तो आश्रमात जातो तेंव्हा मुनी समिधा गोळा करून आणण्यासाठी अरण्यात गेले असतात. त्यांची मानसकन्या शकुंतला दुष्यंताचे स्वागत करते, प्रथमदर्शनीच दुष्यंत तिच्या प्रेमात पडून तिला लग्नाची मागणी घालतो. पण “माझ्या पुत्राला तुझ्या पश्चात राज्याधिकार देणार असशील तरच मी लग्नाला तयार आहे.” अशी अट शकुंतला त्याला घालते. कामातुर राजा ही अट त्या क्षणी मान्य करतो आणि त्यांचा गांधर्वविवाह होतो. शकुंतलेला सन्मानाने राजवाड्यात बोलावून घेण्याचे आश्वासन देऊन दुष्यंत परत निघून जातो. परंतु तो आपले वचन पाळत नाही. शकुंतला कण्व मुनींच्या आश्रमातच एका पुत्राला जन्म देते आणि त्याचे नांव सर्वदमन असे ठेवते. तो सहा वर्षांचा झाल्यानंतर ती त्याला दुष्यंत राजाकडे घेऊन जाते. शकुंतलेचे म्हणणे साफ नाकारून दुष्यंत तिचा स्वीकार करत नाही. यावर ती रागाने थयथयाट करते आणि “असला खोटारडा आणि विश्वासघातकी माणूस तुमचा राजा कसा झाला? ” असा प्रश्न त्याच्या दरबारातील मंडळींना करते. पण तरीही दुष्यंत तिला दाद देत नाही. ती निराश होऊन परत फिरते तेवढ्यात “शकुंतला हीच दुष्यंताची पत्नी आहे आणि तिचा मुलगा राजपुत्रच आहे. ” अशी आकाशवाणी होते.  ती ऐकल्यावर मात्र दुष्यंत राजा “आपल्याला सगळे आठवत होते, पण प्रजा काय म्हणेल? असा विचार करून आपण ते विसरल्याचे नाटक केले.”  अशी सारवासारवी करतो आणि शकुंतलेचा तिच्या मुलासह जाहीरपणे स्वीकार करतो.

या मूळ गोष्टीवर नाटक लिहिण्यापूर्वी कालिदासाने सखोल विचार करून त्यात अनेक फेरफार केले. अट घालून लग्नाला तयार होणारी शकुंतला आणि दिलेले वचन मोडणारा दुष्यंत त्याला पसंत नव्हते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार नाटकांचे नायक व नायिका हे धीरोदात्त, निष्कलंक, चारित्र्यवान, सद्गुणी, समाजाला आदर्श वाटावा असे हवेत. त्यांचे निखळ प्रेम मनापासून केलेले असले पाहिजे. त्यात नफ्यातोट्याचा हिशोब असू नये. त्यांनी हेतुपुरःसर स्वार्थ किंवा ढोंग करणे उचित नव्हते. यामुळे अनेक उपकथानके आणि प्रसंग रंगवून, काल्पनिक पात्रे टाकून कालिदासाने हे नाटक निर्माण केले. त्याचे नांव ‘ अभिज्ञान शाकुंतल’ म्हणजे ‘शकुंतलेची ओळख’ असे ठेवून त्यात शकुंतलेची ओळख पटणे याला केंद्रस्थानी धरले. यासाठी त्याने कोणते महत्वाचे बदल केले ते पाहू.

सुरुवातीलाच राजा दुष्यंत शिकार करण्यासाठी वनात हिंडत असतांना एका सुंदर हरिणावर नेम धरून बाण सोडणार असतो तेवढ्यात ते हरिण कण्वमुनींच्या आश्रमातले असल्याचे कोणीतरी त्याला सांगतो. “मी इथला राजा आहे, मला पाहिजे ते मी करीन.”  असा उन्मत्तपणा न दाखवता तो धनुष्यावर चढवलेला बाण मागे घेतो आणि अंगावरील राजवस्त्रे, अलंकार वगैरे उतरवून ठेऊन साध्या कपड्यात कण्वमुनींची भेट घेण्यासाठी आश्रमात जातो. इथेच दुष्यंताच्या व्यक्तीरेखेला सुसंस्कृततेची झालर लावणे सुरू होते. मूळ कथेनुसार समिधा आणण्यासाठी कण्वमुनी रानात गेलेले असतात. पण हे काम तासा दोन तासात पूर्ण होण्यासारखे आहे. दुष्यंत व शकुंतलेची भेट, प्रेम आणि मीलन या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी एवढा वेळ पुरेसा नाही. म्हणून कण्वमुनींना कुठले तरी व्रत करण्यासाठी एका तीर्थक्षेत्राला पाठवून देतो आणि आपल्याला हवे तेवढे प्रसंग नाटकांत घालण्याची सोय कालिदास करून घेतो.

दुष्यंत आणि शकुंतलेची भेट घडवून आणण्यासाठी कालिदासाने मोठ्या चतुराईने एक काव्यमय प्रसंग रंगवला भहे. शकुंतला वेलीवरची फुले तोडीत असतांना राजा दुष्यंत झुडुपांमागून तिला पहात असतो पण आपण होऊन पुढे होण्यात त्याला संकोच वाटत असतो. त्याच वेळी एक भ्रमर शकुंतलेच्या मुखकमलाजवळ फेऱ्या घालून तिला हैराण करतो. “याच्या त्रासातून कुणीतरी मला सोडवा गं.” असे ती आपल्या सख्यांना सांगते. त्यावर एक सखी म्हणते, “शत्रूपासून तुझे संरक्षण करणे हे तर राजाचे काम आहे.”  झाले, लगेच झुडुपाआडून निघून समोर येण्यासाठी दुष्यंताला चांगले निमित्य मिळते.  तो त्या भुंग्याला पिटाळून लावून शकुंतलेला त्याच्या त्रासातून मुक्त करतो आणि नकळतच आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गुंतवतो.

शकुंतलेच्या ओढीमुळे दुष्यंताला तिकडून परत राजधानीकडे फिरायचे नसते, पण कण्व मुनींच्या आश्रमात तो थांबणार तरी कसा? यावर कालिदासाने तोड काढली. कण्वमुनींचे शिष्यच ते करत असलेल्या यज्ञकर्मांचे राक्षसांपासून संरक्षण करण्याची विनंती दुष्यंताला करतात आणि तो एका पायावर तयार होऊन त्यासाठी स्वतः जातीने तेथे थांबतो. दुष्यंताचे मन तर प्रथमदर्शनी शकुंतलेवर जडलेले असते पण तिच्या मनात काय आहे हे त्याला कसे समजणार? त्याला भेटून जातांजाता तिच्या मनगटाला बांधलेली फुलांची माळ गळून पडते आणि ती आणण्याचे निमित्य करून ती त्याच्याकडे परत येते. यावरून दुष्यंत त्याला जे समजायचे असते ते समजतो आणि त्यांचे मनोमीलन होते.

पण कांही झाले तरी राजा आपल्या राज्याचा कारभार सोडून किती दिवस दूर राहणार? दुष्यंताला माघारी तर जावेच लागते. शकुंतलेला आणा भाका वचने वगैरे देऊन तो परत जातो. जाण्यापूर्वी आपली आठवण म्हणून आपली अंगठी तिच्या बोटात घालतो. आता यापुढे कथाभागाप्रमाणे या प्रेमिकांचा विरह व्हायला हवा. तो घडवून आणण्यासाठी कालिदासाने दुर्वासमुनींना नाटकात आणले. दुष्यंताच्या आठवणीत मग्न असल्यामुळे शकुंतलेला दुर्वास मुनी आश्रमात आलेले समजतच नाही. या अपमानाने क्रुध्द झालेले दुर्वास मुनी “ज्याच्या आठवणीत तू एवढी हरवून गेली आहेस तोच तुला विसरून जाईल.” असा शाप शकुंतलेला देतात. तिला बिचारीला ते ही समजत नाही. पण तिच्या सख्य़ा तिच्या वतीने रदबदली करून मुनींकडून उःशाप मागून घेतात. दुष्यंताचीच शकुंतलेकडील एकादी वस्तू त्याला दिसली तर त्याची स्मृती जागी होईल असा तो उःशाप असतो. त्यामुळे सखी निर्धास्त होतात आणि शकुंतलेला यातले कांही सांगत नाहीत.

कण्वमुनी तीर्थक्षेत्राहून परत आल्यानंतर त्यांना सर्व हकीकत समजते. शकुंतला गर्भवती असल्यामुळे आता तिने पतीच्या घरी जाणेच श्रेयस्कर असते. “अर्थोहि कन्या परकीय एव।” याची जाणीव होताच ते तिची सासरी पाठवणी करायचे ठरवतात. शकुंतला तर कधी दुष्यंताचे बोलावणे येईल याची आतुरतेने वाट पहात असते, पण दुर्वासांच्या शापवाणीमुळे त्याला शकुंतलेचे विस्मरण झालेले असते. अखेर आश्रमातील दोन शिष्यांना सोबतीला घेऊन शकुंतला हस्तिनापुराला जायला निघते. त्यावेळी कण्वमुनींची तर दाटून कंठ येतो अशी अवस्था होतेच पण आश्रमातील हरिणी आणि इतर प्राणीच नव्हे तर फुलझाडेसुध्दा गद्गदून जातात असे हृद्य दृष्य कालिदासाने उभे केले आहे.

दुर्वास मुनींच्या शापाच्या प्रभावाखाली असल्यामुळे दुष्यंताला शकुंतलेची ओळख पटत नाही. तिचे सौंदर्य पाहून तिला स्वीकारण्याचा मोह त्याला क्षणभर होतो, पण ती गर्भवती आहे याचा अर्थ आधीच ती दुसऱ्या कोणाची झालेली आहे हे पाहून तो आपल्याला झालेला मोह टाळतो. अशा प्रकारे त्याचे उदात्तीकरण केलेले आहे. दुष्यंताने दिलेली अंगठी त्याला दाखवावी म्हणून ती नाट्यमय पध्दतीने आपला पंजा पुढे करते आणि बोटात अंगठी नसल्याचे पाहून तिला धक्का बसतो. तिने सांगितलेल्या आपल्या कर्मकथेतले कांहीच आठवत नसल्याचे दुष्यंत सांगतो.

दुष्यंत राजाने न स्वीकारल्यानंतर शकुंतलेने कुठे जायचे हा प्रश्न उभा राहतो. तिचे म्हणणे खरे असेल तर तिने कसेही पतीकडेच राहिले पाहिजे आणि दुष्यंताचे सांगणे खरे असेल ती कुलटा ठरते आणि त्यामुळे आश्रमात जाऊन राहू शकत नाही. या दुविधा अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी दुष्यंताचा अमात्य तिला आपल्या घरी घेऊन जातो आणि तिचे संगोपनाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. पण शकुंतलेची माता मेनका स्वर्गातून पृथ्वीवर अवतरते आणि तिला उचलून घेऊन जाते. आकाशातून दिव्य विजेचा लोळ खाली उतरला आणि शकुंतलेला घेऊन अदृष्य झाला एवढेच त्याला दिसते आणि तो दिग्मूढ होऊन जातो.  शकुंतलेच्या बाबतीत कांही तरी अद्भुत आहे एवढे अमात्याला समजते पण त्याला कांहीच करता येण्यासारखे नसते.

कांही दिवसांनी राजदूत एका कोळ्याला पकडून दुष्यंताच्या समोर आणतात. त्याने राजाची अंगठी चोरली आहे असा आरोप त्याच्यावर असतो. त्याचे असे झाले असते की सासरी जात असतांना वाटेत एक नदी लागते. नांवेत बसून ती पार करत असतांना शकुंतला पाण्यात हात घालून मजेत तो हलवण्याचे चाळे करीत असते. त्या वेळी ती अंगठी तिच्या बोटातून निसटून केंव्हा पाण्यात पडते ते तिलाही समजत नाही. त्यावेळी तिथून जात असलेला एक रावस मासा ती अंगठी गिळतो. आणि ती अंगठी त्याच्या पोटात जाते. एक कोळी त्या माशाला जाळ्यात पकडून घरी नेतो. खाण्यासाठी तो मासा कापताच ती अंगठी त्याला सापडते. नदीमातेनेच आपल्याला हे धन दिले अशा समजुतीने तो कोळी ती अंगठी विकण्यासाठी बाजारात घेऊन जातो. त्यावरील राजमुद्रा पाहताच ती अंगठी राजाचीच आहे हे सराफ लगेच ओळखतो आणि त्या कोळ्याला शिपायांच्या स्वाधीन करतो. कोळ्याच्या सांगण्यावर कोणीच विश्वास ठेवीत नाही आणि प्रत्यक्ष राजाचाच अपराध त्याने केला असल्याने राजानेच त्याला दंड करावा म्हणून ते त्याला दुष्यंताच्या समोर उभे करतात.

दुर्वास ऋषींनी दिलेल्या उःशापानुसार ती अंगठी पाहताच दुष्यंताला सारे कांही एकदम आठवते आणि शकुंतलेच्या विरहाने तो व्याकुल होतो. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण ती अदृष्य झाली आहे एवढेच त्याला समजते. पश्चात्ताप दग्ध झाल्यामुळे त्याला राज्यकारभारातही रस रहात नाही आणि तो सैरभैर होऊन जातो. याच अवस्थेत फिरत असतांना एक चमत्कार घडतो. एक दिवस त्याचा विदूषक मित्र अचानकपणे हवेत तरंगू लागतो. “ही कसली गंमत आहे?”  असे विचारताच तो सांगतो, “मी आपल्या मनाने उडत नाही आहे. कोणीतरी मला हवेत वर उचलत आहे.” त्याला वाचवण्यासाठी दुष्यंत आपले धनुष्य आणि बाणांचा भाता घेऊन येतो आणि अदृष्य अशा शक्तीला मारण्याचे अस्त्र धनुष्यावर चढवतो. ते पाहताच इंद्राचा सारथी मातली तिथे प्रकट होऊन दुष्यंताला वंदन करून सांगतो, “हे राजन, इंद्रावर कोण्या बलाढ्य असुराने हल्ला केला असून त्याला तुमच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला नेण्यासाठी मी इथे आलो आहे.” हे ऐकून दुष्यंताचा क्षात्रधर्मजागा होतो आणि तो मातलीबरोबर युध्दाला निघून जातो.

दैत्याचे पारिपत्य करून पृथ्वीकडे परततांना त्याला एक अत्यंत रमणीय अशी जागा दिसते म्हणून तो मातलीला आपला रथ तिकडे न्यायला सांगतो. मारिच ऋषी आणि त्यांची पत्नी आदिती यांचा आश्रम तिथे असतो. आश्रमात गेल्या गेल्या दुष्यंताला एक लहानगे मूल सिंहाच्या छाव्याबरोबर खेळतांना दिसते. दोन्ही हातांनी त्याचा जबडा उघडून त्याला सिंहाच्या छाव्याच्या तोंडातले दांत मोजायचे असतात. त्या मुलाच्या या अजब हट्टाने त्याच्याबरोबर असलेली आश्रमकन्या भयभीत होऊन ” या मुलाला कांही तरी समजाऊन सांगा”  असे दुष्यंताला सांगते. त्या बालकाला पाहून दुष्यंताच्या मनात प्रेमाचे भरते येते आणि तो त्याच्याशी संवाद करू लागतो. इतक्यात दुसरी एक आश्रमकन्या तिथे येते. बाजूच्या झाडावर बसलेल्या शकुंत पक्ष्याला पाहून ती आपल्या सखीला “पश्य शकुंतलावण्य। ”  असे म्हणते. त्यातील शकुंतला एवढे ऐकताच चमकून तो मुलगा “माझी आई कुठे आहे?” असे विचारतो. ते ऐकताच दुष्यंत राजा चपापतो. “हा मुलगा आपला तर नाही ना?” असा विचार त्याच्या मनात चमकतो.

त्याच वेळी आणखी एक घटना घडते. त्या बालकाच्या दंडाला बांधलेला मंतरलेला ताईत निसटून खाली पडतो. जमीनीवरून तो उचलून पुन्हा त्या मुलाच्या दंडात बांधण्यासाठी दुष्यंताने खाली वाकताच ती आश्रमकन्या त्याला ओरडून थांबायला सांगते. त्या ताइतात अशी जादू असते की त्या बालकाचे माता आणि पिता याखेरीज इतर कोणीही त्याला स्पर्श करताच त्याचे रूपांतर एका विषारी सर्पात होऊन तो त्या माणसाला दंश करेल. पण दुष्यंताला थांबवण्याच्या आधीच त्याने तो उचललेला असतो आणि त्याचा साप बीप कांही होत नाही हे पाहून त्या आश्रमकन्येला आश्चर्य वाटते. एवढ्यात प्रत्यक्ष शकुंतला तेथे येते. तिच्याशी नजरानजर होताच दुष्यंत अत्यंत खजील होऊन तिची माफी मागतो. झाल्या प्रकाराबद्दल शकुंतला त्याला दोष देत नाही. “कदाचित विधीलिखितच असे असेल आणि त्याप्रमाणे घटना घडत गेल्या असणार” असे ती शांतपणे सांगते. एवढ्यात मारिच ऋषी तिथे येतात आणि हे सगळे दुर्वासमुनींच्या शापामुळे घडले असल्याचे त्यांनी सांगितल्यावर कोणाच्याही मनात किंतू रहात नाही आणि नाटकाचा पडदा पडतो.

अशा प्रकारे एका साध्या कथेला कालिदासाने अत्यंत रोचक बनवले आहे आणि त्यातल्या अनेक प्रसंगांचे धागे एकमेकांबरोबर व्यवस्थित जुळवले आहेत. त्यात अनेक व्यक्तीरेखा त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांसह समर्थपणे उभ्या केल्या आहेत. कोणाच्याही वागण्यात विसंगती नाही, कोणीही दुष्टपणाने वागत नाही, कसलेही कपट कारस्थान नाही, तरीही नाटकाची कथा रहस्यमय पध्दतीने उलगडत जाते. यातून चांगल्या वर्तनाचे वस्तूपाठ मिळतात, प्रणयातला शृंगाररस, भावनातिरेकाचा करुण रस आणि इतर रसांचा अनुभव येतो. हे सगळे कालिदासाच्या परीसस्पर्शामुळे घडते.
—————–

३.मेघदूत

Kalidasa_inditing_the_cloud_Messenger,_A.D._375

“आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।”  या मेघदूतातल्या श्लोकावरून दर वर्षी आषाढ महिन्याच्या प्रतीपदेला म्हणजे आषाढस्य प्रथम दिवसे कविकुलगुरू कालीदास दिन साजरा केला जातो.

मालविकाग्नीमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञानशाकुंतल ही तीन नाटके आणि  अस्ति,  कश्चित आणि वागार्थः या तीन शब्दांनी सुरू होणारी कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश ही तीन दीर्घकाव्ये कालिदासाने लिहिली. त्याच्या तीनही नाटकांमध्ये त्यांमधील कथेला अनुसरून अनेक रोचक किंवा मनोरंजक प्रसंग त्याने अनुपम कौशल्याने रंगवले आहेत. रघुवंश या महाकाव्यात राघवाच्या (श्रीरामाच्या) वंशातल्या अनेक पिढ्यांमध्ये होऊन गेलेल्या सम्राटांची चरित्रे आहेत. शंकर आणि पार्वती यांच्या प्रेमाच्या कहाण्या कुमारसंभव या महाकाव्यात आहेत. त्यात दक्षकन्या उमा आणि हिमालय पर्वताची पुत्री गिरिजा किंवा पार्वती अशा दोन जन्मात तिने केलेली शंकराची खडतर आराधना,  महादेवाने तिचा स्वीकार करणे, त्यांचे मीलन आणि कार्तिकेयाचा जन्म याची सुरस कथा आहे. मेघदूत हे काव्य मात्र या सर्वांहून वेगळे आहे. सांगण्यासारखी कथा अशी या खंडकाव्यात नाही.

कुबेराची सेवा करणारा एक यक्ष आपल्या प्रिय पत्नीच्या प्रेमात (किंवा बाहुपाशात) इतका गुरफटलेला असतो की त्यामुळे त्याच्या हातून धन्याच्या सेवेत अक्षम्य कुचराई होते. त्याच्या अशा उद्दंडपणाच्या वर्तनामुळे कुबेर संतापतो आणि त्या यक्षाला वेगळ्याच प्रकारची शिक्षा देतो. त्या शिक्षेप्रमाणे एक वर्षभर त्याने दूर रामगिरीवरील आश्रमात रहायचे आणि त्याच्या पत्नीने मात्र हिमालयातील यक्षांच्या अलकानगरीतील घरी रहायचे अशी आज्ञा त्याला होते. असल्या ‘पनिशमेंट पोस्टिंग’वर गेलेला बिचारा यक्ष पत्नीचा विरह मोठ्या कष्टाने कसाबसा सहन करत असतो. गोष्टीची ही सगळी पार्श्वभूमी मेघदूताच्या पहिल्या श्लोकात सांगून टाकली जाते.

कश्चित्कान्ताविरहगुरूणा स्वाधिकारात्प्रमत्तः शापेनास्तङ्गणितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरूषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।। १ ।।

जानकीने (सीतेने) या जागी स्नान केल्यामुळे पावन झालेल्या जलाशयाच्या कांठावरील स्निग्ध छाया देणा-या वृक्षराजीमध्ये तो आश्रम आहे असे रामगिरी येथील आश्रमाचे काव्यमय वर्णन कालिदासाने या श्लोकात केले आहे. एवढी प्रस्तावना करून कालिदास मुख्य मुद्यावर येतो.

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।

पत्नीच्या विरहाच्या वेदनेने यक्ष दिवसमास खंगत असतो आणि त्याच्या सुकलेल्या दंडावरील सोन्याची वलये खाली ओघळत असतात. अशा कृष्ट अवस्थेत असतांना आषाढ महिन्याच्या प्रतिपदेला त्याला आभाळ काळ्या ढगांनी दाटलेले दिसते. त्या मेघराजाला पाहताच तो मीलनोत्सुक आणि मदोन्मत्त असा हत्ती आहे असा भास त्याला होतो आणि त्याच्या मनातली प्रियेबद्दल वाटणारी आसक्ती उफाळून वर येते. उन्हाळ्याची रखरख संपून पावसाळी ढगाळ वातावरण निर्माण होताच त्या यक्षाला आपल्या पत्नीची जास्तच प्रकर्षाने आठवण येते. कांही करून आपण तिच्याबरोबर संपर्क साधलाच पाहिजे असे त्याला तीव्रतेने वाटू लागते. पण तो काय करू शकणार होता? त्या काळात सेल फोन, एसटीडी, आयएसडी, इंटरनेट चॅटिंग, ईमेल, स्क्रॅप असले कांही नव्हते. चिठ्ठी नेऊन पोचवणारा पोस्टमन नव्हता. सांडणीस्वार, संदेशवाहक कबूतरे वगैरे साधने एका यःकश्चित सेवकाला परवडणारी नव्हती आणि असली तरी त्यांची रेंज हिमालयापर्यंत असणार नाही. अशा अवस्थेत आकाशमार्गे उत्तरेच्या दिशेने जात असलेल्या मेघाला पाहून यक्षाच्या मनात आशेचा किरण फुटला. “हा निर्जीव वाफेचा पुंजका मला काय समजून घेणार आहे आणि माझा कोणता संदेश घेऊन जाणार आहे?” असली शास्त्रीय शंका त्याच्या हळुवार मनाला शिवली नाही कारण “मदनबाणांनी विध्द झालेल्या पुरुषाची विवेकबुध्दी जागेवर नसते.” असे कालिदासानेच पुढे नमूद केले आहे.

त्यामुळे असला रुक्ष विचार करत न बसता त्या मेघालाच दूत ठरवून आपले मनोगत त्याच्यापुढे व्यक्त करायचे आणि हा संदेश अलकापुरीमध्ये रहात असलेल्या आपल्या प्रियपत्नीला पोचवण्याची विनंती त्याला करायची असे तो यक्ष ठरवतो. आधी त्या मेघाची तोंडभर स्तुती करून त्याला आपला मित्र बनवतो. आपल्या मनातल्या पत्नीबद्दल वाटणाऱ्या प्रेमभावनांना शब्दात व्यक्त करतो. विरहामुळे आपण किती व्याकुळ झालो आहोत ते सांगतो. रामगिरीपासून अलकापुरीचा मार्ग कसा कसा जातो, वाटेत कोणते पर्वत, नद्या, अरण्ये,  कोणकोणती रम्य नगरे आणि स्थळे लागतील त्यांचे रसभरित वर्णन करतो. वाटेत कांही सुंदर कृषीवलकन्या तुला पाहून हर्षभरित होतील, पण तू मात्र त्यांच्या नादी लागून आपल्या मार्गावरून विचलित व्हायचे नाहीस अशी त्याची थट्टा करतो. अखेरीस अलकापुरी आल्यानंतर ती सुंदर नगरी कशी दिसेल याचे सुरेख वर्णन करतो. तिथे आपली पत्नी आपल्या वाटेवर डोळे लावून बसलेली असेल असे सांगून तिच्या मनात कोणत्या भावनांचे वादळ उठलेले असेल याचे वर्णन करतो. तिच्या रूपाचे वर्णन तर आलेच. अखेर आपला निरोप तिला देऊन तिचे कुशलमंगल वृत्त माझ्यापर्यंत आणून पोचव अशी परोपरीने त्या मेघाची विनवणी करतो.  तसेच तू माझ्यासाठी हे नाजुक काम करशीलच असा विश्वास दाखवतो.

अशा प्रकारे हे कथाकथन नसलेले विशुध्द काव्य आहे. मेघाला दूत बनवून त्याच्यामार्फत संदेश पाठवण्याची कल्पनाच भन्नाट आहे. तिचा विस्तार करतांना निसर्गातील सौंदर्यस्थळे आणि मनातील नाजुक तसेच उत्कट भावना यांना कालिदासाने आपल्या अलौकिक प्रतिभेने शब्दबध्द केले आहे. या काव्यातील एक एक उपमा, उत्प्रेक्षा, रूपके पाहता “उपमा कालिदासस्य”  असे कां म्हणतात ते पटते. या काव्यासाठी कालिदासाने मंदाक्रांता हे वृत्त निवडले आहे. या वृत्तात ला ला ला ला अशी संथ सुरुवात करून लललललला अशी जलद लय येते आणि ला ललाला ललाला अशी ती दुडक्या चालीने संपते.  आजच्या काळातले संगीतकार मेघदूतातील नादमय शब्दांना यमन, केदार आदि रागांच्या सुरात गाऊन अधिकच मजा आणतात. हजार वर्षाहून अधिक काळ टिकून राहिलेली मेघदूताची जादू पुढेही अनंत काळपर्यंत रसिकांच्या मनाला मोहिनी घालत राहील यात शंका नाही.

———————————

One Response

  1. […] कविकुलगुरु कालिदास आणि त्याचे साहित्य यांची ओळख करून देणारे माझे लेख इथे वाचावेत – आनंद घारेhttps://anandghare2.wordpress.com/2010/09/09/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-… […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: