कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प ३

इंग्लंडमध्ये प्रत्येक प्रेक्षणीय स्थळ पाहून झाल्यावर बाहेर निघण्याच्या वाटेवर नेहमी दोन प्रशस्त दालने दिसतात. एका ठिकाणी उपाहारगृह असते तर दुस-यात अनेक प्रकारचे सोव्हेनीर्स विकायला ठेवलेल्या असतात. त्या स्थळी असलेल्या कलाकृतींच्या प्रतिकृती, छायाचित्रे, ग्रीटिंग कार्डे व त्यांचेशी संबंधित चित्रे छापलेली त-हेत-हेची स्मृतिचिन्हे तेथे मांडून ठेवलेली दिसतात. वेगवेगळ्या आकारांचे शो पीसेस तर असतातच, लहान मुलांसाठी रबर, पेन्सिली, फूटपट्ट्या पासून ते मोठ्या माणसांचे टी शर्ट्स, थैल्या, चादरी, गालिचे व रोज वापरावयाचे मग्स, बाउल्स, डिशेस अशा विविध वस्तु तिथे असतात. अनेक ठिकाणी अंगठ्या, पदके, बिल्ले वगैरे अलंकारही दिसतात.

भारतात गणपतीचे चिन्ह असलेल्या अशा त-हेच्या वस्तूंचे मार्केटिंग प्रचंड प्रमाणात होते. मुंबईसारख्या शहरांत प्रमुख देवस्थानांच्या आजूबाजूला अशी दुकाने आहेतच, भेटवस्तूंच्या इतर दुकानांतसुध्दा गणपतीच्या प्रतिमा ठळकपणे दिसतात. गणेशचतुर्थीचे सुमारास मोठमोठाली खास प्रदर्शने भरतात व त्यात भारताच्या विविध राज्यामधून आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती विकतात. सिंहासनावर बसलेली रेखीव मूर्ती तर आहेच, त्यांतही गणपतीची मुद्रा, पीतांबर, अंगावरील दागदागीने, हातांत धरलेली शस्त्रास्त्रे, सिंहासनावरील नक्षीकाम यांत सूक्ष्म फरक करून वेगळेपण आणलेले असते. त्याशिवाय उभा ठाकलेला, कुशीवर झोपलेला, आपल्या लाडक्या वाहनावर आरूढ झालेला अशा कितीतरी अवस्थांमधील मूर्ती असतात. गणपती हा कलांचा देव आहे हे दर्शवणारी लेखक, वादक, नर्तक ही विलोभनीय रूपे आजकाल विशेष लोकप्रिय आहेत. तबला, पेटी, सारंगी, पांवा, झांजा वगैरे वादकांच्या रूपातील गणेशांचा संचच मिळतो तसेच आपली तुंदिल तनु सांवरीत अगदी कथ्थक ते दांडिया रास गरब्यापर्यंत नर्तनाच्या विविध मुद्रा दाखवणारी गोंडस रूपेही असतात. शिवाय क्रिकेटपटु, संगणक चालवणारा, शाळकरी मुलगा, रांगणारे बाळ अशी गोड चित्रे कुठे कुठे दिसतात.

ज्या पदार्थापासून ही चित्रे बनतात त्यात मोठे वैविध्य दिसते. आजकाल सर्वाधिक मूर्ती प्लॅस्टर आफ पॅरिस व प्लॅस्टिकमध्ये असतात, पूर्वी दगडाच्या किंवा लाकडाच्या असायच्या. आताही असतात, त्यांतही रोजवुड, चंदन, शिसवी वगैरे विविधता. चिकणमातीचे टेराकोटा आणि विशिष्ट मातीचे सिरॅमिक हे भट्टीत भाजलेले लोकप्रिय प्रकार आहेत. त्याशिवाय विविध धातु, पेपर मॅशे, कांच, पोर्सेलीन, फायबर, रेझिन, कापड, कापूस, काथ्या, ज्यूट वगैरे ज्या ज्या पदार्थापासून कोठलीही वस्तु बनवता येऊ शकेल अशा प्रत्येक पदार्थाचा गणेशाच्या प्रतिमा बनवण्यासाठी कोणीतरी वापर करतो. आणि या सा-याच वस्तु आपापल्या परीने अतीशय सुंदर दिसतात.  नऊ प्रकारची धान्ये किंवा फळभाज्या, पालेभाज्या यांपासून सुध्दा गणेशाची प्रतिमा बनवतात तर कांही मूर्तींवर वाळूचे बारीक कण चिकटवून एक वेगळाच लूक् आणलेला असतो. कांही मूर्ती नाजुक मीनाकारीने मढवलेल्या असतात.

या वस्तु अक्षरशः अगणित प्रकारच्या असतात.  शो केसमध्ये ठेवायच्या मूर्ती वेगळ्या आणि पेडेस्टलवर बसवायच्या वेगळ्या, मोटारीत डॅशबोर्डावर ठेवायच्या त्याहून निराळ्या. भिंतीवर लटकवायच्या संपूर्ण त्रिमिति आकृत्या असतात किंवा नुसतेच मुखवटे. कागद, कापड किंवा ज्यूटपासून बनवलेले वॉल हँगिंग्ज वेगळेच.  त्यावरही रंगकाम, विणकाम व भरतकामाची वेगवेगळी कलाकुसर असते. कधी कधी कौशल्यपूर्ण विस्तृत बारीक काम केलेल्या पूर्णाकृती असतात तर कुठे फक्त चार पांच वक्र रेषांमध्ये किंवा साध्या त्रिकोण, चौकोनांच्या रचनेतून त्याचा आकार दाखवलेला असतो आणि कुठे फक्त सोंड व दात दाखवून त्याचा आभास केलेला. गजाननाचे चित्र असलेले खिशांत ठेवायचे किल्ल्यांचे जुडगे तसेच ते भिंतीवर टांगायचा स्टँड दोन्ही असतात. घड्याळे तर सर्रास दिसतात. सराफांच्या दुकानांत दागदागिन्यांबरोबर सोन्याचांदीच्या वस्तूही ठेवलेल्या असतात, त्यात देवदेवतांच्या प्रतिमासुध्दा असतात. दिवाळीमध्ये पूजेसाठी लक्ष्मीचे चित्रांची नाणी घेतात. तशीच गणपतीचे किंवा लक्ष्मी, सरस्वती, गणपती या त्रयींचे शिक्के पण असतात. गणेशाच्या विविध मुद्रांमधील मूर्तीसुध्दा ठेवतात. आजकाल गणपतीच्या हिरेजडित प्रतिमा निघाल्या आहेत. अशी कुठकुठली किती रूपे वर्णावीत?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: