कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प १- २

       

कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प

कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे । कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे ।।
असे कवीवर्य यशवंत देव यांनी देवाला म्हणजे परमेश्वराला म्हंटलेले आहे. पण श्रीगणेशाला मात्र त्याचे भक्तगण अनेक रूपांत नुसते पाहतातच नव्हे तर त्याच्या विविध रूपांमधील प्रतिकृती बनवून त्याची आराधना करतात. अशाच कांही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीबद्दल मी आणि आपण जे रोज वाचतो त्यातलंच थोडे सांगणार आहे.

आपल्याकडे देवदेवतांच्या भिन्न प्रकारच्या मूर्ती असतात. कायम स्वरूपाच्या मूर्तींची देव्हा-यात व देवळांत स्थापना करून त्यांची पिढ्या न पिढ्या, वर्षानुवर्षे पूजा केली जाते. या मूर्ती दगडांपासून किंवा धातूंच्या बनवलेल्या असतात. वातावरणातील आर्द्रता आणि रोजच्या धुण्यापुसण्याने त्यांची झीज न होता त्या दीर्घकाळ टिकतात.  बहुतेक मूर्ती घडवतांना त्यांना सुबक आकार दिलेले असतात. कांही विवक्षित ठिकाणी सापडणा-या खड्यांना वा गोट्यांना विशिष्ट देवतांचे प्रतिनिधी मानले जाते तर कांही ठिकाणी सर्वसामान्य दिसणा-या दगडांना शेंदूर माखून देवत्व प्रदान केले जाते.  शेवटी “भाव तेथे देव” असतो म्हणतात. नैसर्गिक रीत्याच श्रीगणपतीचा थोडाफार भास होत असणा-या स्वयंभू मूर्तीसुध्दा अनेक जागी पहाण्यात येतात. कधीकधी त्या एखाद्या मोठ्या खडकाचा अभिन्न भाग असतात व त्यांच्या सभोवती देऊळ बांधलेले असते.

बहुतेक देवतांच्या वेगळ्या अशा उत्सवमूर्ती असतात. खास उत्सवप्रसंगी कांही काळासाठी त्यांना देवळातच एका वेगळ्या ठिकाणी आकर्षक रीतीने मांडतात. त्यांना नवनव्या कपड्यांनी सजवतात व दागदागीन्यांनी मढवतात. आजूबाजूला नयनरम्य सजावट करतात. कुठे कुठे त्यांची पालखीमधून किंवा रथातून गाजावाजाने मिरवणूक काढण्यात येते.

मोठ्या देवळांच्या गाभा-यांतील मुख्य देवतेच्या मोठ्या मूर्तीशिवाय आजूबाजूला इतर अनेक देवतांच्या लहान लहान मूर्तींची स्थापना केलेली असते. या शिवाय देवळांच्या भिंती, कोनाडे, शिखरे वगैरेवर देवतांच्या तसबिरी वा प्रतिकृती काढलेल्या असतात. प्रवेशद्वारावर तर गणपतिबाप्पा बसलेले हमखास दिसतात. पूर्वीच्या काळी घरोघरी दिवाणखान्याच्या भिंतीवर मोठमोठी चित्रे लावून ठेवायची पध्दत होती. त्यात गजाननाशिवाय श्रीरामपंचायतन, गोपाळकृष्ण व भगवान शंकर पार्वतीसुध्दा त्या घराण्यातील दिवंगत झालेले पूर्वज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, संत ज्ञानेश्वर, मेनकेसह ऋषि विश्वामित्र, महात्मा गांधी, पंडित नेहरू वगैरेंच्या सहवासात सुखेनैव विराजमान होत. कालानुसार ही प्रथा मागे पडत गेली असली तरी गणपतीच्या प्रतिमा मात्र अनंत रूपाने जागोजागी मांडलेल्या दिसू लागल्या आहेत. किंबहुना तो एक सजावटीचा भागच होऊन बसला आहे.

कुठलीही शुभकार्याची निमंत्रणपत्रिका गणपतीच्या चित्राला मुखपृष्ठावर घेऊन येते. त्याची महती सांगणा-या ध्वनिफिती धडाक्याने विकल्या जातात. अनेक प्रकारच्या वस्तूंच्या जाहिराती गजाननाच्या नांवाने केल्या जातात.

या सगळ्या सहज दिसणा-या रूपांचा थोडक्यात परामर्श पुढील भागांत क्रमशः करायचे योजले आहे.

कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प २

आपल्या देशांत जागोजागी पुरातन देवालये आहेत, नवी नवी बांधली जात आहेत. त्यातील प्रत्येक देवळांत मुख्य गाभा-यात नाहीतर एखाद्या वेगळ्या छोट्या गोभा-यात, निदान एका खास कोनाड्यात कुठेतरी श्रीगजाननाची मूर्ती अवश्य दिसते. आधी त्याला वंदन करूनच भक्तजन पुढे जातात. शिवाय खास गणपतीची वेगळी देवळे आहेतच.  पश्चिम महाराष्ट्रात ती जास्त करून दिसतात. सुप्रसिध्द अष्टविनायक आहेतच, त्यात गणना होत नसलेली पण तितकीच लोकप्रिय अशी टिटवाळा व गणपतीपुळे येथील देवस्थाने आहेत. मुंबईमधील प्रभादेवीच्या सिध्दीविनायकाचा प्रचंड भक्तसमुदाय आहे. त्याशिवाय पुण्याचे कसबा गणपती, तळ्यातला गणपती, सांगलीच्या संस्थानिकांचा गणपती वगैरेंची मंदिरे लोकप्रिय तसेच प्रसिध्द आहेत. ही सर्व जागृत व इच्छित फलदायी देवतांची स्थाने आहेत असा त्यांचा लौकिक आहे व या सर्व स्थानी श्रध्दावान भक्तांची मोठी गर्दी असते.

दोन तीन सन्माननीय अपवाद वगळता यातील बहुतेक ठिकाणच्या मूर्ती स्वयंभू आहेत, अर्थातच त्यांत कोरीव कामाचे कौशल्य नाही. गणपतिपुळ्याला अत्यंत विलोभनीय असा समुद्रकिना-याचा परिसर लाभला आहे. इतर ठिकाणे रम्य असली तरी सृष्टीसौंदर्यासाठी फारशी प्रसिध्द नाहीत. मंदिरांच्या इमारती सुध्दा शिल्पकलेचे नमूने म्हणून पहाण्यासारख्या असल्या तरी मदुराई, रामेश्वरम् येथील मंदिरांसारख्या भव्य दिव्य नाहीत. त्यामुळे तेथे येणारे लोक भक्तीभावनेने येतात, कांहीतरी अद्भुत दृष्य पहायला मिळेल या अपेक्षेने प्रेक्षकाच्या भूमिकेतून येत नाहीत किंवा मौजमजा करण्यासाठी निघालेले प्रवासी इथे येत नाहीत.

बहुतेक सर्व आधुनिक देवळांत, विशेषकरून बिर्लांनी देशात ठिकठिकाणी बांधलेल्या सुंदर मंदिरांमध्ये गजाननाच्या मनोरम अशा प्रतिमा स्थापन केलेल्या दिसतातच पण अशा मंदिरांबाहेर सुध्दा कित्येक ठिकाणी गणपतीच्या सुबक मूर्ती पहायला मिळतात. बहुतेक सा-या पुराणवस्तु संग्रहालयात विनायकाच्या प्राचीन कालीन मूर्ती दिसतातच. कधीकधी एखाद्या मोठ्या होटेलांत, इस्पितळांत किंवा मंगलकार्यालयात  प्रवेशद्वाराजवळ त्याच्या आकर्षक व सुशोभित मूर्तीची स्थापना केलेली पाहून सुखद धक्का बसतो. संगमरवर किंवा गारगोटीच्या शुभ्र दगडामध्ये किंवा काळ्याभोर प्रस्तरात त्यांचे कोरीव काम सुबकपणे केलेले असते. कांही ठिकाणी मिश्रधातूंचे ओतीव काम करून हे शिल्प बनवलेले असते.

आजकाल शोभिवंत वस्तु विकणा-या सा-या दुकानांमध्ये विविध आकारांचे व विविध सामुग्रीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती प्रामुख्याने ठेवलेल्या दिसतात. त्यासंबंधी पुढच्या भागांत पाहू.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: