कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प ५-६

कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प ५

गणपती म्हंटल्यावर एक उत्साहाने ओतप्रोत भरलेली उत्सवमूर्ती डोळ्यापुढे उभी राहते. कुठल्याही कार्याचा शुभारंभ आपण श्रीगणेशायनमः। असे म्हणून गणेशाला वंदन करून करतो. नव्या निवासात प्रवेश केल्यावर आधी त्याची पूजा करून सारे कांही सुरळीत होवो अशी प्रार्थना करतो. सर्व विघ्नांचा नाश करणारा आणि सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी तत्पर असा आपला पाठीराखा अशी त्याची प्रतिमा आहे. प्रत्येक समारंभाचे पहिले निमंत्रण आपण त्याला देतो आणि कार्यक्रमामध्ये त्यालाच अग्रपूजेचा मान देतो. मग त्याचा स्वतःचाच उत्सव म्हंटल्यावर उत्साहाला किती उधाण येईल कांही विचारायलाच नको.

इतर वेळेस आपल्या देवघरांतील देवाच्या मूर्ती थोड्या घासून पुसून चमकवून पूजाविधीसाठी घेतात व पूजाविधी संपल्यावर पुन्हा आपल्या जागेवर नेऊन ठेवतात. पण गणपती उत्सवाला मात्र दरवेळी मूर्ती सुध्दा नवीन हवी आणि तिने उत्सव संपल्यानंतर कुठेतरी अडगळीत जाऊन पडू नये म्हणून तिचे साग्रसंगीत विसर्जन होते. या नवीन मूर्तीला साजेशी आकर्षक सजावट हवीच. ती सुध्दा दरवर्षी उत्साहाने नव्याने केली जाते. या सगळ्या खटाटोपामध्ये किती श्रम व पैसे वाया जातात अशी टीका कांही लोक करतात पण ती गोष्ट तर सा-याच समारंभांना लागू पडते. माणसाला समारंभ साजरे करण्याची एक अंतःप्रेरणा असते त्याची अभिव्यक्ती या ना त्या रूपाने होतच राहणार.

गणपतीच्या आकारातच किती आगळेपणा आहे, मूर्त आणि अमूर्त या दोन्हीचा त्यात समावेश होतो हे आपण पाहिलेच आहे. त्यामुळे उत्सवांसाठी ज्या मूर्ती बनवतात त्यातसुध्दा पराकाष्ठेचे वैविध्य येणारच. इथे तिची प्रत्यक्ष पूजा अर्चना करायची असते, मुळांत मूर्तिपूजेला सुरुवातच या कारणामुळे झाली, त्यामुळे सर्वसामान्य लोक निर्गुण रूपापेक्षा सगुण रूपच अधिक पसंत करतात. तसे पाहिले तर मनुष्याकृतीला चार हात व हत्तीचे मुख जोडणे हे फारसे वस्तुनिष्ठ नाहीच. शिवाय प्रतिभेचे पंख लाभलेले कलाकार साध्या आकृतीला सुध्दा कल्पकतेने अनेक प्रकारची रूपे देतात. वेगवेगळ्या मुद्रा, रंगीबेरंगी वस्त्रालंकार, त-हेत-हेची आभूषणे यांनी त्या आकारांना मनसोक्त नटवतात. ही मूर्ती फक्त थोड्याच दिवसासाठी बनवायची असल्यामुळे टिकाऊपणा आणण्यासाठी कराव्या लागणा-या विशेष प्रयत्नांची गरज नसते. सहज सुलभ मिळणारा कच्चा माल व कलाकुसरीचे सामान यांचा उपयोग करता येतो. त्यामुळे आविष्काराच्या मर्यादा अधिकच रुंदावतात.

उत्सव खाजगी, व्यक्तिगत स्वरूपाचा आहे की सार्वजनिक यावरून त्याचे बजेट ठरते व त्याप्रमाणे मूर्तीचे व सजावटीचे आकारमान. घरगुती उत्सवात एक माणूस सहजपणे उचलू शकेल, घरातील एकाद्या खोलीत ठेवू शकेल इतपत आकाराची, बहुधा पारंपरिक मुद्रा धारण केलेली मूर्ती पसंत केली जाते. त्यासाठी मखर, सिंहासन, पालकी, रथ, झोपाळा किंवा नुसतीच कोनाड्याची चौकट अशी साधी सजावट करतात. तयार सजावटी सुध्दा बाजारात मिळतात, पण निर्मितीचा आनंद घेण्यासाठी बहुतेक लोक शक्यतोंवर स्वतःच ती बनवतात. त्यासाठी विविध आकारातील थर्मोकोलच्या वस्तु व शीट्स, पुठ्टे, रंगीबेरंगी कागद, रंग वगैरे मिळतात. त्यांना उठाव आणण्यासाठी त-हेत-हेच्या माळा, पताका, तोरणे, झुंबर, कळस, कृत्रिम फुले वगैरे सुध्दा मिळतात. आजकाल विजेच्या रोषणाईचे सुध्दा किती प्रकार निघाले आहेत. या सगळ्यांची पहाणी करून निवड करण्यांत, आपल्या परीने नवनवीन आकृत्या बनवून त्यांची जुळवाजुळव करून एक कलाकृती तयार करण्यांत अद्भुत आनंद मिळतो आणि गणरायाच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यासाठी प्रेरणा मिळते.

कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प ६

समाजातील सर्वसामान्य लोकांनी उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून एकत्र यावे,  करमणुकीच्या निमित्ताने त्यांचे सामाजिक तसेच राजकीय प्रबोधन करावे या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्याला शंभरावर वर्षे होऊन गेली. आता इतर अनेक माध्यमे आल्यानंतर या उत्सवात प्रबोधनाला फारसे महत्व राहिले नाही पण लोकांनी एकत्र येणे मात्र सहस्रावधी पटीने वाढत गेले. गणेशोत्सवापूर्वी गोकुळाष्टमीला गोविंदा, नंतर नवरात्रात शारदोत्सव, गरबा व दुर्गापूजा, त्याशिवाय नारळी पौर्णिमा, होली, ईद, ख्रिसमस, नववर्षदिन, महानिर्वाणदिन, अय्यप्पा उत्सव वगैरे अनेक सण हल्ली मोठ्या प्रमाणात सामुदायिक रीत्या साजरे होतात. स्वातंत्र्यदिन व गणतंत्रदिन हे राष्ट्रीय दिनही धूमधडाक्याने साजरे केले जातात, त्या दिवशी प्रशासनातर्फे सजवलेले चित्ररथसुध्दा निघतात. इतर सा-या समारंभांमध्ये सुध्दा प्रेक्षणीय आतिशबाजी, नेत्रदीपक रोषणाई वगैरे असतेच. पण गणपतीच्या उत्सवाचा आवाका इतका प्रचंड असतो की त्याची सर मात्र दुस-या कशालाही येत नाही.

जसजशी लोकसंख्या वाढली आणि लोकांची आर्थिक स्थिती सुधारली तसतशी गणेशोत्सवाच्या आयोजनाची भव्यता वाढत गेली. बरीचशी सभागृहे त्याने व्यापलेली असतातच. भरस्त्यात तसेच दोन बिल्डिंगमधील रिकामी जागा, ओसाड पडलेल्या जागा, मोकळी मैदाने वगैरे मिळेल त्या जागेवर मांडव घालून श्रींची स्थापना होते. गणेशमूर्तींची भव्यता व देखाव्याचा देखणेपणा यांत वेगवेगळ्या मंडळांमध्ये चांगलीच चुरस लागलेली दिसते. पूर्ण मनुष्याकृती प्रतिमा आता सर्वसामान्य होऊन गेल्या आहेत आणि वीस, पंचवीस फुटांचा प्रचंड आकार सर्रास दिसू लागला आहे. गणपतीच्या आजूबाजूला कलात्मक सजावट करण्याशिवाय प्रसिध्द स्थळांची व मोठ्या इमारतींची प्रतिकृती बनवून किंवा ऐतिहासिक, पौराणिक वा सामाजिक प्रसंगांचे दृष्य उभे करून एक तात्पुरती प्रतिसृष्टी निर्माण करण्याकडे कल दिसत आहे. तांत्रिक प्रगतीमुळे चालत्या बोलत्या चलनशील पुतळ्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे महत्वाचे प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडत असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुध्दा अनेक जागी होतो.

प्रचंड आकाराच्या मूर्ती बनवण्यामागे दूरवरून त्या दिसाव्यात, येणा-याजाणा-यांना दुरूनच तिचे आकर्षण वाटावे असा एक उद्देश असायचा. आता मात्र मुंबईत कित्येक जागी त्यांना अनेक पडद्याआड झाकून ठेवतात.  आंत जाण्यासाठी एक चिंचोळा मार्ग ठेवलेला असतो. त्यांत शिरून एखाद्या बोगद्यासारख्या अंधे-या वाटेने आजूबाजूचे इतर देखावे पहात आपण मुख्य उत्सवमूर्तीपर्यंत पोचतो. आजकाल सुरक्षिततेच्या दृष्टीने सगळीकडे जास्तच कडेकोट बंदोबस्त असतो. साहजिकच त्यांना पार करून श्रीपर्यत पोचण्यात बराच वेळ जातो व दर्शनासाठी इच्छुकांच्या लांबलचक रांगा लागतात. यामुळे अनेक वेळा इच्छा असूनसुध्दा प्रत्यक्ष दर्शन न घेता दूरदर्शन व वर्तमानपत्रातील वृत्तांवर समाधान मानावे लागते. त्या मानाने पुण्याला शहराच्या मुख्य भागातून एक फेरफटका मारला तरी अनेक ठिकाणचे सुंदर देखावे पाहिल्याचा आनंद व समाधान मिळते. पुण्याला विसर्जनाच्या दिवशी रस्त्यातून जाणा-या मिरवणुकांमध्ये अनेक ठिकाणचे गणपती पहायला मिळतात. मुंबईत मात्र विसर्जनाच्या अनेक जागा व तेथे जाणारे अनेक मार्ग असल्यामुळे गर्दीमुळे त्यातील एकादीच जागा पाहता योतो. त्यापेक्षा घरबसल्या टीव्हीवरील प्रक्षेपण पाहिले तर मुंबईतले सारे महत्वाचे गणपती दिसतातच. त्याखेरीज पुणे, सोलापूर, नागपूर, इंदूर वगैरे अनेक शहरांमधील गणेशांचे दर्शन होते.

गणेशोत्सवाबद्दल मजेदार माहिती रोज वाचायला मिळते. त्यातील कांही वैशिष्ट्यपूर्ण भाग यापुढील पुष्पांमध्ये येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: