कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प ११

ही लेखमाला मी चार वर्षांपूर्वी लिहिली होती. त्या काळात मी आजारपणामुळे जवळ जवळ अंथरुणाला खिळलेला होतो आणि मला कुठलाच गणेशोत्सव प्रत्यक्ष तिथे जाऊन पहाणे फार कठीण होते. बिछान्यावर पडल्या पडल्या वर्तमानपत्रे वाचून किंवा टी.व्ही पाहून जे दिसले, समजले आणि उमगले तेवढे मधून मधून थोडे खुर्चीत बसून टंकत होतो. गणरायाच्या कृपेने तेवढे मात्र सलग करत राहिलो होतो.  नंतर लवकरच हिंडू फिरू लागलो.

गेल्या दोन आठवड्यात (२००६ साली) वर्तमानपत्रांचे रकाने गणपतीसंबंधित मजकुराने तुडुंब भरून वहात आहेत. बातम्या, लेख, जाहिराती व वाचकांची पत्रे या सर्व ठिकाणी गणरायाचे दर्शन घडते. आधी गणेशोत्सवाची पूर्वतयारी, त्याचे थाटामाटात वाजत गाजत आगमन, उत्सवासंबंधित कार्यक्रम आणि आता विसर्जनाची तयारी, सारे कांही ठळकपणे छापून येत आहे. त्यातील फक्त कांही निवडक वैशिष्ट्यपूर्ण बातम्यांचा थोडा परामर्श या अखेरच्या भागांत घेत आहे.

लालबागच्या राजाने मुंबईमध्ये अग्रगण्यस्थान मिळवलेले आहेच. त्याची महाकाय मूर्ती, आकर्षक कलाकुसर केलेली भव्य व दिव्य आरास, असंख्य भक्तगण, सगळेच कल्पनातीत आहे. या वर्षी त्याचे चरणकमल सोन्याने मढवण्यात आले. त्याची विधिवत स्थापना होण्यापूर्वीच पहाटे तीन वाजतापासून भाविक लोक त्याच्या दर्शनासाठी रांगा लावून उभे होते व दिवसभर ही गर्दी वाढतच गेली. इतकेच नव्हे तर सात आठ दिवस होऊन गेल्यानंतर सुध्दा तिचे नियंत्रण करणे कठिण काम झाले होते, कारण घरचा पांच सात दिवसाचा उत्सव साजरा करून आलेल्या भाविकांची रोज भर पडत होती. काही प्रसिध्द सिनेकलावंत त्याचे दर्शन घेऊन गेले तर विख्यात पार्श्वगायकांनी इथे गणरायाची आरती म्हणून गायनसेवा केली. एवढा विस्तृत लोकाश्रय क्वचितच कोणत्या उत्सवाला मिळत असेल.

लोकांच्या समस्या किती वेगवेगळ्या असतात व त्यातून ते एकमेकाविरुध्द दिसणारे मार्ग कसे काढतात ते दिसले. मुंबईजवळच्या एका खेडेगांवात पूर्वी घरोघरी गणेशोत्सव साजरा व्हायचा. उत्पन्न अपुरे पडत असल्यामुळे कांही लोकांवर ऋण काढून सण साजरा करावयाची पाळी यायची. त्याला आळा घालण्यासाठी कांही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन “एक गांव एक गणपती” ही संकल्पना स्वीकारली व एकत्र सार्वजनिक पूजा सुरू केली. ती अनेक वर्षे चालू आहे व आसपासच्या इतर गांवांनी त्यापासून धडा घेतला आहे. मुंबईजवळच्याच दुस-या एका गांवांत उत्साही लोकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले होते. पण तिथे देवाच्या आराधनेपेक्षा त्यावर वायफळ खर्च, झगमगाट, गोंगाट, गोंधळच जास्त व्हायला लागला आणि त्याला कंटाळलेल्या नागरिकांनी या वर्षी घरोघरी साधेपणाने व भक्तीभावाने उत्सव साजरा केला. एखादी संकल्पना चांगली की वाईट हे तिची अंमलबजावणी कशी होते त्यावर बरीचशी अवलंबून असते.

गणेशाने भारताची भौगोलिक सीमा कधीच ओलांडली आहे. आज जगभर त्याचा उत्सव केला जात आहे. वर दिलेले चित्र इंग्लंडमधील लीड्स इथे निघालेल्या मिरवणुकीचे आहे. त्यात मराठी भाषिकाशिवाय इतर भारतीय तसेच कांही आंग्लसुध्दा सहभागी झालेले दिसतात. इंडोनेशियाच्या चलनी नोटेवर गणपतीचं चित्र छापलेलं असल्याचं नुकतंच वाचलं.

गणेशाच्या मूर्ती बनवणे, रंगवणे, सजवणे, त्यांची विक्री वगैरे कामात सर्वधर्मीय कलाकार व व्यापारी त्यांच्या उत्पन्नाचे साधन म्हणून भाग घेतातच, पण ती मूर्ती घरी आणून हिंदू रिवाजाप्रमाणे तिची पूजा अर्चा करणारे सुध्दा कांही परधर्मीय लोक आहेत. एक वेगळेपण म्हणून त्यांची छायाचित्रासह नांवनिशीवार माहिती वर्तमानपत्रात येते. या वर्षी दोन ठिकाणी तृतीयपंथी लोकांनी आपला वेगळा गणपती स्थापन केला आहे त्याबद्दल आनंद मानावा की विषाद तेच समजत नाही.  दरवर्षी गणपतीबरोबरच पर्यावरणासंबंधी बातम्या नेमाने येतात. त्या दृष्टीने उत्सवाच्या स्वरूपात, विशेषतः विसर्जनाच्या पध्दतीत बदल होऊ लागले आहेत ही एक चांगली गोष्ट आहे.

गणेशोत्सवानिमित्त ही पुष्पमाला लिहायला घेतली तेंव्हा आपण दहा अकरा दिवस रोज काय लिहू शकू असे वाटले होते. पण वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी आणि इंटरनेट या माध्यमांतून घरबसल्या इतकी माहिती मिळत होती की देणा-यांचे हात हजारो दुबळी माझी झोळी अशी अवस्था झाली. त्यातूनच चार दाणे वेचून या मालिकेमध्ये मांडायचे काम केले. गणपती वरील कविता, गाणी, लेख, व्यंगचित्रे अशा इतर माध्यमांमधून त्याच्या विविध रूपांचे जे विलोभनीय दर्शन घडत होते ते वेगळेच. त्यांचा फक्त उल्लेख करणेच शक्य आहे. गेले दोन तीन महिने माझा संगणक आणि इंटरनेट कनेक्शन यांची सतत कांही ना कांही कुरबुर चालली असायची. या अकरा दिवसात मात्र कांही व्यत्यय न येता दोन्ही निर्विघ्नपणे चालत होते ही सुध्दा विघ्नहर्त्याची कृपाच.

. .  . . . . . . . . . . . .  (समाप्त)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: