उंदीरमामाकी जय

कॉलेजमधील शिक्षणासाठी पुण्यात रहात असतांना तिथल्या गणेशोत्सवांच्या मंडपांतील आरास पहात फिरणे हा त्यातील एक अत्यावश्यक भाग होता. विद्येचे दैवत असलेल्या गणेशाचे दर्शन घेतल्याखेरीज कसून अभ्यास करून परीक्षेतले पेपर व्यवस्थितपणे सोडवण्यासाठी चांगली बुद्धी कशी मिळणार? त्यामुळे तत्कालीन पुण्यातले जवळपास सारे गणपती त्या काळात आवर्जून पाहून येत होतो. नोकरीमुळे मुंबईला स्थाईक झाल्यावर सुरुवातीच्या काळात तिथले प्रसिद्ध गणपती पहायला जात होतो. पण दूर उपनगरात राहून शहरातले गणेशोत्सव पहायला जाणे कठीण होत असे. त्यासाठी करावी लागणारी दगदग दिवसेदिवस वाढत गेली आणि त्या मानाने मनातला उत्साह कमी होत गेला. त्यामुळे अखेरीस फक्त आपल्या उपनगरातले गणपती तेवढे पाहिले जाऊ लागले.

मुंबईतल्या गणेशोत्सवातील गजाननाच्या मूर्तींचे आकार अवाढव्य असतात तसेच त्यांच्या रूपात प्रचंड विविधता असते. ज्या पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक विषयावरील देखावा करायचा त्यातील प्रमुख पात्राला हत्तीचे तोंड लावून गणपतीला एक वेगळे रूप सर्रास दिले जाते. श्रीराम, श्रीकृष्ण, दत्तात्रेय, वेंकटेश वगैरे रूपांचे गणपती तिथे पहायला मिळतात. पुण्याला मात्र असे महाकाय आकाराचे गणपती सहसा दिसत नाहीत. दुरून सहज दिसू शकतील एवढ्याच मोठ्या आकाराचे गणपती देखाव्यातील प्रसंग तटस्थपणे पहात एका बाजूला आपल्या सिंहासनावर शांतपणे विराजमान झालेले असतात. त्यांच्या साक्षीने घडत असलेल्या देखाव्यांमध्ये मात्र पुण्यात खूपच कल्पकता दिसते.

मुंबईला एक दोन गणेशोत्सवातले देखावे पहाण्यातच सगळी संध्याकाळ निघून जात असल्यामुळे त्यातून मनाचे समाधान होत नाही. पुण्याला एकापाठोपाठ एक देखावे पहात फिरण्यात जी मजा येते ती तिथे येत नाही. त्यामुळे त्यासाठी पुण्याला जाण्याची इच्छा दरवर्षी होत असे पण आपल्या घरातल्या गणपतीचे विसर्जन करून आवरासावर केल्यानंतर पुण्याला जाण्यासाठी वेळ काढणे कठीण होत असल्यामुळे क्वचितच त्या इच्छेची पूर्ती होत असे. एका वर्षी आम्ही आपला घरचा गणेशोत्सवच पुणे मुक्कामी करायचे ठरवले आणि त्यासाठी गेले दोन आठवडे पुण्याला तळ ठोकून बसलो.

मुंबईचा माझा संगणक सखा पुण्याला उपलब्ध नसल्यामुळे या सदरासाठी कांही लिखाण मात्र करणे शक्य होत नव्हते. तसा एक मांडीवरला संगणक तिथे हाताशी होता, पण त्याला मराठी भाषा समजत नव्हती. त्यामुळे उंदीरमामाला (माऊसला) हाताशी धरून आंतर्जालावर भटकंती करायची आणि जो प्रसाद हाती लागेल त्याची खिरापत आपल्या वाटीतून द्यायची एवढेच करणे शक्य होते. या परिस्थितीची पूर्वकल्पना असल्यामुळे त्यासाठी सोयिस्कर असा कृष्णगीतांचा विषय निवडून त्या विषयाचे सूतोवाच मी मुंबईलाच करून ठेवले होते आणि त्यामधील पुष्पे इथे आल्यावर गुंफीत गेलो. पण इथले सर्व वातावरणच गणपतीमय झालेले असल्यामुळे गणेशोत्सवात त्याला अग्रपूजेचा मान देणे आवश्यक वाटले. त्यामुळे उंदीरमामाला आणखी थोडे फिरवून गजाननाच्या चित्रमय गीतांची एक वेगळी मालिका बनवली व कृष्णगीतांच्या जोडीने त्यातील पुष्पे वहात गेलो.

त्यापूर्वीच्या वर्षी या दिवसात मी अंथरूण पकडलेले होते आणि घरबसल्या प्रसारमाध्यमांच्या सहाय्यानेच मिळतील तेवढी गणपतीची रूपे पाहू शकत होतो. त्यामुळे हाच विषय घेऊन मी ‘कोटी कोटी रूपे तुझी’ ही मालिका तयार केली आणि गजाननाच्या कृपेने ती सलगपणे प्रदर्शित करू शकलो. त्यानंतरच्या वर्षीसुद्धा माझ्या संगणकाच्या आधाराशिवायच उंदीरमामाच्या मदतीने हे काम करता आले ही सुद्धा त्याचीच कृपा.

गणपती बाप्पा मोरया!   मंगलमूर्ती मोरया!   उंदीरमामाकी जय!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: