गणेशोत्सव आणि पर्यावरण

दरवर्षी जेंव्हा गणेशोत्सव जवळ येत जातो तेंव्हा त्यापासून पर्यावरणावर होणारा दुष्प्रभाव टाळण्यासाठी काय करायला हवे याबद्दल सर्व माध्यमांमध्ये जोरात चर्चा सुरू होते. समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने ही तशी चांगली गोष्ट आहे आणि त्याचे प्रमाण सुदैवाने वाढत आहे. या वर्षी गणेशोत्सवासंबंधी एकंदर जेवढ्या बातम्या आणि लेख वर्तमानपत्रात वाचण्यात आले त्यातील निम्म्याहून अधिक पर्यावरणाशी संबंधित असावेत. खालील प्रकारचे मुद्दे या लेखात मांडले गेले होते.

गणेशाची मूर्ती फार मोठी असल्यास ती समुद्राच्या पाण्यात बुडून रहात नाही आणि विरघळतही नाही. त्यामुळे तिचे खंडित भाग किना-यावर येण्याचे प्रमाण वाढते, हा तिच्या अहेतुक विटंबनाचा प्रकार आहे. नदीच्या पात्रात यापूर्वीच लोक फार विशालकाय मूर्तींचे विसर्जन करत नव्हते. पण ते केल्यास त्यातून भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मूर्ती जितकी मोठ्या आकाराची असेल तेवढा त्याचा पर्यावरणावरील प्रभाव जास्त या विचाराने मूर्तीचा आकार बेताचा ठेवावा. खुद्द मुंबईच्या महापौरांनी असा नियम करण्याची मागणी केली होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही.

प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे द्रव्य वाळल्यानंतर सिमेंटसारखे कठीण बनते, ते पाण्यात विरघळत नाही, त्याचे तुकडे माशाच्या पोटात गेल्यास त्याला अपाय करते. नदीच्या किना-यावरील जमीनीत पसरल्यास त्या जमीनीचा कस कमी होतो, तिथे येणा-या पिकांवर परिणाम होऊ शकतो  वगैरे कारणामुळे मूर्ती तयार करतांना त्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करू नये.

शाडू मातीच्या गणपतींच्या मूर्तीची परंपरा महाराष्ट्रात पूर्वीपासून चालत आलेली असल्यामुळे सरळ सरळ त्याच्या विरोधात सहसा कोणी जात नाहीत. उलट शाडू मातीच्या गणपतीचा पुरस्कारच करतात. पण ती मातीच आता महाराष्ट्रात कोठे मिळत नाही, दूरच्या प्रांतांमधून ती आयात करावी लागते. ती पाण्यात विरघळत असली तरी पिकांना उपयुक्त नाही तसेच पाण्याबरोबर पिण्यात आल्यास जलचरांना व माणसांनाही हानीकारक ठरू शकते. मूर्ती रंगवण्यासाठी वापरली जात असलेली रसायने तर निश्चितच विषारी असतात वगैरे त्याबद्दल बोलले जाते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास गणेशोत्सवासाठी वेगळ्या मूर्तीची स्थापनाच केली नाही तर तिचे जलाशयात विसर्जन करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यामुळे पर्यावरणाला हानी पोचणार नाही.

कोठल्याही जागी जेवढ्या आकाराची मूर्ती असेल त्याच्या कित्येक पट आकाराची सजावट त्याच्या आसपास केलेली असते. तिचे रीतसर पाण्यात विसर्जन केले जात नसले तरी उत्सव संपल्यानंतर त्याचे सगळे सामान चहूकडे फेकून दिले जाते. त्यातील थर्मोकोल आणि प्लॅस्टिक हे पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत की कुजत नाहीत, जमीनीत गाडले तरी वर्षानुवर्षे तसेच पडून राहतात, कुठलेच पशुपक्षी किंवा किडेमुंग्यासुध्दा त्यांना खात नाहीत, त्यांनी चुकून खाल्ले तर ते जीवच नष्ट होतात, हे पदार्थ पाण्याबरोबर वहात जाऊन त्याच्याच प्रवाहात अडथळे निर्माण करतात, त्यामुळे पावसाळ्यात गटारे व नाले तुंबतात, माणसांच्या वस्त्यांत पाणी शिरते व प्रचंड हानी करते वगैरे भयानक चित्र या लेखांमध्ये रंगवले जाते. त्यात दिलेल्या विधानांचा प्रत्ययही कधी कधी येतांना दिसतो. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि थर्मोकोल यांच्या सजावटीमध्ये होणा-या वापरावर बंदी घालावी इथपर्यंत प्रतिपादन केले जाते.

या विघातक वस्तूंऐवजी कागद व पुठ्ठा यापासून सजावट करावी असा विचार आज मांडला जातो. खरे तर थर्मोकोल येण्यापूर्वी याच वस्तूंचा उपयोग सर्रास होत असे आणि तेंव्हा त्या गोष्टींवर टीका होत असे. कारण कागद किंवा पुठ्ठा तयार करण्यासाठी जो लगदा लागतो तो बनवण्यासाठी प्रचंड प्रमाणात वृक्ष तोडले जात होते आणि आजही ते तोडले जात आहेत. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा विचार करता माणसाने कुठल्याही कारणासाठी कागदाचा उपयोग करणे शक्यतो टाळावे असा एक विचार प्रवाह जोरात चालला आहे. पेपरलेस ऑफीसेसचे महत्व वाढत चालले आहे. तेंव्हा सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात कागदाचा उपयोग करणे हेसुध्दा पर्यावरणाला घातकच आहे.

पाने, फुले, फळे यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचाच उपयोग सजावट करण्यासाठी करावा असा एक विचार हळू हळू जोर धरतो आहे. पण एक तर या सर्व वस्तू नाशवंत असतात, त्यामुळे रोजच्या रोज नव्याने सजावट करावी लागेल आणि दुसरी जास्त महत्वाची गोष्ट अशी आहे की सामान्य माणसाला ज्या गोष्टी स्वतःसाठी घेणे परवडत नाही अशा गोष्टी निव्वळ सजावटीसाठी वापरून त्यांची नासाडी करणे कोणालाही मान्य होणार नाही. 

यातून कांही पर्याय मांडले जातात. वर दिल्याप्रमाणे उत्सवासाठी वेगळी मूर्तीच बसवली नाही तर तिच्यासाठी सजावटही लागणार नाही. लहान आकाराची मूर्ती आणली तर सजावटही कमी लागेल. एक गांव एक गणपती यासारख्या मोहिमा राबवल्या तर गणपती आणि त्याची सजावट यांत मोठी संख्यात्मक घट होईल वगैरे वगैरे. यांतले सगळे मुद्दे बुध्दीला पटणारे असतात आणि कोणीच त्याला उघडपणे विरोध करतांना दिसत नाही. कांही लोक या कल्पना प्रत्यक्षात आणतात आणि त्यांची मोठी बातमी छापून येते. याचाच अर्थ ते सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे वागतात. सर्वांनीच नवी धोरणे स्वीकारली असती तर पेपरवाले कोणाकोणाची बातमी देणार? निदान माझे कुटुंबीय, मित्रमंडळी, शेजारी वगैरेतल्या कोणाही ओळखीच्या सद्गृहस्थाचा समावेश त्यात झालेला मला दिसत नाही आणि आजूबाजूचे वातावरण पाहता सार्वजनिक तसेच खाजगी उत्सव, त्यासाठी केली जाणारी सजावट आणि त्यात केला जात असलेला आक्षेपार्ह वस्तूंचा वापर यांत दरवर्षी वाढच होतांना दिसते आहे.

पर्यावरणाबद्दल काळजी व्यक्त करणारे इतके लेख आणि त्यासंबंधीचा प्रचार व बातम्या वाचूनसुध्दा त्याचा समाजावर परिणाम कां होत नाही ? बहुतेक लोक ते वाचतच नसतील किंवा वाचून वाचून वैतागले असतील. अशा लोकांच्या मनात आलेल्या नाराजीला ठिणगी लावायचा उद्योगही कांही लोक करतात. “हा सगळा विरोध फक्त हिंदूंच्या सणांनाच कां? अंगात हिम्मत असेल तर ईद किंवा ख्रिसमसवर निर्बंध घालून पहा. कांहीतरी निमित्य काढून हिंदूंच्या मूर्तीपूजेला बदनाम करण्याचे हे कुटील कारस्थान आहे. सर्व हिंदूंनी हे हाणून पाडले पाहिजे.” अशा प्रकारची वक्तव्ये करणारे लोकही आहेत आणि त्यांनाही टाळ्या पडतात.

यातल्या कांही गोछ्टींचे विवेचन पुढील भागात पाहू.
(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: